फॉलोअर

मंगळवार, २८ जानेवारी, २०२०

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔ अग्निदिव्य भाग -22





नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜

अग्निदिव्य
_📜🗡 भाग -22 🚩🗡___
लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार

_🚩📜🚩___

दिवाण-ए-खासचा दरबार दिवाण-ए-आमपेक्षा खूपच जास्त गंभीर आणि भारदस्त होता. साहजिकच होते ते. कारण त्या दरबारात अगदी निवडक वरच्या दर्जाचे सरदार, मुत्सद्दी आणि उमरावच फक्त उपस्थित राहू शकत होते. कितीही मोठा शेठ, सावकार वा धर्मगुरू असो, सरकारी हुद्देदारांशिवाय कोणालाही त्या दरबारात प्रवेश नव्हता. या दरबारात महत्त्वाचे राजकीय आणि लष्करी निर्णय घेतले आणि घोषित केले जात. दिवाण-ए-आमचा दरबार काही विशेष कारणानेच भरविला जात असे. गैरसरकारी प्रतिष्ठितांना सन्मानपूर्वक आमंत्रित केले जाई. तो दरबार बहुतांश एखादा समारंभ साजरा करावा त्याप्रमाणे पार पाडला जाई. याउलट दरबाराचे प्रत्यक्ष कामकाज वगैरे मुख्यत: दिवाण-ए-खासच्या दरबारातच चाले; त्यामुळे स्वाभाविकपणेच वातावरणात भारदस्तपणा आणि गांभीर्य येत असे.

अल्काबच्या दमदार पुकारात आलमगीर बादशहा दरबारात येऊन बसला. कुर्निसात झडले आणि रिवाजाप्रमाणे कामकाज सुरू झाले. कुलीखानाने खालमानेनेच किंचित नजर उंचावून बादशहाकडे पाहिले. बादशहाने पोशाख बदलला होता. अंगावरचे अलंकार कमी झाले होते. वैभव आणि रुबाब तोच असला तरी भपका कमी झाला होता. वेगवेगळे दरबारी उपचार रिवाजाप्रमाणे पार पडले. त्यानंतर अनेक हुकूम जारी झाले. मीर बक्षीने मग दरबारात अफगाणी पठाणांच्या बंडाचा आणि त्यांना इराणचा शहा देत असलेल्या मदतीचा अहवाल सादर केला. त्यावर बादशहाने अनेक दरबारी मुत्सद्द्यांची व सेनानींची राय घेतली. सरतेशेवटी अफगाणी पठाणांचे बंड मोडून काढण्याची मोहीम बादशहाने मुकर्रर केली.

मोहिमेचा सरलष्कर म्हणून महाबतखानाच्या नावाची रीतसर घोषणा झाली. बादशहाने स्वत: त्याच्याबद्दल चार भले शब्द बोलून त्याची हौसला अफजाही केली. सोन्याच्या दागिन्यांनी सजविलेला आणि रेशमी कायदे असलेला अस्सल अरबी नस्लचा घोडा आणि शाही निशाणासाठी हत्ती त्याला इनायत फरमावला गेला. त्याशिवाय रोख इनाम, पोशाख, सरलष्कराची शिक्केकट्यार आणि शिरपेच समारंभपूर्वक दिला गेला. सरतेशेवटी त्याला खिलत देऊन बादशहाने त्याचा मोठाच सत्कार केला. मुबारकबादचे नारे दरबारात गुंजले. त्याच्या दिमतीला एकापेक्षा एक वरचढ आणि नामांकित सरदारांच्या नावाची घोषणा झाली. त्या नामावलीमध्ये एकही राजपूत, जाट, डोगरा वा बुंदेला नसल्याचे कुलीखानाच्या लक्षात आले आणि त्याचे मन चरकले. अजून त्याचे नाव पुकारले नसले तरी ही वीज आपल्यावर कोसळणार या आशंकेची घंटा त्याच्या मनीमानसी घणघणू लागली. दरबारी कारवाई सुरू असतानासुद्धा बादशहाची हिरवी नजर त्याला जोखत होती आणि त्या जाणिवेची सतत टोचणी लागून राहिली होती; त्यामुळे त्याने कसोशीने चेहरा गंभीर निर्विकार ठेवला होता. वजीर दरबारात हजर असलेल्या, मोहिमेत वर्णी लागलेल्या सरदाराचे नाव पुकारी. मीर बक्षी हौसला अफजाही करणारे चार भले शब्द त्याच्याविषयी बोले. पोशाख, तलवार, रोख बक्षिसाची बादशहाने स्पर्श केलेली तबके त्याला बहाल होत होती. गैरहजर असणाऱ्यांच्या नावे या वस्तू रवाना करण्याचे हुकूम जारी होत होते. मुख्य सैन्याला त्यांनी कुठे आणि केव्हा मिळावे याची फर्माने रवाना करण्याचे हुकूम झाले. एकूण महाबतखानाची अवघी फौज नामजद झाली. शाही रिवाजानुसार अमाप दारूगोळा आणि अगणित खजिना मंजूर झाला. ठिकठिकाणच्या मोगली अंमलदारांना आणि मनसबदारांना सैन्याला सतत रसद पुरवठा करण्याची फर्माने रवाना करण्याचे हुकूम झाले. म्हणजे वजीर तशी घोषणा करी आणि संमतीचे निदर्शक म्हणून जपमाळ किंचित उचलली जाई. वजिराच्या हातातील यादी संपली आणि नकळत कुलीखानाच्या मुखातून सुटकेचा अगदी हलकासा सुस्कारा सुटला. त्याच्या प्रत्येक स्पंदनावर बारीक लक्ष ठेवून असलेल्या बादशहाच्या नजरेतून तो सुस्कारा सुटला असावा, अशी वेडी आशा त्याच्या मनाला चाटून गेली. पुढची कारवाई सुरू करण्याची इजाजत मागण्यासाठी वजीर तख्तासमोर आला. जपमाळ जरा वेगळीच हलली. त्याचा अर्थ कुलीखानाला नीटसा समजला नाही. पण बहुधा वजिराला थोपविले असावे.

वजीर दोन पावले मागे सरकला. आधीच शांत असलेल्या दरबारातील शांतता अधिकच गडद झाली. माना खाली असूनही नजरा बादशहाच्या चर्येवर खिळल्या. बादशहाचा अगदी खालच्या पट्टीतला गंभीर पण जरब व्यक्त करणारा आवाज त्या दिवाण-ए-खासच्या भल्या प्रचंड सभागृहात पसरू लागला. त्या सभागृहातील ध्वनिव्यवस्था इतकी उत्कृष्ट होती की, बादशहा अगदी हळू आवाजात बोलत असला तरी त्याचा शब्दन् शब्द त्या वास्तूच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अगदी स्पष्ट ऐकू येई. आणि कोणत्याही कोपऱ्यातील सूक्ष्मतर आवाज तख्ताशी स्पष्ट ऐकला जाई.

परवरदिगार रहिमान-ए-रहीम अल्लाने माबदौलतांना एका खास मकसदीसाठी या दुनियेत पाठवले आहे. माबदौलतांना पूर्ण आत्मविश्वास आहे की, ती जबाबदारी पार पाडण्यासाठी तोच शक्ती, युक्ती, बुद्धी देणार आहे; त्यामुळे यशसुद्धा तोच मिळवून देणार आहे.

आमीन! सुम्मा आमीन!!

अल्लाच्या या नेक कामात जेव्हा आमचेच धर्मबांधव असणारे, म्हणवणारे, स्वत:ला अल्लाचे उपासक आणि पैगंबरांचे सलल्लाह वसल्लम बंदे म्हणवणारे जेव्हा अडथळे आणतात, तेव्हा मग माबदौलतांना अत्यंत वाईट वाटते. अल्लाची अशी नाफर्मानी करणाऱ्यांचा अतोनात संताप येतो. वास्तविक एका नेक मुसलमानाने दुसऱ्या तशाच नेक सश्रद्ध मुसलमानावर शस्त्र उचलण्यास पवित्र कुराणशरीफने सख्त बंदी केली आहे. अफगाणी पठाण पण वस्तुत: मुसलमानच म्हणवतात. पण धर्माचरणी मुस्लीम सत्ताधाऱ्याच्या विरोधात बंड आमच्या लेखी अल्लाची आणि इस्लामची नाफर्मानीच आहे. म्हणूनच माबदौलत त्यांच्याविरुद्ध शस्त्र उचलण्यास मजबूर झाले आहेत.

अफसोस! सख्त अफसोस!!

अफगाणी मुसलमानांच्या विरुद्ध माबदौलतांनी जे हे कदम उचलले आहे त्याला जसा कुराणशरीफचा आधार आहे तसाच हदीसचा दाखला आहे. इतकेच नव्हे तर पैगंबरांचे सलल्लाह वसल्लम यांचे मार्गदर्शन लाभलेल्या पहिल्या चार खलिफांच्या सीरतचासुद्धा दाखला आहे. म्हणूनच माबदौलतांना खात्री आहे की, जी कारवाई करण्याचे योजले जात आहे तिला सही अंजाम मिळणार आहे.

इन्शाल्लाह!

इराणचा शहा इकडे आमच्या दरबारात वकील पाठवून गोड गोड गोष्टी करतो आणि दुसरीकडे अफगाणी पठाणांना आमच्या खिलाफ उठाव करण्यासाठी प्रोत्साहन देतो. सर्व प्रकारची मदत देतो. मुघलिया फौजेच्या टापांखाली जेव्हा अफगाणिस्तान चिरडला जाईल, तेव्हा आपोआपच इराणच्या शहाला जरब बसल्याशिवाय राहणार नाही.

इन्शाल्लाह!

साहेबी इमानाच्या बाता करणारेसुद्धा मनात कुफ्र बाळगून राहतात अशा नकाबपोश काफिरांना नष्ट केले तर आलम दुनिया इस्लामच्या झेंड्याखाली येण्यास क्षणाचाही अवधी लागणार नाही.

इन्शाल्लाह!

माबदौलतांनी आधीच फरमावल्याप्रमाणे या नेक आणि पाक जिहादमध्ये अल्ला मुघलिया फौजेला मदतगार होणार आहे. म्हणूनच त्याने मुघलिया सलतनतीशी बगावत करण्यात उभी हयात घालवणाऱ्या एका काफिराच्या मनात इस्लामची निष्ठा पैदा केली. त्याच्या मनातील कुफ्र जाळून नष्ट केले आणि मुघलिया तख्ताच्या सेवेत दाखल केले. त्याचा जुना आका त्यामुळे त्याचा घात करण्यासाठी टपून बसला होता. पण अल्लाच्या कृपेने सलतनतीच्या नेक आणि वफादार सेवकांनी त्याचे नापाक इरादे मोडून काढण्यात यश मिळवले.

सुभानअल्ला! सुभानअल्ला!!

मुघलिया सलतनतीच्या पनाहमध्ये दाखल झालेला हा नवा नगिना आहे महम्मद कुलीखान. माबदौलत त्याला खास कामगिरी देऊन नावाजणी करीत आहेत.

इर्शाद. इर्शाद.

वजिराने खूण केल्यावर कुलीखान कुर्निसात करीत तीन पावले पुढे आला. तख्तासमोर मधोमध दोन्ही हात बांधून उभा राहिला.

महम्मद कुलीखान कोहस्तानी जंग लढण्यात माहिर आहेत. ताकतवर गनिमाला अगदी थोड्या फौजेच्या मदतीने परास्त करण्यात त्यांचा हातखंडा आहे. म्हणून माबदौलत या अफगाण मोहिमेत त्यांच्यावर तमाम शाही फौजेच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवीत आहेत. खुदा-ए-खिदमतगार शेर-ए-दख्खन महम्मद कुलीखान यांना माबदौलत अफगाण मोहिमेचे शाही सरलष्कर, जनाबेआली नवाब महाबतखान यांचे नायब म्हणून नामजद करीत आहेत. त्यांना हुकूम देण्याचा अधिकार फक्त माबदौलत, वजीरेआझम आणि नवाब महाबतखान यांनाच राहील. त्यांची छावणी नेहमी सर्व फौजेच्या मध्यभागी आणि त्यांचा मुक्कामाचा शामियाना सरलष्कर महाबतखान यांच्या शामियान्याच्या शेजारीच असेल. या हुकुमाची सही सही तामील न झाल्यास लिहाज केला जाणार नाही.

पहिल्या रांगेतच उभा असलेला महाबतखान जागेवरून एक पाऊल पुढे आला. कुर्निसात करून अत्यंत लीनतेने म्हणाला,

जिल्हेसुभानी आलमपन्हांचा हर हुकूम सर आँखोंपर. आलमपन्हांच्या मुखातून बाहेर पडणारा हर हरब आमच्यासाठी कलमाच्या खालोखाल पवित्र आहे. त्यांची प्रत्येक कृती आम्ही हदीसप्रमाणेच अनुकरणीय मानतो. प्रत्येक हुकूम शब्दश: अमलात आणण्यात येईल.

स्वत: बादशहाने नेमणुकीची घोषणा करण्याचा सन्मान दरबारात अत्यंत दुर्मीळ; त्यामुळे ‘मुबारक हो, मुबारक हो’च्या गजराने काही क्षण दरबार दुमदुमला. वस्त्रे, शस्त्रे, शिरपाव आणि रोख इनाम देऊन त्याला पुन्हा गौरविण्यात आले. त्याशिवाय अजून एक अजूबा घडला. बादशहाने पुन्हा खिलत देऊन त्याची खास नावाजणी केली. एकाच दिवशी लागोपाठच्या दोन्ही दरबारांत खिलत मिळविण्याचा अत्यंत दुर्मीळ योग साधणाऱ्या कुलीखानाचे भाग्य पाहून अनेक जुने दरबारी मनातल्या मनात जळफळू लागले. कालच बाटून मुसलमान झालेला आणि आज घटकाभरापूर्वीच नोकरीत दाखल झालेला हा बगावतखोर काफिर कानामागून येऊन तिखट झालेला पाहून ते मनातल्या मनात शिव्याशाप देऊ लागले; परंतु जे जाणकार होते, ते मुत्सद्दी तो नेताजी पालकर असताना त्याने केलेले कर्तब जाणत होते आणि बादशहालासुद्धा नीट ओळखून होते. त्यांना यामधील ग्यानबाची मेख बरोब्बर उमगली होती. कुलीखानसुद्धा त्याबद्दल पूर्ण समजून चुकला होता. म्हणूनच तो अगदी बेचैन होऊन गेला. आता आपण आलमगिराच्या पंजात पुरते अडकलो आहोत हे समजून चुकला.

दिलेरखानाच्या मोगली फौजा पुरंदराला वेढा घालून बसल्या असताना मिर्झाराजांच्या काही तुकड्या राजगडाच्या पंचक्रोशीत सहजी पोहोचू शकल्या होत्या. राजगड स्वराज्याच्या सीमांपासून अगदी जवळच होता. भविष्यात होणाऱ्या संघर्षाच्या दृष्टीने त्याची सुरक्षितता फारशी विसंबनीय नव्हती; त्यामुळे महाराजांचा मुक्काम आता राजगडावरून कायमच्या वास्तव्यासाठी रायगडावर हलला होता. राजधानी म्हणून रायगड किल्ला राजगडापेक्षा जसा जास्त सुरक्षित होता तसाच जास्त सोईस्करसुद्धा होता. तो चांगला विस्तीर्ण असल्यामुळे त्यावर राजवाडा, राणीवसा, दरबार यांसह स्वराज्याचे अठरा कारखाने, दफ्तरखाना, प्रधान मंडळांचे वाडे वगैरे साऱ्यांची नीट बैजावार व्यवस्था करणे शक्य झाले होते. हिरोजी इंदुलकराने गड मोठ्या कल्पकतेने वसविला होता. महाराज गडावर बेहद खूश होते.

रायगडाच्या खलबतखान्यात मोजकीच मंडळी बसली होती. बहिर्जी बराच काळ उत्तरेत राहून परतला होता. त्याने आणलेल्या बातमीची चर्चा करण्यासाठीच मसलत बसली असल्याचे सारे जाणत असले तरी नेमके काय असेल ते कोणालाच अद्याप माहीत झाले नव्हते. कुजबुजत तर्कवितर्क लढविले जात होते. नेताजीसंबंधी काही असावे असासुद्धा एक तर्क पुढे आला होता. एवढ्यात महाराज आणि सोबत खाशा आईसाहेब येत असल्याचा पुकारा झाला. साऱ्यांनी खडीताजीम दिली. मुजरे झडले. आईसाहेबांना खलबतखान्यात आलेले पाहून सारे चकित झाले. कारण महाराज आग्र्याहून परत आल्यापासून त्यांनी प्रत्यक्ष कारभारात लक्ष देणे जवळजवळ बंद केले होते. याचा अर्थ त्यांनी त्यातून अंग काढून घेतले होते असा नाही. महत्त्वाच्या प्रत्येक घटनेची त्यांना पुरती खबर असे. तशीच निकड भासली तर त्या संबंधिताला व्यक्तिश: बोलावून चर्चा करीत. निर्णय मात्र फक्त महाराजांचाच असे.

आईसाहेब मसनदीवर लोडाला टेकून बसल्या. महाराज खाली त्यांच्या पायाशी बसले. इशारत झाल्यावर मग सारेच जाजमावर मांड्या ठोकून बसले.

अरे बाबा मोरोपंता, अरे पेशवा तू आणि प्रतापराव तू सरनोबत; हे दत्ताजी आहेत, अनाजीपंत, हा त्र्यंबक आहे. अरे! इतकी सारी तोलामोलाची मंडळी आहेत मग आता मला म्हातारीला रे कशाला दगदग? शिवबा अगदी पुढे घालूनच घेऊन आला बघा.

आईसाहेब, नेमके काय ते कोणालाच माहीत नाही. पण महाराजांनी आपल्याला थेट खलबतखान्यात आणले म्हणजे निश्चितच बाब खूप महत्त्वाची आणि नाजूक असली पाहिजे हे मात्र नक्की.

बोलता बोलता अनाजी दत्तोंनी हसून महाराजांकडे अपेक्षेने पाहिले पण त्यांची गंभीर मुद्रा पाहून त्यांचे पुढचे बोलणे कंठातच गोठून गेले. दालनात गंभीर शांतता पसरली. सारे महाराजांच्या मुद्रेकडे बघत राहिले. महाराजांनी प्रत्येकाच्या नजरेत काही क्षण पाहिले. त्यांच्या शांत गंभीर स्वरांनी मसलत सुरू झाली.

मंडळी, आजची मसलत का बोलावली समजले असेलच.

सर्वांनी एकमेकांकडे पाहिले आणि अखेर साऱ्या नजरा मोरोपंतांवर स्थिर झाल्या. कपाळीचा घाम उपरण्याने टिपत मोरोपंत मोठ्या धीराने बोलले–

क्षमा महाराज; पण सांगावा सांगणाऱ्या हेजिबाने फक्त मसलत बोलावल्याचेच सांगितले. मसलतीचे कारण सांगण्याचा रिवाज नाही.

महाराज मंद हसून म्हणाले–

अरे! एवढे थोर मुत्सद्दी तुम्ही. थेट आलमगिराच्या दाढीला हात घालणारे उस्ताद, तुम्हाला तुमच्या हेरांकडून काहीच का कळले नाही? का तुम्हीच आळस केलात खबर काढण्याचा?

तसे नाही महाराज, पण महाराजांसाठी येणाऱ्या बातम्या फक्त महाराजांनाच पोहोचवल्या जातात. त्यात कधी गफलत होत नाही. कोणी कितीही वजन वापरण्याचा प्रयत्न केला तरी खबर कधी झिरपत नाही. हेच तर आपल्या हेर खात्याचे वैशिष्ट्य आणि यशाचे गमक आहे. इतके बरीक खरे की बहिर्जी उत्तरेतून परत आल्याचे समजले, तेव्हा मसलत त्याने आणलेल्या माहितीच्या अनुषंगानेच असणार.

प्रतापराव, बहिर्जी सदरेवर आहे. माणूस धाडून बोलावून घ्या.

पुन्हा शांतता. फक्त अधूनमधून आईसाहेबांच्या हातातली सळकडी वाजत तेवढीच. काही पळांचाच काय तो कालावधी पण अगदी अंगावर येणारा. अखेर बहिर्जी आला. मुजरा घालून तो उभा राहिला. महाराजांनी अंगुलीनिर्देश करताच त्याने कवाड बंद असून अडसर घातला असल्याची खात्री करून घेतली.

हं सांगा बहिर्जी. मघा आम्हास जे सांगितलेत ते तसेच तपशीलवार साऱ्यांना सांगा. अगदी सुरुवातीपासून विस्ताराने कळू देत सारे. ते ऐकण्यासाठीच आईसाहेबांना आज तसदी दिली आहे. कोणताही तपशील, कितीही क्लेशकारक वाटला तरी वगळू नका.

महाराजांनी असे सांगितले असले तरी कोणता तपशील गाळायचा हे त्या अतिविश्वासू, अनुभवी हेराला नीट उमगत होते. कारण कोणाला काय आणि किती कळले पाहिजे याचे महाराजांनी घालून दिलेले मानदंड त्याच्या रक्तात पूर्ण मुरले होते. बहिर्जीने आईसाहेबांकडे पाहत जमिनीला हात लावून नमस्कार केला आणि बोलायला सुरुवात केली.

आईसाब, सरनोबत नेताजी सरकार विशाळगड सोडून ग्येले आन आदिलशाहीत दाकल जाले, तवा धरूनच आपली मानसं त्येंच्यावर नजर ठेवून व्हती. जमलं तर गोडीनं न्हायतर चक्क पळवून त्यांना परत आनायचं असा म्हाराजांचा सपस्ट हुकूम व्हता. पर दैवानं साथ दिली न्हाई. आजघडीपातुर मसलत तडीला ग्येली न्हाई. येवडे अवगडातले अवगड मनसुबे म्हाराजांनी सांगितले आनि सेवकांनी पार पाडल्ये पर असं अपेश कंदी पदरी आलं न्हाई. कंदी दोन पावलं मागं घ्यावी लागली असतील पर मनसुबा पुरा झालाच. आदिलशहानं सरनोबतांना, आता आमच्या तोंडात तसंच रुळलंया त्येला काय करनार? सरकार तेवडं सरत करून घ्या. तर त्येंना मोठ्या बंदोबस्तात छावनीच्या ऐन गाभ्यातच ठेवलं व्हतं. तरी आपली मानसं त्यांच्यापोतुर पोहोचलीच. मिर्जाराजा बी काय कमी नव्हता. त्यानं आपल्यावर मात क्येली. सरनोबतांना फितवलं. मोट्या हिकमतीनं मोगली छावणीत दाखल करून घेतलं. त्येनं पार त्येंचा कुटुंबकबिलाच त्येंच्या सोबत मोगली छावनीत आनून घातला. त्येनं सरनोबतांना मोटा मरातब बहाल क्येला. सुप्याची जागिर दिल्ही. सरदारी दिल्ही. रोख इनाम दिल्हे. मात्र ठेवले दिलेरखानाच्या छावनीत.

म्हाराज आग्र्यात आडकल्येले. सारेच चिंतेत. नजर ढळली न्हाय, पर कारगीर हालचाल कराया घावलं नाय. हिकडं बाच्छावाच्या पंजातून म्हाराज सुटले आन तिकडं सरनोबतांचे ग्रह फिरले. पार ज्येवत्या थाळ्यावरच त्येंना दिलेरखानानं गिरफ्तार क्येलं. काढण्या-बेड्यांनी जेरबंद करून मोट्या कडक बंदोबस्तात उघड्या पिंजऱ्यात घालून, शिकारखान्यातल्या जनावरागत, आग्र्याला पोचिवलं. वाटत दोन-चार डाव त्या काफिल्यावर छापा मारून त्येंना पळवायचा बेत क्येलता पर दिलेरखानानं क्येलेली तयारी येकदम मुस्तकिम. दोन हजाराचे घोडदळ आन संगती तोपा बी व्हत्या. नाय सादू शकलं. पार निरुपाय जाला. आग्र्याला आदबखान्यात सिद्दी फुलादखानानं लई हाल क्येलं. त्येनं म्हाराजांनी त्येच्या केलेल्या फजितीचा पुरता सूड सरनोबतांवर काडला. राखेचे, गरम रताळ्यांचे तोबरे, आसुडाचे फटके, मिरच्यांची धुनी, चटके, जमिनीत पुरून तळपत्या उन्हात शेक, ह्ये समदं कमी पडलं म्हनून की काय, भरउन्हात काकवीची आंगुळ घालून दिवसभर लाल चाचडांच्या वारुळावर बशिवलं. असे नाना प्रकार सिद्यानं चालवले.

परमेश्वरा! शिवबा, अरे काय ही दुर्दशा; तुमच्यावरील रुसव्याची केवढी मोठी किंमत मोजावी लागली नेताजीला. बरे, मग पुढे?

पदराने डोळे टिपत आईसाहेब म्हणाल्या.

आईसाब, ह्ये फकस्त येक डाव करून सिद्दी थांबला न्हाई. या यातनांचं ठरवलेलं चक्र हप्त्यामागून हप्ते चालू व्हतं. परतेक शुक्करवारी त्येंना बाच्छावाफुडं हाजिर क्येलं जाई. ते म्हाराजांवर रुसून मोगलांना मिळाले ह्ये मुळी बाच्छावाच्या मनासच येईना. त्येचा आपला येकच धोशा म्हने ह्ये शिवाची सोची समझी गनिमी काव्याची साजिश हाय. सरनोबतांनी ती कबूल करावी ह्यो त्येचा आघ्रव.

बहिर्जीच्या मुखातून हे शब्द बाहेर येताच आईसाहेबांसह प्रत्येकाने चमकून महाराजांच्या मुखाकडे पाहिले. पाषाण चेहऱ्याने बोटातल्या जहर पारखी अंगठीकडे एकटक पाहत महाराज स्वस्थ बसून होते. त्यांच्या चेहऱ्यावरची नजर न हटवता आईसाहेबांनी सवाल केला–

मग? मिळाला का आलमगिराला त्याच्या मनासारखा कबुलीजबाब?

छ्या! तो कुटला मिळाया बसलाया. बाच्छावाच्या मरजीपरमानं कबुली द्याया सरनोबत म्हन्जी काय कोनी फर्जी प्याद की खोजा पानक्या? रुसले म्हणून काय खोटं सांगून म्हाराजांच्या जिवाला का ते नस्तां घोर लावनार? त्ये छळ सोसत ऱ्हायले पर बाच्छावाच्या मनासारका जबाब न्हाय दिला. मंग बाच्छावानं नवीनच शक्कल काडली. सोताहून आला म्हन्तोस त हो मुसलमान. आन मिळव बाच्छावाची किरपा.

एवढा निर्ढावलेला, बारागावचा पाणी प्यायलेला नामांकित हेर, पण बहिर्जीचा कंठ भरून आला. काही क्षण त्याला बोलवेना. पटक्याचा शेव तोंडावर झाकून त्याने काही क्षण हुंदके दिले. बैठकीत जड नि:श्वास घुमू लागले. कित्येक शेले आणि उपरणी डोळ्याला लागली. आईसाहेबांनीसुद्धा पदराने तोंड झाकून घेतले. महाराजांचा श्वास स्थिर होता. पाषाणमूर्तिवत चेहरा निर्विकार होता. मात्र त्यांचे डोळे गळत होते. त्यांना थोपविण्याचा वा पुसण्याचा ते किंचितही प्रयत्न करत नव्हते. बराच वेळ ही अस्वस्थता अशीच दाटून राहिली. तिचा भंग केला त्या धीरोदात्त माउलीनेच.

सांगून टाक बहिर्जी, सांगून टाक. स्वराज्यावर रुसण्याची काय गत होते ते सांगून टाक एकदाचे. संधी मिळाली आणि वेळीच सावरलात तर ठीक. नाहीतर डोंगराच्या उतारावरून निखळलेल्या धोंड्यागत किती खोल गर्तेत कोसळावे लागते समजू दे आम्हा सगळ्यांनाच.

आईसाब, हप्त्यामागून हप्ते तरी सरनोबत छळ सोसत ऱ्हायले. बाच्छावाचा सख्त हुकूम व्हता म्हनून, आणि म्हनूनच सिद्द्यानं त्येंचे हातपाय तोडले न्हाय किंवा डोळे फोडले न्हाईत वा जीवे मारलं न्हाई. पर छळाची कमान चढतीच ऱ्हायली. येका शुक्करवारी बाच्छावानं तर्कट चालवलं की, इतका छळ सोसून बी ह्यो मुसलमान व्हन्यास तयार न्हाई याचाच अर्थ त्येचा शक शंभर टक्के खरा हाय. आईसाब, छळाफुडं सरनोबत मोडले की म्हाराजांवर कोन्या संशयपिशाचानं खोटा आळ घेऊ नये म्हनून त्येंनी गुडघं टेकलं एक ते सोता आनि दुसरा खंडोबाच जानो. पर सरनोबत अखेर मुसलमान झाले. सोता बाच्छावानं रातोरात त्येंना कलमा पडवला. छळापाई ढासळलेली तब्येत रस्त्यावर येन्यासाटी त्येंना दस्तूरखुद्द वजीर जाफरखानाच्या जनानखान्यात मोट्या बंदोबस्तात ठेवलं. त्येंची खबर काडण्यासाठी आग्र्यात धाडलेली आपली पंदरा मानसं कोनी गद्दारानं चुगली क्येली म्हनून सिद्दी फुलादखानाच्या हाती गावली. हरामखोरानं त्येंना साफ कापून काडलं. आपल्या येका भाद्दरानं तर जनानखान्यात रिघाव गावावा म्हनून थ्येट वजिराच्या येका बेगमेलाच जाळ्यात वढलं. पर गफलतीनं टपालाचं कबुतर धरलं गेलं. सुदैवानं त्येच्याकडला गुप्त संदेश वजिराला फकस्त येक प्रेमपत्रच वाटलं म्हनून फार खोलात चौकश्या झाल्या न्हाईत. बिचारी ती बेगम आणि तिचा आशिक दोघांची मुंडकी वजिरानं आपल्या डोळ्यादेखता उडवली.

सरनोबत तंदुरुस्त झाल्यावर बाच्छावानं दिवानेआममधी खिलत देवून त्येंचा इस्तकबाल क्येला. पाचहजारी मनसबदारी आन बलुचिस्तानची जागिरी दिली. येवडंच नाय त शाहिस्तेखानानं आपला मेवना वजीर जाफरखानाला नजर करन्यासाठी धाडलेली नागा जातीची येक पोरगी बाच्छावानं जप्त क्येली व्हती. तिचा निका सरनोबतांबरुबर लावून दिला. त्येंचा समदा कुटुंबकबिला बी आग्र्यात न्येला हाय. ती मंडळी बी आता बाटून मुसलमान झालियात. त्येंच्या राहन्यासाठी बाच्छावानं नबाब दिलावरखानाची नवी कोरी हवेली पन बहाल करवलिया.

रमजानचे रोजे संपले की सरनोबत, आता त्येंचे नवे नाव महम्मद कुलीखान झालंया, नव्या बेगमेला घेऊन पेशावरला आपल्या जागिरीचा ताबा घेन्यासाठी जातील. म्हयना-दीड म्हयना मुक्काम करून म्होरं अफगानिस्तानात पठानांचं बंड मोडून काडन्याच्या मोहिमेवर रवाना व्हतील.

म्हंजी आता नेताजी सरकारांचा समदाच ख्योळ खल्लास जाला म्हनायचा.

व्हय. जवळजवळ तसंच. आईसाब, इतलं झालं तरी बाच्छावाच्या मनातला संशोय जाया तयार न्हाई. त्येनं सरनोबताच्या फौजेतला परतेक सरदार, शिपाई, प्यादा इतकंच न्हाय त सेवेतला हलक्यातला हलका खिदमतगार आनि चाकर मुसलमानच असावा, किमान तीन पिढ्यांपूर्वी बाटलेला असावा असा हुकूम जारी क्येला हाय. ह्ये समदं जनू कमीच पडलं म्हनून त्येंचावर महाबतखानाची नदरकैद कायम हाय.

बहिर्जीने बोलणे संपविले. सारे सुन्न होऊन बराच काळ बसून राहिले. एवढा वेळ स्तब्ध असलेल्या महाराजांचे ओठ हलले. त्यांच्या शब्दात कोणताच विकार वा भाव नव्हता. त्यांचा स्वर नेहमीसारखाच शांत गंभीर होता.

बादशहा आलमगीर अति धूर्त तितकाच संशयी. ज्याने कधी आपल्या स्वत:च्या बापाचा विश्वास धरला नाही. सख्ख्या भावांचा कपटाने काटा काढला, तो काय एके काळचा दुश्मन शरण येऊन चाकरीत आला म्हणून त्याच्यावर आंधळा विश्वास टाकेल की काय? या अशा प्रवृत्तीमुळेच हे म्लेंच्छ बाहेरून येऊन आमच्यावर राज्य करतात. त्यांना स्वत:च्या सावलीचासुद्धा विश्वास नसतो. अष्टौप्रहर सावध असतात ते. आम्ही खुळे, कोणी नुसते गोड बोलले तरी हुरळून जाणार. वर्षानुवर्षांचे हाडवैर विसरून स्वत:चे सर्वस्व त्याच्या हाती सोपवून मोकळे होणार.

संदर्भ उमगून आईसाहेबांनी त्यांच्यावर तीव्र कटाक्ष टाकला. तो जाणवूनसुद्धा महाराजांनी नजर चुकविली आणि बोलण्यात खंड पडू दिला नाही.

बहिर्जी, आता दोन दिवस पूर्ण विश्रांती घ्या. उदईक आईसाहेब पाचाडास जातील. त्यांच्यासोबत निघा आणि वाड्यातच राहा. उगा याची त्याची गाठभेट घेत हिंडू नका. आज रात्रीचा मुक्काम वाड्याच्या देवडीवरच ठेवा म्हणजे सकाळी मेणा निघताना खोटी होणार नाही. दोन-तीन दिवसांत आम्ही बोलावणे धाडू.

मुजरा करून बहिर्जी निघून गेला. जाताना त्याने आठवणीने कवाड नीट लावून घेतले.

काही वेळ शांततेत गेल्यावर किंचित खाकरून मोरोपंतांनी बोलण्यास तोंड फोडले.

क्षमा असावी महाराज, पण आपले नजरबाज एवढी जोखमीची कामे करीत होती पण आम्हाला कधी त्याची पुसट कल्पनासुद्धा देण्यात आली नव्हती. अंऽऽ… म्हणजे तसे नाही. आपण त्यात जातीनिशी लक्ष घालीत होतातच पण जर आमची थोडकी मदत होऊ शकली असती तर आपल्या शिरावरचा भार थोडका उणावता, इतकेच.

अनाजी दत्तोंनी मोरोपंतांचे तेच बोलणे उचलून धरीत पुढे चालविले.

मोरोपंत म्हणतात त्यात तथ्य आहे महाराज. बहिर्जी निष्णात हेर आहे. आपल्या पूर्ण विश्वासातला आहे. तो कोणतेही सोंग अस्सलापेक्षा सरस वठवितो यात कोणाचेच दुमत नाही. पण सेनानीचे सोंग काढून खबरा मिळविणे निराळे आणि प्रत्यक्ष मोहीम आखून ती कारगीर करणे निराळे. त्याने प्रतापरावांना वा मोरोपंतांना किमानपक्षी खुद्द आईसाहेबांना विश्वासात घेऊन आपण त्याला दिलेला हा हुकूम कळवला असता, तर आपल्या अनुपस्थितीत नेताजीरावांना आग्र्यास नेले जात असता त्यांना सोडवण्यासाठी केलेली छापामारी अधिक योजनाबद्ध आणि परिणामकारक आखता आणि राबवता आली असती. ती यशस्वी होण्याची शक्यता वाढली असती.

प्रतापरावांचे मुंडासे अनाजींना दुजोरा देत हलले.

अक्षी बरुबर हाय पंत म्हनाले त्ये. चुकलंच बहिर्जीचं. अवं समदी फौज आमच्या अखत्यारीत मंग बिट्यानं छापामारीसाटी शिबंदी पैदा क्येली कुठून? आमच्या परोक्ष आन आमाला आंधारात ठिऊन कोनी बी फौजा वापराया लागलं तर झाला का कल्यान. शिवाय तो येळीच नीट अक्कल वापरून काही करता, तं नेताजीरावांची आन त्यांच्या समद्या कबिल्याची झालेली इटंबना तं टळती. छ्या! लई ब्येकार झालं गड्यांनु.

उद्विग्न प्रतापरावांना हाताने थोपवीत रघुनाथपंत म्हणाले–

थांबा. थांबा राव. पंत, थांबा. बहिर्जीला दोष देणे म्हणजे परोक्षपणे महाराजांवरच दोषारोप करणे. तो बिचारा महाराजांच्या आज्ञेने बांधलेला. त्या वक्ताला महाराज स्वत: परागंदा. त्याने महाराजांना कुठे शोधावे, गाठावे आणि पुढल्या आज्ञा घ्याव्या? महाराजांनी देऊन ठेवलेल्या आज्ञांच्या मर्यादेत त्याने जे सुचले ते पुऱ्या कसोशीने आणि प्रामाणिकपणे केले असावे यात संशय नसावा. राहतो प्रश्न त्याने कोणास विश्वासात घेण्याचा. तर आपण सारे बहिर्जीला पूर्णपणे ओळखतो. प्राण गेला तरी तो महाराजांची आज्ञा ओलांडणार नाही. त्याने तसे केले नाही याचा मला स्पष्ट दिसणारा अर्थ असा की, तसे काही करण्यास महाराजांनीच त्यास मनाई केली असावी. महाराजांनीसुद्धा तशी मनाई करण्यामागे काही निश्चित विचार असलाच पाहिजे. अन्यथा एवढी महत्त्वाची बाब प्रधानमंडळापासून गुप्त राखली असे पूर्वी कधी घडलेले नाही. उद्वेग आपल्या स्थानी ठीक आहे. विवेकावर वैयक्तिक उद्वेगाला जो मात करू देत नाही तोच खरा मुत्सद्दी म्हणवतो. काय त्र्यंबकपंत खरे ना?

पटले. रघुनाथा सर्वथा पटले. महाराज नेताजीरावांच्या काळजीने मन कोंदून गेले आणि अनवधानाने अधिक्षेप झाला. क्षमा असावी. तरुण पिढी महाराजांप्रमाणेच स्थिरमती आहे. पाहून संतोष वाटला.

अनाजी दत्तोंची प्रांजळ कबुली ऐकून वातावरणातला ताण जरा सैलावला. महाराजांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता येऊन गेली. किंचित हसून ते म्हणाले–

मंडळी एकूण सारेच प्रकरण इतके नाजूक आणि गंभीर आहे की, आपले कोणाचेही चित्त किंचित जरी विचलित झाले असते तरी नेताजीकाकांच्या प्रकरणावरून फौजेत आणि रयतेत बंडाळी माजून फितुरीला ऊत आला असता. शिवाय तसे पाहता मामला आम्हा दोघांचा आपसातला होता. आता काय होऊन गेले याचे चर्वितचर्वण करण्यापेक्षा उद्या ही चर्चा स्वराज्यात आणि फौजेत पसरली म्हणजे त्याचे काय गंभीर परिणाम होतील याचा आपण विचार केला पाहिजे. त्यामधून निभावण्याचा उपाय शोधला पाहिजे. काय?

प्रतापराव आत्मविश्वासाने म्हणाले-

म्हाराज, नेताजीरावांवर फौजेचा लय जीव व्हता ह्ये खरं पर ज्या प्रकारे ते स्वराज्य सोडून ग्येले आन गनिमाला मिळाले त्यानं त्येंच्यावर फौजेत लई नाराजी हाय. ते मुसलमान झाल्याच्या बातम्या आधीच आल्याती. त्यापाई तर त्यांची पत पार धुळीला मिळालिया. म्हाराजांनी फौजेबाबत निर्घोर ऱ्हावं. आमाला वाटतं, म्हाराजांनी त्येना परत आनन्याची भारीच खटपट करून जाली. लय मानसं बी खरची पडलिया त्यापाई. आता ह्यो खटाटोप आवरावा.

अनाजी दत्तो आणि दत्ताजी पंतांनीसुद्धा त्यांचे बोलणे उचलून धरले. मोरोपंतांनीसुद्धा तोच मुद्दा पुढे चालविला.

नेताजीरावांनी केलेल्या आततायीपणाचे प्रायश्चित्त तर ते भोगीत आहेतच. दु:खात सुख एवढेच की, या सर्व प्रलयात त्यांच्या मनी महाराजांविषयी सद्भाव अजून जागा आहे. पण कोणत्या प्रकारे वा कारणाने का होईना त्यांनी धर्मत्याग करून यावनी धर्म स्वीकारला आहे ही बाब जरा गांभीर्यानेच घेतली पाहिजे. त्याशिवाय बहिर्जीच्या कथनातून स्पष्ट होते की, त्यांनी बादशहाची मर्जी सर्वार्थाने संपादन केली आहे. अथवा मुत्सद्दी दूरदर्शीपणाचे धोरण म्हणून बादशहा तसे भासवीत तरी असावा, अन्यथा एखाद्या नवागताला अफगाण मोहिमेसारख्या कठीण आणि महत्त्वाकांक्षी मोहिमेची नायब-सरलष्करी दिली गेली नसती. तद्वतच त्यांनी सरनोबती गाजवली असल्या कारणाने स्वराज्याचे अनेक भेद त्यांना ठावकी आहेत. या बाबीचा उपयोग करून घेण्यासाठी बादशहा त्यांना नक्की दख्खनवर पाठवील. तसे झाले तर मोठा बांका प्रसंग उभा राहील. कारण खऱ्यापेक्षा बाटगा जास्तच कडवा असतो. बादशहाप्रति आपल्या निष्ठांचे प्रदर्शन करण्यासाठी ते स्वरा?
Image result for netaji palkar"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...