नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔
अग्निदिव्य
__📜⚔🗡
_⚔🚩⚔📜🚩___
कुणाच्या हुकमाने? त्यांची खातरजमा कशी पटवलीस? त्यांनी दगा केला, फंद माजवला तर जिम्मेदार कोण? दरमहिना तनख्वाह तेवढा उचलायचा. त्याच्या खर्चाचा ब्योरा, ताळेबंद देण्याची गरज नाही. शाही खजिना म्हणजे काय अस्मानातून पडणारे बरसाती पाणी आहे? कोणीही कितीही वापरावा, कसाही नासावा?
मुन्शी गुलशन नक्वी ज्या दिवसापासून मी सरलष्कर झालो, त्या दिवसापासून कालपर्यंतचा फौजेचा ताळेबंद परवा तयार ठेवा. आम्ही दफ्तरखान्यात येऊन जातीने तपासणार आहोत. त्याचप्रमाणे मोहीम निघाल्या दिवसापासूनची अवघी जमाबंदी आम्ही कधीही तपासण्यास मागू, तयारीत राहा.
जो हुकूम जनाबे आली.
शेख अरमान आणि उस्मान अली, आज असरच्या नमाजापूर्वी तुमच्या फौजा पाणवठ्याजवळच्या मैदानात हजर करा. आम्ही जातीने तपासणी करणार आहोत. पुरा दस्ता जनावरे आणि हत्यारांसह हजर असला पाहिजे. बीमार आहे, फलाणे आहे असे बहाणे खपवून घेतले जाणार नाहीत. त्याशिवाय मुन्शी छावणीत आणि प्रत्येक ठाण्यावर द्वाही फिरवा, दोन घटकांची सूचना देऊन आम्ही कोणाच्याही फौजेची झाडाझडती घेऊ. तखलिया.
थरथरत्या हाताने कुर्निसात करून लटपटत्या पायाने तिघे बाहेर पडू लागले. ते जेमतेम दरवाजापर्यंत पोहोचले तोच आवाज आला–
मुन्शी गुलशन नक्वी, वजीरेआझम आणि जनाब महाबतखान सलामतांना खुफिया पत्र लिहिताना आत्ता इथे जे घडले ते आणि तसेच लिहा. अल्लाची भीती बाळग. बेईमानी करू नकोस कारण मी स्वत: आलाहजरतांना पुरा मसला कळवणार आहे. त्यांचा तुझ्यापेक्षा माझ्यावर जास्त विश्वास आहे.
काही उत्तर न देता घाईघाईने कुर्निसात करून तिघे निघून गेले. आफताबखान तिथेच रेंगाळत होता. आपल्या सरनोबतांचे हे तेजस्वी रूप फार वर्षांनी त्याला दिसले होते. ते रूप पाहून तो अत्यंत प्रफुल्लित झाला. पाण्याचा पेला घेऊन तो पुढे झाला. पेला हाती देता देता हळूच पुटपुटला-
आज धन्य झालो. आमचे जुने सरनोबत आज पुन्हा दिसले, तृप्त झालो. पण सरकार, अचानक अशी सख्ती? मराठा फौजेची शिस्त मुघल फौजेला लावताय. उद्या हे आपल्याला जड नाही ना जायचे?
साऱ्या फौजेतच नव्हे तर पार दिल्लीपर्यंत खळबळ उडाली पाहिजे. या फौजेत वरपासून खालपर्यंत सारे चोर भरलेले आहेत. बादशहा हे जाणत नाही असे नाही पण तो काही करू शकत नाही. उद्या या कागाळ्या तिथपर्यंत जाणारच. त्याला दखल घ्यावीच लागेल, त्याला कुमक तरी पाठवावी लागेल, नाहीतर परत तरी बोलावून घ्यावे लागेल. किती दिवस रिकामे बसणार माश्या मारीत. आता पाहणी करण्याच्या निमित्ताने पार इराणच्या सरहद्दीपर्यंत जायचे. मौका साधून थेट मकरान गाठायचे. कुमक येईल तेव्हा येवो.
फारच उत्तम सरकार.
आफताब मागे तू जसे पत्र पाठवले होतेस, तसेच पत्र लिहून ही बाब महाराजांना कळव. व्यापाऱ्यांचे गुमास्ते आणि लमाणांचे तांडे येत-जात असतात. आपण गाढवासारखे झापडबंद होऊन राहिलो. संपर्क साधण्याचा हा मार्ग आपल्या लक्षात कसा आला नाही?
खरोखरच. सरकार ही एवढी साधी बाब माझ्या कधी ध्यानातच आली नाही. एक पत्र सुखरूप पोहोचते झाल्यानंतरसुद्धा हा जरिया मला दिसला नाही. किती काळ मी मूर्खासारखा वाया घालवला. छे!
ठीक आहे. घडून गेलेल्या गोष्टी उगाळत बसून उपयोग नसतो. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. टपालाच्या मुन्शीलासुद्धा एकदा असेच दाबात घेतले पाहिजे. म्हणजे आपले काम जरा अजून सुकर होईल.
जरूर सरकार. फारच चढलाय तो. पैसे खाऊन चांगला गब्बर झाला आहे.
अपेक्षेप्रमाणे कुलीखानाचे हे स्वरूप सर्वांनाच आश्चर्यचकित करून गेले. छावणीत खळबळ उडाली. नवख्या कुलीखानाला दबावात ठेवून आपले उखळ पांढरे करून घेण्याचे बुजुर्ग मानकऱ्यांचे बेत बासनात ठेवण्याची वेळ आली. त्याने खरोखरच सरलष्कराचे सर्व अधिकार वापरायचे ठरविले तर कदाचित प्राणांशी गाठ पडायची, असा सुज्ञ विचार छावणीत पसरू लागला. आफताबखान आणि नर्दुल्लाखान दोघांनीही आपापल्या अखबारांमध्ये साऱ्या प्रकरणाचे रसभरित वर्णन दिल्लीत रवाना केले. लवकरच पुढचा वळसा देण्याचा बेत कुलीखान आखू लागला.
मौलाना घियासुद्दीन तीन आठवडे निरनिराळ्या सरदारांचा पाहुणचार घेत राहिला. वाटखर्चाची तरतूद म्हणून त्याने भरपूर माया गोळा केली. त्याला निरोप देण्याचा कार्यक्रम मोठा दणक्यात झाला. कूच करण्यापूर्वी त्याने कुलीखानाला लवून, झुकून कुर्निसात करीत विनंती केली–
जनाबे आली, आपल्या पायाशी एक विनवणी आहे. तेवढी मान्य करावी.
जरूर. होण्यासारखे असेल तर नक्कीच केले जाईल.
हुजूर माझे दोन मुर्शद आजारी झाले आहेत. एवढ्या लांबच्या बिकट प्रवासात त्यांना सोबत नेणे शक्य नाही. तरी त्यांची तब्येत दुरुस्त होईपर्यंत त्यांना आपल्या आश्रयाला ठेवून घेतले तर मोठी मेहेरबानी होईल. तब्येत पुरेशी सुधारली तर ते पुढे येऊन आम्हास मिळतील. त्यांना वाटले तर घरी परत जातील. तसेच आमचे दोन हमराह प्रवासाच्या दगदगीने आणि वाटेत घडलेल्या काही प्रसंगांनी घाबरून गेले आहेत. त्यांच्या नशिबात हज दिसत नाही. त्यांना पण परत जायची इच्छा आहे. आपण कृपावंत होऊन त्या चौघांना आवश्यक ते परवाने देऊन घरी रवाना करण्याची मेहेरबानी करावी.
घियासुद्दीनच्या विनंतीमधली गोम कुलीखानाच्या लक्षात लगेच आली. पण चेहरा निर्विकार ठेवत त्याने तोंडभर आश्वासन दिले–
त्यात काय मोठेसे? पण त्यांच्याकडे प्रवासासाठी स्वत:ची जनावरे आणि वाटखर्चासाठी पुरेसे पैसे आहेत का?
जी सरकार. आपण साऱ्यांनी कृपावंत होऊन मला इतके दिले आहे की, मी त्यांना परतीच्या प्रवासासाठी पुरेसे धन देऊ शकलो आहे. प्रत्येकासाठी एकेक उंट मी मागे ठेवीत आहे.
उत्तम. मग तर कोणताच प्रश्न नाही. नर्दुल्लाखान, जे दोघे लगेच परत जात आहेत, त्यांची व्यवस्था या आठवडाअखेरीस जाणाऱ्या डाकेसोबत झाली पाहिजे. आजारी इसम आफताबखानाच्या स्वाधीन कर. त्यांच्या जिवाला धोका होता कामा नये याची त्याला नीट ताकीद दे. तबियत पुरेशी सुधारली की, मला कळव आणि त्यांच्या वापसीच्या परवान्यांचा बंदोबस्त कर.
जमिनीपर्यंत झुकून मौलानाने आभार मानले. ‘लबैक, लबैक’च्या पुकाऱ्यात काफिल्याने कूच केले. हिंदकळणाऱ्या उंटावरच्या अंबारीतून मौलाना घियासुद्दीन पुन:पुन्हा मागे वळून पाहत होता. डोळ्यांतून पाझरणारे पाणी गमछा उचलून पुसण्याचे भान त्याला राहिले नव्हते.
मौलाना घियासुद्दीनच्या असण्याने छावणीत थोडी चहलपहल निर्माण झाली होती. त्याच्या जाण्यानंतर पुन्हा तोच मरगळलेला दिनक्रम सुरू झाला. तो गेला त्याच्या तिसऱ्या दिवशी भल्या सकाळी कुलीखानाने फौजेचा डाकमुन्शी रहमत अलीला बोलावून घेतले. मुन्शी गुलशन नक्वीला नुकताच जो दणका मिळाला होता त्या अनुभवाने रहमत अली धास्तावला होता. टपाल व्यवस्थेची जुजबी चौकशी करून कुलीखानाने त्याच्याकडून वळणावळणाने बरीच माहिती काढून घेतली. वास्तविक एवढी वर्षे त्याने छावणीत एवढ्या मोठ्या पदावर काढली होती, तरी यासंबंधीचा सर्व तपशील त्याच्यासाठी नवा होता. या विषयातील त्याच्या अनभिज्ञतेचा खालचे लोक चांगलाच फायदा उठवीत असल्याचे त्याच्या चाणाक्ष मनाने टिपले. असा प्रकार अनेक बाबतींत घडत असावा हे त्याने ताडले. लवकरात लवकर सर्व विषयांचा पूर्ण ताबा मिळवायचा हे त्याने मनोमन ठरविले. बोलणी अत्यंत शांतपणे चालू असल्याने रहमत अलीचा धीर बराच चेपला होता. सरलष्कराला आपण बरोबर गुंडाळले आहे या समजुतीने तो मनातल्या मनात खूश होत असताना सहज विचारावे तसे कुलीखानाने विचारले–
तर मुन्शी रहमत ही झाली आपली, सरकारी डाक पाठवण्याची व्यवस्था. याशिवाय अनेक सरदार, दरबारी, व्यापारीसुद्धा आपले खलिते, टपाल, व्यक्तिगतपत्रे किंवा भेटवस्तू वगैरे पाठवीत असतील, जसे मी पेशावरला माझ्या कुटुंबाला आणि गुमास्त्यांना पाठवतो आणि त्यांच्याकडून मागवतो नाही का? त्याचे कसे काय?
जी, जनाबे आली. त्याची व्यवस्थासुद्धा आपल्या डाकेच्या काफिल्यासोबतच केली जाते. प्रत्येक सरदाराचा आणि दरबाऱ्याचा दिल्लीत वाडा आहेच. तसेच प्रत्येक मोठ्या व्यापाऱ्याची दिल्लीत पेढी आहेच. बड्या असामींची डाक सरकारातून पोहोचवली जाते, बाकी आम लोक दफ्तरखान्यात अधूनमधून चौकशी करतात तेव्हा त्यांची डाक त्यांना सुपुर्द केली जाते. व्यापाऱ्यांचे गुमास्ते शाही दफ्तरखान्यातून रोज डाक गोळा करतात. जर विशेष जोखमीचा ऐवज पाठवायचा असेल तर त्यांचा माणूस आपल्या काफिल्यासोबतच जातो.
‘सरकारी डाकेची जशी दफ्तरी नोंद असते तशी या खासगी डाकेची काही नोंद असते का?
जी, जनाबे आली. आमच्या माहितीसाठी आम्ही कच्ची नोंद ठेवतो.
जी खासगी आणि व्यापारी डाक सरकारातून जाते तिच्यासाठी सरकार काही हशील घेते का?
कुलीखानाचा मनमोकळा सहज भाव पाहून रहमत अली बराच निर्ढावला होता. सहजपणे तो बोलून गेला-
जी नही सरकार. एवढ्या मोठ्या शाही रगाड्यात अशी कामे अनायासे खपून जातात.
अस्सं! म्हणजे लोकांची डाक पोहोचती करण्याचे काम सरकार धर्मादाय खात्यातच करते म्हणायचे. पण त्यांच्यावर अशा मेहेरबानीसाठी ही मंडळी तुला काहीतरी देतात की नाही?
आता मात्र रहमत अली गडबडला. कुलीखानाच्या शांतपणाच्या सापळ्यात तो बरोब्बर फसला होता. तो काहीच बोलेना. खाली मान घालून थरथर कापत नुसताच उभा राहिला. दोन-तीन वेळा हाच प्रश्न पुन:पुन्हा विचारला गेला तरी त्याच्या तोंडून शब्द फुटेना. कुलीखानाच्या आवाजाची पट्टी तशीच अन् शांतपणा तोच असला तरी त्याची धार जाणवणारी होती.
आपल्या फौजेने पेशावर सोडल्यापासून आजपर्यंत जेवढी खासगी डाक तुझ्या हातून गेली त्यांचा संपूर्ण ब्योरा मला एक हप्त्याच्या आत पाहिजे. त्याचप्रमाणे ही डाक पाठवण्यासाठी जी माया तू गोळा केलीस, तीसुद्धा एका हप्त्यात सरकारात जमा झाली पाहिजे. ती बरोबर आणि पुरती जमा झाली आहे किंवा नाही याची शहानिशा मी सावकाश करीन. मात्र यात कसूर सापडली तर तुझी खैरियत राहणार नाही हे लक्षात ठेव. शाही अधिकाऱ्यांकडून अशा कामाचे पैसे घेतल्याचे कानी आले, तर नतीजा ठीक होणार नाही याची याद राखून ठेव. मात्र व्यापाऱ्यांच्या प्रत्येक टपालाचा खर्च सरकारी तिजोरीत जमा झालाच पाहिजे. त्यासाठी फौजेचा मुन्शी किंवा बक्षी तुला योग्य हुकूम देतीलच.
जिवावरचे शेपटीवर निभावले या समाधानात रहमत अली कुर्निसात करीत गडबडीने निघून गेला. त्याची तारांबळ पाहून आफताबखानाला हसू आवरेना.
आफताब, यापुढे तुला पत्र पाठवताना काहीच अडचण येणार नाही.
हे फारच सोयीचे झाले सरकार.
जौहरच्या नमाजानंतर सरलष्कराची सदर बसली. रसदीची चणचण, खजिन्याचा खडखडाट आणि खंडित झालेली मोहीम हाच मोठा विषय होता. मोहीम पुढे सुरू करण्याचा विषय सोडून बाकी दोन्ही बाबींवर मोठ्या तावातावाने चर्चा झाली. काही बुजुर्ग मंडळी शिरा ताणून बोलली. सर्वांचा ताव निवल्यानंतर कुलीखानाने बोलायला सुरुवात केली–
शाही दफ्तराचा हवाला द्यायचा तर अफगाणिस्तानात तैनात असलेली शाही फौज पस्तीस हजार आहे. पण जेव्हा प्रत्यक्ष मोजदाद झाली तेव्हा मात्र फौज फक्त पंचवीस हजारच भरली. शाही खजिन्यातून गला आणि तनख्वाह मात्र पुरा पस्तीस हजारांचा उचलला जातो. कोणाच्या निसबतीत किती शिपाई कमी आहेत ते आम्ही आता जाहीर करणार नाही. ज्याला त्याला ते माहीत आहे. मात्र प्रत्येकाला आम्ही आगाह करतो, आजपासून बरोबर तीस दिवसांनी पुन्हा एकदा गणती होईल. त्या वेळी मात्र फौज कमी भरली तर मुलाहिजा राखला जाणार नाही. बलुचिस्तान, गिलगिट, काश्मीर, लडाख, पंजाब, सिंध जिथून मिळतील तिथून जवान भरती करून आणा, पण फौज पुरती खडी राहिली पाहिजे. दुसऱ्याचे शिपाई आपल्या दस्त्यात उभे करून कोणी लबाडी करू पाहील तर नतीजा ठीक होणार नाही. ज्याची लबाडी पकडली जाईल त्याला गद्दार करार केले जाईल. त्याचा ओहदा काय याचा मुलाहिजा राखला जाणार नाही.
इतका वेळ तावातावाने बोलणाऱ्यांची वाचाच बसली. माना अधिकच खाली झुकल्या. कुलीखानाचा आवेश आणि तडफ अशी होती की, आडवे जाण्याची कोणाची हिंमत झाली नाही. आज एक वेगळाच कुलीखान सर्वांना दिसत होता. उदास, अलिप्त, घुमा सरलष्कर कुठे विरून गेला होता. सर्वांवर नजर फिरवत कुलीखान पुन्हा बोलू लागला-
शिरगणतीमध्ये अजून काही धक्कादायक माहिती आमच्या हाती आली आहे. प्रत्यक्ष लढाऊ फौज फक्त पंचवीस हजार, तर छावणीतला जनानखाना आणि शागिर्दपेशा पंधरा हजार. त्याशिवाय जनानखान्यासाठी राबणारे बिगारी, वेठबिगार आणि गुलाम अलग. या सर्वांसाठी लागणाऱ्या दाणागोट्याची आणि चारावैरणीची उचल फौजेसाठी येणाऱ्या शाही रसदीमधूनच केली जाते. बड्या मानकऱ्यांच्या आणि दरबारींच्या जनानखान्यातच अर्ध्यापेक्षा जास्त रसद जिरते. परिणाम? प्रत्यक्ष लढाऊ सैन्याला रसद अपुरी पडते. त्याची उपासमार होते. वास्तविक शाही रसद फक्त लढाऊ फौजेसाठी असते. शिपाई उपाशी राहिला तर जोमाने लढणार कसा? साहजिकच तो लूटमार करण्यास प्रवृत्त होतो. मग या मुलखातली रयत आपली दुश्मन बनून राहिली तर नवल करण्याची गरज नाही. एकदा मुलूख जिंकला की, तिथली रयतसुद्धा शाही अमलाखाली आलेली मुघली रयत समजली पाहिजे. तरच जिंकलेल्या प्रदेशात सलतनत कायम होते. नाहीतर आज जे घडते आहे तेच ता कयामत चालत राहील, फौज लढत राहील, मरत राहील, जिंकतसुद्धा राहील पण सलतनत कायम होणार नाही. बंडखोरी होत राहील, प्रदेश हातून जात राहील.
आपल्या बोलण्याचा काय परिणाम झाला याचा अंदाज घेण्यासाठी कुलीखान किंचित थांबला. तेवढाच मौका साधून गुलाम हैदरने मध्ये तोंड घातले–
गुस्ताखी माफ हुजूर, पण आपल्या रसदीची नेमकी गरज आलमपन्हांना पटवून देण्यात आपण कमी पडत आहोत. जनाबे आली नवाब महाबतखान हुजुरांच्या जमान्यात रसदीची किल्लत कधी झाली नाही आणि अशी रोती सूरत करून बसण्याची नौबत आली नाही. सगळीकडे अमन आणि चैन होती. मोहीम बेरोक जारी होती. कामयाबी हासिल होत होती. गफलत कुठे आहे आपणच आत्मपरीक्षण करून शोधली पाहिजे.
गुलाम हैदरच्या स्वरातील उपहास, हेटाळणी आणि तुच्छता जाणवण्याइतपत स्पष्ट होती. आतापर्यंत शांत, संयत पण दृढ स्वरात बोलणाऱ्या कुलीखानाचा स्वर उंचावला, कपाळावर आठ्यांचे जाळे उमटले; मुठी आवळल्या गेल्या. नजरेतून अंगार फेकत कुलीखान गरजला–
ज्या अर्थी नवाब महाबतखान साहेबांना दिल्लीत परत बोलावून घेण्यात आले, एवढेच नव्हे तर त्यांच्यासोबत बहुतेक सर्व फौज परत बोलावली गेली, त्या मागोमाग खजिना आणि गला दोन्हीमध्ये कटौती करण्यात आली, त्या अर्थी हे साफ आहे की, आलाहजरतांसमोर कोणतीतरी मोठी अडचण निर्माण झाली आहे. फौज आणि सामान अन्यत्र वापरण्याची निकड निर्माण झाली आहे. प्रत्येक गोष्टीचे आपल्याला स्पष्टीकरण देण्यास आलाहजरत बांधील नाहीत. तख्ताचे एकनिष्ठ चाकर आणि बंदे गुलाम म्हणवणाऱ्या आपल्यासारख्या बुजुर्गांनी हे समजून घेतले पाहिजे. पूर्वीपेक्षा कितीतरी कमी रसद पोहोचत आहे. पण रसद पोहोचते आहे याचा अर्थ आलमपन्हा आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. रही बात अमन चैनची. आपण या प्रदेशात जिहाद झुंजण्यास आलो आहोत. सैरसपाटा आणि हवाफेरीसाठी नाही. फौज जेव्हा अमन चैनची अपेक्षा करते तेव्हा आवाम परेशान होते. इतकी वर्षे आपण या मुलखात धूळ छानत आहोत, काय हासिल केले आपण? अनेक मोठे विजय मिळवले, बंडखोर परास्त केले, पण सलतनत कायम करू शकलो नाही. कारण आपण फक्त आपल्या आणि आपल्या जनानखान्याच्या चैनीचा विचार करीत राहिलो. जनानखाने राखण्यासाठी आपली मोठी फौज छावणीतच गुंतून पडते. मग झुंजात फौज कमी पडते. हे आता थांबले पाहिजे. सरलष्कर म्हणून आम्ही आलमपन्हांना जवाबदेह आहोत. काही गमवावे लागले तर त्यासाठी असली फुसकी कारणे पुढे करणे आम्हाला शक्य नाही. खैर, आतापर्यंत जे घडले त्याच्याशी आमचा तेवढा सरोकार नाही. यापुढे फौजेत, छावणीत आणि संपूर्ण इलाख्यात तेच घडेल, जे आम्हाला हवे आहे, जे आम्ही ठरवू. नाफर्मानी करण्याची कोणी हिंमत दाखवू पाहील तर या ने… कुलीखानाची समशेर अशी बगावत मोडून काढण्याची काबिलीयत बाळगते याचे प्रत्येकाने भान ठेवावे.
सदर स्तब्ध झाली. पिढ्यान्पिढ्या तख्ताच्या सेवेत गेल्या, पण बादशहा आणि वजीरेआझम वगळता इतक्या रोखठोक भाषेत, अशा परखडपणे सर्वांदेखत कोणी त्यांना असे सुनावले नव्हते. आजघडीला या भूमीत सरलष्कर हा त्यांचा सर्वश्रेष्ठ सर्वेसर्वा अधिकारी होता. बादशहाचे सर्व अधिकार त्याच्या हातात एकवटले होते; त्यामुळे त्याला विरोध करणे झेपणारे नव्हते. सदरेत अस्वस्थ शांतता भरून राहिली. किंचित थांबून अंदाज घेऊन कुलीखानाने फौजेचा मुख्य मुन्शी गुलशन नक्वी याला खूण केली. अदब बजावत लटपटत्या पायांनी मुन्शी दोन पावले पुढे झाला.
मुन्शी गुलशन नक्वी, उद्याच्या उद्या छावणीत आणि प्रत्येक ठाण्यावर आमचे हुकूम जारी करा. फौजेत, ठाण्यावर वा छावणीत कोणाही शिपायाला, सरदाराला वा दरबारी मानकऱ्याला, खोजा, दासी, बटकी, रखेल वा नाटकशाळा इतकेच नव्हे तर बेगम, लग्नाची बायको, कोणत्याही नात्याने स्त्री ठेवण्यास सख्त मनाई करण्यात आली आहे. ज्या कोणा सरदाराचे वा अधिकाऱ्याचे जनानखाने कोणा ठाण्यावर वा छावणीत असतील त्यांनी एक हप्त्याच्या आत आपले जनानखाने आमच्या जहागिरीच्या शहरात, पेशावर येथे रवाना करावेत. आमचे गुमास्ते त्यांच्या राहण्यासाठी योग्य भाड्यात महाल, वाडा वा घर शोधून देतील. आजपासून जोपर्यंत फौज राजधानीत दाखल होत नाही तोपर्यंत प्रत्येक सरदार, दरबारी, मानकरी आपल्या जनानखान्याचा खर्च स्वत: करील. शाही खजिन्यातून त्यासाठी कोणतीही रक्कम देण्यात येणार नाही. छावणीत कोणाहीकडे कोणत्याही नात्याने स्त्री आढळली तर सख्त कारवाई केली जाईल. हुद्द्याचा आणि ओहद्याचा मरातब राखला जाणार नाही. शाही खजिन्यातून आजपर्यंत जनानखान्यांवर झालेल्या खर्चापोटी प्रत्येकाने आपल्या स्वत:च्या जहागिरीच्या उत्पन्नातून रोख रुपये पंचवीस हजार छावणीच्या शाही खजिन्यात भरणा करावे. त्यासाठी चार महिन्यांची मुदत दिली जात आहे. जर कोणी शिपाई, अंमलदार वा अधिकारी रयतेकडून जमीन वा जना यांपैकी काही लुटून घेण्याचा प्रयत्न करताना दोषी आढळेल, त्याला अत्यंत कठोर शिक्षा ठोठावण्यात येईल, अशी सख्त ताकीद सर्वत्र जारी करा. मोहिमेदरम्यान जमा होणारी संपूर्ण गनीमत छावणीत जमा करण्यात आली पाहिजे. काझीच्या सल्ल्याने प्रत्येकाचा वाटा धर्मात सांगितला आहे त्या अनुसार वाटला जाईल. कोणी लूट परस्पर दाबू पाहील तर गर्दन छाटण्यापर्यंतची कोणतीही शिक्षा सुनावली जाईल, अशी ताकीद जारी होऊ देत.
उद्यापासून कधीही, आगाऊ सूचना न देता आम्ही प्रत्येक ठाण्याला भेट देणार आहोत. सर्वांना सतर्क करणारे इशारे रवाना झाले पाहिजेत. आमच्या हुकमांवर कोणास आपत्ती जाहीर करायची असल्यास वा काही दुरुस्ती सुचवावी वाटत असल्यास किंवा कोणा तपशिलाचे अधिक स्पष्टीकरण हवे असल्यास या क्षणी मोकळीक आहे. एकदा हुकूम जारी झाले की, नंतर नाफर्मानीस दया नाही.
प्रत्येकजण अस्वस्थ चुळबुळ करीत होता पण तोंड उघडून बोलण्याची हिंमत कोणातच नव्हती. थोडा वेळ वाट पाहून कुलीखानाने निरोपाचे विडे व अत्तर-गुलाबाची तबके फिरविण्याची खूण केली आणि तबके फिरत असतानाच तो सदरेतून उठून गेला. तो जाताच सदरेवर संतापाचा कल्लोळ उठला. पण संताप वांझोटा होता. बडबड करण्यापलीकडे काही करण्याची कोणात हिंमत नव्हती, कारण प्रत्येकजण मनोमन जाणत होता की, त्यांचे व्यक्तिगत स्वार्थ आणि हितसंबंध दुखावले असले तरी हे निर्णय अंतिमत: फौजेच्या कल्याणाचे, मोहिमेच्या आणि तख्ताच्या हिताचे होते. बादशहा त्याचीच पाठराखण करणार होता.
कुलीखान महालात परत आला. त्याचा पोशाख उतरविताना आफताबखानाने हळूच विचारले-
सरकार, आपण येथून निसटून जाण्याच्या योजना तयार करण्याच्या फिकिरीत आहोत आणि आपण तर अवघ्यांनाच शिस्त लावण्यास आणि खजिन्याची भर करण्यास निघाला आहात. बादशहा खूश झाला आणि तुम्हाला सुभेदार म्हणून कायम केले तर?
खुळा आहेस तू आफताब. ही मोगलाई आहे. शिवशाही नव्हे. हा अवघा वृत्तान्त मी उद्या रवाना होणाऱ्या डाकेतूनच पाठवणार आहे. एकदा अंमलबजावणीची सख्ती सुरू झाली की, तक्रारींच्या पत्रांची रीघ लागेल. काही उघड तर काही गुपचूप, काही गुप्त. हे नामर्द अय्याश तेवढेच करू शकतात. बादशहाला यात बंडखोरीचा, स्वतंत्र वृत्तीचा वास येईल. कदाचित तक्रारींची शहानिशा करण्यासाठी मग बादशहा राजधानीत बोलावून घेईल. काबूलपेक्षा दिल्ली स्वराज्याला जवळ आहे. आपला मार्ग जास्त आसान होईल. नाही का?
आफताबखानाचा ऊर आनंदाने आणि अभिमानाने भरून आला. त्याचे सरनोबत जुन्या तेजाने पुन्हा झळाळू लागले होते. हा सगळा वृत्तान्त बहिर्जीकडे आणि पुढे स्वराज्यात महाराजांकडे कधी एकदा रवाना करतो असे त्याला होऊन गेले. फुलादखानालासुद्धा हे कळवायचे होते; कोणी माथेफिरू यामुळे भडकून सरनोबतांना दगा करण्याची शक्यता होती. नर्दुल्लाखानाला याची जाणीव देऊन सतर्क करणे जरूर होते. मालकांचे झटपट आवरून नर्दुल्लाखानाला गाठण्यास आणि पुढची कामे उरकण्यास तो तातडीने महालाबाहेर पडला.
कुलीखानाच्या हुकमांची अंमलबजावणी सक्तीने सुरू झाली; त्यामुळे आम शिपायाला पुरेसा दाणागोटा मिळाला. जनानखान्यासाठी कराव्या लागणाऱ्या फुकटच्या हमालींमधून त्यांची सुटका झाली; त्यामुळे फौजेत समाधान पसरले पण दरबाऱ्यांचा आणि मानकऱ्यांचा नाराजीचा सूर आठ-दहा दिवस लोटले तरी उणावत नव्हता. वातावरण आपोआप निवळेल या हिशेबाने या दिवसांत कुलीखान कोणात मिसळत नव्हता. रोजची सदर त्याने बंद ठेवली होती. नमाज पढण्यासाठी मशिदीत जाणे तो टाळत होता. त्यानंतर एक दिवस त्याने निवडक बड्या मानकऱ्यांना आपल्या महालात जौहरच्या नमाजानंतर जेवणाची दावत दिली. मनात असो वा नसो, दरबारी शिस्तीचा भाग म्हणून निमंत्रण टाळणे त्यांना शक्य होणार नाही हे तो ओळखून होता. शिवाय तो मुद्दाम नमाजासाठी हजर राहिला आणि जातीनिशी त्यांना पुढे घालून घेऊन आला.
मेजवानीचा थाटमाट मोठ्या बडेजावाचा ठेवला होता. अनेक चविष्ट मसालेदार पदार्थांची नुसती रेलचेल उडविली होती. मेवा-मिठायांना गणतीच नव्हती. पाण्याच्या ऐवजी वेगवेगळ्या प्रकारची सरबते ठेवली होती. उणीव फक्त दोन गोष्टींची होती. दारू आणि तवायफांचे नाच-गाणे; त्याला जाणीवपूर्वकच फाटा दिला गेला होता. कारण दोन्ही गोष्टींना इस्लामची इजाजत नाही. सुरुवातीला मंडळी जरा घुश्शातच होती. पण मेजवानीचा आस्वाद आणि कुलीखानाचे अगत्यशील आतिथ्य आणि विनम्र वर्तणूक, आर्जवी बोलणे याचा हळूहळू योग्य परिणाम जाणवू लागला. मंडळी सैलावली. मग अंमळ मोकळी झाली. मग संधी साधून कुलीखानाने आपण घेतलेल्या निर्णयांची आणि उचललेल्या कठोर पावलांची कारणमीमांसा, युक्ती-प्रयुक्तीने त्यांना समजावून सांगितली.
पराक्रम करून जिंकलेला विस्तीर्ण भूप्रदेश. त्या प्रदेशातील लोकांचे विचित्र आणि बेभरवशाचे स्वभाव, स्थानिक रयतेत धुमसत असलेला प्रचंड विद्वेष, फौजेतला असंतोष हे सर्व सांभाळण्यासाठी हाती असलेले मनुष्यबळ मात्र अत्यंत तोकडे, साधनसामग्री मर्यादित, जनानखाने छावणीत असल्याने उद्भवणारे अनेक प्रश्न, अनवस्था प्रसंग, गुंतून राहणारे मनुष्यबळ वगैरे सर्व बाबींची त्याने अत्यंत गोड आणि आर्जवी भाषेत मीमांसा केली. वरवर अन्यायकारक वाटणारे निर्णय अंतिम हिताच्या दृष्टीने कसे योग्य आहेत हे त्याने नीट पटवून दिले.
तो यारो, माझा रवय्या जरी जालीम वाटला तरी तो योग्य आहे हे आता तुमच्या ध्यानात आले असेल. एवढ्या मोठ्या प्रदेशाच्या हिशेबाने आपली फौज मूठभरच म्हणावी लागेल. तीसुद्धा दूरवर पसरलेली! इथली रयत जरी आपला द्वेष करीत असली तरी ती विखुरलेली आहे. उद्या त्यांना समर्थ नेता लाभला, ते संघटित झाले तर आपली चटणी उडायला वेळ लागणार नाही. आमच्या डोळ्यांसमोर दोन महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. एक जिंकलेले साम्राज्य राखणे आणि बायका-मुलांसह सुरक्षित घरी परत जाणे. उद्या या लोकांनी उठाव केला तर साहजिकच त्यांचा पहिला घाला आपल्या बायका-मुलांवर पडणार. त्यांना वाचवण्यात गुंतलो तर प्रदेश गमावणार असा हा तिढा आहे.
याशिवाय आपल्या वतनापासून, घरादारापासून, बायका-मुलांपासून दूर एकाकी वर्षानुवर्षे लढत असलेले आपलेच सर्वसामान्य सैनिक. आपल्या जनानखान्यांकडे पाहून अस्वस्थ होतात आणि बायका पळवून बलात्कार करणे वगैरे गुन्ह्यास प्रवृत्त होऊ शकतात. त्याची झळ क्वचित कधी आपल्या जनानखान्याससुद्धा पोहोचते. स्थानिक रयतेत तर त्यामुळे पराकोटीचा विद्वेष आणि वैरभाव निर्माण होतो. शिस्त राखण्यासाठी आपल्याला आपल्याच लोकांना सजा द्यावी लागते. त्याचा आपल्या फौजेवरसुद्धा उलटा परिणाम होतो. अखेर नुकसान कोणाचे? आपलेच. मला तुमच्या भावनांची पूर्ण कल्पना आहे. पाच-सहा महिने जाऊ द्या. मग आळीपाळीने एक-एक, दोन-दोन मानकऱ्यांना आपण रजा देत राहू, ते काही दिवसांसाठी पेशावरला जातील. विश्रांती घेतील, आपल्या माणसांत राहतील, ताजेतवाने होतील; परत येऊन नव्या जोमाने उत्साहाने कामाला लागतील.
भरल्यापोटी मंडळींना हे सारे नीट पटले. त्यांचा रोष जरा कमी झाला. त्यानंतर कल पाहून कुलीखानाने बिनकामाच्या, बसून असलेल्या फौजेचा आणि अपुऱ्या खजिन्याचा विषय काढला. सहज सुचल्याप्रमाणे कुलीखान म्हणाला–
अफगाणिस्तानातून हिंदोस्तानात हिंग, सैंधव, काळे मीठ, शिलाजित, औषधे, दगडफूल, नागकेशर यांसारखे मसाले; बदाम, मनुके, चिलगोजे असे सुकामेवा, खसखस, अफू, गांजा असा मोठा माल जातो. अरबी आणि तुर्की व्यापारीसुद्धा आपला माल अफगाणिस्तानातूनच हिंदोस्तानात नेतात. हिंदोस्तानातून माल येतो. व्यापाऱ्यांचे तांडे सतत येत-जात असतात. फार मोठा व्यापार चालतो. त्या मालावर जकात लावली तर आपले अनेक खर्च वरच्यावर निघतील. अफगाणी पठाण व्यापारी तांड्यांची येता-जाता लूटमार करतात. आपण आपल्या हद्दीतून जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या काफिल्यांना आपले संरक्षण पुरवू. त्यासाठी त्यांच्याकडून चांगला पैसा तर मिळेलच शिवाय आपली फौज आज रिकामी बसून आहे ती गुंतून राहील. ठरावीक काळाने तुकड्या बदलत्या राहतील. त्याशिवाय अनेक दिवसांपासून एकाच ठाण्यात गुंतून असलेल्या तुकड्या बदलत ठेवल्या तर वातावरणातल्या बदलाने थोडे चलनवलन निर्माण करता येईल. तुम्हाला कसे वाटते?
मोठ्या उत्साहात मंडळींनी दिलखुलास चर्चा करून या योजनांना गर्मजोशीने पाठिंबा दिला. कुलीखानाने एक आघाडी जिंकून आपल्या आटोक्यात आणली होती. पूर्वी सदरेवर त्याला विरोध करण्याचे धाडस करणारा गुलाम हैदर म्हणाला-
हुजुरे आली, आपण जर आम्हाला हे सारे आधीच समजावून सांगितले असते, तर बरे झाले असते. आम्ही तर शिकायतीचे खलिते दरबारात रवानासुद्धा केलेत. आता काय करायचे?
त्या वेळी तुमची माथी गरम होती. स्वत:च्या सुखाला धक्का लावून घेण्यास कोणी सहजासहजी तयार नसतो. आम्ही कितीही माथाकूट केला असता, तरी तुम्हाला ते पटले नसते. आता तुम्ही सहज समजावून घेतलेत कारण निर्णय झालेला आहे. त्या वेळी हे इतक्या सहजपणे तुमच्या गळी उतरले नसते. तुम्ही आमची शिकायत करणार ही आम्हाला खात्री होतीच. आम्ही याविषयी वजीरेआझम सरकारांना सविस्तर खलिता पाठवला आहे. आम्हाला आत्मविश्वास आहे जसे आमचे म्हणणे तुम्हाला पटले तसे त्यांनासुद्धा पटेल आणि ते आलमपन्हांना नीट पटवून देतील कारण त्या दोघांचा तुम्हा कोणाहीपेक्षा आमच्यावर जास्त विश्वास आहे.
तृप्त पोटाने आणि समाधानाने निरोपाचे विडे घेऊन मंडळी परत गेली. रिवाजाप्रमाणे आपण सरलष्करांसाठी अहेर आणि नजराणे घेऊन न आल्याची हळहळ प्रत्येकाने व्यक्त केली. दहा-दहा वेळा माफी मागितली. साधायचे ते साधले असल्याने कुलीखानाने मनाचा मोठेपणा दाखवत माफी दिली.
या सर्व प्रकरणाचा बारीकसारीक तपशील आपल्या अखबारांमधून देण्याची सूचना आफताबखान आणि नर्दुल्लाखानाला देण्यात आली. नजरबाजीचे सारे कौशल्य वापरून रसभरित वर्णनांनी भरलेले खलिते एकामागोमाग एक पाठविण्याचा त्यांनी सपाटा लावला. प्रत्येक खबर आता स्वराज्यात पोहोचती होऊ लागली हे निराळे सांगणे नकोच. जुना मराठी खाक्या वापरून कुलीखानाने एकेका ठाण्यास भेट देण्याचा धडाका लावला. जनानखाना आणि बाजारबुणग्यांचा भार दूर झाल्याने, सामान्य शिपायापर्यंत पुरेसा शिधा आणि दाणागोटा पोहोचू लागल्याने सामान्य शिपाई समाधानी झाला होता. सर्वत्र कुलीखानाचा धाक आणि दरारा निर्माण झाल्याने सर्व पातळ्यांवरच्या भ्रष्टाचारास मोठाच आळा बसला होता. व्यापाऱ्यांकडून नवे उत्पन्न सुरू झाले होते. तो पैसा नवे तंबू, राहुट्या पुरविण्यासाठी वापरला गेला. शिपायांसाठी नव्या घोंगड्या, रुईदार अंगरखे, लोकरी कोपरी-बंड्या वगैरे उपलब्ध करून दिल्या गेल्या; त्यामुळे रात्री-अपरात्री, थंडीवाऱ्यात पहारा करणाऱ्या, गस्त घालणाऱ्या शिपायांची उत्तम सोय झाली. ते नव्या सरलष्करांना दुवा देऊ लागले. प्रत्येक ठाण्याला भेट दिली की, कुलीखान मोगली बडेजाव एका बाजूला ठेवून सर्वसामान्य शिपायांमध्ये मिळूनमिसळून त्यांची चौकशी करू लागला. त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊ लागला; त्यामुळे थोड्याच अवधीत तो सर्वसामान्य शिपायांच्या गळ्यातील ताईत बनला, कारण आजवर मुघल अधिकारी शिपाई आणि जनावर यांत विशेष फरक करीत नसत. एवढा मोठा अधिकारी प्रथमच त्यांना माणूस म्हणून वागवत होता. दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील आणि तरुण सरदारांवर त्याने विशेष लक्ष केंद्रित केले. त्यांना सलगी दाखवून आपलेसे करून घेण्याचे धोरण राखू लागला. कोठेही गेला तरी त्याच्याभोवती तरुणांचा घोळका असे. दुपारचे भोजन वा सकाळची न्याहारी तो सहसा तरुणांसोबतच घेणे पसंत करी. अबूबकर उमर वगैरेंच्या काळातील मुस्लीम इतिहासातील कथा सांगून तो त्यांना प्रोत्साहित करू लागला. या सर्व प्रयत्नांचा अनुकूल परिणाम दिसू लागला. जुन्या धन्याला सोडून, स्वार्थ साधण्यासाठी त्याच्याशी गद्दारी करून शाही तख्ताच्या आश्रयाला आलेला, जिवाच्या भीतीने मुसलमान झालेला, लांगूलचालन करून मरातब मिळविलेला, तरी बादशहाच्या संशयाचा विषय असलेला, बाटगा म्हणून लहानापासून म्हाताऱ्यापर्यंत आणि मानकऱ्यापासून हुजऱ्यापर्यंत तिरस्काराचा विषय होऊन तसेच आजवर एकाकी पडलेला कुलीखान काही महिन्यांतच काही बुजुर्ग ताठर खोंड वगळता साऱ्यांच्या आदराचा आणि कौतुकाचा विषय बनला. यासंबंधी बारीकसारीक तपशील आफताबखान आणि नर्दुल्लाखान यांच्या वार्तापत्रांमधून ओसंडून वाहत होता. ‘हलक्या’ लोकांत मिसळण्यामुळे काही मोजकी बुजुर्ग मंडळी मात्र पूर्ण नाराज होती. त्यांच्या तक्रारीसुद्धा दरबारात रुजू होत होत्या.
एकेक ठाणे करीत कुलीखान नैर्ऋत्य भागात इराणच्या सीमेजवळ येऊन पोहोचला. हा भाग बरड, विराण टेकड्यांनी भरलेला होता. पुरते वाळवंट नसले तरी वैराण. पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष. काटेरी झाडांशिवाय वनस्पती नाही. गवत म्हणजे नुसती कुसळे. जनावरांना हिरवा चारा मिळणे दुरापास्त. साप, विंचवासारखे नाना प्रकारचे विषारी जिवाणू पदोपदी विखुरलेले. अनेक जातीचे विषारी किडे विशेषत: माश्या माणसांनाच नव्हे तर उंट-घोडे यांसारख्या जनावरांनासुद्धा त्रस्त करून सोडीत. अत्यंत क्रूर रानटी आणि लुटारू लोकवस्ती त्या भागात होती. त्यातल्या त्यात बरी जागा आणि पाण्याची बरी सोय पाहून कुलीखानाने पडाव टाकला होता. मुक्काम पडला आणि दुसऱ्याच सकाळी त्याने आफताबखान आणि नर्दुल्लाखानास एकांतात बोलावून घेतले.
नर्दुल्ला, आता आपण इराणच्या सरहद्दीच्या अगदी जवळ येऊन ठेपलो आहोत. या ठिकाणापासून इराणची सरहद्द पन्नास-साठ कोसांपेक्षा अधिक दूर नसावी. म्हणजे एक किंवा दोन मजलांवर. मुलूख विराण आहे. वाटा-पायवाटांचा मागमूस नाही. असे असले तरी आता हिंमत करून आपण असेच इराणमध्ये घुसून जाऊ या. देवाच्या दयेने मी भरपूर माया जमवून सोबत घेतली आहे. स्वराज्यातून मदत येण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा आपण एखादे गलबत भाड्याने घेऊ आणि थेट सोपारा किंवा भिवंडी बंदराचा रस्ता धरू. नर्दुल्ला या भागातून इराणमध्ये पोहोचण्यासाठी माहीतगार वाटाडे तातडीने शोधून काढ. वाटा-आडवाटांची माहिती करून घे. लवकरच या भागात नवी मोहीम सुरू करायची असल्याचा आभास फौजेत निर्माण कर. आपल्यासोबत असलेल्या दीडशे मुघल स्वारांचे काय करायचे याचा निर्णय अखेरच्या क्षणी करता येईल. आत्ता त्याची चर्चा नको.
त्या दिवसापासूनच नर्दुल्लाखान कामाला लागला. दिवस-रात्र एक करून माहिती गोळा करण्यास त्याने सुरुवात केली. परंतु उत्साह वाढावा, उमेद वाढावी अशी माहिती हाती येत नव्हती. विषारी जीव-जिवाणूंमुळे माणसांनाच नव्हे तर जनावरांनासुद्धा धोका होता; त्यामुळे फार काळ त्या परिसरात गुंतून राहणे शक्य नव्हते. निष्क्रिय बसून असलेली फौज त्रासदायक ठरू शकते या सर्व बाबींची सर्वांना जाणीव होती; त्यामुळे जो-तो आपापल्या परीने तातडी करीत होता. पाचव्या दिवशी भल्या सकाळी नर्दुल्लाखान पडावावर परत आला. त्याच्या धूळभरल्या कपड्यांवरून त्याने रात्रभर प्रवास केल्याचे सहज लक्षात येत होते. त्याच्यासोबत एक सूफी अवलिया फकीर होता. कुलीखानाची सकाळची आन्हिके अद्याप सुरूच होती तरी त्याची तमा न बाळगता नर्दुल्लाखान तसाच राहुटीत घुसला. आफताबखानास एका बाजूला घेऊन त्याने बाकी चाकरांना बाहेर काढण्याची आणि मालकांना लवकरात लवकर तयार करण्याची सूचना केली. चाणाक्ष आफताबखानाने काही क्षणांतच मैदान साफ केले आणि कुलीखान तयार होऊन बैठकीवर बसला आणि नर्दुल्लाखानाने अवलियास पेश केले. प्राथमिक सलाम - दुवा झाल्यानंतर नर्दुल्लाखान चक्क मराठीत सांगू लागला–
सरकार हे हजरत अल्लारखासाहेब. अजमेरच्या ख्वाजा मोईद्दीन चिस्तीसाहेबांचे औरस वारस. सूफी फकीर आहेत. इस्लामचा प्रचार-प्रसार करण्यासाठी अनेक दशके या भागात हिंडत आहेत. ही भूमी त्यांना स्वत:च्या तळहाताइतकी साफ माहीत आहे. कृपावंत होऊन ते आपल्याला मदत करण्यासाठी तयार झाले आहेत. सरकार, फकीरसाहेब मोठे चमत्कारी आहेत. माझी त्यांची अचानकच गाठ पडली. भेट झाल्यावर त्यांनीच माझे नाव सांगितले. आपले नाव सांगितले. जणू पूर्वीपासूनच ते आपल्यासोबत असावेत अशा प्रकारे आपला पूर्वेतिहास साफ/साफ सांगितला. आपला इथे येण्याचा हेतूसुद्धा त्यांनी अगदी स्पष्ट सांगितला. मी आपल्याला त्यांच्या भेटीस आणण्याची अनुमती मागितली, तर विनाकारण वेळ वाया जाईल असे सांगत ते स्वत:च आपल्या भेटीस आले. इतकेच नव्हे तर प्रवासाला निघाल्यापासून ना स्वत: क्षणभर थांबले ना कोणास उसंत घेऊ दिली. सारी दुपार आणि रात्र घोड्याच्या चालीने चालत राहिले.
त्याचे बोलणे संपताच अल्लारखाने बोलण्यास सुरुवात केली. कोणतीही प्रस्तावना न करता ते म्हणाले–
बेटा, तुमच्या मूळ जुबानीत तुझ्या माणसाने जे तुला सांगितले, त्यातला प्रत्येक शब्द मला समजला. कारण परवरदिगार अल्लाच्या कृपेने मी जुबानी अल्फाज नव्हे तर दिली जुबान ऐकतो, जी सर्वांची एकच आहे. बोल, तुला माझ्याकडून काय अपेक्षा आहेत?
हजरते आला, आपण सर्वज्ञ आहात. आपल्यापासून काय लपवायचे. आपण सर्वच जाणले आहे. तोंडातून काही अधिक-उणे निघाले तर गुस्ताखी पदरी यायची. कृपावंत होऊन आपणच मार्गदर्शन करावे.
आपल्या खोल डोहासारख्या गहिऱ्या डोळ्यांनी त्यांनी कुलीखानाकडे काही क्षण रोखून पाहिले. आफताबखानाकडे वळून त्यांनी खुणेनेच पाणी मागितले. जवळपास कळशीभर पाणी ते घटाघटा प्यायले. नंतर बसल्या जागीच तोंडावर चार-सहा हबके मारले. केसांवरून ओले हात फिरविले. पाणी सांडून पायाशी ओल्या झालेल्या मातीत हातातल्या काठीने काही अगम्य आकृत्या काढल्या आणि त्यांच्याकडे अनिमिष डोळ्यांनी काही क्षण पाहत राहिले. डोक्यावरचा टोपा काढून क्षणभरासाठी त्यांनी आकृतींवर ठेवला. मग टोपा पुन्हा डोक्यावर ठेवला आणि डोळे मिटून घेतले. भारल्यागत त्यांच्या हालचाली पाहणारे त्यांनी अचानक डोळे उघडताच एकदम दचकले. त्यांनी भडाभडा बोलायला सुरुवात केली.
बेटा, तू आपल्या आकाला सोडून का आलास? कसा आलास? मला सारे स्पष्ट दिसते आहे. ते उघड करणे इथल्या कोणाच्याच हिताचे नाही. तू आपल्या आकाकडे परत जाण्यास बेताब आहेस कारण ज्यासाठी तू त्याला सोडलेस ते सारे आता खतम झाले आहे. परत जाण्यासाठी कोणतेही साहस करण्याची तुझी तयारी आहे. तुझ्या आकाने तुझ्यासाठी पाठवलेली ही माणसे तुझ्या कामयाबीसाठी जिवाची बाजी लावून सिद्ध आहेत. तुम्हा सर्वांची निष्ठा आणि भक्ती पाहून तुमची मदत करण्याची प्रेरणा मला झाली. माझ्या अल्लाने मला त्यासाठी रजामंदी दिली. तर बेटा, हा भयाण प्रदेश ओलांडून तुला इराणमध्ये जायचे आहे. तिथून जहाजात बसून आपल्या आकाच्या पायाशी जाण्याचा तू विचार करतो आहेस. बरोबर?
जी मौलाना.
या वेड्या साहसापासून तुला परावृत्त करण्यासाठी मला अल्लाने प्रेरणा दिली आहे. पण तुझा जुनून एवढा जबरदस्त आहे की, तू कोणाचे ऐकून घेणार नाहीस. जर मी तुझ्या या माणसाकरवी तुला हा संदेश पाठवला असता तर तू त्याला जुमानले नसतेस. एवढेच नव्हे तर, जर त्याने माझ्यावरील विश्वासाने चिकाटी धरून तुला परावृत्त करण्याचा यत्न केला असता तर फितूर ठरवून तू त्याला ठारसुद्धा मारले असतेस. म्हणूनच अजिबात वेळ न दवडता मी स्वत: प्रत्यक्ष तुला भेटून हे सांगावे, असा मला अल्लाचा हुकूम आहे. आजची रात्र जर या ठिकाणी तू मुक्काम केलास तर तुझ्यावर भयंकर संकटांची मालिका कोसळेल हे मला दिसल्यानेच मी क्षणभरही न थांबता तुझ्यासमोर आलो आहे. माझे म्हणणे नीट ध्यान देऊन ऐक.
जी मौलाना.
बेटा, हा इलाखा कसा खडतर आहे हे तर तू आपल्या डोळ्यांनी पाहतो आहेस, अनुभवतो आहेस. जितका हा प्रदेश भयानक आहे त्यापेक्षा कितीतरी पट अधिक भयंकर इथली माणसे आहेत. अत्यंत क्रूर, रानटी, विश्वासघातकी आणि स्वार्थी. इथल्या माश्या अतिशय विषारी आहेत. त्यांच्या डंखाने माणूस मरत नाही, पण त्याला लकवा होऊ शकतो. पावलोपावली विषारी जिवाणूंचा धोका आहे. इथल्या विंचवाच्या एका दंशाने उमदा घोडा बघता बघता हातपाय झाडत गारद होतो. त्याहीपेक्षा विषारी इथली माणसे आणि त्यांचे तीर. स्वत:च्या सावलीलासुद्धा दगा करण्यास ही माणसे कचरणार नाहीत. ना कशावर इमान ना श्रद्धा. कोणताही मजहब ही जंगली माणसे मानत नाहीत. सतत साठ वर्षे मी या भागात इस्लामचा संदेश घेऊन फिरतो आहे, पण आजपर्यंत मला केवळ आठ चेले मिळाले. त्यातले पाच यांनी मारून टाकले. अल्लाने जणू पृथ्वीवर नरकाची प्रतिकृतीच या ठिकाणी निर्माण केली आहे. इथून, तू बसला आहेस त्या ठिकाणावरून इराणची सरहद्द फक्त साठ कोस आहे. पण तो फासला तय करणे नामुमकिन आहे. ही भूमी शापित आहे. या मार्गाने इराणला जाण्याचा विचार तू सोडून दे, हे सांगण्यासाठीच मी रात्रभर चालून आलो आहे.
माझ्यासारख्या पाप्यासाठी या वृद्धापकाळात आपण जे कष्ट घेत आहात त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. धोका पत्करण्याची, कष्ट उपसण्याची आमची सिद्धता आहे. आमच्या मनगटात संकटांवर मात करण्याची ताकद आहे याचा आम्हाला विश्वास आहे. प्रयत्न करून यश खेचून आणण्याची आमच्यात क्षमता आहे. या मार्गाने जाण्यासाठी आमच्या धन्याचा आम्हाला कौल मिळाला आहे. तो कौल कधी अपेश देत नाही अशी आमची दृढ श्रद्धा आहे. आपल्या दैवी शक्तीबद्दल पूर्ण आदर आणि श्रद्धा ठेवून मी आपल्याला विनंती करतो की, मला माझ्या ध्येयापासून विचलित करू नका.
बेटा, तुझी ही निस्सीम भक्ती आणि अविचल श्रद्धाच मला स्वत: इथे येण्यास भाग पाडत आहे. फार फार वर्षांपूर्वी युनान देशाचा सम्राट सिकंदरे आझम जग जिंकण्यासाठी निघाला. निळा समुद्र ओलांडून त्याने इजिप्त जिंकले. तांबडा समुद्र पार करून त्याने अरब भूमी जिंकली. पारस म्हणजे आजचा इराण जिंकला. तुर्कस्तान, अफगाणिस्तान पादाक्रांत करून खैबर ओलांडून तो हिंदुस्थानात उतरला. मात्र त्याने हिंदुस्थान जिंकावा अशी अल्लाची इच्छा नव्हती; त्यामुळे तो परत फिरला. मात्र परतताना आला त्याच रस्त्याने, स्वत: जिंकून घेतलेल्या प्रदेशातून न जाता, या प्रदेशातून जाणारा मार्ग जवळचा अशा भावनेने तो या भूमीतून परत निघाला. मात्र या प्रदेशातील क्रूर रानटी टोळ्यांनी त्याच्या विश्वविजेत्या सैन्याची प्रचंड लांडगेतोड केली. विषारी प्राण्यांनी त्याचे असंख्य सैनिक आणि जनावरे गारद केली. या शापित भूमीत सैतानाने त्याच्या सैन्याच्या आत्म्याचा ताबा घेतला. सैन्यात बेदिली, बंडखोरी माजली. तो कसाबसा बाबिलोनमध्ये पोहोचला, पण तेथे त्याच्याच माणसांनी त्याला विष घालून ठार मारले.
बेटा, प्रत्यक्ष पैगंबरांचे सलल्लाह वसल्लम सान्निध्य आणि मार्गदर्शन ज्यांना लाभले, त्यांच्या खालोखाल मोमिन ज्यांचा मान करीत, ते दुसरे खलिफा; हजरत उमर यांनी जिहाद करून पारस जिंकून घेतले. तसेच प्रदेश जिंकत पुढे पुढे जात जिहाद हिंदुस्थानात नेण्याचा विचार त्यांच्या सिपाहसालारांनी केला. पण ज्या कारणांमुळे मी तुला परावृत्त होण्याचा हा यज्ञ करीत आहे त्याच कारणांनी हजरत उमर यांनी त्यांना रोखले. पुढे अल्लाच्या आज्ञेने महम्मद बिन कासिमने जिहाद हिंदुस्थानात नेला, पण या वाटेने नव्हे, खैबरच्या वाटेने. प्रत्यक्ष अल्लानेच त्याच्या नेक बंद्यांना या रस्त्याने जाण्यास मनाई केली आहे.
आलमगीर बादशहाचा थोरला भाऊ दारा शुकोह, जीव वाचवण्यासाठी याच रस्त्याने इराणच्या शहाच्या पनाहमध्ये जाण्यास निघाला. त्याला मी असेच रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्याने अल्लाचा आवाज, माझा आवाज समजून मानला नाही. अल्लाचा कहर त्याच्यावर बरसला. बायका-पोरांसह बरबाद झाला बिचारा. म्हणून मी तुला वारंवार सांगतो, हे वेडे साहस तू करू नकोस. तू तुझ्या आकाच्या पायाशी सुखरूप पोहोचणार आहेस. अगदी लवकरच. राजरोसपणे. ज्या मार्गाने तुला तुझ्या आकापासून दूर नेले गेले, त्याच मार्गाने. तू परत जाशील हा माझा शब्द आहे. अल्लाच्या हुकमाशिवाय या बंद्याची जबान शब्द उच्चारत नाही. ध्यानात ठेव.
बोलता बोलता अल्लारखा ताडकन उठून उभे राहिले. दोन्ही हात आशीर्वादाच्या आविर्भावात उंच उभारले आणि कोणाला काही कळण्याच्या आत गर्रकन वळून राहुटीतून बाहेर पडले. ताडताड चालत निमिषात दिसेनासे झाले.
दुपारच्या जेवणाच्या भरीस न पडता कुलीखानाने मुक्काम हलविला आणि लांबलांबच्या मजला मारीत तो काबूलमध्ये दाखल झाला.
क्रमश:
___🌱🌳🍂🍁___
भाग - 28⃣⚔🚩🗡___
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा