*नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔*
*अग्निदिव्य*
*लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार*
*___⚔🚩⚔📜🚩_______*
*दानिशमंदखानाने सुरईतले मोगऱ्याच्या सुवासाचे थंडगार पाणी सोन्याच्या प्याल्यातून बादशहाच्या ओठांना लावले. चार-सहा घोट घेऊन बादशहाने प्याला दूर सारला. दानिशमंदखानाने त्याला अलगद झोपविले आणि सुगंधी गार पाण्यात भिजविलेल्या रेशमी रुमालाने त्याचे कपाळ अन् मस्तक हळुवारपणे पुसून काढले. काही वेळ बादशहा तसाच स्वस्थ पडून राहिला. मात्र मुखाने ‘अ उजू…’ दुवा पुटपुटत राहिला. मग तो उठून बसला पण त्याने मस्तकावरचा ओला रुमाल तसाच राहू दिला. नजर रुजाम्यावर खिळली होती. बोटे अस्वस्थ हालचाल करीत होती. हलक्या आवाजात दानिशमंदखान म्हणाला–*
जान की अमान पाऊँ तो गुलाम कुछ अर्ज करना चाहता है।
मान होकारार्थी हलली.
गुस्ताखी माफ आलमपन्हा, पण ही वेळ शोक व्यक्त करण्याची, संताप व्यक्त करण्याची नव्हे. आलमपन्हांना सारी कायनात जिंदा पीर समजते. हजरत उमर यांच्यानंतर इस्लामच्या तवारीखमध्ये जहाँपन्हांचे नाव घेतले जाते. आलमपन्हांचा बसेरा खैबरपार असता तर खिलाफत या मुबारक चरणांशी चालत आली असती. असे असताना ही असली गफलत? गुस्ताखी माफ पण गुलामाची अकल काम करेनाशी झाली आहे.
दानिशमंद, माबदौलतांची बेवजहची तारीफ बंद कर. तुला माहीत आहे माबदौलतांना बकवास पसंत नाही. मातम? कोणासाठी? त्या गाफील अय्याश चाळीस हजारांसाठी? कुत्ते की मौत मरण्याची त्यांची लायकी होती आणि तसेच मरण त्यांना आले. कुलीखानासाठी? माबदौलतांना पूर्ण यकीन आहे तो मेलेला नाही. अशा पद्धतीने तो मारला जाणे शक्य नाही. काय तर म्हणे पलंगावर मुडदा सापडला म्हणून तो कुलीखानाचा. त्या बेवकूफ मीर अल्तमशने काही ठोस सबूत मिळविले? नाही. आणि आमचे सिपाहसालार समजतात त्याचे बयान खरे आहे. नुसता अय्याश वेड्यांचा बाजार आमच्याभोवती जमा झाला आहे. कामात चुस्ती नाही, डोक्यात अक्कल नाही. आणि दिलात इमान? ते तर नाहीच नाही. नुसता कुफ्रचा अंधार. दिलेरखान त्याला एकदा गिरफ्तार करू शकला याचा अर्थ तो कोणाच्याही शिकंजामध्ये सहज सापडेल की काय? नामुमकिन! कतई नामुमकिन!! तो कुलीखान आहे. नेता पालकर. दुसरा शिवा. माबदौलतांनी त्याला आणि त्याच्या धन्याला जेवढे ओळखले आहे, तेवढे त्यांना त्यांच्या बापांनीसुद्धा ओळखले नसेल. असे चिलटासारखे मरण्यासाठी त्याचा जन्म नाही. कुलीखानाचा तर नव्हेच.
माबदौलतांचा अंदेशा खरा ठरला. दानिशमंद, कुलीखानाला दख्खनमध्ये धाडण्यासाठी मना करीत होते. माबदौलतांनी दिल की बात नजरअंदाज करून सियासतला अहमियत दिली. दिल की आवाज ठुकराने का अंजाम आज सामने आहे. माबदौलतांचा गुस्सा त्यासाठी आहे. तो मारला गेल्याचे भासवून त्या चाणाक्ष शिवाने आपल्या लोकांना गुमराह केले. या गाफीलपणाचा फायदा घेऊन कुलीखान पळाला. हा खलिता बऱ्हाणपुराहून निघण्यापूर्वीच तो आपल्या पुरान्या धन्याकडे सुखरूप पोहोचला असेल. हा गुस्सा सहजपणे उल्लू बनवल्या गेलेल्या आपल्याच बेवकूफ, गाफील, बिनडोक, बेजबाबदार, अय्याश सरदार आणि मनसबदारांवर आहे. कुलीखान परत गेला. सुखरूप परत जाऊ शकला. इसका साफ मतलब असा की, इतकी वर्षे माबदौलतांच्या दिलोदिमागमध्ये बसत असलेला शक और शुबा यकीन में तबदील हो चुका है. नेताला शिवानेच बुढ्ढ्या मिर्झाराजाकडे पाठवले. शिवाने भरवसा दिला, हुकूम दिला म्हणून त्याने इस्लाम कबूल केला. अन्यथा तो सैतान वाटेल तेवढे हाल सोसत मरण पत्करता पण इस्लाम कधीच कबूल न करता. माबदौलतांनी तेव्हासुद्धा दिल की बात नजरअंदाज केली. हा गुस्सा त्यासाठी आहे. जर हे खरे असेल आणि यकीनन ते खरे आहेच, तर मग हे साफ आहे की, शिवा सतत त्याच्याशी संधान बांधून होता. माबदौलतांच्या डोळ्यांत धूळ फेकण्यात कामयाब होऊन संधान बांधून होता. मग तो आदबखाना असो, जनानखाना असो वा अफगाणिस्तान असो. हे असले स्वत:ला रुस्तम समजणारे, सूरमा म्हणवणारे शाही मनसबदार स्वत: तर गाफील राहिलेच पण माबदौलतांना गुमराह करीत राहिले. हा गुस्सा त्यासाठी आहे. आदिलखानासारख्या य:कश्चित सुलतानाच्या एका कवडीमोल जमीनदाराचा पोरगा एवढी ताकद ठेवतो की, हजारो कोसांचे मुघलिया साम्राज्य किसी को भनक लगे बिना पार करून त्याची माणसे थेट अफगाणिस्तानात पाठवतो. त्याचा त्याहून बिनकिमतीचा एक मुलाजिम, जो माबदौलतांच्या कृपेने मुघलिया तख्ताचा सामान्य पाचहजारी मनसबदार झाला तो स्वत:च्या ताकदीवर, राजधानीतून मदतीची अपेक्षा न करता, चंद दिवसांत अवघा अफगाणिस्तान जिंकून घेण्याचा वादा करू शकतो; म्हणजे त्या पाताळयंत्री शिवाने त्याच्या मदतीसाठी स्वत:ची फौजसुद्धा पाठवली होती की काय? माबदौलतांना त्याची हवासुद्धा नसावी? अफसोस! कदाचित, असे करून माबदौलतांच्या दिलात बगावतीचा खौफ पैदा करावा म्हणजे त्याला हिंदुस्थानात परत आणले जाईल असा त्याचा हिशेब असावा. अफसोस!! माबदौलत गुमराह झाले. हरामखोर कुलीखानाची साजिश कामयाब झाली. हा गुस्सा माबदौलतांच्या त्या नाकामयाबीवर आहे. कुलीखानाकडून इस्लामची सेवा करायची होती, असे खयाली पुलाव पकवणे सरासर नादानी होती. वो ख्वाब चकनाचूर झाला; हा गुस्सा त्यासाठी आहे. माबदौलतांचे जन्नतनशीन पुरखे शहनशाहे आलम जलालुद्दीन महम्मद अकबर गाझी यांनी सरजमीने हिंदमध्ये मुघलिया सलतनत बुलंद केली. मुघलिया सलतनतीच्या सरहद्दी अफगाणपासून दख्खनमध्ये नर्मदापार नीरा नदीपर्यंत पोहोचवल्या. पण त्यासाठी त्यांनी इस्लाम दुबळा केला. काफिरांना जवळ केले, त्यांचे लाड केले. इतकेच नव्हे तर साहेबी इमान ठेवणाऱ्या सरदार, मनसबदार, फौज आणि अवाममध्ये कुफ्र फैलावला; त्यामुळे मुघल नस्ल इस्लामच्या नेक राहवरून भटकली. हा गुस्सा त्यासाठी आहे. जाफरखान माबदौलतांना केवळ सत्तेची लालसा होती म्हणून त्यांनी तख्त काबीज केले असे नाही, तर माबदौलतांना दाराला तख्तापासून दूर ठेवायचे होते. जन्नतनशीन पुरख्यांनी जोपासलेले कुफ्र त्याच्यात पुरेपूर उतरले होते. खुदा ना खास्ता जर दारा सत्ता हासिल करण्यात कामयाब होता, तर या काफिर शिवाने आणि त्याच्या बापाने कुतुब आणि आदिल या दोन्ही शहांना कधीच नेस्तनाबूद केले असते. इतकेच नव्हे तर नर्मदा तर सोडाच चंबळ ओलांडून आतापर्यंत दिल्लीच्या मुघलिया तख्ताला नख लावण्याची गुस्ताखी केली असती. स्वत:ला पाक नमाजी, मोमिन म्हणवून घेणारी तुझ्यासारखी माणसे अजून हे समजून घेत नाहीत, कुराणेपाकमध्ये सांगितलेले फर्ज आणि सुन्नत नजरअंदाज करतात, कुफ्र जोपासतात, अय्याशीमध्ये रमतात; त्यामुळे नुकसान इस्लामचे होते हा गुस्सा त्यासाठी आहे.
बोलता बोलता बादशहाचा आवाज चढत गेला. अखेर त्याला धाप लागली म्हणून तो बोलायचा थांबला. दानिशमंदखानाने पुढे केलेल्या प्याल्यातून त्याने घटाघटा पाणी प्यायले आणि फूत्कार सोडीत तो बसून राहिला. तिन्ही मुत्सद्दी एकमेकांकडे पाहत राहिले. बऱ्याच वेळानंतर तोंड उघडण्याचे धाडस दाखविले ते वजीर जाफरखानानेच. तो वजीर असल्याने बादशहाकडून हुकूम घेऊन त्याची तामिली करण्याची जिम्मेदारी अखेर त्याचीच होती.
गुस्ताखी माफ आलमपन्हा, जे घडायचे ते तर आता घडून गेले. जो गजब होऊन गेला तो तर आता दुरुस्त केलाच पाहिजे. आलमपन्हांनी हुकूम करावेत जल्द अज् जल्द शब्दश: तामिली होईल.
जाफर, या क्षणी तरी सैतानाला दूर ठेवण्यासाठी माबदौलत अल्लाच्या सोबत राहू इच्छितात. तू ईशाच्या नमाजानंतर दिवाणखान्यात भेट. तुला पुढचे हुकूम मिळतील. मात्र आत्ताच्या आत्ता फौज रवाना कर आणि ही खबर शिकारपूरच्या कुलीखानाच्या हवेलीत पोहोचण्याच्या आत त्याचा सारा कुटुंबकबिला गिरफ्तार कर. कोणी अटकाव करण्याची जुर्रत करू पाहील तर सरळ कापून काढण्याची सख्त ताकीद दे. कुलीखानाने आपल्या कबिल्याची बरबादी स्वत:च्या हातांनी ओढवून घेतली आहे. तो नाहीतर निदान त्याची बायका-पोरे तर माबदौलतांच्या हातात आहेत. एक गोष्ट पक्की लक्षात ठेव, या गुन्ह्यातून आता कोणाचीच सुटका नाही. तू कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केलास किंवा स्वत:च्या जिम्मेदारीवर कोणाला तसा शब्द दिलास, तर त्याचा नतीजा भयंकर असेल. तुम्हा दोघांना निरोप दिला आहे. दानिशमंद माबदौलतांची सोहबत करेल. जनानखान्याच्या दरोग्याला हुकूम दे. म्हणावे, पुढच्या हुकमापर्यंत माबदौलतांच्या महालातला राबता पूर्ण बंद राहील. काय वाट्टेल ते झाले तरी. नमाजासाठीसुद्धा माबदौलत बाहेर निघणार नाहीत. तखलिया.
थरथरत्या हातांनी कुर्निसात करीत पाठ न दाखविता दोघे बाहेर निघून गेले.
मराठ्यांनी औरंगाबादच्या छावणीत उडविलेल्या प्रलयाची खबर दिलेरखानास इफ्तीखारखानाच्या खलित्यावरून मिळाली होतीच. तो हातातला घास ताटात टाकून टाकोटाक निघाला आणि मीर अल्तमश अन् इखलासखान बऱ्हाणपुरास पोहोचल्यापासून तीन-चार दिवसांतच तो बऱ्हाणपुरात दाखल झाला. छावणीत माजलेली घबराट आणि गर्भगळित झालेले बडे बडे सरदार पाहून त्याचे तर पित्तच खवळले. कुलीखानाचा मृत्यू ज्या प्रकारे झाला आणि त्याचा सरदारांसह सैन्याच्या मनोधैर्यावर जो परिणाम झाला, तो पाहून ही महत्त्वाकांक्षी मोहीम बारगळल्यातच जमा आहे हे त्या चाणाक्ष सेनापतीने अचूक हेरले. खचलेल्या मनाने युद्धे जिंकली जात नाहीत याच्या साक्षी इतिहासात पानोपानी विखुरल्या आहेत. मात्र अशा खचलेल्या आणि भेदरलेल्या अनुयायांमध्ये जोम उत्पन्न करून त्यांना विजयोन्मुख करणे यातच खऱ्या नेत्याचा कस लागतो, हेसुद्धा तो पुरेपूर जाणून होता. दिलेरखानाला सर्वप्रथम फौजेला धीर देऊन उभे करायचे होते. सर्व लहान-मोठ्या सरदारांना त्याने सदरेवर गोळा केले आणि त्यांची चांगली खरपूस खरडपट्टी काढली. आवेशपूर्ण भाषण करून त्यांच्यात नवा जोम भरण्याचा प्रयत्न केला.
छावणीत दाखल झाल्यापासून बरोबर चौथ्या दिवशी त्याने दाऊदखानाला छावणी हलविण्यास भाग पाडले. दाऊदखान एवढा भेदरून गेला होता की, मोहिमेचा सरलष्कर असूनसुद्धा दिलेरखान जे सांगेल ते जसेच्या तसे करण्यातच प्राप्त परिस्थितीत श्रेयस्कर आहे हे मनोमन जाणून त्याप्रमाणे वागत होता. छावणी औरंगाबादकडे कूच करू लागली. जेमतेम तापी ओलांडली आणि पहिल्या वळिवाने तडाखा दिला. औरंगाबाद जवळ येण्यापूर्वीच मृगाचा पाऊस सुरू झाला. अवजड सामान सोबत नसल्याने वेगाने औरंगाबाद जवळ करणे शक्य झाले. छावणी स्थिरस्थावर होत असतानाच दाऊदखानाच्या हाती बादशहाने त्याच्या थैलीला पाठविलेला जवाब पडला.
अपेक्षेप्रमाणे सर्व दोषांचे खापर बादशहाने त्याच्याच माथी फोडले आणि त्याला भरपूर शिव्याशाप दिले होते. दिलेल्या हुकमाचे पालन न करण्याबद्दल आणि बेजबाबदारपणे कुलीखानाला नाहीसा होऊ दिल्याबद्दल त्याला संपूर्णपणे दोषी ठरविण्यात आले. त्याचा सर्व सरंजाम जप्त करण्यात आला. त्याने कळविले त्याप्रमाणे कुलीखान मारला गेला असेल या वृत्तावर विश्वास ठेवण्यास त्याला स्पष्ट नकार कळविला. तो जिवंत असून त्याला जिंदा वा मुर्दा बादशहासमोर हाजिर केल्याशिवाय बादशहासमोर पेश होण्यास मज्जाव करण्यात आला. इतकेच नव्हे तर तापी ओलांडून उत्तरेत येण्यास प्रतिबंध करण्यात आला.
शाही हुकूम पायदळी तुडवून छावणी सोडून शहरात राहिल्याबद्दल आणि त्यामुळे मराठ्यांपासून छावणी वाचविण्यात कुचराई केल्याबद्दल इफ्तीखारखानावर ठपका ठेवण्यात आला. बादशहाची सख्त इतराजी झाल्याचे त्याला स्पष्टपणे कळविले गेले. त्याचा अर्धा सरंजाम जप्त झाला. पावसाची तमा न बाळगता ताबडतोब राजधानीत हुजूर दाखल होण्याचे फर्मान त्याच्यावर बजावण्यात आले.
एका स्वतंत्र फर्मानानुसार दाऊदखानाला सरलष्करपदावरून बरखास्त केले गेले आणि दिलेरखानास मोहिमेचा सरलष्कर नेमण्यात आले. नव्या फर्मानानुसार आता दाऊदखान दिलेरखानाच्या हुकमाप्रमाणे चालणारा एक सर्वसामान्य सरदार होऊन राहिला. त्याशिवाय सरलष्कर म्हणून दिलेरखानाला, मीर अल्तमश आणि इखलासखानास कामात कुचराई करून फौजेच्या विनाशास कारण झाल्याचा आरोप ठेवून कैद करण्याचा हुकूम झाला. त्यांना दिल्लीत बंदोबस्ताने घेऊन येण्याची जिम्मेदारी इफ्तीखारखानावर सोपविली गेली.
दिलेरखानासाठी स्वतंत्र गुप्त खलिता आला होता. त्यात बादशहाने कळविले होते की, कुलीखान जिवंत असून तो आपल्या जुन्या धन्याकडे परत गेला आहे. एवढेच नव्हे तर तो रायगडावर सुखरूप पोहोचल्याची मुस्तकीम खबर असल्याचे लिहिले होते. याची नीट चौकशी करून तपशीलवार वृत्त पाठविण्याच्या सख्त सूचना त्याला देण्यात आल्या होत्या. कुलीखानाला शिवा पुन्हा हिंदू करून घेईल अशी आशंका बादशहाने व्यक्त केली होती. बाकी सर्व मोहीम बाजूला ठेवून, कुलीखानाला ज्या ठाण्यावर ठेवण्यात आले असेल, त्या ठाण्यावर हल्ला करून, त्याच्या मुसक्या आवळून त्याला स्वत:च्या निगराणीत दिल्लीमध्ये आणण्याचा स्पष्ट हुकूम बादशहाने दिला; आणि त्यामुळे एकही नवा किल्ला वा ठाणे जिंकून न घेता आले तरी चालणार होते.
एकूणच स्वराज्याविरुद्धची मोहीम तूर्तास थंड पडून कुलीखानाला पुन्हा पकडून आणण्याची मोहीम सुरू झाली. पावसाची पर्वा न करता छावणी नगरच्या दिशेने कूच करू लागली.
दुपारच्या विश्रांतीनंतर महाराजांनी सरनोबत हंबीरराव मोहित्यांना एकांतात बोलावून घेतले.
हंबीरराव, नेताजीकाकांसोबत मोगली शिपायांचा जो दस्ता ताब्यात आला आहे त्याच्या चौकशीचा हुकूम झाला होता. काय निष्पन्न झाले?
जी महाराज, त्यांच्यावर नजरबाजांची टेहळणी लावली होती. मी स्वत:सुद्धा जातीनिशी हरएक हशमाशी रुबरू बोललो आहे. आपल्या हुकमाप्रमाणे त्यांना कुठेही अपराधी वा अपमानास्पद वाटेल असे न वागवता त्यांची कसून चौकशी झाली. ते स्वत:ला नेताजीरावांचे खास अंगरक्षक म्हणवतात. बहिर्जीने त्यांची पुष्टी केली आहे. त्यांचा रिसालदार आहे नर्दुल्लाखान पठाण या नावाचा, तो पूर्वी स्वराज्याच्या चाकरीत होता. महाराज कदाचित त्याला ओळखत असावेत असे वाटते. कारण पूर्वी कुं वर छत्रसाल बुंदेल्यास मदत करण्यासाठी महाराजांनी स्वराज्यातून जी माणसे धाडली होती, त्यातल्या पहिल्या तुकडीचा तोच नायक होता. खुद्द कुंवरजींसोबतच उत्तरेत गेला होता. त्याच्या दस्त्यातील माणसेसुद्धा त्याच तुकडीची. कारण उमगू शकले नाही पण पुढे तो आपल्या या दस्त्यासह कुंवरजींपासून अलग झाला. त्याचे म्हणणे असे की, खास कामगिरीवर कुंवरजींनीच त्याला महाबतखानाकडे धाडले. मोठ्या युक्तीने त्याने महाबतखानाचा विश्वास मिळवला. पुढे महाबतखान हिंदुस्थानात परत आला तेव्हा त्याने त्याच्या माघारी नेताजीरावांवर नजर ठेवण्यासाठी म्हणून त्यास खास मागे ठेवले. त्याला त्याने नेताजीरावांचा खास अंगरक्षक म्हणून नेमले. तो असे सांगतो की, पुढे नेताजीरावांनी त्याला आपल्या मायेत घेतले. जुने इमान, मूळ निष्ठा पुन्हा जागी झाली; त्यामुळे बहिर्जी माणसांची चाचपणी करीत असताना हा त्याला गवसला. बहिर्जीच तो, त्याने त्याला आपल्याकडे वळवून घेतले. त्याच्या फितव्यामुळेच नेताजीरावांवरचा छापा कारगर झाला. त्याला त्याच्या दस्त्यासह पुन्हा फिरून स्वराज्याच्या सेवेत रुजू होण्याची इच्छा आहे. विशेष म्हणजे त्या सर्वांचा कुटुंबकबिला इथेच स्वराज्यात आहे.
अरे वा! ठीक. पुढे?
दुसरा महत्त्वाचा माणूस म्हणजे नेताजीरावांचा खासगी खिदमतगार. त्याचे नाव सिद्दी आफताबखान. तोसुद्धा म्हणे पूर्वी स्वराज्याच्या सेवेत सिद्दी हिलालच्या निसबतीत होता. पुरंदराच्या तहानंतर झालेल्या पडझडीत तो दिलेरखानाच्या फौजेत दाखल झाला. नेताजीरावांना कैद करून आग्र्यास नेले तेव्हा हा बंदोबस्तासाठी गेलेल्या सैन्यात होता. आग्र्यात गेल्यावर त्या सैन्याला वाली राहिला नाही. माणसे बारावाटा झाली, हा तिकडेच रमला. पन्नास हिकमती लढवून आणि बिरादरांचा वशिला लावून सिद्दी फुलादखानाच्या निसबतीत दाखल झाला. बेटा मोठा चलाख. त्यानेसुद्धा सिद्दी फुलादखानाचा विश्वास मिळवला. पुढे मुसलमान झाल्याने बादशहाने नेताजीरावांस स्वतंत्र केले आणि अफगाणिस्तानात पाठवले. मात्र संशयी बादशहाला त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी माणूस हवाच होता. विशेषत: मराठी जाणणारा. कारण नेताजीरावांना झोपेत किंवा जागेपणी स्वत:शीच बडबड करण्याचा विकार जडला होता. पूर्वी स्वराज्यात असल्याने याला मराठी चांगलेच समजते. बादशहाकडे स्वत:चे वजन वाढवण्यासाठी फुलादखानाने आपला गुप्तहेर म्हणून याला नेताजीरावांचा खासगी खिदमतगार म्हणून पाठवले. नेताजीरावांनी त्यालासुद्धा प्रेमात घेतले; त्यामुळे बहिर्जीला त्याला जाळ्यात घेणे अवघड गेले नाही. बहिर्जीने दोघांची खातरजमासुद्धा दिलेली आहे. हुकूम झाला तर चाकरीत ठेवून घेता येईल.
ठीक आहे. ये विषयी आम्हीसुद्धा बहिर्जीशी बोलतो. गरज पडली तर त्या दोघांशीसुद्धा जातीनिशी बोलू आणि मग हुकूम जारी करू. त्यांना थेट फौजेत हुद्देदार करणे सध्या ठीक होणार नाही. माणसे तशीच कामाची वाटली तर बहिर्जीच्या निसबतीत ठेवता येतील. पण त्यांच्यापर्यंत मोगलांचे हात सहजी पोहोचणार नाहीत, अशा कामगिरीवर रुजू करून घेता येतील. या आता. बहिर्जीला आम्हाकडे लगेचच लावून द्या.
जी, आज्ञा.
मुजरा करून हंबीरराव महालातून बाहेर पडले; मात्र त्यांना मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी असे जाणवत राहिले की, महाराजांनी आपल्या मुखातून जे वदवून घेतले, ते कदाचित त्यांना यापूर्वीच माहीत असावे आणि ते आपल्यालाच चाचपडून बघत असावेत. भल्याभल्यांनासुद्धा महाराजांच्या मनाचा ठाव लागणे शक्य नाही हेच खरे.
दुपारी महाराजांनी दिलेल्या हुकमाप्रमाणे सायंकाळी जरा सामसूम असताना आणि जिथे-तिथे रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू असताना आफताबखान आणि नर्दुल्लाखानास घेऊन बहिर्जी महालात रुजू झाला. महाराजांना प्रत्यक्ष समोर पाहताच दोघांनीही स्वत:ला जमिनीवर लोटून दिले. महाराजांनी दोघांनाही खांद्याला धरून उठविले. रोमांचित झालेली त्यांची अंगे आनंदाने आणि सात्त्विक समाधानाने गदगदत होती. डोळ्यांना धारा लागल्या होत्या. त्यांच्या पाठीवर थोपटून महाराजांनी दोघांना थोडे शांत केले. काही वेळ कोणीच काही बोलले नाही. हळूहळू दोघे सावरले. भरल्या आवाजात आफताबखान म्हणाला–
महाराज, आज ही पावले दिसली; सर्व कष्टांचे चीज झाले. सर्व थकवा नाहीसा झाला. हा दिवस उगवावा म्हणून सतत अल्लाची मनधरणी करत होतो. अल्ला सत्याचा वाली असतो याचे प्रत्यंतर अल्लाने या नाचीज बंद्याला पुन्हा एकदा दिले. महाराज, अशी काळरात्र घेरून आली होती की, कोणत्याही दिशेने प्रकाशाचा एक कतरा दिसणेसुद्धा मुश्कील होऊन बसले होते. सरकार जाफरखान वजिराच्या जनानखान्यात नजरकैदेत होते, अत्यंत बीमार होते त्या वेळी त्यांच्या आसपास पोहोचण्याच्या खटपटीत सात-आठ सोबती मारले गेले. पाचजण पकडले जाऊन आदबखान्यात मरणयातना भोगीत राहिले. अखेरपर्यंत ते एकच सांगत राहिले की, ते आग्रा शहराची माहिती काढण्यासाठी आले होते. सुरतेला दिला तसा हिसका आग्र्याला द्यायचा बेत आहे. सुदैवाने मी बचावलो, पण सुलतानी वरवंटा खूपच जवळून पाहिल्याने अगदी घाबरून गेलो होतो. निराशेने घेरला गेलो होतो. वाटले, आता सारे संपले. पण अल्लाने खैर केली. हिंमत सुटू दिली नाही. तशाही स्थितीत सिद्दी फुलादखानाच्या फौजेत चिकटून राहिलो. त्याच्या नजरेत भरण्याची, विश्वासात जाण्याची कोशिश करीत राहिलो. जमेल तसा माग काढीत राहिलो. सरकारांच्या जवळपास जाण्याची खटपट जारी ठेवून राहिलो. शेवटी अल्लानेच फुलादखानाला बुद्धी दिली आणि खिदमतगार म्हणून का होईना अफगाणिस्तानात पोहोचलो. सरकारांच्या सेवेत रुजू झालो.
नाईक, मकरानाला पोहोचून तेथून गलबतातून नेताजीकाकांना परत आणण्याची हिकमत सांगणारा आफताब तो हाच काय?
जी म्हाराज, ह्योच तो.
त्या समयी आम्ही तुम्हाला काही सांगितले होते आणि बजावले होते, हा आमच्यासमोर येईल तेव्हा आठवण करून द्या म्हणून.
जी म्हाराज, म्हाराजांच्या काळजात हरएका शेवकाची चिंता हरहमेश जागी असतिया. तवा शेवकाला सवती याद करून देन्याचा मौका कंदी गावतच न्हाई.
बोलता बोलता बहिर्जी पुढे झाला. मिश्कीलपणे हसत तिवईवर ठेवलेले सरपोस झाकलेले एक ताट त्याने महाराजांसमोर धरले. महाराज मनापासून हसले. त्यांच्या नजरेची इशारत मिळताच त्याने डाव्या हाताने सरपोस दूर केला. चांदीच्या ताटात अंथरलेल्या लाल मखमलीवर बावनकशी सोन्याचे सव्वा सव्वा शेराचे दोन तोडे झगमगत होते. महाराजांनी तोडे उचलून हातात घेतले.
ये. आफताब असा पुढे ये.
मुजरा घालीत आफताबखान पुढे झाला. त्याच्या दोन्ही मनगटांवर महाराजांनी स्वहस्ते तोडे चढविले. त्याचे हात हातात धरून महाराजांनी क्षणभर त्याच्या मनगटावरचे गोंदण निरखले. त्यांची सहेतुक नजर बहिर्जीकडे वळली. होकाराचे हसू हसत बहिर्जीने मुजरा केला. गदगदणाऱ्या आफताबखानाला मात्र मुजरा करणेसुद्धा सुचेनासे झाले. हात सोडून पुन्हा मसनदीवर बसत महाराज प्रसन्न स्वरात म्हणाले–
नाईक, एक कडे तुम्हाला कबूल केले त्याप्रमाणे, स्वतंत्र बुद्धीने विचार करून नेमकी मसलत सुचवल्याबद्दल आणि दुसरे जिवाची पर्वा न करता आमचा सांगावा नेताजीकाकांपर्यंत, त्यांचा विश्वास बसेल अशा रीतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांचा जीव वाचवल्याबद्दल. अफसोस, गुप्तहेरांचा सन्मान भरदरबारात उघडपणे करता येत नाही. त्यांची दफ्तरी नोंदसुद्धा ठेवता येत नाही. रणगाजींचा सन्मान खुलेपणाने होतो, पण त्यांना यश लाभावे म्हणून अंधारात राबणारे, प्रसंगी जीव वेचणारे मात्र कायम विस्मृतीच्या अंधारातच राहतात. नाईक, या लोकांच्या पगाराचे कसे?
म्हाराज, दर साल समद्या बावनच्या बावन गड्यांचा रोजमुरा शिमग्यानंतर घरपोहोच होतुया.
उत्तम. ज्या दिवसापासून ही मंडळी या कामगिरीवर नामजद झाली, त्या दिवसापासून त्यांना मोकळे करीपर्यंतच्या दिवसाच्या पगाराइतकी रक्कम, पगारावेगळी त्यांच्या पदरी घाला. त्याशिवाय नजराणा आणि मानाची वस्त्रे त्यांच्या घरी पोहोचती होऊ देत. हा सारा खर्च कुठे खर्ची घालावा हे सांगणे नकोच.
आज्ञा म्हाराज. समदं असंच व्हुईल.
जहे किस्मत! अलहमदुलइलल्लाह!! अन्नदाता दिलदरिया आहे. महाराजांच्या कदरदानीला सीमा नाही.
मुजरा घालीत दोन्ही खान एकाच वेळी म्हणाले. त्यांचे कंठ भरून आल्याने शब्द कसेबसे उमटले.
ठीक. ठीक. मग आफताब आता पुढे काय विचार आहे?
महाराज, अल्लाच्या मेहेरबानीने कामगिरी पूर्ण झाली. या पायांपाशी सुखरूप येऊन पोहोचलो. पण अकरा-बारा वर्षे झाली, बायको-पोरांची नजरभेट सोडाच; खबरबातसुद्धा नाही. गनिमाच्या चाकरीत पगार मिळत होता, पण घरी पाठवण्याची सोय नव्हती. जीव सतत टांगणीला असे. आता नाईकांच्या तोंडी खुलासा झाला आणि या पायांवर ठेवलेला विश्वास सार्थ होता याचे नव्याने समाधान लाभले. कामगिरीवर निघताना शेवटचे पाहिले तेव्हा मुलगा पाच वर्षांचा होता. लेक पाळण्यात. दोघेही आता लग्नाला आले असतील. महाराजांची कृपा तर गुलामावर सदैव राहिली आहे, जर इजाजत मिळाली तर… तर प्रथम तडक मिरजेस घरी जाईन. चार दिवस मुलामाणसांत राहीन. इन्शाल्लाह दोन्ही पोरांची लग्ने लावून देईन आणि पावसाळा संपताच पुन्हा पायांशी दाखल होईन. अशी मनशा आहे, पण महाराज काही नवे काम सांगणार असतील तर आधी त्याची पूर्ण तामील करेन आणि मगच घरचा विचार.
अरे वेड्या, स्वराज्यात कामगिऱ्यांना काय तोटा? एक संपवावी; तर दहा नव्या उभ्या राहतात. त्यांचे काय, त्या होतील. पण बाबारे इतकी वर्षे तुझ्या बायकोने कशी काढली असतील, मुलांना कसे वाढवले असेल, जनांना कसे तोंड दिले असेल, तिचे तिलाच माहीत. ते काही नाही या खटपटीतून मोकळे झालात की तुम्हा सर्वांनी पहिल्यांदा घर गाठायचे. नाईक, या सर्वांना संपूर्ण वर्षाची भरपगारी रजा द्या. आफताबच्या दोन्ही लेकांची लग्ने थाटामाटात झाली पाहिजेत. चांगली तालेवार घरे पाहा. दोन्ही लग्नांचा खर्च आमच्या खासगीतून होईल. आमच्या वतीने तुम्ही जातीनिशी लग्नात हजर राहून अहेर करा.
जी म्हाराज.
पुढल्या वर्षी ही मंडळी जेव्हा हुजूर दाखल होतील तेव्हा नर्दुल्लाखान आणि त्याचा दस्ता विशाळगडावर रुजू होईल. आम्ही हंबीररावांकरवी तसे हुकूम जारी करू. आफताब, नेताजीकाकांच्या सहवासात तू इतकी वर्षे आहेस. तुला त्यांची नस अन् नस ठावकी झाली आहे. त्यांचासुद्धा तुझ्यावर पुरता विश्वास बसला आहे. ते स्वराज्यात परतलेत खरे, पण धूर्त आलमगीर त्यांचे घर उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. त्यांची बायका-पोरे त्याच्या सुडाच्या आगीत जळून भस्म होणार हे भविष्य स्वच्छ आहे; त्यामुळे आता नेताजीकाकांना त्यांची बायका-मुले भेटणे शक्य नाही, हे आपण सारे जाणून आहोत. अशा वेळी त्यांना सावरणे अत्यंत गरजेचे आहे. मोठे नाजूक काम असणार आहे हे. त्या वेळी त्यांना ज्याच्यावर विसंबता येईल, ज्याचा विश्वास वाटेल असा कोणीतरी मायेचा माणूस त्यांच्या जवळ असला पाहिजे… काय?
जी महाराज.
वास्तविक तू मर्द शिपाई गडी, पण स्वराज्याच्या काजासाठी, आमच्या शब्दाखातर तू इतकी वर्षे शागिर्दीत घालवलीस… पुन्हा तुला त्याच कामी रुजू हो हे सांगण्यास जीभ रेटत नाही हे खरे, पण आमच्या शब्दाखातर तू हे पत्करावे, अशी आम्ही विनंती करतो. अर्थात तुला योग्य वाटले तरच. त्यासाठी सक्ती नाही.
महाराजांनी संकोच करण्याचे काहीच कारण नाही. कुराण आणि पैगंबरांनंतर स्वराज्य आणि हे पायच बंद्याचे इमान आहे. महाराजांच्या मुबारक मुखातून निघणारा हरएक शब्द गुलामासाठी हदीस आहे. सुन्नत आहे. स्वराज्यासाठी तलवार पेलणे जेवढे मानाचे, तेवढ्याच तोलाचे स्वराज्याच्या काजासाठी तस्त उचलण्याचे! महाराजांनी विनंती करू नये. त्यांच्या पापणीची फडफडसुद्धा गुलामासाठी प्रत्यक्ष अल्लाच्या हुकमाइतकीच मूल्यवान आहे. खरं सांगू महाराज, आता नेताजी सरकारांपासून ताटातूट होणार, जिंदगीत पुन्हा कधीच त्या महान हस्तीची भेट होणार नाही या विचाराने जीव कासावीस झाला होता. महाराजांचा हा हुकूम म्हणजे अल्लाची मेहेरबानीच म्हणायची. गुलामाच्या जिवात जीव आला. चाकरावर धन्याचा विश्वास आणि बहाल मर्जी असल्यावर काम काय, हुद्दा कोणता या गोष्टींना किंमत उरत नाही. आपण निश्चिंत असावे महाराज. गनिमाच्या गोटात टांगत्या तलवारीखाली त्यांना जपले, इथे तर सारी आपलीच घरची माणसे. त्यांना फुलासारखा सांभाळीन. अल्ला कसम.
शाबास आफताब! नेताजीकाकांविषयी आता आम्ही निर्धास्त झालो. रजा संपवून रुजू झालास की, चिपळूणच्या छावणीत पुन्हा एकदा नेताजीकाकांचा खास खिदमतगार आणि पालक-अंगरक्षक म्हणून तू रुजू व्हावेस. काम शागिर्दीचे असले तरी तुझा हुद्दा अन् तनखा जुमलेदाराचा असेल. चार-दोन दिवसांतच तसे हुकूम जारी करण्याच्या सूचना आम्ही सुरनिसांना आणि मोरोपंतांना देऊन ठेवू. मात्र चिपळुणास रुजू होण्याआधी एकवार आम्हास भेटून जाणे. भेटीस येताना ‘सासवडचे अंजीर’ आणण्यास विसरू नकोस. नर्दुल्ला तुझ्यासाठीसुद्धा एक अगदी खास कामगिरी आहे, पण ती तू विशाळगडी रुजू झाल्यानंतर सांगू. या आता.
मिश्कील हसत बहिर्जी हळूच पुटपुटला–
म्हाराज, तिवईवर अजून येक ताट झाकल्येलं हाय. त्ये कुनासाटी?
अरे हो, हे राहिलेच की. बरे झाले नाईक याद दिलीत. नाहीतर पुन्हा संधी मिळती न मिळती. आम्हास रुखरुख लागून राहिली असती.
मंद हसत महाराजांनी स्वत:च ताटावरचा सरपोस दूर केला. बावनकशी सोन्याची शेरभर वजनाची कडी झळाळून उठली. महाराजांनी एक कडे नर्दुल्लाखानाच्या मनगटावर, तर दुसरे खुद्द बहिर्जीच्या मनगटावर चढविले. तिघांनीही भुईवर डोई टेकवून महाराजांना नमस्कार केला आणि मुजरा करीत पाठ न दाखविता ते निघून गेले.
-
पोशाख करून महाराज दरबारात जाण्याच्या तयारीत असतानाच निराजीरावजींनी भेटीची इजाजत मागितली. त्यांना लगेचच भेट मिळाली.
या निराजीपंत, अगदी दरबारात निघताना तातडीने भेट मागितलीत. सर्व ठीक आहे ना?
कारण तसे क्षुल्लकच, पण जरा अगत्याचे वाटले म्हणून तसदी दिली. क्षमा असावी.
ठीक. बोला.
महाराज, पैठण क्षेत्रीचे विद्वान वैदिक दत्तात्रय शास्त्री टोळ काल गडावर आलेत. समर्थांच्या मठातून हणमंत गोसावी त्यांच्यासोबत आहेत. मुक्काम माझ्याच घरी आहे. शास्त्रीजी विद्वान तर खरेच त्याशिवाय पैठणच्या धर्मसभेचे अध्वर्यू आहेत. त्यांचा दुसरा विशेष सांगायचा म्हणजे गागाभट्टांचे स्नेही अन् समविचारी आहेत. काही वैयक्तिक अडचण घेऊन आलेत. त्यांनी प्रथम चाफळास समर्थांचे दर्शन घेतले आणि त्यांच्या सल्ल्यानेच गडावर पावते झालेत. भेटीची इजाजत मागत आहेत. आज्ञा झाली तर दरबारात पेश होतील. अनायासे दरबारात वैदिकाचा सत्कारसुद्धा घडून येईल; त्यामुळे जरा तातडी केली.
अरे वा! हे उत्तम झाले. योगायोगाने पैठणच्या धर्मसभेच्या अध्वर्युंचे पाय गडाला लागावेत हा मोठा शुभ शकुनच म्हणायचा. आमच्या पुढ्यातील समस्या सुकर व्हाव्यात असे आम्हास वाटू लागले आहे.
गागाभट्टांचे स्नेही आणि समविचारी म्हणता, तर ये विषयी आमची खात्रीच पटली. आम्ही मनी धरलेल्या कार्यास मूर्त रूप देण्यास ते निश्चितच साहाय्यकारी होतील. जणू त्याचसाठी गडावर येण्याची ‘श्रीं’नी त्यांना प्रेरणा दिली असावी. समर्थ कोठेही असले तरी आमच्या मनीची स्पंदने अचूक जाणतात. आम्हास या अडचणीत साहाय्य करण्यासाठी म्हणूनच त्यांनी या थोर विभूतीस तातडीने धाडले असावे असे आमची मनोदेवता खात्रीपूर्वक सांगत आहे. आम्ही काही शास्त्रीमंडळींना मुद्दाम गडावर बोलावून घेतले आहे. हे तर तुम्ही जाणताच. आज तिसऱ्या प्रहरी आम्ही त्यांना जगदीश्वराच्या मंदिरात बोलावले आहे. टोळशास्त्र्यांनासुद्धा आम्ही तेथेच भेटू.
जी. आज्ञा.
निराजीपंतांशी बोलत बोलतच महाराज दरबारात जाण्यासाठी महालाबाहेर पडले.
पावसाळा तोंडावर आला होता. तिसऱ्या प्रहरी आभाळ गच्च भरून आले होते. वारा साफ पडल्यामुळे मनस्वी उकडत होते. कुठल्याही क्षणी वळिवाची जोरदार सर कोसळेल असे वाटत होते. जगदीश्वराच्या सभामंडपात शास्त्रीमंडळींसाठी सोवळ्यातल्या सुखासनांची सोय केली होती. महाराजांची मसनद गुडघाभर उंच असली तरी अगदी साधी होती. बैठकीत दरबारी डामडौलाचा लवलेश नव्हता. होता साधेपणा आणि शुचिता. देवाच्या गाभाऱ्यात मध्यान्ह पूजा झालेले शिवलिंग मोठे प्रसन्न दिसत होते. हिरव्याकंच बेलपत्रांमधून डोकावणारी पांढरी सुगंधी फुले खूपच सुंदर दिसत होती. लखलखीत अभिषेक पात्रामधून शिवपिंडीवर संततधार सुरू होती. शांत तेवणाऱ्या नंदादीपाच्या प्रकाशात गाभारा उजळून निघाला होता. अष्टांग धूपाच्या सुगंधाने गाभाराच नव्हे तर सारे मंदिरच घमघमत होते. बाहेरचे वातावरण कुंद असले तरी सभास्थानी प्रसन्नता भरून राहिली होती.
नाशिकचे जनार्दनशास्त्री ढेरे, वाईचे जगन्नाथशास्त्री चित्राव, महाबळेश्वरचे विनायक भट बिन परशुराम भट महाबळेश्वरकर, पुण्याचे रामेश्वरशास्त्री जोशी, चिपळूणचे नारायणशास्त्री जोग वगैरे विद्वान मंडळी सभेत बसली होती. नुकतेच पैठण क्षेत्रावरून आलेले, तेथील धर्मसभेचे अध्वर्यू दत्तात्रयशास्त्री टोळ सर्व विद्वानांपेक्षा वीतभर उंच उच्चासनावर बसले होते. विद्वज्जनांचा हलक्या आवाजात काव्य-शास्त्र-विनोद सुरू होता. रेशमी वस्त्रांत बांधलेल्या अनेक पोथ्या त्यांच्यासमोर नीट मांडून ठेवल्या होत्या. त्यांचे विद्यार्थी आपापल्या गुरूंच्या मागे योग्य अंतर राखून स्वस्थ बसून गुरुजनांची चर्चा कान देऊन ऐकत होते.
महाराजांच्या आगमनाची ललकारी झाली. महाराजांनी देवदर्शन घेतले. पुजाऱ्याने दिलेले तीर्थ प्राशन करून महाराज सभामंडपात प्रवेशले. विद्वत्सभेने सिंहासनाधीश्वर राजास उत्थापन दिले. प्रत्येक ज्येष्ठ विद्वानास यथाविधी नमस्कार करून ते आपल्या आसनावर वीरासनात बसले. निराजीपंतांनी विद्वज्जनांचा आणि त्यांच्या प्रमुख विद्यार्थ्यांचा परिचय करून दिला. ब्राह्मणांकरवी महाराजांनी विद्वानांची यथासांग पाद्यपूजा करविली. सुवर्णदान, वस्त्रदान, दक्षिणा आदी देऊन त्यांची उत्तम संभावना केली. वस्त्रोपवस्त्रे आणि दक्षिणा देऊन विद्यार्थिवर्गसुद्धा संतुष्ट केला. उच्चरवात मंत्रघोष करून विद्वज्जनांनी राजास मंगलाशीर्वाद दिले. सर्व स्थिरस्थावर झाल्यावर महाराजांनी बोलण्यास प्रारंभ केला–
आमच्या शब्दाचा सन्मान करून ब्रह्मवृंद आज येथे उपस्थित झाला, याचा आम्हास बहुत आनंद आहे. दुष्टांचे निर्दालन, गोब्राह्मण व दीन-दुबळ्या रयतेचे रक्षण तसेच धर्मसंस्थापनेसाठी ‘श्रीं’च्या इच्छेकरून आम्ही मस्तकी छत्र धरिले आहे, हे तर आपण जाणताच. धर्मसंस्थापना म्हणजे धर्मरक्षण आणि धर्मरक्षणाचा उत्तम मार्ग म्हणजे धर्माची अभिवृद्धी. प्रपाताचे पाणी कड्यावरून कोसळावे तद्वत अनेक शतकांपासून आपले धर्मबांधव, समाजबांधव, अनेकानेक कारणांनी, मोहास बळी पडून वा छळास कंटाळून वैदिक धर्मापासून तोडले जात आहेत. प्रपाताचे पाणी जसे उलट फिरून पर्वतमाथ्यावर येत नाही, तद्वतच हे दूर गेलेले धर्मबांधव स्वधर्माच्या मुख्य प्रवाहात येण्यापासून वंचित राहत आहेत. जोवर ही परतवाट मोकळी होत नाही, तोवर खऱ्या अर्थाने धर्मवृद्धी, धर्मरक्षण व धर्मसंस्थापना झाली असे म्हणता येणार नाही. आपणास ज्ञात असेलच की, आमचे पूर्वीचे सरनोबत नेताजी पालकर दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडून गनिमाच्या गोटात गेले. आम्ही आग्र्याहून पळून आल्याचा राग दिल्लीश्वराने त्यांच्यावर काढला. दगा करून त्यांना आदबखान्यात कोंडले, राजधानीत नेऊन त्यांचा छळ मांडला. छळाची परिसीमा झाल्यानंतर धर्मसाधनेसाठी देहरक्षण करावे म्हणून आणि गनिमी काव्याचा एक भाग म्हणून अत्यंत नाइलाजाने त्यांनी इस्लाम स्वीकारला. स्वराज्य आणि स्वधर्माची सेवा करण्याचा हेतू मनात धरून अनेक वर्षांपासून ते स्वराज्यात परत येण्याची संधी शोधीत राहिले. संधी उपलब्ध होताच आता ते स्वगृही परत आले आहेत. त्यांना प्रायश्चित्त देऊन, शुद्ध करून घेऊन पुनश्च स्वधर्मात घ्यावे आणि धर्मसंस्थापनेच्या कार्याचा श्रीगणेशा केल्याचे पुण्य पदरी घ्यावे, अशी आम्ही ब्रह्मवृंदास विनंती करतो. धर्मरक्षणासाठी आम्ही शस्त्रे धारण केली आहेत, तर शास्त्रे आपणा अधीन आहेत. हे महान कार्य केवळ राजाज्ञेने, जुलमाने करवले गेलेले एक कृत्य न ठरता त्यास शास्त्राचा आणि धर्मनिर्णयाचा ठोस आधार लाभावा म्हणून आज आपणास कष्ट दिले आहेत.
सभेत अगदी नीरव शांतता पसरली. सर्व मंडळी एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिली. काही वेळ वाट पाहून मग महाराजांनीच शांततेचा भंग केला.
भूदेव असे नि:शब्द का? टोळशास्त्री, आपण धर्मसभेचे प्रतिनिधी. अध्वर्यू. वास्तविक या कामी आपण पुढाकार घ्यावा.
राजन, पैठण म्हणजे दक्षिण काशी. त्या धर्मसभेचा निर्णय आसेतू हिमालय मान्य होतो. त्या धर्मपीठाचे आम्ही अध्वर्यू; त्यामुळे आम्ही आमचा कौल अप्रत्यक्षपणेसुद्धा सूचित केला तर विद्वज्जन आपले म्हणणे मनमोकळेपणाने मांडू शकणार नाहीत. आम्ही सर्वशेवटी मतप्रदर्शन करावे आणि निर्णय घोषित करावा असाच धर्मसभेचा शिष्टसंमत संकेत असतो.
पुन्हा अस्वस्थ शांतता पसरली.
बोला ढेरेशास्त्री. कोणतेही दडपण घेण्याची आवश्यकता नाही. समस्येचा सांगोपांग विचार व्हावा याचसाठी सभेचे प्रयोजन असते. आपले मत नि:संकोच मांडा. सर्वांनी केवळ आमच्या मताचाच अनुवाद करावा, अशी आमची कधीच अपेक्षा नसते. मग ती समस्या राजकारणाची असो वा धर्मकारणाची. चर्चेतूनच तत्त्वबोधाची निष्पत्ती होते, असेच शास्त्रवचन आहे, खरे ना?
किंचित खाकरून, घसा साफ करून हलक्या आवाजात ढेरेशास्त्री म्हणाले–
राजन, आपला हेतू शुद्ध आहे. मात्र आपल्या संकल्पास धर्मशास्त्राची अनुमती असल्याचे निदान आमच्या तरी पाहण्यात नाही.
शास्त्राधार शोधण्यासाठी आणि शास्त्रानुसारी निर्णय करण्यासाठी म्हणून तर ही धर्मसभा योजून आपणास येथे पाचारिले आहे. धर्माचरणासंबंधाने उपस्थित होणाऱ्या कोणा समस्येचे समाधान शास्त्रांमध्ये नाही असे कसे शक्य आहे? पतितास प्रायश्चित्त देऊन, पावन करून पुन्हा वर्णाश्रम धर्मात घेणे यास शास्त्रे आणि स्मृतींची अनुमती आहेच. कदाचित आपल्या स्मरणात नसेल किंवा आजवर उपस्थित न झाल्याने ये विषयीचे संदर्भ दुर्लक्षित राहिले असतील. आपल्या हाती ग्रंथ आहेतच; त्यातून संदर्भ शोधावा. गरज भासल्यास सांगाल तेथून, म्हणाल तो ग्रंथ माणूस धाडून आणविता येईल. केवळ स्मरणावर विसंबून वा पूर्वग्रहावर विश्वासून तर्क वा निर्णय होऊ नयेत.
चित्रावशास्त्री म्हणाले–
महाराज, तर्काच्या कसोटीवर आपला मुद्दा अगदी बिनतोड आहे. पण आपणच म्हणालात त्याप्रमाणे त्या अनुज्ञा धर्माचरणात चूक झाल्यास किंवा अजाणतेपणे वा परिस्थितीच्या रेट्याखाली किंवा मोहास बळी पडून हातून काही पापाचरण घडल्यास घेण्याच्या प्रायश्चित्तातांसंबंधी आहेत. दोषी वा निर्दोषित्व सिद्ध करण्यासाठी सांगितलेल्या दिव्यांच्या अनुरोधाने आहेत. वैदिक धर्म सोडून परधर्मात गेलेल्यांसाठी नाहीत.
इतका वेळ अगदी सौम्य आणि आर्जवी असणारा महाराजांचा स्वर आता किंचित कठोर आणि आग्रही झाला.
चित्रावशास्त्री, आपले म्हणणे असे की, पंच महापापे करणाऱ्यांपेक्षा ज्याला छळाबळाने, इच्छेविरुद्ध धर्मातून बाहेर खेचून काढले आहे, त्याला स्वधर्मात पुन्हा परत येण्यास प्रायश्चित्त नाही? महापाप्यांपेक्षा त्याची अगतिकता अक्षम्य? त्यांचे दुर्भाग्य अपरिवर्तनीय?
दुर्भाग्याने तसे आहे एवढे बरीक खरे.
अशक्य. अविश्वसनीय. अतर्क्य. ब्रह्महत्या करणाऱ्यास शुद्ध होता येते, गुरुपत्नी प्रत्यक्ष मातेसमान, तिच्याशी असंग करणाऱ्या अधमास प्रायश्चित्त घेता येते; इतकेच नव्हे तर मात्रागमन करणाऱ्या अत्यंत तिरस्करणीय पाप्यास प्रायश्चित्त देऊन पांक्तेय करून घेता येते, पण दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडून, खोट्या प्रलोभनास भुलून किंवा पराकोटीच्या शारीरिक, मानसिक छळापायी निरुपाय म्हणून ज्यांचा धर्म हिरावला गेला आहे त्यास मात्र प्रायश्चित्ताचा अधिकार नाही? असमर्थनीय.
पुन्हा अस्वस्थ शांतता. कोणी काहीच बोलत नाही असे पाहून महाराज पुन्हा बोलू लागले–
या धर्मसभेच्या सभासदांच्या मनात काय सुरू आहे त्याचा अंदाज आम्ही बांधू शकतो. आपल्या मनात उत्पन्न झालेली दुविधा आम्हाला जाणवते आहे. आमचे बोलणे आपल्या संवेदनशील मनास पटते आहे. तर्क भावतो आहे. पण साचेबंद झालेल्या बुद्धीस पटत नाही. शास्त्र आणि स्मृतींकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आजवर आपण बाळगला आहे; त्यामुळे आपली स्मरणशक्ती आपल्या मनास भावणाऱ्या वस्तुस्थितीस पुष्टी देणारी प्रमाणे व्यक्त करण्यास तोकडी पडत आहे. परिणामी, बुद्धी आमचा तर्क स्वीकारण्यास धजावत नाही. अशी ही दुविधा आहे. आमच्या मते, ही दुविधासुद्धा प्रामाणिक आणि स्वाभाविक आहे. कारण बहुतांश स्मृती ज्या काळात सांगितल्या गेल्या, त्या काळात समाजधुरीणांसमोर अशी समस्या कधी आलीच नाही. कारण कत्तल, लूट, मूर्तिभंजन, परस्त्रीहरण, छळ यांना प्रतिष्ठा देऊन समशेरीच्या बळावर धर्मप्रसार करणारा अवैदिक धर्मच त्यांच्या काळात या भूमीत अस्तित्वात नव्हता. त्या संस्कृतीचे अभद्र वारे या भूमीस स्पर्शले नव्हते. वैदिक हिंदू धर्मापुढे नास्तिक बौद्ध आणि जैन संप्रदायांचेच मोठे आव्हान उभे ठाकले होते. या संप्रदायांना नास्तिक म्हणून संबोधण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांना वेदप्रामाण्य मान्य नव्हते. कर्मकांडाच्या आणि काम्य उपासनांच्या अवडंबरास कंटाळलेला फार मोठा समाज या नास्तिक म्हणजे अवैदिक संप्रदायास शरण गेला. या संक्रमणाने एवढे मोठे स्वरूप घेतले की, वैदिक संस्कृतीसच धोका उत्पन्न झाला. अशा वेळी जगद्गुरू आद्य शंकराचार्यांचा अवतार झाला. त्यांनी आसेतू हिमाचल प्रवास करून अनेक वादसभांमध्ये दिग्विजय मिळवला आणि वैदिक धर्माचरणात शिरलेल्या अपप्रवृत्तींचा पराभव तर केलाच पण अवैदिक नास्तिक संप्रदायांचासुद्धा प्रभाव दूर केला.
त्यांनी स्वत:चा असा अधिकार प्रस्थापित केला की, त्यांनी स्वत:च नव्हे तर त्यांच्या शिष्यांनीसुद्धा केलेला शंखनाद ज्यांनी ऐकला ते सर्व स्त्री-पुरुष वैदिक धर्मात परत आले असे मानले गेले. विद्वानांशी वादविवाद करून आणि येरांसाठी कर्मकांडविरहित भक्तिमार्गाचा प्रसार करून त्यांनी नवी धर्मवाट तयार केली आणि वैदिक धर्मसंस्कृतीची पुनर्स्थापना केली.
ते संक्रमण क्रांतिकारी असले तरी शांततेने आणि हिंसाविरहित झाले कारण बौद्ध वा जैन संप्रदाय वेदप्रामाण्य मान्य करीत नसले, तरी त्यांची मुळे याच भूमीत रुजलेली होती. त्यांचे अध्वर्यू आणि अनुयायी याच समाजाचे अंगभूत घटक होते. इथल्या संस्कृतीशी त्यांची नाळ कायम होती. उपनिषदांमधील अनेक तत्त्वे त्यांच्या आचरणात होती. हजारो वर्षांपासून या भूमीत जोपासली गेलेली नीतिमूल्ये आणि परंपरा त्या संप्रदायांचे अनुयायी जसेच्या तसे पाळीत होते; त्यामुळे त्या संप्रदायांनी वैदिक हिंदू धर्मावर आक्रमण केले नव्हते तर त्यात संक्रमण घडवले होते.
परंतु वैदिक धर्म आणि संस्कृतीवर होत असलेले हे आक्रमण परक्या भूमीतून आलेले आहे. तो धर्म घेऊन आलेल्यांसाठी ही भूमी देवभूमी, धर्मभूमी, पुण्यभूमी नसून केवळ भोग्य भूमी आहे. येन केन प्रकारेण त्यांना त्यांची संस्कृती, त्यांचा धर्म, त्यांची सत्ता या भूमीत रोवावयाची आहे; विरोध मोडून काढून येथील संपत्तीचा, समृद्धीचा त्यांना अनिर्बंध उपभोग घ्यायचा आहे. तो त्यांचा एकमेव उद्देश आहे. म्हणूनच ते जास्त हिंस्र आहे. सर्वनाशक आहे. जे जे वैदिक, जे जे भारतीय ते ते सारे नष्ट, भ्रष्ट करून त्यांची स्वत:ची धर्मसंस्कृती त्यांना आपल्यावर लादायची आहे. या आर्यभूमीत त्यांचे हे प्रयत्न गेली आठशे ते नऊशे वर्षे अव्याहत सुरू आहेत. दक्षिणेत चारशे वर्षांपासून अहोरात्र ते हेच काम करीत आहेत. या प्रयत्नांत भले त्यांना राजकीय सत्ता मिळाली असेल, पण निर्विवाद धर्मसत्ता प्रस्थापित करण्यात त्यांना यश आलेले नाही.
याचे कारण त्यांनी धर्मप्रसारात आळस केला वा ते कमी पडले असे नाही तर वैदिक धर्म मानणाऱ्या सर्व वर्णांच्या अगदी शूद्रातिशूद्र सर्व लोकांच्या अत्यंत चिवट आणि प्रबळ धर्मनिष्ठा हे आहे. मात्र धर्मरक्षणाच्या भ्रांत कल्पनांना कवटाळून आम्ही ज्यांना निरुपायाने धर्मभ्रष्ट व्हावे लागले आहे, त्यांची परतवाट बंद करीत असू तर आपल्या या कृतीमुळे वैदिक धर्माची अभिवृद्धी वा संरक्षण होत नाही तर उलट यवनांच्या धर्मप्रसारासच मदत होत आहे हे ब्रह्मवृंदाने आतातरी समजून घ्यावे.
या समस्येकडे बघताना एका व्यक्तीचा धर्मत्याग अशा मर्यादित, संकुचित दृष्टीने न पाहता या बाबीची जाणीव ठेवा की, त्याची पुढची संतती, जी पिढी दरपिढी वाढत जाऊन हजारो व्यक्तींमध्ये विस्तारणार आहे. ती आपल्या वैदिक संस्कृतीतून बाहेर जाणार आहे. इतकेच नव्हे तर हिंदू धर्म, हिंदू देवदेवता, हिंदू संस्कृती, हिंदू प्रजा या साऱ्यांची कट्टर वैरी उत्पन्न होऊन राहणार आहे. कुऱ्हाडीचे हे असे दांडे अखेर गोतास काळ ठरत असल्याचे आपण आपल्याच डोळ्यांनी प्रत्यही पाहत आहोत.
धर्मराज्य स्थापन करण्यासाठी, म्हणजेच धर्मरक्षणासाठी, धर्माच्या पुनरुत्थानासाठी, अभिवृद्धीसाठी आम्ही हाती खड्ग धरिले आहे. मस्तकी छत्र धारण केले आहे. शस्त्रबळावर आम्ही प्रदेश मुक्त केला आहे, करीत आहोत. पण जोपर्यंत समाजाचे धुरीण असणारा, विशाल समाजपुरुषाचे उत्तमांग म्हणवणारा ब्रह्मवृंद अग्नी, पंचगव्य आणि दर्भ घेऊन आमच्यासोबत उभा राहत नाही, आमच्या पाठीशी शास्त्रांची, मंत्रांची शक्ती उभी करीत नाही, तोपर्यंत धर्मसंस्थापनेच्या आमच्या कार्यास खरे यश येणार नाही. धर्मापासून दुरावले गेलेले विश्वासाने आणि निर्धास्तपणे, मोठ्या संख्येने वैदिक हिंदू धर्मात परत येऊ लागतील तेव्हाच खरे धर्मरक्षण झाले, खऱ्या अर्थाने स्वराज्य आले असे आम्ही समजू.
बोलता बोलता महाराजांचा स्वर अधिकाधिक तीव्र आणि चढा होत गेला. त्यांना किंचित धाप लागली. बोलणे थांबवून त्यांनी एकवार सभेवरून नजर फिरविली. त्यांच्या तळमळीचा आणि पोटतिडिकीचा उपस्थितांवर बराच परिणाम झालेला त्यांना जाणवला. मात्र सभा तटस्थ बसून होती. सारे विद्वान खाली माना घालून गप्प होते. कुणी काही बोलण्याचे धाडस करीत नव्हते. बराच काळ शांततेत गेला. विनायक भटांनी सहज नजर वर उचलली. त्यांची महाराजांशी अनायासे नजरानजर झाली. महाराजांच्या नजरेतील व्यथा आणि प्रतिक्रिया जाणून घेण्याची उत्कटता त्यांना प्रखरपणे जाणवली. आता काही न बोलून चालणारे नव्हते. अगदी हळू, कुजबुजत्या आवाजात त्यांनी शांततेचा भंग केला–
महाराजांचे म्हणणे, वरकरणी बिनतोड वाटते; त्यामुळे मनाला भिडते. पटते. ऐसे ऐकिवात आहे की, सिंधूतीरावरील प्रदेशात ‘देवल स्मृती’ म्हणून कोणा एका स्मृतीमध्ये असा प्रायश्चित्त विधी आहे. आम्ही दस्तूरखुद्द ती स्मृती पाहिलेली मात्र नाही. राज्याभिषेक प्रयोगाचे समयी देशोदेशीचे पंडित आणि विद्वान जमले असता त्यांच्यामार्फत ती स्मृती मिळविण्याची गागाभट्ट खटपट करीत असल्याचे श्रवणी आले होते. अर्थात देवल स्मृती म्हणजे काही अगदी मनुस्मृती नव्हे. तदोपरांत ‘शास्त्रात रूढी: बलिर्यसि’ तेव्हा हे तर्कशास्त्र आम्हास मनोमन भावले असले, तरी सर्वसामान्यांच्या गळी उतरविणे अवघडच ठरणार.
महाराज खिन्न हसून म्हणाले–
रूढी. महाबळेश्वर गुरुजी, रूढी. याच महाराष्ट्र देशी संन्याशाची चार कोवळी पोरे धर्मसंस्कारांच्या अधिकारासाठी ब्रह्मवृंदाकडे याचना करीत होती, तेव्हा धर्ममार्तंडांनी त्यांच्या तोंडावर हीच उक्ती फेकली होती. अखेर काय घडले? पैठणच्या धर्मपीठासमोर त्या चिमुरड्यांनी असा काही चमत्कार घडवला की, त्या धर्मपीठाला त्या बालकांना सन्मानपत्र लिहून द्यावे लागले. आज याच महाराष्ट्र देशी त्या बालकांचा नामघोष केल्याशिवाय जनलोक मुखी पाणीसुद्धा घेत नाहीत. धर्मपीठाच्या निर्णयापुढे जनमत झुकते. झुकावेच लागते. राजसिंहासन व धर्मपीठ जसे एक दुसऱ्याचे प्रतिद्वंद्वी नव्हते तद्वतच ते एक दुसऱ्याचे आश्रितसुद्धा नाहीत. ती उभयता एकमेकांना पूरक आहेत. राजदंडाच्या संरक्षणाशिवाय धर्मपीठ कुचकामाचे आहे. जसे ते आज झाले आहे. तद्वतच धर्मपीठाचा आधार नसेल तर राजसिंहासन भ्रष्ट होण्यास वेळ लागणार नाही. ते केवळ अराजक होय. ज्याप्रमाणे डबक्यात साचलेले जल अशुद्ध, अमंगल, रोगिष्ट, नासलेले समजले जाते त्याप्रमाणेच कोणतीही स्थिर वा अचल वस्तू अयोग्य असते. वाहते जल निर्मळ गंगाजल, त्याच न्यायाने प्रवाहित परिवर्तन होणारे जीवन शुद्ध, सात्त्विक असते. धर्म म्हणजे साचलेले डबके नव्हे. मूळ धर्मतत्त्वाला धक्का न लावता, बाधा न आणता कालानुरूप परिवर्तन ही धर्माची गरज आहे. अगदी सत्य, त्रेता किंवा द्वापारयुगाचा दाखला देण्याची आवश्यकता नाही. पूर्वी कलियुगाच्या आरंभ काळी जे धर्माचरण होते ते आजघडीला नाही. कालानुरूप परिवर्तित होत राहिला म्हणूनच सनातन वैदिक धर्म सारी आक्रमणे पचवून प्राणांत घात सोसून शाश्वत राहिला. दृढतेने उभा आहे. ‘चराति चरतो भग:’ असे ‘ऐतरेय ब्राह्मण’ सांगते आहे.
महाराज थांबले. पण बोलण्यास कोणी धजावले नाही. शांततेचा पुनर्भंग महाराजांनीच केला.
काही वर्षांपूर्वी आमचे शालक, आमच्या दिवंगत ज्येष्ठ राणीसरकारांचे बंधू, फलटणचे बजाजीराजे नाईक निंबाळकर यांच्यावर हेच संकट गुदरले, तेव्हा धर्मसभेला आम्ही असेच साकडे घातले होते. त्या समयी तर ना आमचे हाती राजदंड होता ना मस्तकी राजछत्र. तरी आम्ही ब्रह्मवृंदाचे मनपरिवर्तन घडवले. बजाजीराजांना शुद्ध करून पुन्हा धर्मात घेण्यात आम्ही यशस्वी झालो. वाटले होते, आम्ही तेव्हा जो नवा पायंडा घातला त्याचे क्षेत्रोक्षेत्री अनुकरण होईल. धर्मबहिष्कृत झालेल्यांना, जबरदस्तीने धर्मत्याग करावा लागलेल्यांना सरसहा पुन्हा धर्मात घेतले जाईल. पण ये विषयी आमची घोर निराशा झाली. त्यानंतर स्वराज्यावर संकटांच्या लाटांमागून लाटा येत राहिल्या. राजकारणाचा नुसता गदारोळ उडाला. त्या धामधुमीत आम्हाससुद्धा या बाबींकडे लक्ष देणे शक्य झाले नाही.
रोहिडेश्वरी शिवशंभूस स्वत:च्या रक्ताने अभिषेक करून आम्ही प्रतिज्ञा केली आहे. स्वराज्य स्थापू, स्वधर्म संस्थापू, धर्मक्षेत्रे, तीर्थक्षेत्रे मुक्त करू. दगड-मातीची देवळे मुक्त करण्यास जे महत्त्व आहे त्याच्या सहस्रपट अधिक महत्त्व धर्मभ्रष्ट झालेल्या माणसांना स्वधर्मात परत आणण्यास आहे. याच कारणे आम्ही हा सारा खटाटोप चालवला आहे.
बोलून बोलून महाराज श्रमले. त्यांना उद्विग्नता आली. मागे रेलून ते लोडाला टेकले. श्रांत नजर सभामंडपाच्या तक्तपोशीकडे लावली. सलकड्याच्या किणकिणाटाने त्यांनी आपली नजर पुन्हा खाली वळविली. जगन्नाथशास्त्री चित्राव काही बोलणार, तर टोळशास्त्र्यांनी हात उंचावून त्यांना शांत राहण्याचा संकेत दिला होता.
थांबावे शास्त्री महाशय. मला वाटते, विद्वज्जनांकडे फारसे नवे मुद्दे नाहीत. आता मला बोलण्यास हरकत नसावी. माझ्या वक्तव्याचा प्रतिवाद करण्याची कोणाची इच्छा असेल तर शिष्टाचारास धरून त्यास नि:संशय संधी लाभल्याशिवाय राहणार नाही. आम्हास असे स्पष्ट दिसत आहे की, महाराजांनी विषय करतलामलक स्पष्ट निरखला आहे. अभ्यासला आहे. प्रतिपाद्य विषयाच्या चिंतनात त्यांनी उमर घालविली आहे; त्यामुळे विषयाच्या सर्व बाजू त्यांनी सुस्पष्टपणे आणि विस्ताराने मांडल्या आहेत. त्यांचा दृष्टिकोन कल्याणकारी आहे. नजर द्रष्ट्याची आहे. विचार क्रांतिकारी आहेत. कृती कर्मयोग्याची आहे. या साऱ्यांचा समुच्चय अवतारी पुरुषांमध्येच दिसून येतो. आपण पोथ्या-पुराणांमध्ये स्वत:ला चौकटबद्ध करून घेतले आहे. महाराजांनी प्रतिपाद्य विषय अत्यंत तळमळीने आणि सोपा करून मांडला आहे. ही केवळ तत्त्वचर्चा नव्हे, तर धर्मविचारांवर, समाजजीवनांवर अत्यंत मूलगामी आणि दूरवर परिणाम घडविणारा काही एक निर्णय करण्यासाठी आपण येथे बसलो आहोत. प्रतिपाद्य विषयाकडे आपण महाराजांच्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न करू या. आता अधिक चर्चा करण्यापेक्षा आपण काही निर्णय करू या. मला वाटते, तेच उत्तम होईल. अर्थात सर्व सभासदांची त्यास अनुमती असेल तरच!
महाराज, या भूमीचे, या देशाचे, या धर्माचे, या रयतेचे हे दुर्भाग्य म्हणावे की काय न कळे, यांच्याच हिताचे यांच्या गळी उतरविण्यातच कर्त्याचा शक्तिपात होतो. काही गोमटे करण्यापेक्षा चालत्या गाड्यास खीळ घालण्यात धन्यता मानणारेच अधिक. विरोध करण्यास अन्य कोणते सबळ कारण न मिळाल्याने आपल्या राज्याभिषेकप्रसंगी आपल्या क्षत्रियत्वालाच आव्हान देणारे स्वकीयच काय थोडे होते? अस्तु.
राजधानीतून काशीस परत जाताना परतीच्या वाटेवर गागाभट्टांचा मुक्काम पैठणी माझ्याच घरी होता. हा विषय त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा. यावर अशाच तळमळीने अन् पोटतिडिकीने ते मजबरोबर प्रहरन् प्रहर अशीच चर्चा करीत. सांप्रत काळास अनुसरून एका नवीन स्मृतीची रचना करण्याचा संकल्प त्यांनी पैठणच्या धर्मसभेसमोर मांडला होता. त्या स्मृतीच्या आराखड्यास आणि त्यातील प्रतिपाद्य विषयास त्यांनी धर्मपीठाची अनुमतीसुद्धा घेतली होती. पैठण मुक्कामीच काही थोडके लिखाणसुद्धा सुरू झाले होते. त्या स्मृतीमध्ये अशा शुद्धीकरणाच्या प्रकरणाचा ऊहापोह करण्याचा आणि त्याचा समग्र विधी सांगण्याचा संकल्प होता.
विद्वज्जन हो, प्रत्यक्ष वेदोनारायणांनी पैठण क्षेत्री धर्मसभेपुढे पूर्वपक्ष करताना अशाच प्रकारच्या आक्षेपांना जो प्रतिवाद केला होता, तो आजसुद्धा माझ्या मन:पटलावर जसाच्या तसा स्पष्ट कोरला गेला आहे. त्यामधील काही वेचक भागाचा अनुवाद सांप्रत सभेसमोर मांडल्यास ते अनाठायी ठरू नये.
वेदोनारायण ये विषयी प्रतिपादितात की, ज्या काळात वेद नव्हते त्या काळात सारी मानवजात संस्कारहीन होती. पुढे परमेश्वरास इच्छा झाली आणि त्याने वेदांची निर्मिती केली. द्रष्ट्या ऋषींना वेद-ऋचा प्रत्यक्ष दिसल्या. मानवाच्या कल्याणासाठी आणि उद्धारासाठी त्यांनी त्या ऋचांचा संग्रह केला. वेदप्रसार केला. त्यातूनच मग पुढे सनातन वैदिक समाजाची निर्मिती झाली. कालौघात प्रतिपत्च्चंद्र रेखेव त्याची वृद्धी झाली. वेदांग आणि शास्त्रे प्रगत झाली. सभ्य, सुसंस्कृत समृद्ध मानवी जीवनास शिस्त लावण्यासाठी स्मृतींची निर्मिती झाली. या सर्वांचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. पिढ्यान्पिढ्या, शतकानुशतके चालत आलेल्या या प्रक्रियेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर अवैदिकांना वैदिक संप्रदायात संमीलित करून घेतले गेले; त्यामुळेच तर वैदिक संप्रदायाचा महाविस्तार झाला!
वेदांचे उपासक त्यांना वैदिक अशी संज्ञा लाभली. तेच आर्य म्हणवले जाऊ लागले. या धरातलावरील अनाचार, अनागोंदी, अशुद्धता, अमानवीयता नष्ट करून वेदांवर आधारित नीतिमूल्ये मानणारा सुसंस्कृत समाज निर्माण करण्याची वैदिकांची प्रतिज्ञा होती; त्यांनी या प्रतिज्ञेचा प्रकट उद्घोष केला– ‘कृण्वन्तो विश्वमार्यम्’ सारे विश्व आर्य म्हणजे सुसंस्कृत, सुसंस्कारित, सुसंघटित, वेदप्रामाण्यवादी करू या. त्यासाठी पितृभाव, मातृभाव, भ्रातृभाव निर्माण करणे जिव्हाळ्याचे ठरले. आपण सारे एक आहोत. जणू एकाच कुटुंबाचे अभिन्न अंग आहोत, असा भाव जनमानसात रुजविण्यासाठी आर्यांनी हाक दिली– ‘वसुधैव कुटुंबकम्’. या वसुंधरेवर निवास करणारे सारे जीव एकाच कुटुंबाचे सदस्य समजून परस्पर व्यवहार आचरावा.
शक, हूण, कुशाण, यवनादिकांची अनेक आक्रमणे या भूमीने झेलली. समाजाने परतवून लावली. आता जसे वसते आहे तसे परकीय आक्रमकांचे शासन काही काळ या देशात राहिले. मात्र शस्त्रबळाने त्यांचा जसा सैनिकी आणि राजकीय पराभव केला गेला, तद्वत उपरोक्त ध्येय द्वयींच्या सुयोग्य व परिणामकारक आचरणाने आक्रमकांची संस्कृती वैदिक आर्य संस्कृतीने स्वत:च्या विशाल उदरात समाविष्ट करून घेतली. त्यांचे नामोनिशाण शिल्लक राहिले नाही. त्यांना व्यापून दशांगुळे अवशिष्ट राहिली ही निखळ शुद्ध वैदिक आर्य संस्कृती. यावरून हे स्पष्ट आहे की प्राचीन काळी, अगदी कलियुगातसुद्धा अवैदिकांना वैदिक धर्मात, वैदिक संस्कृतीत समाविष्ट करून घेण्याची प्रथा होती. मात्र सांप्रतचे मूर्तिभंजकांचे आक्रमण इतके क्रूर आणि सर्वव्यापी आहे की समाजपुरुष त्या धक्क्यातून अजून सावरलेला नाही. आम्ही जे ऐतिहासिक वस्तुस्थितींचे संदर्भ सभेपुढे कथन केले आहेत, त्यास कोणा सभासदाचा विरोध आहे काय? इतिहासाचा यावेगळा अन्वयार्थ कोणी लावू इच्छितो काय? विद्वान सभासदांनी मनमोकळेपणाने आपले मनोगत व्यक्त करावे.
टोळशास्त्र्यांच्या मुखातून प्रकट झालेला गागाभट्टांचा युक्तिवाद ऐकून महाराजांच्या मुद्रेवरील निराशेचे मळभ दूर झालेले दिसले. उद्विग्नता लोप पावून पुनश्च प्रसन्न मंदस्मित विलसू लागले. टोळशास्त्र्यांनी आपला वाक्ओघ किंचित काळ थांबवून सभासदांवरून एक नजर फिरविली. सभासदांच्या माना सकारात्मक डुलत होत्या. टोळशास्त्र्यांची नजर महाराजांच्या नजरेस भिडली. महाराजांनी नजरेनेच त्यांना वक्तव्य सुरू ठेवण्यास सुचविले.
गागाभट्टांनी पैठणच्या धर्मसभेस संबोधून असे पुढे सांगितले की, एक सर्वमान्य उक्ती आपणास ज्ञात असेलच. ‘स्वधर्मे निधनम् श्रेय: परधर्मो भयावह:’ याचा अर्थ स्पष्ट आहे की, मनुष्याने परधर्मात मरू नये. मरण्यापूर्वी तरी त्याने स्वधर्मात परतावे. तर्क असे सांगतो की, जर काही कारणे करून मनुष्यास स्वधर्म सोडून परधर्माचा आश्रय घ्यावा लागला असेल तर त्याने स्वधर्मात परत यावे, असे स्पष्ट आवाहन यामधून केलेले आहे. म्हणजेच परधर्मात गेलेल्यांसाठी स्वधर्मात फिरून परतण्याची परतवाट पूर्वसूरींनी यापूर्वीच मोकळी करून ठेवलेली आहे. फक्त अज्ञानाने म्हणा वा खोट्या अभिनिवेशाने वा भयचकित, दिङ्मूढ झाल्याकारणाने म्हणा राबता आणि वहिवाट कुंठित झाल्यामुळे आज तिचे अस्तित्वच सरसहा नाकारले जात असलेले आढळून येते. आज अज्ञानाच्या, गैरसमजुतीच्या तिमिराने सत्याचे अस्तित्व नाकारले जात आहे. शंकराचार्यांचा ‘सर्प-रज्जू न्याय’ या स्थळी अगदी चपखल बसतो. आपल्या मनात ज्ञानाचा प्रकाश अस्तित्वात आहेच. ज्ञानदीप जरा या दिशेने वळवून आपण सत्य दर्शन घेऊ या. विद्वज्जन हो, सत्य ज्ञानाच्या प्रकाशात परधर्मातून स्वधर्मात येणारी ही परतवाट नीट निरखून घ्या. पारखून घ्या. ती अनगड भासतेय म्हणून तिचे अस्तित्वच नाकारण्यास सरसावू नका.
अज्ञानाच्या आणि खोट्या कल्पनांच्या आहारी जाऊन, रूढींचे अवडंबर माजवून शुद्ध आणि शास्त्रोक्त धर्मास तिलांजली देणे हाच मुळात धर्मद्रोह होय. तर मग असे असताना जे मुळात आपलेच आहेत, पण दुर्भाग्यवश पराधीन झाले आहेत; मार्गभ्रष्ट, धर्मभ्रष्ट झाले आहेत त्यांना सहृदयपूर्वक, मातृ-पितृ-भ्रातृभावाने आपल्या कुटुंबात पुन्हा समाविष्ट का करून घेता येऊ नये? युद्धात मोठ्या प्रमाणात हानी होते. आक्रमकांच्या सर्वंकष युद्धांत अनेक संस्कार लुप्त होतात. कुलस्त्रिया भ्रष्ट होतात. हे कटू असले तरी प्रखर वास्तव आहे. भगवान वेद व्यासांनी अर्जुन मुखातून भगवद्गीतेच्या प्रथमाध्यायातच तसे वदविले आहे. प्रत्यक्ष भगवंतांनी ती वस्तुस्थिती मान्य केली आहे. काही संस्कार लुप्त झाले म्हणून मूळ धर्म, संस्कृती, मूळ ज्ञान नष्ट होत नाही. त्यांची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवंतास अवतार घ्यावा लागतो एवढेच! गागाभट्टांचा हा युक्तिवाद वस्तुत: अनेक सत्रांमध्ये चालला. अनेक विद्वानांनी अनेक शंका-कूट प्रश्न उपस्थित केले पण प्रखर वास्तववादी आणि तर्कशुद्ध प्रतिपादनाने त्यांनी सर्व शंका-कुशंकांचे संपूर्ण निराकरण केले. धर्मसभा प्रभावित झाली. एकमुखाने नव्या स्मृतींच्या लेखनास व त्यात शुद्धी प्रकरण समाविष्ट करण्यास मान्यता लाभली.
विद्वज्जन हो, आपण सुदैवी. अशाच एका भगवद् अवताराच्या राजाश्रयाने आपण राहत आहोत. सुखेनैवपणे आपला योगक्षेम चालवीत आहोत. धर्मसाधना आपापल्या बुद्धीप्रमाणे, क्षमतेप्रमाणे करीत आहोत. जसे प्राचीन ऋषि-मुनींनी श्रीराम व श्रीकृष्णास खलनिर्दालनार्थ आणि धर्मसंस्थापनेस्तव सर्वतोपरी, सर्वशक्तिनिशी साहाय्य केले त्याचप्रमाणे भगवंताने आपणास शिवाजीराजास साहाय्यभूत होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे हे ओळखले पाहिजे. ही दैवदुर्लभ, ऐतिहासिक संधी आपण ठोकरली तर भगवान शारंगपाणी आपणास कधीच क्षमा करणार नाही. विद्वज्जन हो, हा दुर्मीळ योग साधून, सत्यधर्म कार्य करून पुण्यसंचयाची ही संधी वृथा दवडू नका. वेदोनारायणांच्या प्रतिपादनावर अवघी धर्मसभा दुधात साखर विरघळावी तशी विरघळली. मग आपण पाषाणवत् राहून चालणार नाही.
स्वयं वेदोनारायणाने ये विषयी दक्षिण काशी क्षेत्राच्या धर्मपीठासमोर अनुकूल प्रतिपादन केलेले असल्यामुळे व त्यास धर्मसभेने एकमुखी मान्यता दिलेली असल्यामुळे तद्वतच बजाजी नाईक निंबाळकरांच्या योगे एक पायंडासुद्धा उपलब्ध असल्याने प्रतिपाद्य विषयावर यावेगळी विस्तृत चर्चा करण्याची आवश्यकता आमच्या नजरेस येत नाही. महाराजांनी वारंवार आवाहन करूनसुद्धा सभेने भरीव आक्षेप व्यक्त केलेले नाहीत. त्यांच्या तर्कास छेद देणारे तर्क वा शास्त्राधार सभेपुढे आणलेले नाहीत. गागाभट्टांनी केलेल्या युक्तिवादाचा जो अनुवाद आम्ही केला त्यावरही कोणाची प्रतिक्रिया वा विरोधी प्रतिपादन आलेले नाही. आता एकमेव मुद्दा रूढीचा. रूढी धर्मशास्त्राच्या विपरीत ठरून - मूळ धर्मासच जर बाध्य ठरत असेल, तर अशी विध्वंसक रूढी मोडून काढणेच सर्वथैव इष्ट होय. रूढी राजाज्ञेने बदलता येते. बदलावी लागते, अशी प्राचीन परंपरा आहे. स्मृती व शास्त्रांनी अभिषिक्त राजास तसा अधिकार प्रदान केला आहे, हे विद्वत्सभेस सांगणे नको. सर्व सभासद व्युत्पन्न प्रज्ञावान आहेत. त्यास अनुसरून ही धर्मभंजक रूढी बदलण्याचा, नष्ट करण्याचा सिंहासनाधीश्वर राजाचा निर्णय आधीच झालेला आहे. तो महाराजांनी स्पष्टपणे व्यक्त केला आहे. त्या निर्णयावर धर्मसभेच्या अनुमतीची मुद्रा उमटविणे तेवढे शेष आहे. दंडकारण्य देश व द्रविड प्रदेशाचे सर्वश्रेष्ठ धर्मपीठ, दक्षिण काशी श्रीक्षेत्र पैठण येथील धर्मसभा व धर्मपीठाचा अध्वर्यू व प्रतिनिधी म्हणून तशी अनुज्ञा व्यक्त करण्याची अनुमती मी सांप्रत येथे भरलेल्या धर्मसभेस मागतो. अनुज्ञेयोस्मिन्.
मंत्रमुग्ध झालेल्या उपस्थित सभासदांनी नि:शंकपणे दोन्ही बाहू उभारून एकमुखाने प्रणवध्वनी केला. ब्रह्मवृंदाच्या विशुद्ध ओंकारध्वनीने सारे मंदिर निनादले. टोळशास्त्र्यांच्या एका शिष्याने उठून गाभाऱ्यासमोरच्या मोठ्या घंटेचा नाद करून त्याचा अनुवाद केला. महाराजांची मुद्रा पूर्ण विकसित सहस्रदल कमळाप्रमाणे फुलली. डोळ्यांत समाधान आणि कृतकृत्यतेचे, कृतज्ञतेचे अश्रू तरळले. महाराजांच्या, परिजनांच्या आनंदास तर पारावार उरला नाही. समाधान आणि आनंदाने भारलेली शांतता काही वेळ तशीच राहू दिल्यानंतर, महाराजांचा संकेत ध्यानात घेऊन टोळशास्त्री आपल्या स्थानी उभे राहिले. जरीचे वीतभर रुंद काठ असलेले उपरणे त्यांनी ठीक केले. मनगटावर ओघळलेल्या सलकड्या मागे सारल्या. मोहरा फिरवून ते शिवशंभूच्या पिंडीस संमुख झाले. किंचित खाकरून त्यांनी घसा स्वच्छ केला. डोळे मिटून काही क्षण परमेश्वराचे चिंतन केले. दीर्घ श्वास घेत त्यांनी आपला दक्षिण बाहू उंच उभारला. त्यांच्या श्रीमुखातून सभामंडपातच नव्हे तर संपूर्ण मंदिरात पवित्र ऐतिहासिक घोषणा निनादली–
हिंदवी स्वराज्याचे भूतपूर्व सरसेनापती श्रीमंत नेताजीराव पालकर, जे अमानुष छळाकारणे निरुपायाने आणि केवळ स्वराज्य-स्वधर्म कार्य करण्याचे साधन जो देह त्या देह रक्षणास्तव धर्मभ्रष्ट होऊन सांप्रत महम्मद कुलीखान या नामाभिधानाने वावरत आहेत, त्यास ही धर्मसंसद प्रायश्चित्त देऊन शुद्ध करून घेण्यास आणि वैदिक हिंदू धर्मात पुन्हा परत येण्यास अनुमती देत आहे. तद्वतच यापूर्वी वा यानंतर जे जे कोणी कोणत्याही कारणाने वैदिक हिंदू धर्मातून बाहेर गेलेले असतील वा जातील, त्यांनी स्वेच्छेने वैदिक हिंदू धर्मात पुन:प्रवेशाची कामना व्यक्त केल्यास, मग ते कोणत्याही पंथाचे वा संप्रदायाचे असोत, त्या सर्वांना प्रायश्चित्तपूर्वक शुद्ध करून पुनश्च वैदिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा