फॉलोअर

शनिवार, २८ मार्च, २०२०

*नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔* *अग्निदिव्य* भाग - 35⃣

*नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜*
*अग्निदिव्य*
*_______📜🗡
भाग - 3⃣5⃣🚩🗡________*

*लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार*
*___🚩📜🚩_______*
*बंगलीच्या गवाक्षात उभे राहून नेताजी जगदीश्वराचे आवार न्याहाळत होते. महाराजांना मंदिरात प्रवेश करून बराच वेळ होऊन गेला होता, तरी बाहेर काहीच हालचाल जाणवत नव्हती. पहाऱ्यावरचे मावळेसुद्धा फारसे हालचाल करताना दिसत नव्हते. त्यांच्या एकूण आविर्भावावरून ते आत चाललेले बोलणे ऐकण्याचा प्रयत्न करीत असावेत आणि आपल्या हालचालींच्या आवाजाने त्यात व्यत्यय येऊ न देण्याची खबरदारी घेत असावेत असे जाणवत होते. घोडी दूर उभी केली होती. मंदिरातील आम राबता तर बंद होताच, पण बहुधा राणीवशातून आलेले चार-पाच मेणेसुद्धा बऱ्याच दूरवरून परतवून लावलेले दिसले. खुद्द सूर्याजी पिसाळ मेण्यांना सामोरा गेलेला दिसला होता. म्हणजे मेण्यातील असामी मातब्बर असाव्यात. याचा अर्थ स्पष्ट होता की, महाराजांची विद्वानांशी गहन चर्चा चालू होती, पण निर्णय होत नव्हता. उभे राहून पायाला रग लागली की, नेताजी कमऱ्यातच अस्वस्थपणे येरझारा घालीत. मात्र त्यांची नजर मंदिराच्या आवारापासून हटत नव्हती. एकेक पळ युगासारखा भासत होता. घटका उलटल्या. पण आवार शांत होते. दोन वेळा घंटा घणघणली एवढेच. एकाएकी प्रचंड मेघगर्जना झाली. नेताजी दचकून उठले. नकळत त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. विजांच्या लखलखाटात आणि ढगांच्या गडगडाटात पुऱ्या जोशात वळीव बरसू लागला. तिन्हीसांजा झाल्या तेव्हा वळीव विसावला. मंदिरातून आरतीचा कल्लोळ ऐकू येऊ लागला. म्हणजे महाराज आरतीसाठी थांबले होते तर. चर्चा संपली असावी. काय निर्णय झाला असावा या हुरहुरीपायी नेताजींची छाती धडधडत होती.*
महाराज आपल्या लवाजम्यानिशी महालाकडे दौडत निघून गेले. ब्राह्मण मंडळीसुद्धा आपापल्या मुक्कामाकडे निघून गेली. सूर्याजींशी बोलत बहिर्जी मंदिराबाहेर आला. त्याने बंगलीकडे एक कटाक्ष टाकला पण तो त्या दिशेने न येता महालाकडे चालू लागला. पहारे गुंडाळून सूर्याजीसुद्धा आपल्या वाटेने निघून गेला. मंदिराचे आवार मोकळे झाले. नेहमीची शांतता पसरली. काय निर्णय झाला असावा काहीच अंदाज येत नव्हता. कारण सर्वांच्याच हालचाली अगदी सामान्य होत्या. न कुठली उदासी न कोणता आनंद. काळजी आणि हुरहुर अधिकच दाटून आली. धडधड वाढली. दाटत्या अंधाराबरोबर अस्वस्थताही वाढत राहिली. अशा अस्वस्थतेतच नेताजी पलंगावर निश्चल बसून राहिले. शून्य नजर कमऱ्याच्या छतावर खिळली होती. मन शंभू महादेवाचा धावा करीत होते. आई जगदंबेची करुणा भाकत होते. हुजऱ्या ठाणवईवर दिवा ठेवून गेला पण त्याच्या मुजऱ्याकडे त्यांचे लक्षच नव्हते.
किती वेळ गेला ध्यानातच आले नाही. कवाडाची साखळी खडखडली आणि बहिर्जीच्या आवाजाने त्यांची तंद्रा भंगली. मुजरा घालीत बहिर्जी कमऱ्यात आला. त्याच्या चर्येवरून मनाचा अंदाज बांधणे अशक्य आहे हे पूर्णपणे माहीत असूनसुद्धा त्यांनी तसा निष्फळ प्रयत्न करून पाहिला. मागोमाग तीन-चार हुजरे जेवणाचे थाळे, पाण्याची कळशी वगैरे घेऊन आत आले. नेताजींच्या नजरेतील अपेक्षेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत जणू काही घडलेच नाही अशा आविर्भावात बहिर्जीने बडबड सुरू केली. मापी सरकार. आजच्याला ज्येवन आनाया वाढुळ उशीरच जाला. त्येचं झालं असं की, म्हाराजांची सोतासाठीच्या ज्येवनातील ज्येवन धाडायची आज्ञा व्हती. आता म्हाराज सोता जेवल्याबिगर आपले ज्येवन सवते काडता येते व्हय? म्हाराज आन बामणं लय येळपर्यंत बोलत बसली व्हती. तवा त्येस्नी थाळ्याला याया उशीर जाला. त्यांची ज्येवनं उरकली की, लगोलग आपला थाळा तयार झाला. चला, चला. हातपाय धुवा आन या थाळ्याला. लई भुका लागल्याती.
बहिर्जीची निरर्थक बडबड आणि निर्विकार मुद्रा पाहून काही अंदाज बांधता येईना. मग तो नाद सोडून ते मुकाट्याने जेवायला बसले. बहिर्जीच्या तोंडाची टकळी सुरूच होती पण काही थांग लागत नव्हता. उरातली धडधड वाढतच होती. घास घशाखाली उतरणे शक्य होत नव्हते. अखेर नेताजींनी तोंड उघडलेच. बहिर्जी! जी सरकार… अरे काय झाले? अखेर काय ठरले? कशाचं सरकार? आता अधिक वेड पांघरण्याचे सोंग करू नकोस. नीट सरळ सांग, मंदिरात काय ठरले? कशाचं म्हन्ता सरकार? नेताजींचा संयम सुटण्याच्या बेतास आला. आवाज चढवून डोळे काढीत दरडावणीच्या स्वरात त्यांनी झापले– मंदिरातल्या सभेत काय निर्णय झाला गुमान सांगणार आहेस की नाही? त्ये व्हय? मला वाटलं, आतावरी तुमापोतुर खबर पोहोचली असंल. अव, म्हाराजांनी मनसुबा धरला आन त्यो पुरा जाला न्हाई, आसं आजवर कंदी झालंया? विनाकारनी चिंता करता सरकार तुमी. आता म्हाराजांची पडछाया तुमी, तुमाला आमच्यावानी, चाकरांनी ह्ये सांगावं व्हय? मला येड्याला उमगच ना तुमी कशाचं काय पुसताय. समदं तुमच्या मनाजोगतं अगदी बैजावार ठरलंया. चिंता करू नगासा. उद्यापासून धाव्या दिशी गुरुवारी लय मोटी पूजा हाय, तुमाला सुद करून घेन्याची. नगा घोर लावून घेऊ. मजेत ज्येवा. उद्या येरवाळीचं बामणं येतील आन समदं बैजावार समजावतील. एखादी सर्वसामान्य खबर सांगावी इतक्या सहजपणे बहिर्जी बोलून गेला. हेच ऐकायला इतका वेळ कान आणि शरीराचा कण अन् कण आसुसला होता. स्तिमित होऊन नेताजी बहिर्जीच्या तोंडाकडे कितीतरी वेळ पाहत राहिले. घास घेण्यासाठी उघडलेले तोंड तसेच उघडे राहिले आणि हातातून घास गळून पडल्याचेही त्यांना भान नव्हते. काही वेळाने ते भानावर आले. तसेच खरकट्या हाताने उठून उभे राहिले. त्यांचे डोळे घळघळा गळू लागले. शरीराला कंप सुटला. तशा अवस्थेतच त्यांनी जगदीश्वराच्या दिशेने जमिनीवर लोटून घेत दंडवत घातला. पुन्हा उठून महालाच्या दिशेने दुसरा दंडवत घातला. ते पाहून बहिर्जीचासुद्धा ऊर भरून आला. पण वातावरण मोकळे करण्यासाठी वरकरणी मिश्कीलपणाने तो म्हणाला– अव, अव सरकार! हे काय करतायसा? असं मुसलमानागत ताटावरून मधेच उटता येनार न्हाई आता. रीत न्हाई तशी मराठ्यांची. खट्याळपणे बोलणाऱ्या बहिर्जीकडे त्यांनी हसून पाहिले. डाव्या हाताने डोळे पुसत लटक्या रागाने ते बोलले– चूप हरामखोर. जेव मुकाट्याने.
जगदीश्वराच्या मंदिरातून निघत असतानाच महाराजांनी रात्री भोजनास येत असल्याची वर्दी महाराणी पुतळाबाईंच्या महाली रवाना केली होती. वर असाही सांगावा धाडला की, भोजनात मिष्टान्न असावे आणि तेच जेवण नेताजीकाकांसाठीसुद्धा धाडावे. महालात पोहोचताच त्यांनी पालखी पाठवून तातडीने टोळशास्त्र्यांना बोलावून घेतले. या टोळशास्त्री. या! निराजीपंत सांगत होते, काही वैयक्तिक अडचण घेऊन आपण गडावर आला आहात. आम्ही पण असे मतलबी की, आपली विचारपूस न करता आपल्याला आमच्याच काजात गुंतवून घेतले. क्षमा असावी.
छे! छे!! त्यात महाराजांनी दिलगीर होण्याचे काहीच कारण नाही. श्रीहरीनेच आमच्या वैयक्तिक कामाचे निमित्त करून का होईना पण आम्हास आपल्या दर्शनास येण्याची बुद्धी दिली आणि आमचेकरवी एका फार मोठ्या आणि अत्यंत गुंतागुंतीच्या पण नाजूक धार्मिक अन् सामाजिक समस्येवर निर्णय करविला. मी हे माझे महत्भाग्य समजतो की, आजच्या धर्मसभेत मला सहभागी होण्याची संधी मिळाली. व्यक्तिगत कामे काय होत राहतील. प्रजेच्या प्रत्येक भल्याबुऱ्याची काळजी वाहणाऱ्या राजाकडून आमची उपेक्षा होणे शक्य नाही याची पुन्हा एकदा खात्री पटली. शास्त्रीबोवा, उलट आम्हीच हे आमचे भाग्य समजतो की, आपल्यासारखा वास्तववादी आणि प्रागतिक दृष्टिकोन बाळगणारा, त्याशिवाय शास्त्रांचे नेमके मर्म जाणणारा व्युत्पन्न विद्वान आजच्या सभेस उपस्थित होता. आमचे कार्य त्यामुळे सुकर झाले. अन्यथा न जाणे किती दिवस हे एरंडाचे गुऱ्हाळ गाळीत आम्हाला बसावे लागले असते. आता निर्णय आपल्याच श्रीमुखातून झाला आहे, तर हे शुद्धीकरणाचे पुण्यकर्मसुद्धा आपल्या शुभहस्तेच सिद्धीस जाऊ देत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, ये विषयी आपले गागाभट्टांसोबत सविस्तर बोलणे पूर्वीच झाले असल्याचे आपण सांगितलेत. मग तर विधीसंबंधी काही त्रुटी राहणे शक्यच नाही.
महाराज, या कार्यात सहभागी होण्यात आम्हाला आनंदच आहे. किंबहुना हे कार्य आम्हा हातून व्हावे अशी जगदीश्वराचीच योजना असावी. याचे ज्ञान समर्थांना झाले होते हे निश्चित. कारण आम्ही दोन सप्ताह समर्थांच्या चरणाशी राहण्याचा मनोदय व्यक्त करताच त्यांनी आम्हाला तातडीने रायगडी रवाना केले. वर बजावून सांगितले की, वाटेत कोठेही न रेंगाळता तडक गड गाठावा. दहा दिवसांनंतर येणाऱ्या पुढील गुरुवारी, सूर्योदयानंतर साडेतीन घटकांनी अमृतयोग आहे. त्या मुहूर्तावर हा सोहळा पार पडल्यास उत्तम राहील.
अवश्य. उदईक निराजीरावजी, मोरोपंत आणि त्र्यंबक सोनदेव आपल्या मुक्कामी आपली गाठ घेतील. या कार्यासाठी जे करणे त्याचा तपशील ते आपल्या आज्ञेनुसार निश्चित करतील. आज्ञा. राजे. उत्तम. आता आपल्या कामाबद्दल सांगावे. अन्यथा या व्यापात नेमके तेच राहून जायचे. त्याची हुरहुर आमचे मन कायम कुरतडत राहील. राजा, काम म्हणावे तर वैयक्तिक आहे, म्हणावे तर सार्वजनिक. पैठणी आम्ही वेदशाळा चालवितो. दीड-दोनशे विद्यार्थी विविध विषयांचे अध्ययन करतात. गुरुकुल असल्याने एवढे सारे विद्यार्थी, त्यांचे तीस-चाळीस अध्यापक आणि त्यांची कुटुंबे या अवघ्यांच्या योगक्षेमाचा भार पाठशाळेवरच आहे. पाठशाळेची थोडकी शेतजमीन आहे आणि दात्यांचा काही थोडा आश्रय, यावर कशीबशी तोंडमिळवणी होते. पण गेल्या काही वर्षांपासून लढायांची धामधूम बरीच वाढली आहे. आम्ही हिंदू म्हणून मोगली फौजा आम्हास लुबाडतात आणि मोगली रयत म्हणून आपले सैन्य आमची लूट करते. येन केन प्रकारेण निष्पन्न काय तर आम्ही जात्याच्या दोन पाळ्यांमध्ये सापडलेले. बहुसंख्य पाठशाळांची स्थिती यावेगळी नाही. या कारणे स्वराज्याकडून पाठशाळेस अभय लाभावे आणि काही वर्षासन प्राप्त व्हावे अशी कामना मनी धरून या यात्रेचे प्रयोजन केले आहे.
चिंता न करणे. सारे यथास्थित होईल. हे आमचे वचन आहे. तथास्तु. यानंतर अनेक विषयांवर दोघे बोलत बसले. गागाभट्टांच्या आठवणींपासून ते थेट मोगल फौजांच्या हालचालींपर्यंत अनेक विषयांवर चर्चा झाली. अखेर टोळशास्त्री म्हणाले– राजन, बोलण्यासाठी खूप विषय आहेत. खूप काही सांगायचे आहे. पण तूर्तास आज्ञा द्यावी. आमची आन्हिके खोळंबली आहेत.
महाराजांनी शास्त्रीबुवांच्या पायी मस्तक ठेवून नमस्कार केला. महालाच्या दारापर्यंत जाऊन त्यांना निरोप दिला. त्यानंतर दरबारी पोशाख उतरून त्यांनी धोतर व सैलसर अंगरखा असा घरगुती पेहराव केला आणि ते थेट महाराणी पुतळाबाईंच्या महाली आले. महालात शिरताशिरताच ते म्हणाले– बघा, राणीसरकार. झाले ना तुमच्या मनासारखे. पदर सावरीत राणीसरकार पुढे झाल्या. वाकून नमस्कार करीत म्हणाल्या– आजवरी इकडून आमच्या मनाविरुद्ध कधीच काही करणे झाले नाही. आता स्वारींनी आमच्या मनास यावे असे नेमके काय खास केले आहे, ते स्वत:च सांगावे. अरे! म्हणजे काय? तुमच्या खास नजरबाजांकडून काहीच खबर मिळाली नाही? आश्चर्यच म्हणायचे. अन्यथा सदरेवर घडलेली प्रत्येक गोष्ट आम्हाला कळण्यापूर्वी राणीवशात पोहोचून जुनी होते. इतरांचे आम्हास ठावे नाही. नगारखान्यात स्वागताची नौबत वाजते तेव्हा आम्हास समजते, स्वारी इतके दिवस गडात नव्हती. अहो, तुमच्या नेताजीकाकांचे दहा दिवसांनंतर गुरुवारी शुद्धीकरण आहे. आता कंबर कसून तयारीला लागा.
अगं बाई! खरेच? अखेर आई जगदंबा पावली म्हणायची. तरीच आज स्वारीकडून मुद्दाम मिष्टान्नाची फरमाईश झाली. जरा थांबावे. देवासमोर दिवा लावून साखर ठेवते. पुतळाबाईंनी लगबगीने देवासमोर तुपाची फुलवात लावली. साखर ठेवली, पदर पसरून त्यावर माथा टेकविला. प्रसन्न चित्ताने महाराजांचे भोजन झाले. रात्री उशिरापर्यंत महाराज पुतळाबाईंशी बोलत बसले होते.
दुसरे दिवशी सकाळचा दरबार महाराजांनी जरा लवकरच आटोपता घेतला. तातडीच्या कामासंबंधी आणि नव्या मोगली आक्रमणाला तोंड देण्यासाठी सैन्याच्या हालचालींबाबतच्या सूचना त्यांनी मंत्रिमंडळास दिल्या. त्यानंतर मोरोपंतादी निवडक मंत्र्यांस व निराजीपंतास सोबत घेऊन महाराज तडक महाली आले. नेताजीरावांच्या शुद्धीकरणासंबंधी त्यांनी थोडकी चर्चा केली. त्याच बैठकीत मग त्यांनी शास्त्रीमंडळींससुद्धा बोलावून घेतले. शास्त्रीमंडळी स्थिरस्थावर झाली. नमस्कारादी प्राथमिक उपचार पार पडल्यानंतर महाराज म्हणाले–
शास्त्री महोदय, हे शुद्धीकरण नेमके कसे होणार? त्याचे विधी विधान कसे? उपचार कोणते? इत्यादी तपशील स्पष्टपणे समजावा अशी आमच्या मंत्रिमंडळाची आणि अर्थात आमचीसुद्धा जिज्ञासा आहे. तरी आपण त्या संबंधाने जरा सविस्तर समजावून सांगितल्यास बरे होईल. प्रसन्नपणे हसून टोळशास्त्री म्हणाले– महाराज, आपण स्वत:च सारे जाणून घेण्याची जिज्ञासा व्यक्त केलीत हे फारच उत्तम झाले. अन्यथा ये विषयी सविस्तर संवाद करण्यासाठी आपल्या भेटीची अनुज्ञा मागावी असा सर्व विद्वानांचा विचार ठरलाच होता.
छान! यालाच म्हणतात मनाची एकतानता. जेव्हा सर्वस्व झोकून एकाच कार्यासाठी माणसे एकदिलाने उभी ठाकतात, तेव्हा आपसूकच त्यांची मने एकसारखा विचार करू लागतात. याच एकतानतेमुळे आम्ही हे सारे यश मिळवले आहे. असो. सांगावे तर मग. शब्दश: महाराज, यात एका पैची अतिशयोक्ती नाही. ऐकावे तर. नेताजीरावांना शक्य तितक्या लवकर, शक्य झाले तर आजच सायंकाळपर्यंत दर्भाच्या किंवा तृणांच्या कुटीमध्ये मुक्कामास जावे लागेल. प्रायश्चित्ते व शुद्धीकरण विधी संपूर्ण होईपर्यंत त्यांस तेथेच राहावे लागेल. या कालावधीत त्यांना भूमिशयन करणे आहे. म्हणजेच पलंग किंवा बाजेवर निद्रा न घेता जमिनीवर तृणशय्या करून त्यावर झोपावे. विधीच्या काळात त्यांस एकभुक्त आणि व्रतस्थ ब्रह्मचर्य पालन करून राहावे लागणार आहे. मध्यान्हकाळी एकदाच धान्यफराळ आणि रात्री फक्त दुग्धपान. आता त्यांनी क्षौर करून घ्यावे. दररोज देशकाळोच्चरणासह समंत्रक गोमय, गोमूत्र, क्षेत्र मृत्तिका, भस्म आणि शुद्धोदक स्नान करायचे आहे. त्याशिवाय त्यांनी एका चांद्रायण आणि एका कृच्छाचे प्रायश्चित्त करावयाचे आहे. अर्थात हे प्रायश्चित्त शुद्धीकरण विधीनंतर करायचे आहे.
हात उंचावून त्यांच्या बोलण्याचा ओघ थांबवत महाराज मध्येच म्हणाले– हे चांद्रायण आणि कृच्छ म्हणजे नेमके काय? त्याचा विधी कसा? कालावधी केवढा? टोळशास्त्र्यांनी सहेतुकपणे चित्रावशास्त्र्यांकडे पाहिले. चित्रावशास्त्री किंचित घुटमळले आणि म्हणाले– शास्त्रीमहाराज, आपणासारखा अधिकारी वेदमूर्ती प्रत्यक्ष उपस्थित असताना मी काही सांगणे उचित नव्हे. तसे नव्हे चित्रावशास्त्री, कोणाचा असा समज होता कामा नये की, आम्ही आमच्या पदाचा आणि अधिकाराचा गैरफायदा घेत अन्य विद्वानांवर दबाव आणून मनमानी करीत आहोत. महाराजांच्या अवकृपेचा धाक दाखवत आमच्या बोटांवर नाचवीत आहोत. आपण सारेच व्युत्पन्न शास्त्रज्ञ आहात. आम्ही फक्त आपल्या ज्ञानास नवा आणि वेगळा आयाम, अर्थ आणि अन्वय पुरविला आहे. इतकेच. विनासंकोच सांगा. आज्ञा विद्वत्वर महाराज, परंपरा आणि शास्त्रसंमत काही महत्त्वाच्या स्मृती आहेत, ज्यात प्रायश्चित्तांचा ऊहापोह आहे. जसे पराशर स्मृती, वृद्ध पराशर स्मृती, प्रायश्चित्तेंदुशेखर, मिताक्षरी, याज्ञवल्क्यस्मृती, संवर्त स्मृती, यत्रंस्मृती, मनुस्मृती, देवल स्मृती इत्यादी. यमस्मृती स्पष्ट निर्देश देते की, सर्व लोक बहिष्कृता: चान्द्रायणेन शुद्धन्ति । सर्व समाजाने कोणत्याही का कारणाने असो, बहिष्कृत केलेली व्यक्ती, चांद्रायणाचे प्रायश्चित्त आचरले असता शुद्ध होते. या बहिष्कृतांमध्ये धर्म बहिष्कृतांचासुद्धा समावेश आहे. महाराज, आरूढ पतित्वाचा दोष सर्वांत गंभीर महापाप समजले जाते. या दोषासाठी काही स्मृती केवळ देहान्त प्रायश्चित्तच सांगतात. परंतु पराशर स्मृतीमध्ये त्या दोषाचे निवारण करण्यासाठीसुद्धा लौकिक प्रायश्चित्त सांगितले आहे.
‘य: प्रत्यसितो विप्र: प्रव्रज्यातो विनिर्गत: । अनाशक निवृत्तश्च गार्हस्थ चेच्चिकीर्षति ।। स चरेत त्रिणी कृच्छाणि त्रिणी चांद्रायणानिच । जातकर्मादिभि: सर्वै: संस्कारै: शुद्धिमाप्नुयात ।।’ याचा अर्थ असा महाराज की, संन्यासाश्रमाचा त्याग करून पुन्हा गृहस्थाश्रमात परत येणाऱ्यास आरूढ पतित अशी संज्ञा शास्त्रांनी दिली आहे. सर्वसंग परित्याग करून, शिखासूत्र त्यागून संन्यास ग्रहण करणे म्हणजे जणू या लौकिक धर्माचा त्याग करणे, कारण परिव्राजकास नित्यनैमित्तिक धार्मिक कृत्ये आचरावयाची नसतात, तद्वतच त्याचे औध्र्वदेहिकसुद्धा केले जात नाही; त्यामुळे वैदिक आश्रम धर्माचा त्याग करून यावनी धर्म स्वीकारणाऱ्याससुद्धा हीच संज्ञा चपखल लागू होते. अर्थात स्वधर्मात परत येणाऱ्या इच्छुकास तीन चांद्रायणे व तीन कृच्छांचे प्रायश्चित्त देऊन शुद्ध करून घेणे उचित ठरते. तदोपरी जणू पुनर्जन्म झाला असे मानून, जातकादी संस्कार करून त्याचा पुनश्च समाजात स्वीकार व्हावा अशी स्पष्ट धर्माज्ञा ही स्मृती देते; त्यामुळेच नेताजीरावांसाठीसुद्धा तेच प्रायश्चित्त निर्धारित केले आहे. अच्छा ते आले ध्यानात. कृच्छ व चांद्रायण म्हणजे नेमके काय करायचे? चित्रावशास्त्र्यांनी जनार्दनशास्त्री ढेरेंना खुणावले. टोळशास्त्र्यांनी मान हलवून त्यास अनुमती दिली. घसा किंचित स्वच्छ करून ढेरेशास्त्री बोलू लागले.
महाराज कृच्छ म्हणजे सहा दिवसांचे एक आवर्तन असते. पहिले दिवशी प्रायश्चित्तकत्त्र्याने केवळ तिळाची ढेप भक्षून राहावे. दुसऱ्या दिवशी केवळ सातूचे पीठ सेवावे. तिसऱ्या दिवशी भाताच्या पेजेचे सेवन करावे, चौथ्या दिवशी स्नेहरहित, म्हणजे लोण्याचा अंश पूर्णत: काढून टाकलेले ताक प्राशन करावे, तर पाचव्या दिवशी केवळ शुद्धोदक घ्यावे. सहाव्या दिवशी निव्वळ निराहार निर्जला उपवास करावा. असे तीन वेळा केल्यानंतर कृच्छ पूर्ण होते. कृच्छ पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या शुद्ध प्रतिपदेपासून चांद्रायणास आरंभ करावा. अमावास्येच्या दिवशी त्याचे आवर्तन पूर्ण होते. शुद्ध प्रतिपदेस मोराच्या एका अंड्याएवढा भात भक्षावा. द्वितीयेस दोन अंड्यांएवढा, तृतीयेस तीन अंड्यांएवढा अशा क्रमाने पौर्णिमेपर्यंत चढत्या श्रेणीने भात सेवन करावा. वद्य पक्षात हाच क्रम उतरता करावा. म्हणजेच वद्य प्रतिपदेस चौदा अंड्यांएवढा, तर अमावास्येस अकलंक निर्जला उपवास. याला चांद्रायण अशी संज्ञा आहे.
महाराज, कृच्छ व चांद्रायण आचरीत असताना त्यात कोणत्याही कारणाने व्यत्यय वा खंड पडू देता कामा नये. अपरिहार्यपणे वा दुर्दैवाने तसा खंड पडलाच तर पुन्हा नव्याने सुरुवात करणे भाग आहे. या प्रायश्चित्तातील सर्वांत कठीण भाग हाच आहे. या संपूर्ण काळात प्रायश्चित्त घेणाऱ्याने संपूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करून व्रतस्थ राहणे नितांत आवश्यक आहे. ही प्रायश्चित्ते ऐकण्यास फारशी दुर्घट वाटत नसली तरी काया-वाचा-मने करून व्रतस्थ राहून विनाव्यत्यय आचरण्यास महाकठीण आहेत. मनुष्याच्या संयमाची आणि इच्छाशक्तीची कस पाहणारी आहेत. मनाचा संयम जरी ढळला तरी व्रतभंग व्यत्यय झाला असे समजून पुनश्च हरि: ओम! म्हणूनच यांच्या सुयोग्य व सफल आचरणाने मनुष्य आंतर्बाह्य शुद्ध होतो असे समजले जाते. अर्थात त्याचा जणू पुनर्जन्मच झाला असे मानून त्यावर जातकादी संस्कार करण्याची धर्माज्ञा आहे. एकूण सारे प्रकरण जरा कठीणच म्हणायचे. पण भूदेव आपण तर शुद्धीकरणासाठी येत्या गुरुवारचा मुहूर्त धरला आहे. त्या अवधीत या प्रायश्चित्ताचे आचरण कसे शक्य व्हावे? महाराज, धर्मशास्त्रात आपत्कालीन तडजोड करण्यास अनुज्ञा आहे. त्यास आपत्धर्म अशी शास्त्रीय संज्ञा आहे; त्यामुळे सांप्रत आपण शुद्धिविधी करून त्या उपरी कृच्छ व चांद्रायणांचे प्रायश्चित्त करविणार आहोत. शुद्धीमध्ये कोणते विधी होतील? सर्वप्रथम चित्त व शरीर शुद्ध्यर्थ पंचगव्य प्राशन, प्रायश्चित्त घेणाऱ्याने करावयाचे. तदोपरी प्रायश्चित्त घेवविणाऱ्याने करायचे पुण्याहवाचन, नंतर आचार्यांद्वारा ग्रहशांती. उग्ररथशांती यांचे होम, पूर्णाहुती. इष्टदेवता व कुलदेवतांची षोड्शोपचार पूजा, प्रायश्चित्त घेणाऱ्यास देवता तीर्थाचा अभिषेक करून त्याची शुद्धी. त्यानंतर त्याच्याद्वारे देवतांची पंचोपचार पूजा, यज्ञकुंडाची पूजा, गोपूजा, ब्राह्मण पूजा, सत्पात्र व गरजवंतास दानार्पण, अन्नदान, गोदान, आप्त, सगोत्र, सुहृद व परिवारासह एका पंगतीत भोजन असा एकूण कार्यक्रम असेल.
शास्त्रीमहोदय, आपण सांगितलेला हा प्रायश्चित्त व शुद्धीकरणाचा विधी अत्यंत बारकावे असलेला आणि क्लिष्ट आहे. सर्वसामान्यांस तो कसा समजावा? त्यांच्याकडून तो कसा आचरला जावा? त्यास खर्चसुद्धा मोठा येणार; येरांस हे कसे जमावे? टोळशास्त्र्यांनी अत्यंत समाधानाने मान हलविली व प्रसन्नपणे ते म्हणाले– महाराजांचा साक्षेप खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. महाराज, हा एवढा तपशीलवार विधी संपूर्णत: शास्त्रसंमत व आवश्यक असला, तरी आपण तो नेताजीरावांसाठीच निर्धारित केला आहे. कारण हा नव्या क्रांतीचा शुभारंभ तर आहेच त्याशिवाय कारण असे की, या प्रयोजनासाठी आपण एवढा गणगोत जमा करण्याचा घाट घातला आहे, त्यास सर्वदूर प्रसिद्धी देण्याचा आपण प्रयत्न करीत आहात. मग तो कार्यविधीसुद्धा तसाच भव्यदिव्य नको का? कोणी त्यात आक्षेपांची खुसपटे काढून प्रथमग्रासे मक्षिकापात करावयास नको. येरांसाठी मात्र त्रिरात्र भूमिशयनासह उपवास, ब्रह्मचर्यपालन, क्षौर, एक दिवस पंचगव्य स्नान, पंचगव्य प्राशन, इष्ट व कुलदेवता पूजन, यथाशक्ती दानधर्म, पांक्तेय झाल्याचे मान्यतादर्शक म्हणून परिवार व सगोत्रांसह एका पंगतीत भोजन एवढाच विधी निर्धारित केला जाईल. उत्तम! हे ठीक होईल. मात्र आमच्या नेताजीकाकास तरी हे अवघे कसे जमावे?
महाराजांची आज्ञा झाल्यास माझे दोन विद्यार्थी त्यांच्याकडून हे सारे विधिवत करवून घेतील. उत्तम! निराजीपंतांस आम्ही सूचना देऊ, ते योग्य ते परवाने आपणापर्यंत पोहोचते करतील. मोरोपंत आणि दत्ताजीपंत आपणास यथावकाश भेटून अन्य तपशील निश्चित करतील. अनेक बारीकसारीक शंकांचे निरसन करवून घेऊन महाराजांनी शास्त्रीमंडळींस निरोप दिला.
महाराजांच्या हुकमाप्रमाणे नेताजी राहत असलेल्या बंगलीच्या आवारातच एक गवताची झोपडी बांधण्यात आली. तिसरा प्रहर सुरू होत असतानाच नेताजी त्या झोपडीत राहण्यास गेले. त्या झोपडीत केवळ घोंगडी व धौतवस्त्र टाकून पेंढ्याची एक शय्या तयार करण्यात आली होती. पाण्याचा खुजा व फुलपात्र ठेवण्यासाठी एक तिवई आणि दिव्याची ठाणवई याव्यतिरिक्त काही सामान नव्हते. दुपारच्या भोजनापूर्वीच त्यांचे क्षौर उरकले गेले. त्यांचा पोशाख उतरून केवळ कंबरेला एक पंचा आणि खांद्यावर पांघरण्यासाठी एक पंचा असा पेहराव त्यांना दिला गेला. दुपारचे जेवणसुद्धा अगदी साधे व पथ्यकर देण्यात आले. रोजच्यासारखा बहिर्जी त्यांच्यासोबत जेवला नाही. तो केवळ समाचार घेण्यासाठी समोर उभा होता. सहज बोलावे तसा तो बोलला–
सरकार, आता ह्ये पूजा सुद्दीकरन व्हयीतोवर ह्ये असं बामनावानी सादं ज्येवन ज्येवायचं आन त्ये बी फकस्त दोपारी. येकल्यानंच. रातच्याला पेलाभर गाईचं दूद प्यायाचं; बास. ज्येवनं झाली का त्या झोपडीत ऱ्हायास जायाचं हाय तुमास्नी. सरकार, आता हुकूम द्येवा. आपला बंदोबस्त आता सूर्याजी पिसाळ ठिवतील. आमाला गड उतरून कामगिरीवर जान्याचा हुकूम झालाया. गनिमाच्या हालचाली सुरू हायती. आपुन त्येच्या शेपटावर पाय दिला हाई. तवा त्यो चवताळलेल्या जनावरागत येनार. त्येची बित्तंबातमी म्हाराजांस कळली पायजे. चाकराला आता हितं रेंगाळून चालनार न्हाई. आपला ह्यो सोहळा बघनं आमच्यासारक्याला कसं शक्य वावं? पोरीचं लगीन हुबं करावं पर तिच्या लगनाची मंगलाष्टकं मातर आई-बापांनी ऐकायची न्हाई असा रिवाज. आमचं तसंच म्हनायचं. लहान त्वांडी मोटा घास घ्येतला, मापी करा. पर चिंता करू नगासा, समदं गोमटंच व्हईल. तुमचा बारदाना आनवन्याच्या खटपटीला म्हाराज हाईती. म्हाराजांचा मनसुबा खाली जायचा न्हाई.
*नेताजीचे जेवण आटोपले. बहिर्जीने त्यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला. नेताजीने त्याला कडकडून मिठी मारली. दोघांचे डोळे पाझरत होते. जड अंत:करणाने बहिर्जी निरोप घेऊन गेला.* *काही वेळाने सूर्याजीने येऊन वर्दी दिली. त्याने मोठ्या आदराने त्यांचा मुक्काम झोपडीत हलविला. दिवेलागणीपूर्वी टोळशास्त्र्यांचे दोन विद्यार्थी येऊन प्रायश्चित्त व शुद्धीकरणाचा तपशील विस्ताराने समजावून गेले. नेताजींच्या शुद्धीकरणास आता सुरुवात झाली होती.* *_क्रमश:_*
*________📜🚩

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...