नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔
अग्निदिव्य
__📜⚔🗡भाग - 2⃣5⃣⚔🚩🗡___
_⚔🚩⚔📜🚩___
वजीर जाफरखानाकडून बादशहाला खास दावत होती. बादशहा ईशाचा नमाज वजिरासोबत त्याच्या हवेलीवरच पढला. वजिराने उत्तमोत्तम पदार्थांची रेलचेल उडविली होती. पण बादशहाने वेचक असे चार-दोन पदार्थच आपल्या थाळीत घेतले. सुक्यामेव्याची आणि चवदार मसाल्यांची भरमार असलेल्या पदार्थांबद्दल त्याने स्पष्ट शब्दांत तीव्र नापसंती व्यक्त केली. तो अगदी मोजकेच जेवला. शेवटी त्याने दुधी हलवा मात्र आवर्जून घेतला. हलवा खाता खाता तो हे सांगण्यास विसरला नाही की, लौकी खाणे हे प्रत्येक सच्च्या मुसलमानासाठी सुन्नत आहे. कारण हजरत महम्मद पैगंबर सलल्लाह वसल्लम यांना लौकी अत्यंत प्रिय होती. खूण करून त्याने खोजास जवळ बोलावले. त्याने पुढे केलेल्या तस्तामध्ये कोमट पाण्याने स्वच्छ हात धुऊन आणि खळखळा चुळा भरून तो दस्तरखानावरून उठला. तो मसनदीवर लोडाला टेकून बसल्यानंतर जाफरखानाने सुक्यामेव्याचा सोन्याचा थाळा मुखशुद्धीसाठी स्वहस्ते बादशहासमोर केला. त्याने मोजून सात-आठ मनुका आणि तीन-चार बदाम तोंडात टाकले. पानदानास त्याने हातानेच नकार दिला. डोहासारखी खोल हिरवी नजर वजिरावर स्थिर झाली.
कहो वजीरेआझम, तुमच्या मनात काहीतरी बोलायचे आहे. बोलून टाका. तुम्ही दावत पेश केलीत तेव्हाच माबदौलतांनी जाणले की, तुमची कोणतीतरी तमन्ना तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे.
तौबा! तौबा!! हुजुरे आला मी कुठल्याच मतलबाने दावत पेश केली नव्हती. अल्लातालाच्या फजलो करमसे आणि आलमपन्हांच्या दयेने गुलामाला कशाचीच कमतरता नाही. स्वत:साठी काही मिळवावे असे काही राहिलेले नाही. आलाहजरतांच्या खालाजानला तिच्या भाच्याला गरीबखान्यात बोलावून दावत द्यायची इच्छा झाली इतकेच.
वजीर बोलत असताना चिकाचा पडदा दूर करून वजिराची बेगम बाहेर आली.
सलाम अलेकुम बेटा औरंगजेब, बऱ्याच दिवसांपासून मला हमशिरा मुमताज…
बेगमेचा अघळपघळ आविर्भाव, बेपर्दा होऊन बेधडक बादशहासमोर येणे, सलगीचे बोलणे, पराकोटीच्या खुद्दार बादशहाला पसंत पडणे शक्यच नव्हते. कपाळावरचा डाग आक्रसला. हिरवी नजर गढुळली. डोळ्यांतला दाह जाणवण्याइतपत वाढला. हलक्या आवाजात दाताच्या फटीतून सीत्कारत शब्द उमटले–
वजीरेआझम… अदब… अदब…
बादशहाचा नूर पाहून बेगमचे पुढचे शब्द घशातच अडकले. तत्परतेने तिला हाताने थोपवीत वजीर लगबगीने बोलला–
सबूर… सबूर… बेगमसाहिबा सबूर। आम्ही आहोत ना आपल्या वतीने बोलण्यासाठी. आलाहजरत आता केवळ तुमचे चहेते भाचे औरंगजेब राहिलेले नाहीत. ते आता अलम हिंदोस्तानचे तख्तनशीन शहेनशाह आलमगीर आहेत. आपल्या दिलात त्यांच्यासाठी पूर्वीचीच ममता कायम असली, तरी तख्ताची अदब सांभाळलीच पाहिजे. आपण सलतनतीच्या मुख्य वजिराच्या थोरल्या बेगम आहात. दुनिया तुमच्या नक्शेकदमवर चालणार.
बेगम गोरीमोरी झाली. खजील स्वरात अजिजी करीत ती म्हणाली–
गुस्ताखी माफ जहाँपन्हा। माझा मतलब होता…
ठीक है। तुमच्या भावना माबदौलतांना समजल्या. आपल्या दिलात असणाऱ्या मोहब्बतीचा एहसास माबदौलतांना कायम जाणवत आला आहे. खालाजान म्हणून माबदौलत आपली इज्जत करतात त्याबद्दल मनात किंतू येऊ देऊ नका. माबदौलतांचे दरवाजे आपल्यासाठी कायम उघडे आहेत याची खात्री बाळगा. आपली दिलीतमन्ना खुलकर जाहीर करा. अनमान करू नका.
बेगमेने धीर करत हिरव्या नजरेला नजर भिडविली. हिरवी नजर स्वच्छ होती. नजर झुकवून ती घुटमळत म्हणाली–
जान की अमान पाऊँ, तो कुछ अर्ज करूं…
इजाजत है। कोणाला मेहेरबानीचा वादा केला आहे? तसे असले तरी हरकत नाही; मात्र त्यामधून जर खासगी लाभ करून घेण्याचा प्रयत्न झाल्याचे कानी आले तर सुनवाई होणार नाही. सीधे नतीजा पावाल इसका खयाल रहे. कहो.
हजरते आला, महाबतखान आमचे जवळचे नातेवाईक हे सारे जग जाणतेच. त्यांच्या वतीने अर्ज आहे. नवाबसाहेबांची काबूलवरून सरकारात खूप पत्रे आलीत. खाविंदांच्या कदमांपाशीसुद्धा त्यांनी अनेक अर्ज पेश केलेत. हुजुरे आला नवाबसाहेब गेली साडेपाच-सहा वर्षे अफगाणांच्याविरुद्ध दिलोजान से झुंजत आहेत. इकडे त्यांची जागीर विरान पडली आहे. तिला कोणी वाली नाही. महसूल तुंबला आहे.
मग काय अर्ज आहे? त्याच्या जागी दुसरा जहागीरदार नेमावा? नामंजूर.
कमालीचे ओशाळे होत बेगमेने नवऱ्याकडे पाहिले. नजरेनेच तिला मागे सरण्याचा इशारा करीत वजीर जाफरखान पुढे सरसावला. आपल्या हातांनी गालांवर हलक्या चापट्या मारीत म्हणाला–
तौबा! हुजुरे आला तौबा!! तख्ताच्या नेक आणि भरोसेमंद सेवकाविरुद्ध असा अर्ज कोणी कसा करू धजेल? परवा बिचाऱ्या नवाबसाहेबांच्या बेगमसाहिबा हुजुरे आलांच्या खालाजानकडे आल्या होत्या. त्या सांगत होत्या की, त्यांच्या दोन मुली आणि एक मुलगा आता जवान झालेत. लग्नाला आलेत. पण बाप घरी नसल्याकारणाने त्यांची लग्ने अडली आहेत. घरात इतर मसले मसाईलसुद्धा त्यामुळेच अडकून पडले आहेत. नवाबसाहेबांच्या वालिदा मुलाच्या काळजीने बीमार झाल्या आहेत. जहागिरीत बखेडे माजले आहेत. बेगमसाहिबा खूपच परेशान दिसल्या. डोळ्यांत पाणी आणून नवऱ्याला घरी परत बोलावण्याची दरखास्त करीत होत्या. आलाहजरतांनी त्यांच्यावर मेहेरनजर करावी अशी आलाहजरतांच्या खालाजानची इंतजा आहे.
अफसोस. लेकिन महाबतखानास मुस्तकीरुल खिलाफतमध्ये परत बोलावणे नामुमकिन आहे. त्याच्या जिम्मेदारीवर कुलीखानाला सोपवले आहे म्हणून माबदौलतांना चैनचा साँस घेणे शक्य होत आहे. त्याला परत बोलावून कसे चालेल?
हुजुरे आला, कुलीखानाला साहेबी इमान स्वीकारून आता पाच-सहा वर्षे झाली. तो नेकीने दीनी फर्ज अदा करत असल्याच्या बातम्या आलाहजरतांच्या पायाशी रुजू आहेत. अफगाणांच्या खिलाफ जानची बाजी लावून तो जिहाद लढतो आहे. लाहोरवरून महाबतखानाने त्याची जी कैफियत लिहून पाठवली आहे, त्यामध्ये त्याच्या विचारांचे प्रतिबिंब पुरतेपणाने उमटले आहे. त्याच्यात दिसून आलेल्या तबदिलीची खाविंदांनी त्या वेळी सराहना केल्याचे गुलामाला स्मरते. त्याच्यावर घरात नजर ठेवण्यासाठी सिद्दी फुलादखानाचा माणूस आलाहजरतांनी पाठवला आहे. तो इमानेइतबारे खबर धाडतो आहे. त्यामध्ये तो नेक नमाजी आणि मोमिन असल्याची तारीफ नेहमीच असते. तो दख्खनशी संधान बांधण्याची कोशिश करत असल्याचा एकही सबूत आजवर कोणी दिलेला नाही. तेव्हा आता तो काही दगा करू शकेल असे संभवत नाही. रही बात सिवा की. त्याने स्वत:ला काफिरांचा बादशहा जाहीर केल्यापासून त्याचे तेवर फारच चढले आहेत. त्याला आता कुलीखानासारख्या गद्दारांची गरज उरलेली नाही. त्याचा नवा सिपाहसालार हंबीरराव मोहिते जवान आणि काबील आहे. इतक्या वर्षांत ते लोक कुलीखानाला नक्की विसरले असतील. आता त्याच्यावरची नजरकैद उठवायला हरकत असू नये. कुलीखानाला परत न बोलावता.
बादशहाने बेगमेकडे नजरेचा इशारा केला. जाफरखानाने बायकोला आत जाण्याचा इशारा केला. तसलीम फरमावत पाठ न दाखविता ती पडद्याआड निघून गेली. बादशहाचा इशारा ध्यानी घेऊन जाफरखानाने आवाज अगदी खाली आणला. तिरप्या नजरेने चिकाच्या पडद्याकडे पाहून आत निघून जाण्याची नेत्रपल्लवी केली.
आलमपन्हा, गुलामाला असे प्रामाणिकपणे वाटते की, कुलीखान आता पुरता रुळला आहे. त्याला परत न बोलावता नवाब महाबतखानांच्या जागेवर त्यालाच मोहिमेचा सरलष्कर जाहीर करावे; त्यामुळे त्याचा रुतबा वाढेल. केलेल्या मशक्कतीचे सलतनतीत योग्य ते चीज होते असा भरवसा त्याला वाटू लागेल. त्याशिवाय गुलामाला असे मनापासून वाटते की, गेल्या सहा वर्षांत जवळपास नेक इमानदार श्रद्धावानांची दीड लाखापेक्षा मोठी फौज अफगाणिस्तानात अडकून पडली आहे. साहेबी इमान राखणारे तख्ताचे एकनिष्ठ सेनापती, सरदार तिकडे अडकून पडले आहेत. इतक्या वर्षांत काही करोड अश्रफी या मोहिमेवर शाही खजिन्यातून खर्च झाल्या; पण पदरात त्या मानाने फारसे काहीच पडले नाही. ना मुलूख, ना वसूल. त्याचा असर इतर मोहिमांवर होतो आहे. सलतनतीला राजपुतांवर विसंबून राहावे लागत आहे. याचा फायदा उठवून दख्खनमध्ये सिवा आणि आदिलशाह शिरजोर बनले आहेत. पंजाबी सुभ्यात शीख डोके वर काढीत आहेत. महाबतखानांसारखी काबील माणसे परत आली तर थोड्या विश्रांतीनंतर या कामांवर लावता येतील.
दलील मोठी दिलचस्प आहे.
जिल्हेसुभानी, ही फक्त महाबतखान नवाबसाहेबांसाठी केलेली दलील नाही, तर बेवाक हकिकत आहे. आज बयान करण्याचा मौका मिळाला एवढेच. गुस्ताखी माफ आलमपन्हा, पण ज्या मकसदसाठी कुलीखानाला मुसलमान करून घेतले, त्याला मोठा ओहदा दिला, सर्फराजी केली; तो मकसद त्याला अफगाणिस्तानात डांबून ठेवून पुरा होणार नाही. आलाहजरत कुलमुखत्यार आहेत. गुलाम आपल्या मर्यादित बुद्धीप्रमाणे फक्त मशवरा देऊ शकतो.
कुलीखानाला तुम्ही जामीन राहाल?
माफी हुजुरे आला, या कोहस्तानी दख्खनी उंदरांना कोण जामीन राहणार? असा गाढवपणा केला आणि कुंवर रामसिंह वल्द जयसिंह चांगला पोळून निघाला. त्याशिवाय आता त्याची गरज उरली असेल असे नाचीजला वाटत नाही.
कपाळावरचा काळा डाग आठ्यांच्या जाळ्यात लुप्त झाला.
लाहौल वलाकूव्वत! मग? त्याला काय बेबंद सोडून द्यावे?
असे कसे व्हावे हुजुरे आला? विश्वासू नजरबाजांची एखादी तुकडी कुलीखानाचे अंगरक्षक म्हणून मागे ठेवण्यास महाबतखानास सांगावे. काही संशयास्पद वाटलेच तर बंदोबस्त करण्यासाठी फौजेत आपले इतर सरदार आहेतच.
ठीक है। वजीरेआझम तुमच्या मशवऱ्यात दम आहे. महाबतखानाच्या बेगमसाहेबांना त्यांची दरखास्त मंजूर झाल्याचे कळवा. परवा येणाऱ्या चाँदरातीनंतर महाबतखानास माघारी बोलावणारे फर्मान जारी करा. फर्मान कोणा सामान्य जासूदा हाती पाठवू नका. फर्मान घेऊन नवाब अस्मत अली जातीनिशी जातील. महाबतखानाला तो सारी मसलत जुबानी बयान करील. या संबंधाने फर्मानात कोणताही उल्लेख असता कामा नये. झाले समाधान? आमच्या खालाजानला समजावा, सियासी बाबींमध्ये कोणाला मेहेरबानीचे वादे देऊ नका. आता माबदौलतांना रुखसत करा. तुम्हा सर्वांचाच खाना खोळंबला आहे. शब्बा खैर.
निरोपाचे विडे, नजर नजराणे आणि अत्तर-गुलाब घेऊन बादशहा जाफरखानाच्या हवेलीतून रवाना झाला.
गाजियाबादचा नवाब अस्मत अली आपल्या हवेलीतील सदरेवर परेशान होऊन हुक्का पीत बसला होता. चार-पाच दिवसांत त्याला फौज घेऊन काबूलला रवाना व्हायचे होते. पाच हजार फौजेचा तनखा खाऊन प्रत्यक्षात जेमतेम हजार-बाराशे स्वारांचीच फौज तो बाळगून होता. आता पुरे पाच हजार स्वार गणती करून छावणीत दाखल करणे भाग होते. तो त्याच विवंचनेत होता. अडचण एकच होती, फौजेतला प्रत्येक प्यादा मुसलमानच असणे बंधनकारक होते. अन्यथा सैन्यभरती हा काही फार मोठा चिंतेचा मसला नव्हता. चार तुकडे फेकले की, या देशात मरण्यासाठी खंडीभर माणसे सहज मिळत होती. तसे पाहता बाजारबुणगे आणि हुजरे शागिर्दांमधून खोगीरभरती करून त्याने जुळवाजुळव करीत आणली होती. आता फक्त शंभर-दीडशे असामींची भर केली की त्याचा व्याप संपणार होता. शिपायाच्या हाकेने त्याची तंद्री मोडली. देवडीवरचा शिपाई वर्दी घेऊन आला होता. कोणी नर्दुल्लाखान पठाण फौजेत भरती होण्यासाठी भेटीची इजाजत मागत होता.
अबे बेवकूफ, त्याला बाहेर का उभे ठेवलेस? ताबडतोब हाजिर कर.
जमिनीपर्यंत लवून कुर्निसात करीत उंच धिप्पाड नर्दुल्लाखान पठाण अस्मत अलीसमोर दाखल झाला.
तर तू आहेस नर्दुल्लाखान पठाण. काय इरादा आहे?
हुजूर, बंदा जातीने पठाण. मूळ गाव कंदाहारच्या आसपास. पण मरहूम शहनशाहे आलम हजरत बाबर सरकार हिंदोस्तानात आले, त्यांच्या मागोमाग आमचे पुरखे नशीब अजमावण्यासाठी या मुलखात आले. तेव्हापासून पिढी दरपिढी पोटामागे हिंडत आहोत. दिलेरखानसाहेबांच्या फौजेत रिसालदारी केली. पार विजापुरापर्यंत जाऊन तेग गाजवली. पण हजरतांचा कारभार मोठा जाचक. शिपाई आणि जनावर त्यांच्या लेखी सारखेच; त्यामुळे अगदी कंटाळून गेलो होतो. आमचा दस्ता कैदी घेऊन आग्र्याला आला. मग परत गेलोच नाही. चार-दोन चाकऱ्या केल्या पण कदरदान मालक मिळाला नाही. खबर मिळाली की, आपण फौज घेऊन अफगाणिस्तानात रवाना होत आहात. हुजुरांच्या दरियादिलीची आणि कदरदानीची चर्चा पुऱ्या राजधानीत आहे. माझा पन्नास स्वारांचा दस्ता आहे. आमची स्वत:ची जनावरे आणि हत्यारे आहेत. माझ्यासह आम्ही बारा हशम खानदानी पठाण आहोत. सगळे माझेच बिरादर आहेत. सहा मूळ अरब आहेत, पण चार-पाच पिढ्यांपासून याच मुलखात आहेत. स्वत:ला अन्सार म्हणवतात. खरे-खोटे अल्ला हु आला. पण माणसे सच्ची आणि इमानाला पक्की आहेत. उरलेले रोहिले आहेत. इमानदार आणि नेक नमाजी. हुजुरांनी आमचा रिसाला पदरी ठेवून घेतला तर गरीब अन्नाला लागतील.
तनख्वाह?
हुजूर, काय थट्टा करता गरिबाची? सरकारी हिशेबाने प्रत्येक मोगल शिपायाला मिळतो तो तनख्वाह, हत्याराचा भत्ता, जनावराचा दाणागोटा आणि गनीमह याउप्पर आम्ही पोटार्थी काय मागणार?
कधीपासून दाखल होणार?
हुकूम झाला तर आत्ता या क्षणापासूनच. ज्या क्षणी कूच करण्याचा हुकूम जारी होईल, त्या क्षणी आमचा रिसाला मोहिमेवर रवाना होईल.
ठीक है। मुन्शी महम्मद हुसैन, नर्दुल्लाखान पठाणला त्याच्या संपूर्ण रिसाल्यासह आजपासूनच दाखल करून घ्या. आजपासूनचा दाणागोटा आणि चारापाणी त्यांच्या पदरात घाला.
बहोत बहोत मेहेरबानी हुजूर. गरिबाची बायका-पोरे दुवा देतील, शाही रहमत ता कयामत बरकरार रहो म्हणून.
अफगाणिस्तानात पोहोचण्याचा बंदोबस्त बिनबोभाट झाल्याची खबर बहिर्जींकडे रवाना करण्यासाठी तो दिल्लीतील प्रमुखाला शोधण्यास निघाला.
वजीर जाफरखानाने सख्त दरडावणी दिलेली असल्याने अस्मत अली वाटेत कोठेही न रेंगाळता, मोठ्या मजला मारीत काबूलला पोहोचला. छावणीत दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी भल्या सकाळी त्याने महाबतखानाची खासगीत भेट घेतली. वजिराने दिलेले खासगी पत्र आणि शाही फर्माने त्याने त्याच्या स्वाधीन केली. तसेच बादशहाचे तोंडी हुकूम शब्दश: त्याच्या कानी घातले. घरी परत जायला मिळणार या बातमीने महाबतखानाला इतका आनंद झाला की, त्याने अस्मत अलीलाच कडकडून मिठी मारली.
शाही फर्मानाचा स्वीकार करण्यासाठी कुलीखानाला आघाडीवरून तातडीने काबूलला बोलावून घेण्यात आले. शाही फर्मानाप्रमाणे आता कुलीखान अफगाण मोहिमेचा सर्वेसर्वा सरलष्कर व्हायचा होता. त्याच्या हाती सूत्रे सोपवून महाबतखान दिल्लीस माघारी जाणार होता. अस्मत अलीसुद्धा त्याच्यासोबतच माघारी जायचा होता. मुळात तो लढण्यासाठी आलाच नव्हता. निघण्यापूर्वी महाबतखानाने कुलीखानासंबंधी काय खबरदारी घ्यायची याबाबत बादशहाचा तोंडी हुकूम कळविणे एवढेच त्याचे काम होते. ते त्याने बजावले होते.
बादशहाने महाबतखानास सख्त हिदायत दिली होती की, नव्या फर्मानाप्रमाणे भले, आता तो सरलष्कर राहणार नव्हता तरी कुलीखानाने काही वेडेवाकडे पाऊल उचलले, बादशहाविरुद्ध बगावतखोरी केली किंवा पळून जाण्याचा वा शिवाशी संगनमत करण्याचा यत्न केला तर त्याची जिम्मेदारी महाबतखानावर राहील. ही अट मान्य असेल तरच त्याला राजधानीत माघारी येण्याची इजाजत होती. अन्यथा त्याने अफगाणिस्तानचा सुभेदार म्हणून कुलीखानावर लक्ष ठेवून काबूलमध्येच राहावे. त्याचा जनानखाना बादशहा स्वखर्चाने त्याच्याकडे पोहोचता करील.
सहा वर्षे अफगाणिस्तानच्या धूळभरल्या विराण डोंगरी प्रदेशात, पराकोटीच्या विषम हवामानात बेबंद क्रूर रानटी पठाणांशी झुंजून महाबतखान पुरता कातावला होता. घरी परत जाण्यासाठी बादशहाची कुठलीही अट मान्य करायला तो नुसता उतावीळ झाला होता. त्याची फौज तर घरी जाण्यासाठी त्याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक आसुसली होती. त्याच्या निसबतीतील एकही अधिकारी कुलीखानावर नजर ठेवण्यासाठी मागे राहण्यास तयार नव्हता. हीच मोठी विवंचना त्याला लागून राहिली होती. जोपर्यंत तो बंदोबस्त समाधानकारक होत नाही तोपर्यंत तो काबूल सोडू शकत नव्हता.
या विवंचनेमध्ये महाबतखान एकटाच हुक्क्याचा नेचा दाताने चावत बसला होता. हुक्का पार विझून गेला होता, पण त्याचे त्याला भान नव्हते. पहाऱ्यावरचा हुजऱ्या वर्दी घेऊन आला,
हुजूर, नवाब अस्मत अली जनाबांच्या खिदमतीत असलेला कोणी नर्दुल्लाखान पठाण मुलाखतीची इजाजत मागतो आहे.
तंद्रीतच त्याने ‘पाठवून दे’ असा हाताने इशारा केला. नर्दुल्लाखान कुर्निसात करून समोर उभा राहिला तरी बराच वेळ त्याचे लक्षच गेले नाही. नर्दुल्लाखान वाट बघत चुळबुळ करीत उभा राहिला. अखेर हलकेच खाकरला. भानावर आलेला महाबतखान प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत राहिला.
सरकार, नाचीजला नर्दुल्लाखान पठाण म्हणतात. आपले पुराने दोस्त चांदराय बुंदेला यांचे साहबजादे कुंवर छत्रसाल बुंदेला यांनी आपल्या खिदमतीत देण्यासाठी एक पत्र गुलामाकडे सोपवले आहे. त्या पत्रावर नजरे इनायत फरमावावी असा अर्ज आहे.
अरे वा! इतक्या वर्षांनंतर तुझ्या कुंवरजींना आमची आठवण आली तर. त्यांच्या वालिद साहेबांचा आमचा जुना याराना. आलाहजरत गादी हासिल करण्यासाठी आपल्या भावांशी झुंजत होते तेव्हा अनेक झुंजी आम्ही एकत्र लढल्या आहेत. मोठा शेरदिल माणूस. जशी त्याची तेग तिखट तशीच जबान तेज. मिजाज मोठा गरम. अफसोस, आलाहजरतांची मर्जी राखण्यात कामयाब झाला नाही. अखेर स्वत:ला बरबाद करून घेतले. त्याची बीबीसुद्धा मोठी जांबाज औरत होती. बिचारी नवऱ्यासोबत सती गेली. कुंवर छत्रसाल दिलेरखानाच्या निसबतीत असल्याचे अनेक वर्षांपूर्वी कानी आले होते. अब कैसे हाल हैं उनके? खैरियत से तो हैं?
जी हाँ हुजूर, ऊपरवालेके फजलोकरम से सब खैरियतसे हैं। कुंवरजी आपल्याला पित्याच्या ठायी मानतात. असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी आपली याद काढली जात नाही. पण झाले असे की, कुंवरजी तिकडे दख्खनमध्ये गुंतलेले, तर आपण इकडे विलायतमध्ये. खैर खैरियत घ्यावी, कळवावी कशी? या वेळी माझ्यासाठी, माझ्यासारख्या एका नाचीज गुलामासाठी कुंवरसाहेबांनी हे पत्र लिहिण्याची जहमत गवारा केली आहे. मेहेरबानी करून गौर फरमावावी.
अदबीने दोन पावले पुढे सरकून त्याने पत्राची थैली बैठकीसमोर पानदानाच्या तिवईवर ठेवली आणि हात छातीशी बांधून उभा राहिला. थैली उघडून महाबतखानाने पत्र वाचले. तीक्ष्ण नजरेने त्याने नर्दुल्लाखानास आपादमस्तक न्याहाळले. मग पुन्हा एकदा सावकाश पत्र वाचून काढले.
आतापर्यंत कोणकोणती कामगिरी केली?
हुजूर, अनेक पिढ्या आम्ही चांदराय बुंदेला हजरतांच्या खानदानाची सेवा करतो आहोत. लहानपणापासूनच मी बापासोबत त्यांच्या फौजेत चाकरी करतो आहे. आलाहजरत बादशहा सलामत यांनी तख्तावर येण्यासाठी झालेल्या जंगांमध्ये माझ्या बापाने आणि मी तलवार गाजवली. पण पुढे आमच्या धन्यावर आलमपन्हांची खफा मर्जी झाली आणि सर्वच वाताहत झाली. कुंवरजी तेव्हा नाबालिग होते. त्यांचा स्वत:चाच ठिकाणा नव्हता. फौज पागा कुठून सांभाळणार? सारे शिपाई, प्यादे बारावाटा झाले. मी आणि माझे बिरादर प्रथम कारतलबखान साहेबांकडे राहिलो. शहजादा मुअज्जम हजरतांच्या फौजेतून जनाब कारतलबखान दख्खनमध्ये दाखल झाले. पुढे नवाब शाहिस्ताखान साहेबांच्या फौजेत आम्ही खूप लढाया मारल्या. मराठ्यांचा मुलूख पुरता ताराज करून सोडला…
काय? मरगट्ट्यांच्या खिलाफ तू जंग खेळला आहेस? मग त्या कोहस्तानी चूह्याला, शिवाला पाहण्याचा कधी मौका आला की नाही?
दोनदा पाहिले हुजूर. त्याचे नाव जरी ऐकले तरी अंगावर काटा येऊन जीव थरथर कापतो. काय त्याचा तोरा, काय ती मिजास. तौबा! जनाब कारतलबखान साहेबांच्या हुकमतीत कोकणावर फौजा निघाल्या. पहाड ओलांडून कोकणात उतरावे लागते. उंबरखिंडीतून आम्ही घाट उतरत होतो. पहाडाच्या ऐन बेचक्यात घनदाट जंगलात दगाबाज शिवाजीने मौका साधून आमच्या थकल्याभागल्या गाफील फौजेवर अचानक छापा केला. सर्वनाश होण्याचीच वेळ आली होती. मला तर वाटले कयामत म्हणतात ती हीच. अल्ला मेहेरबान होता. रायबाघन नावाच्या एका ब्राह्मण बाईने मध्यस्थी केली आणि फौज वाचवली. मग शिवाजीने खुद्द नवाबसाहेबांनाच दगा केला आणि मोहीम संपली.
आमची फौज दिल्लीच्या वाटेवर असताना हुकूम झाला, मिर्झाराजांच्या फौजेत सामील व्हा. आमचा मोहरा बदलला, पुन्हा दख्खन. त्यांच्या फौजेत कुंवरसाहेब होते. त्यांनी मेहेरबान होऊन जनाब कारतलबखान साहेबांकडून मला मागून घेतले. त्यांच्या जोडीने पुरंदरावर आणि गोंडवनातसुद्धा गुलामाने कामगिरी केली आहे.
मग आता कुंवरसाहेबांना सोडून येण्याचे कारण काय?
हुजूर, कुंवरसाहेब काही कारणांनी बुंदेलखंडात वापस गेले आहेत. आजकाल बाकी स्वाऱ्या - शिकारी जवळपास बंदच आहेत. फौजेचा खर्च परवडेनासा झाला. हुजुरांची मोहीम या भागात सुरू असल्याचे समजले. विचार केला काही दिवसांसाठी आपल्या सेवेत दाखल व्हावे. आपले मूळ वतनसुद्धा बघता येईल आणि कदरदान धन्यांची चाकरी घडेल. पुढे-मागे कुंवरसाहेबांची हालत दुरुस्त झाली आणि त्यांनी बोलावले तर आपण अनमान करणार नाही. म्हणून कुंवरसाहेबांनी जातीनिशी हे पत्र देऊन पाठवले आहे. मी बेवकूफ सारखा बडबडत राहिलो. त्यांनी आपल्यासाठी हा नजराणा पाठवला आहे. कबूल फरमावावा.
असे म्हणत त्याने कंबरेची एक जडशी थैली काढून मोठ्या अदबीने तिवईवर ठेवली. महाबतखानाने थैली उचलून घेतली. काही वेळ हातावर तोलून आतल्या ऐवजाचा अदमास घेतला आणि बैठकीवर मांडीजवळ ठेवून घेतली. काही वेळ विचारात दंग राहिला मग अचानक आठवल्यासारखे करून त्याने विचारले–
पण तुला इथपर्यंत येण्याचा परवाना कुणी दिला?
हुजूर, आपसे क्या पर्दा. नवाब अस्मत अलीसाहेबांच्या फौजेत भरती सुरू होती. आम्ही त्यांच्याकडे भरती झालो आणि हुजुरांच्या पायाशी दाखल झालो. यकीन करा हुजूर, आम्ही कोणतीही गैरकानुनी हरकत केलेली नाही. मेहेरबानी करून आपण आमचा रिसाला त्यांच्याकडून मागून घ्या.
ठीक है। बेफिक्र रहो। आजपासूनच तू आणि तुझा रिसाला माझ्याकडे दाखल व्हा. मी तसे हुकूम जारी करतो.
मोठ्या समाधानाने, अल्लाचे आभार मानीत, नर्दुल्लाखान महालाबाहेर पडला. महाबतखानाच्या गोटात शिरकाव तर झाला. आता नेताजींच्या जवळपास जाण्याची खटपट कशी करता येईल याचा विचार करीत तो आपल्या मुक्कामाकडे निघाला. आतापर्यंत जशी नशिबाची साथ लाभून गोष्टी विनासायास पदरात पडत गेल्या तसेच, हेसुद्धा सहज साधून जाईल असे त्याला मनोमन वाटू लागले. मुक्कामावर पोहोचताच सर्वप्रथम त्याने शुक्रानीचा नमाज अदा केला आणि धन्याने सोपविलेली कामगिरी सुखरूप आणि यशस्वी पार पडण्यासाठी दुवा मागितला.
क्रमश:
*____⚔📜

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा