फॉलोअर

गुरुवार, २६ मार्च, २०२०

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔ अग्निदिव्य भाग - 33⃣



 नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔

अग्निदिव्य


__📜⚔🗡
भाग - 33⃣⚔🚩🗡___

लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार



_⚔🚩⚔📜🚩___

कुलीखान औरंगाबादहून निघून बऱ्हाणपूरच्या वाटेवर असल्याचे टपाल दिल्लीस रवाना करून दाऊदखानाने हाश्शऽ हुश्शऽऽ केले. त्याला जेमतेम आठ-दहा दिवस उलटले आणि एक दिवस भरदुपारच्या तळपत्या उन्हात पाच-सहा शिपायांची टोळी छावणीत दाखल झाली. सारे अंग धुळीने माखलेले, अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या लोंबत असलेल्या, जागोजागच्या जखमांतून वाहून सुकलेल्या रक्ताचे ओघळ अंगावर आणि कपड्यांवर दिसत असलेले, तहान-भुकेने कासावीस झालेले ते शिपाई दरोग्याने दाऊदखानाच्या समोर पेश केले.


प्रत्येकजण पार भेदरून गेला होता. तारवटलेल्या डोळ्यांमध्ये भीती दाटून आली होती, जणू स्वत:चा मृत्यू त्यांना प्रत्यक्ष समोर दिसला होता. धीर देऊन, पाणी पाजून दाऊदखानाने त्यांना कसेबसे शांत केले. तेव्हा मग कोठे ते काही सांगू शकण्याच्या परिस्थितीत आले. त्यांच्या विसकळीत, तुटक, कित्येकदा असंबद्ध वाटणाऱ्या आणि शिवीगाळीने भरलेल्या कथनातून जे निष्पन्न झाले ते असे की, ते सैनिक औरंगाबादला पुढे गेलेल्या छावणीतून कसेबसे जीव बचावून येथवर पोहोचले होते.


रात्रीच्या गर्द अंधारात, कोणास काही कल्पना नसताना अचानक भुतांची टोळी प्रकट व्हावी तसे नामुराद, कमअस्सल मराठे टोळधाडीसारखे भेकडांप्रमाणे त्यांच्यावर कोसळले. रात्रीचा अंधार एवढा दाट होता की, डोळ्यांत बोट घातले तरी दिसू नये. अमावास्या जवळ आल्याने चंद्राचा उजेड तर शक्यच नव्हता. आभाळात बऱ्यापैकी ढग असल्याने तारेसुद्धा गर्दिशमध्येच होते. डरपोक, भेकड मराठ्यांनी मात्र याचा फायदा घेत शेतातल्या ज्वारीच्या कणसांची तोडणी करावी तशी कापाकाप सुरू केली. त्यांना नक्कीच सैतानाची मदत असणार कारण एवढ्या घनदाट अंधारात ते नेमके मोगली वीरांनाच टिपून टिपून कापत होते. चुकूनसुद्धा त्या हरामखोरांची तलवार त्यांच्या स्वत:च्या माणसांना शिवत नव्हती. त्या नामर्दांनी मोगली वीर सूरम्यांना घोड्यावर बसण्याची तर सोडाच पण हातात हत्यार धरण्याचीसुद्धा फुरसत मिळू दिली नाही. कित्येक बिचारे तर पथारीवर झोपले असतानाच कापले गेले. रात्रीच्या अंधारात स्पष्ट पाहू शकणाऱ्या त्या सैतानी घुबडांनी पळून जाण्याच्या वाटासुद्धा रोखून धरल्या होत्या. मोगली सूरम्यांच्या हाती एखादे जरी हत्यार लागते तर एकही नामुराद मराठा जिवंत परत जाऊ शकला नसता एवढे नक्की. त्या बेरहम नामुरादांनी दाणा, वैरण, दारूगोळा, तंबू-राहुट्या, होते नव्हते ते सारे जाळूनपोळून राख करून टाकले. पेटत्या आगीच्या भयंकर उजेडात तर त्यांच्या सैतानीस नुसता ऊत आला. जनावरांची आणि ओझ्याच्या गाड्यांची पार दैना करून टाकली. छावणीत होत्या नव्हत्या तेवढ्या सर्व लहान-मोठ्या तोफा पार बहिऱ्या करून सोडल्या हरामखोरांनी. पंचवीस-तीस ठिकाणी विखरून असलेल्या गोटांवर अगदी ठरवून केल्याप्रमाणे त्या नामर्दांनी एकाच वेळी हल्ला केला. या भेकड दगाबाजीमुळे एका गोटाला दुसऱ्या गोटाची कुमक देता-घेता आली नाही. त्या पिशाचांनी तेवढी फुरसतच मिळू दिली नाही. कारण अवघ्या दीड-पावणेदोन घटकांत होत्याचे नव्हते करून त्या भुतांच्या टोळ्या अंधारात गायब झाल्या. मागे उरले माणसांच्या आणि जनावरांच्या मुडद्यांचे ढीग. जखमींचे विव्हळणे आणि ओरडणे आणि राखरांगोळी झालेली छावणी. हजारांपैकी मूठभर हशम तरी वाचले असतील का याची शंकाच उरली होती. नशिबाने साथ दिली म्हणून अल्लाच्या मेहेरबानीने एवढी पाच-सहा घोडी तरी धडधाकट मिळाली म्हणून निदान खबर देण्यासाठी तरी येथवर येणे त्यांना शक्य झाले होते.


मराठ्यांच्या भुतावळीने दीड-पावणेदोन घटकांत चाळीस हजार फौजेचा फन्ना उडविला आणि एवढा मोठा तोफखाना गारद केल्याची खबर ऐकून दाऊदखानाच्या पायाखालची जमीनच सरकली. आतापर्यंत मराठ्यांच्या अशा भूतचेष्टांच्या कहाण्या तो ऐकून होता. त्याचा या असल्या अशक्यप्राय ‘अफवां’वर कधीच विश्वास बसला नव्हता. प्रत्यक्ष अनुभव घेतल्याचे शपथेवर सांगणाऱ्याचीसुद्धा तो आजवर खिल्ली उडवत आला होता. पण आता त्याच्या स्वत:च्याच फौजेला हा जबरदस्त हिसका बसला होता. त्याचे डोके पार सुन्न होऊन गेले. तो पाषाण मूर्तीसारखा निश्चल बसून राहिला. डोळ्याची पापणी लवेना. त्याच्या हुजऱ्यांनी त्या शिपायांना कसेबसे डेऱ्याबाहेर काढले. तोंडावर पाण्याचे पाच-सहा हबके मारले तेव्हा तो भानावर आला. राबता बंद करून तो एकटाच एकामागून एक दारूचे पेले रिचवत, भणभणत्या डोक्याने विचार करीत बसून राहिला. ही बातमी बादशहापासून लपविणे शक्यच नव्हते. सरलष्कर म्हणून अखेर तोच जबाबदार होता. बादशहाच्या रागाचा सामना कसा करायचा या एकाच गोष्टीचा विचार त्याला भंडावून सोडत होता. सायंकाळी दिवेलागणीच्या सुमारास औरंगाबादहून खान-ए-सामान इफ्तीखारखानाचा खलिता घेऊन सांडणीस्वार दाखल झाला. खलिता गुप्त होता. इफ्तीखारखानाने घडलेला सर्व प्रकार अगदी तपशीलवार लिहिला होता. शिपायांच्या भेदरट कथनापेक्षा खलित्यामधली वस्तुस्थिती अधिकच भयाण होती. आपल्याला या साऱ्या अरिष्टातून सुखरूप वाचविल्याबद्दल अल्लाचे आभार मानण्यास इफ्तीखारखान विसरला नव्हता. त्याच्या ‘सुदैवा’ने त्या रात्री तो त्याच्या ‘खासगी’ कामासाठी शहरात मुक्कामाला राहिल्यामुळे थोडक्यात बचावला होता. खलित्यात त्याने संशय व्यक्त केला होता की, नामुराद कम्बख्त काफिर कुलीखानाने मराठ्यांना हा हल्ला करण्यास फितविले असावे कारण तो स्वत: एवढी मोठी फौज वाऱ्यावर सोडून वाटेत शिकारीची मौजमजा लुटून बऱ्हाणपुरात सुखरूप बसला आहे. त्याने दाऊदखानास आवर्जून सल्ला दिला की, कुलीखान सावध होण्यापूर्वीच आणि त्याने आणखी वेगळी हालचाल करण्यापूर्वीच तातडीने त्याच्या मुसक्या आवळून त्याला जेरबंद करावे. तसेच हा सारा वृत्तान्त तातडीने आलाहजरतांना कळवून पुढच्या कारवाईसाठी योग्य ते हुकूम मिळवावेत. आपण हे वृत्त बहादूरखान आणि दिलेरखानाससुद्धा कळविले असून, त्यांना तातडीने बऱ्हाणपुरास येण्याची विनंती केल्याचे आणि स्वत: दोन-तीन दिवसांत बऱ्हाणपुरामध्ये दाखल होत असल्याचे लिहून धीर देण्याचा प्रयत्न केला होता.


खलिता वाचून दाऊदखानाची दारूची धुंदी क्षणात उतरली. त्याचे डोके ताळ्यावर आले. त्याला एकदम कुलीखानाची आठवण झाली. वास्तविक तो एव्हाना छावणीत दाखल व्हायला हवा होता. मग तो नेमका आहे कुठे? त्याला आणायला पाठविलेले मीर अल्तमश आणि इखलासखान, त्यांचे काय झाले? त्यांच्यासोबत चांगली दहा हजार फौज दिली होती. त्यांना काय घारीने उचलून नेले? त्या सैतान कुलीखानाने त्यांचा काटा काढला की काय? तो नेमका आहे कुठे? इफ्तीखारखानाच्या चुगलीत सत्यता असावी अशी त्याची पक्की खात्री पटली. म्हणजे? आलाहजरतांचा संशय रास्त होता तर. कुलीखान फितूर झाला. त्याने शिवाजीकडून पैसे खाल्ले असले पाहिजेत. ज्या अर्थी इखलासखानाकडून काही विपरीत खबर नाही त्या अर्थी ते दोघे कुलीखानाच्या पाठलागावर असावेत.


रातोरात त्याने एक तुकडी इखलासखान आणि मीर अल्तमशकडे रवाना केली. तातडीने हालचाल करून कुलीखानाच्या मुसक्या आवळून हजर करण्याचा हुकूम सोडला. औरंगाबादमध्ये घडलेले रामायण त्याने थोडक्यात कळविले. अर्थात सगळा मामला तोंडी. कारण खलिता लिहिण्यात फुकट घालविण्यासाठी त्याच्याकडे वेळच नव्हता.


गमतीची गोष्ट अशी की, दोन-तीन दिवसांत बऱ्हाणपूरच्या वाटेवर असलेला कुलीखान भेटणारच आहे. मग त्याला शोधत फुफाटा तुडविण्याची दगदग करण्यापेक्षा वाटेवरच वाट पाहत बसलेल्या त्या दोघांना आठ-दहा दिवस झाले तरी कुलीखान आला नसल्याचे भानच नव्हते. ते मस्त चैनीत निवांतपणे वाट पाहत बसून होते. औरंगाबादहून पळत सुटलेले सैनिक किंवा खलित्याचा सांडणीस्वार यापैकी कोणाशीच त्यांची गाठ पडली नाही. कशी पडावी? कारण ते मुळी त्यांच्या वाटेवर नव्हतेच. ते त्या मार्गापासून दूर साल्हेर-मुल्हेर आणि नाशिककडे जाणाऱ्या वाटेवर तळ ठोकून बसले होते. आणि अक्रीत घडले. कुलीखानाऐवजी येऊन थडकले दाऊदखानाचे तोंडी फर्मान; कुलीखानाला कैद करण्याचे, मुसक्या बांधून व काढण्या लावून बऱ्हाणपुरात हजर करण्याचे.



दाऊदखानाचा हुकूम मिळताच दोघांचेही धाबे दणाणले. ऐशाचा कैफ आणि आरामाची सुस्ती क्षणात उतरली. भराभरा हुकूम सुटले. छावणी मोडून कुचाची तयारी सुरू झाली. लहानथोर प्रत्येकजण झडझडून कामाला लागला. मात्र दोघेही वीर एवढे गांगरून गेले होते की, नेमके काय करावे आणि कोठे जाऊन कुलीखानाला शोधावे हेच त्यांना उमगेना.


छावणी मोडण्याची धांदल चालू असतानाच त्यांनी आपल्या प्रमुख सरदारांना बोलावून घेतले. मीर अल्तमशच्या डेऱ्यात मसलत बसली. घडलेला सारा प्रकार आणि दाऊदखानाचा हुकूम इत्यादीचे वृत्त इखलासखानाने थोडक्यात सांगितले. शेवटी तो म्हणाला–



अल्लाच्या कृपेने आणि तुमच्या मदतीने कोणतेही काम अशक्य नाही; त्यामुळे त्या नादान बगावतखोर कुलीखानाच्या मुसक्या आवळणे ही काही फार अवघड गोष्ट आहे असे नाही. अडचण फक्त एकच आहे, या सैतानी प्रदेशात त्याला शोधायचे तर कुठे शोधायचे? एवढा उत्पात घडवून आणल्यानंतर तो आपली वाट पाहत एकाच जागी बसला नसणार हे तर उघडच आहे.
आडवीतिडवी बोलघेवडी वांझोटी चर्चा सुरू झाली. नुसते एरंडाचे गुऱ्हाळ. नाही रस नाही चोथा. मात्र चर्चेत एकमताने सारेच हिरिरीने सांगत होते की, कुलीखान शिवाला फितूर होऊन त्याला मिळाला असलाच पाहिजे. कलकलाटाने विटून गेलेल्या मीर अल्तमशने अखेर हात उंचावून गलका थांबविला.
ही वेळ बाजारगप्पा करण्याची, खरेखोटे किस्से ऐकवण्याची नाही. ठोस निर्णय, तोसुद्धा तातडीने घेण्याची आहे. ध्यानात घ्या, जाणारा हर लम्हा आपल्यातील आणि कुलीखानामधील अंतर वाढवणारा आहे.


वृद्धापकाळाने कंबरेत किंचित वाकलेला आणि पांढऱ्या स्वच्छ दाढीमिश्या झालेला अवधसिंह हांडा एक पाऊल पुढे सरकला. इतर सरदारांची चालू असलेली बडबड तो नुसतीच ऐकत होता. हे मीर अल्तमशच्या नजरेतून सुटले नव्हते. वाकलेली कंबर अधिकच झुकवून सलाम करीत तो म्हणाला–
हुजूर, जान की अमान पाऊँ तो कुछ कहूं.
कहो। पण काहीतरी ठोस सांगायचे असेल तरच तुझे दातपडके थोबाड उघड.
जी हुजूर, सर्वांत पहिले आपण कुलीखान ज्या ठिकाणी शिकार खेळण्यास थांबला होता त्या त्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचू. हुजुरांनी बयान केल्याप्रमाणे तो काही तेथे आपली वाट पाहत बसला नसणार हे उघडच आहे. पण त्या भागातील बासिंदे तो नेमका कुठल्या दिशेने गेला? कधी गेला? याची माहिती तर हमखास देतील. त्याप्रमाणे आपल्याला आपली तपासाची पुढची दिशा ठरवता येईल. सर्वांचा अंदाज आहे की, तो शिवाजीराजांना जाऊन मिळाला असेल. हा अंदाज ठोकरून लावण्यासारखा नाही. मात्र मी स्वत: मिर्झाराजांच्या छावणीत शिवाजी राजाला फार जवळून पाहिले आहे. निरखले आहे. इतकी वर्षे गनिमाकडे राहिलेल्या आणि धर्म सोडून मुसलमान झालेल्या कुलीखानाला इतक्या लवकर आणि सहजासहजी शिवाजीराजांसमोर जाणे शक्य नाही हे मला पक्के माहीत आहे; त्यामुळे पुरती खात्री पटेपर्यंत शिवाजीराजा त्याला आपल्यापासून दूरच ठेवणार. त्यामुळे त्याच्या मुक्कामापासून सर्वांत जवळच्या साल्हेरीच्या गडाचा आश्रय घेऊन तो राजांच्या हुकमाची वाट पाहत असणार. तातडीने काही नजरबाज साल्हेरीवर पाठवून खातरजमा करून घेतली पाहिजे.


बहोत खूब। याला म्हणतात अनुभवाचे बोल. म्हणूनच तर कितीही अडचणीचे वाटत असले तरी आम्ही अशा पिकलेल्या वयाचे तजुर्बेकार बुजुर्ग आमच्यासोबत बाळगतो.


हुजूर, अजून एक गोष्ट सांगावी वाटते. आपण एवढी मोठी फौज घेऊन निघालो तर आपल्या हालचाली वेगाने करता येणार नाहीत. शिवाय त्याचा सुगावा गनिमाला लगेचच लागून तो सावध होऊ शकतो. तेव्हा सेवकाला असे वाटते की, मीर अल्तमश हुजुरांनी हजार-दीड हजाराची सडी फौज घेऊन पुढे निघावे आणि इखलासखान साहेबांनी मागचा बारदाना आवरून मागोमाग निघावे. जर कुलीखान साल्हेरीत लपल्याची मुस्तकीम खबर मिळालीच तर आपली फौज एकत्र येताच सरळ साल्हेरीस वेढा घालायचा आणि सरलष्करांकडे खबर पाठवून कुमक मागवायची. एकदा गडाला वेढा घालून कुलीखानास किल्ल्यात कोंडले की पुढचे निर्णय सरलष्कर करतील.


दुरुस्त। अगदी रास्त मशवरा आहे. आम्ही खूश आहोत. एकदा का तो बगावतखोर आमच्या हातात सापडला की तुझे दातपडके तोंड आम्ही सोन्याच्या अश्रफींनी भरून टाकू. जिल्हेसुभानी आलाहजरतांकडे तुझी शिफारस करू.


एकदा काय करायचे हे निश्चित झाल्यावर दोन्ही खानांनी वेळ न गमावता एकदिलाने हालचाली सुरू केल्या. घटका पूर्ण होण्याच्या आत चार-पाच नजरबाज साल्हेरीकडे रवाना झाले. पहाटेच्या अंधारातच दीड हजार सडे स्वार घेऊन मीर अल्तमश कुलीखानाच्या तळाच्या रोखाने निघाला. बाकी फौज घेऊन इखलासखान त्याला साल्हेरीजवळच्या जंगलात गाठणार होता.

झपाट्याने मजला मारीत मीर अल्तमश कुलीखानाच्या तळाच्या परिसरात येऊन पोहोचला. नजरबाजांनी सांगितलेल्या खाणाखुणा नीट तपासून आपण योग्य ठिकाणी पोहोचल्याची खात्री त्याने करून घेतली. समोरचा पहाड ओलांडून पलीकडच्या दरीत गेले की, तो कुलीखानाच्या तळावर पोहोचणार होता. काही वेळ जनावरांना आणि हशमांना विश्रांती देऊन त्याने डोंगर चढण्यासाठी पाय उचलला… आणि लगेचच लगाम खेचून घोडे रोखले… घिरट्या घालणाऱ्या घारी-गिधाडांनी डोंगरावरचे आभाळ भरून गेले होते. त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. मनात अशुभाची पाल चुकचुकली. त्याने स्वत:ला सावरले. कुणाशी शब्द न बोलता त्याने टाच मारली आणि अवघड चढणीवरून चौखूर घोडे दौडवत तो शिखरावर पोहोचला. दुपारच्या तळपत्या सूर्याची उन्हे दरीत पसरली असल्याने खालचे स्पष्ट दिसत होते. त्याच्या मनातली शंका खरी ठरल्याचे त्याला स्पष्ट जाणवत होते. जळून खाक झालेल्या राहुट्या तळावर दिसत होत्या. घारी आणि गिधाडांनी मोकळी जागा शिल्लक ठेवली नव्हती. सडक्या-कुजक्या मांसाचा दर्प आसमंतात भरून राहिला होता. दरीतून येणारी ती भयंकर दुर्गंधी एवढ्या उंचीवरसुद्धा डोक्यात झिणझिण्या आणत होती.


दुर्गंधीचा त्रास टाळण्यासाठी त्याने बहुतेक सर्व फौज डोंगराच्या विरुद्ध उतारावरच ठेवली आणि सोबत मोजकेच शे-दीडशे हशम घेऊन तो दरीत उतरला. सर्वांनी आपापल्या पागोट्यांच्या शेवाने नाक-तोंड झाकून घेतले असले तरी दुर्गंधीतून सुटका होत नव्हती. एवढा माणसांचा जमाव जवळ आला तरी गिधाडे उडून जाण्याचे नाव घेईनात. अखेर त्यांना मारण्यासाठी बंदुकीचे बार काढावे लागले. पाचपन्नास गिधाडे मरून पडली तेव्हा कुठे मैदान मोकळे झाले. जागोजाग जळून खाक झालेले तंबू-राहुट्या आणि इतस्तत: पसरलेली सडकी प्रेते समोर दिसू लागली. तळाच्या जागेवर माश्या, पिसवा, मच्छर आणि अन्य विषारी कीटकांची रेलचेल असणार हे ओळखून त्याने आपल्या माणसांना आसपासच्या झाडीतून कडुनिंबाचा ओला पाला गोळा करण्यास पिटाळले. भरपूर धुराने परिसर भरून गेला तेव्हा किड्यांचा त्रास कमी झाला. दुर्गंधीसुद्धा काहीशी उणावली.


मराठ्यांचा छापा पडून गेला त्याला आता आठवडा उलटून गेला होता. एवढ्या काळात आसपासच्या डोंगरांत-जंगलात राहणाऱ्या माणसांनी तळावर आणि प्रेतावर सापडेल ती चीजवस्तू लुटून नेली होती. जंगली श्वापदांना तर मोकळे रानच मिळाले होते. तरस, कोल्हे, लांडग्यांची इतकेच नव्हे तर उंदरांनीसुद्धा प्रेते इतक्या भयानक पद्धतीने फाडून खाल्ली होती की एकाचीही ओळख पटविणे शक्य नव्हते. उरलेसुरले काम घारी आणि गिधाडांनी संपवत आणले होते. तेथे जे पडलेले दिसत होते त्याला मानवी प्रेते म्हणणे धाष्टर्याचेच व्हावे. थोडेबहुत कुजलेले मांस शिल्लक राहिलेले ते केवळ हाडांचे सांगाडेच होते. श्वापदांनी पळवून नेल्याने हातपाय दूरपर्यंत पसरले होते.
तळावरचा सर्वांत मोठा तंबू सरदार कुलीखानाचा असावा असे अनुमान काढून खानाने तिकडे मोहरा वळविला. जळक्या तंबूत कोळसा झालेल्या पलंगावर एक हाडांचा सापळा अस्ताव्यस्त पडला होता. मान धडापासून वेगळी केली गेली असावी कारण कवटी खाली धुळीत लोळत होती. तो सांगाडा महम्मद कुलीखानाचाच असावा असा सर्वानुमते निर्णय झाला.


या भयाण दृश्याचा अर्थ स्पष्ट होता. नामुराद, दगलबाज मराठ्यांनी जसा औरंगाबादच्या छावणीवर भेकड हल्ला केला आणि शाही फौज तख्ततारास केली, त्याचप्रमाणे दगा करून कुलीखानाच्या तळावर हल्ला केला. दिवसभर उन्हातान्हात शिकार करून गाढ झोपेत असलेल्या तळावरच्या हशमांची रानटीपणे सरसहा कत्तल उडविली. जे उचलून नेणे शक्य नव्हते ते जाळून भस्म केले. मीर अल्तमश आणि त्याच्या सोबतच्या हशमांच्या दिलात आणि डोक्यात संताप आणि दहशतीचे संमिश्र काहूर उठले. पण मन आवरून, अल्लाचे नाव घेत तो कामाला लागला. अंधार पडण्याच्या आत त्याला डोंगरापलीकडे आपल्या माणसांत सुखरूप पोहोचण्याची आता घाई झाली होती.


मीर अल्तमशने आजूबाजूच्या खेड्यांमध्ये स्वार पाठवून वेठबिगार जमा केले. इतस्तत: विखरून पडलेले हात, पाय व मुंडकी म्हणजेच हाडे आणि कवट्या गोळा करविल्या. त्यानंतर तळाच्या जागेच्या मधोमध एकच मोठा खड्डा खणविला आणि त्यात सर्व सांगाडे पुरून टाकले. एकशे चौपन्न सांगाडे पुरल्याची त्याने नोंद करून घेतली. त्यानंतर सर्वांनी सर्व मृतांसाठी एकत्र सामुदायिक फातिहा पढून अंत्यविधी पूर्ण केला. दैवाची खैर, सूर्य मावळण्याच्या आत हे काम पूर्ण झाले. त्या ठिकाणचे वातावरण इतके प्रदूषित आणि भयप्रद झाले होते की, एक क्षणही वाया न दवडता त्याने तळ सोडला आणि डोंगराच्या पलीकडे ठेवलेल्या फौजेस जाऊन मिळाला. रात्र त्याने कशीबशी डोंगराच्या पायथ्याशी काढली आणि फजरचा नमाज पढून होताच त्याने इखलासखानाला गाठण्यासाठी दौड मारली. कुलीखानाच्या तळाची दैना आणि त्याच्या हत्येची भयंकर खबर ऐकून इखलासखानसुद्धा पार मुळापासून हादरून गेला. सारा वृत्तान्त लवकरात लवकर दाऊदखानाच्या कानावर घालण्यासाठी दोघे सडेच बऱ्हाणपुराकडे गेले. बाकी फौज आणि बारदाना मागून निघाला.


लांब-लांब मजला मारीत खानांची जोडगोळी बऱ्हाणपूरच्या दिशेने दौडत सुटली. शेवटच्या दिवशी तर त्यांनी दुपारच्या भोजनासाठीसुद्धा वेळ वाया घालवला नाही. तिसऱ्या प्रहरी सरलष्कराची सदर बसण्यापूर्वी दोघे छावणीत दाखल झाले. धुळीने माखलेल्या अवस्थेतच ते दाऊदखानासमोर पेश झाले. त्यांना तशा अवस्थेत पाहून सारी सदर चरकली. मनातून हबकलेला दाऊदखान उसने अवसान आणून संतापाचे प्रदर्शन करीत कडाडला–
लाहौलवलाकूव्वत! हे मी काय पाहतो आहे? इखलासखान, तू खालीहाथ परत आलास? दिलेला हुकूम न बजावता हुजूर दाखल होण्याची तुम्हा दोघांना हिंमत झालीच कशी? कुठे आहे तो नामुराद, बगावतखोर कुलीखान? त्याने तुम्हालासुद्धा चोपून काढले की काय? तुमचा गोटसुद्धा लुटला की काय? तुमच्या फौजेचीसुद्धा त्याने बरबादी केली की काय?


इफ्तीखारखानानेसुद्धा संधी साधून तोंडसुख घेतले. इखलासखानाने दीन मुद्रेने मीर अल्तमशकडे पाहिले. जणू तो सुचवीत होता की, जे घडले आणि जे तू स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेस ते तूच स्वत: आपल्या तोंडाने सांगणे बरे राहील. मोठा अवंढा गिळत मीर अल्तमश पाऊलभर पुढे सरकला. वारंवार बंदगी करीत त्याने कसेबसे आपल्या वरिष्ठांना शांत केले. नंतर कुलीखानाच्या तळाच्या बरबादीचे आणि प्रत्यक्ष कुलीखानाच्या शहादतीचे मोठे रसभरित वर्णन ऐकविले.
मराठ्यांच्या छाप्यात कुलीखान मारला गेल्याचे वृत्त ऐकताच सदरेचा नूर पालटला. सर्वांवर एकच प्रेतकळा पसरली.


‘इन्ना लिल्लाही व इन्ना इलैही राजिऊन’
दाऊदखानासह सर्वांच्या मुखातून असा दु:खोद्गार बाहेर पडला. दाऊदखानाने छावणीत तीन दिवसांचा मातम जाहीर केला. अत्तर-गुलाब किंवा निरोपाचे विडे न होताच सदर बरखास्त झाली.
औरंगाबादला झालेल्या बरबादीची हकिकत बादशहाला कळविण्याचा दाऊदखानाला अद्याप धीर झाला नव्हता. सध्या इफ्तीखारखान त्याचा जवळचा सल्लागार झाला होता. त्याने सल्ला दिल्याप्रमाणे कुलीखानाच्या मुसक्या आवळून नंतर खबर कळविली तरच कातडी बचावण्याची थोडीतरी शक्यता वाटत होती. म्हणून तो इखलासखानाच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. पण आता निरुपायच झाला. दुसऱ्या दिवशी औरंगाबादच्या विनाशाची आणि महम्मद कुलीखानाच्या शहादतीची रडकथा सांगणारा खलिता घेऊन सांडणीस्वार दिल्लीकडे रवाना झाला.
छावणीत प्रचंड घबराट पसरली होती. मोठ्यात मोठ्या मनसबदारापासून ते सर्वसामान्य प्याद्यापर्यंत, इतकेच नव्हे तर सामान्य खोजांपासून बाजारबुणग्यांपर्यंत प्रत्येकानेच मराठ्यांची दहशत घेतली होती. कुणीही एकटा-दुकटा छावणीच्या बाहेर झाड्याला जाण्यासाठीसुद्धा धजावत नव्हता. गस्ती पहारे धास्तावले होते. छबिन्याची गस्त तर बंदच झाली.

बऱ्हाणपुराहून आलेले दाऊदखानाचे टपाल हातात पडले त्या वेळी वजीर जाफरखान आदल्या रात्री जनानखान्यात केलेल्या अय्याशीच्या आठवणींतच रमलेला होता. नेहमीचेच टपाल समजून सवयीच्या बेफिकिरीने त्यावरून नजर फिरविली. पण जसजसा तो वाचत गेला तसतशी लोडाला रेललेली त्याची पाठ सरळ होत गेली. त्याच्या डोळ्यांतली नशा आणि मनावरची धुंदी उतरत गेली. त्याचे दोन्ही तळहात घामाने चिंब ओले झाले. कपाळ आणि माथ्यावरून घामाच्या धारा वाहू लागल्या. श्वास छाती फोडून बाहेर निघेलसा सुरू झाला. डोईवरचा किमांश उतरून त्याने बाजूला ठेवला. थंड गुलाबपाण्यात भिजविलेल्या रुमालाने त्याने चेहरा आणि टक्कल खसखसून पुसून काढले. शराबाच्या धुंदीमुळे आणि मनात सतत वसत असलेल्या बादशहाच्या धाकामुळे आपण काही भलतेच वाचले असावे असे त्याला वाटले. खोजाला खूण करून मस्कती डाळिंबाच्या शराबाने प्याला भरून घेतला आणि एकाच दमात रिता केला. मग खलित्यातला एकेक शब्द त्याने पुन्हा नीट सावकाश वाचून काढला. आणि त्याने जे पहिल्यांदा वाचले होते ते विदारक सत्य होते, भास नव्हता याची त्याला खात्री पटली. आता मात्र खरोखरच त्याचे धैर्य गळाले.
या अल्ला! इन्ना लिल्लाही व इन्ना इलैही राजिऊन!! त्या भयंकर मराठ्यांनी चाळीस हजार शाही फौज आणि लाखो रुपयांचा तोफखाना पलक झपकते होत्याचा नव्हता केला!! या अल्ला! गरीब बिचाऱ्या कुलीखानाचा शक खरा ठरला. त्या भुतावळीने त्याच्यावर पुरता सूड उगवला. दाऊदखान, आता तुझी कंबख्ती भरली. तू कुलीखानाला एकटा सोडला आणि म्हणूनच हा अनर्थ घडला. आलाहजरत आता तुला माफ करणे शक्य नाही. त्यांच्या संतापापासून अल्ला तुझे रक्षण करो.


ही बातमी तातडीने बादशहाच्या कानी घालणे जरूर होते. लपवून ठेवणे वा दिरंगाईने कळविणे कोणत्याही परिस्थितीत शक्य नव्हते. कारण बादशहाचे स्वत:चे खबऱ्यांचे अन् नजरबाजांचे जाळे मोठे कार्यक्षम होते. अल्लाहु आला कदाचित ही बातमी बादशहाला आधीच कळली असावी आणि तो वजीर बातमी कधी आणि कशी देतो याची वाट पाहत असावा; या शंकेच्या भुंग्याने त्याच्या डोक्यात नवीनच पोखरणी लावली. मात्र काही असो, बादशहासमोर एकटे जाण्याची त्याची हिंमत होत नव्हती.
‘असाल तसे हजर व्हा’ असा निरोप पाठवून त्याने बादशहाचा विश्वासू दानिशमंदखान खोजा आणि मुख्य कारभारी शेख सादुल्ला या दोघांना बोलावून घेतले. घटकाभरात दोघे हजर झाले. आगतस्वागत करण्याचे दरबारी रीतीरिवाज बाजूला ठेवून जाफरखानाने त्यांना दाऊदखानाचा खलिता स्वत: वाचून दाखविला. मजकूर ऐकून दोघे सुन्न-बधिर झाले.


आलाहजरतांना ही भयंकर खबर ऐकवण्यासाठी मला जावेच लागणार आहे. पण तुम्हा दोघांपासून वस्तुस्थिती लपवण्यात काही अर्थ नाही. आलमपन्हांना एकट्याने सामोरे जाण्याची हिंमत या क्षणी तरी माझ्याकडे नाही. तुम्हाला खुदा का वास्ता, पण तुम्ही दोघांनी माझ्यासोबत असावे म्हणजे मला जरा धीर येईल. दुसरे म्हणजे आलाहजरतांना शांत करण्याची, त्यांचा कहर कमी करण्याची ताकद अख्ख्या सलतनतीत केवळ एकट्या दानिशमंदखानाकडेच आहे.
या स्तुतीवर कोणतीही प्रतिक्रिया न देता अगदी शुष्क स्वरात दानिशमंदखान म्हणाला–
ठीक है। कधी जायचे आहे?
आत्ता. लगेचच. जेवढा उशीर जास्त, तेवढी संतापाची धार तेज.
शेख सादुल्लाने हलकेच सुचविले–
वजीरेआझम, आपण जनाब महाबतखान किंवा मीर बक्षी जनाब असदखानसाहेबांना सोबत घेतले तर? त्या दोघांचे आलाहजरतांकडे वजन तर आहेच शिवाय ते दाऊदखानसाहेबांचे करिबी रिश्तेदार असल्याने त्यांची रदबदली करून ते त्यांना कयामतपासून बचावण्याची कोशिश करू शकतील.
जाफरखानाने प्रश्नार्थक मुद्रेने दानिशमंदखानाकडे पाहिले.
नहीं हम शेखसाहब की राय से इत्तफाक नहीं रखते। एक म्हणजे खबर आलाहजरतांकडे पोहोचण्यापूर्वी राजधानीत तिचा बभ्रा होणे धोकादायक आहे आणि दुसरे असे की, या क्षणी जर कोणी कोणाला वाचवण्याची कोशिश करण्याची गुस्ताखी करू धजेल तर तोसुद्धा रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही. कारण या मोहिमेत आलाहजरतांच्या मोठ्या अपेक्षा गुंतल्या आहेत. हा हादसा एवढा जबरदस्त आहे की, ही मोहीम सुरू होण्याआधीच बारगळल्यात जमा आहे. हा सदमा पचवणे आलाहजरतांना सोपे असणार नाही. अल्ला सर्वशक्तिमान आहे. इन्शाल्ला तो स्वत:च दाऊदखानाची काळजी घेईल. मनाला त्रास देणारे काम रेंगाळत ठेवू नये, त्याने त्रास अधिक वाढतो. वजीरेआझम, आपली तयारी झाली असेल तर अल्लाचे नाव घेऊन निघू या.


एकाच अंबारीत बसून तिघे लाल किल्ल्यात हजर झाले. बादशहा त्या वेळी जनानखान्यात झेबुन्निसा बेगमबरोबर काही घरगुती मामल्यांची चर्चा करीत बसला होता; त्यामुळे भेट मिळायला थोडा उशीर झाला. जाफरखानाच्या अस्वस्थतेत त्यामुळे अधिकच भर पडली. शाही महालातील वाळ्याच्या पडद्यांचा गारवा त्याला अपुरा वाटू लागला. अखेर अस्वस्थ प्रतीक्षा संपली. भेट फरमावली गेली.


अगदी साध्या वेषात बादशहा आरामगाहमध्ये बसला होता. सर्व दाराखिडक्यांवर वाळ्याचे पडदे सोडून त्यावर भरपूर पाणी मारले होते. बादशहाच्या बैठकीसमोर एक छोटे कारंजे थुईथुई नाचत होते. छतावरच्या जाड पडद्यांच्या पंख्यांच्या हालचालींमुळे हवा खेळती आणि मोठी आल्हाददायक झाली होती. महालात सर्वत्र वाळा, गुलाब आणि मोगऱ्याचा संमिश्र मंद सुगंध भरून राहिला होता. झेबुन्निसा बहुधा आपल्या पित्यासाठी मोगऱ्याचे गजरे तयार करीत असावी कारण ती जेथे बसली असण्याची शक्यता होती त्या बैठकीवर मोठ्या तबकात काही तयार गजरे आणि मोगऱ्याची फुले पडलेली दिसत होती. अंधारलेल्या महालात चिरागदानाचा मंद प्रकाश पडला होता. त्या अपुऱ्या प्रकाशातसुद्धा बादशहाच्या शिरपेचातील रत्ने झगमगत होती. कुर्निसात करीत आत प्रवेश करणाऱ्या जाफरखानावर हिरवी नजर खिळली.
जाफरखान, ज्या अर्थी भरदुपारच्या आगीत आणि तेसुद्धा या दोघांना, विशेष म्हणजे माबदौलतांच्या खास चहेत्या दानिशमंदला घेऊन आला आहेस, त्या अर्थी तू काहीतरी घोटाळा करून ठेवला असावास जो तुझ्यावर आता शेकणार आहे किंवा दख्खनमध्ये काहीतरी घडले असावे.
जाफरखानाने नजर उचलून बादशहाच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्याचा क्षीण प्रयत्न केला, पण हिरव्या नजरेतला दाह या क्षणी त्याला झेपला नाही.


आलमपन्हा, बऱ्हाणपूरहून दाऊदखानाचा खास खलिता घेऊन सांडणीस्वार आला आहे. कुलीखानाचा अंदेशा दुर्दैवाने खरा ठरला. मराठ्यांनी दावा साधला. बऱ्हाणपूरच्या वाटेवर कुलीखानाला कापून काढण्यात आले. शहराजवळची छावणी साफ बुडवली गेली. चाळीस हजार खस्त झाले. शिवाय सारा तोफखाना आणि बारूदखाना बरबाद झाला.


जपमाळ थांबली. कपाळावरचा काळा डाग आठ्यांच्या जाळ्यात गडप झाला. हिरवी नजर अधिकच दाहक आणि विखारी बनली. संतापाने चेहरा लालबुंद झाला. जाफरखान आणि त्याच्या सोबत्यांच्या अंगाला कंप सुटला. बादशहा आसनावरून उठला. दोन्ही हात मागे बांधून त्याने महालाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत येरझारा घालण्यास सुरुवात केली. त्याच्या नाका-तोंडातून निघणाऱ्या फूत्कारांशिवाय महालात दुसरा आवाज नव्हता. जाफरखान गप्प बसलेला पाहून बादशहा कडाडला–
रुक क्यों गये? जे काही असेल ते जसेच्या तसे साफ साफ बयां कर. काही लपवण्याची कोशिश केलीस तर त्याचा अंजाम तुला ठाऊक आहेच.
जाफरखानाने दीनपणे महालात वावरणाऱ्या बांदी आणि खोजांकडे नजरेनेच इशारा केला.
तखलिया…
क्षण-दोन क्षणांत महाल रिकामा झाला.
अब बको…


दानिशमंदखानाने एक चिरागदान जाफरखानाजवळ आणून ठेवले. उजेडाचा कोन साधून जाफरखानाने खलिता वाचण्यास सुरुवात केली. जसजसा मजकूर पुढे सरकत गेला तसतसा संतापाचा पारा वरवर चढत गेला. मात्र बादशहाने वाचनात कोणताही व्यत्यय आणला नाही. फक्त लंबकाची गती वाढली आणि फूत्कारांचा आवाज मोठा झाला.


बादशहाच्या क्रुद्ध मन:स्थितीचा अंदाज येण्यास तेवढे पुरेसे होते अन्यथा कोणत्याही प्रसंगात बादशहाची चर्या निर्विकार आणि हालचाली कमालीच्या थंड असत. खलित्याचे वाचन संपले. त्याच आवेगात दोन येरझारा पूर्ण झाल्या. बादशहा आसनाजवळ येऊन थांबला. आपल्या मस्तकावरचा किमांश उतरून त्याने हातात घेतला. झटकन पुढे होऊन दानिशमंदखानाने तो हातात घेऊन जवळच्या तिपाईवर ठेवला. दोन्ही हातांनी मस्तक गच्च धरून बादशहा मटकन आसनावर बसला आणि पुटपुटला–
अ उजू बिल्लाही मिनश शैतानिर रजाम.
क्रमश:

*____⚔📜🚩

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...