फॉलोअर

मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०१४

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ५. परराष्ट्रीय धोरण... भाग १

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ५. परराष्ट्रीय धोरण...
भाग १
शिवरायांचे राज्यकारभार विषयक नेमके धोरण काय होते??? याबाबत काही जाबते आपण आधीच्या भागात पाहिले आहेतच. त्यांनी 'अरिमित्र विचक्षणा' कशी केली होती? स्वराज्य सुरवातीपासूनच चहुकडून शत्रुपक्षाने घेरलेले होते आणि राज्याला अंतर्गत शत्रू देखील खूप होते. ह्या दृष्टीने राजांनी परराष्ट्रीय धोरण कसे ठरवले आणि कसे राबवले हे समजून घेणे महत्वाचे आहे.
अरि म्हणजे शत्रू किंवा जवळ ज्याचे राज्य तो. तर मित्र म्हणजे अर्थात सुहृदय. कौटिल्य अरिमित्राचे ६ प्रकार सांगतो.
१. सहज शत्रू - राजाचे नातलग आणि सिमेलगतचे राष्ट्र.
२. कृत्रिम शत्रू - आपल्या विरोधात जाउन इतर राज्यांना सुद्धा विरोध करण्यास भाग पाडणारा.
३. सहज मित्र - सिमेलगतचे राष्ट्र सोडून अन्य राज्यांचा राजा.
४. कृत्रिम मित्र - लाभ संपादन करण्याच्या दृष्टीने मैत्री ठेवणारा.
५. मध्यम - संधीविग्रहात अनुकूल असलेला.
६. उदासीन - बलवान असून मैत्री ठेवणारा.
स्वराज्य हे आदिलशाही मुलुख जिंकून वाढीस लागले असल्याने ते साहजिकच सहज शत्रू राष्ट्र होते. शिवाय मुघल सुद्धा स्वराज्याचे सहज शत्रू होतेच. पण आत्ता शत्रू असणारे राज्य नंतरच्या काळात कृत्रिम मित्रराष्ट्र सुद्धा बनू शकते. मुघलांशी १६६५ मध्ये तर आदिलशाही बरोबर १६७७-७८ मध्ये राजांनी ही भूमिका घेतली होती. मुघल, आदिलशाही, क़ुतुबशाही, इंग्रज आणि पोर्तुगीझ या ५ राज्यांबरोबर शिवरायांनी कसे राजकारण केले ते आपण आता बघू.
मुघल -
स्वराज्याच्या सुरवातीच्या काळात मुघलांनी मराठ्यांकडे कृत्रिम मित्र म्हणुन पाहिले होते. आदिलशाही पोखरली जाते आहे ह्याचा त्यांना फायदाच होत होता. पण १६५७ मध्ये मराठ्यांनी जुन्नर आणि नगर येथे हल्ले करून मुघलांचे शत्रुत्व ओढावून घेतले आणि मग ते बनले सहज शत्रू. उत्तरेला स्वराज्याची सीमा आता थेट मुघलांशी भिडली होतीच. कल्याण-भिवंडी या उत्तर कोकणावरील आक्रमण आणि अफझलखान वधानंतर तर मुघल थेट चाल करून आले. १६६०-१६६३ ही ४ वर्षे खुद्द शास्ताखान पुण्यात तळ ठोकून होता. सर्व व्यर्थ आहे हे कळल्यानंतर अधिक मोठी मोहिम मिर्झाराजा घेउन आला आणि पुरंदरचा तह घडला. या तहाने मुघल मराठ्यांचे कृत्रिम मित्र बनले. अर्थात त्यांचा सहज शत्रू असलेल्या आदिलशाहीचा पाडाव करायला. पुढे मात्र १६७० मध्ये जिझिया कर, उत्तर हिंदूस्थानमधील मंदिरांवरील आक्रमणे या व अनेक बाबींमुळे हा तह मोडला आणि मराठे-मुघल पुन्हा एकदा समोरा समोर आले. मुघलांशी मराठ्यांचे असलेले संबंध असे बदलत गेले. पुरंदरच्या तहाचा एक महत्वाचा परिणाम म्हणजे आदिलशाहीला सुद्धा आपण मुघलांविरोधात मराठ्यांशी मैत्री का करू नये ही जाणीव झाली. ह्यातून पुढे १६७७ मध्ये मराठे - आदिलशाही तह घडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...