फॉलोअर

सोमवार, ५ जून, २०२३

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ९२

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव



भाग ९२
सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप - राजकीय संघर्ष
पोस्तसांभार :: मिसळपाव
भाग
नहपानाच्या पराभवानंतर स्वस्थ न बसता गौतमीपुत्राने आणखी मोहिमा उघडल्या व गुजरात, राजस्थान, ओरिसा, मध्यप्रदेश इ प्रदेशापर्यंत त्याचा राज्यविस्तार केला. ह्या पराक्रमामुळे त्याची किर्ती संपूर्ण भरतखंडात पोहोचली.
क्षहरात कूळ समूळ नष्ट केल्याबद्दल त्याला 'क्षहरात वंस निर्वंस करस' असे म्हटले गेले. त्याकाळी त्याच्या इतका सामर्थ्यवान राजा भारतात दुसरा नव्हता. सातवाहनांचा मूलप्रदेश नहपानाच्या हातून जिंकून घेऊन त्याने सातवाहनांची प्रतिष्ठा वाढवली म्हणून त्याचा 'सातवाहन यश प्रतिष्ठा करस'असा गौरवपूर्वक उल्लेख केला गेला आहे. 'ती समुद्द तोय पीतवाहन' म्हणजे ज्याची घोडी तीन समुद्रांचे पाणी पितात असेही त्याला म्हटले गेले. उत्तर,दक्षिण मोहिमांमध्ये गौतमीपुत्राने शक, यवन, पल्हव राज्यकर्त्यांचा पराभव केला म्हणून त्याला 'शक यवन पल्हव निदुसनस' असे म्हटले गेले आहे. सातवाहन राजे मराठा असून कट्टर वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते. गौतमीपुत्र सातकर्णी स्वत:ला येथील शिलालेखात 'मऱ्हाट ' अर्थात एक मराठा म्हणवतो. क्षत्रियांचे निर्दालन केल्याने त्याला 'खतियदपमानदम' असेही नाशिक शिलालेखात म्हटले आहे.
गौतमीपुत्रानंतर त्याचा पुत्र वासिष्ठिपुत्र पुळुवामी गादीवर आला. हा सुद्धा आपल्या पित्यासारखाच पराक्रमी होता. गौतमीपुत्राच्या निधनानंतर उज्जैनचा महाक्षत्रप कार्दमकवंशीय रूद्रदामन आणि सातवाहन यांच्यात सख्य होऊन रूद्रदामनाने आपली कन्या पुळुवामीला दिली. पण तरीही सातवाहन आणि क्षत्रपांमधले संघर्ष चालूच राहिले. वासिष्ठिपुत्र पुळुवामीला नर्मदेच्या उत्तरेचा प्रदेश आणि कोकणचा काही भाग गमवावा लागला. रूद्रदामनाने वासिष्ठिपुत्र पुळुवामीचा दोनदा पराजय केला पण तो जावई असल्यामुळे त्याचा समूळ उच्छेद केला नाही असे त्याने गौरवाने जुनागढच्या शिलालेखात कोरून ठेविले आहे. या शिलालेखातच पुळुवामीचा उल्लेख 'दक्षिणापथपति' असा केला आहे यावरून पुळुवामीच्या सामर्थ्याची कल्पना यावी. ह्याला उत्तरेकडचा थोडासा प्रदेश जरी गमवावा लागला असला तरी ह्याने दक्षिणेत प्रचंड विस्तार करून आख्खा दक्षिण भारत आपल्या ताब्यात आणला होता.

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ९१

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव


भाग ९१
सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप - राजकीय संघर्ष
पोस्तसांभार :: मिसळपाव
भाग
शक क्षत्रपांच्या सततच्या हल्ल्यांनी जेरीस आल्यामुळे सातवाहनांची राज्यव्यवस्था खिळखिळी होऊन गेली. सह्याद्रीतील घाटमार्ग क्षत्रपांच्या ताब्यात गेल्यामुळे सातवाहनांकडे येणार्या संपत्तीचा ओघ खुंटला गेला. तत्कालिन सातवाहन नृपती शिवस्वातीच्या काळात सातवाहन राज्य गलितगात्र होऊन गेले. त्याच्या अमलाखाली फक्त दक्षिण महाराष्ट्राचा भूभाग राहिला होता असे दिसते. अशातच शिवस्वाती सातकर्णी याची पत्नी गौतमी बलश्री हिच्या पोटी एका पराक्रमी पुत्राचा जन्म झाला तोच गौतमीपुत्र सातकर्णी.
गौतमीपुत्र सातकर्णी अतिशय कुशल, धोरणी आणि महाप्रतापी होता. त्याने आपल्या कारकिर्दीच्या पंधरा सोळा वर्षात हळूहळू आपले सामर्थ्य वाढवत नेऊन परकी आक्रमकांच्या दास्यातून आपले साम्राज्य मुक्त करण्याचा निश्चय केला. सर्वप्रथम त्याने विदर्भावर स्वारी करून वेण्णा(वैनगंगा) नदीच्या काठावर असलेल्या पौनी (कुशावती) ह्या नगरीच्या क्षत्रपांचा उच्छेद केला व स्वतःला 'बेणाकटकस्वामी' म्हणून घोषित केले. नंतर त्याने पश्चिमेकडच्या प्रदेशात चाल करून नहपानाने बळकावलेल्या प्रदेशावर आक्रमण केले. त्याची आणि नहपानाची घनघोर लढाई नाशिकजवळच्या गोवर्धन पर्वताजवळ झाली. हा गोवर्धन पर्वत नेमका कुठला ते आता समजत नाही पण हा बहुधा त्र्यंबकेश्वरनजीकचा डोंगरी प्रदेश असावा. तीत नहपानाचा संपूर्ण पराभव होऊन तो सह्याद्रीच्या पर्वतरांगामधे आश्रयार्थ पळून गेला. या विजयानंतर गौतमीपुत्राने लागलीच नाशिकच्या लेण्यांस भेट देऊन तेथील बौद्ध भिक्षुसंघास 'अजकालकीय' नावाचे शेत निर्वाहासाठी दान केले व तसा उल्लेख तेथील शिलालेखामध्ये केला. याच लेखात गौतमीपुत्र स्वत:ला बेणाकटकस्वामी म्हणवतो. नाशिकचे युद्ध गौतमीपुत्राच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी झाले होते. गौतमीपुत्राच्या राज्यारंभाचे वर्ष निश्चितपणे माहीत नाही पण नहपानाच्या कारकिर्दीचे शेवटचे वर्ष शके ४६ आहे. त्यानुसार इस. १२५ मध्ये ही घटना घडली असावी.
नाशिक येथील विजयानंतर गौतमीपुत्राने सह्याद्रीमध्ये नहपानाचा पाठलाग करून त्याचा समूळ वंशविच्छेद केला व लागलीच कार्ले येथील लेणीला भेट देऊन तिथल्या बौद्ध संघाला निर्वाहासाठी करजक नावाचे गाव दान देऊन तसा शिलालेख तिथल्या भिंतीवर कोरविला. दोन्ही शिलालेखांतील वर्णनानुसार ह्या दोन युद्धात सुमारे पंधरा दिवसांचे अंतर होते असे दिसते. गौतमीपुत्राच्या कार्ले शिलालेखावरून नहपानाचा विच्छेद मावळप्रांती झाला असावा असे मानण्यास पुरेसा वाव आहे. या युद्धात फार मोठी कत्तल झाली. गौतमीपुत्राने नहपानाची सर्व नाणी जप्त करून त्यावर पुन्हा आपली मुद्रा उमटवून ती नाणी परत वापरात आणली. अशी जवळजवळ तेरा हजार नाणी सापडली आहेत.

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ९०

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव



भाग ९०
सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप - राजकीय संघर्ष
पोस्तसांभार :: मिसळपाव
भाग
नाणेघाटाबरोबरच इतरही अनेक घाटवाटा व त्यांचे संरक्षक दुर्ग मुख्य सह्यधार व त्यांच्या उपत्यकेत निर्माण केले गेले. बौद्ध धर्माला उदार राजाश्रय दिला गेला. ग्रीक, रोमन लोकांबरोबर व्यापाराला सुरुवात झाली. रोम, इस्तंबूल, अलेक्झांड्रिया आदी शहरांमधून येणार्या मणी, सोने, चांदी, रत्ने, प्रवाळ, नक्षीदार भांडी, उंची मद्यपेये इ. वस्तू समुद्रमार्गे चेऊल (चौल), कलियान (कल्याण), श्रीस्थानक (ठाणे), शूर्पारक (नालासोपारा) इ. बंदरात येऊन पडू लागल्या. सार्थवाह बैलांच्या तांड्यावर त्या वस्तू लादून खोदीव घाटमार्ग पार करू लागले व पैठण, तेर, नाशिक, ब्रह्मपुरी आदी शहरांत येऊ लागले व तिथे त्या वस्तू देऊन तलम रेशमी वस्त्रे, मसाल्याचे पदार्थ, कापूस, हस्तीदंती वस्तू, लोणी, तूप, मध, चंदन आदी माल परत समुद्रापार नेऊ लागले. हळूहळू व्यापाराची भरभराट होऊन सातवाहन साम्राज्य समृद्ध होत गेले. राज्य विस्तार पावू लागले. पैठण ही सातवाहनांची राजधानी. तिची किर्ती दूर दूर पसरू लागली व याच व्यापारावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी सातवाहनांच्या समृद्ध राज्यात क्षत्रपांचा प्रवेश झाला.
क्षत्रप म्हणजे प्रांताधिपती. क्षत्रप मूळचा संस्कृत शब्द नाही तो पर्शियन भाषेतील शब्द क्षत्रपन यांपासून बनलेला आहे. क्षत्र म्हणजे राष्ट्र. राष्ट्राचा कारभार पाहणारे ते क्षत्रपन. मध्यपूर्वेतून शकांच्या रानटी टोळ्यांची वरचेवर आक्रमणे होऊ लागली. शक मूळात वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये विभागलेले असल्याने शकांना स्वतंत्र असे नेतृत्व नव्हते. प्रत्येक टोळीचा एक प्रमुख असे.
सन ७८ मध्ये कुशाणवंशीय कनिष्काची राजवट सुरु झाली. त्याने लवकरच बहुतेक उत्तर भारत आक्रमून दक्षिणेकडे आपला मोर्चा वळवला. संस्कृतीविहीन, धर्मविहीन, रानटी अशा ह्या शकांना कुशाणवंशीयांनी आपलेसे केले. प्रथम कनिष्काने कच्छ जिंकून तेथे त्याने कार्दमक वंशीय 'चष्टन' याची आपला क्षत्रप म्हणून नेमणूक केली. पुढे कनिष्काने महाराष्ट्राच्या उत्तर भागात 'भूमक' हा क्षहरात वंशी दुसरा क्षत्रप नेमला. क्षहरात हा सुद्धा पर्शियन शब्द असून क्षहर म्हणजे नगर व राद् म्हणजे अधिपती. अर्थात नगराधिपती. भूमकाने गुजरात, काठेवाडाचा काही भाग, माळवा या प्रांतांवर आक्रमण करून त्यांचा ताबा मिळवला. त्याने महाराष्ट्राचा किती प्रदेश जिंकला होता याचे उल्लेख मात्र सापडत नाही. कनिष्काच्या मृत्युनंतर कुशाण राजवट कमजोर होऊन शकांनी स्वतंत्र राज्ये स्थापन केली व ते स्वतःस स्वामी, राजा, महाक्षत्रप अशा विशेषणांनी गौरवू लागले. क्षत्रपांची अनेक घराणी भारताच्या निरनिराळ्या प्रांतात लहान लहान राज्ये चालवू लागली. मथुरा, पंजाब, तक्षशीला यांवर अंमल करणार्या क्षत्रपांस 'उत्तरी क्षत्रप' तर माळवा, गुजरात, उज्जैन, उत्तर महाराष्ट्र यांवर अंमल करणार्यांस पश्चिमी क्षत्रप म्हणत असत. भूमकाच्या नंतरच्या पिढीतील नहपान क्षत्रपाने सातवाहनांची बरीचशी राज्यलक्ष्मी हरण करून जुन्नर, नाशिक, कोकण, विदर्भ आदी विस्तृत प्रदेश बळकावत सातवाहनांना पार प्रतिष्ठान (पैठण) पर्यंत ढकलले. स्वतः नहपानाने जुन्नर ही राजधानी केली असावी असे काही पुरातत्वीय पुराव्यांनुसार मानले जाते. नहपानाचा जावई उषवदात (ऋषभदत्त) याने आपल्या अनेक धर्मकृत्यांचा व दानांचा उल्लेख नाशिकच्या शिलालेखाद्वारे करून ठेवला आहे. यावरून त्याच्या आणि त्याचा सासरा नहपान यांच्या राज्यविस्ताराची, त्यांच्या साधनसंपत्तीची पुरेशी कल्पना येते. हे शक मूळचे रानटी जरी असले तरी इथली संस्कृती त्यांनी आपलीशी केली होती. बौद्धांना उदार राजाश्रय देऊन ब्राह्मणांनाही विपुल दानधर्म केला होता. नाशिकच्या शिलालेखात नहपानाचा उल्लेख 'क्षत्रप' असा आलेला असून कारकिर्दीचे वर्ष शके ४४ आहे तर जुन्नरजवळच्या मानमोडी लेणीतील शिलालेखात नहपानाचा अमात्य आयम नहपानाचा उल्लेख 'महाक्षत्रप' असा करतो व त्यात शके ४६ असा कालउल्लेख आहे. म्हणजेच केवळ दोनच वर्षात नहपान क्षत्रप पदावरून महाक्षत्रपपदाला पोहोचला पण दुर्दैवाने हेच त्याच्या कारकिर्दीचे आणि वंशाचेही शेवटचेच वर्ष ठरले.

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ८९

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव


भाग ८९
सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप - राजकीय संघर्ष
पोस्तसांभार :: मिसळपाव
भाग १
महाराष्ट्राच्या आद्य इतिहासात इथे दंडकारण्य होतं असं मानलं जातं. त्यानंतर काही आदिम जमातींनी वसाहती केल्या. पण लिखित किंवा इतर काही पुराव्यांच्या स्वरूपात इथला त्या काळचा इतिहास फारसा आढळत नाही. महाराष्ट्राचा ज्ञात इतिहास सुरू होतो तो प्रबळ पराक्रमी सातवाहनांपासून.
सातवाहन, भारत देशीच्या विस्तृत भूभागावर सुमारे ४५० ते ५०० वर्षे इतका प्रदीर्घ काळ राज्य केलेली एकमेव भारतीय राजवट, महाराष्ट्राचा आद्य राजवंश. सातवाहनांच्या पूर्वकाळातील अशोकाच्या शिलालेखांत रथिक, भोजक व पेतेनिक यांचे उल्लेख आढळतात पण ते तेव्हढ्यापुरतेच.
सातवाहनांच्या उदयानंतर मात्र त्यांनी खोदवलेल्या गुहा, तत्कालिन शिलालेख, त्यांनी पाडलेली नाणी, इ. पुरातत्वीय पुरावे तसेच गुप्तकाळात निर्माण झालेली पुराणे, हाल सातवाहनाने संकलित केलेली गाथा सप्तशती, गुणाढ्याची बृहत्कथा, शुद्रकाचे मृच्छकटिक यांसारख्या ऐतिहासिक दस्तावेजांमुळे तत्कालिन कालखंडाविषयी बरीचशी माहिती मिळू शकते.
अर्थात सातवाहनांवर काही लिहायचे म्हणजे तो एका मोठ्या लेखमालेचाच विषय होईल. त्यामुळे याविषयी फारसे विस्तारात न जाता सातवाहन आणि त्यांचे परंपरागत शत्रू शक-क्षत्रप यांच्या संघर्षावर काही प्रकाश टाकायचा प्रयत्न करत आहे.
तत्कालीन सातवाहन साम्राज्य नकाशा
कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाचे मतपरिवर्तन होऊन त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. अशोकाने केलेल्या अतिरेकी धर्मप्रसारामुळे, यज्ञयागावरील व मांसाहारावरील कडक बंधनांमुळे जनतेत असंतोष पसरून त्याचे राज्य बलाढ्य राज्य राजकीयदृष्ट्या बरेच कमजोर झाले होते. अशोकाच्या मृत्युनंतर त्याच्या विशाल साम्राज्याचे तुकडे पडून लहान लहान राज्ये अस्तित्वात आली. अशोकानंतर पन्नास वर्षांच्या अवधीतच मौर्य वंशाची सत्ता संपुष्टात येऊन पुष्यमित्र शुंगाने गादी बळकावली. कलिंग देशात खारवेलाने स्वतंत्र राज्य स्थापन केले तर महाराष्ट्रात रथिक, भोजक, पेतेनिक यांच्यापैकीच कुणी एक असलेल्या सातवाहन नावाच्या वीराने आपले स्वातंत्र्य उद्घोषित करून स्वतःच्या नावाची तांब्या-शिशाची नाणी पाडली व सातवाहन राज्याची मुहूर्तमेढ रोविली. (साधारण इस. पूर्व २३०)याच्या नंतरच्या पिढीचा, बहुधा सातवाहनाचा पुत्र सिमुक (श्रीमुख) सातवाहन गादीवर आला. याच्या कारकिर्दीत सातवाहन राज्य लहानसेच असावे पण याच्या नावाची स्वतंत्र नाणी आहेत. सिमुकानंतर त्याचा पुत्र पहिला सातकर्णी हा अल्पवयीन असल्याने सिमुकाचा भाऊ कण्ह (कृष्ण)हा सातवाहनांच्या गादीवर आला व कण्हानंतर पहिला सातकर्णी हा सातवाहन राजा झाला. कण्हाचे व प्रथम सातकर्णीचे संबंध तणावाचे असून त्याला आपले राज्य कण्हाशी लढूनच मिळवावे लागले असावे असे अभ्यासक मानतात कारण नाणेघाटातल्या प्रतिमा लेखात कण्हाची प्रतिमा दिसत नाही.
ह्या प्रथम सातकर्णीने सातवाहनांचे राज्य मध्यप्रदेशातल्या विदिशा पर्यंत नेऊन भिडवले असावे असे सांची येथील शिलालेखावरून समजते. हा अत्यंत सामर्थ्यवान सातवाहन राजा. याची पत्नी प्रख्यात सातवाहन सम्राज्ञी नागनिका उर्फ नयनिका. प्रथम सातकर्णीच्या काळातच नाणेघाटाची निर्मिती झाली. नाणेघाटाच्या सुरुवातीचीला कड्यात नागनिकेने गुहा खोदविली तेच सातवाहनांचे एकमेव ऐहिक लेणे. सातवाहनांनी केलेले अश्वमेध, राजसूयादिक यज्ञयाग, त्यात केलेला विपुल दानधर्म तसेच सातवाहनांच्या राजेकुलाच्या प्रतिमा व त्याखाली त्यांची नावे इ. उल्लेख त्यात कोरलेले आहेत.

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ८८

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव




भाग ८८
शककर्ता शालिवाहन- गौतमीपुत्र सातकर्णी (शतकर्णी) नाणी.
पोस्तसांभार :: https://www.maayboli.com/node/33680
हिंदू नववर्षाची आणि मराठी नववर्षाची सुरवात म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले. मराठी नववर्षाचा प्रारंभ हाच दिवस मानला जातो. पण ज्या शालिवाहनाच्या नावाने हे शक सुरू झाले,
शालिवाहन हे शक सातवाहन राजांशी संबंधित आहे. सातवाहनांची राजधानी तत्कालीन प्रतिष्ठान आणि आताचे पैठण ही होती. या सातवाहन राजांनी दीर्घकाळ महाराष्ट्र व शेजारील प्रदेशावर राज्य केले. इसवी सनाच्या पहिल्या शतकात शकांनी पश्चिम भारतावर आक्रमण करून सातवाहनांची या प्रदेशावरची सत्ता उखडून टाकली. त्यामुळे महाराष्ट्र, व शेजारील प्रदेशावरील सातवाहनांचे वर्चस्व संपले आणि त्यांना दक्षिणेत जावे लागले.
याच सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा तेवीसावा राजा अतिशय पराक्रमी होता. त्याच्या पित्याचे नाव शिवस्वाती व आईचे नाव गौतमी बलश्री असे होते. सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती. त्यामुळे राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावित असत. गौतमी ही सातकर्णीची आई होती. म्हणूनच त्याचे नाव गौतमीपुत्र सातकर्णी असे होते. नाशिकजवळ गोवर्धन येथे सातकर्णी व शकांमध्ये तुंबळ लढाई झाली. यात शकांचा राजा नहपान हा मृत्युमुखी पडला. सातकर्णी विजयी झाला. त्याने या प्रदेशात पुन्हा एकदा सातवाहनांचे वर्चस्व प्रस्थापित केले याच्या कार्यकाळात सातवाहन राज्याने भरभराटीचा कळस गाठला होता.
नाशिकजवळ बौद्धलेणी आहेत. या लेण्यांमध्ये सातकर्णीविषयीची माहिती मिळते. सातकर्णी याचा उल्लेख येथील लेखांत वेदांचा व ब्राह्मणांचा आश्रयदाता असा केला आहे. सातकर्णी वैदिक धर्माचा पोषक असूनही तो अत्यंत धार्मिक व सहिष्णू होता. बौद्ध धर्माच्या बाबतीत तो अतिशय उदार होता. बौद्धांच्या तत्कालीन संघांना त्याने बरीच मदतही केली होती. मुंबईजवळील कार्ले येथी बौद्ध संघालाही त्याने करजक नावाचे गाव दिले होते.
तसेच सुप्रसिद्ध नाणेघाट यांच्याच शासन काळात घडवला गेला.
एका समकालीन कविच्या अनुसार प्रुथ्वीला दोन भार वहावे लागतात
उत्तरेला हिमालयाचा आणि दक्षिणेला सातवाहनांच्या पराक्रमाचा.
बोरीवली येथील कान्हेरी लेणी हि सुद्धा याच शालिवाहनाची देण आहे आणि हे कळल्यावर तुम्हाला थोडे नवलच वाटेल कान्हेरी लेणी ही त्या काळचे विद्यापिठ होते यावर आजुनही खोल संशोधन चालु आहे.
शकांचे दमन करणारा शालिवाहन (सातवाहन) गौतमीपुत्र सातकर्णी असा त्याचा उल्लेख सापडतो. त्यामुळे शालिवाहन शकाचा प्रारंभ त्याच्या जीवनकाळात झाला. त्याचा कार्यकाळ इसवी सन १०६-१३० असा मानला जातो. इसवी सन ७८ पासून हे शालिवाहन शक सुरू झाले. पण गौतमीपुत्र सातकर्णीच्या शासनकाळाशी ही तिथी जुळत नाही. त्यामुळे त्याच्या जन्मापासून हे संवत सुरू झाल्याचे मानले जाते.
गौतमीपुत्र सातकर्णीचे चांदिचे नाणे
त्या नाण्याची पाठची बाजु.
सातकर्णी तांब्याची नाणि
दक्षिणेचेपहिले सम्राट सातवाहन यांची नाणी महाराष्ट्रात नाशिक, नेवासे , कोल्हापूर, तेर, कऱ्हाड, पैठण,जुन्नर, चांदा व तऱ्हाळे इ. अनेक ठिकाणी सापडली आहेत. सातवाहनानी मुख्यत्वे तांब, जस्त इत्यादी धातूंचा उपयोग केला असून, चांदीचा वापर वसिष्ठीपुत्र पुलुमावी , वसिष्ठीपुत्र सातकर्णी व गौतमीपुत्र श्री यज्ञ सातकर्णी चित्रीत केलेली थोडी नाणी सापडली आहेत. सातवाहन नाण्यांवर बैल, हत्ती व सिंह यासारख्या प्राण्यांच्या कोरलेल्या अक्षरांसहित आकृती एका बाजूला असून दुसऱ्या बाजूला साधारणतः पार बांधलेले झाड, मासा, वृषभ, नदी, नंदीपाडा व उज्जैन पद्धतीचे स्वस्तिक या प्रकारची चित्रे आहेत.
यात जाणकार आजुन भर घालतीलच

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ८७

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव




भाग ८७
तऱ्हाळे नाणेसंचय (Tarhala Coin Hoard)
पोस्तसांभार :: वैदेही भागवत
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात (पूर्वीच्या अकोला जिल्ह्यातील मंगरूळ तालुक्यात) स्थित तऱ्हाळे गावात सप्टेंबर १९३९ मध्ये एका शेताजवळून वाहणाऱ्या नाल्याशेजारी जमिनीमध्ये गाडलेले एक मृद-भांडे सापडले. या मृदभांड्यात जवळपास १६०० सातवाहनकालीन नाण्यांचा संचय प्राप्त झाला. तत्कालीन ट्रेजर ट्रॉव्ह ॲक्ट अंतर्गत त्या काळातील प्रांतिक सरकारने सदर निधी ताब्यात घेतला व मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय, नागपूर यांच्याकडे पाठविला.
विदर्भामध्ये सापडलेला सातवाहनकालीन नाण्यांचा हा दुसरा महत्त्वाचा नाणेसंचय आहे. यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे सापडलेला चांदा नाणेनिधी म्हणून प्रसिद्ध असलेला नाणेसंचय आढळून आला. तऱ्हाळे नाणेसंचयाचे संशोधन व प्रकाशन सर्वप्रथम वा. वि. मिराशी यांनी केले.
नाणेसंचयाचे वर्णन : नाणेसंचयातील १६०० नाण्यांपैकी १५२५ नाणी पूर्ण आकाराची तर, ७५ नाण्यांचे तुकडे आढळून आले. सर्व नाणी केवळ सातवाहन नृपतींची होती. परदेशी राजवंशाचे (उदा., रोमन) एकही नाणे नव्हते, हे या नाणेसंचयाचे वैशिष्ट्य. प्राप्त नाणी पोटीन या मिश्र धातूची (तांबे व शिसे या धातूंचे मिश्रण) होती. तथापि निरनिराळ्या नाण्यांमध्ये तांबे व शिसे यांचे प्रमाण वेगवेगळे असल्याचे आढळून आले. काही नाणी शिसे या धातुप्रमाणे काळी तर काही तांब्याप्रमाणे तांबड्या चकचकीत रंगाची असल्याचे दिसून आले.
नाण्यांचे वर्णन : संचयातील सर्व नाणी एकाच प्रकारची व गोलाकार आहेत. त्यांच्या दर्शनी भागावर सोंड उंचावलेला हत्ती व गोलाकार कडेवर व ब्राह्मी लिपीत व प्राकृत भाषेत राजाचे नाव सांगणारा लेख तर मागील बाजूवर उज्जैन चिन्ह आहे. उज्जैन चिन्हाच्या चार बाजूंवरील मोठ्या वर्तुळांमध्ये एक लहान वर्तुळ (वर्तुळात वर्तुळ) आहे. काही वर्तुळांच्या वरच्या बाजूला चंद्रकोर आहे.
कर्ण सातकर्णी या राजाची नाणी वगळता उर्वरित नाण्यांवर दर्शनी भागावरील हत्तीचे तोंड उजवीकडे आहे. कर्ण सातकर्णीच्या नाण्यांवर मात्र हत्तीचे तोंड डावीकडे आहे, असे निरीक्षण मिराशींनी नोंदविले आहे. काही नाण्यांची चकती (planchet) लेखाच्या ठशापेक्षा लहान असल्यामुळे बऱ्याच नाण्यांवर लेख अपूर्णावस्थेत आहेत. नाणी वजनाने हलकी असून वजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वैविध्य आढळते. प्राप्त नाण्यांचे नृपतीनिहाय वर्णन पुढीलप्रमाणे :
गौतमीपुत्र सातकर्णी : नाण्यांची संख्या – ५७३. निधीतील सर्वाधिक नाणी या नृपतीची आढळतात. नाण्यांवर सिरि सातकणिस किंवा सिरि सातकणि हे लेख आढळतात. नाण्यांचे वजन – ३१- ६० ग्रेन्स दरम्यान.
वाशिष्ठिपुत्र पुळुमावी : नाण्यांची संख्या – १७४. नाण्यांवर रञो सिरि पुळुमाविस अशा प्रकारचा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ४० – ४५ ग्रेन्स दरम्यान.
चौथा सातकर्णी : नाण्यांची संख्या – ३५. नाण्यांवर सिव सिरी सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : २६ – ३८ ग्रेन्स दरम्यान.
शिवश्री पुळुमावी : नाण्यांची संख्या – ३२. नाण्यांवररञो सिव सिरि पुळुमाविस अशा प्रकारचा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ३७ – ५० ग्रेन्स दरम्यान.
स्कंद सातकर्णी : नाण्यांची संख्या – २३. नाण्यांवर (रञो) सिरि खद सातकणिस असा लेख दिसतो. नाण्यांचे वजन : ५० – ५२ ग्रेन्स दरम्यान.
यज्ञ सातकर्णी : नाण्यांची संख्या २४८. नाण्यांवर रञो सिरि यञ सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ३१ – ४५ ग्रेन्स दरम्यान.
विजय सातकर्णी : नाण्यांची संख्या : ४. नाण्यांवर (सिरि) विजय सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ४० – ५० ग्रेन्स दरम्यान.
कुंभ सातकर्णी : नाण्यांची संख्या : ५६. नाण्यांवर (रञो) सिरि कुभ सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : सरासरी ३० ग्रेन्स.
कर्ण सातकर्णी : नाण्यांची संख्या – ७. नाण्यांवर सिरि कण सातकणिस हा लेख आहे. नाण्यांचे वजन : ३० – ३६ ग्रेन्स दरम्यान.
शक सातकर्णी : नाण्यांची संख्या – ४. नाण्यांवर सिरि सक किंवा सकस सातकणिस असा लेख दिसतो. नाण्यांचे वजन : ३४ – ३७ ग्रेन्स दरम्यान.
श्री पुळुहामवी : नाण्यांची संख्या – ४. नाण्यांवर (रञो सिरि) पुळुहामविस हा लेख आहे. नाण्यांचे वजन : ४० – ५१ ग्रेन्स दरम्यान.
याशिवाय ज्या नाण्यांवरचे लेख वाचता येत नाहीत, अशा नाण्यांची संख्या ३६५ एवढी आहे.
नाणेसंचयाचे महत्त्व : चांदा नाणेनिधी प्रमाणेच नंतरच्या काळात सापडलेला तऱ्हाळे नाणेसंचय सातवाहनांच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा स्रोत ठरतो. आतापर्यंत सापडलेल्या सातवाहनकालीन नाणेसंचयामध्ये हा नाणेसंचय मोठा आहे. उत्तर सातवाहन काळातील सातवाहन नृपती व त्यांचा कालक्रम ठरविण्यासाठी या नाणेसंचयाची मदत होते. हत्ती व उज्जैन छापाची नाणी विदर्भात चलनात होती, हे या संचयामुळे सिद्ध होते. पुराणात वर्णन केलेल्या अनेक सातवाहन राजांची नाणी प्रथमच या नाणेसंचयाद्वारे प्राप्त झाली. तसेच पुराणात उल्लेख नसलेल्या काही राजांची नाणीदेखील या संचयामुळे प्रकाशात आली. सातवाहन राजवंशाच्या अगदी शेवटच्या काळात सातवाहनांची सत्ता विदर्भापुरती मर्यादित असल्याचे पुरावे या नाणेनिधीमुळे प्राप्त झाले.
संकेतशब्द : तऱ्हाळे, वाशिम, अकोला, सातवाहन, वा. वि. मिराशी, चांदा, गौतमीपुत्र सातकर्णी, वाशिष्ठिपुत्र पुळुमावी, सातकर्णी चौथा, शिवश्री पुळुमावी, स्कंद सातकर्णी, यज्ञ सातकर्णी, विजय सातकर्णी, कुंभ सातकर्णी, कर्ण सातकर्णी, शक सातकर्णी, पुळुहामवी, विदर्भ
संदर्भ :
Mirashi, V. V. ‘Studies in Indology’, Vol. 3, (Ancient Indian Coins), Vidarbha Samshodhan Mandal, pp.34-48, Nagpur, 1962.
Sarma, I. K. Coinage of the Satavahana Empire, Delhi, 1980.
Shastri, A. M. Ed., Historical Analysis of the Satavahanas and Coins from Excavations, Nagpur, 1972.
Gokhale, Shobhana, Lord of Dakshinapatha Coins, Trade and Trade – Centres Under the Satavahanas, Mumbai, 2008.
पाठक, अरुणचंद्र संपा., महाराष्ट्र प्राचीन काळ (खंड :१), दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००२.

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ८६

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव




भाग ८६
चांदा नाणेसंचय (Chanda Coin Hoard)
पोस्तसांभार :: वैदेही भागवत
महाराष्ट्रातील सातवाहनकालीन नाण्यांचा एक प्रसिद्ध संचय. ब्रिटिशकालीन चांदा (सध्याचा चंद्रपूर जिल्हा) जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील एका गावातील शेतामध्ये हा नाणेसंचय सापडला (ऑक्टोबर १८८८). ब्रिटिश पोलीस उपअधीक्षक जे. हिगीन्स यांनी सापडलेला हा संचय एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेकडे सुपुर्द केला. या नाणेसंचयाचा अहवाल प्रथम डॉ. हॉर्नले यांनी प्रोसिडिंग्ज ऑफ एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालमध्ये प्रसिद्ध केला (१८९३). या नाणेसंचामध्ये एकूण १८३ नाण्यांचा समावेश होता. संचयातील सर्व नाणी सातवाहन नृपतींची होती. या संचयाचे वैशिष्ट्य म्हणजे विदर्भात सापडलेला सातवाहन नाण्यांचा हा प्रथम संचय होय.
नाण्यांचे वर्णन : या निधीतील सर्व नाणी पोटीनची (तांबे व शिसे यांचा मिश्र धातू) आहेत. दर्शनी भागावर उजवीकडे तोंड करून उभा असलेला हत्ती, तर मागील बाजूवर उज्जैन चिन्ह या प्रकारची ही नाणी आहेत. यांच्या दर्शनी भागावर गोलाकार कडेवर राजाचे नाव असणारा प्राकृत भाषेतील व ब्राह्मी लिपीतील लेख आहे. ही नाणी साधारणपणे ३०-५० ग्रेन्स वजनाची आहेत.
एकूण १८३ नाण्यांपैकी हॉर्नले यांनी ५१ नाणी गौतमीपुत्र सातकर्णी, २४ नाणी वासिष्ठीपुत्र पुळुमावी, तर ४२ नाणी यज्ञ सातकर्णी यांची असल्याचे दर्शविले आहे. हॉर्नले यांच्या नोंदींप्रमाणे गौतमीपुत्र सातकर्णीच्या नाण्यांवर सिरि सातकरणि (सदर वाचन प्राकृत भाषेच्या नियमाना धरून नाही, हे आधुनिक काळातील सातवाहन नाण्यांच्या अभ्यासावरून स्पष्ट झाले आहे.) अथवा सिरि सातकणिस हे लेख आढळले. वासिष्ठिपुत्र पुळुमावीच्या नाण्यांवर (सि) अथवा सिरि पुळुमाविस अशा प्रकारचे लेख आढळले. पुळुमावीच्या काही नाण्यांवर सिरि (श्री) हा बहुमानदर्शक शब्द न आढळता केवळ पुळुमाविस असाही लेख आढळला आहे (ही नाणी त्रुटित लेखांची असल्याने त्यावर फक्त पुळूमावीस एवढाच लेख दिसतो). यज्ञ सातकर्णीच्या नाण्यांवर *ञ सीरि यञ सातकणि (* = पहिले अक्षर वाचता येत नाही) असा लेख दिसून येतो. याशिवाय काही नाण्यांवर अनिश्चित स्वरूपाचे लेख आढळले. यांपैकी एका नाण्यावर य (गद?) सात, दोन नाण्यांवर सिरि (किंवा रि )कणु सात (ही नाणी बहुदा कर्ण सातकर्णीची असावीत, असे नंतर सापडलेल्या पुराव्यांवरून विशेषतः तऱ्हाळे नाणे संचयात प्राप्त झालेल्या नाण्यांवरून वाटते.) आणि उर्वरित दोन नाण्यांवर फक्तरञो (किंवा ञ्ओ) अशा प्रकारचे लेख आहेत. हॉर्नले यांना या नाण्यांची ओळख पटवता आलेली नाही.​ मुळात चांदा नाणेसंचय हा एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात सापडला असून त्या काळी सातवाहन नाण्यांची मोठ्या प्रमाणावर उपलब्धी झाली नव्हती, तसेच सातवाहन नाण्यांबद्दलची माहिती अपूर्ण होती. या मर्यादा लक्षात घेऊन चांदा नाणेसंचयाचा अभ्यास करावा लागेल. वरील नाणेनिधीतील काही नाणी ब्रिटिश म्युझिअम, लं​​डन, काही नाणी इंडियन म्युझिअम, कोलकाता येथे पाठविण्यात आली आहेत. याशिवाय ६० नाणी किंवा नाण्यांचे तुकडे सापडले आहेत. त्यांच्या दर्शनी भागावरील हत्तीचे चिन्ह व मागील बाजूवरील उज्जैन चिन्ह स्पष्ट दिसत असले, तरी लेख संपूर्णपणे नष्ट झाले आहेत.
नाणेसंचयाचे महत्त्व : चांदा नाणेनिधी हा वर सांगितल्याप्रमाणे विदर्भात सापडलेला पहिला नाणेसंचय आहे. यानंतर इतर नाणेसंचय सापडले असले, तरी सातवाहनकालीन नाण्यांचा तपशीलवार अभ्यास करणे या नाणेनिधीमुळे शक्य झाले. सातवाहनकालीन विशेषतः उत्तर सातवाहकालीन नाण्यांचा संचय यादृष्टीने याचे महत्त्व असाधारण आहे. सातवाहनांच्या नाण्यांची व्याप्ती व प्रसार खूप विस्तृत आहे. सातवाहन नृपतींनी त्यांच्या आधिपत्याखालील विविध प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची नाणी काढली. त्यामुळे सातवाहनकालीन नाण्यांचा अभ्यास करताना तो कालक्रमानुसार तसेच प्रादेशिक वैशिष्ट्यांनुसार करणे सयुक्तिक ठरते. त्यांपैकी विदर्भात उत्तर सातवाहन काळात हत्ती व उज्जैन चिन्ह असलेली नाणी दीर्घकाळ प्रचलित असल्याचे कळते. सातवाहन साम्राज्याच्या अस्तानंतर त्यांचे राज्य फक्त महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा भागापुरते मर्यादित असल्याचे चांदा व तऱ्हाळे नाणेसंचयावरून दिसून येते. सातवाहनांच्या हत्ती व उज्जैन छापाची नाणी तांबे, शिसे व पोटीन या धातूंमध्ये आढळतात. त्यांपैकी चांदा येथे केवळ पोटीनची नाणी आढळली आहेत. मूलतः या नाण्यांची व्याप्ती मोठी असली, तरी सातवाहनांच्या शेवटच्या काळात ती केवळ विदर्भात आढळतात. त्यामुळे उत्तर सातवाहनकालीन इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने चांदा नाणेसंचय महत्त्वाचा ठरतो.
संदर्भ :
Sarma, I. K. Coinage of the Satavahana Empire, Delhi, 1980
Shastri, A. M. Ed., Historical Analysis of the Satavahanas and Coins from Excavations, Nagpur, 1972.
Gokhale, Shobhana, Lord of Dakshinapatha Coins, Trade and Trade- Centres Under the Satavahanas, Mumbai, 2008

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...