मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे. यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे. यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल. धन्यवाद आपला मित्र शिवभक्त विनोद जाधव माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. https://www.facebook.com/mhkharakuraitihas
फॉलोअर
शनिवार, २० जून, २०२०
#बाजींद भाग क्र.२१ वा..!
रविवार, १० मे, २०२०
🏰 हिरकणी भाग ८ 🏰
🏰 हिरकणी भाग ८ 🏰
त्यानंतर कितीतरी वेळ मी बोलत होते. त्या दिवशी गडावर आले त्या क्षणांपासून , गडाचे बंद झालेले दरवाजे , घरी एकटा असलेला माझा कान्होबा , गडावरून खाली उतरण्याचे वेडे साहस, ते साहस करताना मला खुणावणारा कान्होबा , गड उतरून घरी घेतलेली धाव, रडता रडता माझ्या छातीला लुचून दुध पिता पिता झोपून गेलेला माझा बाळ, आणि त्यानंतर शांत क्लांत अवस्थेत झोप लागून गेलेली मी, आणि अपराधाचं ओझं बाळगत आज या दरबारात असहाय अवस्थेत उभी असलेली मी सगळे सगळे मी मला जमेल तसं आणि सांगता येईल तसं सांगून खालमानेने उभी राहिले .... शांतपणे .... माझ्या नियतीचा फैसला ऐकण्यासाठी ...!
दरबारात टाचणी पडली तरी आवाज होईल अशी शांतता पसरली होती. सर्वांचे कान आता पुढे काय होणार या उत्सुकतेने दाटले असावेत. जो तो पुढे येण्यासाठी एकमेकांना रेटू लागला. महाराज आता काय करणार? आम्हाला काय शिक्षा सुनावणार ? प्रश्न .... प्रश्न ...... प्रश्न.
आणि काही क्षण गेल्यावर तो आवाज पुन्हा त्या दरबारात घुमु लागला.
" आम्ही ... राजे शहाजी व जीजाऊ मांसाहेब यांचे पुत्र व भोसले कुलोत्पन्न अभिषिक्त सम्राट " छत्रपती शिवाजी " ! आमचे आजपर्यंतचे जीवन म्हणजे अगदी दंतकथा वाटाव्यात अशा घटनांच्या मालिकांनी अगदी शिगोशीग भरलेले आहे . आणि त्या सर्व प्रसंगांमध्ये अगदी मुकुटमणी शोभावा असा विचित्र तिढा आज आमच्यासमोर उभा आहे.
काल बहिर्जीनी जेव्हा घडलेल्या या संपूर्ण प्रसंगाची इत्यंभूत बातमी आम्हाला दिली तेव्हापासून आमचे मन एका विचित्र कात्रीत सापडले आहे. एकीकडे आमची कर्तव्यं आणि आम्हीच बनवलेले व स्वतः देखिल कधीही न मोडलेले कायदे आम्हाला साद घालत आहेत तर दुसरीकडे या हिरकणीच्या रूपातील एक आई आमच्यासमोर न्यायाच्या प्रतिक्षेत उभी आहे. पण या दोघांना आम्ही या राजदरबारात उपस्थित केले आहे ते वेगळ्याच कारणाने ..
आम्हाला आजही तो दिवस आठवतो. आमचे वय कदाचीत पंधरा सोळा असेल.
रायरेश्वराच्या पावन मंदिरात आमच्या सारख्या छोट्या मुला वर विश्वास ठेऊन आमचे एक स्वप्न पुर्ण करण्यासाठी स्वतःचे जीवन देखिल अर्पण करण्याची शपथ घेणारे आमचे सहकारी आजही आम्हाला लख्ख आठवतात. आमचा जीवा, शिवा, येसाजी, तानाजी, दिपाजी, कुडतोजी , बाजी.. सगळे सगळे आठवतात. प्रत्येक क्षणी आठवतात. आम्हाला फक्त आठवत नाहीत तर ...... आठवण देखिल करुन देतात !
कशासाठी घातला आहे आम्ही हा सगळा घाट, कशासाठी लावली आहे वेळोवेळी प्राणांची बाजी, कशासाठी दिली आहे आप्तस्वकीय आणि मित्रांच्या प्राणांची आहुती, कशासाठी त्या औरंग्याशी मांडला आहे आजन्म उभा दावा या सगळ्याची आठवण करुन देतात.
आमचे वडील म्हणजे राजे , उभ्या महाराष्ट्रातील एक वजनदार व नामांकित असामी.
जन्मतःच आम्हाला मिळालेली जहागीरी आणि यावर कंठू शकणारे एक सुखासीन आयुष्य. एक मोह पाडणारं आयुष्य ..... पण ....... पण एकीकडे माझेच रक्ताचे बांधव दुःखाच्या अग्नीत होरपळत असताना डोळेझाक करुन हा शिवाजी. तुमचा शिवाजी मिष्ठान्नाचे घास आपल्या घशाखाली कसे ढकलू शकला असता ? आमच्या मातोश्रींनी स्वाभिमान आणि न्यायाचे धडे आम्हाला जन्मापासुन दिले होते ते यासाठी ? नाही , नाही , त्रिवार नाही!
काय होतं ते आमचे स्वप्न ........ एकीकडे आदिलशहा, निजामशहा, औरंगजेब आमच्या इष्ट देवतांची करत असलेली मानखंडना , आयाबहिणींची लुटत असलेली अब्रु , रक्ताचं पाणी करुन वाढवलेल्या पिकांची होणारी उभी लुट, सावकारांना देखिल लज्जा वाटावी अशा पद्धतीने केली जाणारी वसुली, घरादारांवर फिरवले जाणारे नांगर हे सगळं रोखायचे असेल तर उभं करावे लागणार होते एक स्वतंत्र राज्य .... " स्वराज्य "
या राज्यात राहणाऱ्या दिनदुबळ्यांपासून प्रत्येक बाईबापडीला आपले वाटेल असे स्वराज्य !
आणि ते स्वप्नातलं स्वराज्य उभं करण्यासाठी कशाकशाची आहुती आपल्या सगळ्यांना द्यावी लागली आहे याची देखिल कल्पना तुम्हा सर्वांना आहे. ( हे बोलताना राजांचा कंठ अगदी दाटून आला असावा ) आज हि हिरकणी आणि हा येसाजी माझ्या समोर अपराधी म्हणून उभा असताना तो आमचा तानाजी, आमचा दिपाजी, आमचा शिवा, आमचा बाजी आणि ...... आणि आमच्या मांसाहेब आमच्याकडे मोठ्या आशेने पहात आहेत. त्यांचा हा शिवाजी , शिवबा काय फैसला देणार याकडे मोठ्या आशेने डोळे लावून बसलेले मला दिसत आहेत.
मगाशी आमच्या शंभू राजांना या हिरकणी कडे पाहिल्यावर त्यांच्या मातोश्रींची आठवण झाली , आणि आश्चर्य म्हणजे या हिरकणी कडे पाहताना आम्हाला देखिल आमच्या मांसाहेबांची आठवण झाली.
आई " ..काय जादु आहे या दोन शब्दांत ! स्वर्गाचं राज्य देखील ज्या पायांवर ओवाळून टाकावे असे शब्द, असे नाते म्हणजे " आई"
आपल्या लेकरावर कठीण प्रसंग आला आहे हे लक्षात आल्यावर क्षणाचाहि विलंब न करता प्राण ओवाळून टाकणारी व्यक्ती म्हणजे आई. आज हि हिरकणी दरबारात उपस्थित झाली आणि आम्ही औरंगजेबाच्या कैदेत अडकून पडल्याचे समजल्यावर कमरेला तलवार लावून तडक निघू पाहणाऱ्या आमच्या मांसाहेब दरबारात पुन्हा अवतीर्ण झाल्या आहेत असा भास आम्हाला झाला. आमच्या मांसाहेबांच्या डोळ्यात आमच्या विषयी दाटून येणाऱ्या प्रेमात आणि या छोट्या बाळासाठी हिरकणीच्या डोळ्यांत दाटून येणाऱ्या प्रेमात फरक करणे या तुमच्या शिवाजीला शक्य नाही........
आज या दरबारात आमच्या मांसाहेब हजर नाहीत परंतु त्या हजर असत्या तर जे घडले असते तेच आम्ही करणार आहोत. त्यांना मनोमन साक्षी ठेऊन वागणार आहोत.
राणीसाहेब तुमच्या स्वहस्ते हिरकणीचा साडीचोळी आणि मानमरातब देऊन सत्कार करा. पत..... तुम्ही आमच्या खाजगीतून येसाजी आणि कान्होबा साठी सोन्याच्या तोड्यांची व्यवस्था करा. पेशवे .... तुम्ही हिरकणीला पाच गावे इनाम आणि त्यांच्या राहत्या गावाला " हिरकणी वाडी" हे नाव दिल्याचे आज्ञापत्र टाकोटाक जारी करा.
हे श्रींचे राज्य आहे. इथले कायदे आणि व्यवस्था लोकांच्या सेवेसाठी, हितासाठीच बनवले जातील आणि त्यांच्या हितासाठीच मोडले आणि रूजु देखिल केले जातील.
या शिवाजीच्या अंतिम श्वासापर्यंत तो यासाठी लढत राहिल. आणि मीच न्हवे तर आमचे शंभुराजे आणि या भुमीत जन्म घेणारा प्रत्येक व्यक्ती यासाठीच त्याच्या अंतिम श्वासापर्यंत लढत राहिल याची आम्हाला खात्री आहे. जगदंब ...... जगदंब ! " कित्येक वेळानंतर तो कैलासपती बोलण्याचा थांबला.
मी स्वप्नात आहे कि सत्यात हे मला देखिल उमगेना. ऐकणारे कित्येक लोक आपल्या डोळ्यांच्या कडा पुसत असताना मला दिसल्या. आणि तेच का तर माझ्याही डोळ्यांतून अणूंच्या धारा वाहू लागल्यामुळे समोरील दृष्य धुसर झाले.
माझ्या कानावर फक्त " छत्रपती शिवाजी महाराजांचा...... विजय असो " अशा घोषणा पडू लागल्या. मीही माझ्या नकळत अगदी अंतकरणापासुन जयघोष सुरू केला
छत्रपती शिवाजी महाराजांचा
.........विजय असो "
तुषार दामगुडे
( तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा )
🏰 हिरकणी भाग ७ 🏰
🏰 हिरकणी भाग ७ 🏰
आम्ही दोघं त्या दरबारात एखाद्या चोराप्रमाणे एका कोपऱ्यात उभे होतो.
आजुबाजुचे काही लोक एकमेकांमधे कुजबुजत होते. बराच वेळ दरबारातील रोजचे कामकाज चालले असावे. आम्ही आमच्या तंद्रीत होतो आणि अचानक तो पुकारा ऐकू आला. हो , हाकाऱ्याने आमचेच नाव पुकारले होते. ते पुकारल्या बरोबर काही शिपाई आमच्या आजुबाजुला येऊन उभे राहिले व त्यांनी आम्हाला पुढे घालून दरबाराच्या मधोमध उभे केले. माझे धनी ... मी ... आणि माझ्या हातात माझा कान्हा.
महाराजांनी आमचे निरीक्षण करता करता पेशव्यांकडे पाहिले. पेशवे उठून उभे राहिले आणि घसा खाकरून समोरील कागद ओढला. त्यांनी दरबाराला तो कागद वाचून दाखवायला सुरुवात केली. वाचून झाल्यावर पुर्ण दरबारात एक भिषण शांतता पसरली. कारण त्या कागदात मी केलेल्या गुन्ह्याचा इतीवृत्तांतच मांडला होता.
सगळ्या दरबाराच्या नजरा आमच्यावर खिळल्या. इतका बेळ अवसान गोळा करुन उभ्या असलेल्या माझ्या पायातुन जणू वारंच गेलं. मी यांच्याकडे पाहिले तर ते देखिल कानकोंडे होऊन अवघडलेल्या अवस्थेत कसेबसे उभे आहेत हे मला जाणवलं. धरणी फाटून मला त्यात सामावून घेईल तर बरे होईल असं मला वाटलं. माझ्या घशाला कोरड पडली. डोळ्यात पाणी उभे राहिले.
"
पंत , या अपराधासाठी गुन्हेगाराला काय शिक्षा आहे ?" एक अत्यंत धीरगंभीर आवाज त्या सुवर्ण सिंहासनावरून उमटला.
प्रत्त्युत्तरादाखल दरबारात काहीच आवाज झाला नाही. मी मान वर करुन पाहिले तर महाराजांनी नजर वळवून पेशव्यांच्या बैठकीकडे पहात पुन्हा प्रश्न विचारला..
" पंत , आम्ही तुम्हाला या अपराधासाठी गुन्हेगाराला काय शिक्षा आहे असं विचारलं?" त्यात स्वरात आता थोडी अधिकारवाणी झळकत होती.
" गडाचे दरवाजे बंद झाल्यावर ....( त्यांनी घसा खाकरत म्हटले )... गडाचे दरवाजे
बंद झाल्यावर अनधीकृतरीत्या गड उतरणे किंवा चढणे हा अत्यंत गंभीर अपराध असून तो हेरगीरी किंवा दगा या कलमांतर्गत मोडतो..... आणि .... आणि त्याचा दंड म्हणजे मृत्युदंड आणि अशा प्रकरणातील गुन्हेगाराला जाणीवपूर्वक आश्रय देणाऱ्या अपराध्याला आजन्म कारावास " कशाबशा आवाजात पेशवे उत्तरले.
मृत्युदंड...... मृत्युदंड..... मृत्युदंड "
संपूर्ण दरबारात आवाज घुमु लागला. पण ते ऐकायला माझे मन जागेवर होतेच कुठे? मी सुन्न होऊन मटकन खालीच बसले. धनी मला उठून उभे करत असावेत पण माझ्या पायातील बळ केव्हाच निघून गेले होते. लागला "
त्या सुवर्ण सिंहासनावरून पुन्हा धीरगंभीर आवाज त्या दरबारात उमटू या दरबारात उपस्थित असलेल्या प्रत्येकाला इथल्या नियमांची व त्या नियमांना मोडल्यावर होणाऱ्या शासनाची माहिती निश्चितच आहे. सुर्यास्त झाल्यावर गडाचे दरवाजे आमच्या आज्ञेशिवाय कोणत्याही कारणास्तव व कोणासाठीहि उघडले जाणार नाहीत हा त्यातलाच एक अत्यंत महत्वाचा नियम आहे. या गडावर असणाऱ्या प्रत्येकाच्या जिविताची सुरक्षितता रहावी व कुठल्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये म्हणुन या अपराधाला "अत्यंत गंभीर " या सदरात टाकून आम्हीच त्यासाठी मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद केली आहे आवाज श्वास घेण्यासाठी थांबला.
" बोलणारा
ते काही क्षण मला युगानुयुगं गेल्यासारखे भासले. त्या दैवी व हुकूमत गाजवणाऱ्या आवाजाने पुन्हा बोलायला सुरुवात केली.
हिरकणी.. हिरकणीच नाव ना तुझं ..... तर हिरकणी कडून सूर्यास्त झाल्यावर गडाचे दरवाजे बंद असताना आमच्या अनुज्ञेशिवाय गड उतरून जाण्याचा जघन्य अपराध घडला आहे...... आणि असा गंभीर अपराध करणाऱ्या गुन्हेगाराला आश्रय देण्याचा गुन्हा येसाजी देखिल कडून घडला आहे. गुन्हेगारांना आपला अपराध कबूल आहे काय? "
सगळ्या दरबाराच्या नजरा आमच्यावर रोखल्या. आम्ही दोघांनी एकमेकांकडे केवीलवाण्या नजरेने पाहिले आणि मानेने होकार भरत
" व्हय, कबूल हाय जी " असं कसनुसं उत्तरलो आणि खाली बघत पायाने जमीन उकरु लागलो. माझा कान्होबा माझ्याकडे बघून हसत होता. त्या बिचाऱ्याला आपल्या आईवडीलांवर काय वेळ आली आहे याची काय कल्पना .......
ते राजसिंहासन पुन्हा बोलु लागलं " मांसाहेब ... तुमच्या मतानुसार या दोघांबरोबर काय सलूक करावा..... मांसाहेब ?" महाराजांनी मांसाहेब बसत त्या सदरेकडे पाहिले.
नव्हतं काय ...
पण ....... पण ती राजसदर ...... राजसदर कसली......तो तर देव्हारा ... तो देव्हारा आता रिकामा होता. थोरल्या धन्यांनी नेहमीच्या सवयीने त्या राजसदरेला साद घातली असावी. त्या देवीचा कौल मागितला असावा. पण राज्यभिषेक झाल्यावर ते दैवी छत्र महाराजांना आणि आमच्या सारख्या लाखो रयतेला पोरकं करुन गेलं आपली चुक लक्षात आल्यावर महाराजांनी त्या राजसदरेला पुन्हा एकदा न्याहाळलं. काही क्षण न्याहाळून झाल्यावर त्यांनी आपले डोळे गच्च मिटून घेतले. तोंडातल्या तोंडात ते काहितरी पुटपूटत असावेत. डोळे उघडले तेव्हा त्या रेखीव डोळ्यांच्या कडांना हलकसं पाणी आल्याची जाणीव मला झाली.
संपूर्ण दरबाराचं वातावरण आणखी गंभीर झालं. डाव्या बाजूच्या सिंहासनावरून आम्हाला न्याहाळंत आमचे धाकले धनी उठले आणि महाराजांच्या कानाशी लागून काहीतरी अत्यंत दबक्या आवाजात बोलु लागले. काही वेळ दोन्ही धन्यांची मसलत चालली होती. ती मसलत करत असताना दोघेही अधूनमधून आमच्याकडे पहात होते. जीवनमरणाचा प्रसंग येऊन उभा ठाकला होता. प्रत्येक क्षण एखाद्या मृत्यु घंटे प्रमाणे मेंदू वर आघात करत होता. शेवटी एकदाचे दोघांची चर्चा संपली. धाकटे धनी पुन्हा आपल्या सिंहासनावर स्थानापन्न झाले.
" हिरकणी तु केलेल्या अपराधाची माहिती पेशव्यांनी दरबाराला वाचून दाखवली, त्याची पार्श्वभूमी आणि पुढील घटनाक्रम आम्हाला आमच्या बहिर्जीकडून इत्यंभूत कळला परंतु आमची इच्छा आहे कि तु तुझ्या तोंडाने आमच्या उपस्थितीत सर्व दरबाराला सगळी घटना ऐकवावी. तुमच्या दोघांचा फैसला त्यानंतर आम्ही करू" खड्या आवाजात महाराजांनी मला आज्ञा केली.
मी धन्यांकडे एक बार पाहिले. त्यांनी डोळ्यांच्या खुणेनेच मला धीर दिला. कान्होबाला त्यांच्याकडे
सोपवून मी तुळजाभवानीचे स्मरण मनोमन केले.
सगळे अवसान गोळा केले आणि बोलायला. सुरुवात केली
🏰 हिरकणी भाग ६ 🏰
🏰 हिरकणी भाग ६ 🏰
येसाजी, एय येसाजी "
"कोण हाय? "
अरं दार उघडतुयस न्हवं...
आं..... नाईक तुम्ही आणि हिकडं? आत या बसा वाईच
" येसाजी आम्ही काय बसाय आलो न्हाय , तुला हाजीर करायला सांगितलंय पेशव्यांनी
" पेशव्यांनी? मला?
तुला आणि तुझ्या कारभारणीला म्होरं घालून आणायला सांगितलं हाय, आता चलतोस का बीगी बीगी "
मी आतून सगळं ऐकत होते. माझं धनी आत आले तेच पडलेल्या चेहऱ्याने . त्यांच्या बरोबर माझ्या मनात देखिल हजारो प्रश्नांचे काहूर उभे राहिले. जी गोष्ट घडेल म्हणून भितीने मन विचार करायचे टाळत होते ते अखेर समोर येऊन उभे राहिले होते.
मी कान्होबाला उचलून पाठिवर झोळीत बांधले. तोवर यांनी डोक्यावर फेटा बांधला आणि आम्ही नाईकांच्या पुढे पुढे चालू लागलो. वाटेने गावातील लोकांचे चेहरे काहीतरी बोलत आहेत आणि त्यातले काही लोक माझ्याकडे बोट करुन कुजबुजत आहेत हे मी डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहिले.
अर्धी चढण संपली असावी. पायाच्या ओल्या जखमेतून रक्त वहायला लागले म्हणुन मी थोडा वेळासाठी खाली बसले.
नाईक आणि त्यांचे शिपाई दुर आहेत हे पाहून मी हळूच यांच्याकडे पाहिले आणि
" धनी हि कशी येळ आली हो आपल्यावर " माझ्या स्वरात चिंता होती.
" हिरे , कळत नकळत तुझ्याकडून चुक घडली हे खरं होय आणि थोरलं धनी म्हणजे कायदाकानुन आणि शब्दांचे पक्के. आपल्याला सजा हुईल. पण आपल्या धन्यासाठी मन मोठं करुन सगळं सोसू. तु तिथं अज्याबात रडून गोंधळ घालायचा नाय म्हणजे काय "
" म्या शिक्षा भोगाया तयार हाय, पण आपल्या कान्होबाला माझ्या पासुन येगळा करू नये. तशी येळ पडलीच तर थोरल्या धन्यांच्या पायावर नाक रगडून माफी मागल म्या. मला काय शिक्षा करायची ती खुशाल करा, कुठल्या कोठडीत टाकायचे तिकडे टाका पण माझा कान्होबा माझ्या जवळ राहू द्या एवढं मागेन
" चल उठ, निघायला हवं, बाकी हिरे... आपण लहान माणसं, तसं बी तिथं आपल्याला इचारणारं कोण हाय ? आता बिरोबाच्या मनात असंल तसं हुईल
अत्यंत निराश मनाने आम्ही दोघं उठलो आणि गड चढायला पुन्हा सुरुवात केली. मागे नाईक अत्यंत बारक्या नजरेने आमच्यावर लक्ष ठेऊन होतेच.
तो प्रचंड मोठा दरवाजा ओलांडुन पुर्ण आयुष्यात मी पहिल्यांदा या राजदरबारात उभी होते. मीच काय माझे धनी देखिल इथे पहिल्यांदाच आले असावेत. अर्थात हे त्यांचा बावरलेला चेहराच सांगत होता.
आत मोठाच दिमाख होता. त्याचं वर्णन करायचे म्हटले तरी मला शब्द सुचणार नाहीत. ऐश्वर्य म्हणजे नेमकं काय असतं हे आमच्या सारख्या गरीबांना आयुष्यात पहिल्यांदाच पहायला मिळत होते. कारण आमचं जगणं पण कुडाच्या झोपडीत आणि मरणं पण कुडाच्या झोपडीत. मी हळू हळू सगळीकडे बघत होते.
सर्व दरबारी आपापल्या हुट्याप्रमाणे उभे किंवा बसलेले होते. माणसांची हि मोठी गर्दी तिथे होती. परंतु तेथील वातावरण मात्र अत्यंत आदबशीर आणि धीरगंभीर होते.
आणि त्या भारावलेल्या वातावरणाचा केंद्रबींदु असलेल्या सुवर्ण सिंहासनाकडे माझी नजर गेली... . हा माझा भास होता का ? नाही, नाही हा भास कसा असेल? मग मी पहात होते ते सत्य होते काय ? हो हिरकणी हे सत्य आहे.
"
मणामणांच्या सुवर्णाने आणि अत्यंत मौल्यवान रत्नांनी घडवलेल्या त्या सिंहासनावर ते" बसलेले होते. हो ..... तेच ! माझे, आमचे सर्वांचे धनी ! " छत्रपती शिवाजी महाराज
आपल्या गणांमध्ये बसलेला प्रत्यक्ष महादेव जणु.
स्वच्छ सुती अंगरखा. पायांत रत्नजड़ित चढाव. डोक्यावर मलमली जिरेटोप. त्या जिरेटोपावर उठुन दिसणारे पाचूंनी मढलेले पदक. गालांवर तोंडभरून शोभेलशी दाढी, आणि त्या रेखीव चेहर्याला शोभतील असे मान्यवर रूळणारे काळेभोर केस.
इतक्या लांबून देखिल वेध घेणारे पाणीदार डोळे आणि त्या विशाल भाळावर रेखाटलेला तो भगवा शिवगंध
हाच तो आमच्यासारख्या अनेक दिनदुबळ्यांचा, बायाबापड्यांची, अनाथांचा आधार असलेला आदिनाथ ......!
स्वतः अनेक संकटांचे हलाहल पचवून आमच्यासारख्या वंचिताना स्वातंत्र्य, न्याय, सुरक्षितता आणि आत्मसन्मान यांचे अमृत पाजणारा निलकंठेश्वर !
🏰 हिरकणी भाग ५ 🏰
🏰 हिरकणी भाग ५ 🏰
श्वास घे.....
खोबणीत हात किंवा पाय
घट्ट पकड़...... पायांना आधार शोध घट्ट रोव..... श्वास सोड...... अंग वेली सारखे लवचिक कर. धीर सोडू नको ...
खाली बघू नको ........ श्वास घे...... थोडंच राहिले आहे ... हे तु पोहचलीच.
घट्ट पकडून ठेव,
फुंकर घालण्यासाठी वाहतोय करुन तुला साथ देत आहेत पुरेसा आहे पायांना आधार शोध
अजून अगदी थोडं
तो वारा तुला उडवून नेण्यासाठी नाही तर तुझ्या जखमांवर तू एकटी नाहीस...... बघ रातकीडे किरे हिरे पुन्हा श्वास घे....... त्या चंद्राचा प्रकाश अजून अगदी थोडे...... अगदी
मी माझ्याशीच बोलत होते कि हे सगळे माझ्या मनात चालू होते ? कितीवेळ गेला होता? मी कुठे होते ? मी कुठे निघाले आहे ?... मी कोण आहे ? मी पुन्हा खाली बसले.
त्या चंद्र प्रकाशात मी माझ्या शरीराकडे पाहिले. साडीची फाटून दैन्यावस्था झाली होती. माझंच नशीब मला पहायला इथे कोणी नव्हते. हातांचे तळवे दगडधोंड्यांवर घासुन आणि घट्ट पकडून त्यातून रक्त वहात होते. गुडघे आणि पाय सोलवटून ठिकठिकाणी झालेल्या जखमांतून देखिल रक्त वहात होते. केस वाऱ्याने पिंजारून वेडेवाकडे झाले असावेत.
चेहरा धुळीने माखल्याची देखिल जाणीव मला झाली. पण मी शुद्धीवर होतेच कुठे ?
मी वेदना , जाणीवा या सगळ्याच्या पार पलीकडे पोहचले होते. पुन्हा थोडी विश्रांती घेण्यासाठी मी तिथे काही वेळ तिथे बसले. मी धीर करून खाली पाहिले.
एक लुकलुकता दिवा मला त्या अंधारात देखिल दिसला. मी मान वर करुन बघितले तर त्या झपाटले पणात जवळजवळ गड उतरून आले होते. नेहमीच्या पायवाटेने जाण्यासाठी लागणारा वेळ या सरळसोट कड्यावरुन उतरताना निश्चितच लागला नव्हता.
बस आता हा शेवटचा अवघड टप्पा पार केला कि आलाच पायथा. आणि मग आणि मग माझा कान्हा ! माझ्या बाळा आलेच रे मी , बस थोडी कळ काढ !
मी पुन्हा कंबर कसून उतरायला सुरुवात करण्यासाठी समोरच्या कड्याचे निरीक्षण चालू केले. पाहताक्षणी हा कडा अगदी जीवघेणा आहे याची मला लगोलग जाणीव झाली. हि शेवटचीच अडचण माझ्या आणि कान्होबाच्या मध्ये उभी होती. पहाटेचे झुंजूमुंजू वारे वहायला सुरुवात झाली होती. त्या गारेगार वाऱ्याने मला थोडी तरतरी आल्यासारखी वाटली.
तोच मी पटकन मागे सरकत
मी पुढे होत त्या दगडाला हात घालणार तोच धपापल्या उराने जागेवरच शांतपणे उभी राहिले. एक काळाकभीन्न नाग फणा काढून त्या दगडाला वेटोळे मारून बसला होता. आता सगळंच संपल. तो माझ्याकडे पहात फुत्कार सोडत होता आणि इकडे माझे पाय भितीने लटलट कापायला सुरुवात झाली होती.
- जगदिश्वरा हा काय प्रसंग आणलास रे माझ्या समोर ? आजपर्यंत तुझी अगदी मनोभावे पुजा केली .... तुझ्यासाठी वेगळं काढून ठेवलेल्या दुधाने अगदी भक्तिभावाने तुझी पुजा केली. या तुझ्या लेकीला संकटातुन सोडव रे जगदिश्वरा ........
काही क्षण गेले असावेत आणि काय आश्चर्य हळूहळू वेटोळे सोडत दुर जाऊ लागला. अगदी हळूवारपणे.
तो नजरेआड झाला.
फुत्कार सोडणारा तो नाग अगदी दूर...
मी झपाट्याने पुढे होत तो दगड माझ्या हातांच्या पकडीत घेतला. आता हि संधी मला घालवायची नव्हती. मी जोर लावून माझे अंग अधांतरी अवस्थेत त्या कड्यावरून खाली सोडून दिले. पायांनीच चाचपत चापपत एक खोबणी शोधली व एखाद्या भिंतीवर पाल चिकटून असावी त्याप्रमाणे उभी राहिले. दुसऱ्या हाताने एक खोबण शोधत तिथे माझी पकड घट्ट केली आणि हळूहळू एखाद्या घोरपडी प्रमाणे ती नैसर्गिक भिंत उभी उतरू लागले ..... श्वास फुलुन आला ..... नुकत्याच झालेल्या प्रसुती नंतर या वेडाचाराच्या कसरतीमुळे पोटाच्या आतड्यांवर अत्यंत वेदनादायक ताण पडू लागला. माझ्या मांड्यांमधून रक्त प्रवाह सुरू झाल्याची जाणीव झाली . पण या सगळ्याकडे दुर्लक्ष करुन मी ती भिंत उतरतच होते.
माझ्यात प्रत्यक्ष भवानीचा संचार झाला होता!
आणि मी एकदाची खाली उतरले. क्षण दोन क्षण मी श्वास घेण्यासाठी थांबले असेल ..... वर पहात मी त्या जगदिश्वराला अंतकरणापासुन नमस्कार केला आणि मी पळत सुटले. माझ्या कान्होबा के......
रस्त्यावर काही लोक गुरंढोरं चारायला बाहेर पडले होते. काही बायका झाडलोट करायला अंगणात आल्या होत्या. त्यातले काही मला तशा अवस्थेत धावताना पाहून जागेवरच थांबले. पण मी मात्र धावत सुटले होते
आणि तो आवाज माझ्या कानांवर पडला तसं माझ्या पायांनी अधिक गती घेतली.
हो ..... तो माझ्या कान्होबाच्या रडण्याचाच आवाज होता. धाव हिरकणे.... अजून जोरात दाब !
आले बाळा आले ...
अखेर खाडकन दरवाजा उघडून मी घरात धाव घेतली आणि झेप टाकत रडत असलेल्या माझ्या कान्होबाला त्याच्या बापाच्या हातांतून जवळजवळ हिसकावूनच घेतले.
त्याला कुशीत घेऊन मटामटा त्याचे मुके घेतले आणि त्याला माझ्या छातीशी लावला. इतका वेळ दाटून आलेली माझी छाती एखाद्या झऱ्याप्रमाणे वाहू लागली.
कान्होबा अगदी शांत होत होत माझ्या छातीला बिलगुन दुध पिवु लागला. एका अवर्णनीय सुखाची संवेदना माझ्या शरीरभर पसरू लागली. याचसाठी केला होता हा अट्टाहास ! बस मला आता जगातील कुठल्याही सुखाची अपेक्षा नव्हती. मी आणि माझा बाळ......माझा कान्होबा !
तुषार दामगुडे
क्रमशः
🏰 हिरकणी भाग ४ 🏰
🏰 हिरकणी भाग ४ 🏰
जागा
गडावर दुध घालताना कुठे पहारेकरी कमी व निवांत असतात त्या जागा मी आठवू लागले. नाही नाही ती नाही..... तिथे जरा जास्तच नजर असते .... मग ती नाही.. ते देखील नाही ...... त्या ठिकाणावर लांबून देखील नजर .. ठेवता येते म्हणून पहारेकरी कमी असतात. मी भरभर सगळे मनातल्या मनात
आठवू लागले.
आणि मला आठवली. एक जागा मला हवी तशी होती. तिथे पहारेकरी कमी असत. आणि जे असत ते देखिल थोडे निवांतच असत. कारण कारण तेथन काही दगा होईल हे कठीण होतं. कठीण कसलं अशक्यच होतं. पण मला शक्य अशक्यच्या त्रांगड्यात अडकुन पडायचे नव्हते. मला कान्होबा कडे जायचे होते एवढेच आता लक्षात होते. बस्स!
मी अगदी तिथलीच रहिवासी असावी अशा पद्धतीने चालत चालत मला हव्या त्या ठिकाणी पोहचले. कुणी बघत नाही हे पाहून पटकन कमरेला पदर खोचून हळूच त्या घळईत शिरले. व पटपट पाऊले टाकत एका आडोशाच्या मागे श्वास घेण्यासाठी उभी राहिले. जोरात चालल्यामुळे माझा श्वास फुलून आला होता. काही क्षण थांबल्यावर मी खाली पाहिले
मी मनाचा निश्चय करुन थोडी पुढे झाले व खाली पाहिले आणि..
बापरे
पटकन मागे सरून मी पुन्हा मागच्या दगडाचा घट्ट आधार घेऊन उभी राहिले. त्या धुसर अंधारात देखिल काळजाचा थरकाप उडवणारी एक खोल खोल दरी माझ्या डोळ्यांसमोर माझा घास घेण्यासाठी " आ" वासुन उभी होती. इथे पहारेकरी कमी का असतात त्याचे कारण माझ्यासमोर उभे होते. मला ये ये म्हणून खुणावत होते.
हिरे अगं हा काय वेडेपणा करते आहेस तु. चल मागे हो , पुन्हा वर जा, आजची रात्र गडावर घालव आणि सकाळी उगवतीलाच खुशाल आपल्या घरी जा. माझे एक मन माझ्याशी बोलु लागले.
पण माझा कान्हा ?
अगं वेडे , समोर हि खोल दरी बघते आहेस ना ? माणसाला देखिल कस्पटासारखं उडवून लावण्या वाऱ्याचा आवाज तुला ऐकू येतोय ना ? इथल्या खोबणी खोबणीत तुला डसण्यासाठी दबा धरून बसलेल्या जनावरांची सळसळ ऐकू येतेय ना?
हो .... पण माझा कान्हा ?
अगं आज वाचलीस तर तुझा कान्हा आहेच पण तुच नसलीस तर....
नाही .. नाही .... गप्प बस. तुझं मला काहीही ऐकायचे नाहीये. आज मी माझ्या बाळाकडे जाईल नाहीतर इथेच माझा जीव देईल पण आता माघार नाही. आई जगदंबे या तुझ्या लेकीचं तुच आता रक्षण कर. मी सगळे विचार थांबवून पुन्हा एकदा पदर खोचला. आणि पुढे होत त्या बेलाग कड्याला उतरायला प्रारंभ केला.
मी खाली बघायचं शक्य तेवढे टाळू लागले कारण उंचावरून खाली पाहताना मला चक्कर येत असे. थोडा जरी झोक गेला तरी एक अत्यंत वेदनामय मृत्यु माझ्या नशीबात निश्चित होता. तोंडाने देवीचं नाव घेत घेत व त्या अंधारात हाता पायानेच चापसत चापसत मी खाली उतरू लागले. हि एक अत्यंत उभी व सरळसोट दगडांची भिंतच होती जणू. मी पुर्ण नेटाने जोर लावून एकेक सांदीकोपरा पकडून पायाला
आधार मिळताच हातातला आधार सोडत होते.
आई गं.. आई .. मी वेदनेने ओरडले.
किती वेळ गेला कुणास ठाऊक त्या कड्यावर सतत पाऊस पडुन पडुन एखाद्या तलवारीला यावी तशी धार आलेली होती आणि मी आधारासाठी त्यावर पाय देताच भाजी चिरावी तसा माझ्या पायाच तळवा चीरला गेला होता. रक्ताची एक धार काटा लागून आधीच जखमी झालेल्या त्या पायातुन वाहू लागली. तो दगड त्या रक्ताने न्हाऊन निघू लागला.
मी वेदनेने कळवळून तिथेच ओक्साबोक्षी रडू लागले. मी काय करून बसले होते.
आई...... आई...... तुझ्या हिरकणीला कुशीत घे. तीला घट्ट कुशीत घे. तुझ्या उबदार मिठीत घे. बघ तुझ्या हिरकणीचं काळीज भितीने कसं उडतंय , तीचे पाय कसे लटलट कापत आहेत ..... ती फार मोठ्या संकटात आहे गं !
आणि कान्हा ? हिरे ..... तुझ्या कान्हाला कुशीत कोण घेणार ? भितीने टाहो फोडणाऱ्या कान्हाला उबदार मिठीत कोण घेणार हिरे ? तुझ्याशिवाय त्याला तरी कोण आहे हिरे ? तु इथेच गर्भगळीत झालीस तर त्याच्यावर मायेची पाखर कोण करणार हिरे ? विचार नुसते विचार.... डोके फुटून जायची पाळी आली होती.
वेदनेचा पहिला भर ओसरल्यावर मी कसलाही विचार न करता धडूत्याचा एक कोपरा टर्रकन फाडून काढला. त्या चींधीनेच वाहणारं रक्त पुसून काढलं आणि तोंड घट्ट आवळून तळव्याला करकचून पट्टी बांधली. रक्त वाहायचं थोडं थांबल परंतु वेदना मात्र तशीच ठसठसत होती. आता त्या वेदनेचा विचार मागे पडला आणि माझ्या बाळाचा चेहरा पुन्हा डोळ्यांसमोर रूंजी घालू लागला. मी तिथेच दगडाला धरुन थोडावेळ आराम केला.
आणि पुन्हा उतरायला सुरुवात केली. आता मी जास्त विचार करायचा नाही या निश्चयानेच उतरू लागले. याला एक प्रकारचे झपाटलेपण म्हणता येईल.
🏰 हिरकणी भाग ३ 🏰
🏰 हिरकणी भाग ३ 🏰
दरवाजा उघडणार न्हाय म्हणजे काय
अहो पर मला घरला जायलाच हवं
" म्या त्यात काय बी करू शकत न्हाय "
मी
" अहो दादा.. घरला माझं तान्हं बाळ हाय... ते अजून अंगावर पितंय... त्यासाठी मला घरला जायलाच हवं..." मी आणखी आळवणी केली
अगं हिरे हिथं आत्ता माझी सख्खी भन येऊन म्हटली तरी मला गडाचे दरवाजे उघडता येणार न्हाई"
" अहो दादा एक डाव चुक पदरात घ्या .... गडावर येळ कसा गेला ते आज काय लक्षात आलं न्हाई आणि सोबतीच्या बायांची चुकामुक झाली म्हणून त्यांना शोधत बसले व इथवर येईपर्यंत सुर्य कधी मावळतीला गेला ते देखिल कळलं न्हाई. चुक माझीच हाय पण एक डाव माफ करा...
" हिरे नसता हट्ट धरू नकोस...दरवाजे उघडणार न्हाय म्हणजे न्हाय "
" अहो माझा कान्होबा माझ्या शिवाय कसा राहिल? त्याला भुक लागल्यावर कुणाकडे जाईल ... मी तुमच्या पाया पडते... भिक मागते ... मला घरी जाऊ द्या .... दरवाजा उघडा" मी त्याच्या पायावर लोळण घेतली
" पाय सोड.. काय करतीयासा... नाईकांना महाराजांचीच आज्ञा हाय कि सुर्य मावळतीला गेल्यावर गडाचे दरवाजे बंद म्हणजे बंद. नाईकांना कळलं मी दरवाजा उघडला तर माझी गर्दन धडावर राहिल काय ? हे बघ तु काय काळजी करू नको .
मी माझ्या बायलीला सांगावा धाडतो.. तु आज गडावर तुझ्या या भावाकडंच
रहा....
॥
" पहाटं उगवतीलाच तु आपल्या घरला खुशाल निघून जा कशी ... मी काय म्हणतोय . लक्ष कुठाय तुझं ... हिरे"
अं. हो हो " मी काहीच न सुचून काहितरी बोलुन गेले. महाराजांची आज्ञा असताना गडाचे दरवाजे आत्ता उघडणं शक्यच नव्हतं. ते नाईकांच्या अखत्यारीत नव्हतं. आणि मी खुद्द महाराजांकडे माझी कर्मकहाणी घेऊन जावं हे देखिल अशक्य होतं. मी तिथेच काहिवेळ मटकन बसून राहिले. पहारेकरी देखिल त्यांचे दैनंदिन कामकाज उरकु लागले.
मी तिथून निघाले. सगळे लोक आपापल्या कामात व्यस्त झाले होते. माझ्या सारख्या दिडदमडीच्या गवळणीकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ होता. दिवसभर काम करुन कधी एकदा आराम करतो असं सगळ्यांना झाले असावे.
माझं मन मात्र अगदी सैरभैर झालं होतं. समोर सतत कान्होबाचा चेहरा थैमान घालत होता. आणि का घालणार नाही. केवढूसा होता तो. आईच्या छातीला लागून चुटूचुटू दुध पिणारा आणि रात्री अंधारात घट्ट बिलगुन आश्वस्त झोप घेणारा तो कोवळा जीव आज काय करेल? त्याला भुक लागल्यावर कोणाकडे जाईल?
त्याला भिती वाटल्यावर कोणाला कवटाळेल ? जेव्हा त्याला जाणीव होईल कि आपली आई आपल्याजवळ नाही तेव्हा त्याला शांत कोण करेल?
नाही .... नाही.... नाही ! मला इथुन जायला हवं. काहीही करुन घरी पोहचायला हवं. घरी जाऊन कान्होबाला जवळ घेतल्याशिवाय मला चैन पडणार नव्हता. आज एकतर मी घरी जाईन किंवा तो प्रयत्न करता करता माझा जीव देईल पण मी इथे थांबणार नाही......... बस्स ठरलं म्हणजे ठरलं !
संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४
संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...
-
संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग ७७ सोपारा (Sopara) पोस्तसांभार :: विजय सरडे प्राचीन भारतातील एक समृद्ध आंतरराष्ट्रीय...
-
संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग ८४ पांडव (पांडू) लेणी, नाशिक (Pandav caves at Nashik) पोस्तसांभार :: विजय सरडे पश्चि...
-
संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०१ हिंदू क्षत्रिय मराठा सातवाहन वंश की संक्षिप्त जानकारी। पोस्तसांभार :: सुयश शिर्क...





