फॉलोअर

गुरुवार, २६ मार्च, २०२०

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔ अग्निदिव्य भाग 30⃣

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜
अग्निदिव्य

लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार
__📜🗡
भाग   30⃣
🚩🗡___
🚩📜🚩___

मोहीम झपाट्याने आकार घेऊ लागली. मोहिमेच्या तयारीत बादशहा जातीनिशी लक्ष घालत होता. निरनिराळ्या ठिकाणचे सरदार आणि मानकरी-मनसबदारांना फौजेत सामील होण्याची फर्माने रोजच्या रोज रवाना होत होती. दिल्लीतून निघताना फौज पाऊण लाखाची असली, तरी वाटेत येऊन मिळणाऱ्या तुकड्यांमुळे बऱ्हाणपुरास पोहोचेपर्यंत ती दोन लाखांचा आकडा गाठणार होती. त्याशिवाय शागिर्दपेशा, बाजारबुणगे आणि जनानखान्यांचा पसारा अलग. चार-चार हत्ती जुंपून ओढाव्या लागणाऱ्या सहा अक्राळविक्राळ तोफा सोबत जाणार होत्या. शिवाय इतर तोफखाना होताच. मिर्झाराजांनी औरंगाबादेत सोडून दिलेल्या तोफा आणि तोफखाना फौजेला मिळणार होता. दिलेरखान आणि बहादूरखानाच्या दिमतीला असलेली फौज आणि तोफा दाऊदखानाच्या हुकमतीत राहणार होत्या. त्या फौजेवर मात्र कुलीखानाची थेट हुकुमत चालणार नव्हती.


छावणीच्या उभारणीची गडबड सुरू असतानाच एक दिवस बादशहाने जाफरखानाला एकांतात बोलावून घेतले. आपल्या खासगी दिवाणखान्यात खिडकीतून येणाऱ्या उजेडाचा कोन साधून बादशहा खूरमांडी घालून गालिच्यावर बसला होता. समोरच्या बैठ्या मेजावर लिखाणाचे साहित्य आणि कागदाचे ताव मांडून ठेवले होते. मेजाशेजारी कुराणाचे पुस्तक उघडे करून ठेवले होते. त्यात पाहून बादशहा समोरच्या कागदावर कुराण उतरवून काढत होता. त्या कागदावर सुंदर रंगसंगतीत वेलबुट्टीची चौकट काढली होती. ती चौकट बादशहाची लाडकी लेक झिनतउन्निसा बेगमने आपल्या हातांनी काढली होती. जाफरखान कुर्निसात करून समोर उभा राहिला. लिहिली जात असलेली आयात पूर्ण करून बादशहाने लेखणी खाली ठेवली आणि तो उठून मसनदीवर लोडाला रेलून बसला. बसता बसता सवयीप्रमाणे जपमाळ हातात आली.
जाफरखान, ही दख्खन मोहीम बरीच लांबणार आहे. कारण या वेळेस काय वाट्टेल ते झाले तरी दख्खन पूर्ण काबीज केल्याशिवाय फौजा माघारी येऊ दिल्या जाणार नाहीत. माबदौलतांच्या अंदाजाप्रमाणे मोहीम दहा वर्षे तरी चालेल.
जी आलमपन्हा.


त्यामुळे सारे लहान-मोठे अंमलदार, मनसबदार, दरबारी, आपापले जनानखाने सोबत ठेवणार.
जी हुजूर. रिवाज तसाच आहे.
का कुणास ठाऊक, पण माबदौलतांना अजून कुलीखानाचा पुरता भरवसा वाटत नाही.
गुस्ताखी माफ, पण आलमपन्हा, आता तो काही गडबड करू शकेल असे वाटत नाही. या मुबारक कदमांशिवाय त्याला दुसरा थारा नाही.


तरीसुद्धा मन शंकित आहे. तो त्याच्या स्वत:च्या मुलखात जाणार. माबदौलतांची जवानी दख्खनमध्ये गेली आहे. हे मराठे मोठे कावेबाज असतात. राजपूत आणि बुंदेले शौर्यात त्यांच्या बरोबरीने असले, तरी त्यांना छक्के-पंजे आणि राजकारण समजत नाही. म्हणूनच ते इमानी कुत्र्यांसारखे आमच्या साखळीला मुकाट बांधलेले राहतात. पण या मराठ्यांचा भरवसा देता येत नाही… जाफरखान, कुलीखानाला तोंडी हुकूम दे. म्हणावे, त्याचा जनानखाना त्याच्या शिकारपूरच्या हवेलीतच माबदौलतांच्या निगराणीत मेहफूज असेल. माबदौलत जेव्हा दख्खनसाठी निघतील तेव्हा त्याचा जनानखाना शाही जनानखान्यासोबत हिफाजत के साथ दख्खनमध्ये पोहोचता होईल.


हुकूम सरआखोंपर आलमपन्हा, पण छावणीतला प्रत्येक लहान-मोठा अंमलदार स्वत:चा जनानखाना सोबत बाळगणार आणि खुद्द नायब सरलष्कराचा जनानखाना आलाहजरतांच्या निगराणीत राजधानीत याचा अर्थ नायब सरलष्करावर आलाहजरतांची मर्जी बहाल नाही असा काढला जाईल. कुलीखान बिथरल्याशिवाय राहणार नाही. तो नजरकैदेत असतानासुद्धा त्याचा जनानखाना त्याच्यासोबत ठेवण्याची मेहेरबानी आलाहजरतांनी केली होती. एका क्षुल्लक कारणापायी एवढी मोठी मोहीम नासून जायची.
तुझ्या बोलण्यात तथ्य आहे. ठीक आहे. त्याला माबदौलतांनी दिलेली ती लौंडिया, काय नाव तिचे? हाँ नूर बानू, ती त्याला त्याच्या सोबत छावणीत ठेवता येईल. बाकी फौजेत असा समज पसरवा की, हिंदोस्तानात परत यायला मिळावे म्हणून त्याने स्वत:च आपला जनानखाना मागे ठेवला आहे. कुलीखानाला कसे समजवायचे, तो तुझा जिम्मा.
जो हुकूम.


त्या नामुराद बहादूरखानाने पेडगावात स्वत:च्या नावाने किल्ला बांधला आणि त्यात मेहफूज राहून तो ऐश करतो. दाऊदखान आणि कुलीखान दोघांनाही किंवा फौजेतील कोणालाही स्वतंत्र, पक्का, कोटबंद वाडा बांधता येणार नाही. सख्त मनाईचा हुकूम जारी कर. कोणतीही परिस्थिती असो, प्रत्येकाने छावणीतच राहिले पाहिजे. मग मुक्काम बऱ्हाणपुरास असो वा शहरात.
जो हुकूम.
याचा अर्थ स्पष्ट होता, बादशहाने कुलीखानाचे अवघे कुटुंबच स्वत:कडे ओलीस ठेवले होते; त्यामुळे त्याला पायबंद घालता येईल असा हा कावा होता. तसेच एखाद्या किल्ल्यात आश्रय घेऊन कुलीखानाने बंड करू नये असासुद्धा बंदोबस्त बादशहाने परस्पर करून टाकला.
यमुनेच्या काठाने छावणी उभी राहू लागली. एक शुभ दिवस पाहून दाऊदखान आणि कुलीखान मोहीमनशीन झाले. दोन दिवसांनंतर बिनीची पथके, नौबत, निशाण आणि मुख्य अंमलदारांसह कूच करून निघाली. एका उंच मचाणावर उभा राहून बादशहा त्यांना निरोप देत होता. क्वचितच कोणा सेनापतीस असा बहुमान मिळत असे. महम्मद कुलीखान - नेताजी पालकरची दख्खन मोहीम सुरू झाली.


बादशहाला पक्का विश्वास होता की, मराठे कुलीखानाचा असा काही अपमान करतील की, तळमळून तो चिडून उठेल. झाल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी म्हणून तो अवघ्या महाराष्ट्रात भयंकर कत्तलींचे आणि बाटवाबाटवीचे थैमान मांडील. आजवरचा इतिहास तेच सांगत होता. खऱ्यापेक्षा बाटगा जास्त कडवा असतो. अगदी निजाम आणि कुतुबशहा यांसारखे बहमनी सुलतानसुद्धा मूळ बाटगेच की. यवनांनी एक हजार वर्षे राज्य केले ते अशा बाटग्यांच्या आणि अंकित झालेल्या स्वकीयांच्या जिवावरच. हिंदूंच्या समोर भरदरबारात मंदिरे उद्ध्वस्त करण्याचे हुकूम सुटत होते आणि राजपूत, जाट, बुंदेले ‘राजे’, ‘महाराजे’ तख्तासाठी रक्त सांडत होते. म्हणून तर आता आलमगीर बादशहा कुलीखानाबाबत काहीसा निश्चिंत होता. त्याला खात्री होती, आपण एका नेताजीला बाटवले, आता त्याला बाटवाबाटवी करायला लावण्याचे उरलेले काम मराठेच करतील. अपमान करून, प्रकट तिरस्कार करून ते कुलीखानाला चेतवतील आणि तो धर्मप्रसाराचे आपले काम व्रत म्हणून अनायासेच पूर्णत्वास नेईल. अलहमदुलइलल्लाह.

बहिर्जी आणि महाराजांची एकांत भेट सुरू होती. मोरोपंत पंतप्रधानांनासुद्धा आत प्रवेश मना करण्यात आला होता.
म्हाराज, हप्त्याभरात मोगली फौजा नर्मदा वलांडून दख्खनमध्ये उतरतील आन बऱ्हानपुरास दाकल व्हतील. फौजेची उरलेली जुळवाजुळव करन्याखातर महिनाभरासाठी छावणीचा तळ बऱ्हानपुरास पडंल. पावसाच्या तोंडावर फौज औरंगाबादेत दाकल व्हईल. पाऊस संपला की, भली दांडगी फौज सोराज्यावर कोसळनार. स्वारीची तयारी मिर्जाराजांच्या स्वारीपरीस जोरदार हाये…
हा अवघा तपशील खलबतखान्याच्या मसलतीत सांगा. आता एवढेच सांगा की, नेताजीकाकांची खबर काय? त्यांनी काही योजना ठरवली आहे का?
जी म्हाराज. फौजा खानदेश-बागलाणात उतरल्या की, एक दिवस साल्हेरजवळच्या जंगलात हरनांची शिकार करन्याच्या मिशानं सरनोबत ऐन फौजेपासून दोन-तीन मजला आपल्या हिसाबानं, मोगली नव्हं; वायले होतील. आन ऐन जंगलात पडाव करून ऱ्हातील. नर्दुल्लाखानाचा दस्ता संगत आसंल. त्या येगळी मूठभर हशम आन मोजके खिदमतगार ऱ्हातील. पडाव आपल्या हद्दीला खेटून पर मोगली हद्दीतच आसंल. मातुर साल्हेर गडाच्या ऐन टप्प्यावर. एखाद्या राती नर्दुल्लाचा दस्ता उठाव करून साधेल तेवडी कापाकाप करील. या दंगलीचा फायदा उठवत सोता सरनोबत चार-सहा हशम संगती घेऊन नाशिककडं धावतील अन् येकादी जवळची वाट काढून सोराज्यात घुसतील. कमीतकमी मुक्काम आन जास्तीतजास्त दौड मारत रायगड गाठतील. असा येकून ढोबळमानानं मनसुबा हाये.


उत्तम! मनसुबा तर नामी आहे, मात्र त्यात थोड्या गफलती आहेत. नाईक, त्या तुमच्या नजरेत यायला हव्या होत्या.
न्हाई, काई ध्यानात ईना म्हाराज.
साल्हेरपासून रायगडापर्यंत नेताजीकाका मोगली पेहराव आणि सरंजामात दौड मारणार. वाटेत आपल्या चौक्या, नाकी, गस्ती, कोणी हटकणार नाही? अटकाव करणार नाही?
व्हय जी म्हाराज, मोटीच गफलत ऱ्हायली. त्येंच्या संगत आपला कुनी जबाबदार गडी-असामी व्हया.
ठीक. मनसुब्यात आणखी दुरुस्त्या हव्या.
जी. हुकूम.
नर्दुल्लाखानाचा दस्ता उठाव करणार नाही.
मंग म्हाराज?
साल्हेरच्या किल्ल्यावरची शिबंदी ‘अचानक’ छापा घालील. छाप्याची वेळ, स्थळ आणि रात्र नेताजीकाकांना आगाऊ कळू देत. छाप्याच्या वेळी त्यांच्या दिमतीची आपली माणसं पिवळी मुंडाशी आणि दोन्ही दंडांना पिवळी कापडे बांधून असावीत. तीच आपली खूण. बाकी शिबंदी गाफील, नशेत असेल तर उत्तमच. नर्दुल्लाचा दस्ताच केवळ पहारा ठेवील. नेताजीकाकांच्या पडावावर असलेल्या शिबंदीच्या तिप्पट मावळे छाप्यात असणे गरजेचे आहे. छाप्याची पहिली धडक पडताच खुद्द नेताजीकाका आणि नुर्दल्लाचा दस्ता आपल्या एका तुकडीचा पाठलाग करीत असल्याचे नाटक करीत पळत सुटेल. सात-आठ मावळ्यांची ती तुकडी वाटाड्याचे काम करील. नेताजीकाका आणि त्यांची माणसे मोगली पेहरावात असल्याने वाटेत कुठे दगाफटका व्हायला नको. एखाद्या ठाण्यावर अटकाव झाला तर, आणि तसा तो झाल्याशिवाय राहणार नाही, न रेंगाळता पुढे सरकण्यासाठी वाटाड्यांकडे आवश्यक त्या परवलीच्या खुणा आणि दस्तावेज असू देत. ठरावीक अंतरावर सर्वांसाठी ताज्या दमाची जनावरे तयार ठेवा. त्यासाठी नेमके कोणत्या मार्गाने जायचे ते तुम्हाला आधीच योजून ठेवावे लागेल. रात्रीचा मुक्काम काही घटकांचा आणि शिरस्त्याप्रमाणे उघड्यावर असेल. शक्य तितक्या लवकर त्यांना हुजूर दाखल करा. छापा असा कारगर झाला पाहिजे की, गनिमाचा एकही हशम जिवंत सुटता कामा नये. दयामाया नाही. जखमी म्हणून, शरणागत म्हणून जीवदान नाही. खबर द्यायला जाण्यासाठी कोणी जिवंत राहताच कामा नये. आकाशात भिरभिरणाऱ्या घारी आणि गिधाडेच शोधकर्त्यांना खबर देतील. बऱ्हाणपुरास खबर जाऊन शोधासाठी माणसे रवाना होईपर्यंत नेताजीकाकांनी रायगड गाठायला हवा. सर्वांत महत्त्वाचे, वाटाड्या तुकडीत नाईक तुम्ही असलेच पाहिजे. रायगडी पोहोचण्यास रात्र झाली तर परवलीच्या शब्दावर गडाचे दरवाजे उघडण्याचा हुकूम देऊन ठेवलेला असेल.


जी, म्हाराज. जसं सांगितलंसा तसंच हुईल. शबुद दर शबुद. त्यात रत्तीभर हेरफेर हुयाचा न्हाई. येक जरी गनीम जित्ता सुटला तरी छापा घालनाऱ्या नायकाची खैर न्हाई असा मुळात दमच तुमच्या नावानं दिऊन ठिवतो. पर म्हाराज येक शक हाये.
महाराजांच्या भुवया वर चढल्या.
न्हाई म्हंजे मनसुब्यात खोट काडाया जागा न्हाई, पर छापा घालनाऱ्यानं इतका कडक छापा कशापाई आन कोनावर घालायचा ह्येची कल्पना त्यांना द्येयाची का न्हाई.
हुं. शंका रास्त आहे. त्यांना एवढेच सांगायचे की, मोगलांचा एक मातब्बर सरदार आमच्या खास हुकमावरून जिवंत पकडून हुजूर दाखल करायचा आहे. त्यासाठी त्याच्या गोटातली माणसं आपण आधीच फोडून ठेवली आहेत. ती गिरफ्तारीत मदत करणार आहेत.


जी, म्हाराज.
निघा, रात्री स्वारीचा तपशील खलबतखान्यात प्रधानमंडळादेखत द्या.
मुजरा करून बहिर्जी दालनाबाहेर पडला, तर मोरोपंत कपाळास आठ्या घालून दाराबाहेर येरझारा घालीत होते. त्यांची नजर चुकवीत खालमानेनेच मुजरा करीत बहिर्जी तिथून सटकला.

अजगराच्या सुस्त चालीने मोगली फौजेचा लोंढा स्वराज्य गिळण्यासाठी दख्खनच्या दिशेने सरकत होता. कुलीखानाचे मन मात्र वाऱ्याच्या वेगाने स्वराज्याकडे धाव घेत होते. यापूर्वी अफगाण मोहिमेतसुद्धा तो नायब सरलष्कर होता. पण तेव्हा त्याच्यावर नजरकैद जारी होती. आता तो काच राहिला नव्हता. आता त्याला मोकळा श्वास घेता येत होता. बऱ्यापैकी मोकळेपणाने वावरता येत होते. गेल्या जवळपास एका तपात त्याचा हिंदू संस्कृतीशी, हिंदू माणसांशी कुठल्याही प्रकारे संपर्क येणार नाही याची बादशहाने कसून काळजी घेतली होती. या मोहिमेत मात्र मोठ्या प्रमाणावर राजपूत, जाट, बुंदेले आणि इतर अनेक जातींचे हिंदू सरदार-मनसबदार सहभागी होते. फौजा औरंगाबादेत दाखल झाल्यानंतर अनेक मराठा सरदारसुद्धा फौजेस येऊन मिळणार होते. नायब सरलष्कर म्हणून त्याचा संपर्क त्या साऱ्यांशी येत होता. त्यांचे बोलणे-चालणे, त्यांचा व्यवहार वगैरे तो मोठ्या अपूर्वाईने पाहत राही. मात्र त्याच वेळी त्यांच्या नजरेतला मूक तिरस्कार त्याला जाणवत राही. बादशहाच्या धाकाने म्हणा किंवा एकूणच उत्तरेतील हिंदूंच्या मनात राज्यकर्त्यांची जमात म्हणून मुसलमानांविषयीचा धाक म्हणा किंवा तो नायब सरलष्कर असल्याने त्याच्या पुढे मान तुकविणे, त्याचा आदर करणे, त्याचा हुकूम मानणे वगैरे दरबारी शिस्तीचा आणि लष्करी शिस्तीचा भाग म्हणूनसुद्धा सर्व हिंदू सरदार-दरबाऱ्यांना भाग होते. असे असले तरी त्यांच्या मनातील तुच्छतेची भावना लपत नव्हती. किंबहुना ती लपविण्याचा कोणी विशेष प्रयत्नसुद्धा करीत नसे. कुलीखानाच्या मानी मराठी मनाला हे शल्य इंगळीच्या डंखासारखे वेदना देत असे. क्वचित एखादा असा प्रसंग घडे की, त्याला अपमान अगदी असह्य होऊन जाई. मग रात्र-रात्र तळमळत काढली जाई. मनामध्ये आत्यंतिक चीड उत्पन्न होई. साऱ्या जगाची जाळूनपोळून पार राखरांगोळी करून टाकावी अशी विचित्र सूडभावना मनात जन्म घेऊ पाही.


हेच. बादशहाला हवे होते ते नेमके हेच. म्हणूनच तो आता कुलीखानाचा हिंदूंशी संपर्क येऊ देण्यास राजी होता. त्याला तो हिंदूंकडून असाच अपमानित व्हायला हवा होता. तो असाच चिडून उठायला हवा होता. म्हणून मग आपल्या हस्तकांकरवी तो हिंदूंच्या अशा वागण्याला प्रोत्साहन मिळेल अशा कारवाया करवीत असे. अपमान जेवढा जास्त, निर्भर्त्सना जेवढी जास्त कडवट, तितकीच चीड आणि संतापाची धार तेज, असे साधे गणित होते. संतापाची ही तेज धारच त्याच्या मनामध्ये अपमानाचा बदला घेण्याची, सूडाची आग चेतविणार होती. पेटती ठेवणार होती. आणि हा अंगार अखेर मराठ्यांवर, मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्यावर कोसळावा यासाठीच तर बादशहा आलमगीर गेले एक तप हा खटाटोप मांडून बसला होता. त्याच्या या तपश्चर्येला फळ मिळण्याची तो मोठ्या उत्सुकतेने, उत्कंठेने वाट पाहत होता.


विवेकाची वेसण घालून कुलीखान आपल्या उधळणाऱ्या मनाला आवर घाली. कारण ज्या क्षणी मुसलमान होण्याचा निर्णय घेतला, त्याच क्षणी त्याला आपले हे भवितव्य माहीत झाले होते. त्याला तोंड देण्याची मानसिक सिद्धतासुद्धा झाली होती. त्या क्षणापासूनच बादशहाच्या या कुटिल अपेक्षा उघड झाल्या होत्या. संधी मिळेल तेव्हा त्याने त्या उघडपणे बोलून दाखविल्या होत्या. किंबहुना त्या व्यक्त करण्याची एकही संधी तो कधी सोडत नव्हता. नेताजीचा धर्म हिरावून घेऊन त्याला कुलीखान बनविण्यात जरी तो यशस्वी झाला असला, तरी साध्य साधल्याचे समाधान त्याला मिळू न देण्याचा कुलीखानाचा निर्धार होता. कुलीखान बादशहाच्या छळामुळे झुकला नव्हता, तर एक मोठे राजकारण गनिमी काव्याने साधण्यासाठी महाराजांच्या आज्ञेने झुकला होता आणि आता महाराजांच्या वरदहस्ताची खातरजमा झाल्यामुळे तर आलमगिराचा पराभव करण्याचा त्याचा निश्चय अधिकाधिक दृढ होत होता. हे अपमान, ही मानखंडना, निर्भर्त्सना पचविण्याची अधिकाधिक शक्ती त्याला मिळत होती. अपमान होत असतानासुद्धा हिंदू सरदार, मानकऱ्यांमध्ये मिसळण्याचा तो जास्तीतजास्त प्रयत्न करीत होता.

प्रचंड मुघल फौज बऱ्हाणपुरास येऊन विसावली. शहराबाहेर कित्येक कोसपर्यंत छावणी पसरली होती. एकेक सरदार फौज घेऊन छावणीत दाखल होत होता. छावणी विस्तारत होती. पाऊस सुरू होण्यापूर्वी तापी आणि पूर्णा उतरून औरंगाबाद गाठणे गरजेचे होते. शाही हुकूमसुद्धा तसाच होता. एक दिवस सरलष्कराच्या दरबारात कोठावळ्याने अहवाल दिला की, छावणीचा विस्तार बराच वाढल्यामुळे शिधासामग्रीच्या वाटपावरचा ताणही वाढू लागला आहे. दर-एक गोटाची स्वत:ची कोठीघराची व्यवस्था झाली पाहिजे. फौजेचा खान-ए-सामान इफ्तीखारखानाने तक्रार गुदरली की, वाढत्या फौजेमुळे छावणीच्या परिसरात मानवी आणि जनावरांच्या विष्ठेची दुर्गंधी भरून राहिली आहे. पाणवठे खराब होत आहेत. वेळीच जर काही उपाय योजले नाही तर लवकरच सैन्यामध्ये साथीचे रोग फैलावतील. मेंदीने रंगविलेली आपली दाढी कुरवाळीत सरलष्कर दाऊदखान कुरेशी मोठा गंभीर आव आणून म्हणाला–
अर्थ साफ आहे. सैन्याच्या तुकड्यांची हलवाहलव झाली पाहिजे. मला वाटते, येत्या हप्त्यात आघाडीची काही पथके खानदेशात उतरवावीत. हा जिम्मा आमच्या नायबसाहेबांचा आहे. क्यों जनाब कुलीखान?
त्याच्या बोलण्यास दुजोरा देत कुलीखान तत्परतेने म्हणाला–


बेशक बिलकुल दुरुस्त फरमाया; त्यामुळे इथला ताण तर कमी होईलच, पण औरंगाबादच्या परिसरात सबंध पावसाळ्याचे तीन-चार महिने फौजेची छावणी राहणार आहे, त्या दृष्टीनेसुद्धा आखणी करून ठेवता येईल. जर हुजुरांना मंजूर असेल तर परवा मी स्वत: आघाडीची पथके घेऊन तापीपार होतो आणि औरंगाबादेस पोहोचतो.


बहोत खूब जनाब कुलीखान, आपल्याला दख्खनमध्ये पोहोचण्याची बरीच घाई झालेली दिसते.
दाऊदखानाच्या स्वरातील विखारी उपहास लपविण्याचा त्याने लवमात्र यत्न केला नाही. त्याची दखल घेत तोडीस तोड तीव्र स्वरात कुलीखानाने जवाब दिला.
दख्खनमध्ये जाण्याच्या माझ्या घाईची चर्चा जेव्हा आलाहजरतांनी केली तेव्हा माझ्या आठवणीप्रमाणे जनाब सरलष्कर तिथे मौजूद होते. सवाल माझ्या घाईचा नाही. सवाल आहे आलाहजरतांचा मकसद पुरा करण्याचा. आपण एक प्रचंड मोठी, अवघड आणि महत्त्वाकांक्षी मोहीम शिरावर घेऊन निघालो आहोत आणि गेले तीन हप्ते नुसते बसून काढण्यात गेले आहेत. लाखोंची फौज अशी नुसती बसून खात राहिली तर समुद्राएवढा खजिनासुद्धा पुरा पडायचा नाही. तुमच्यासाठी ही केवळ एक मोहीम आहे पण माझ्यावर सर्वशक्तिमान अल्लाने आणि जिल्हेसुभानी आलाहजरतांनी जे काम सोपविले आहे ते नुसते जंग खेळून मुलूख काबीज करण्याचे नाही. माझ्या खांद्यावर एका पवित्र कार्याचा भार आहे. आलाहजरतांच्या वतीने जिहाद करण्याची माझ्यावर जिम्मेदारी आहे. जिहादसाठी निघालेला हरएक सच्चा मोमिन डोक्याला कफन बांधून निघत असतो. जोपर्यंत जिहाद पूर्ण होत नाही, विजय मिळत नाही, कुफ्र नष्ट होत नाही तोपर्यंत सच्चा जिहादी आराम करीत नाही, आपली तलवार म्यान करीत नाही.
कुलीखानाचा आवेश आणि जोश बघून सगळे थक्क होऊन गेले.
सुभानअल्ला. सुभानअल्ला. अल्ला हो अकबर।


जशी मोहीम पुढे सरकेल तशा फौजा विखुरतील. एवढ्या मोठ्या फौजेची रसद थेट दिल्लीमधून येईल, असे म्हणाल तर ती कधीच पुरी पडणार नाही. चारा-वैरण, दाणागोटा आपला आपणच उभा केला पाहिजे. मुघल रयतेतून उभा करायचा तर रोख दाम मोजावा लागेल. त्यासाठी खर्च होणाऱ्या खजिन्याचा अंदाज येथवर पोहोचेपर्यंत झालेल्या खर्चावरून सहज येईल. जाहीरच आहे, हा खर्च आपल्याला गनिमाला लुटून गोळा करावा लागेल; त्यामुळे गरज पडेल तशी फौज पावसाळ्यातसुद्धा हलती राहील. मिर्झाराजांनी हे आणि असेच डावपेच वापरून शिवाजीराजांना जेरीस आणले होते आणि अखेरीस गुडघे टेकण्यास भाग पाडले होते. महामारीचा जो सैतान आज इथे खौफ पैदा करीत आहे, तो त्याहीपेक्षा भयानक स्वरूपात औरंगाबादेत छळणार आहे; त्यामुळे फार मोठी छावणी फार काळ एका जागी ठेवणे योग्य होणार नाही. दख्खनमध्ये पाऊस सैतानासारखा बरसतो; त्यामुळे छावणी वारंवार हलविणे तर शक्य नाही. त्यावर उपाय म्हणजे छावणीमधील गोट एकमेकांना खेटून न ठेवता ते एकमेकांपासून दूर विखरून/विखरून ठेवावे लागतील.


परवा आम्ही रवाना होऊ तेव्हा प्रत्येक महत्त्वाच्या गोटातले हजार-बाराशे हशम अशी जवळपास पस्तीस हजारांची सडी फौज माझ्यासोबत राहील. दोन-तीन आठवड्यांतच या भागात वळवाचा पाऊस सुरू होईल; त्यामुळे लहान-मोठे ओढे-नाले अचानक पूर भरून वाहू लागतील. आपल्या डोक्यावर स्वच्छ ऊन असेल पण कोसोदूर पहाडांमध्ये पडून गेलेल्या पावसाचे ते पाणी असू शकेल. आता दगडासारखी टणक वाटणारी जमीन ओली आणि भुसभुशीत होऊन जाईल. वाटा चिखलाने भरतील. अशा वेळी मोठ्या अवजड तोफा ओढणे हत्तींनासुद्धा जिकिरीचे जाते. अचानक आलेल्या लोंढ्यामुळे बारूद बरबाद होण्याचा मोठा धोका असतो. जनाब दिलेरखानसाहेबांनी याचा चांगला अनुभव घेतला आहे; त्यामुळे अवजड तोफखाना आणि बारूदखाना मी सोबत पुढे नेतो. छावणीची जागा तयार करण्यासाठी हत्ती वापरावे लागणार; त्यामुळे अर्धा पीलखाना माझ्यासोबत रवाना होईल. जमेल तेवढे जड सामान आम्ही आत्ताच पुढे घेऊन जाऊ. एवढे महत्त्वाचे सामान पुढे जाणार तर त्याची देखभाल आणि व्यवस्था करण्यासाठी कोणी भरवशाचा, काबील आणि जबाबदार अधिकारी हवाच. खान-ए-सामान इफ्तीखारखानसाहेब आमच्या सोबत असतील. येथील छावणीची व्यवस्था त्यांचे नायब पाहतील. त्यांना काही अडचण आली, तर खुद्द सरलष्करसाहेब छावणीत मौजूद आहेतच.


पुढे गेलेली फौज पाणवठा आणि जनावरांना सोईस्कर जागा हेरून, तयार करून ठेवील. निरनिराळ्या सरदार-मनसबदारांचे गोट कुठे असावेत याच्या जागा निश्चित करून आमच्यासोबतच्या फौजेच्या तुकड्या मुक्रर केलेल्या जागी थांबून राहून छावणीची आखणी करून ठेवतील. छावणी शहरापासून अडीच कोस दूर असेल; त्यामुळे शहराला छावणीचा उपद्रव होणार नाही. सर्वांना नीट ठाऊक आहेच की, फौजेतला कोणताही अधिकारी वा अंमलदार शहरात मुक्काम करणार नाही. तो फौजेसोबत छावणीतच राहील. एकूण छावणी दहा-बारा कोसांच्या घेरामध्ये विस्तारलेली असेल; त्यामुळे कूडाकचरा आणि विष्ठेमुळे होणारा उपद्रव टाळता येईल. परिणामी, रोगांची भीती उरणार नाही. तुम्हाला आठवत असेल, दिलेरखान आणि मिर्झाराजांची छावणी पुरंदरापासून सासवडपर्यंत पसरलेली होती.


सुभानअल्ला! बहोत खूब. वहाव्वा! वहाव्वा!! जनाब महम्मद कुलीखान। आलमपन्हा तुमची एवढी वाखाणणी का करतात, ते नेहमी तुमचा बहुमान का करतात ते आज आम्हाला पुरते कळून चुकले. वहाव्वा! आमचे नायब असून तुम्हाला एवढा अधिकार बहाल केला तो सार्थच आहे. आमच्या शिरावरचा भार तुम्ही एकदम कमी करून टाकलात. शाही हुकमाने तुम्हाला सारी मोकळीक आहेच, आमच्यातर्फेसुद्धा तुमच्या प्रत्येक निर्णयाला संपूर्ण मान्यता आहे. तुमच्यासोबत कोणी जायचे त्याची यादी आज मगरीबच्या आधी पेश करा.


तीन दिवसांनंतर मुघल फौजेचा एक मोठा हिस्सा अवजड तोफखाना, बारूदखाना आणि पीलखाना घेऊन तापीपार झाला आणि खानदेशाची तप्त भूमी तुडवत औरंगाबादच्या दिशेने निघाला. ही फौज औरंगाबादेस पोहोचवून कुलीखान बऱ्हाणपुरास परत येणार होता. त्यानंतर मुख्य फौज हलणार होती.

सदरेवर बसून महाराज फौजेचा ताळेबंद आणि स्वराज्याच्या वसुलीचा लेखाजोखा तपासत होते. त्यांनी बाळाजी आवजींना बोलावून घेतले होते. बाळाजी येऊन तिष्ठत होते. हातातल्या कामातून मोकळीक होताच महाराजांनी त्यांच्याकडे पाहिले.
या बाळाजी, जरा तिष्ठावे लागले. पण जमा-खर्चाची कामे एकदा लांबणीवर पडली की, त्यातला गुंता अधिकच गुंतत जातो. मग सोडविताना दुरापास्त होते.
जी महाराज.
बाळाजी, काही पत्रे अगदी तातडीने लिहायची आहेत. नाशिक, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर, महाबळेश्वर आणि वाई येथील प्रमुख शास्त्रीमंडळींना तातडीने गडावर बोलावणी धाडा. पत्र घेऊन जाणाऱ्या हेजिबाला सूचना करणे की, शास्त्रीबोवांना सोबत घेऊनच येणे. शास्त्रीबुवांस लिहिणे की, येताना सोबत धर्मशास्त्राच्या पोथ्या आणि स्मृतिग्रंथ घेऊन येणे. म्हणावे, गडावर महत्त्वाच्या धर्मकृत्यासाठी शास्त्रार्थ करणे आहे. त्या कारणे त्यांचा सल्ला आणि सहभाग आम्हास अगत्य आहे. पत्रे आत्ताच तयार करण्यास घ्या आणि उदईक पहाटे गडाचे दरवाजे उघडताक्षणी हेजीब रवाना होतील असे पाहणे.
जी, महाराज. ज्यांना पत्रे पाठवायची आहेत त्यांची यादी आणि मसुदा घेऊन घंटाभरात दाखल होतो.
फक्त यादी दाखवा. मसुदा दाखवण्याची गरज नाही. हे काही कोणा बांक्या राजकारणाचे खलिते नव्हेत. तेवढे लिखाण आपण स्वतंत्रपणे करू शकता. कसे?


बाळाजी निघून जाताच महाराजांनी देवडीवरच्या हवालदारास बोलावून घेतले.
हंबीरराव सरनोबतांना सांगावा धाडा. आज दुपारी ते आमच्या पंगतीला भोजन घेतील म्हणावे. भोजनोत्तर महत्त्वाची बोलणी करायची आहेत. पुरेशी सवड काढून यावे म्हणून सांगावा देणे. हाच सांगावा मोरोपंत पेशवे, निळो सोनदेव, अनाजी दत्तो यांनासुद्धा देणे. ही मंडळी पंगतीस असतील याची सूचना महाराणी सरकारांना देऊन मगच पुढे व्हा.
महाराजांच्या खासगी दिवाणखान्यात भोजनोत्तर मसलत बसली. बहिर्जी नाईक आधीच तेथे येऊन तिष्ठत होता. जड भोजनामुळे मंडळी जरा सैलावली होती.
काय अनाजी, आज दुपारची वामकुक्षी हुकली म्हणायची.
चालायचेच. महाराजांच्या पंगतीलाभापुढे वामकुक्षीची काय मातब्बरी. ज्या अर्थी इतक्या तातडीने बोलावणे आले आणि बहिर्जी इथे येऊन तयार आहे त्या अर्थी तशीच महत्त्वाची आणि निकडीची मसलत असावी.


काय हंबीरराव, गंभीरसे?
हं. बरे झाले महाराजांनी स्वत:च बोलावले. अन्यथा आज तीन प्रहरी महाराजांची मुलाखत मागायचीच होती.
काही विशेष?
पेशव्यांना खबर असणारच. दाऊदखान कुरेशीच्या फौजा तापी उतरून पुढे सरकल्या आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त फौज अजून बऱ्हाणपुरातच आहे. नवनवीन तुकड्या त्याला येऊन मिळतच आहेत. खबर अशी की, पुढे सरकलेल्या फौजेची अगवानी महम्मद कुलीखान करीत आहे.
कुलीखानाचे नाव उच्चारताना हंबीररावांच्या स्वरातील कडवट तिरस्कार लपून राहिला नाही. ते नाव कानी पडताच बहिर्जी वगळता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तिरस्कार उमटला. दातांच्या फटींमधून तिरस्कार व्यक्त करीत मोरोपंत उद्गारले–
अखेर उंट टेकडीखाली आलाच तर. खऱ्यापेक्षा बाटगा अधिक कडवा असतो त्याचे आता पुन्हा एकदा प्रत्यंतर येणार म्हणायचे.


सर्पास वेळीच ठेचले तर बरे. अन्यथा सारे घर त्याच्या पायाखालचे. प्रत्येक सांदी-कोपरा त्याला ठावकी.
अनाजी म्हणाले ते रास्तच आहे. त्याचसाठी आता आपण बसलो आहोत. नाईक, सांगा तुमची खबर.
महालात शिरताशिरता महाराज एकदम बोलले. ताजीम न देता महाराज आल्यामुळे मंडळींची बरीच धांदल उडाली. धडपडत उठून साऱ्यांनी मुजरे घातले. मंद हसत, हातानेच महाराजांनी बसण्याची खूण केली. स्वत: मसनदीवर लोडाला टेकून बसले. बहिर्जी बसणे शक्यच नव्हते. त्याने बोलायला सुरुवात केली–


नेता… जी, चुकलो. महम्मद कुलीखान चाळीस हजार फौज, अवजड तोफखाना, बारूदखाना आणि पीलखाना अंदाजे पंचवीस ते तीस हत्ती, असा सरंजाम घेऊनशान औरंगाबादेस पोहोचला हाये. मागून येनारी फौज अदमासानं पावनेदोन लाखाची आसंल. सोराज्यावर ह्यो अखेरचा निर्नायक दनका हानन्याची आलमगिराची म्होईम हाये. येवडा तोंडावरचा पाऊसकाळ सरला का बादूरखान आन दिलेरखान बी या फौजला कुमक करनार हायती. पुढं-मागं सोता आलमगीर बाच्छा दख्खनमधी उतरनार अशी बी बोलवा हाये. कुलीखान त्याच्या संगत असलेली फौज अन् अवघ्या फौजच्या छावनीची विगतवार तयारी करून ठिवनार हाये. ही म्होईम म्हनं लई लांबनारी असनार हाय म्हनून मग समदी आखनी कुलीखान सोता बैजावार करून घेनार हाय. छावनी शहराच्या अल्याड अंगाला अडीच कोसांवर आसंल. समदा पसारा पंधरा-वीस कोसांत फैलावनार हाय. दर दोन गोटामधी किमान दीड-दोन कोसांचं अंतर राखलं जाणार हाय. घानीचा तरास आन बीमारी टाळन्याचा ह्यो उपाय हाय म्हनं. ही समदी आखनी बी कुलीखानाचीच. त्यानं ती मिर्जाराजांच्या आखनीवर बेतलिया म्हनं.


कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ.
निळोपंत, व्यक्तिगत मतमतांतरे ऐकण्यासाठी का आपण जमलो आहोत?
क्षमा महाराज. मात्र इतके होऊनसुद्धा महाराजांना अजून कुलीखानास बोल लावलेला खपत नाही. हे नवलच म्हणायचे.
हे माहीत असून आमच्या देखता असे वावगे बोलवतेच कसे? त्यांनी आखलेला छावणीचा आराखडा आपल्यासाठी कसा फायदेशीर ठरवता येईल हा विचार मनात का येत नाही? असो. मुद्दा तो नाही. मसलत वेगळीच आहे.


नाईक पुढे बोला.
नेता… आपलं कुलीखान छावनीची अशी येवस्ता लावून दोन-तीन दिवसांत बऱ्हानपुराकडं माघारा निघंल. ज्या ज्या ठिकानी छावनीचे गोट ऱ्हानार हायती त्या त्या ठिकानावर आखनी आन दाना-वैरनीची तयारी करून ठिवन्यासाठी कुलीखानानं संगत न्येलेली फौज कुटं हजार तर कुटं बाराशे अशी ऱ्हानार हाय. समद्या मोटमोट्या तोफा देवगिरीच्या अंगाला तळ करून हायती. त्याच्या वरल्या अंगाला बारूदखाना आसंल आन शहराच्या जवळ पान्याची सोय पाहून पीलखाना आसंल. चाळीस हजारांची ही फौज अशी जवळजवळ ईस कोसांच्या घेरात मस्त फैलावून ठेवलिया.


दुसरी खबर अशी हाय की, कुलीखान बऱ्हानपुरास्न लगोलग परत फिरनार हाय आन इस-पंचवीस हजारांची दुसरी फौज घेऊनशान पावसाळ्याची बेगमी करन्यासाटी सोराज्यातून धान्य, वैरन आन जनावरांची लूट करनार हाय. जमेल तितकी जाळपोळ आन साधेल तेवढा धुमाकूळ घालनार हाय. कुलीखान या कारवाईची जातीनिशी अगवानी करनार हाय म्हनं.
बघा बघा, महाराज बघा. आणि तरीसुद्धा आपण म्हणता…


सबूर, सबूर. बहिर्जीचे बोलणे पुरे होऊ देत.
जी क्षमा.
तिसरी खबर अशी हाय की, आता बऱ्हानपुरास परत निगालेल्या कुलीखानासंगत लई मोटी शिबंदी न्हाय. लई म्हनाल तर दोन-अडीचशे सडे हशम. वाटत साल्हेर-मुल्हेरच्या जंगलात आठ-धा दिस मुक्काम ठोकून तो सांबरांची अन् हरनांची शिकार खेळनार हाय. खबर अगदी पक्की हाय.
अरे व्वा! मियाँ मोगली शौकात अगदी तरबेज झालेले दिसतात.
हूंऽऽऽऽ
क्षमा महाराज.
तर बोला मंडळी. आता कोणाचं काय म्हणणं आहे ते सविस्तर सांगा. गनिमाचा सरदार कोण, हे दुय्यम महत्त्वाचं आहे. त्याने जी तजवीज करून ठेवली आहे तिचा फायदा कसा उठवता येईल याचा विचार करायचा आहे. गनिमाला चाप लावणे हे प्रमुख उद्दिष्ट. इतर सारे गौण. राजकारणात व्यक्तिगत हेवेदावे, राग-लोभ, प्रतिष्ठा, मान-अपमान यांना स्थान नाही. काय हंबीरराव खरे ना?
ते तर खरेच महाराज, पण खंडोजी खोपड्याला एक न्याय आणि नेताजीला दुसरा असे होऊ नये. खंडोजी परका आणि नेताजी भोसल्यांचा पाव्हणा म्हणून त्याला झुकते माप. असे झाले तर फौज बिथरल्याशिवाय राहणार नाही.


हाच का आमच्या फौजेचा आमच्यावर भरवसा? फौजेला समजावणे, सांभाळणे किंवा फितवणे कोणाच्या हाती?
तसे नाही महाराज, आपल्या प्रत्येक कृतीवर आणि शब्दावर फौजेतला प्रत्येक बारगीर, शिपाई आणि शिलेदार प्राणापलीकडे विश्वास ठेवतो. माझे म्हणणे एवढेच की, साप जर तावडीत घावतो आहे, तर… तर पुरता चेचूनच का काढू नये?


फौजेचा आम्हावर दृढ विश्वास आहे ना? मग या खेपेलासुद्धा आम्ही जे करू ते स्वराज्याच्या हिताचेच करू हा भरवसा मनी धरावा. फौजेचे मन कसे सांभाळायचे याचे धडे सरनोबतांस आम्ही देणे उचित नव्हे. आम्ही जे करतो किंवा करू त्याचा मतलब येरांच्या ध्यानी येणार नाही कदाचित, पण आमच्या सरदार आणि मुत्सद्द्यांना आकळावा ही अपेक्षा अनाठायी नव्हे. खंडोजी म्हणजे नेताजी नव्हे हे जितके खरे तितकेच दोन परिस्थितीत संदर्भ भिन्न आहेत. विचार करणाऱ्यांनी तरी दोन बाबींची गल्लत करू नये. कोणी गल्लत करू पाहील तर त्यास प्रोत्साहित करू नये. प्रश्न साप चेचण्याचा. आम्हास नेताजी जिवंत हवेत. कितीही किंमत मोजावी लागली तरी ते जिवंतच परत आले पाहिजेत. ते आमच्या शब्दाने दुखावून गेले आहेत. आपण नेमके काय करतो आहोत याचे भान येईपर्यंत ते पुरते आलमगिराच्या सापळ्यात अडकले गेले. आम्ही आग्र्यास न जातो, तर चित्र कदाचित वेगळे असते. आमच्यावर सूड उगवण्यासाठी आता आलमगिराने त्यांना गुंतवले आहे, हे तर जगजाहीर आहे. जेव्हा कधी सवड सापडेल तेव्हा आलमगिराने त्यांचा केलेला शारीरिक आणि मानसिक छळ बहिर्जीकडून ऐकून ठेवा; त्यामुळे त्यांची रीतसर रुजवात झाल्याशिवाय फैसला होणार नाही.


एवढा वेळ साऱ्यांचे बोलणे शांतपणे ऐकत बसलेले त्र्यंबक सोनदेव किंचित खाकरत म्हणाले–
महाराजांचे म्हणणे रास्त आहे. जुन्या इमानाचे स्मरण देऊन मोहरा आपल्याकडे वळवता आला तर ते नक्कीच स्वराज्याच्या हिताचे ठरेल. एवढा मोठा मातब्बर आणि अनेक भेद जाणणारा गडी गनिमाहाती असण्यापरीस, कसाही असो, आपल्या छत्राखाली परत आला तर भविष्यातले नुकसान टाळणे शक्य होईल. खंडोजीच्या काळची परिस्थिती आणि आजची यात किमान जाणकारांनी तरी गल्लत करू नये. याशिवाय राज्याचा गाडा सुरळीत चालवायचा असेल तर व्यक्तिसापेक्षतेचा विचार राजाला करायास हवा असे राजधर्म सांगतो.


नासलेल्या दुधाची बासुंदी आटवायला निघालात.
मोरोपंत…! तुम्हीसुद्धा?
राहिले.
बरे पुढे? मोरोपंत राजकारणाचे बोला.
महाराज, मोगली रीतीला अनुसरून आणि मिर्झाराजांसारख्या रणधुरंधर मुत्सद्द्याची नक्कल करण्याच्या नादात कुलीखान मोठीच गफलत करून बसला आहे. एवढी चाळीस हजारांची फौज आणि तोफखाना वगैरे त्याने वीस कोसांत विखरून ठेवले आहे. त्यांच्यासोबत बरा खजिना आणि गल्ला असणारच. विखुरलेल्या सर्व गोटांवर एकाच वेळी छापा टाकला तर चाळीस हजारांचा खुर्दा उडण्यास कितीसा वेळ लागणार? कुलीखानास जिवंत धरून आणायचे असेल तर तो बऱ्हाणपुराच्या वाटेवर साल्लेर-मुल्हेरच्या रानात शिकार खेळण्यात गुंतला असतानाच छापा घातला पाहिजे. स्वराज्याच्या सीमेवर खेटून राहून शिकारीचा खेळ खेळण्याचे तो योजतो आहे. यात माझ्या दृष्टीला तरी त्याचा गाफील अतिआत्मविश्वास किंवा अहंगंड कारण असावा असे वाटत नाही. आपल्यावर धरणे यावे अशी कदाचित तो अपेक्षा करीत असावा अशी शंका आमच्या मनी डोकावू पाहत आहे. ही फौज विखरून ठेवण्याची गफलतसुद्धा त्याने याच कारणाने केली असेल का, अशी आम्हास शंका वाटते. असो. तो हे जाणीवपूर्वक करीत आहे की अनवधानाने, गाफीलपणे करीत आहे की खिजवण्यासाठी अहंगंडाने यात स्वारस्य दाखवण्याचे कारण नाही. उघड्यावर लोण्याचा गोळा पडला आहे आणि घरधनीण जागेवर नाही. मग बोक्याचे जे कर्तव्य तेच आपले. ज्या वेळी कुलीखानाच्या मुक्कामावर हल्ला होईल, त्याच सुमारास या विखुरलेल्या फौजेवर घाला घालून तिला परास्त करून टाकू. पहिल्याच फटक्यात एवढा जबरदस्त दणका बसला तर मागाहून येणाऱ्या फौजेचे नीतिधैर्य पार गळून गेल्याशिवाय राहणार नाही. भ्यायलेली, हबकून गेलेली फौज हजारांची की लाखांची याला काहीच महत्त्व उरत नाही.


व्वा! भले शाबास! याला म्हणतात पेशव्यांचा मनसुबा. एकदा मनाची कवाडे उघडली की, मनातली जाळी-जळमटे आपसूक उडून जातात. डोळ्यांवरची ढापणे काढली की, स्वच्छ दिसू लागते. मग स्वराज्यहितापुढे अन्य सारे गौण ठरते. ही मसलत ऐकून आम्हास मनस्वी आनंद झाला. अनाजी, तुमची काय राय आहे?


मोरोपंतांचा मनसुबा अगदी बिनतोड आहे. छापा असा अकस्मात आणि जोरदार असावा की, एका गोटाला दुसऱ्याची मदत करायला जायचे म्हटले तरी उसंतच मिळू नये. असा कारगर असावा की, खबर सांगायला माणूसच शिल्लक राहू नये. छाप्याची खबर नेताजीरावांस मिळेल ती ते आपल्या ताब्यात असताना आपल्याकडूनच.


अनाजी, नेताजीकाकांचा उल्लेख कुलीखान न करता नेताजीराव असा केलात, मनाला फार संतोष झाला. कारण नेताजीचा कुलीखान झाला यास आमचा बोल कारण आहे ही टोचणी आमच्या काळजात अहोरात्र सलत असते.


आम्ही जाणतो महाराज. धन्याच्या मनातली बोच जाणून घेणे हाच सेवक धर्म आहे. स्वराज्याच्या कारभारात महाराजांनी ज्या स्थानी ठेवले आहे त्या स्थानी बसून मन आणि डोळे उघडे ठेवून कारभार करताना अनेक गोष्टींचे अंदाज बांधता येतात. साऱ्याच गोष्टी उघड न बोलण्याचे अवधान मात्र सांभाळले पाहिजे. आईसाहेबसुद्धा हाच सल उरात ठेवून गेल्या हेही आम्ही जाणतो. स्वराज्याची पहिली मोठी झुंज पुरंदरावर झाली. त्यात नेताजीरावांनी केलेल्या कामगिरीस तोड नाही. त्याच पुरंदराच्या लढाईनंतर पन्हाळ्याच्या मोहिमेत हे असले विपरीत घडले या योगायोगाचे खुद्द आईसाहेबांनाही कायम वैषम्य वाटत राहिले. ते असो, पण महाराज नेताजीरावांवर छापा घालायचा आणि त्यांना जिवंत धरायचे म्हणजे काही पोरखेळ नव्हे. मोरोपंतांचा होरा सत्यात उतरला तर प्रश्नच नाही पण आपण तयारी ठेवताना तो सत्य असेल असे मानून चालणे व्यवहारास धरून नाही; त्यामुळे त्या कामी त्याच तोलामोलाचा मोहरा योजावा लागेल.


अगदी रास्त. आमच्या मते खुद्द हंबीररावांनीच ही जोखीम सांभाळावी. बरखास्त असले तरी सरनोबतच ते. तेव्हा सरनोबतांचे धरणे सरनोबतांनी सांभाळले तर ते रीतीला शोभून दिसेल.
आज्ञा महाराज.
बहिर्जी…
जी. नेताजी सरकारांसंगतच्या तुकडीत फितवा करन्यात यश आलंया. त्यांच्या अंगरक्षक दस्त्याचा रिसालदार नर्दुल्लाखान म्हनून कोनी पठान हाय. म्हाबतखानाचा खास मानूस. बाच्छावाच्या मर्जीनं त्येनं त्येला सरकारांवर ध्यान ठिवन्यासाठी पार अफगानिस्तानापासून ठिवलंया. आता त्यो सरकारांच्या बी मायत हाय. थ्येट त्यालाच फोडन्यात यश घावलंया. त्यो पठान पूर्वी सोराज्याच्या चाकरीत व्हता. पुरंदरानंतर जी थोडकी पडझड झाली त्यात घरटं सोडून उडून ग्येलेल्या पाखरांपैकी त्यो बी येक हाय. त्याला पूर्वीच्या इमानाची याद दिली, काळजाला काळजातून साद घातली. म्हाराजांचा कौल मिळवून देन्याचा वायदा क्येला आन फोडला गडी. छाप्याच्या राती त्योच पहाऱ्यावर ऱ्हाईल अशी तजवीज त्यो करनार हाय. त्याची समदी मानसं दोन्ही दंडांना पिवळी कापडं बांधून आन् डोईला पिवळी मुंडाशी बांधून ऱ्हातील.


नेताजी साल्हेर-मुल्हेरच्या जंगलात कधी येणार आहेत; काही अंदाज?
आता हंबीररावांनीसुद्धा मसलतीत अगदी मनापासून भाग घेण्यास सुरुवात केली.
जी सरकार. परवा ते शहरातून कूच करून निघतील. चार-सा रोजात त्ये ठरल्या ठिकानी पडाव करतील. येकाद दिवस अलीकडं-पलीकडं. मात्र येकदा मुक्काम केल्यानंतर आठ-धा दिस मनसोक्त शिकार खेळल्याबिगर त्ये काही हलायचे न्हाईत. ही खबर अगदी पक्की.


आज वद्य तृतीया आहे. म्हणजे नेताजी वद्य दशमीपर्यंत साल्हेर-मुल्हेरजवळ पोहोचतील म्हणायचे. साहजिकच त्यांचा मुक्काम मोगली सरहद्दीत खिंडीच्या पलीकडे पडलेला असणार.
जी सरकार.


हंबीरराव, उद्या दुपारनंतर तुम्ही गडावरून कूच करा आणि जल्दीने साल्हेरी गड गाठा. नेताजीकाकांसोबत किती हशम असतील म्हणालात, नाईक?
दोन-अडीचशे असत्याल. त्यात पन्नास नर्दुल्लाखानाच्या दस्त्यातले. मंजे आता आपल्या तर्फेने वळवलेले.
तर हंबीरराव निघताना तुम्ही सोबत दोनशे स्वार घ्या. तीनशे हशम साल्हेरीच्या शिबंदीमधून उचला. वाटल्यास पन्नास अधिक घ्या, पण हशम कमी पडता उपयागाचे नाही.
जी महाराज.
तुमच्यासोबत खुद्द बहिर्जी असतील. नाईक तुमच्या नर्दुल्लाखानास सूचना पोहोचत्या करा; वद्य चतुर्दशीच्या रात्री त्याच्या तळावर छापा पडेल. गड सोडताना तुम्ही सरनोबतांसोबत नसाल. वाटेतील कामे उरकत छाप्याच्या दोन दिवस आधी साल्हेरी गाठा. नर्दुल्लाने पक्क्या तयारीत राहावे. गफलत होता उपयोगाची नाही.


जी महाराज.
हंबीरराव, रायगडावरून नेलेले शंभर स्वार त्या रात्री बहिर्जीच्या हुकमतीखाली राहतील. बहिर्जी, नर्दुल्लास कळवणे दंगलीचा फायदा घेऊन नेताजीकाकांना घेऊन गर्दीच्या बाहेर काढणे. तो स्वत:च अंगरक्षकांचा रिसालदार असल्याने संशय न येता विना रोकटोक त्यास हे सहज साधावे. गर्दीतून बाहेर येताच बहिर्जीच्या तुकडीने नेताजीकाकांस व नर्दुल्लाच्या तुकडीस घेरावे. नेताजीकाका प्रतिकार करू पाहतील तर त्यांस जेरबंद करून चालवणे मात्र समजुतीने संगे येतील तर सन्मानाने वागवावे. अजिबात वेळ न दवडता स्वराज्यात दौड मारावी ती थेट रायगड जवळ करण्यासाठी. तुम्ही मागे वळून पाहण्याचे काम नाही. छाप्याचे बाकी सोपस्कार हंबीरराव सांभाळतील. रायगडाच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे ताज्या दमाची जनावरे घ्यायची या साऱ्याचा चोख बंदोबस्त तुम्ही साल्हेरीस पोहोचण्याआधी झाला पाहिजे. बाकी तपशील सांगणे गरजेचे नाही.


जी महाराज, चिंता नसावी. शक्यतो लवकर कैदी हुजूर दाखल केला जाईल.
हंबीरराव, छापा असा कारगीर झाला पाहिजे की, एकही शिपाई प्यादा, खिदमतगार वा खोजा जिवंत निसटता कामा नये. बऱ्हाणपूर किंवा औरंगाबाद कुठेही खबर पोहोचण्यासाठी कुणी जिवंत उरता कामा नये. नेताजीकाका रायगडी पोहोचल्याची आणि तळावर छापा पडल्याची अशा दोन्ही खबरी दाऊदखानास एकदमच समजू देत. तपास करण्यास येतील दहा-पंधरा दिवसांनी, तेव्हा त्यांना सापडू देत उद्ध्वस्त झालेला तळ आणि घारी-गिधाडांनी फाडलेली, कोल्ह्या-कुत्र्यांनी खाल्लेली त्यांच्या हशमांची प्रेते.
जी महाराज, तसेच होईल. पण प्रेतांना गती द्यायची नाही?


नाही. प्रेते तशीच सडत पडू देत. स्वराज्य बुडवण्यास निघाला आहे दाऊदखान, जाणवू देत त्याला स्वराज्याची दहशत. आमच्या सुसंस्कृतपणाला हे म्लेंच्छ दुबळेपणा समजतात. तेव्हा त्यांना त्यांच्याच भाषेत समजावलेले बरे. आमच्या अंदाजाप्रमाणे तळावर स्त्रिया नसतील. पण जर दुर्दैवाने असल्याच तरी त्यांचा अपवाद करू नये कारण हा प्रसंगच तसा बाका आहे. जखमी, शरणागत म्हणून अभय देणे नाही. सद्गुण विकृती ठरू पाहतील तर त्यांस मुरड घालून वास्तवाचे भान आणणे हीच राजनीती. ही राजनीती आम्ही सोडली आणि फक्त सद्गुणांचे डांगोरे पिटले. नतीजा? आज आमच्याच देशात आम्ही म्लेंच्छांचे गुलाम. हंबीरराव, एक जरी इसम वाचून पळाला तरी तुम्हाला किंमत मोजावी लागेल, हे पुरते ध्यानात असू द्या. सरनोबतीचा शिरपेच मस्तकी राहणार नाही.
आज्ञा. केसाइतकी कसूर होणार नाही खात्री असो देत.
रक्ताचे पाणी करून आम्ही स्वराज्य उभे करायचे. आमच्या माणसांचे रक्त सांडायचे, आमच्या आया-बहिणींनी विधवा व्हायचे तेव्हा कुठे स्वराज्य जीव धरू पाहते आहे आणि या तुर्कांनी लाखालाखांच्या फौजा आणून त्यावरून वरवंटा फिरवायचा. यापुढे स्वराज्याच्या हद्दीत घुसताना प्रत्येक मुघल सैनिकाच्या मनात दहशत निर्माण झाली पाहिजे. स्वराज्याविरुद्ध तलवारीस हात घालताना, मनाचा थरकाप झाला पाहिजे. लढाईस उभा ठाकण्यापूर्वीच तो मनातून खचलेला, पराजित झालेला असला पाहिजे. मग खुद्द आलमगीर चालून आला तर त्याचे थडगे इथेच बांधणे अवघड होणार नाही.


म्हणजे महाराज नेताजीरावांना गिरफ्तार करून आणणे हे काम आणि त्याचे निमित्त करून गनिमाच्या मनात दहशत बसवणे हे मुख्य काम असेच ना?
अगदी बरोबर. मोरोपंत, विखुरलेल्या छावणीवर अचानक छापे मारून तीच दहशत तुम्ही सर्वांनी निर्माण करणे आहे. ज्या रात्री हंबीरराव छापा घालतील त्याच रात्री म्हणजे वद्य चतुर्दशीच्या रात्री औरंगाबादच्या विखुरलेल्या छावणीवर छापे पडतील. त्यात कसूर वा दिरंगाई होता उपयोगाची नाही. ढिलाईचा मुलाहिजा राखला जाणार नाही. छाप्यात लुटीस महत्त्व नाही. किंबहुना या छाप्यांचे ते उद्दिष्टच नव्हे. या छाप्याचा हेतू आहे विनाश. दहशत. धाक. सर्व तोफा बहिऱ्या करून सोडा. दिसेल तेवढी बारूद जाळून टाका. भस्म करून टाका. सहजी हाती लागेल तेवढाच रोकड खजिना उचला. दारूच्या कोठारावर पेटते बाण टाका. हत्ती-घोडे मात्र हाकून घेऊन या. बाकी सारे अग्नेय स्वाहा। जेवढी म्हणून कत्तल उडवता येईल तेवढी उडवा. आपल्या तलवारींना गनिमांचे रक्त मनसोक्त पाजा. जर चुकून कोणी जिवंत राहिलाच तर त्याची अवस्था अशी व्हावी की, या परते मरण परवडले. मात्र आपली माणसे गमावणार नाहीत याची पण पुरती काळजी घ्या. कोणी वेडे साहस करता कामा नये. आपल्या माणसाचा जीव जाता कामा नये.


यानंतर बहिर्जीने छावणीचे गोट कोठे पडले आहेत, तिथल्या शिबंदीचा आणि हत्यारांचा नेमका अंदाज वगैरे तपशील सांगितला. त्यावरून कोणी कुठे आणि कसे छापे मारावे, कोणी कोणत्या ठाण्यावरून वा गडावरून शिबंदी उचलावी याचा नीट तपशील ठरला. सर्व तपशील पक्के होईतो दिवेलागण व्हायला आली. मंडळींना निरोप देताना महाराजांनी प्रत्येकास निक्षून सांगितले–



कामगिरी उरकताच कोठे रेंगाळणे नाही. तडक रायगड गाठणे. अनेक महत्त्वाची कामे तुम्हासाठी खोळंबली असतील. नेताजीकाकांचा फैसला तुम्हा देखताच झाला पाहिजे.
मुजरे घालून मंडळी बाहेर पडताच समया उजळण्यासाठी कुळंबिणी महालात आल्या.
क्रमश:

*____📜🚩

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...