फॉलोअर

सोमवार, २१ जानेवारी, २०१९

माहुलीचा वेढा

 माहुलीचा वेढा

शहाजीराजे हे निजामशाहीच्या सेवेत रुजू होते. निजामशाहाच्या मृत्युपश्चात त्याची सात आठ वर्षाची दोन मुले होती. निजामशाही दरबारात साबाजी अनंत हे ब्राम्हण मुत्सद्दी तसेच थोर अकलवंत कार्यरत होते. पातशाहच्या बायकाेने साबाजीस विचारले "आता पातशाहीस एखादा वजीर दिवाण पाहिजे, चोख बंदोबस्त करणारा असा अकलवंत मोहरा पाहिजे". त्यानंतर साबाजी यांनी शहाजी राजांस पातशाहीच्या बायकाेकडे घेऊन गेले. मुळात शहाजीराजे हे देखणे, अकलवंत आणि तसेच शूर शिपाई असल्याकारणाने साबाजी यांनी शहाजीराजे यांचे नाव सुचवले आणि म्हणाले "हा दिवाण वजीरीलायक आहे" असा अर्ज साबाजी यांनी केला त्यावरून निजामशाहच्या बायकाेने देखील यास मंजुरी दिली.
निजामशाहीच्या अस्तानंतर राज्य चालवण्यासाठी शहाजीराजांनी त्यांच्या दोन्ही मुलांना स्वत: मांडीवर घेतले आणि गादीवर बसुन राज्य कारभार पाहू लागले. गादीखाली जाधवराव वगैरे मनसबदार लोक मुजऱ्यास घेतले. कित्येक दिवस अशा प्रकारे कारभार केला. लखुजीराव जाधव याना त्यावेळी खूप दुःख झाले होते कारण, त्यांच्याकडे भोसले यांची सोयरीक जुळली होती आणि तेच भोसले पातशाहीची मुले घेऊन कारभार पाहतात आणि आम्हास मुजरा करावा लागतो हे त्यास योग्य नाही वाटले. त्यावेळी जाधवरावांनी मनसुबा करून दिल्लीस शाहजाद्याकडे वकील अर्जी पाठवून साठ हजार फौज उत्तरेकडून मागवली आणि ते दौलताबादेस चालून आले.
जेव्हा हि खबर शहाजीराजे यांस कळाली तेव्हा त्यांनी मुलगा आणि बायकोसमवेत (म्हणजेच पुत्र संभाजी आणि जिजाऊसाहेबां सोबत) कल्याण भिवंडी जवळ असलेल्या किल्ले माहुली येथे आले. कोकणातील थोर किल्ला पाहून सोबत काही फौज घेऊन ते येथे आश्रयास आले. मागून जाधवराव व उत्तरेकडून आलेली फौज माहुलीस सहा महिने लढाई - वेढा घालून बसली होती. शहाजीराजांनी लढा चालू असतानाच विजापूरच्या पातशाहास अर्ज लिहून वकील पाठवला आणि त्यात म्हंटले कि “पातशाहची मोहीम झाली. आमचे सासरे फौज घेऊन आमच्यावर चालून आले. आम्ही माहुली किल्ला बळकावून बसलो आहे. जर का पातशाह आम्हाला कौल पाठवतील आणि दौलत अधिक देतील तर आम्ही फौजेसह पातशाहीच्या चाकरीत येऊ”. त्यावरून पातशाह विजापूरचे मुरारजगदेव दिवाण पातशाही त्यांनी कौल आणि इमान पाठवले.
त्यानुसार शहाजीराजे यांनी आपल्या पाच हजार फौजेनिशी जाधवरावांचा वेढा मारून रातोरात माहुली वरून पलायन केले. सोबत पुत्र संभाजी आणि जिजाऊसाहेब होत्याच. त्यावेळी जिजाऊसाहेब सात महिन्याच्या गरोदर होत्या. त्यामुळे पलायन, आपल्या वडिलांचा होणार पाठलाग हि सर्व दगदग त्यांना सहन होत नव्हती. शहाजीराजांनी हे जाणिले आणि त्यांनी आपल्या फौजेतील शंभर स्वार जिजाऊंसोबत ठेऊन ते पुढारी निघून गेले. मागून जाधवराव आपल्या फौजेनिशी येत होते त्यांनी वाटेत जिजाऊसाहेबांना पाहिले. जाधवराव यांनी पाचशे स्वार पाठवून जिजाऊसाहेबांना त्वरित शिवनेरी किल्ल्यावर घेऊन गेले. त्यावेळी जिजाऊसाहेब यांनी शिवनेरीवर असलेल्या शिवाई देवीस नवस आपणास जर पुत्र जाहला तर त्यास तुझे नाव देऊ...
एकंदरीत वरील घटना पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते, जर का माहुलीचा वेढा काही काळ अजून चालू राहिला असता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा किल्ले माहुली येथे झाला असता.
संकलन - मयुर खोपेकर, बा रायगड परिवार
संदर्भ - ९१ कलमी बखर (राजवाडे. साने, फॉरेस्ट)

गुरुवार, १७ जानेवारी, २०१९

⚔🌄पावनखिंड🌄⚔ ▪भाग : ०३▪



🌄पावनखिंड🌄
भाग : ०३
बाजी वाड्यात गेले. आतल्या सोप्यात ते जेव्हा गेले, तेव्हा गौतमार्इ तेल-हळद घेऊन आल्या होत्या. पाठोपाठ सोनाबार्इ आल्या. बाजी अंगरखा उतरत म्हणाले,
‘काही झालं नाही.’
दोघी बाजींच्या दंडावरची जखम पाहत होत्या.
जखम किरकोळ होती. रक्त यायचं थांबलं होतं.
गौतमार्इ जखमेवर तेल लावत असता सोनाबार्इ म्हणाल्या,
‘असला कसला खेळ खेळायचा !’
बाजी हसले. म्हणाले,
‘आमचा पानाचा डबा मागवून घ्या.’
गौतमार्इ बाजींच्या जखमेवर पट्टी बांधत होत्या. त्यांच्याकडं पाहून बाजी हसत होते. गौतमार्इ त्या हसण्यानं चिडल्या. त्या म्हणाल्या,
‘हसायचं कसलं ते !’
‘तुम्हांला माहीत नाही.’ बाजी सांगत होते, ‘पोर मोठं गुणी आहे. पट्टा चालवताना पाहिलं नाहीत. पाय कसं नाचवीत होतं, ते ! आणि तलवारीची सफार्इ केवढी ! त्याचा बाप गुणाजी असाच धारकरी होता.’
‘होता !’ सोनाबार्इ उद्गारल्या.
‘हां ! बांदलांचं आणि जेध्यांचं जेव्हा वैर पेटलं, तेव्हा हा गुणाजी जेध्यांच्या बाजूनं लढत होता. लढार्इत कुणीतरी पायावर वार केला. गुणाजी अधू बनला. त्यानंच पोराला तयार केलं आणि माझ्याकडं पाठवलं.’
बाजींनी अंगरखा चढवला आणि त्याच वेळी बाहेरून घोड्यांच्या टापांचा आवाज आला. बाजी उठले आणि सोनाबार्इंनी पगडी पुढं केली.
‘कोण आलं ?’
‘दाजीसाहेब !’ सोनाबार्इ म्हणाल्या.
‘कोण ! दादासाहेब ?’ म्हणत बाजींनी पगडी घातली आणि गडबडीनं ते बाहेर आले.
सोनाबार्इंनी सांगितलेलं खोटं नव्हतं.
बाजींचे थोरले बंधू फुलाजी चौकातून सदरेकडं येत होते.
फुलाजी देशपांडे बाजींच्यापेक्षा वयानं मोठे. बाजींच्यासारखीच त्यांची अंगलट. कोणीही दोघांना एकत्र पाहिलं, तर ते सख्खे बंधू आहेत, हे ओळखावं.
बाजी तत्परतेनं सदरेच्या पायऱ्या उतरले. फुलाजींना वाकून नमस्कार केला. फुलाजी म्हणाले,
‘बाजी, तातडीनं गड गाठायला हवा. राजांची तशी आज्ञा आहे.’
‘काय झालं ?’ बाजींनी विचारलं.
‘शिवाजी भोसल्याचा खलिता आला आहे.’
‘खलिता ?’ बाजी उद्गारले.
‘चला. आत सांगतो !’
दोघे सदर ओलांडून वाड्यात प्रवेश करते झाले.
सोनाबार्इ आणि गौतमाबार्इंनी फुलाजींना वाकून नमस्कार केला. आशीर्वाद पुटपुटत फुलाजी म्हणाले,
‘आम्ही गडावर जाणार आहोत तातडीनं !’
दोघे बंधू शयनगृहात गेले. फुलाजी पलंगावर बसले. बाजी जवळ उभे होते.
‘काय म्हणतो शिवाजी भोसला ?’ बाजींनी विचारलं.
‘काय म्हणणार ! आपल्या पुंडाव्यात सामील व्हा, असं सांगतो.’ फुलाजींनी उत्तर दिलं.
‘मग, राजे काय म्हणाले ?’
‘त्यासाठी तर तुला बोलावलंय्. तू त्यांचा प्रधान. तू सल्ला देशील, तो खरा. पानावर बसणार असाल, तर जेवायला गडावर घेऊन या, असं सांगितलंय् राजांनी !’
बाजी, फुलाजी शयनगृहाच्या बाहेर आले.
सोनाबार्इ, गौतमार्इ सोप्यात उभ्या होत्या.
त्यांच्याकडं वळून फुलाजी म्हणाले,
‘आम्हांला गडावर तातडीनं जायला हवं !’
‘भोजन करून गेलं, तर…’ सोनाबार्इ म्हणाल्या.
‘तेवढी उसंत नाही.’ फुलाजी म्हणाले.
दोघींनी फुलाजींना वंदन केलं आणि दोघं सदरेवर आले.
सदरेवर म्हातारे तात्याबा म्हसकर उभे होते. पागेबाहेर आणलेली घोडी आणि दोघांचे वेश बघून तात्याबांनी विचारलं,
‘कुठं जायचा बेत ?’
‘विचारलंत कुठं म्हणून ?’ बाजी उद्वेगानं म्हणाले, ‘येवढं वय झालं, तरी एखादा बाहेर जाताना कुठं म्हणून विचारू नये, हे, तात्याबा, कसं कळत नाही ?’
‘चुकलंच ते… तात्याबा म्हणाले, ‘आता वय झालं नव्हं !’
‘जाऊ दे, रे !’ फुलाजी बाजींना म्हणाले; आणि तात्याबाकडं पाहून ते बोलले, ‘तात्याबा ! राजांचा निरोप आलाय्. गडावर आम्ही जातो.’
‘मग, येऊ मी ?’
‘चल की ! पण तू चालत येणार आणि आम्ही घोड्यावरून जाणार !’
तात्याबानं आपल्या पांढऱ्या मिशीला पीळ भरला आणि तो म्हणाला,
‘म्हातारा झालो, म्हणून मांड ढिली झाली न्हार्इ.’
सारे हसले. बाजी म्हणाले,
‘तात्याबा, ते खरं ! पन आता तू घरी जाणार. निरोप घेणार. वेळ होर्इल.’
‘कसला निरोप ! वाड्यावर आलो, तवाच निरोप घेतला घरी. कोन तरी सांगंल घरला; धन्यासंगं गडावर गेलो, म्हणून. आता काय तरनाताठा मी, ते कारभारणीला निरोप सांगू ? त्यो तुमी सांगायचा !’
तात्याबाच्या बोलण्यानं सदरेवरच्या साऱ्यांना हसू आलं.
बाजी म्हणाले,
‘बरं, चल ! उगीच वटवट नको.’
चौकात दोघांचे घोडे घेऊन सेवक उभे होते.
बाजींचं लक्ष यशवंतकडं गेलं. ते फुलाजींना म्हणाले,
‘दादासाहेब, हा यशवंत जगदाळे. गुणाजीचा मुलगा. धारकरी म्हणून आम्ही त्याला घेतला आहे.’ यशवंतकडं वळून बाजी म्हणाले, ‘यशवंतराव, तुमची नेमणूक आमच्या वाड्यावर. लक्ष ठेवा.’
तात्याबासह दोघे बंधू स्वार झाले. वाड्याबाहेर जाताच शिलेदारांचं पथक त्यांना मिळालं. रोहिड्याच्या दिशेनं घोडी उधळत निघाली.
गर्द रार्इतून घुमणारा टापांचा आवाज बराच वेळ ऐकू येत होता…
🚩क्रमशः🚩

⚔🌄पावनखिंड🌄⚔ ▪भाग : ०२▪

🌄पावनखिंड🌄
भाग : ०२
जेव्हा बाजी भानावर आले, तेव्हा त्यांचं लक्ष चौकाकडं गेलं. सदरेलगत चौकात एक तरुण उभा होता. मांड-चोळणा परिधान केलेल्या त्या तरुणाच्या मस्तकी मराठेशाही पगडी शोभत होती. ओठावर कोवळ्या मिशीची काळी रेघ उमटली होती. चेहऱ्यावर प्रसन्न स्मित रेंगाळत होतं. बाजींची नजर वळताच त्यानं मुजरा केला.
‘कोण ?’ बाजींनी विचारलं.
‘मी यशवंतराव जगदाळे ! भोरच्या गुणाजीरावांचा मुलगा.’
‘का आलात ?’
‘आबांनी तुमांस्नी भेटायला सांगितलं. धारकरी म्हनून पदरी घ्यावं.’
त्या कोवळ्या तरुणाकडं बाजी कौतुकानं पाहत होते. पट्टा, विटा, तलवार, भाला या सर्व शस्त्रांत जो पारंगत असेल, तो धारकरी.
‘धारकरी !’ बाजी उद्गारले. ‘यशवंतराव, आम्ही गुणाजींना ओळखतो. ते आम्हांला परके नाहीत. आम्ही तुम्हांला जरूर आमच्याकडं घेऊ. पण धारकरी म्हणून नव्हे ! शिपार्इगिरीत या. पुढं तुमचं कसब आणि इमान बघून आम्ही तुम्हांला जरूर मोठेपण देऊ.’
‘मी धारकरी हाय ! ती जागा मिळाली, तरच आमी चाकरीला येऊ.’ यशवंत म्हणाला.
‘अस्सं !’ आपला संताप आवरत बाजी म्हणाले, ‘कोणती हत्यारं चालवता तुम्ही ?’
‘तलवार, भाला, पट्टा, फरीगदगा…’
‘अरे, वा !’ बाजी मिशीवरून पालथी मूठ फिरवीत होते. पण ओठांवर आलेलं हसू लपत नव्हतं. एकदम बाजी ओरडले,
‘कोण आहे तिकडं !’
सेवक धावले.
बाजींनी आज्ञा केली,
‘हत्यारं घेऊन या.’
काही क्षणांत बाजींच्या समोर हत्यारं ठेवली गेली.
‘यशवंतराव, पट्टा उचला. बघू तुमचं कसब.’
यशवंत सदरेवर आला.
तिथं दोन-तीन पट्टे ठेवले होते. काही क्षण तो पट्टे निरखीत होता. एक एक पट्टा हाती घेऊन त्यानं तो तोलला आणि शेवटी एक पट्टा निवडला.
त्यानं निवडलेला पट्टा पाहताच बाजींचा संताप वाढला.
यशवंतनं निवडलेला पट्टा खुद्द बाजींचा होता.
पट्टा घेऊन यशवंत चौकात उतरला. बाजींनी आपल्या दोन धारकऱ्यांना बोलवलं. बाजी म्हणाले,
‘तलवारी घ्या.’
यशवंतनं चौकात वीरासन घेतलं. उजव्या हातातील पट्टा सरळ धरून त्यानं बाजींना वंदन केलं.
बाजींनी मान तुकवली आणि यशवंतनं उड्डाण करून पट्टा चालवायला सुरुवात केली.
बाजींनी आपल्या धारकऱ्यांना आज्ञा केली,
‘चला !’
यशवंत विजेच्या चपळार्इनं पट्टा चालवीत होता. दोन्ही बाजूंनी आलेल्या धारकऱ्यांना पुढं घुसण्याची संधी मिळत नव्हती.
बाजी थक्क होऊन यशवंतची करामत बघत होते. सदरेवरचं कोणीतरी म्हणालं,
‘खरा धारकरी हाय.’
बाजींच्या कानांवर ते शब्द पडले. बाजींनी आज्ञा केली,
‘भाला घ्या !’
धारकऱ्यांनी भाले उचलले. यशवंतचा पट्टा चौफेर फिरत होता. धारकऱ्यानं भाला फेकला.
बाजींच्या हृदयाचा एक ठोका चुकला. सरसर भाला आला आणि मध्येच दोन तुकडे होऊन तो भाला कोसळला.
‘भले !’ बाजी भान हरपून म्हणाले, ‘बंद करा !’
तिघेही वीर आपला खेळ थांबवून बाजींच्याकडं पाहत होते.
बाजी झोपाळ्यावरून उठले. यशवंतवर नजर खिळवत ते म्हणाले,
‘पट्टा उतरा आणि तलवार घ्या.’
यशवंतनं तलवार हाती घेतली. बाजींनी आज्ञा केली,
‘माझी ढाल आणा.’
ढाल आणली जाताच बाजी ती ढाल डाव्या हाती घेऊन चौकात उतरले. त्यांच्या चेहऱ्यावर हासू होतं. यशवंतला बाजी म्हणाले,
‘चालव तलवार…’
नुसत्या ढालीनिशी उभ्या असलेल्या बाजींना बघून यशवंत उद्गारला,
‘जी !’
‘चालव म्हणतो ना ! तुझ्यासारख्या पोरासंगती खेळायचं, तर तलवार कशाला पायजे ? चल !’
यशवंतनं तलवारीचे हात करायला सुरुवात केली.
येणारा प्रत्येक वार बाजी हसत ढालीवर घेत होते. हसत होते.
त्या हसण्यानं यशवंतचा संताप नकळत वाढत होता. तो त्वेषानं तलवार चालवत होता.
बाजी यशवंतला खेळवत होते. बाजी हसून ओरडले,
‘काय, यशवंतराव, रग जिरली ?’
त्या उद्गारांनी यशवंतचं भान हरपलं. त्वेषानं तो बाजींवर तुटून पडला.
ढालीवर पडणारा प्रत्येक घाव बाजींना त्याच्या ताकदीचा अंदाज देत होता. बाजी कौतुकानं यशवंतकडं पाहत होते. त्याच वेळी यशवंतनं बगल दिली. नकळत बाजींची ढाल त्या बाजूतला झुकली आणि मोहरा बदललेली तलवार बाजींच्या हातावर उतरली.
बाजींनी आपल्या उजव्या हाताकडं पाहिलं.
अंगरख्यातून तांबडी रेघ उमटत होती.
यशवंतनं तलवार फेकली आणि बाजींचे पाय धरले.
‘उठा ! यशवंतराव, तुम्ही खरे धारकरी आहात. आमच्या शिलेदारीत तुमची नेमणूक केली आहे. उठा !’
‘माझ्यामुळं आपणांला….’
‘चालायचंच ! असल्या खरवडींना आम्ही दाद देत नाही.’ वाड्याकडं पाहत बाजी म्हणाले, ‘जरा तेल- हळद घ्या.’
🚩क्रमशः🚩

⚔🌄पावनखिंड🌄⚔ 🚩 भाग 1🚩

🌄पावनखिंड🌄
🚩आजपासुन एक नवीन कथा मालिका सुरू करत आहोत🚩
  🚩 भाग 1🚩

सूर्य उगवला, तरी हिरडस मावळातल्या सिंध गावावर धुकं रेंगाळत होतं. सिंध ! पाच-पन्नास घरट्यांचं गाव. गावाच्या मध्यभागी काळ्याशर दगडांनी चिरेबंद झालेला तीन चौकी देशपांडे-वाडा उभा होता. वाड्याच्या भव्य कमानीत भालार्इत पहारेकरी उभे होते. पहिल्या चौकाच्या उजव्या बाजूला घोड्यांची पागा होती. सदरेवर पाच-सहा मंडळी बाजींची वाट पाहत बसली होती. सदरेवरच्या झोपाळ्यावर बाजींची बैठक मांडली होती. पितळी, चकचकीत पानाचा डबा झोपाळ्यावर नजरेत भरत होता. झोपाळ्यालगत जमिनीवर एक मोठी पितळी पिंकदाणी ठेवली होती.
वाड्यातल्या तिसऱ्या सोप्यातील देवघरातून बाजी बाहेर आले.
बाजींनी जांभळा मुकटा नेसला होता. लिंब कांतीचे, धिप्पाड देहाचे, पिळदार शरीराचे बाजी होते. कपाळी गंध रेखाटलं होतं. मस्तकी काळाभोर संजाब होता. त्यातून उतरलेली शेंडी मानेवर रुळत होती. ओठावरच्या भरदार गलमिश्यांनी आणि जाड भुवयांनी त्यांच्या भव्यतेत अधिक भर घातली होती.
बाजी देवघराबाहेर येताच त्यांच्या पत्नी सोनाबार्इ म्हणाल्या,
‘न्याहरीची तयारी झालेय्.’
‘हो ! आम्ही पोशाख करून आलोच.’
बाजी आपल्या शयनगृहात गेले, तेव्हा तिथं त्यांच्या द्वितीय पत्नी गौतमार्इ आदबीनं उभ्या होत्या. पलंगावर बाजींचा पोशाख काढून ठेवला होता.
बाजींनी त्या पोशाखाकडं नजर टाकली व ते हसून म्हणाले,
‘हा तर सणासुदीचा पोशाख काढलात !’
गौतमार्इ म्हणाल्या,
‘आज सणाचा दिवस. तेव्हा….’
‘बरोबर !’ बाजी म्हणाले, ‘तुम्ही म्हणाल, ते खरं. आमची हुकमत बाहेर. इथं आम्ही तुमच्याच हुकुमाचे ताबेदार ! खरं ना ?’
गौतमार्इ लाजल्या. त्या म्हणाल्या,
‘थोरल्या वाट बघत असतील. लवकर पोशाख करून न्याहरीला चलावं.’
‘जशी आज्ञा !’
बाजी पोशाख करून, न्याहरी आटोपून, जेव्हा सदरेवर आले, तेव्हा सदरेवरच्या साऱ्यांनी उठून बाजींना मुजरे केले. त्या मुजऱ्यांचा स्वीकार करून बाजी झोपाळ्यावर बसले. पानाचा डबा उघडला. पान जुळवत असता त्यांचं लक्ष उभा असलेल्या तात्याबा म्हसकराकडं गेलं.
तात्याबा एक वयोवृद्ध शेतकरी. ऐंशीच्या घरात गेला, तरी म्हातारा अजून ताठ होता. गुडघ्यापर्यंत धोतर, अंगात घोंगड्याची खोळ आणि डोर्इला मुंडासं बांधलेला तात्याबा बाजींच्याकडं पाहत होता.
‘तात्याबा, बस ! येरवाळीच आलास ?’
‘जानार कुठं ?’ तात्याबा म्हणाला, ‘कोंबडं आरवायच्या आदी जाग येतीया ! शेती-भाती पोरं बघत्यात. सांगाय गेलं, तर कुत्र्यावानी भुकत्यात. तवा जायचं कुठं ? घरचा वनवा नको, म्हणून सदरंत येऊन पडायचं !’
‘पड की ! तुला कोण नको म्हणणार ?’ बाजींनी हसून विचारलं, ‘आवंदा पीक बरं हाय नव्हं ?’
‘हाय, पर गावंल, तवा !’ तात्याबा म्हणाला.
‘न गावायला काय झालं ?’ बाजींनी विचारलं.
‘का ऽ य झालं ? रानाच्या साऱ्या डुकरांची चंगळ चाललीया, बघा. दिवस म्हनत न्हार्इत, रात्र म्हनत न्हार्इत, कडाडा धाटं मोडत्यात.’
‘रखवाली ठेवावी.’ बाजींनी सांगितलं.
‘चार चौकांवर चार माळं केलं, तर शिवाजी भोसल्यागत मधनं घुसत्यात. लर्इ बेरकी जात ती.’
‘असं म्हणतोस !’ बाजींनी क्षणभर विचार केला. ‘काळजी करू नकोस ! उद्यापासनं आमचे भालार्इत स्वार शिवारात फिरतील. झालं ?’
तात्याबा उदासपणे हसला.
बाजींनी विचारलं,
‘का हसलास ?’
‘हसू नको, तर काय रडू ? धनी, पीक सजलं, तरी गरिबांच्या पोटात थोडंच पडनार ?’
‘का ? का नाही पडणार ?’
‘तुमी इचारतासा ? तुमी परधान ! तुमचं धनी बांदल राजं. मळण्या सुरू झाल्या की, तुमचं शिपार्इ येनार ! असंल, नसंल, ते धुऊन घेऊन जानार. गरिबांनी जायचं कुठं ?’
‘तात्याबा !’ बाजी उद्गारले, ‘गेल्या वर्षी दुष्काळ होता. गडाची कोठारं भरली नाहीत, तर…’
‘व्हय, धनी ! राजा ऱ्हायला, तर परजा ऱ्हानार ! म्या न्हार्इ म्हनत न्हार्इ. चार वर्सांमागं आपल्या गावात पन्नास घरटी व्हती. व्हय का न्हार्इ ? आज दोन र्इसा धाबी ऱ्हायली न्हार्इत. कुठं गेली ती मानसं ? चौकशी केलीसा ?’
बाजींना ठसका लागला.
कुणीतरी पिंकदाणी बाजींच्या हाती दिली.
डोळ्यांत आलेलं पाणी पुसून बाजी करड्या आवाजात म्हणाले,
‘तात्याबा ! आज कुरापत काढायची ठरवलीस, वाटतं ?’
‘न्हार्इ, धनी ! इट्टलाशपथ न्हार्इ. रातसारी डोळ्यात डोळा लागला न्हार्इ.’
‘काय झालं ?’
‘काल परशाचा रानबा गाव सोडून गेला.’
‘गाव सोडून गेला ?’
‘व्हय, धनी ! एकानंबी त्येला आडवलं न्हार्इ.’
‘का गेला ? आम्हांला माहीत नाही ! आम्ही गडावर होतो.’
‘गडावरून कसं दिसनार, धनी !’ तात्याबा म्हणाला, ‘लर्इ दूरची कानी हाय.’
‘सांग.’
‘सांगंन कवा तरी !’ म्हणत तात्याबा उठला.
बाजी म्हणाले,
‘उठू नको. सांग !’
‘सांगतो ! गेल्या वर्साला रानबाची गाय व्याली. दूध बक्कळ व्हतं. कुनीतरी ही गोष्ट राजाच्या कानांवर घातली. त्यांच्या नातवाला गार्इचं दूध पायजे व्हतं, म्हनं. गाय त्यांनी नेली.’
‘पण त्या गार्इची किंमत मी दिली आहे. फुकट नाही घेतली.’
तात्याबा खिन्नपणे हसला.
‘धनी ! म्यानात तलवार असतीया, नव्हं ? जवा ती बाहीर पडतीया, तवा ती काय करती, हे कधी म्यानाला ठाऊक असतंय् ?’
‘काय म्हनायचंय् तुला ?’ बाजींनी विचारलं.
‘तुमी गार्इची किंमत भरलीसा, ते खरं हाय ! पन राजाला मागितलेल्या गार्इची किंमत दिली, याचा राग आला. आनी रानबाची तरणीताठी लेक एक दिवसरानात लाकडं आनाय् गेली आन् परत आली न्हार्इ.’
‘वाघरानं तिला मोडली, हा काय राजांचा दोष ?’
‘आजपातूर वाघरांनी किती जनावरं मोडली ? धनी, ते वाघरू निराळं व्हतं ! लांडग्या-कोल्ह्यांनी फाडली तिला. म्या बघितली पोरीला. रानबा गावात राहील कसा ?’
‘आता राणबाच्या घरात कोण राहतं ?’ बाजींनी विचारलं.
तात्याबा हसला.
‘मला इचारतासा ? ते तुमच्या कारभाऱ्याला इचारा ! जाऊ दे, धनी ! झालं गेलं, हून गेलं. इळा-भोपळा तुमच्या हातात. करशीला, ते खरं !’
तात्याबा आपल्या बुडाखालचं घोंगडं झटकून उठला. बाजींना मुजरा करून तो सदरेवरून उतरला. पण बाजींना त्याला परतवण्याचं बळ राहिलं नव्हतं. त्यांची नजर त्यांचे कारभारी गोविंदपंतांच्याकडं वळली.
गोविंदपंत साठीच्या घरातले. बाजींचे दूरचे नातेवार्इक. बाजींच्या नजरेनं गोविंदपंत चपापले. ते गडबडीनं म्हणाले,
‘म्हातारा भारीच तऱ्हेवार्इक. कुठं काय बोलावं, याचं भानच नाही.’
‘पंत, राणबाची कथा ऐकली, ती खरी ?’
‘असं लोक बोलतात !’
‘हं ! आता राणबाचं घर कुणाच्या ताब्यात आहे ?’
गोविंदपंत बाजींची नजर चुकवत, हात उडवत उद्गारले,
‘नाही. म्हणजे काय झालं… ते घर… राणबा म्हणाला…’
‘कळलं !’ बाजी म्हणाले, ‘एकूण ते घर तुम्ही घेतलंत, तर ! ठीक आहे. तुम्ही व्यवहार केला असेल. मी नाही म्हणत नाही. पण या क्षणापासून तुम्ही आमचे कारभारी नाही. तुम्ही आमचे आप्त. परत असली कागाळी आमच्या कानांवर येऊ देऊ नका. नतीजा बरा होणार नाही. कळलं ? चला !’
गोविंदपंतांचा टाळा वासला गेला होता. पण तिकडं बाजींचं लक्ष नव्हतं. तात्याबाच्या बोलण्यानं त्यांचं मन उद्विग्न झालं होतं. झोपाळ्याचे झोके वाढले होते. सदरेवरच्या कुणाला काही बोलण्याचं धैर्य नव्हतं. संजाबावरून हात फिरवीत आपल्याच विचारात बाजी मग्न झाले होते.
🚩क्रमशः🚩

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...