फॉलोअर

गुरुवार, २६ मार्च, २०२०

*नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔* *अग्निदिव्य* भाग - 32⃣

*नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜*
*अग्निदिव्य*
*लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार*
*_______📜🗡
भाग - 3⃣2⃣🚩🗡________*
*___🚩📜🚩_______*
*सकाळचा दरबार आटोपून महाराज नुकतेच महालात परतले होते. अंगावरचा जामानिमासुद्धा अजून उतरला नव्हता. तेवढ्यात पाचाडच्या वाड्यावरचा हुजऱ्या महत्त्वाचा निरोप घेऊन आल्याची वर्दी आली. तो इतक्या तातडीने काय निरोप घेऊन आला असावा याची अटकळ महाराजांना आली. त्याला लगेचच भेटीचा हुकूम झाला. मुजरा घालीत हुजऱ्या आत आला आणि मोठ्या उत्साहात त्याने बोलायला सुरुवात केली–*
म्हाराज, बहिर्जी नायकांनी योक भला दांडगा मोगली सरदार धरून आनालाया. संगतीनं त्याचे पन्नास-साठ स्वार बी धरून आनलेती. खाली पाचाडास येऊन ताटकळत हायती. नाईक तातडीनं कैदी पेश करन्याची इजाजत मागत हायती. खूपलढा बुरुजावरून निशाणाची खूण करून आमची इजाजत कळवायला सांग. जाता जाता देवडीवरच्या हवालदारास धाडून दे.
महाराजांचे पोशाख उतरणे सुरू असतानाच हवालदार हजर झाला. आज दुसरे महत्त्वाचे राजकारण निघाल्या कारणाने आमचे सायंकाळच्या दरबारास येणे होणार नाही असे सुरनिसांना ताबडतोब कळवा. जर काही तातडीचे तिढे असतील तर ते रात्री सदरेवर पेश करा म्हणावे. बाकी कामकाज उद्याच्या दरबारासाठी तहकूब ठेवा म्हणून कळव. भोजन उरकताच आम्ही सदरेवर येत आहोत. काही तातडीचे राजकारण उभे राहिले आहे; त्यामुळे पेशवे, अमात्य, मंत्री आणि सुरनिसांना सांगावा धाडा की, आम्ही सदरेवर त्यांची वाट पाहत आहोत. दुसरे महत्त्वाचे, बहिर्जी कोणा मोगल सरदारास कैद करून गडावर घेऊन येताहेत. कैद्यासोबतची मोगली तुकडी होळीच्या माळावर अडकवून ठेवा. त्यांच्या सोबत गडावरून गेलेली शिबंदी असेल. बहिर्जींना सांग, आमचे नाव घेऊन सांग, म्हणावे मोगली तुकडीच्या भोवती आपली शिबंदी दक्ष असू दे. ढिलाई असता उपयोगाची नाही. तिसरे तितकेच महत्त्वाचे, सदरेच्या आत तसेच बाहेर पहारे सख्त करा. कैद्यावरची नजर ढळता कामा नये. अर्ध्याएक घटकेत कैदी हुजूर दाखल होईल. तातडी करा. आम्ही तातडीने भोजनास बसत आहोत याचीसुद्धा वर्दी जाऊ देत.
दळ पाचाडास पोहोचले तेव्हा सूर्य माथ्यावरून सरकला होता. गडावरून बोलावणे आले तर खोटी व्हायला नको म्हणून दुपारच्या जेवणासाठी फक्त कण्या आणि चिंचेचे सार करण्याची सूचना देऊन वाड्यावरच्या हुजऱ्यास बहिर्जीने बोलावून घेतले. आपण पाचाडास पोहोचल्याची वर्दी त्याने महाराजांकडे पाठविली. एका झाडाच्या सावलीत टाकलेल्या बाजेवर बसून कुलीखान भव्यदिव्य रायगड न्याहाळत होता. पूर्वी चंद्रराव मोऱ्यांच्या प्रकरणानंतर आणि अफजलखानाच्या स्वारीची धामधूम सुरू असताना चार-दोन डाव त्याचे रायगडावर येणे झाले होते. तेव्हा त्याची उभारणी आणि जडणघडण सुरू होती. रायगड डोळ्यांत मावत नव्हता. जुन्या आठवणींचे उमाळे येत होते. मन स्वत:तच गुंगून गेले होते. अशा वेळी बहिर्जी हळूच कानाशी कुजबुजला–
सरकार कवा बी गडावरून हुकूम व्हईल, लगेच निगावं लागंल. जवळची हत्यारं काडून तेवडी माज्याजवळ द्या. तंद्री भंगली. चमकून कुलीखानाने विचारले– हत्यार? का? तू तर म्हणाला होतास आम्ही कैदी नाही म्हणून. मग हत्यार का काढून मागतोस? सरकार, कैदी न्हाईत यात काय दोन मतं न्हाईत. सरकार, बोलाया जीभ धजंना झालिया, पर आज या घडीला आपुन हुद्देदार बी न्हाईत. ह्यो तर आपला जुना, तुमीच घालून दिलेल्या धाऱ्यापरमानं चालत आलेला रिवाज हाय. म्हाराजांम्होरं जाताना… ठीक, ठीक, आले लक्षात. रिवाज तर राखलाच पाहिजे. घे. कुलीखानाने कंबरेची तलवार बहिर्जीच्या हवाली केली– सरकार, तेवडा बिचवा आन कट्यार… कुलीखानाने दुशेल्यात खोवलेली कट्यार आणि बिचवा तर काढून दिलाच शिवाय अस्तनीत खोचून ठेवलेल्या दोन्ही छोट्या कट्यारीसुद्धा काढून दिल्या. बुरुजावरून एक शीळ घुमली. पाठोपाठ निशाणांची विशिष्ट हालचाल झाली. बहिर्जी म्हणाला– चलावं सरकार. इजाजतीचा हुकूम झाला. म्हाराज वाट बघत्याती. इशारत होताच पटापट घोड्यांवर उड्या पडल्या. घोडी झपाट्याने गड चढू लागली. वाटेला सरावलेली असल्याने घोडी बे रोकटोक उभी चढण चढत होती. वाटेने जाताना कुलीखानाची नजर आपसूक शून्यात गेली. मनात कल्लोळ सुरू झाला. वेगवेगळ्या आठवणींची दृश्ये नजरेसमोर येत होती. ती रात्र महाराजांनी जोखमीचे हे राजकारण सांगितले आणि आपण ते शिरावर घेतले; ती मिर्झाराजांच्या छावणीतली रात्र. मग आठवली विशाळगडावरची ती रात्र जेव्हा महाराजांशी लटके भांडण करून आपण स्वत:ला कमऱ्यात कोंडून घेतले. आठवले विजापूरच्या छावणीतले दिवस, दिलेरखानाच्या छावणीतली धरपकड, आग्र्याच्या आदबखान्यातला छळ, आलमगिराची सक्ती, मुसलमान होण्यासाठी चाललेला आग्रह. सत्त्व राखण्याचा निग्रह, आफताबखानाने आणलेला महाराजांचा सांगावा, मुसलमान होणे, जाफरखानाच्या जनानखान्यातले बायकांच्या आणि हिजड्यांच्या सहवासातले दिवस, मग अफगाणिस्तान मोहीम, नजरेसमोरच्या दृश्यागणिक मुखावर वेदनेच्या वेगवेगळ्या छटा उमटत होत्या. त्याची मनोव्यथा बहिर्जीने सहज टिपली. मूकपणे तो त्याच्या डाव्या अंगाने घोडे चालवीत राहिला.
महाद्वार ओलांडून घोडी आत आली. महालाच्या देवडीचा हवालदार सामोरा आला. त्याने बहिर्जीला कानात महाराजांचा निरोप सांगितला. त्याप्रमाणे बहिर्जीने स्वार होळीच्या माळाकडे रवाना केले. कुलीखान स्वत:तच इतका गुंगून गेला होता की, या घडामोडींची त्याला जाणीवच झाली नाही. घोडी सदरेच्या दरवाजाशी उभी राहिली. बहिर्जी पायउतार झाला, पण कुलीखान शून्यात नजर लावून तसाच बसून होता. बहिर्जीने घोड्याची ओठाळी हातात धरून घोडे थांबविले आणि कुलीखानाच्या गुडघ्याला स्पर्श करून त्याला भानावर आणले. कुलीखान पायउतार झाला. चला सरकार, महाराज खोळंबल्याती.
थांब! किंचित काळ थांब!! येथवर तर मोठ्या हिमतीने आलो, पण आता पायात मणामणाच्या बेड्या पडल्यागत झाले आहे. महाराज काय म्हणतील? मानकरी आणि पंतमंडळ कसे वागतील, या विचारांनी जीव थरकापून उठतो. खंडोजी खोपड्याचा चौरंगा करण्याचा हुकूम झाला तेव्हा मी तेथेच होतो. संतापाने बेभान झालेली ती मुद्रा आणि क्रुद्ध नजर आजसुद्धा आठवली की, काळजाचे पाणी पाणी होते. महाराजांचे शेकडो निवाडे मी प्रत्यक्ष पाहिलेत. कित्येकांत बरोबरीने सला-मशवरा दिला आणि आज स्वत:च महाराजांसमोर निवाड्यासाठी हे असे उभे राहायचे. असे काही होईल असे जन्मात कधी वाटले नव्हते. कुठल्या तोंडाने जाऊ महाराजांसमोर? सरकार, नशिबाचे भोग ह्ये. भोगल्याबिगर सुटका हाय व्हय? व्हनारे व्हवून ग्येले. आता जे हुईल त्येला फकस्त सामुरं जायाचं, आपल्या हातात येवडंच. उखळात डोस्कं घातल्यावर फकस्त घाव सोसनं आपल्या हाती, मोजायची उजागिरी नसती आपल्याला. काळजी करू नगासा. म्हाराजांनी धरन धाडून न्हाय तर कौल धाडून आनिवलया तुमास्नी. तुमी तितं भोगत व्हतासा आन म्हाराज हितं जळत व्हते, मनातल्या मनात. ना कोनाला दाखवन्याची उजागिरी ना कुनाकडं मन मोकळं करून बोलन्याची. म्या सोता पायलिया म्हाराजांची घुसमट. तुमचं काळीज त्येंना ठाव की त्येंचं तुमाला. खंडेरायाची किरपा आन हा क्षण बघाया घावला. इतक्या वर्षांची तपश्चर्या दोघास्नी बी फळली बगा. चला, आता शुब कामाला उशीर नगं. म्हाराज खोळंबल्याती.
दीर्घ सुस्कारा सोडून कुलीखानाने जडपणे पाऊल उचलले. देवडी ओलांडून गेल्यावर सदरेच्या उंबरठ्यावर पुन्हा त्याचे पाऊल अडखळले. सदरेवरच्या मंद प्रकाशात ती तेजस्वी मूर्ती मसनदीवर बसलेली दिसत होती. डाव्या पायाची मांडी घातलेली, उजवा गुडघा उभा, त्यावर आजानुबाहू उजवा हात विसावलेला, मन अस्वस्थ असल्याची खूण म्हणजे बोटांना जाणवेल न जाणवेलसा कंप, तोच तो आगळावेगळा जिरेटोप आणि मंद मंद डुलणारा त्यात खोवलेला मोत्यांचा घोस, भव्य कपाळावरचे तेच ते दुबोटी गंध, आडव्या गंधाच्या मधोमध असलेला तो केशरी टिळा, तीच स्थिर तेजस्वी करारी पण आश्वासक नजर, चेहऱ्यावरचा तोच शांत गंभीर भाव आणि ओठावर विलसणारे समोरच्याला जिंकून घेणारे मोहक स्मित, मात्र आता चेहऱ्यावर वयाचा प्रौढपणा जाणवत होता. नियतीच्या फटकाऱ्यांचे व्रण लपत नव्हते.
‘देवा परमेश्वरा, शंभू महादेवा, आई जगदंबे इतकी वर्षे हे, हेच रुपडे डोळ्यांनी बघण्यासाठी मन आणि शरीराचा कण अन् कण आसुसला होता. आज इतक्या मोठ्या विरहानंतर हे रुपडे दिसले. धन्य झालो, कृतार्थ झालो. जग काय म्हणेल, काय करेल, कसे वागवेल याची तमा आता उरली नाही. या क्षणी, या पावलांवर मृत्यू आला तरी त्यासारखे दुसरे श्रेयस्कर काही नाही.’ असे विचार मनात घोळवीत कुलीखानाने उंबरठा ओलांडला आणि सदरेवर पाऊल टाकले. त्यासरशी महाराज ताडकन उठून उभे राहिले आणि सदरेच्या पायऱ्या उतरून दोन पावले सामोरे आले. बस्स इतकेच! आणि बांध फुटला. हरवलेले, बराच काळ दुरावलेले वासरू आईकडे ज्या आकांताने आणि ओढीने धावते, त्याच आकांताने धावत कुलीखान पुढे आला आणि त्याने स्वत:ला महाराजांच्या पायावर लोटून दिले. माथ्यावरचा किमांश उडून एका बाजूला पडला, हिसड्याने गळ्यातील नवरत्ने ओवलेली मोत्यांची माळ तुटून त्यातील मोती आणि रत्ने महाराजांच्या पायाशी विखुरली. महाराजांचे दोन्ही पाय घट्ट धरून त्यावर आसवांचा नुसता अभिषेक सुरू झाला. हुंदक्यांनी अवघे शरीर गदगदत राहिले. महाराजांनी आवेगाचा पहिला भर ओसरू दिला. ते तटस्थ उभे झाले. सारी सदर चित्रासारखी स्तब्ध राहून, डोळ्यांत प्राण आणून महाराजांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आतुर झाली. महाराजांच्या डोळ्यांतून आता अंगार बरसणार, त्यांच्या सात्त्विक संतापाचा स्फोट होणार, तीक्ष्ण वाग्बाणांनी समोरचा घायाळ होणार; तिखट शब्दांत जरब बसविणाऱ्या आज्ञा सुटणार आणि सारी सदर हादरणार या अपेक्षेत जो तो असताना महाराजांनी दोन्ही खांदे धरून कुलीखानाला वर उठविले. त्यांचे डोळे घळघळा गळू लागले. वाहणारे आसू न पुसता अवरुद्ध आवाजात महाराज म्हणाले– उठा, नेताजीकाका उठा. सारी दु:स्वप्ने संपली आहेत. आता तुम्ही आपल्या घरी, आपल्या माणसांत पोहोचला आहात. शांत व्हा. शांत व्हा.
एवढा सह्याद्रीच्या कड्यासारखा राकट, पुरंदराच्या बालेकिल्ल्यासारखा बुलंद अभेद्य गडी पण त्याला हुंदके आवरत नव्हते. आसवांना खळ नव्हता. मुखातून शब्द फुटत नव्हता. पहाऱ्यावरच्या मावळ्याने महाराजांच्या नजरेचा इशारा ओळखला. दूर उडून पडलेला किमांश त्याने महाराजांच्या हाती दिला. महाराजांनी तो स्वहस्ते कुलीखानाच्या मस्तकी ठेवला. आपल्या अस्तनीत खोवलेला रेशमी रुमाल काढून आपणच त्याचे डोळे कोरडे केले. म… म… म… महाराज, क… क… क… काय होऊन बसले हे? शब्द न उच्चारता महाराजांनी नेताजींना उराशी कवटाळले. त्यांच्या पाठीवर थोपटीत भरल्या गळ्याने महाराज बोलले– शांत व्हा, नेताजीकाका शांत व्हा. जे घडून गेले त्याला इलाज तो काय? यालाच प्राक्तन म्हणायचे. हीच नियती. माणूस भविष्य जाणू शकता तर मग काय पाहायचे होते? ज्योतिष्याकडून समजून घेता तरी विधिलिखित का कोणास टाळता येते? चिंता करणे नाही. आम्ही आहोत. खात्री असू द्या. आता सारे गोमटे होईल.ु यापुढे तुम्हाला आमच्यापासून कोणी दूर करू शकणार नाही. सदरेचा आपल्या कानांवर, डोळ्यांवर विश्वास बसेना. सदर आश्चर्यात बुडून गेली. बऱ्याच वेळाने दोघे अलग झाले. महाराज स्थिरचित्ताने मसनदीवर बसले. सावरलेले नेताजी दोन्ही हात बांधून समोर उभे राहिले. त्यांच्या मागे दोन पावलांवर उभ्या असलेल्या बहिर्जीने पागोट्याच्या शेवाने डोळे कोरडे केले. त्याच्या चेहऱ्यावर कृतकृत्यतेचे समाधान झळकत होते. सदर शांत, तटस्थ होती. आत्ता कुठे महाराजांनी नेताजींना नीट निरखले. आश्चर्याने त्यांनी पुसले- हे काय? नेताजीकाका, तुम्ही नि:शस्त्र?
नेताजींच्या मुद्रेवर खिन्न हसू आले. पण ते काही बोलण्यापूर्वीच बहिर्जी पुढे सरसावून मुजरा घालत बोलला– जी म्हाराज, वाटभर सरकारांची सारी हत्यारं त्येंच्या कमरंलाच व्हती. मातर गड चढताना रिवाजापरमानं काडून माज्याकडं घेतली. चूक जाली आसंल तर चाकरास मापी असावी. या घडीला सरकारांना म्हाराजांम्होरं हाजिर क्येलं हाय त्ये गनिमाचे शरणागत मनसबदार म्हणून. तवा मंग धाऱ्यापरमानं कारवाई क्येली. फुडं म्हाराजांची मर्जी. हातातील हत्यारं बहिर्जीने महाराजांच्या पायाशी ठेवली.
ठीक आहे. तुमचा काही दोष नाही. दोष द्यावा तर नियतीलाच. नेताजीकाका आता सगळी चिंता सोडा. सततची दौड करून थकला असाल. आता फक्त विश्रांती घ्या. संपूर्ण विश्रांती. शरीराला, गात्रांना आणि मनालासुद्धा. तुमच्या मुक्कामावर आता आमचा खासगीचा कारकून येईल, येताना सोबत आणलेली दौलत त्याच्या हाती जमा करा. गरज लागेल तसे मागून घ्या. आम्ही तसे हुकूम देऊन ठेवू. सायंकाळ होईतो तुमची मापे घेण्यास शिंपी येईल. नवी मराठमोळी कापडे शिवून देईल. सकाळी न्हावी येईल. आता हा यावनी सरंजाम टाकून द्या. तुमच्या आतिथ्याची सोय राणीवशातून केली जाईल. इतका वेळ आपण महाराजांना मुजराच केला नाही हे नेताजींच्या एकदम लक्षात आले. त्यांनी झटकन वाकून मुजरा केला. थोड्या खजील आवाजात ते म्हणाले– क्षमा महाराज. आपले दर्शन झाले आणि भान हरपले. पांडुरंगासमोर वारकरी यावा तशी गत झाली. रिवाज विसरलो. चुकी झाली. महाराज या धनाचे आता मला काय काज. ते आपल्या चरणी वाहिले आहे. जन्मजन्मांतरीचे संचित, त्रैलोक्याचे वैभव या क्षणी मला लाभले आहे, हे चमकते धातूचे तुकडे आणि गोटे यांची त्यापुढे काय पत्रास? मला परत आणवण्यासाठी स्वामींनी उदंड धन खर्चले असेल त्याचे मोल पंचप्राण ओवाळले तरी पुरे होणारे आहे का? असू दे. ते ठरवण्यासाठी हाती भरपूर अवधी आहे. ते नंतर पाहता येईल. बहिर्जी… हुकूम म्हाराज.
नेताजीकाकांना आम्ही तुम्हा हाती सोपवीत आहोत. पुढच्या हुकमापर्यंत त्यांची काळजी तुम्ही जातीनिशी घ्यायची. त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था जगदीश्वराच्या मंदिराशेजारच्या बंगलीत केली आहे. त्यांना तिकडे घेऊन जा. त्यांची हत्यारे परत करा. सगळ्यात महत्त्वाचे, आमच्या हुकमाशिवाय त्यांना कुणी भेटता कामा नये. त्यांना संपूर्ण विश्रांती मिळायला हवी. खुद्द हंबीरराव किंवा मोरोपंत आले तरी हा हुकूम लागू आहे. तुम्ही त्यांच्या शेजारच्या कमऱ्यातच राहा आणि हवे-नको जातीनिशी बघा. कोणत्याही कामासाठी त्यांना बंगलीच्या बाहेर पडण्याची गरज भासता कामा नये. त्यांच्या सोबत आलेल्या अंगरक्षकांची स्वतंत्र सोय करा. त्यांना उणे पडणार नाही याची काळजी घ्या. त्यांना इतक्यात गडावर हिंडण्याची मोकळीक देऊ नका. प्रत्येकाची तुम्ही स्वत: जातीने छानबीन करा. त्यांचा फैसला नंतर करू. सर्वप्रथम, जाता जाता राणीवशात जाऊन पुतळाबाई राणीसरकारांना सांगणे की, नेताजीकाकांना आम्ही त्यांचेवर सोपवीत आहोत. त्यांनी त्यांची काळजी घ्यावी.
जी म्हाराज. या आता. नेताजीकाका, आम्हास सवड झाली की, आम्ही जातीनिशी येऊन समाचार घेऊ. मुजरे करत पाठ न दाखविता दोघे सदरेबाहेर निघून गेले. काही काळ महाराज डोळे मिटून स्वस्थ बसून राहिले. थोड्या वेळाने त्यांनी किंचित हसून सर्वांवर नजर फिरविली. काहीतरी बोलण्यासाठी बाळाजी आवजी चिटणीस पुढे झाले, पण त्यांनी तोंड उघडण्यापूर्वीच महाराज सदरेवरून उठून गेले.
महाराज महालात पोहोचले असतील नसतील तोच बाळाजी आवजी भेट मागत असल्याची वर्दी आली. महाराजांच्या कपाळास आठी पडली, पण त्यांनी बाळाजींना बोलावून घेतले. मुजरा घालीत अजिजीच्या स्वरात बाळाजी म्हणाले– क्षमा महाराज, हे काम सदरेवर झाले असते, पण सुरुवातीस विषय काढेपर्यंत नेताजी सरकार सदरेवर दाखल झाले आणि मग अचानक उठून जाणे झाले. म्हणून आता तसदी द्यावी लागत आहे. ठीक. बोला.
महाराज, आमंत्रणाप्रमाणे शास्त्रीमंडळी गडावर दाखल झाली आहेत. अतिथिगृहात त्यांची सोय करून दिली आहे. आचारी, पाणके, सोवळेकरी आणि बाकी शागिर्दपेशा नेमून दिला आहे. यथास्थित शिधा पुरवण्यासाठी कोठावळ्यास जातीनिशी सूचना दिल्या आहेत. सारी व्यवस्था नीट झाली आहे. आता आपल्या भेटीस कधी हुजूर दाखल करावे एवढेच फक्त विचारायचे होते. ठीक! छान!! सोमवारी तिसरे प्रहरी आम्ही जगदीश्वराच्या दर्शनास जाऊ तेव्हा श्रींच्या साक्षीने त्यांचा समाचार घेऊ. हे क्लिष्ट काम जगदीश्वराच्या साक्षीने होणे इष्ट. बैठकीची सुयोग्य व्यवस्था आगाऊच करून ठेवणे. ब्रह्मवृंदास कळविणे की, धर्मग्रंथ आणि पोथ्या घेऊनच भेटीस येणे. विद्वानांच्या सत्कारात हयगय होऊ देऊ नका. रोज मिष्टान्नाचे प्रयोजन करा. आणि एक, आम्ही मंदिरात ब्रह्मवृंदासह असू तोवर राबता पूर्ण बंद ठेवणे. राणीवशात कळविणे की, त्यांची देवदर्शने प्रात:काळीच करून घेणे. या. आणि दारावरच्या हुजऱ्यास सांगणे, आता इतक्यात आम्ही कोणाची भेट घेणार नाही. आम्ही जरा पडावे म्हणतो. या आता. जी महाराज.
महाराणी पुतळाबाईसाहेब आपल्या महालातील देव्हाऱ्यासमोर बसल्या होत्या. ब्राह्मण श्रीरामविजयाची पोथी वाचीत होता. मूळ ग्रंथच अतिरसाळ. त्यातच वाचणारा पुरोहित पदरची भर घालून दृष्टान्त देत, मोठ्या रसाळपणे प्रतिपाद्य विषय विशद करून सांगत असल्याने कथा चांगलीच रंगली होती. एक अध्याय संपवून पुरोहित देव्हाऱ्यातील देवांस पुष्पाक्षता वाहत असताना दारावरची कुळंबीण महाराणीकडे वर्दी घेऊन आली– सरकार, बहिर्जी नाईक दाराशी आल्याती. तातडीची भेट मागत्यात. लई महत्त्वाचं काम हाय म्हन. काय सांगतेस? हेरांचे नायक बहिर्जी आमची भेट मागताहेत? अरे देवा! आता काय नवे अरिष्ट ओढवणार आहे तुलाच ठावे रे बाबा. ठीक आहे. दे धाडून त्यांना. पुरोहित महाशयांना एवढा इशारा पुरेसा होता. त्यांनी पोथी गुंडाळून देवापुढे ठेवली. देवाला दंडवत घालून ते महालाबाहेर निघून गेले. त्यांना ओलांडत बहिर्जी दाखल झाला. भुईवर डोके टेकून त्याने राणीसरकारांना नमस्कार केला आणि दोन्ही हात बांधून उभा राहिला. राणीसरकार त्याची मुद्रा न्याहाळत होत्या पण चर्येवरून काही थांग लागत नव्हता. थोडी वाट पाहून राणीसरकारच बोलल्या– या नाईक. तुम्ही आणि राणीवशात? त्यातसुद्धा आम्हाकडे? आश्चर्यच म्हणायचे. नवलच ते! आम्हाकडे कुठले राजकारण काढलेत? रानीसरकार, लई आनंदाची खबर घेऊनशान आलोया. पयले त्वांड ग्वाड करा. अरे वा! अशी कोणती मोठी खास आनंदाची खबर आहे की, जी सांगायला तुम्हासारख्या मोहऱ्यास आम्हापर्यंत यावे लागावे? अन्यथा आम्हास बातम्या कळतात त्या गडभर पसरल्यानंतर, हुजऱ्यांकडून वा कुळंबिणींकडून. पार शिळ्या आणि चावून चोथा झाल्यानंतर. साधे इकडच्या स्वारींचे गडावर येणे-जाणेसुद्धा आम्हापर्यंत थेट येत नाही.
महाराणी सरकारांच्या स्वरात विषण्णतेची झाक डोकावून गेली. त्यावर काहीच न बोलता वा चेहऱ्यावरची सुरकुती न हलविता बहिर्जी मुकाट उभा राहिला. काही क्षण असेच अस्वस्थ शांततेत गेले. दीर्घ सुस्कारा सोडून त्याच पुन्हा म्हणाल्या– ते आमचे सोडून द्या. तुम्ही कसे येणे केलेत तेवढे सांगा. स्वामींच्या हुकमाशिवाय तुमचे येणे शक्य नाही एवढे बरीक खरे. जी सरकार. आपलं जुनं सरनोबत, नेताजी सरकार, माघारी परतलेती. म्याच घेऊनशान आलोया. नुकतीच त्येंची महाराजांसमोर पेशी जाली. म्हाराजांनी त्यास्नी कौल देऊन मायेत घेतलंया. काय? सांगता काय नाईक? स्वामींनी काकांना मायेत घेतले? ते स्वामींवर रुसले, म्हणून स्वराज्य सोडून गेले, धर्म सोडला, काय नाही नाही ते कानावर येत होते. ते सारे लटकेच होते म्हणायचे. न्हाय सरकार. दुर्दैवानं त्ये समदं खरंच हाये. पर नेताजी सरकारांवानी येवडा तोलामोलाचा म्होरा गनिमाहाती ऱ्हानं सोराज्याला मानवनारं न्हाई. म्हनून मंग म्हाराजांनीच मूळ धाडून परत आनिवलंया, आन अबय देऊन पदरी घेतलंया. आता वांदा येवडा येकच हाये की सरकार मुसलमान झालेती. पर म्हाराजांनी त्येचाबी समदा इचार क्येला असनारच. त्ये कायना काय तोड काडतीलच बगा. हाय काय अन् नाय काय.
आई भवानीच पावली म्हणायची. महाराणी जागेवरून उठल्या. देवीला हळद-कुंकू वाहून देवीसमोर त्यांनी नमस्कार केला. देवीसमोरच्या वाटीतील खडीसाखर हाती घेऊन त्या देवीसमोरून उठल्या. खडीसाखर त्यांनी बहिर्जीच्या हातावर ठेवली. प्रसाद हातात घेऊन त्याच ठिकाणावरून त्याने देवीस आणि महाराणीस दंडवत घातला. आशीर्वाद पुटपुटत राणीसरकार पुन्हा जागेवर येऊन बसल्या. तोंडात खडीसाखर घोळवत बहिर्जी म्हणाला–
सरकार, नेताजी सरकारांची ऱ्हान्याखान्याची येवस्ता जगदीश्वराच्या वरल्या अंगाला असलेल्या बंगलीत क्येलिया. त्येंना पुरता आराम भेटावा म्हनून त्यांचा राबता बंद हाय. दस्तूरखुद्द म्हाराजांच्या हुकमाबिगर कोनाला भेटन्याची इजाजत न्हाई. त्येंना बी बंगलीभाईर जान्याची मनाई क्येली हाय. म्हाराजांनी त्येंना आपल्यावर सोपवलिया. दुवक्तचा थाळा, न्ह्यारी, काय हवं नगं, आपल्या म्हालातून आपल्या देकरेकीखाली धाडन्याचा हुकूम हाये. म्या सोता येऊन न्हेत जाईन. बाकी कोनावर विसंबायचं न्हाई. काय? काय सांगता? त्यांचा जिम्मा आम्हावर? नवलच! वास्तविक अशी जोखीम थोरल्या महालावर सोपवलेली असते. मापी असावी सरकार, रिवाज तसाच हाय. पर सरनोबत आपल्या म्हायेरचे. तवा त्येंच्या येवस्तेत आपल्याकडून हयगय व्हायाची न्हाई. त्याचपरमानं जालेल्या घोळापाई त्येंच्या बाबत येरांची नाराजी बी अजून दूर जालेली न्हाई. वाईट-वंगाळ नियत ठेवून कोनी दगा-फटका क्येला तर? म्हनून मंग म्हाराजांनी मला सोतालाच आपली गाठ घेऊनशान समदं बैजावार सांगन्याचा हुकूम क्येला. परत्येक बाबीवर आपन जातीनिशी देखरेख राखावी असा हुकूम हाय जी.
स्वामींना आम्हावर विश्वास दाखवावासा वाटला हे आमचे भाग्यच म्हणायचे. स्वामींना सांगावे, त्यांनी निश्चिंत राहावे. आम्ही जातीनिशी सारे नीट पाहू. आता चलतो सरकार. हुकूम द्यावा. सरनोबतांची समदी येवस्ता लावायची बाकी हाय. त्येंना मुक्कामी सोडून तडक पायाशी आलोया. बरे या. सायंकाळी काकांसाठी दूध हवे असेल. आम्ही तयार ठेवू. आणि रात्रीच्या थाळ्यास विनाकारण उशीर करू नका. बहिर्जी निघून गेला. महाराणींनी ताबडतोब कुळंबीण पाठवून राणीवशाच्या दरोग्यास, खासगीच्या कारभाऱ्यांस आणि कोठावळ्यास बोलावून घेतले. महालाच्या एका पडवीत सारवण-लिंपण करवून स्वयंपाकाची आणि कोठीची व्यवस्था लावून घेतली. प्रत्येक वस्तू त्यांनी स्वत: पारखून घेतली. सारी व्यवस्था मनासारखी पूर्ण झाल्यानंतरच त्यांनी बैठकीवर बसून पाण्याचा घोट घेतला.
दिवेलागणीनंतर सदर बसली, तेव्हा मोजकीच मंडळी हजर होती. गडाचे दरवाजे बंद होण्याच्या सुमारास हंबीरराव मोहिते गडावर दाखल झाले होते. त्यांच्या कानी सारे वर्तमान गेल्यामुळे ते तडक सदरेवर दाखल झाले होते. दुपारी घडलेला प्रकार सर्वांनाच अस्वस्थ करून गेला होता. महाराजांवर रुसून, स्वराज्य सोडून गनिमाला जाऊन मिळालेला आणि स्वार्थ साधण्यासाठी स्वधर्माला तिलांजली देऊन सहकुटुंब मुसलमान झालेल्या नेताजीस समोर पाहताच, ज्वालामुखीचा उद्रेक व्हावा तसा महाराजांचा संताप उफाळून येईल, अशी प्रत्येकाला खात्री वाटत होती. अनेक गद्दारांना टकमक टोकावरून कडेलोटाच्या शिक्षा देण्यात आल्या होत्या. मागे एकदा महाराज चक्क फिरंगोजी नरसाळ्यासारख्या पिढ्यान् ढ्यांच्या इमानदारास तोफेच्या तोंडी देण्यास निघाले होते. तशीच शिक्षा आता नेताजीस मिळेल किंवा कमीतकमी खोपड्याप्रमाणे त्याचा चौरंगा होईल किंवा अगदीच नाहीतर गेला बाजार साखळदंडांनी जेरबंद करून लिंगाण्याच्या किंवा सुधागडच्या काळकोठडीत टाकण्याचा तरी हुकूम होईल अशी सर्वांची अटकळ होती. पण प्रत्यक्षात घडले भलतेच. नेताजी महाराजांच्या पायावर काय पडला, आणि महाराज विरघळले. कर्तव्यकठोर, स्थितप्रज्ञ महाराज चक्क विरघळले. डोळ्यांतून पाणी काढत त्यांनी त्याला थेट उराशी काय कवटाळले, त्याची हत्यारे काय परत दिली, घरी परत आलात, आपल्या माणसांत आहात, आम्ही आहोत, असा भरवसा काय दिला, विशेष मानकऱ्यांची आणि राजकीय पाहुण्यांची बडदास्त ज्या बंगलीत ठेवली जाते, त्या बंगलीत त्याला ठेवले काय जाते, त्याच्या जेवणाची सोय अगदी महाराणींच्या खासगीतून काय केली जाते, सारेच मोठे अक्रीत घडले होते. यावरही कडी म्हणजे खुद्द मोरोपंत पेशव्यांना आणि हंबीरराव सरनोबतांना त्यांना भेटण्यास मज्जाव करण्यात आला होता.
सदरेवर अस्वस्थ कुजबुज चालू होती. ललकारी उठली आणि महाराज सदरेवर येऊन बसले. मुजरे झडले. महाराजांची तीक्ष्ण नजर सर्वांवर फिरली. त्या नजरेचा सामना करण्याची कोणाचीच हिंमत नव्हती. सर्वांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थ नाराजी त्यांनी नेमकी टिपली असली, तरी त्याची दखल न घेता त्यांनी सरळ कामकाजाला सुरुवात केली. फार चर्चा न होता कामे पटापट निकालात निघाली. समोरचे कामकाज संपले तशी अस्वस्थ चुळबुळ जाणवण्याइतपत वाढली. मग महाराजांनी पण तिची दखल घेतली. बोला, पंतप्रधान पेशवे, मनात जे काही असेल, शंका असेल ते सारे स्पष्ट बोला. मनात काही शक-शुबा असेल तर मन मोकळे करून टाका. मागे उरलेला सल पुढे नासूर बनतो. नासूर जीवघेणासुद्धा ठरू शकतो. शक-शुबा वा सल नाही, पण महाराज, दुपारी सदरेवर जे दिसले, ते सत्य की स्वप्न हे कळेनासे झाले आहे. त्याचा अर्थ लागेनासा झाला आहे? काही न उमगल्याचा आव आणीत मंद हसून थट्टेच्या स्वरामध्ये महाराज म्हणाले– मतलब? आमच्या पेशव्यांनासुद्धा ज्याचा अर्थ लागू नये अशी ही कोणती गोष्ट आहे? महाराज, पाचहजारी मनसबदारीच्या लोभाने नेताजी मोगलांना मिळाला. धूर्त बादशहाने त्याच्या तोंडाला पाने पुसली. इतकेच नव्हे तर जेरबंद करून आदबखान्यात डांबले. जिवाच्या भीतीने आणि वतनाच्या लोभापायी नेताजीने स्वधर्म सोडला. स्वराज्याशी गद्दारीची कहाणी इथेच संपत नाही, तर गनिमाच्या सैन्याची अगवानी करीत प्रत्यक्ष स्वराज्यावर चालून आला. सरनोबत हंबीररावांनी मोठ्या शर्थीने त्याला धरून आणले आणि बहिर्जी हाती हुजूर दाखल केले. दुर्दैवे करून जर हंबीररावांस यश न लाभते आणि मोगली फौज घेऊन नेताजी स्वराज्यावर कोसळता, तर केवढा अनर्थ ओढवला असता. केवळ कल्पनेनेच अंग शहारते. अशा स्वराज्यद्रोह्यास महाराजांनी उराशी धरावे, अभयदान देऊन कौल द्यावा. ना रुजवात, ना चौकशी, ना साक्ष, ना पुरावा. मोठा अचंबा वाटून राहिला आहे. हुं! हे असे आहे तर! आत्ता जे पेशवे बोलले, ते सारे आम जनतेला माहीत असलेले आहे. ये विषयी आमच्या पेशव्यांकडे काय माहिती आहे, ते पण एकदा सदरेसमोर येऊ देत.
दख्खनवर चालून निघालेल्या मुघल फौजेवर आलमगीर बादशहाने महम्मद कुलीखान अर्थात नेताजी पालकरास नायब सरलष्कर म्हणून नामजद केले. तेव्हापासूनच महाराज बहिर्जीमार्फत त्याच्याशी संपर्क साधून आहेत. मात्र यासंबंधीच्या गुप्त खबरा सरकारात न येता थेट फक्त महाराजांनाच मिळत. एवढे मात्र खरे की, बहिर्जीमार्फत महाराज जे राजकारण साधू पाहत होते त्याला यश आले असावे. इतपत खबरा सरकारात दाखल आहेत. मात्र ते राजकारण काय याचा सुगावा लागू शकला नाही. खुद्द महाराजांशी संबंध असल्याकारणाने त्यात सेवकाने खोलवर छानबीन करण्याची कोशिश केली नाही. कोशिश केली नाही, पण घडत असलेल्या घटनांचा पेशवा म्हणून अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न तर केला असेलच ना?
सेवकाच्या ध्यानी येत नाही महाराज. महम्मद कुलीखान फौजेचा एक मोठा भाग घेऊन, मुख्य फौजेपासून शेकडो कोस दूर घेऊन जातो. ती फौज लहान लहान तुकड्यांमध्ये दूर दूर विखरून ठेवतो. स्वत: त्यापासून अलग होतो. स्वराज्याच्या टप्प्यात येऊन राहतो. याचा काहीच अर्थ मुत्सद्दी म्हणवणाऱ्या आमच्या मंडळींना लावता आला नाही? मसलत ठरवताना तपशीलवार चर्चा झाली असताना? नवल! सांगा हंबीरराव, तुम्ही छापा घातलात तेव्हा कितपत प्रतिकार झाला? कुणाकडून?
क्षुल्लकसासुद्धा प्रतिकार झाला नाही महाराज. छापा टाकला तेव्हा गोट पूर्ण गाफील होता. गाढ झोपलेला होता. पहिली चकमक झडण्यापूर्वीच नेताजी आणि त्यांचे अंगरक्षक घोड्यावर स्वार झाले. अंगरक्षकांनी त्यांच्या भोवती कडे केले. सुदैवाने तळावरची सर्व घोडी जिने कसून तयार होती. रायगडावरून नेलेल्या तुकडीने चपळाई करून घोडी कब्जात घेतली. बहिर्जीच्या तुकडीने त्यांना घेरून तळापासून दूरवर पळवत नेले. आणि अखेर हुजूर दाखल केले.
नेताजीकाका आणि त्यांची माणसे सशस्त्र होती. त्यांच्याकडूनसुद्धा प्रतिकार झाला नाही? बहिर्जीच्या दस्त्याने अशी चपळाई दाखवली की त्यांना हत्याराला हात घालायला उसंतच मिळू शकली नाही. शाबास! पण सरनोबत तुम्ही नेताजीकाकांस चांगलेच ओळखता. त्यांच्या तिखट तलवारीची कीर्त आजसुद्धा दुमदुमत आहे. असा जांबाज लढवय्या, जर हत्यारे उपसून विरोधात उभा ठाकता तर बहिर्जीसारखा सर्वसामान्य शिपाईगडी त्यांच्यासमोर टिकता काय? त्यांना घेरून इतक्या सहजासहजी पळवून नेऊ शकता काय? इतका दूरचा प्रवास विनासायास करू शकता काय? आम्हाला याच गोष्टीचा मोठा अचंबा वाटत राहिला आहे महाराज. नेताजीरावांनी हत्याराला हातसुद्धा घातला नाही. इतकेच नव्हे तर वाटेतसुद्धा त्यांनी काही प्रतिकार केल्याची किंवा निसटून जाण्याचा प्रयत्न केल्याची खबर नाही.
असे सारे असताना आमच्या लोकांना वाटते की, नेताजीकाका स्वराज्यावर चालून येण्यास, दगाबाजी करण्यास निघाले होते. जेव्हा नेताजीकाकांवर धरणे काढण्यासाठी आणि विसकळीत मोगली छावणीवर छाप्याची तयारी करण्यासाठी मसलत बसली होती, तेव्हा या संबंधाने खल झाला होता. त्या खेपेस आम्ही आमच्या भावना जवळपास स्पष्ट शब्दांत उलगडल्या होत्या. इत:पर जर संभ्रम असेल तर मुत्सद्द्यांची मने साफ नाहीत असेच निष्कर्ष काढावे लागतील. आमचा त्यांना स्पष्ट सल्ला आहे, त्यांनी प्रत्येक घटनेचा नीट विचार केला, साफ दिलाने खबरांची आणि पुढे आलेल्या घटनांची योग्य कार्यकारणभावाने छाननी केली, तर आमच्या वागण्यात काहीच अतार्किक वाटणार नाही. काय अनाजी? जी महाराज. पटतंय आता. थोडा एकांगी विचार झाला खरा. पण आता अभ्रे निवळू लागतील याची खात्री बाळगावी.
ठीक. आता राहिला मुद्दा त्यांच्या धर्मांतराचा. मागच्या मसलतीत आम्ही सल्ला दिला होता, त्यांच्या झालेल्या छळाच्या कथा बहिर्जीकडून ऐकून घ्या, म्हणून. मोहिमेची तातडी उडाल्याने ते राहून गेले असेल. पण म्हणून पुन:पुन्हा तेच पालुपद लावून भुई धोपटणे याला मुत्सद्दीपणा म्हणावे काय? आम्हास तरी शंका वाटते. याबाबत आत्ता आम्ही एवढेच सांगतो की, जेवढे आम्ही स्वत:स जाणतो, तितकेच आम्ही त्यांचे अंतरंग जाणून आहोत. त्यांचा त्यांच्या स्वत:वर नसेल इतका विश्वास आम्हावर आहे. मध्यंतरी दुर्दैवाच्या फेऱ्यात काही अनाकलनीय, अवांछनीय अक्रीत घडले, त्याचा अधिक ऊहापोह नको. या गोष्टी सांगण्यापेक्षा समजून घेणे जास्त हितकर असते. एवढेच सांगणे पुरेसे व्हावे की, आमच्यावरील विश्वासावर खेळलेली ती एक गनिमी काव्याची खेळी होती. आलमगीर महाचलाख, धूर्त आणि दूरअंदेशी. इतकी वर्षे त्याने त्यांस मोकाच मिळणार नाही अशी चोख तजवीज केली. नेताजीकाकांच्या स्वधर्मनिष्ठेसंबंधाने आमच्या मनात कोणताही किंतू नाही, आणि कोणी तसा बाळगल्यास आम्हास ते रुचणारही नाही. त्यांनी आम्हावर टाकलेला विश्वास आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही.
महाराजांचे बोलणे ऐकून सदर स्तंभित झाली. खुद्द महाराजच हे बोलत असल्याने त्याच्या सत्यतेची शंका घेण्यास जागाच नव्हती. त्या अद्भुत कथनातून जे ध्वनित होत होते ते अत्यंत आश्चर्यकारक होते. दिव्य होते. महाराजांच्या मुत्सद्दीपणाचा, दूरदर्शीपणाचा, भव्यदिव्यतेचा पैलू प्रकट करणारे होते. महाराज आपल्या माणसांवर किती पराकोटीची माया करतात याचे प्रत्यंतर देणारे होते. मोरोपंत अगदी खजील स्वरात पुटपुटले–
क्षमा करावी महाराज. आम्ही फारच उथळ विचार करीत होतो; त्यामुळे घटनांच्या अन्य आणि वास्तव पैलूंकडे ध्यानच गेले नाही. या कृष्णमेघास इतकी दिव्य रुपेरी कडा आहे हे आम्हा करंट्यांस कधी जाणवलेच नाही. उगाचच आम्ही नेताजीरावांबद्दल अपसमज करून घेतला आणि करंटेपणाचा कळस म्हणजे आपल्या न्यायाबद्दल मनात किंतू उत्पन्न होऊ दिला. या मूर्खपणास तोड नाही. या पापास क्षमा नाही महाराज.
आमच्या माणसांच्या मनात असा संभ्रम आहे हे आम्ही जाणले होते. म्हणूनच मोरोपंत, तुमच्यासह साऱ्यांनाच आम्ही नेताजीकाकांस भेटण्याची मना केली आहे. एक-दोन दिवसांत आम्ही त्यांची एकांतात गाठ घेऊ आणि मग कदाचित लगेचच ही बंदी उठेल. मोरोपंत, आपण स्वराज्याचे पेशवे आहात याचे भान क्षणभरही सुटू देऊ नका. प्रत्येकानेच व्यक्तिगत राग-लोभ, हेवे-दावे, लागे-बांधे आणि हितसंबंध बाजूला ठेवून विदुराच्या भूमिकेतून हरएक बाबीच्या प्रत्येक अंगाचा, सूक्ष्मतर पैलूचा, संपूर्ण विचार केला तर जे दिसते आणि जे आहे त्यातला फरक ध्यानात येईल. आमच्यापेक्षा किंवा आमच्या वारसांपेक्षा अखेर स्वराज्य मोठे आहे याचे भान कधीच सुटू देऊ नका. गनीम मुळातून दुखावला आहे. पुढचा काळ सोपा नाही. परस्पर अविश्वासाचा कली स्वराज्यात शिरला तर मोठे कठीण जाईल. नल राजासारख्या पुण्यश्लोकास तो आटोपला नाही मग आपली काय केवा. ऐक्य आणि परस्परविश्वास, विवेक आणि स्वराज्यनिष्ठा स्थिर असतील तर आलमगीरच काय पण कलीकाळसुद्धा स्वराज्यास नख लावण्यास धजावणार नाही. बोलता बोलता महाराज उठले आणि झराझरा सदरेच्या पायऱ्या उतरून महालाकडे चालू लागले.
महाराज सदरेतून उठले ते सरळ पुतळाबाई महाराणी सरकारांच्या महालाकडे निघाले. रात्रीच्या भोजनाला ते येणार असल्याची वर्दी दुपारीच गेली होती; त्यामुळे महाराणी सरकारांच्या महालामध्ये सणासुदीसारखे उत्साही वातावरण होते. महालातील सगळी चिरागदाने, हंड्या, झुंबरे साऱ्या अंगांनी लखलखत होती. धूपदाण्यांमध्ये सुगंधी धूप जळत होता. जागोजागी उंची गालिचे अंथरले होते. फुलदाण्यांमध्ये सुगंधी फुले आकर्षक पद्धतीने मांडून ठेवली होती. महाराजांसाठी किनखापी लोड-तक्क्यांची उंची बैठक सजविली होती. सर्वत्र मंगल-प्रसन्नता भरून राहिली होती. हा सगळा थाटमाट पाहून महाराजांच्या मूळच्याच प्रसन्न चेहऱ्यावर अधिकच प्रसन्नता आली. सामोऱ्या आलेल्या महाराणी सरकारांकडे रोखून पाहत हसत हसत ते म्हणाले–
अरे वा! आज अगदी दिवाळीचा थाटमाट केलेला दिसतोय. काही विशेष? बोलता बोलता चहूकडे नजर फिरवीत महाराज उंबरठा ओलांडून महालात आले. पदर सारखा करीत पुतळाबाईंनी त्यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला. भिंतीशी टेकून असलेल्या बटकी आणि कुळंबिणींनी जागेवरून भुईवर डोकी टेकविली. उठून उभ्या होत पुतळाबाई हलक्या आवाजात बोलल्या– आमच्या दैवतांचे पाय क्वचितच कधी दासीकडे वळतात. मग तो दिवस आम्हाला दिवाळीपेक्षा मोठा न वाटला तरच नवल.
वा! हे छान! नाव आमचे पुढे करायचे, पण तुमच्या माहेरचे माणूस सुखरूप परत आल्याचा हा उत्सव आहे हे काय आम्ही ओळखले नाही की काय? ती तर दुधातली साखरच म्हणायची. तो आनंद नाही असे कसे म्हणू? पण त्यानिमित्ताने स्वामींची पायधूळ झडली हे मोठे भाग्य.
तसे विचाराल तर तुमच्या महाली येण्याची आणि तुमच्या हातचे घीवर खाण्याची इच्छा आम्हास नेहमीच असते. पण आम्ही आमच्या स्वाधीन नाही हे तुम्ही जाणताच. पुतळाबाई नुसत्याच हसल्या. महाराजांनी उतरविलेला जिरेटोप त्यांनी हाती घेतला आणि कुळंबिणीने पुढे केलेल्या तबकात ठेवला. महाराजांचा दरबारी पोशाख त्यांनी स्वत:च्या हातांनी उतरविला. घरगुती धुवट सुती धोतर आणि मलमलचा अंगरखा नेसून महाराज बैठकीवर बसले. तस्त आणि झारी घेऊन बटकी पुढे झाल्या. सुखोष्ण पाण्याने पुतळाबाईंनी महाराजांचे पाय धुतले आणि त्यातले चार थेंबुटे तीर्थाप्रमाणे मुखात सोडले. ओले हात दोन्ही डोळ्यांस लावले. आपल्या नेसत्या शालूच्या पदराने त्यांनी पाय कोरडे केले. मग महाराजांनी हात धुतले आणि ऊन पाण्याचे हात मुखावरून फिरविले. चवाळीच्या पंचाने हात-तोंड स्वच्छ पुसून मग लोडाला टेकून ते स्वस्थ बसले. त्यांनी हाताने इशारा केल्यावर किंचित संकोचत पुतळाबाई खाली गालिच्यावर बसल्या. महाराज काही काळ लोडाला टेकून स्वस्थ बसले. बैठकीवरच्या तबकातला मोगऱ्याचा गजरा मधूनच ते नाकाशी नेत. त्याचा मंद मादक सुवास दीर्घश्वासाने उरात भरून घेत होते. पुतळाबाई त्यांची चर्या निरखीत स्वस्थ बसून होत्या. मग हळुवार आवाजात त्यांनी विचारले–
श्रांत झालेसे दिसताहात! महाराजांनी सावकाश डोळे उघडले आणि मान वळवून नजर पुतळाबाईंच्या नजरेस भिडविली. पुतळाबाईंची नजर आपसूक खाली वळली. छे! छे!! थकवा नाही. उलट अनेक वर्षांपासून मनावर वागवत असलेला भार आज उतरला म्हणून जरा तकवा आला आहे, इतकेच. नेताजीकाका मोगलांकडे होते, आमच्या जिवात जीव नव्हता. जणू आमचे प्राणच गनिमाहाती होते. आज त्यांना हातीपायी सुखरूप आलेले पाहिले आणि सारा भार उतरला. मन हलके झाले.
पण आता ते जातीत नाहीत… बघू. तो तिढासुद्धा सुटेल. स्वामींना काहीच अशक्य नाही. आज आईसाहेब असत्या तर त्यांना फार आनंद झाला असता. स्वराज्यस्थापनेचा सोहळा त्यांनी डोळ्यांनी पाहिला. हा धर्म संस्थापनेचा सोहळा त्यांच्या डोळ्यांदेखता होता, तर त्यांना परमसंतोष झाला असता. अनेक गोष्टी आम्हास जरा सोप्या झाल्या असत्या. त्या जेथे कोठे असतील तेथून स्वामींवर लक्ष ठेवून असणारच. स्वर्गी थोरल्या महाराजांशेजारी बसून देवतांच्या साक्षीने त्या हा सोहळा पाहतील. स्वामींना उभय माता-पित्यांचे आशीर्वाद लाभतील. आमच्या मनाचे समाधान करण्याचे कसब बरीक तुम्हास चांगलेच साधते. तुम्ही म्हणता तसेच घडो अशी आपण कामना करू या.
महाराज खळखळून मोकळेपणाने हसले. मग तळावर छापा टाकून नेताजींना कसे आणवले याची थोडक्यात कथा महाराजांनी ऐकविली. नवऱ्याबद्दलचे प्रेम, अभिमान, कौतुक, विश्वास आणि श्रद्धा पुतळाबाईंच्या डोळ्यांतून ओसंडून वाहत होती. कुळंबिणीने पाने वाढून तयार असल्याचे कानाशी लागत हळूच सांगितले. पदर सावरीत पुतळाबाई लगबगीने उठून उभ्या राहिल्या. चलावे. पान तयार आहे. भूक लागली असेल.
आज समाधानानेच आमचे पोट भरले आहे. पण तुमच्या हातचे जेवायला आम्ही कायम भुकेले असतो. गोड बोलणे तर कोणी स्वामींकडून शिकावे. मिर्झाराजांसारखा मोहरा बोलण्यात गुंगवून टाकला तिथे आमच्यासारख्या बाईमाणसांचा काय पाड. दिलखुलास हसत महाराज बैठकीवरून उठले. उठताना त्यांना हात टेकून उठावे लागले. चेहऱ्यावर वेदनेची झलक चमकून गेली. पुतळाबाई काही विचारणार तोच त्यांना हाताने थोपवीत त्यांनी विचारले– अरे हो. नेताजीकाकांचा थाळा रवाना झाला का? त्यांच्यासाठी काय बेत केलाय? आपण आज्ञा केली त्याप्रमाणे जे आपल्यासाठी रांधले तेच. बाहेर बहिर्जी स्वत: येऊन थांबलेत. स्वामींचे भोजन आटोपले की ते थाळे घेऊन जातील. ठीक. उत्तम!
चंदनी चौरंगावर सोन्याच्या थाळ्यात सुग्रास अन्न वाढले होते. बसायला आणि टेकायला चांदीच्या फुल्या मारलेले शिसवी पाट मांडलेले होते. पानाभोवती सुंदर रंगीत रांगोळ्या रेखल्या होत्या. कनोजी उदबत्त्यांचा घमघमाट सुटला होता. पानासमोर गुडघाभर उंचीच्या चांदीच्या दोन समया सर्व वातींनी तेवत होत्या. शेजारी तशाच थाटाच्या पानावर शंभूराजे बसले होते. त्यांना पाहताच महाराजांच्या मुखावर अतिप्रसन्न हास्य पसरले. अरे वा! पंगतीला युवराजसुद्धा आहेत तर. मग तर आज दिवाळीपेक्षा वरचढ मोठा सण साजरा झाला म्हणायचे.
शंभूराजांनी उठून महाराजांचे पाय शिवले. महाराजांनी त्यांना उठवून त्यांच्या मस्तकाचे अवघ्राण केले. स्वामी भोजनाला येणार असल्याची वर्दी आली मग आम्ही बाळराजांनासुद्धा मुद्दाम बोलावून घेतले. पुष्कळ दिवसांत त्यांचासुद्धा योग आला नव्हता. आता बाळराजे थोर झालेत. आऊसाहेबांची आठवण होत नाही त्यांना आताशा. हाताला धरून बाळराजांना त्यांच्या पानावर बसवीत महाराज म्हणाले– उत्तम केलेत. निदान यानिमित्ताने तरी आज बाळराजांशी निवांत बोलण्याचा योग जुळून आला. तुमच्यामुळे असे योग वरचेवर जुळून येवोत. पुतळाबाईंनी स्वहस्ते सोन्याच्या झारीतून अन्नशुद्धी केली. आणि त्या शेजारी पाट घेऊन वाढपावर लक्ष ठेवत बसल्या. हसत-खेळत जेवणे झाली. पुतळाबाईंनी आग्रह करकरून दोघांस वाढायला लावले. महाराज मोकळेपणी जेवले. मोजके चार घास पानात मागे ठेवत महाराजांनी पान स्वच्छ केले. महाराजांपुढे हात धुण्याचे तस्त ठेवून, हातावर पाण्याची धार धरून पुतळाबाई हळूच बोलल्या. नेताजीकाकांना भेटण्याची सर्वांना मनाई आहे असे ऐकले. जिवावरच्या संकटाचा मुकाबला करीत पुनर्जन्मच झाला जणू असे सुखरूप परत आलेत. एकदा डोळे भरून पाहावे, सुख-दु:खाचे चार शब्द बोलावे असे फार मनात येते.
त्यांच्या सुरक्षेसाठी आणि आरामासाठी ती बंदी केलेली आहे. पण ठीक आहे. उद्या दुपारी थाळ्यासोबत तुम्ही जातीने जावे. आम्ही बहिर्जीस तसा हुकूम देऊन ठेवतो आणि मेण्याची व्यवस्था करण्यास सांगतो. बराच उशीर झाला. आता त्यांचे भोजन रवाना करा आणि लगोलग तुम्ही पण भोजन करून घ्या. तोपर्यंत आम्ही बाळराजांशी बोलत बसतो.
रात्री खूप उशिरापर्यंत महाराज आणि शंभूराजे बोलत होते. शंभूराजे पित्याकडे मनमोकळेपणाने अनेक तक्रारी सांगत होते. महाराज त्यांना समजावीत होते. कधी चार समजुतीच्या गोष्टी सांगत होते. कधी त्यांची थट्टा करीत होते, तर कधी त्यांचे स्वरचित संस्कृत काव्य ऐकून त्यांचे तोंडभर कौतुक करीत होते. प्रसंग आणि विषय पाहून पुतळाबाईसुद्धा मोकळेपणाने संभाषणात भाग घेत होत्या. उशिराने शंभूराजे निघून गेले. महाराज रात्रीच्या मुक्कामास पुतळाबाईंच्या महालीच राहिले.
नेताजी रायगडी येऊन पोहोचले त्याला तीन दिवस उलटून गेले तरी त्यांना बंगलीबाहेर पडण्याची इजाजत मिळाली नव्हती. त्यांची बडदास्त जरी उत्तम राखली जात असली, तरी बंदिस्त जागेत राहून ते कंटाळून गेले होते. रात्रीच्या भोजनानंतर ते बहिर्जीशी गप्पा मारीत असताना अखेर त्यांनी विषय काढलाच–
बहिर्जी, अरे अजून किती दिवस ही नजरकैद सुरू राहणार? घरी परत येण्यासाठी इतका आटापिटा केला पण अखेर नतीजा काय? ही नजरकैद! असं कसं म्हन्ता सरकार, म्हाराज का तुमास नवे? जवर पुरी खातरजमा व्हईत न्हाई तवर थोडी कळ काडा. काय? आमच्याबद्दल महाराजांना खातरजमा करून घ्यायची आहे? तौबा, तौबा, सरकार गैरसमज व्हतुया. म्हाराजास्नी तुमची खातरजमा हाई म्हनून तर येवडे सायास क्येले आन परत आनिवलं तुमास्नी. पर… मग आता हा पण काय?
सरकार, दुनिया येवडंच जानते की, तुमी गनिमाकडं ग्येलात, धर्म बदलून जागीर मिळवलीत. पर गनिमाच्या छावनीत तुमच्या रक्षनासाटी आन तुमास्नी परत आनन्यासाटी म्हाराजांनी जी उस्तवारी क्येली, मानसं खर्ची घातली त्ये कोन जानतो? त्यापाई मुत्सद्दी आन मानकरी मनात शक बाळगून हायती. खातरजमा त्येंची पटवायची हाय. येकादा माथेफिरू कायतरी दगाफटका करायचा. कोनी मातब्बर म्होरा आपला जिव्हारी लागेल असा अपमान करायचा. म्हाराजास्नी ह्ये नको हाय म्हनून ही काळजी घेनं चालू हाय. त्याचसाटी मला बी रोखून धरलंया. मनात येडंवाकडं, वंगाळ आनू नगा. बोलणे सुरूच होते की खुद्द महाराज येत असल्याची वर्दी घेऊन हुजऱ्या धावत आला. दोघे झटकन उठून उभे राहिले. डोईला मुंडासे बांधे-बांधेपर्यंत महाराजांचे पाऊल कमऱ्यात पडले. कंबरेत वाकून मुजरा करणाऱ्या नेताजींना महाराजांनी कडकडून मिठी मारली. बराच वेळ तसाच गेला आणि मग दोघे वेगळे झाले. तेवढ्या वेळात चपळाई करून बहिर्जीने आणि हुजऱ्याने पलंग झाडून झटकून बसण्याजोगा केला. बहिर्जी दारावरच्या हुजऱ्याला दूर उभे करून कवाड लावून घ्या. तुम्ही आतच थांबा.
महाराज पलंगावर गिर्दीला रेलून बसले. इशारा झाल्यावर बहिर्जीने पुढे आणून ठेवलेल्या घडवंचीवर नेताजी अवघडून बसले. बहिर्जी अंतर राखून अदबीने उभा राहिला. कशी सुरुवात करावी या विचारात काही वेळ शांततेत गेला. मग धिम्या आवाजात महाराजांनी बोलायला सुरुवात केली–
नेताजीकाका, आम्ही तुमच्याकडे शब्द टाकला आणि तुम्ही तो उरी-शिरी धरलात. त्यापायी स्वत:चे हे असे अनन्वित हाल करून घेतले. आमच्या शब्दावर विसंबून तुम्ही प्राणांपेक्षा प्रिय धर्मसुद्धा सोडलात. सीतेच्या अग्निदिव्यापेक्षा मोठे दिव्य केलेत. दहा-अकरा वर्षे जळत राहिलात. पण परिस्थितीने आम्हास असे बांधून घातले आहे की, आम्ही उघडपणे तुमची नावाजणी करू शकत नाही. आम्हा कारणे तुम्ही तुमच्या घरादारावर, संसारावर निखारे ठेवलेत. आलमगीर त्यांचा पुरता नायनाट केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री असूनसुद्धा पुढचा-मागचा विचार न करता कुटुंबकबिला गनिमाहाती सोडून स्वराज्यात परतलात. तुमच्या चारित्र्याला, कीर्तीला बट्टा लावून घेतलात.
महाराज, आपल्या नजरेच्या एका इशाऱ्याने हजारो जीव कोणताही विचार न करता कुर्बान होतात. तेथे मग मी सामान्य सेवकाने जे केले ते काय मोठे विशेष केले? आपले राजकारण बिनतोड होते. आपण केलेली निवडसुद्धा बिनचूक होती. आलमगिराचा सामना सामान्य काम नव्हे. पण माझ्याच दैवाचे फासे उलटे पडले आणि त्यामुळे आपले राजकारण नासून गेले. आपण स्वत:स बोल लावून न घेणे. दोष आहे तो फक्त माझ्याच प्राक्तनाचा. त्याला उपाय तो कोणता? बादशहा जसा संशयी तसाच अतिसावध, धूर्त, दूरदर्शी. आदर्श राजाचे अनेक गुण त्याच्या अंगी आहेत. समोरच्या माणसाचे मन तो एका नजरेत वाचून काढतो. शत्रू कसा विचार करेल याचा अंदाज बांधण्याची त्याची हातोटी विलक्षण आहे. मी आपल्याविरुद्ध बगावत करून नव्हे तर आपण पाठवल्याकारणे त्याच्या छावणीत गेलो हा संशय तो वारंवार बोलून दाखवतो. पण साऱ्या चांगल्या गुणांवर धर्मांधता कायम मात करत असते. माझ्याविषयी त्याच्या मनात सतत संशय जागा असल्याकारणानेच त्याने मला इतकी वर्षे संधी मिळू शकणार नाही याची डोळ्यांत तेल घालून काळजी घेतली. हे दुर्दैवसुद्धा माझे एकट्याचेच. अगदीच नाइलाज झाला म्हणून त्याने मला दख्खनमध्ये धाडले खरे, पण याचा अर्थ त्याच्या मनातला संशय फिटलेला आहे असे मात्र नव्हे. माझ्यावर नजर राहील अशी त्याची कायम व्यवस्था होती. मी दाऊदखानास सहजी बनवू शकलो, पण माझ्या मसलतीमधली ग्यानबाची मेख त्याने नेमकी हेरली आणि त्याने आम्हासाठी धरणे पाठवले. पण फर्मान पोहोचेपर्यंत आम्ही करायचे ते करून ठेवले होते. इमानाच्या मोठ्या लंब्याचौड्या बाता मारून दाऊदखानास थोपवण्यात सुदैवाने यश आले. मोगली ढिसाळपणा आणि अय्याशीची वृत्ती पथ्यावर पडली म्हणून ही संधी साधता आली. अन्यथा ही पण संधी मिळाली नसती आणि मग पुन्हा माझे दुर्दैव उभे ठाकले असते. आलमगिराच्या तावडीत गवसतो तर सर्वनाश अटळ होता. हे पाय पुन्हा दिसण्याचे भाग्य या जन्मी मिळणे सर्वथा अशक्य झाले असते.
चला, येथवर तर दैवाची साथ लाभली. पुढे पण सारे मंगल होईल. गतम् न शोच्यम्. जे घडून गेले ते उगाळण्यात पुरुषार्थ नाही. आता पुढे काय याचा विचार केला पाहिजे. मोठमोठ्या शास्त्री-पंडितांना आम्ही गडावर बोलावून घेतले आहे. जसे बजाजीराजांस शुद्ध करून घेतले तसेच तुमचेसुद्धा शुद्धीकरण होईल. चिंता न करणे. आग्र्याच्या आदबखान्यात नरकयातना सोसत असताना आपला सांगावा पोहोचला त्याच क्षणी आमची येविषयी खात्री पटली होती. आपण चाकराला वाऱ्यावर सोडणार नाही या विश्वासापोटीच; महाराज, मी धर्मत्याग करण्याचे दिव्य करण्यास सिद्ध झालो. अन्यथा स्वराज्याचा सरनोबत धर्मासाठी कसा मरण पत्करतो ते जगाने पाहिले असते. नेताजीकाका, आलमगीर म्हणजे कालसर्प. त्या सर्पाचे शेपूट तुडवून आम्ही आग्र्यातून निसटलो; त्यामुळे त्याची जगभर नाचक्की झाली. वड्याचे तेल वांग्यावर या न्यायाने त्याने तुम्हाभोवती फास आवळला. ते त्याला सहज शक्य झाले कारण तुम्ही आयतेच दिलेरखानाच्या छावणीत होतात. मात्र आपण घाई करून कुटुंबकबिला मोगली छावणीत न नेता तर आम्हास त्यांचे रक्षण करणे शक्य होते. आम्ही स्वत: दूरवर गनिमाच्या सापळ्यात अडकून पडलेलो; त्यामुळे आपणास या अविचारापासून रोखू शकलो नाही. आता तर तुम्हीसुद्धा त्याच्या पकडीतून निसटलात. त्याच्या साऱ्या राजकारणाचा पार फज्जा उडवून, अगदी शेणोडा करून पळालात. त्याउपर त्याची चाळीस हजार गाफील फौज आणि भारी तोफखाना अलगद आमच्या तोंडी दिलात. त्या कालसर्पाची तुम्ही नुसती शेपटी तुडवली नाही तर पार छाटूनच टाकलीत. त्याच्या मर्मस्थानावर प्रहार केलात. धर्मभावना पायदळी तुडवलीत. याचा सूड घेतल्याशिवाय तो राहणार नाही. एक वेळ तो त्याच्या शहजाद्याचा खून करणाऱ्यास माफ करील, पण तुम्हाला, शक्यच नाही.
हे तर अटळ आहे. याचासुद्धा निर्णय आग्र्याच्या आदबखान्यातच झाला आहे. पण त्यास भितो कोण? हे शरीर स्वराज्याच्या कामी आले तर त्या परते भाग्य ते कोणते? नेताजीकाका, भावनेच्या आहारी गेल्याने कार्यसिद्धी होत नाही. भावना कह्यात राखून, मन जागृत ठेवून, थंड डोक्याने आणि विवेकाने काम केले तरच राजकारण साधते. आपलाच जीव फुकाफुकी वैरल्याने स्वराज्य उभे राहत नाही तर जिवाची पर्वा न करता पण गनिमाचा बळी घेण्यानेच स्वराज्य उभे राहते. कुडतोजी गुजरांसारखा मोहरा हे प्राथमिक तत्त्व विसरला आणि स्वराज्य एका समर्थ सरनोबतास फुकाफुकी मुकले. खरे आहे महाराज. अफगाणिस्तानच्या वाटेवर लाहोरास या वेडाने मला पण पछाडले होते पण दैवाची खैर, खंडोबाने तारले.
आमच्या कानी आला तो प्रकार. आता काही काळ तरी होता होईतो तुम्हास मोगली फौजांचे आणि त्यांच्या कपटी मारेकऱ्यांचे हात पोहोचणार नाहीत असे दूर कोठेतरी राहावे लागेल. म्हणजे? आता सेवकाला स्वराज्य सेवेपासून वंचित करणार की काय महाराज? छे! छे!! त्यासाठी का एवढे सव्यापसव्य करून तुम्हाला माघारी आणवले? महाराजसाहेबांच्या कर्नाटकातील जहागिरीचा पैतृक वाटा आता आम्हास मिळाला आहे. त्यासोबतच आपण जिंजी आदी गडकोट आणि प्रदेश जिंकून कर्नाटकात स्वराज्य वाढवले आहे. रघुनाथपंत हणमंते त्याची व्यवस्था पाहतात. तुम्ही त्यांचा भार हलका करावा, साधेल तेवढा प्रदेश स्वराज्यात जोडावा अशी आमची इच्छा आहे.
महाराजांची इच्छा चाकरासाठी आज्ञाच. पण महाराज दहा-अकरा वर्षे वनवास भोगला, या पावलांचा विरह सहन केला. आता काही काळ तरी या पायांपासून दूर लोटू नका. या पावलांच्या सहवासाच्या ओढीनेच हे तन आणि मन आजवर उभारी धरून आहे. आता दूर लोटू नका. नेताजीकाका, हंबीरराव आमचे सख्खे मेहुणे. अत्यंत सक्षमपणे ते इतकी वर्षे तुमचा वारसा चालवीत आहेत. फौजेतसुद्धा त्यांच्यासाठी आदर, प्रेम आणि दरारा आहे. त्यांच्या मस्तकीचा शिरपेच उतरवणे तर शक्य नाही. ते योग्यही नाही.
नाही महाराज, माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नाही. प्राप्त परिस्थितीत तसे काही केले तर ते अनिष्टाला आमंत्रण ठरेल. हंबीररावांची योग्यता निर्विवाद आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की, आपल्या आसपास राहून करण्याजोगी काही कामगिरी मिळावी. कोणत्याही मरातबाची इच्छा आता उरलेली नाही. सेवकाला आपला विश्वास लाभला आहे या परता दुसरा सन्मान तो कोणता? *ठीक आहे. काही दिवस तुम्ही चिपळूणच्या छावणीत राहून तिथला कारभार करावा. मोगली वा आदिलशाही हात तेथवर सहजी पोहोचणार नाहीत. तुम्हाला विश्रांती मिळेल. मावळ्यांच्या, शिलेदारांच्या सहवासात मन रमेल आणि मुख्य म्हणजे या मधल्या काळात तुमच्या संबंधाने फौजेत जी कटुता निर्माण झाली आहे, ती दूर होईल. मग पुढे काय अन् कसे करता येईल ते नंतर ठरवू. एकदा शुद्धीकरण झाले की राबता खुला होईल.*
*जी महाराज.* *त्यानंतर पहाटेचा कोंबडा आरवेपर्यंत तिघे ताज्या मोगली आक्रमणाची, त्याच्या व्यूहाची,* *बलस्थानांची, दुर्बल स्थानांची चर्चा करीत राहिले. डावपेचांचा आराखडा आकार घेत राहिला.* *_क्रमश:_*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...