नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔
अग्निदिव्य
__📜⚔🗡भाग -21 ⚔🚩🗡___
लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार
_⚔🚩⚔📜🚩___
मोठमोठ्या कमानींखालून अनेक दरवाजे, व्हरांडे ओलांडत आपल्याला नेमके कोठे नेले जात आहे हे कुलीखानाला काहीच कळत नव्हते. दरबारच्या वाटेवर जनानखान्यात असतात तसे बायकांचे पहारे पाहून त्याला अचंबा वाटत असतानाच त्याच्या एकदम लक्षात आले की, तो दरबारात नव्हे तर खुद्द आलमगीर बादशहाच्या खास खासगी महालात आणला गेला आहे.
*_दरबारी जामानिमा करून बादशहा जपमाळ ओढीत उंची मसनदीवर बसला होता. समोर मोजकेच दरबारी उमराव अदब राखून उभे होते. डाव्या हाताला मीर बक्षी, तर उजव्या हाताला वजीर जाफरखान उभा होता. उपस्थितांत एकसुद्धा हिंदू दरबारी नाही हे कुलीखानाच्या चाणाक्ष नजरेने क्षणात टिपले. महालाच्या दारात पाऊल टाकताच बादशहाला कंबरेत वाकून कुर्निसात करीत करीत तो सामोरा येऊन उभा झाला. बादशहाची गहिरी हिरवी नजर त्याचा वेध घेत होती. वजीर जाफरखान कुजबुजत्या आवाजात बोलला–
हुजुरे आलांच्या हुकमाप्रमाणे महम्मद कुलीखान हाजिर करण्यात आले आहेत._*
माळ थांबली. नजर तीव्र झाली. मान झुकलेली ठेवून पण नजर किंचित उंचावून कुलीखान बादशहास न्याहाळण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र एवढ्या कमी प्रकाशातसुद्धा झगमगणारा किमांशमधील रत्नखचित शिरपेच आणि सर्पाच्या नजरेची आठवण देणारी थंड हिरवी नजर त्याची नजर वारंवार खाली झुकविण्यास भाग पाडीत होते.
खुशामदीन महम्मद कुलीखान. आता तबियत कशी आहे? वजीरेआझमचा पाहुणचार पसंत पडला की नाही?
सगळी जिल्हेसुभानी आलमपन्हांची मेहेरबानी आहे. फक्त एकाच गोष्टीचे अतिशय वाईट वाटते आहे.
सगळे एकदम चमकले. हिरवी नजर किंचित गढुळली. कपाळावरील काळा डाग आक्रसला. मिटल्या दातांच्या फटीतून जरबेने भरलेले शब्द उमटले–
मतलब?
गुस्ताखी माफ हुजुरेआली. माशाल्ला, मी अगदी सुखात आहे. पण आदबखान्यातून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आलमपन्हांच्या खिदमतीत पेश होण्याचे भाग्य या नाचीज गुलामाला आज प्रथमच लाभते आहे. पण सदका उतरण्यासाठी किंवा काही नजराणा पेश करण्यासाठी या निष्कांचन गुलामाच्या हातात काहीच नाही. रिकाम्या हाती दर्शनासाठी आल्याबद्दल आलमपन्हांनी या बेबस दरिद्री गुलामाला माफ करावे आणि सदका म्हणून हा गुलाम आपली संपूर्ण निष्ठा आणि नजराणा म्हणून स्वत:ला आलाहजरतांच्या चरणांवर वाहून घेत आहे. दयावंत होऊन स्वीकार व्हावा, असा अर्ज आहे.
उपस्थितांचे चेहरे उजळले. जाफरखानाला तर अगदी कृतकृत्य झाल्याचे समाधान मिळाले. नेताजीतून कुलीखान घडविण्यात त्याला यश आल्याची पावतीच जणू त्या उद्गारांतून मिळाली होती. आक्रसलेला काळा डाग सैलावला. हिरवी नजर पुन्हा साफ झाली. त्या नजरेत विजयाची चमक झळकून गेली, अगदी क्षणभरच. काही क्षण ती नजर जाफरखानावर स्थिरावली. त्यातली शाबासकी हेरत त्याने कंबरेत झुकून कुर्निसात करून कृतज्ञता व्यक्त केली. नजर पुन्हा कुलीखानाकडे वळली. त्याचे शब्द केवळ ओठावरचे की, मनातून उमटलेले याचा जणू पडताळा नजर घेत होती. उपस्थित उमरावांना अत्यंत दुर्मीळ योग अनुभवायला मिळाला. बादशहाच्या मुखावर चक्क अस्फुट स्मितरेषा प्रकटली. अल्लाची केवढी मेहेरबानी.
सुभानअल्ला! बहुत खूब. महम्मद कुलीखान बहुत खूब. माबदौलत तुझ्यावर निहायत खूश झाले आहेत. तुझा सदका आणि नजराणा दोन्ही कबूल फरमावत आहेत. वजीरेआझम…
हुकूम आलाहजरत…
तुमची जी कनीज माबदौलतांनी आपल्या पनाहमध्ये घेऊन अगदी मेहफूज ठेवलेली आहे, ती या आनंदाच्या क्षणी महम्मद कुलीखानाला बतौर तोहफा इनायत करावी अशी तमन्ना माबदौलतांच्या दिलात जागी झाली आहे. जर तुमची त्याला परवानगी असेल तरच अर्थात.
मनातली चडफड मनातच दाबून ठेवत आणि चेहऱ्यावर ओशट लाचार हसू आणून कंबरेत लवत जाफरखान बोलला–
जहे किस्मत. या शरीरावरच नव्हे तर त्यातल्या प्राणांवरदेखील जहाँपन्हांचीच सत्ता आहे. गुलामाच्या संपत्तीतला प्रत्येक कतरा हुजुरे आलींच्या मालकीचा आहे. तिथे एका नाचीज कनीजची काय केवा. आलाहजरत कुलमुखत्यार आहेत.
बेहतर है। ती कनीज माबदौलत महम्मद कुलीखानास इनायत फरमावत आहेत. बांदी म्हणून नव्हे तर बेगम म्हणून. आज रात्रीच त्यांचा निकाह पढला जाईल. वजीरेआझम, तुम्ही स्वत: दुल्हनचे पालक म्हणून निकाहनाम्यावर दस्तखत करावी. दहा हजार अश्रफी मेहेर म्हणून माबदौलतांच्या खासगीतून तुमच्याकडे पोहोचत्या होतील. घटकाभरातच तुमची अनामत तुमच्या हरममध्ये पोहोचलेली असेल. मीर बक्षी, तुम्ही माबदौलतांच्यातर्फे दुल्हेमियाँचे वकील म्हणून निकाहमध्ये शरीक व्हा.
जहे किस्मत. आलमपन्हांच्या हुकमाची पूर्ण तामील होईल. दुल्हेमियाँने अदा करण्याचा जो मेहेर आलाहजरत स्वत:ला तोशीस लावून अदा करीत आहेत, तो भार उचलण्याची गुलामाला परवानगी मिळाली तर गुलाम स्वत:स धन्य समजेल.
तीक्ष्ण हिरवी नजर काही क्षण मीर बक्षीवर स्थिर झाली.
मंजूर है।
मीर बक्षीने कंबरेत झुकून आपली कृतज्ञता व्यक्त केली. कुलीखानाची नजर जाफरखानाकडे गेली. बऱ्याच वेळापासून तो खुणा करकरून काहीतरी सुचवीत असल्याचे त्याच्या ध्यानात आले. क्षणभराने त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. मग त्यानेसुद्धा लवून झुकून कुर्निसात करीत आपली कृतज्ञता व्यक्त केली.
आलमपन्हांच्या जर्रानवाजीमुळे या नाचीज गरिबाचा सन्मान झाला आहे, ते उपकार जन्मभर विसरण्यासारखे नाहीत. या उपकाराची परतफेड करणे कधीच शक्य नाही पण तरी त्यातील काही अंशांची तरी परतफेड करण्याची संधी आणि काबिलीयत अल्लाने द्यावी अशी मी आयुष्यभर दुवा करीत राहीन… आलाहजरतांच्या या दयाबुद्धीमुळे गुलामाला मोठाच धीर आला आहे. या आनंदाच्या प्रसंगी एक अर्ज पेश करण्याची इजाजत असावी… गुलामाचा कुटुंबकबिला दिलेरखान हजरतांच्या छावणीत दख्खनमध्येच राहिला आहे. आलाहजरतांनी घाईगर्दीत तातडीने बोलावून घेतले; त्यामुळे तो सोबत आणणे शक्य झाले नाही. त्यानंतर इथे पोहोचल्यावर आलाहजरतांच्या मेहमान नवाजीमुळे नाचीज इतका गुंतून पडला होता की, त्यांची खबर खैरियतसुद्धा समजू शकली नाही. आलाहजरतांच्या पायाशी अर्ज असा की, आम्हाला आमच्या कुटुंबकबिल्याची खैरियत जाणून घेण्याची परवानगी मिळावी आणि हजरत दिलेरखानांच्या छावणीत जाऊन त्यांना आलमपन्हांच्या पायाशी घेऊन येण्याचे फर्मान जारी व्हावे.
पहिल्याच मुलाखतीत अशी बेधडक मागणी करण्याची कुलीखानाची हिंमत पाहून अवघे उमराव मनातून चरकले. हिरव्या नजरेत कोणतेच भाव उमटले नाहीत. केवळ जपमाळ किंचित उंचावली गेली आणि जाफरखानाच्या दिशेने हलली. वजीर जाफरखानाने लगेचच त्याचा अनुवाद केला.
महम्मद कुलीखान आज आलाहजरतांनी अत्यंत दयावंत होऊन या खास-उल्-खास अंजुमनमध्ये तुम्हाला शिरकत फरमावली आहे ते तुम्हाला हीच खुशखबर देण्यासाठी. तुमचा कुटुंबकबिला दख्खनमधून दार-उल्-सलतनतमध्ये पूर्वीच आणवला गेला आहे. माशाल्ला, तुमच्या तीन बायकांना आणि तुमचा काका कोंडाजी पालकर याला तुमच्याप्रमाणेच इस्लामच्या सही रस्त्यावर येण्याची बुद्धी झाली आहे. दोन-चार रोजातच त्यांची तुमची भेट होईल. सध्या ते नवाब दिलावरखानांनी आलाहजरतांना नजर केलेल्या शिकारपूरच्या नव्या हवेलीत राहत आहेत.
झटकन खाली झुकून कुलीखानाने बादशहाला कुर्निसात घातला आणि वारंवार धन्यवाद देत राहिला. त्यानिमित्ताने आपल्या चेहऱ्यावरील घोर निराशा लपविण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला. बादशहाच्या धूर्त दूरदृष्टीने एक धाडसी बेत उधळला गेला होता. कुटुंबाची खबर खैरियत काढून घेण्याच्या निमित्ताने स्वराज्यात बहिर्जीशी किंवा थेट महाराजांशीच काही संपर्क साधता येतो का ते पाहावे आणि कुटुंब राजधानीत आणण्याच्या मिशाने दख्खनमध्ये जाण्याची संधी साधावी. एकदा नर्मदा आणि तापी ओलांडली की राजगडावर पोहोचणे फारसे अवघड जाणार नव्हते. मात्र धूर्त चाणाक्ष बादशहाने सारा बेत मुळातूनच साफ उखडून टाकला. त्याने प्रदर्शित केलेली लीनता पाहून हिरव्या नजरेत क्षणभरासाठी कौतुक तरळून गेले.
महम्मद कुलीखान इस्लामच्या प्रत्येक नेक बंद्यास या जगातली सर्व सुखे आणि मेल्यानंतर स्वर्गसुख देण्याचे वचन खुद्द परवरदिगार अल्लानेच दिले आहे. माबदौलत केवळ एक जरिया आहेत. असाच नेकीने आणि निष्ठेने तख्ताची आणि अल्लाची, इस्लामची सेवा करीत राहा. रब्ब तुझ्यावर माबदौलतांमार्फत मेहेरबानीची नुसती बरसात करील. गुर्झबारदाराला अल्काब पुकारण्याचा इशारा रवाना करा. माबदौलत दरबारासाठी निघत आहेत.
बादशहाला पाठ न दाखविता सारे उमराव आणि कुलीखान कुर्निसात करीत करीत महालातून बाहेर पडले. वजीर आणि इतर दरबारी मंडळी झपाट्याने चालत दरबाराकडे निघाले. कुलीखानाला पूर्वीसारखेच पहाऱ्यात वेगळ्या वाटेने दिवाण-ए-आमसमोरच्या बगिच्यात आणण्यात आले. खुद्द बादशहा मेहेरबान झाला असला तरी पहाऱ्यात किंचितही ढिलाई आली नव्हती. नंग्या तलवारींच्या पहाऱ्यात कुलीखानाला प्रवेशद्वारासमोर एका झाडाखाली उभे केले गेले. आपल्याला दरबारात न नेता इथे का उभे केले गेले आहे याचा तो विचार करीत असतानाच त्याच्या कानावर अल्काबचा पुकारा आला.
होशियाऽऽऽर, बा अदब होशियाऽऽऽर. वजीर-ए-आझम, जनाब- ए- आली मीर महम्मद जाफरखान तश्रीफ ला रहे हैं. बा अदब बा मुलाहिजा होशियाऽऽऽर.
दिवाण-ए-आममध्ये चालू असलेली कुजबुज एकदम शांत झाली. तख्ताच्या सेवेत असणाऱ्या काही खिदमतगारांच्या हालचालींचे अस्पष्ट आवाज काही क्षण ऐकू आले. तेवढ्यात शाही गुर्झबारादाराचा बुलंद खणखणीत अल्काब साऱ्या परिसरात दुमदुमला. सारा दरबार सावध आणि तटस्थ झाला. उरलीसुरली हालचालसुद्धा बंद झाली. दरबारात शेकडो असामी हजर असल्या तरी मुंगीचा पदरवसुद्धा ऐकू यावा अशी शांतता पसरली. अचानक एक वेगळेच दडपण उत्पन्न झाले. दरबाराच्या बाहेर बगिच्यात उभा असलेला कुलीखानसुद्धा आपसूक ताठ झाला. गर्दन झुकली नजर पायतळी आली. त्या अल्काबात तशीच शक्ती भरली होती–
बाऽ अदब बाऽ मुलाहिजा होशियाऽऽऽर. नजर बर्कदम होशियारऽऽऽ बुत शिकन, कुफ्र शिकन शहनशाह-ए-हिंदोस्तान जिल्हेसुभानी आलमपन्हा बादशहा सलामत आलमगीर मिर्झा औरंगजेब गाझी तश्रीफ फरमा रहे हैं होशियाऽऽऽर नजर बर्कदम होशियारऽऽऽ आहिस्ता कदम आहिस्ता कदम बंदगाने आली आहिस्ता कदम होशियारऽऽऽ बा अदब बा मुलाहिजा होशियाऽऽर.
कुलीखान उभा होता त्या जागेवरून तख्त स्पष्ट दिसत होते. जवळपास सव्वाशे-दीडशे हात अंतर असूनसुद्धा तख्ताच्या आसपास होणारी कुजबुजसुद्धा स्पष्ट ऐकू येत होती. तख्तावर बसलेला बादशहासुद्धा आपल्याला स्पष्ट पाहत असणार ही जाणीव होताच सैल झालेले अंग ताठ करून तो दरबारी पद्धतीने नीट उभा राहिला.
दरबाराचे काम त्वरितच सुरू झाले. बादशहा स्वत: अगदीच मोजके बोलत होता. वजीर, मीर बक्षी आणि मुख्य चोपदार यांना तो आवश्यक तेव्हा संकेताचे इशारे करी. बादशहाच्या वतीने वजीरच बोलत होता. सर्वप्रथम वेगवेगळ्या खलित्यांचे वाचन झाले. त्यामध्ये दख्खनमधून दिलेरखानाने पाठविलेला खलिता वाचला गेला. त्याने गोंड राजावर मिळविलेल्या विजयाचे मोठे रसभरित वर्णन लिहून पाठविले होते. दख्खनचा सुभेदार शहजादा मुअज्जम याच्या खलित्यावरून कुलीखानाला समजले की, मराठ्यांनी पुन्हा उचल खाल्ली असून, पुरंदराच्या तहात गमावलेले किल्ले परत जिंकून घ्यायला सुरुवात केली आहे. तानाजी मालुसऱ्यांनी डोणगिरीचा उभा कडा चढून जाऊन अचानक छापा घातला आणि कोंडाणा परत मिळविला. खासा किल्लेदार उदयभान राठोड ठार झाला. त्याचा ऊर अभिमानाने भरून आला. या धामधुमीत आपण तिथे नाही याची हुरहुर मनात उमटून गेली. पण जे दिव्य आपण करीत आहोत ते एकमेवाद्वितीय असल्याचे त्याने मनाला समजावले. खलित्यांना उत्तरे देण्याचा वा त्यावर कारवाई करण्याचा हुकूम बादशहा देत होता. त्यातच दिलेरखानाच्या बरोबरीने बादशहाचा नातेवाईक बहादूरखान याला कोकलताश अशी पदवी देऊन दख्खनमध्ये नामजद केल्याचा हुकूम जारी झाला.
त्यानंतर इराण आणि तुर्कस्तानच्या सुलतानांकडून आलेल्या वकिलांचा सन्मान झाला. मग इतर काही किरकोळ कामकाज होऊन दरबारी लोकांचा सत्कार सुरू झाला. कोणाला पालखी तर कोणाला पदवी, कोणाला मोर्चेल तर कोणाला वतन, कोणाला रोख इनाम तर कोणाला तलवार, घोडा इ. तर कोणाला शिरपाव आणि पोशाख. काही मोजक्यांना खिलत देण्यात आली. सिद्दी फुलादखानलासुद्धा खिलत मिळाला, मिळणारच; दुसरा शिवाजी म्हणविणाऱ्या नेताजी पालकरला नमवून त्याने मुसलमान होण्यास भाग पाडले, ही काय कमी महत्त्वाची आणि मर्दुमकीची कामगिरी होती? त्याने जणू एक अवघड मोहीमच फते करून दाखविली होती.
हे सारे घडत असताना कुलीखान मात्र दरबाराच्या बाहेर ताटकळत उभा होता; त्यामुळे त्याची अस्वस्थता वाढायला लागली. सोबत असलेल्या वजिराच्या गुमास्त्याकडे त्याने कुरकुर केली तेव्हा त्याने कानाशी येऊन मोठ्या अदबीने कुजबुजत्या आवाजात समजावले–
हुजूर, असे नाराज होऊ नका. जिल्हेसुभानी आलमपन्हांची तुमच्यावर नजरे इनायत झाली आहे. हे खरे, पण अजून आपल्याला शाही मनसबदारीचा आणि सरदारकीचा हुद्दा सरकारातून मिळालेला नाही; त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला तो हुद्दा मिळत नाही तोपर्यंत दरबारात उभे राहता येणार नाही. काळजी करू नका, याच दरबारात तसा हुकूम होईल. हुजुरांचे नाव पुकारून सत्कार होईल आणि सन्मानाने दरबारात उभे करण्यात येईल.
हे बोलणे चालू असतानाच सिद्दी फुलादखानाचा एक खोजा एका मखमली थैलीत काही अश्रफी घेऊन सामोरा आला आणि अगदी हलक्या आवाजात त्याने विनंती केली–
हजरत महम्मद कुलीखान हुजुरांच्या पायाशी एक दरख्वास्त आहे की, माझे आका हजरत सिद्दी फुलादखान सरकारांनी या सोन्याच्या अठरा अश्रफी हुजुरांकडे पाठवल्या आहेत. मेहेरबानी करून त्याचा स्वीकार व्हावा. या अश्रफी आपण आलाहजरतांसमोर सदका उतरून ठेवाव्यात, अशी माझ्या आकाची मनशा आहे. हुजुरांनी ती पूर्ण करावी अशी त्यांनी मैत्रीपूर्ण विनंती केली आहे.
कुलीखानाच्या कपाळाला आठ्या पडल्या. तो चिडून काही बोलणार एवढ्यात गुमास्त्याने हाताच्या इशाऱ्याने त्याला थांबविले. कानाशी तो पुटपुटला–
हुजूर येथे बोललेले तख्ताजवळ स्पष्ट ऐकू जाते. ज्या अर्थी आलाहजरतांना स्पष्ट दिसत असताना हा खोजा उघडपणे हे बोलतो आहे, ते आलाहजरतांना ऐकू जात आहे हे माहीत असताना, सिद्दी फुलादखानाचा म्हणून ऐवज आपल्याला पेश करीत आहे त्या अर्थी हा आलाहजरतांच्या हुकमाने स्वत: वजीरेआझम हुजुरांचा निरोप असावा. अन्यथा तो मक्खीचूस काजळाचा बुधला अश्रफी, त्यासुद्धा सोन्याच्या, सुखासुखी कोणाला देतो की काय? स्वीकार करा.
तेवढ्यात गुर्झबारदाराने पुकारा केला–
खान-ए-खानान, शेर-ए-दख्खन, जनाबे आली महम्मद कुलीखानऽऽऽ
पुकारा होत असतानाच दरबारी शिपाई आणि चोपदार त्याच्या समोर हाजिर झाले. मोठ्या अदबीने त्यांनी त्याला आपल्या मागोमाग चलण्याची खुणेनेच विनंती केली. भोवतीचे पहारेकरी दूर सरकले. कुलीखान दरबारी चोपदारामागे जाण्यासाठी पुढे झाला. दरबाराच्या पायऱ्यांपासून थेट तख्ताच्या समोर चार पावले अलीकडेपर्यंत मेंदीच्या हिरव्या रंगाचा मखमली गालिचा पसरला होता. पायऱ्या चढून गालिच्यावर पहिले पाऊल टाकताच त्याने कंबरेत झुकून कुर्निसात केला. आणि ताठ चालत तो दरबारी चोपदाराच्या मागे निघाला. कंबर ताठ असली तरी गर्दन झुकलेली ठेवणे भाग होते. दरबारी रिवाजच मुळी होता तसा. खालमानेनेच तो बादशहाला न्याहाळत होता. सोन्याच्या रत्नखचित मयूर सिंहासनावर - तख्ते ताऊसवर आलमगीर बादशहा इस्लामी पद्धतीची मांडी घालून बसला होता. अंगावर मोजकेच मूल्यवान दागिने होते. हातातली जपमाळ वेगाने फिरत होती. हिरवी नजर पुढे चालत येणाऱ्या कुलीखानावर खिळली होती. दरबारात त्याचे पाऊल पडताच चिकाच्या पडद्याआड खुसफुस चालू झाली. त्यासरशी हिरवी नजर त्या दिशेने वळली. त्या नजरेतील धाक पडदा भेदून पलीकडे पोहोचला असावा कारण खुसफुस लगेच जिरली. एकेक दमदार पाऊल टाकत कुलीखान तख्ताजवळ सरकत होता. त्या चालण्यात डौल होता, ताठा होता पण उद्दामपणा नव्हता. लीनता निश्चितच होती पण मोगली लाचारी नव्हती तर मराठी रग होती. हिरव्या नजरेने तो सूक्ष्म फरक नेमका टिपला असावा कारण काही क्षण झालेली जपमाळेची अस्वस्थ चाळवाचाळव सर्वांच्याच नजरेत भरली.
बादशहाच्या दिशेने एकेक पाऊल टाकताना कुलीखानाच्या मनात येत होते, ‘याच दरबारात याच बादशहासमोर काही महिन्यांपूर्वी महाराज असेच आले असतील का? महाराज फार मोठे राजकारण मनात धरून आले होते. पण या बादशहाने आडमुठेपणामुळे सारे राजकारण पार नासवून टाकले. शिवाय महाराजांना अपमानित केले. शेवटी मोठ्या हिकमतीने त्यांना याच्या दाढेखालून निसटून पळून जावे लागले. त्यांचा सूड बादशहाने आपल्यावर हा अशा प्रकारे उगवला. खैर आता त्याच राजकारणाचा आपल्या वाट्याला आलेला भाग तरी तडीस जावा. आई भवानी यश दे, बळ दे. माझ्या राजाची इच्छा पूर्ण करण्यासाठी शक्ती दे. बुद्धी दे. यश दे. युक्ती दे.’
कुलीखान मखमली हिरवा गालिचा पायांनी तुडवत तख्ताकडे चालत असताना एक दरबारी कारकून खणखणीत स्पष्ट शब्दांत आणि उच्च स्वरात साऱ्या दरबाराला त्याची ओळख करून देत होता. दरबारात पडलेल्या पहिल्या पावलापासून त्याने बोलण्यास सुरुवात केली होती.
शेर-ए-दख्खन, खान-ए-खानान, जनाब महम्मद कुलीखान. दख्खनच्या कोहस्तानी मुलखात बगावत करणाऱ्या, मुघल तख्ताशी गुस्ताख खिलवाड करणाऱ्या बेइमान शिवा भोसला याच्या साथीने अवघ्या दख्खनी मुलखात बगावत आणि कुफ्र माजवत होते. परवरदिगार रहमाने रहीम अल्लातालाच्या मेहेरबानीने त्यांच्या मनात सही रस्त्यावर येण्याची प्रेरणा जागी झाली आणि शिवा भोसल्याची नापाक साथ सोडून ते जयपूर महाराजा मिर्झाराजे जयसिंह यांच्या पनाहमध्ये आले. त्यांना दिलेरखानसाहेबांची निसबत फरमावली असताना शहेनशाहे आलम आलाहजरतांनी मनात दयाभाव उत्पन्न झाल्यामुळे त्यांना मुस्तकिर-अल्-खिलाफत अकबराबाद ऊर्फ आग्रा शहरात मोठ्या इतमामाने आणवले. कोतवाले-ए-आग्रा, जनाब सिद्दी फुलादखान यांनी त्यांची शाही रिवाजाप्रमाणे उत्तम खातिरदारी करून शाही मेहमान नवाजीची एक नवी मिसाल कायम केली. साहेबे आलम आलाहजरतांच्या हुकमाप्रमाणे त्यांच्या मनात अल्लाचा सच्चा धर्म जो इस्लाम त्याविषयी प्रेम आणि श्रद्धा उत्पन्न केली. त्यांच्या मनातील अलोट श्रद्धा पाहून अल्लाच्या मर्जीस अनुसरून आलमपन्हा जिंदा पीर आलाहजरतांनी त्यांना दावते इस्लाम दिली आणि त्यांनी ती मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने कबूल केली. हुजुरे आली आलाहजरतांनी स्वत:च त्यांना कलमा पढवून इस्लामच्या पवित्र छायेत दाखल करून त्यांच्या मनातील कुफ्र जाळून नष्ट केले. त्यांना नवे नाव आणि भवितव्य दिले. आज इस्लामच्या पवित्र सत्य मार्गावरून चालत जिंदगीत पहिल्यांदाच शाही दरबारात पेश होत आहेत. खान-ए-खानान महम्मद कुलीखान.
ज्या ठिकाणी हिरवा गालिचा संपला त्या ठिकाणी दरबारी चोपदाराच्या इशाऱ्याने कुलीखान थांबला. नेमकी त्याच क्षणी दरबारी कारकुनाची परिचय घोषणासुद्धा थांबली. जमिनीपर्यंत लवत कुलीखानाने तीन वेळा कुर्निसात केला. कंबरेच्या शेल्यात खोचलेली मखमली थैली काढून तीन वेळा बादशहावरून उतरली आणि तख्तासमोरच्या मोठ्या नक्षीदार चौरंगावर ठेवली. लगोलग भरजरी रुमालाने झाकलेली दोन भली मोठी तबके घेऊन दोन खिदमतगार सामोरे आले. वजिराने त्या तबकांना स्पर्श करण्याची खूण केली. त्याप्रमाणे त्याने स्पर्श केल्यानंतर ती दोन्ही तबके त्याच चौरंगावर ठेवली गेली. मागोमाग गुर्झबारादाराची घोषणा दरबारात घुमली–
‘पेश-ए-खिदमत सदका और नजर नजराणा तर्फे महम्मद कुलीखान.’
नजराणा कबूल केल्याची निशाणी म्हणून जपमाळ किंचित उंचावली गेली. वजीर दरबाराच्या मधोमध तख्ताखाली येऊन उभा राहिला. कंबरेत किंचित झुकून त्याने बादशहाच्या इशाऱ्याला प्रतिसाद दिला. हातातले कागदी भेंडोळे उलगडून त्याने कलम दरकलम वाचण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम त्याने दरबारी कारकुनाने सांगितलेलेच आख्यान अधिक विस्ताराने तपशीलवार आणि दरबारी आलंकारिक ढंगात मोठ्या रसभरित पद्धतीने पुन्हा एकदा सादर केले. त्यानंतर कुलीखान काफिर असताना त्याने केलेले गुन्हे किती गंभीर आहेत आणि त्या गुन्ह्यांसाठी सजा-ए-मौतसुद्धा अगदी सौम्य शिक्षा ठरावी असे असताना जिल्हेसुभानी आलाहजरतांनी त्याच्या मनात निर्माण झालेले इस्लामचे प्रेम आणि निष्ठा पाहून त्याचे सारे गंभीर गुन्हे माफ करून सुधारण्याची संधी कशी दिली आहे हेसुद्धा मोठ्या रोचक पद्धतीने सांगितले. वजिराने बोलणे संपवून बादशहाकडे नजर वळविली. जपमाळ पुन्हा वर झाली. त्या इशाऱ्यासरशी झाकलेली ती तबके बादशहासमोर आली. बादशहाने उजव्या हाताचा स्पर्श करून तबके परत पाठविली. तबकांवरील रुमाल दूर झाले. इतका वेळ नि:शस्त्र असलेल्या कुलीखानाला जडावाची मूठ आणि किनखापाचे म्यान असलेली पल्लेदार तलवार, मखमली म्यानातील तीक्ष्ण बिचवा आणि कट्यार तसेच लखलखता रत्नजडित शिरपेच बहाल करण्यात आला. दरबारी खिदमतगारांनी तिथल्या तिथे त्याच्या कंबरेला शस्त्रे बांधली. ओक्याबोक्या किमांशमध्ये शिरपेच खोवला. कुलीखानाने बादशहासमोर गुडघे टेकून लीनतेने सन्मानाचा स्वीकार केला.
वजीर जाफरखानाने इशाऱ्यानेच त्याला तसाच राहण्याची खूण केली आणि त्याला पाचहजारी मनसब बहाल केल्याचा हुकूम वाचून दाखविला. त्याला महाबतखानाचा नायब घोषित करण्यात आले. त्याशिवाय त्याच्या निसबतीत दिलेल्या प्रमुख सरदारांची नावे दरबारात वाचून दाखविण्यात आली. त्यानंतर सरहिंद आणि पेशावरचा पाच लाख अश्रफी वसुलाचा प्रदेश जहागिरी म्हणून दिल्याची घोषणा वजिराने केली. जहागिरीच्या सनदेचा स्वीकार त्याने पुन्हा गुडघे टेकून केला. सनद डोक्यावर धरून तो उभा राहिला. एक लाख अश्रफी इनाम म्हणून, तर एक लाख अश्रफी खर्चासाठी उचल म्हणून शाही खजिन्यातून मंजूर करण्यात आल्या. त्याला कुटुंबासह राहण्यासाठी शिकारपूर येथे एक नवी हवेली आलाहजरतांच्या वतीने बतौर तोहफा बहाल करण्यात आली. सरतेशेवटी भल्या मोठ्या सोन्याच्या थाळीतून सोन्याच्या जरीने कलाबतूचे भरगच्च काम केलेली मखमली खिलत बादशहाने स्पर्श करून पाठविली. सर्वोच्च सन्मानाचे प्रतीक असलेली ती खिलत गुडघे टेकलेल्या कुलीखानाच्या अंगावर चढविण्यात आली. त्याबरोबर काही क्षण दरबारात मुबारकबादचे आवाज घुमले. मग दरबारी चोपदाराने मोठ्या सन्मानाने पाचहजारी मनसबदारांच्या रांगेत त्याच्या जागेवर नेऊन त्याला उभे केले. दरबाराची पुढची कारवाई सुरू झाली.
कुलीखानाने मोठ्या धीराने सारा प्रसंग निभावला. पण त्याच्या हातापायांना कंप सुटला होता. तळवे घामाने चिंब झाले होते. वातावरण थंड असूनसुद्धा कपाळावर घाम चमकू लागला. कारण त्याचा वरिष्ठ जसा खानदानी मुसलमान होता तसेच त्याचे सारे दुय्यम सरदारसुद्धा खानदानी मुसलमानच दिले गेले होते. एकही राजपूत, जाट वा बुंदेला त्याच्या आसपास राहणार नाही याची अगदी बारकाईने काळजी घेतली गेली होती. यातला आलमगिरी कावा लक्षात यायला त्याला वेळ लागला नाही. खालमानेनेच त्याने आपल्याभोवती उभ्या असलेल्या दरबारी उमरावांवर नजर फिरविली. सगळे एकजात मुसलमान! दरबारातसुद्धा त्याचा कोणा हिंदूशी यत्किंचितही संपर्क येणार नाही याची काटेकोर काळजी घेतली गेली असल्याचे त्याच्या लक्षात आले. जहागीर फरमावली गेली तीसुद्धा सरहिंद आणि पेशावरसारख्या स्वराज्यापासून अतिदूरच्या प्रदेशातील. म्हणजे स्वराज्याचा, महाराजांचा वारासुद्धा लागू नये याचा अगदी चोख बंदोबस्त करण्यात आला होता. त्याच्या पायाखालची जणू जमीनच सरकली. त्याला काही सुचेनासे झाले. हंबरडा फोडून मोठ्याने रडावे असे त्याला वाटू लागले. दरबारात काय चालू आहे त्याला कशाचाच अर्थबोध होत नव्हता. भोवतालचे सारे कुर्निसात करण्यासाठी वाकले. त्या हालचालींनी तो भानावर आला आणि घाईगर्दीने खाली वाकला. बादशहा दरबारातून उठून जात होता.
एकेक दरबारी हळूहळू बाहेर पडू लागला पण कुलीखान दगडी पुतळ्यासारखा तसाच निश्चल उभा होता. दरबारी चोपदार त्याच्या जवळ येऊन अदबीने हाका मारू लागला तेव्हा तो भानावर आला. सर्वांना वाटत होते अत्यंत दुर्मीळ असा सत्कार आणि मरातब लाभल्यामुळे तो भारावून गेला असावा.
हुजूर, यानंतर दिवाण-ए-खासमध्ये दरबार होईल. त्या दरबारात हजर होण्याचा सन्मान आता आपल्याला लाभला आहे. त्या दरबारात आपल्याला नेण्यासाठी मी आलो आहे. या बाजूने चलावे.
काष्ठपुतळीसारख्या, यंत्रवत हालचाली करीत कुलीखान चोपदाराच्या मागोमाग दिवाण-ए-खासकडे निघाला. त्या दरबारात आता अजून काय वाढून ठेवले आहे ईश्वर जाणे.
दिवाण-ए-खासच्या वाटेवर असतानासुद्धा त्याच्याभोवतीचा शिपायांचा गराडा तसाच होता. मात्र काही घटकांपूर्वी भाल्याची टोके रोखलेली होती, ती आता अस्मानाकडे वळली होती. नंग्या तलवारी म्यान झाल्या होत्या. वाटेने अनेक दरबारी मानकरी घोळक्याघोळक्याने उभे असलेले भेटत होते. बऱ्याच नजरांमध्ये औत्सुक्य दिसत होते, तर कित्येक नजरांतून असूया ठिबकत होती. तिरस्काराच्या नजरासुद्धा मोठ्या संख्येने दिसत होत्या. त्या जशा हिंदू दरबाऱ्यांच्या होत्या तशाच अनेक मुसलमानांच्यासुद्धा होत्या. पूर्वी दख्खनमध्ये मराठ्यांचा मार खाल्लेल्यांच्या नजरेमधील ‘भली जिरली’ हा भाव लपून राहू शकत नव्हता. एके ठिकाणी राजपूत मानकऱ्यांच्या घोळक्यात मिर्झाराजांची मुले आणि सरदार उभे होते. ते त्याच्याकडे सखेद आश्चर्याने पाहत होते. पण पुढे होऊन चार शब्द बोलण्याचा धीर कोणालाच झाला नाही. कुलीखानानेसुद्धा त्यांच्याशी बोलून वा अभिवादन करून किंवा ओळखल्याचे स्मित करून त्यांच्यासाठी तसेच स्वत:साठी त्रास निर्माण करून घेतला नाही. सर्व प्रकारच्या नजरांचा सामना करीत करीत तो दिवाण-ए-खासच्या बागेत पोहोचला. बागेत एका चमेलीच्या मांडवाखाली मुस्लीम मानकऱ्यांसाठी फराळाची आणि सरबताची व्यवस्था होती. तिकडे न वळता तो एका बाजूला डेरेदार झाडाच्या सावलीत उभा राहिला.
चमेलीच्या मांडवाखालून सिद्दी फुलादखान त्याला सामोरा आला. तोंडभर हसत त्याने मोठ्या गर्मजोशीने सलाम बजावला. रिवाज म्हणून त्याने सलामाचा जबाब दिला पण कपाळावर उठलेली आठी आणि मुद्रेवरचा तिरस्कार लपून राहू शकला नाही. त्याकडे दुर्लक्ष करीत त्याचे दोन्ही हात हातात घेऊन फुलादखान मोठ्या उत्साहात म्हणाला–
मरहब्बा! खुशामदीन! अमा जनाब, इतनी भी क्या बेरुखी? आमच्याकडून थोडी सख्ती झाली. मान्य. पण आमची मजबुरीसुद्धा समजून घ्या. आम्ही शाही हुकमाचे बंदे गुलाम. तुम्हीसुद्धा जरा लवकर कबूल झाला असतात तर आम्ही तरी कशाला त्रास दिला असता. अमा खैर छोडो. बीत गई सो बात गई। आता तुम्ही आमचे झालात. हम राह, हम इमान, हम जिगर। तुमच्यासाठी आमचा दिल साफ होता आणि राहील; त्यामुळेच आमच्या दोस्तीचा पैगाम म्हणून आलाहजरतांचा सदका उतरण्यासाठी आम्ही आमच्याकडून तुम्हाला रक्कम पाठवली. तुम्ही तिचा स्वीकार केलात, आम्ही तहे दिलसे तुमचे शुक्रगुजार आहोत. इन्शाल्लाह! ही दोस्ती ता कयामत अशीच कायम राहो अशी मी दुआ करतो.
कुठलीही प्रतिक्रिया न दर्शविता कुलीखान स्वस्थ उभा राहिला. मग फुलादखानच गडगडाटी हसत पुन्हा म्हणाला–
अमा यार, अशी दुआ प्रकट केल्यानंतर ‘आमीन’ असे म्हणायचे असते. आता तुम्हाला ती सवय करून घ्यायला पाहिजे.
आमीन
कुलीखान तोंडातल्या तोंडात पुटपुटला. फुलादखान गडगडाटी हसला. चमेलीच्या मांडवाखालूनसुद्धा हास्याचा मोठा फवारा उठला.
चला चला, या दोस्तीवर पेशावरी कबाब, काबुली चणे आणि त्याच्या जोडीला खास इस्तंबूलवरून मागवलेल्या अनारच्या सरबताचे शिक्कामोर्तब होऊन जाऊ देत.
फुलादखान कुलीखानाच्या हातांना धरून मोठ्या फुर्तीने चमेलीच्या मांडवात घेऊन गेला. तिथे खाण्या-पिण्याची मोठी चंगळ उडाली होती. बलुची वेषातील एक सुंदर दासी कुठल्याशा तंतुवाद्यावर काहीतरी संगीत छेडत होती. एक खोजा ढोलकीवर हलका ठेका धरून तिला साथ देत होता. संगीताचे दर्दी म्हणविणाऱ्यांचा एक घोळका त्यांच्याभोवती उभा होता. त्यात संगीताची ओढ किती आणि त्या दासीच्या सौंदर्याची किती हे एक खुदाच जाण! पान-तंबाखूने रंगलेले दात विचकत घोड्याच्या खिंकाळण्यासारखे हसत एक अमीर लाचार हसत पुढे आला. त्याच्या पेहरावावरून तो सरहिंद भागातील असावा असा अंदाज करता येत होता. लघळपणे हसत तो म्हणाला–
सलाम अलेकुम हुजुरे आली। बंद्याला नन्हेखान म्हणतात. गुलामाला हुजुरांचीच निसबत फरमावली गेली आहे. वास्तविक आलाहजरतांना गाण्या-बजावण्याची सख्त नफरत आहे हे तर कायनात जाणते. पण आज खास दिवस आहे आणि फक्त अल्लाची इबादत करणारी गाणीच वाजवायची या अटीवर आलाहजरतांनी इजाजत दिली आहे. हे पाखरू हुजुरे आलींच्या जहागिरीतून खास आणलेले आहे. हा तर नुसता मासला आहे. आपल्या मुलखात यापेक्षा वरचढ एकापेक्षा एक हसीन पऱ्या भेटतात. हुजुरे आलींची नुसती चंगळ आहे. वहाव्वा! वहाव्वा!!
कुलीखानाच्या नजरेतील तिरस्कार एवढा टोकदार होता की, त्या उमरावाचे पुढचे शब्द तर घशात जिरलेच पण अन्य कोणा दुसऱ्याचे असे काही बाष्कळ बोलण्याची हिंमत झाली नाही. फुलादखान आणि त्याच्या बरोबरचे काही उमराव आग्रह करकरून त्याला खाऊपिऊ घालू लागले. परजातीच्या लोकांच्या घोळक्यात पायात जोडे तसेच ठेवून उभ्या उभ्या काही अरबट चरबट खाण्याची त्याच्या आयुष्यातील ती पहिलीच वेळ होती. तोंडातला घास ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा