फॉलोअर

मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०१४

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ६. आरमार... भाग १

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ६. आरमार...
भाग १
"आरमार म्हणजे स्वतंत्र येक राज्यांगच आहे. जैसे ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे... तसेच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र... याकरीता आरमार अवश्यमेव करावे." अशी भूमिका मांडणाऱ्या व त्यावर वाटचाल करणाऱ्या श्री शिवछत्रपति महाराजांची दूरदृष्टि थक्क करून सोडते. इंग्रजी इतिहासकारांनी लिहून ठेवल आहे 'बरे झाले हा शिवाजी डोंगरी मूलखात जन्मला. जर हा सागरकिनारी जन्मता तर आमच काही खरे नव्हते.'
मध्ययुगात आरमार आणि सागरी व्यापार यांची खंडीत झालेली परंपरा सुरु केली ती शिवरायांनी. १६५७च्या आसपास कल्याणमधील दुर्गाडी येथे पहिला जहाज बांधणीचा प्रयत्न त्यांनी केला तेंव्हा कोकणच्या संपूर्ण किनारपट्टीवर इंग्रज, पोर्तुगीझ, सिद्दी, काही प्रमाणात मुघल आणि आदिलशाहाचे वर्चस्व होते. परकीयांचा कावा शिवरायांनी त्वरीत ओळखला होता. एका पत्रात ते म्हणतात,"सावकारांमध्ये फिरंगी (पोर्तुगीझ), इंग्रज, फरांसीस (फ्रेंच), डिंगमारांदी (डच?) टोपीकर हेहि सावकारी करितात. ते वरकड सावकारांसारखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्यक प्रत्यक राज्याच करितात. त्यांचे हुकुमाने त्यांचे होतात्से हे लोक या प्रांती सावकारीस येतात. राज्य करणारांस स्थळलोभ नाहीं यैसें काय घडो पाहाते?" हिच दूरदृष्टी इतर सत्तांनी दाखवली असती तर इतिहास आज वेगळा असता.. खुद्द मराठ्यांच्या उत्तराधिकाऱ्यान्ना हे कितपत उमगले माहीत नाही. नाहीतर त्यांनीच मराठ्यांचे आरमार उध्वस्त केले नसते.
कोकणात शिरून स्थावर व्हायची संधी राजे शोधत होते. ती संधी त्यांना १६५६ च्या जानेवारीमध्ये मिळाली. औरंगजेब बादशहा व्हायला दिल्लीला रवाना होत होता. तिकडे विजापुरला अली आदिलशाह मरण पावला होता. योग्य संधीचे सोने करत राजांनी जावळी मारली. मोरेचा पाठलाग करत थेट कोकणात उतरून रायरी काबीज केली. राजांसाठी कोकणद्वार खुले झाले. उत्तरकोकणचा आदिलशाही भूभाग विजापुरपासून जावळीमुळे विभागला गेला. आता राजे १६५७ मध्ये उत्तर कोकणात उतरले आणि त्यांनी कल्याण, भिवंडी आणि माहुली परिसर जिंकून घेतला. याशिवाय सुधागड़, सरसगड़, तळागड़, सुरगड़ हे किल्ले सुद्धा मराठ्यान्नी सहज जिंकून घेतले. या भागाची जमीनीकड्ची बाजू आधीपासूनच मराठ्यांच्या ताब्यात होती. आता गरज होती ती तिची पश्चिम म्हणजे सागरीबाजू संभाळण्याची. सिद्दीवर अंमल आणायचा असेल तर त्याच्या इतकेच बलवान आरमार हवे हे ओळखायला राजांना वेळ लागला नाही. तशी तयारी १६५७ पासून दुर्गाड़ी येथे सुरू झाली. विविध प्रकारच्या युद्धनौका बांधायला निष्णात तंत्रज्ञ आणि तसेच कुशल कारागीर लागणार म्हणून राजांनी पोर्तुगीझांकडे मदत मागितली. ते आधी तयार झाले मात्र नंतर हेच आरमार आपल्या अंगावर शेकेल ह्या भीतीने त्यांनी मदत करायला नकार दिला. पण म्हणून राजे थोडीच स्वस्थ बसणार होते. त्यांनी जहाज बांधणीचा उद्योग सुरूच ठेवला. राज्याचे एक नवे अंग सजू लागले.

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ३. लष्करी व्यवस्था ... ! भाग ३

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ३. लष्करी व्यवस्था ... !
भाग ३
मराठ्यांच्या युद्धतंत्रात महत्वाचे स्थान होते ते घोडदळाला. त्या मागोमाग पायदळ. तोफखाना विभाग होता पण तो पायदळ अंतर्गत आणि तो गड़-किल्ल्यांवर स्थिर असे. फौजेसोबत फिरता नसे. मराठा घोडदळाने दिवंगत किर्ती प्राप्त केली होती. इतकेच नव्हे तर शत्रूने त्यांची प्रचंड भिती घेतली होती. विजापुरचा कवी नुस्नाती त्याच्या 'अलिनामा' मध्ये म्हणतो,"मराठ्यांच्या घोडयाना जणू पंख होते. एक-एक घोड़ा सैनिकांपेक्षा ही वरचढ़ होता. मराठ्यांची प्रत्येक घोडी म्हणजे जणू परीच. ती चंद्राची सखी असते. मराठा वीर जेंव्हा काव्याने लढू लागतो, तेंव्हा सारे विश्व नदीच्या भोवऱ्यात सापडल्यागत होते. मराठा शिपाई रणावर तळपू लागला म्हणजे जणू तो वाऱ्याशी गुजगोष्टी करीत असतो. अश्यावेळी त्याचे मुंडासे हात-हात वर उड़ते; धरती त्याच्या हालचालीने डळमळू लागते." पुढे तो म्हणतो,"वाऱ्याचाही शिरकाव होणार नाही अश्याही स्थळी मराठे सैनिक जाउन पोचतात. किंबहुना अश्या ठिकाणी प्रवेश करणे मराठ्यांच्या घोडयाना एक प्रकारचा खेळ वाटतो. या लष्कराने आणि शिवाजीने आकाशाशी स्पर्धा करणारे उंच-उंच गड़ चढून काबीज केले. जहाजत बसूनही मराठे लढले आणि त्यांनी फिरंग्यान्ना धाक बसवला. त्यांच्या वर्दळीमुळे समुद्रावर नेहमीच तूफ़ान येत राहिले."
दक्षिणदिग्विजय मोहिमेदरम्यान फ्रेंचमन मार्टीन आपल्या डायरीमध्ये अशी नोंद घेतो -
'Quick Cavalry movements & excellent, well-paid intelligent services were the main cause of Shivaji’s success. He also mentioned about simplicity of Shivaji’s camp, absence of women, and lack of heavy baggage. He also observed that horsemen in cavalry were paid regularly & that they did not own horses. The horses were property of state. What a contrast to the slow moving, Mansabdari – ridden Mughal armies.'
“He also frequently surprised his enemies who thought him to be far off when he fell upon them. The families of these cavalries who belong to these parts were stationed in the lands of the west coast of India. This is what attached them to his service. This chief also paid his spies liberally who have given him considerable facilities for his conquest by the sure information they have supplied him.”
थोडक्यात मराठ्यांचे युद्धतंत्राचे ब्रीद होते - 'मति कुंठित करणारा वेग आणि अक्कल गुंग करणारी चपळाई.' याला दिले गेलेले नाव म्हणजे 'गनिमी कावा'. पण गनिमी कावा म्हणजे नेमके काय?..
सांभार : संदर्भ - सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे (लेखक- रामचंद्रपंत अमात्य), शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी), छत्रपती शिवराय - पत्ररूप व्यक्तीदर्शन - डॉ. रामदास, अथातो दुर्गजिज्ञासा (लेखक- प्र. के. घाणेकर)

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ५. परराष्ट्रीय धोरण... भाग १

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ५. परराष्ट्रीय धोरण...
भाग १
शिवरायांचे राज्यकारभार विषयक नेमके धोरण काय होते??? याबाबत काही जाबते आपण आधीच्या भागात पाहिले आहेतच. त्यांनी 'अरिमित्र विचक्षणा' कशी केली होती? स्वराज्य सुरवातीपासूनच चहुकडून शत्रुपक्षाने घेरलेले होते आणि राज्याला अंतर्गत शत्रू देखील खूप होते. ह्या दृष्टीने राजांनी परराष्ट्रीय धोरण कसे ठरवले आणि कसे राबवले हे समजून घेणे महत्वाचे आहे.
अरि म्हणजे शत्रू किंवा जवळ ज्याचे राज्य तो. तर मित्र म्हणजे अर्थात सुहृदय. कौटिल्य अरिमित्राचे ६ प्रकार सांगतो.
१. सहज शत्रू - राजाचे नातलग आणि सिमेलगतचे राष्ट्र.
२. कृत्रिम शत्रू - आपल्या विरोधात जाउन इतर राज्यांना सुद्धा विरोध करण्यास भाग पाडणारा.
३. सहज मित्र - सिमेलगतचे राष्ट्र सोडून अन्य राज्यांचा राजा.
४. कृत्रिम मित्र - लाभ संपादन करण्याच्या दृष्टीने मैत्री ठेवणारा.
५. मध्यम - संधीविग्रहात अनुकूल असलेला.
६. उदासीन - बलवान असून मैत्री ठेवणारा.
स्वराज्य हे आदिलशाही मुलुख जिंकून वाढीस लागले असल्याने ते साहजिकच सहज शत्रू राष्ट्र होते. शिवाय मुघल सुद्धा स्वराज्याचे सहज शत्रू होतेच. पण आत्ता शत्रू असणारे राज्य नंतरच्या काळात कृत्रिम मित्रराष्ट्र सुद्धा बनू शकते. मुघलांशी १६६५ मध्ये तर आदिलशाही बरोबर १६७७-७८ मध्ये राजांनी ही भूमिका घेतली होती. मुघल, आदिलशाही, क़ुतुबशाही, इंग्रज आणि पोर्तुगीझ या ५ राज्यांबरोबर शिवरायांनी कसे राजकारण केले ते आपण आता बघू.
मुघल -
स्वराज्याच्या सुरवातीच्या काळात मुघलांनी मराठ्यांकडे कृत्रिम मित्र म्हणुन पाहिले होते. आदिलशाही पोखरली जाते आहे ह्याचा त्यांना फायदाच होत होता. पण १६५७ मध्ये मराठ्यांनी जुन्नर आणि नगर येथे हल्ले करून मुघलांचे शत्रुत्व ओढावून घेतले आणि मग ते बनले सहज शत्रू. उत्तरेला स्वराज्याची सीमा आता थेट मुघलांशी भिडली होतीच. कल्याण-भिवंडी या उत्तर कोकणावरील आक्रमण आणि अफझलखान वधानंतर तर मुघल थेट चाल करून आले. १६६०-१६६३ ही ४ वर्षे खुद्द शास्ताखान पुण्यात तळ ठोकून होता. सर्व व्यर्थ आहे हे कळल्यानंतर अधिक मोठी मोहिम मिर्झाराजा घेउन आला आणि पुरंदरचा तह घडला. या तहाने मुघल मराठ्यांचे कृत्रिम मित्र बनले. अर्थात त्यांचा सहज शत्रू असलेल्या आदिलशाहीचा पाडाव करायला. पुढे मात्र १६७० मध्ये जिझिया कर, उत्तर हिंदूस्थानमधील मंदिरांवरील आक्रमणे या व अनेक बाबींमुळे हा तह मोडला आणि मराठे-मुघल पुन्हा एकदा समोरा समोर आले. मुघलांशी मराठ्यांचे असलेले संबंध असे बदलत गेले. पुरंदरच्या तहाचा एक महत्वाचा परिणाम म्हणजे आदिलशाहीला सुद्धा आपण मुघलांविरोधात मराठ्यांशी मैत्री का करू नये ही जाणीव झाली. ह्यातून पुढे १६७७ मध्ये मराठे - आदिलशाही तह घडला.
छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ४. युद्धतंत्र ... !
भाग २
मराठा पायदळ सुद्धा अश्याच तंत्राचा वापर करून शत्रूला हैराण करून सोडे आणि गुढगे टेकण्यास भाग पाडे. शत्रू बेसावध असताना अचानक हल्ला करणे आणि आपली सैन्यसंख्या कमी असून देखील ती जास्त आहे असे भासवणे असे विशिष्ट तंत्र वापरून शिवरायांनी सुरवातीच्या काळात शत्रुवर विजय प्राप्त केले. ह्या सर्वात 'वेग' हा मूलभूत महामंत्र आणि सोबत असते अखंड सावधानता.
पण गनिमी काव्याचे हे युद्ध खरच किती योग्य आहे??? प्राचीन भारतीय राजनीतीमध्ये कुठ-कुठली युद्धतंत्रे सांगितली गेली आहेत?
प्राचीन भारतीय राजनीतीमध्ये युद्धाचे ३ प्रकार नमूद केलेले आहेत. १. प्रकाशयुद्ध, २. कूटयुद्ध आणि ३.तूष्णीयुद्ध. यामध्ये तूष्णीयुद्ध हे निषिद्ध मानलेले आहे. तर प्रकाशयुद्ध म्हणजे उभय पक्ष काळ-वेळ ठरवून जेंव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतात ते. प्रकाशयुद्ध हे 'धर्मिष्ट' असल्याचे स्पष्ट असले तरी कूटयुद्ध सुद्धा 'अधर्मिष्ट' नसते.
जेंव्हा कुठल्याही एका पक्षास प्रकाशयुद्ध करणे शक्य नसते तेंव्हा कूटयुद्ध करावे असे कौटील्य सांगतो. जसे... शत्रूचे सैन्य आपल्यापेक्षा संखेने वरिष्ठ असेल पण युद्धक्षेत्र आपल्याला अनुकूल असेल तर कूटयुद्ध करावे. शत्रु सैन्य नदी पार करत किंवा डोंगर उतरत-चढत असेल तरी त्यावर हल्ला करावा. कौटील्य सांगतो की, 'गिरीदुर्ग, वनदुर्ग, कंटककिर्ण अरण्य, पाणथळ जागा, गिरीशिखरे, उंचसखल भूभाग हे प्रकाशयुद्धाने हाती लागत नाहीत. ह्यासाठी कूटयुद्ध करावे. पुढे तो म्हणतो,'वादळी वारा सुटला असताना, वातावरण धुक्याने भरलेल असताना शत्रू स्थळावर आक्रमण करावे, रात्रीच्या वेळी देखील हल्ले करावेत.'
छत्रपति शिवरायांनी याच कूटयुद्धनीतीचा पुरेपुर वापर करत शत्रूला पराजीत केले. आपण त्याला आज 'गनिमी कावा' म्हणतो इतकेच. संख्येने सदैव कमी असलेल्या मराठा सैन्याला विजय प्राप्त व्हावे म्हणुन त्यांनी लढाईची रणक्षेत्रे अनुकूल निवडली. शत्रु जर आपल्या प्रतिकूल रणक्षेत्रामध्ये असेल तर स्वतः शत्रूला अनुकूल न होता शत्रूला आपल्या अनुकूल रणक्षेत्रामध्ये खेचून आणणे यात त्यांचे कौशल्य होते. उदा. अफझलखान प्रकरण. वाई येथे बसलेल्या खानास राजांनी हरप्रयत्ने जावळीच्या जंगलात खेचून आणलेच. अनुकूल रणक्षेत्र निवडताना शिवरायांनी एक पथ्य नियमितपणे पाळले ते म्हणजे लढाई स्वराज्याच्या भूमीत शक्यतो होऊ द्यायची नाही. (अपवाद - पुरंदरचे युद्ध.) कारण उभय पक्षात लढाई झाली की विजय कोणाचाही होवो नुकसान हे सामान्य जनतेचे होते. पिके जाळली जाणे, घरे लुटणे असले प्रकार सर्रास होत असत. कधीही भरून येणार नाही अशी हानी होत असे.
कूटयुद्धामध्ये वापरले जाणारे अजून एक प्रभावी तंत्र म्हणजे 'बेरीरगिरी' - म्हणजे फिरती लढाई. लढाई करता-करता एका जागी न थांबता रणक्षेत्र थोड्या अंतराने बदलणे आणि शत्रूला पांगवणे. त्यानंतर चहुबाजूने हल्ले करून हैराण करणे. (उदा. जालना, खानदेश येथील हल्ले १६७९) दुसरे अजून एक तंत्र म्हणजे रात्री चालकरून शत्रू जवळ पोचणे आणि भल्या पहाटे शत्रुवर हल्लाबोल करणे. हे तंत्र तर मराठ्यांनी कैक वेळा वापरले. तानाजी मालुसरे यांनी घेतलेला सिंहगड(१६७०), कोंडाजी फर्जंद यांनी घेतलेला पन्हाळा(१६७३), प्रतापराव - आनंदराव यांचे बहलोलखानाबरोबरचे उमराणीचे युद्ध, मोरोपंत - प्रतापराव यांचे मुघलांविरूद्धचे साल्हेरचे युद्ध अशी अनेक उदाहरणे आहेत.
गनिमी काव्यामध्ये सर्वात महत्वाचे असतात त्या 'लष्कराच्या गतिमान हालचाली' आणि 'शत्रुवर अनपेक्षित आक्रमण.' शिवरायांनी लालमहालामध्ये शाहिस्तेखानावर केलेल्या हल्याने संपूर्ण भारत अचंभीत झाला. विजापुरचा कवी नुस्नाती त्याच्या 'अलिनामा' मध्ये म्हणतो,'पापणी लवण्यास जेवढा अवधी लागत नाही, खालचा श्वास वर येण्यास जितके क्षण लागतात तेवढ्या कालावधीत एखाद्या भुजंगाने झडप घालावी तदवत शिवाजीने शास्ताखानावर हल्ला केला.'
कूटनितीच्या प्राचीन युद्धतंत्राचे पालन करत छत्रपति शिवरायांनी विजयाची एक मोहोर दख्खनेवर उमटवली. एका नव्या साम्राज्याचा पाया निर्माण केला. पण ह्या सर्वांसोबत चोख लष्करी व्यवस्था, दुर्गमदुर्ग बांधणी आणि कोशबल यांची योग्य सांगड घातली.

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ४. युद्धतंत्र ... ! भाग १

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ४. युद्धतंत्र ... !
भाग १
मराठ्यांचे युद्धतंत्राचे ब्रीद होते - 'मति कुंठित करणारा वेग आणि अक्कल गुंग करणारी चपळाई.' याला दिले गेलेले नाव म्हणजे'गनिमी कावा'. पण गनिमी कावा म्हणजे नेमके काय??? हे नाव कोणी ठेवले? कसे पडले? म्लेच्छांसाठी गनिम म्हणजे मराठे. तर कावा म्हणजे कपटाने केलेला हल्ला. थोडक्यात शत्रुने आपल्या लढाईच्या पद्धतीला दिलेले हे नाव इतकी ढोबळ माहिती आपल्या सर्वांना असते. पण मराठ्यांचे युद्ध तंत्र इतकेच होते का??? ह्याच तंत्रावर त्यांनी साल्हेरी पराक्रम गाजवला??? दक्षिण दिग्विजय फत्ते केला? पुढे दिल्लीवर कब्जा मिळवला??? उत्तर अर्थात 'नाही' हेच आहे. मराठ्यांचे स्वतःचे असे एक विकसीत तंत्र होते. त्याबद्दल आपण थोड़ी माहिती घेउया पण त्याआधी 'गनिमी कावा' या शब्दाबद्दल थोड़े अधिक जाणून घेउया.
कावा म्हणजे कपट, हुलकावणी असे त्याचे सरळ अर्थ असले तरी त्याचा अजून एक अर्थ आहे तो म्हणजे 'घोड्याची रग जिरवण्यासाठी त्यास वेगाने घ्यावयास लावलेले फेरे'. अधिक स्पष्टपणे सांगायचे तर घोड़ा वेगाने वाटेल तसा वळवणे, फिरवणे आणि मंडल, फेर किंवा घिरटी घेत वेगाने पुढे नेणे. आता ह्या मधून काव्याबद्दल अधिक योग्य माहिती हातात येते. मराठ्यांचे घोड़े हे अश्या प्रकारच्या तंत्रात तरबेज केलेले होते. वेग कमी करून घोड़ा हवा त्या दिशेला वळवणे कोणालाही जमेल पण वेग कमी न करता घोड़ा हव्या त्या दिशेला वळवणे हे कठीण काम असते. कारण वेग मंदावून मोहरा बदलल्यास शत्रूला आपली पुढची चाल सहज समजू शकते तेंव्हा घोडेस्वार कोणत्या दिशेला वळणार आहे ह्याचा अंदाज शत्रूला बांधू न देता मोहरा बदलणे अतिशय महत्वाचे असते.
अश्या प्रकारची अनपेक्षित वळणे वेग मंद न करता घेत काव्याच्या ह्या तंत्रात तरबेज असलेले मराठे घोड़े आणि घोडेस्वार शत्रूला बरोबर चुकवीत असत. आणि काव्याच्या लढाईमध्ये शत्रूची दिशाभूल हे प्रमुख उद्दिष्ट मराठा सैनिक साध्य करत असत. सर्वच बाबतीत वरचढ असलेल्या शत्रुपक्षाला पराजीत करण्यासाठी मराठ्यांनी हे युद्ध तंत्र वापरात आणले होते. अश्या वेगवान हल्यांमुळे शत्रुपक्षात मुसंडी मारत मराठा फ़ौज घुसे आणि शत्रु फळीमध्ये खिंडार पाडून लगेच परत फिरत असे. गोंधळलेल्या शत्रूच्या पिछाडीवर दुसरी तुकडी हल्ला करत असे आणि शत्रुला मागे फिरून मोहरा बदलवण्यास भाग पाडत असे. आता शत्रुच्या डाव्या-उजव्या बाजूवर हल्ले केले जात आणि शत्रूची पूर्ण फळी विस्कळीत केली जाई. याला 'Pincer Movement' असे म्हणतात.
छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ३. लष्करी व्यवस्था ... !
भाग २
स्वराज्याच्या पहिल्या तपात माणसे जोड़णे, त्यांच्यात ध्येय निर्माण करून लष्करी आणि मुलकी व्यवस्था लावणे हे काम शिवरायांनी तडीस लावले. आवशक्यता असेल तेंव्हा स्वतः मोहिमेचे नेतृत्व करून सैन्यात उमेद आणि उत्साह निर्माण केला. लाखभर फौजा उभ्या करून सुद्धा त्यांनी कुठल्याही लढाईमध्ये निम्यापेक्षा अधिक सैन्य कधीच गुंतवले नाही. कौटिल्यच्या अर्थशास्त्रानुसार राजाने आपले सैन्याचा चौथा भाग युद्धात गुंतवू नये असा नियम लिहिला आहे. शिवरायांनी हेच धोरण अंगीकारले आहे असे दिसते. या शिवाय 'माणूस ख़राब होवू नये' याची ते नेहमीच दक्षता घेत. ह्याचमधून निर्माण झाले मराठ्यांचे एक विलक्षण युद्धतंत्र. अफझलखान मोहिम असो नाहीतर पुरंदरची लढाई प्रकर्षाने हेच पुढे येते. माणूस ख़राब होवू नये म्हणजे सैन्य जाया होवू नये म्हणुन त्यांनी पुरंदरची लढाई थांबवून तह स्वीकारला.
फ्रेंचमन मार्टीन आपल्या डायरीमध्ये म्हणतो,
"Shivaji was an outstanding General of his age. He was aware of his limited resources & cousious about huge resources of his enemies. So tool full advantage of every single weakness of enemy. He watched their movements & managed to corner them into difficult positions. Time & again he broke the combinations of enemies by driving a wedge between them. His campaigns in Baglana in 1670-1672 were a masterpiece of war strategy."
राजांनी सैन्यात एक शिस्त निर्माण केली. सैन्यासंबंधी निरनिराळ्या तजविजींवर शिवरायांचे बारकाईने लक्ष्य असे, त्याचप्रमाणे आपल्या सैन्याकडून रयतेला यत्किंचितहि उपसर्ग होऊ नये म्हणून ते प्रचंड दक्ष असत. राजाभिषेकाच्या थोड़े आधी म्हणजे १६७४ मध्ये त्यांनी चिपळूण येथील अधिकार्‍यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात,"मोघल मुलकात आले त्याहूनहि अधिक तुम्ही. रयतेस काडीचाहि आजार द्यावयाची गरज नाही." पत्रामध्ये लष्करी छावणीमध्ये शिस्त कशी हवी हे सुद्धा राजे लिहितात. चोख शिस्त असलेल्या सैन्याला प्रशिक्षण देखील तितकेच महत्वाचे असते. त्यासाठी आवश्यक आयुधे, शस्त्रे आणि इतर सामुग्री वेळेवर उपलब्ध करणे सुद्धा महत्वाचे असते. या बाबतीत सुद्धा राजांनी एक धोरण अंगीकारले होते. वेळप्रसंगी परकीय सत्तांकडून दारूगोळा आणि शस्त्रे ते घेत असत.
छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ३. लष्करी व्यवस्था ... !
भाग १
गेल्या २ भागात आपण पाहिले की छत्रपति शिवरायांनी मंत्रशक्ती आणि उत्साहशक्ती वापरून तिसरे बलस्थान जे 'प्रभुशक्ती' (कोश आणि सैन्य) ते क्रमाक्रमाने कसे वाढवले. सैन्य आणि कोश हे एकमेकांस पूरक आहेत हे सुद्धा आपण ह्याआधी पाहिले आहेच.
'थोरले महाराज यांनी हे राज्य गडावरुन निर्माण केले' या आज्ञापत्रातील ओळीवरुन हे स्पष्ट होते की गड-कोट, किल्ले-दुर्ग ही ठाणी जिंकण्यासाठी आणि टिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सैन्य आवश्यक होते. थोडक्यात 'राजतंत्र' हे सर्वस्वी सैन्यावर अवलंबून असते. नवीन शत्रुप्रदेश जिंकणे, जिंकलेल्या भागाचे संरक्षण करणे, संरक्षित भागाचे संवर्धन करणे आणि अखेर त्याचे न्यायाने परीचालन करणे ह्या सर्व बाबींसाठी सैन्याची आवशक्यता असतेच. स्वराज्याच्या सुरवातीच्या काळात सैन्याची जमवा-जमव हा एक जटील प्रश्न होता. रोहिडेश्वर येथे स्वराज्य शपथ घेणाऱ्या शिवरायांनी पुढच्या काही काळात १ हजार सैन्य उभे केले होते. समोर असलेल्या परिस्थितिमधून मार्ग काढताना, नविन राज्यपद्धती रुद्ध करताना त्यानी एक नविन युद्धतंत्र प्रवर्तित केले. गरज वाढली तसे सैन्येचे संख्याबळ आणि त्यांना लागणाऱ्या साधनसामुग्री उभी केली. लढ़ण्याचा ध्येयवाद त्यांच्यामध्ये निर्माण केला. सेतु माधवराव पगड़ी म्हणतात की,
"The Marathas fought for saving their homelands. It was cause worth Fighting & Dying for. They were led by a Man of No ordinary Skills & Calibre."

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...