_⚔🚩⚔📜🚩___
नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔
अग्निदिव्य
लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार
__📜⚔🗡भाग - 2⃣3⃣⚔🚩🗡___

वर्दी न पाठविता महाराज पाचाडाच्या वाड्यात आले. दासी-कुळंबिणी आणि शागिर्द-हुजऱ्यांची धावपळ उडाली. मुजरे घेत महाराज थेट आईसाहेबांच्या महालात पोहोचले. बंद कवाडाआड माय-लेक एकांतात बराच काळ काही बोलत बसले. नंतर उठून महाराज माडीवर त्यांच्या खासगी दालनात गेले. त्यांनी बहिर्जीला बोलावून घेतले. बहिर्जीने येऊन सवयीप्रमाणे दाराला अडसर घातला आणि मुजरा करून उभा राहिला. खिडकीशी उभे महाराज दूरवरची दरी न्याहाळत होते. अशा परिस्थितीत अनिश्चित वेळेपर्यंत स्वस्थ उभे राहून वाट पाहण्याची बहिर्जीने सवय लावून घेतली होती. खोल उसासा सोडून महाराज आत वळले. खिडकीखालीच मांडलेल्या एका घडवंचीवर ते टेकले. त्यांनी खूण करून बहिर्जीला जवळ येऊन बसण्याचा इशारा केला. तो पुढे येऊन अदब राखून भुईवर पायांशीच बसला.
तर नाईक, अशी सुरू आहे नेताजीकाकांची फरफट. आलमगिराने बंदोबस्त एवढा चोख ठेवलेला दिसतोय की, माणूस घुसवणे दुरापास्तच व्हावे. आता कसे करावे?
म्हाराज, सरनोबतांच्या आदबखान्यातल्या पहाऱ्यावर घुसवलेला आपला मानूस आग्र्यातच हाई. आता त्येला त्येंच्या शागिर्दपेशात घुसवायची खटपट सुरू हाय. बेट्यानं तवा फटकं खाल्लं पर फुलादखानाची अक्षी मर्जी मिळवलिया. सरनोबत झोपंत काय-बाय बरळतात ह्ये त्येनं सिद्द्याच्या मनात पार ठसवलया. आपल्याला मराठी येतं म्हणून त्येंचं बोलनं ऐकून फोडू शकतो ह्ये बी त्येनं सिद्द्याच्या गळी उतरवलया. पर आज तरी तो येकलाच हाय. मध्यात जी मानसं मारली ग्येली त्यापाई साखळी अस्ताव्यस्त झालिया. पर हुईल समदं बैजावार. चिंता नगं. मात्र म्हाराज, येकडाव का सरनोबत फौजंत मोहीमनशीन झालं, आन दिल्लीवरून फुडं सरकलं की संपर्क राखनं लई अवघाड; अशक्यच म्हना ना. आपली चार-दोन इस्वासाची मानसं प्येरली तरी त्येंच्याकडून खबरा याव्यात कशा? आन त्येंना हुकूम धाडावे कशे? आताच्या परिस्थितीत सरनोबतांचा कितपत भरवसा धरावा ह्यो सवाल बी उरतोच. उद्या त्येंनीच आपली मानसं पकडून दिली तर? बिचारी मरायची हकनाक.
का? अशी शंका येण्याजोगे काही घडले का? असा काही अनुभव?
नाय नाय. मी तथं व्हतो तवर तरी न्हाई आला. पर बाच्छावानं त्येंच्यावर मेहेरबानीची अशी काय बरसात चालवलिया की कोनी बी पाघळावा. त्येनं आपल्या मामाची अन् मावशाची नाराजगी न जुमानता त्येंच्या जनानखान्यातली पोरगी बी त्येंना बाईल करून दिली. लई मोटी हवेली इनाम करून दिली. अजून काय पायजे?
आजवरची सारी उमर घोड्याच्या पाठीवर आनि रांगड्या मावळ्यांच्या कोंडाळ्यात घालवलेला ह्यो गडी आज गुलजार बायांच्या गोतावळ्यात गाद्यागिरद्यांवर लोळतोया. पुलाव, कुर्मे कोफ्ते हानत चैन करतोया… मंग बुद्धी चळाया कुठला उशीर वो? ह्यो आपला आमचा आडाणी मराठमोळा आडाखा. आपल्या कानी असावा म्हनून सांगितला येवडंच.
तुमचा तर्क अगदी रास्त आहे. आम्हा खालोखाल मोरोपंतांच्या बरोबरीने स्वराज्याची खडान्खडा माहिती त्यांनाच आहे. कित्येकदा छळाने न बधणारा मर्दगडी मोहाला बळी पडल्याशिवाय राहत नाही, हे तुरुक चांगले जाणतात. आलमगिराचा पणजा अकबराने हीच नीती वापरून राजपुतांना अंकित करून घेतले. नेताजीकाकांना पोरगी देऊन आलमगिराने आपल्या मनसुब्याची चुणूक दाखवली आहे. आता तो हळूहळू आपल्या हस्तकांमार्फत त्यांना मोगली व्यसनांमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही; त्यामुळे तर आता त्यांच्यावर बारीक नजर ठेवणे जास्तच अगत्याचे झाले आहे. आधी सुरू असलेल्या सिलसिल्याप्रमाणेच त्यांना आपल्या माणसांचे अस्तित्व जाणवू देत. यात दोन गोष्टी साधता येतील. पहिली म्हणजे जर त्यांच्या मनात स्वराज्य आणि आमच्याप्रति निष्ठा अन् प्रेम शिल्लक असेल तर आपली माणसे भोवताली असल्याने त्यांना एकलेपणा घेरणार नाही; त्यामुळे त्यांची निष्ठा टिकून राहण्यास मदत होईल. दुसरे असे की, जर ते मोहाच्या मार्गावर वळू पाहतील तर एवढ्या दूरवर आणि गनिमाच्या ऐन गोटात आपण आपली माणसे घुसवू शकतो. त्यांच्याभोवती ठेवू शकतो याचा धाक आणि वचक त्यांना काही गोष्टी करण्यापासून निश्चितच रोखू शकेल.
अभय असंल तर एक मसलत सुचवावी वाटते.
किंचित हसून महाराज म्हणाले–
काही थोडके आमच्या ध्यानी येतेय, पण बोला. तुम्ही काय मनसुबा धरून आहात, स्पष्ट बोला.
शब्दांची जुळवाजुळव करीत बहिर्जी काही वेळ बसून राहिला. आपल्या गहिऱ्या नजरेने महाराज त्याचा ठाव घेण्याचा प्रयत्न करीत राहिले. बऱ्याच वेळाने चोरटी नजर वर करीत किंचित चाचरत बहिर्जी म्हणाला–
अं… म्हाराज… अं… आता सरनोबत, म्हन्जे अजून आमच्या तोंडी त्येच बसलया, पर अं… आता त्ये गनिमाला मिळालं. मुसलमान बी जालं… अं… म्हन्जे अगदी पूर्णच गनीम जालं म्हनायचं. अं… मंग… अं… गनिमाला गनिमाच्या भाष्येत, गनिमाच्या रीतीनंच वागवलं तर… हाताळलं तर…?
बोला, तुम्हाला काय वाटते स्पष्ट करा. मनात किंतू राहू देऊ नका.
बहिर्जीची जीभ पुढे बोलायला रेटेना. काही वेळ तो अस्वस्थ चाळे करीत राहिला. माणूस कडू औषध जसे एकाच मोठ्या घोटात संपवून टाकतो तसा तो पटकन बोलला–
म्हन्जे मला असं म्हनायचंया म्हाराज की, सोराज्याला तर आता लयच मोटा धोका निर्मान झालाया. तवा हा सवाल एका झटक्यासरशी संपवून टाकला तर?… गनिमाला त्येच्याच पद्धतीनं शेह दिला त?… म्हन्जे… अं… गनीम झालेल्या सरनोबतांनाच संपवून टाकलं त?
बहिर्जीच्या मनात काय असावे याचा महाराजांना अंदाज आला असला तरी त्याच्या तोंडून ते भयंकर शब्द बाहेर पडताच महाराज दचकले. त्यांचे सर्वांग घामाने डवरून आले. त्यांनी आपले विशाल नेत्र झाकून घेतले. मनात विचार उचंबळले–
‘आमच्या एका शब्दाखातर हे दिव्य करायला निघालेल्या आणि आमच्याच शब्दाखातर जीव वाचवून मुसलमान झालेल्या आमच्याच जिवलगाला संपवून टाकायचे? काय सांगतोय हा बहिर्जी? अरे! जर अखेर हेच करायचे होते तर बिचारे धर्मवीर म्हणून तरी मरते. आम्हीच त्यांचा तो सन्मान हिरावून घेतला ना? जगदंब! जगदंब!! जगदंब!!! आई, काय ही परीक्षेची घडी समोर आणलीस? ज्या शक्यतेचा विचार संशयखोर म्हणून बदनाम असलेला आलमगीर करू शकतो ती शक्यता जिवाला जीव देणारे सवंगडी, समविचारी म्हणवणारी मुत्सद्दी, राजकारणी म्हणवणारी आमची स्वत:चीच माणसे करू शकत नाहीत. केवढे हे दुर्दैव! याचा अर्थ स्पष्ट आहे, आमच्या शत्रूने आम्हाला जेवढे ओळखले आहे तेवढे स्वकीयांनी-आप्तांनी जाणलेले नाही. आमच्याबद्दल आणि आमच्या खास विश्वासू माणसांबद्दल जी खात्री आलमगिरास वाटते, त्याचा संशयसुद्धा आमच्या माणसांना येऊ नये? आश्चर्य! तेसुद्धा आम्ही आरंभापासूनच आमची माणसे नेताजीकाकांच्या भोवती ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असल्याचे उघड झाल्यानंतरसुद्धा? महदाश्चर्य! स्वराज्य माते, केवढे तुझे हे दुर्दैव. संशयाला पुष्टी देणारा एक जरी धागा आलमगिरास गवसता तर आपण कधी आणि कसे मारले गेलो हे नेताजीकाकांना समजणारसुद्धा नाही. आम्हाला पुरता ओळखून असणारा बादशहा कितीही गमजा आणि गर्जना करो, तो आमच्या हयातीत कधीच स्वत: स्वराज्यावर चालून येणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ. मात्र आम्ही दुर्दैवाने त्याच्या आधी गेलो तर… तर तो ताबडतोब जातीनिशी चालून येईल आणि स्वराज्याचा घास घेण्याचा आटोकाट प्रयत्न करील. स्वत:चे उर्वरित आयुष्य याच एका कामासाठी वेचेल पण रिकाम्या हातांनी दिल्लीस परत जाणार नाही…’
म्हाराज…
हलक्या आवाजातल्या बहिर्जीच्या हाकेने महाराज भानावर आले.
नाही. बहिर्जी नाही. असा विचारसुद्धा कदापि मनात आणू नका. तुम्हाला खंडोबाची आण. कधी तुम्हाला विपरीत अनुभव आला किंवा तशीच काही संशय उत्पन्न करणारी खबर मिळाली तरी तीन-तीनदा वाजवून खात्री करून घ्या. कोणत्याही परिस्थितीत दस्तूरखुद्द आमच्या स्पष्ट आज्ञेशिवाय नेताजीकाकांच्या जिवाला अपाय होता कामा नये. तद्वतच आपल्या कोणत्याही माणसाच्या बोलण्यातून किंवा हालचालीतून आलमगिराने मनात धरून ठेवलेल्या संशयाला थोडा जरी आधार गवसला आणि त्याने नेताजीकाकांना दगा केला तर मुलाहिजा राखला जाणार नाही. याद राखून ठेवा…
म्हन्जी म्हाराज…
चूप… याचा उच्चार मनातल्या मनातसुद्धा होता कामा नये. गर्दन छाटली जाईल.
नकळत महाराजांचा चढा आणि करडा स्वर उमटला. बहिर्जीने शब्दच नव्हे तर विचारसुद्धा गिळून टाकले. महाराजांशी पूर्णांशाने एकरूप झालेल्या त्या इमानी सेवकाला जे उमगायचे ते उमगले होते. अस्वस्थ शांततेत दोघेही बराच वेळ गप्प बसून होते. वाघासारख्या येरझारा घालणारे महाराज पुन्हा थबकून खिडकीखालच्या घडवंचीवर बसले. बहिर्जी हळूच पुटपुटला…
म्हाराज…
अं?
म्हाराज, आनिक येक खबर हाये. पर सरनोबतांच्या वार्तेनं आपन इतके अस्वस्थ झालता की द्याची राहून ग्येली.
बोला.
म्हाराज, चंदरराय बुंदेला तर ठावकी हायच. बाच्छावानं गादी बळकावण्यासाटी त्येची मदत घ्येतली आन मतलब सादल्यावर मातर दगा करूनशान त्येला पार बुडविला. त्याची बाईल सती ग्येली. पाच पोरं उघडी पडली.
त्याचे काय?
त्येचा योक ल्योक हाये. छत्रसाल नावाचा…
नाईक प्रतिष्ठितांचा आणि वीरांचा उल्लेख सन्मानाने करण्याची रीत कधीपासून विसरलात?
मापी मायबाप. गलती जाली. कुंवर छत्रसाल लय तेज आन स्वाभिमानी हायती. मिर्जाराजांच्या पदरी व्हते. पुरंदराच्या येड्यात वङ्कागड घेताना जे राजपूत झुंजले, त्यात त्यांनी बी मोटी चमक दावली व्हती.
होय, आठवले. मिर्झाराजांच्या छावणीत आम्ही असताना हा तरुण बुंदेला वीर आम्हास भेटण्यासाठी आला होता. त्याचे काय?
मिर्झाराजांच्या नंतर त्ये दिलेरखानाच्या निसबतीत ऱ्हायले. गोंड राजाइरुध बा त्येंनी मोटी समशेर गाजवली. तरी त्येंचं चीज झालं न्हाय. त्यापाई आधीपासूनच उरात ठरून ठेवल्येली खुद्दारी पुन्यांदा पेटून उटली. आपल्या माय-बापांचा खुनी, कुटुंबाचा पार इस्कोट करनारा ह्यो बाच्छा आन त्येचीच चाकरी आपुन करतुया? शरम वाटाया लागली. काळजात सुडाची आग पेटली. आता त्येंना आपल्या पदरी ऱ्हाऊन काई कर्तब दावण्याची, देवा-धर्मा-देशासाठी कायतरी करन्याची इच्छा हाये.
अरे वा! छान. मग पुढे?
हाली कुं वरजी बहादुरखान कोकलताशच्या निसबतीत हायती. त्येला दख्खनच्या मोहिमेचा हुकूम झालाया आनि त्यो सोराज्यावर चालून निघालाया ह्ये समदं तर सरकारात रुजू हायेच. कुंवर साहेबास आपली रजामंदी कळवता आली त त्ये संधी गावताच पायाशी दाखल व्हतील.
मंजूर. मात्र खबर या कानाची त्या कानाला लागता कामा नये. नाहीतर प्रज्वलित होण्याआधीच बादशहा ठिणगी चिरडून टाकील. ठीक. आता इतक्या दिवसांनी मुलखात आलात. उद्या सकाळीच निघा. चार दिवस बायका-पोरांत राहा. मात्र फार रेंगाळू नका. आग्रा-दिल्लीत चक्कर मारून काही साधते का पाहा. पण गुंतून पडू नका. पुढच्या हालचाली येथूनच भरवशाच्या माणसांकरवी करवता येतील. मघाशी मनात येऊन गेलेले विचार स्वत:च्या मनाशीसुद्धा बोलू नका. कधीतरी घात व्हायचा. या आता.
मुजरा करून बहिर्जी निघून गेला. खिडकीतून दिसणारी दूरवरची डोंगरशिखरे आणि आभाळ निरखत महाराज विचारात गढून गेले.
दिवाण-ए-खासनंतर घुसलखानाच्या दरबारातसुद्धा कुलीखानाचा सत्कार झाला. एकूणच सत्कार आणि कौतुकाने बादशहाने त्याला नुसते गुदमरून सोडले; मोगली सामर्थ्याच्या आणि वैभवाच्या प्रदर्शनाने त्याला अगदी दिपवून टाकले असावे अशी मोगली सरदार आणि मुत्सद्दीच नव्हे तर वजीर आणि खुद्द बादशहाचीसुद्धा खात्री पटली. त्यांची जणू खात्रीच पटली की, मूर्ख शिवाच्या नादाला लागून आजवरची कर्तबगारी फुकट घालविल्याचा त्याला नक्कीच पश्चात्ताप होत असेल.
अत्यंत सन्मानपूर्वक पण कडक बंदोबस्तात कुलीखानाला जाफरखानाच्या जनानखान्यात परत नेण्यात आले. आता तो कैदी नव्हता तर आलाहजरतांच्या खास मर्जीतला मनसबदार होता. वजिराचा सन्माननीय पाहुणा आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे आज रात्री होणाऱ्या निकाहचा दुल्हेमियाँ होता. इतमाम वाढला होता हे निश्चित पण भोवतालचा बंदोबस्त तसाच चोख आणि कडक राहिला. रोखलेल्या नजरा आणि तलवारी तशाच, फक्त गुर्मीची जागा अदबीने घेतली एवढाच फरक; या सगळ्या कोडकौतुकात त्याचे स्वत:चे चित्त मात्र थाऱ्यावर नव्हते. परत येताच त्याने स्वत:ला कमऱ्यात कोंडून घेतले. सह्याद्रीतील कडेकपारीतील वाघाच्या काळजाचा, बुलंद किल्ल्याच्या अभेद्य बुरुजासारखा तो मराठा गडी पलंगावर पालथा पडून, उशीत तोंड लपवून कितीतरी वेळ ओक्साबोक्शी रडत राहिला. दुल्हेमियाँला समजविण्यासाठी बांदी-बटकींनी दरवाजा वाजवत, बराच कलकलाट केला तेव्हा कोठे तो मोठ्या मुश्किलीने उठला आणि तोंडावर पाण्याचा हबका मारून त्याने कवाड उघडले.
रात्री मोठ्या थाटामाटात निकाह पार पडला. आता बादशहाच्या वतीने झालेला निकाह म्हटल्यावर वैभवात आणि डामडौलात कोणतेही उणे नसणार हे वेगळे सांगणे नको. आपल्या उरावर बसणारी एक सवत लाडक्या भाच्याने कमी केली या गोष्टीचा वजिराच्या बेगमेला मोठा आनंद झाला होता; त्यामुळे ती कुलीखानावरसुद्धा निहायत खूश होती. तिने आणि सोबत इतर बेगमांनी त्या निकाहमध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला. गेले काही महिने जनानखान्यात वास्तव्य राहिल्याने आणि त्या काळातील त्याच्या अत्यंत सभ्य, सुसंस्कृत वासनारहित वागण्यामुळे जनानखान्यातील समस्त सेवकवर्गाला त्याच्याविषयी आदर आणि आत्मीयता वाटू लागली होती. त्या लोकांच्या निरपेक्ष सेवेमुळे त्याला जवळपास पुनर्जन्म मिळून तो पुन्हा माणसात येऊ शकला होता. त्याची हरहमेश जाण ठेवूनच तो त्यांच्याशी वागत असे. कदाचित म्हणूनसुद्धा असेल पण त्यांच्यात काही एक वेगळेच ऋणानुबंध तयार झाले होते; त्यामुळे त्यांचा सहभागसुद्धा मोठा उत्साहपूर्ण होता. नवरीचा पालक म्हणून वजिरानेसुद्धा हात सैल सोडला होता. दहेज वगैरे देण्यात कोणतीच कोताही केली नाही. त्याने नवरीसोबत दागदागिने, कपडेलत्ते आणि इतर साजोसामान अगदी मनमोकळेपणाने दिले. बादशहाच्या कृपेने दुल्हेमियाँच्या कनवटीलासुद्धा आता चार पैसे आले होते. त्याची सेवा करणाऱ्या बांदी-बटकी आणि खोजांना त्याने भरपूर इनामे दिली गेली.
दस्तूरखुद्द बादशहाने नवरा-नवरीसाठी भारी अहेर पाठविला होता. मीर बक्षी बादशहाच्या वतीने पूर्णवेळ हजर होताच. एवढेच नव्हे तर प्रत्येक रस्मोरिवाजात त्याने घरातील वडीलधाऱ्याचा असावा तसा सहभाग ठेवला. आल्या-गेल्या पाहुण्यांच्या सरबराईकडे तो जातीने लक्ष देत होता. बादशहाने नवरीसाठी खास आणि अगदी विशेष तोहफा पाठविला होता. तो म्हणजे त्याने तिला नवे नाव बहाल केले होते– ‘नूर बानू’ म्हणजे तेजस्विनी.
आई-बाप, जमात यांच्यापासून तोडून, जन्मभूमीपासून पळवून परदेशात एवढ्या लांबवर आणलेल्या त्या अनाथ पोरीचे तर जणू भाग्यच उजळले. वासनेने वखवखलेल्या लांडग्यांच्या या जगात आपल्या आयुष्याचे आणि अब्रूचे आता पार धिंडवडे निघणार या भीतीने धास्तावलेली ती पोर, आपल्याला मालक म्हणवणारे एखादे जनावर नव्हे तर हक्काचा पती मिळाला, घर मिळाले; संसार मिळाला या आनंदात पार सुखावून गेली.
निकाहनंतर नूर बानूला घेऊन कुलीखान मीर बक्षीच्या एका आरामगाहमध्ये पाहुणचार घेत राहिला. वैभवाची, अय्याशीची, कोणताही शौक पुरा करण्याची सारी साधने भोवताली हात जोडून उभी होती. पण कडक पहारा आणि सख्त नजरा क्षणभरसुद्धा सैलावत नव्हत्या. आता सहजासहजी आणि निकटच्या भविष्यात तरी आपली सुटका नाही याची हळूहळू त्याला खात्री पटू लागली.
मीर बक्षीचा पाहुणचार घेऊन तो त्याला बहाल केलेल्या नबाब दिलावरखानाच्या हवेलीत राहण्यासाठी गेला. त्याला वाटले, आता स्वत:च्या घरात राहताना तरी मोकळा श्वास मिळेल. पण हाय रे दैवा! त्याने जसा अंत:पुरात पाय ठेवला, तशी वजीर जाफरखानाच्या जनानखान्याची नायब दरोगा असलेली तार्तर बाई कुर्निसात घालत सामोरी आली.
खुशामदीन हुजुरे आली. नव्या महालात आपला इस्तकबाल करताना या नाचीज बांदीला मनस्वी आनंद होत आहे. आलाहजरत जिल्हेसुभानींच्या खास हुकमावरून हुजूर सलामतांच्या हरमचा जिम्मा या नाचीजवर वजीरेआझम हुजुरांनी सोपवला आहे. कनीजने आपल्या जनानखान्याची मुख्य दरोगा म्हणून हुजुरे आलींच्या गैरहाजिरीत त्यांचा हरम जिवाच्या कराराने सांभाळला आणि यानंतरसुद्धा हुजुरे आली जेव्हा मोहिमेवर वा शाही कामगिरीवर असतील तेव्हा तसाच सांभाळला जाईल. हुजुरांनी निर्घोर राहावे. दख्खनमधून आलेल्या काही गुस्ताख मरगट्ट्यांनी आपल्या पुरान्या बेगमांशी नापाक आणि नाजायज संबंध बांधण्याची नाकाम कोशिश करून पाहिली. बिचारे हकनाक मारले गेले. त्या नादान बेवकूफ मराठ्यांची फूस मिळाल्याने तुळसा नावाची आपली एक बाईल इस्लाम कबूल करण्यास शेवटपर्यंत तयार झाली नाही. शेवटी नाइलाज झाला म्हणून शाही हुकमाने तिला दोजखमध्ये हाकलून दिले गेले. काफिर हिंदू दोजखच्या आगीत मुर्दा फेकतात. तिला मात्र दोजखच्या आगीने जिवंतपणीच आपल्या आगोशमध्ये घेतले. हुजुरे आली जोपर्यंत ही नाचीज आपल्या सेवेत आहे, तोपर्यंत आपला जनानखाना संपूर्ण सुखरूप आणि चोख बंदोबस्तात असेल याची खात्री बाळगावी.
आपल्या कंबरेच्या दुशेल्यातून एक थैली काढून त्याने दरोग्याच्या दिशेने फेकली आणि तो तडक आत चालता झाला. त्याचे डोके भणाणून गेले. याचा अर्थ स्पष्ट होता, नजरकैद कायम होती. हरामखोर बादशहाने त्याच्या एका धर्मनिष्ठ बायकोला मारून टाकले होते. अजून पुढे काय काय वाढून ठेवले आहे, आई जगदंबाच जाणे. धडधडत्या छातीनेच त्याने आत प्रवेश केला.
त्याची आणि त्याच्या जुन्या बायकांची अन् बाकी कुटुंबाची भेट झाली. आक्रोश आणि आक्रंदनाचा एकच आगडोंब उसळला. एकमेकांच्या गळ्यात पडून सगळ्यांनी बराच वेळ रडून घेतले. दु:खाचा पहिला भर ओसरल्यावर त्याच्या बायकांनी आणि कोंडाजीने त्याला महाराजांना सोडून मोगलांकडे आल्याबद्दल, स्वत: धर्म बुडवून त्यांना धर्म बुडविण्यास भाग पाडल्याबद्दल यथेच्छ शिव्याशाप दिले. निमूटपणे ते ऐकून घेण्याशिवाय अन्य पर्यायच नव्हता. त्यांना द्यायला त्याच्याकडे उत्तर नव्हते आणि सांत्वन करण्यासाठी शब्दही नव्हते. ते स्वातंत्र्यसुद्धा कोठे उरले होते? कारण त्याच्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द बादशहापर्यंत पोहोचू शकत होता. पराचा कावळा होण्यास वेळ लागणार नव्हता याची त्याला पूर्ण जाणीव होती. ऐरणीने छातीवर पडणारे घणाचे घाव आणि वर धरलेल्या तापल्या लोखंडाचे चटके फक्त सोसायचे असतात; ते मोजण्याचे स्वातंत्र्यसुद्धा ऐरणीला नसते.
कुलीखानाला जुम्म्याचा नमाज बादशहासोबत मोती मशिदीत पढण्याचा सन्मान मिळाला. तो शाबान महिन्याचा शेवटचा जुम्मा होता. येणाऱ्या चाँदरातीपासून रमजानचे रोजे चालू होणार होते. रोजे संपले की शव्वाल महिन्याचा पहिला दिवस ईद. पोरांपासून थोरांपर्यंत चर्चा होती, रोजे आणि ईद यांचीच! नमाजानंतरची बादशहाची बैठक सुरू होती. डोके आणि मिश्या सफाचट केलेला, फेंदारलेली दाढी मेंदीने रंगवून मिरविणारा कोणी एक मौलवी बादशहासमोर पेश केला गेला होता. कुलीखानाचे अर्धे लक्ष बैठकीत, तर अर्धे जुन्या आठवणींत होते. त्याच्या डोळ्यांसमोर जोखडात जखडलेला, साखळ्या काढण्यांनी जखडलेला नेताजी तरळत होता. अचानक त्याच्या नावाचा पुकारा झाला आणि तो भानावर आला. कुर्निसात घालीत तो बादशहाला सामोरा गेला. दरबारी अदब सांभाळत हात बांधून तो उभा राहिला. हिरवी नजर त्याच्यावर स्थिरावली.
किन खयालों में खोये थे महम्मद कुलीखान?
पुरानी यादें अन्नदाता. अशाच एका जुम्म्याच्या अंजुमनमध्ये आलाहजरतांनी नाचीजवर नजरे इनायत फरमावली होती. त्याची आठवण येत होती.
मनातला कुफ्र पूर्ण नष्ट करायचा असेल तर जहनममध्ये काफिरानी यादें खोल दफन करून टाकायच्या. त्या परत वर सतहपर येता कामा नये. सैतान असे कारनामे करीत राहणारच. त्याची हरकत नाकामयाब करणे हीच खरी इबादत.
बादशहाच्या इशाऱ्यावरून दरबारी मुन्शीने त्याची पहेचान मुफ्ती नसरुद्दीन करीमलाला पेशावरी याच्याबरोबर करून दिली. त्याने बाकायदा आदाब बजावला, पण त्याच्या चेहऱ्यावर मगरुरी, लाचारी आणि खुशीचे अनोखे मिश्रण झळकत होते. बादशहाच्या खिदमतीचा मौका मिळाल्यामुळे त्याला अगदी कृतकृत्य झाल्यासारखे झाले होते.
महम्मद कुलीखान, इस्लामच्या नेक राहवर आल्यानंतरचा हा तुझा पहिलाच रमजान. हे मुफ्ती नसरुद्दीन उद्या जौहरच्या नमाजानंतर तुझ्या हवेलीवर राहण्यास येतील. तुझ्यासोबत ईद साजरी करूनच ते परत जातील. रमजान शरीफमध्ये तुझ्याकडून रोजांचे तौर तरीके, सेहरी, इफ्तारी यांचे वेळापत्रक आणि अगदी तरावीसुद्धा करवून घेतील.
हजरतांचे गुलामाच्या प्रत्येक बारीकसारीक जरूरतीवर बारकाईने लक्ष आहे. पोटच्या पोराची करावी तशी या नाचीजची काळजी घेतात. म्हणूनच गुलाम आज जिवंत आहे. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.
मनातून मात्र तो पुरता हादरला. रमजानच्या रोजांच्या काळात साऱ्या मोगलाईत जे शैथिल्य येते त्याचा फायदा उठविण्याच्या त्याच्या इराद्यावर बादशहाने नेमके पाणी ओतले होते. तशाही अवस्थेत बादशहाच्या सावध वृत्तीचे आणि धोरणीपणाचे त्याला कौतुक वाटल्याशिवाय राहिले नाही. त्याच्या या स्वभावामुळेच तर त्याने महाराजांना पुरते ओळखले होते… आणि त्याचा धूर्त, कावेबाज पाताळयंत्रीपणा पुरता ओळखणारे उभ्या हिंदुस्थानात ते एकमेव राज्यकर्ते होते. महाराजांच्या तीव्र आठवणीने आलेली अस्वस्थता लपविण्यास त्याला बरेच प्रयास पडले. नशीब थोर. तेवढ्यात दुसरा विषय सुरू झाला आणि हिरवी नजर अन्यत्र गुंतली.
मुफ्ती नसरुद्दीनच्या करड्या नजरेखाली रमजान महिना पार पडला. आपले धर्मप्रेम, कर्मठ धर्मनिष्ठा, ज्ञान पाजळण्याची एकही संधी तो सोडत नव्हता. कुलीखानावर नजर ठेवण्याची आणि त्याच्याकडून तसेच त्याच्या कुटुंबाकडून धर्माचरण करवून घेण्याची कामगिरी दस्तूरखुद्द आलाहजरतांनी सोपविलेली असल्यामुळे मुफ्तीसाहेबांचे तेवर सातव्या आसमानावर होते. शेवटी एकदा कुलीखानाला त्याला स्पष्ट शब्दांत जाणीव करून द्यावी लागली की, मुफ्ती येथे राजधानीत भले बादशहाच्या हुकमाखाली असेल पण अखेर तो त्याच्या जहागिरीत राहणारा एक मामुली सरकारी नोकर आहे. मोगली रिवाजाप्रमाणे जहागिरीत राहणाऱ्या रयतेच्या जान व संपत्तीवर जहागीरदाराची पुरती सत्ता चालते. त्याने मुफ्तीला जाणीव करून दिली की, ईदनंतर लवकरच तो जहागिरीचा ताबा घेणार आहे. त्यानंतर मात्र गाडे सुरळीत मुक्कामाला पोहोचले. ईद यथास्थित पार पडली. बासी ईदनंतर तिसऱ्या दिवशी घवघवीत बिदागी आणि ईदी म्हणून भरपूर नजर-नजराणे घेऊन महाशय स्वस्थानी रवाना झाले.
क्रमश:
*____⚔📜🚩
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा