फॉलोअर

शनिवार, २८ मार्च, २०२०

*नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔* *अग्निदिव्य* भाग - 37⃣

*नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜*
*अग्निदिव्य*
*_______📜🗡भाग - 3⃣7⃣🚩🗡________*

*लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार*

*___🚩📜🚩_______*
*गुरुवारी पहाट ताऱ्याचे चांदणे रायगडावर उतरले आणि नगारखान्यात रुद्रगंभीर नौबत दुमदुमू लागली. त्या मागोमाग जगदीश्वराच्या देवळात आणि होळीच्या माळावर उभारलेल्या मंडपात चौघडा सुरू झाला. सनईचे मंगल सूर वातावरण उल्लसित करू लागले. तोरणा-राजगडाच्या दिशेने आकाश लाल-शेंदरी होऊ लागण्यापूर्वीच टोळशास्त्री आणि ढेरेशास्त्रींचे विद्यार्थी मांडवात पोहोचले. त्यांनी लगेचच धार्मिक विधींची तयारी, चौरंग व देवतायनांची मांडामांड वगैरे कामे सुरू केली. त्यांच्या काही सहकाऱ्यांनी रात्रभर जागून शिंपण, लिंपण, सारवण, रांगोळी रेखन, तसेच लतापल्लव, तोरणे, ध्वजारोपण इत्यादी यथास्थानी करवून घेतले होते. मंडपात ही कामे सुरू असतानाच प्रेक्षक रयतेने अन् निमंत्रित मानकऱ्यांनी मंडपात जागा धरायला सुरुवात झाली. त्यांच्यात उत्साह तर एवढा होता की, जसजसे हुजरे पोस, चादरी, लोड-गिर्द्यांची मांडामांड करू लागले तसतसे त्यावर मानकरी जागा धरू लागले. कित्येकजण तर आपला मरातब बाजूला ठेवून त्यांना त्या कामी मदतसुद्धा करू लागले.*
इकडे नेताजींना भल्या पहाटेसच उठवून त्यांचे पुन्हा एकदा विधिवत क्षौर करविण्यात आले. टोळशास्त्रींच्या विद्यार्थ्यांच्या देखरेखीखाली त्यांची गोमूत्र, गोमय, गोधुली, क्षेत्रमृत्तिका व शुद्धोदक स्नाने झाली. एक कोरा पंचा कंबरेस आणि एक दोन्ही खांद्यांवर पांघरून त्यांना अनवाणी मंडपात नेण्यात आले. गोमयाने सारवून धर्मविधीसाठी तयार करण्यात आलेल्या चौकाच्या बाहेरच्या अंगाला एका तृणासनावर त्यांना बसविण्यात आले. तोपर्यंत शास्त्रीमंडळी मंडपात उपस्थित झाली. गणेशशास्त्री जांभेकर, सोबत अन्य काही विद्वान द्विजवरांना घेऊन, महाराजांच्या आज्ञेप्रमाणे शुद्धीकरण प्रयोगात अत्यंत आस्थेने सामील झालेले दिसत होते. ब्रह्मवृंद त्यांना आदराने व सन्मानाने वागविताना दिसत होता.
मंडपपूजन, अष्ट दिग्पाल स्थापना, नवग्रह स्थापना, मातृका स्थापना, देवायतन व देवक स्थापना वगैरे प्राथमिकता पूर्ण होण्यापूर्वीच महाराजांना वर्दी गेली. अर्ध्या घटकेत महाराजांची पालखी देवक स्थानापर्यंत आली. त्यांच्या पाठोपाठच महाराणी सोयराबाई साहेबांचा मेणा दाखल झाला. अन्य राण्यांचे मेणे पोहोचले. रामराजांच्या बोटाला धरून शंभूराजेसुद्धा दाखल झाले. हाती नारळ देऊन टोळशास्त्रींनी महाराज व राणीसाहेबांचे स्वागत केले. उभयतांनी सर्व ज्येष्ठ ब्राह्मणांस चरणस्पर्श करून नमस्कार केला आणि पुण्याहवाचनासाठी आसनस्थ झाले. महाराज, दो नेत्रांस उदकस्पर्श करावा. हरि: ॐ।। केशवाय नम:।। ॐ नारायणाय नम:।। ॐ माधवाय नम:।। ॐ गोविंदाय नम:… ब्राह्मण खणखणीत वाणीने मंत्रोच्चार करू लागले. आचमन, प्राणायाम करून पुण्याहवाचनास सुरुवात झाली.
हरि: ॐ।। श्रीमन्महागणाधिपतये नम:।। इष्ट देवताभ्यो नम:।। कुलदेवताभ्यो नम:।। ग्रामदेवताभ्यो नम:।। दुर्ग देवताभ्यो नम:।। स्थानदेवताभ्यो नम:।। शचिपुरंदराभ्याम् नम:।।… विनायकं गुरुं भानु ब्रह्माविष्णू महेश्वरान् । सरस्वती प्रणम्यादौ सर्व कार्यार्थ सिद्धये।।… श्रीमद्भगवतो महापुरुषस्य, विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य, अस्य ब्रह्मणे द्वितिये परार्धे… भरतवर्षे भरतखण्डे जंबुद्वीपे दंडकारण्यांतर्गत अपरान्ह देशे, सह्यगिरी पर्वतशिखरे सिंधूसागराया: पूर्वेतीरे, गोदावर्या: दक्षिणेतीरे शालिवान शके… तथाच शिवराज्याभिषेक शके… देशकालाचा यथोचित विधिवत उच्चार करून, बाह्मणांनी शुद्धीकरण प्रयोगाचा संकल्प सांगितला. …मम सेनाध्यक्ष: पालकर कुलोत्पन्न: नेताजीवर्मनस्य प्रायश्चित्तोपरी वैदिकधर्मे पुनरागमनार्थे शुद्धीकरण कार्यांतर्गत यथाशास्त्रेण पुण्याहवाचम् अहम् करिष्ये । तथाच… त्यानंतर तदंगभूत देवतापूजन, हवनादींचा यथास्थित संकल्प सांगितला गेला. संकल्पोत्तर श्रीगणेशाची आद्यपूजा झाली. ॐ गणानां । त्वाम् गणपतिं हव:महे । कविं कविनामुपश्रवस्तंम् । ज्येष्ठराजं ब्रह्मणा ब्रह्मणस्पत आ न श्रुण्वन्नुतीभि: सीद सादनम् ।। यानंतर भूमिपूजन, आसनशुद्धी, दिग्बंधन, न्यासादी पूर्वकर्मे करून चौरंगावर कलश स्थापना केली गेली. ॐ आषधयै: संवदन्ते सोमेनसहराज्ञा । यस्मै कृणोति ब्रह्मणस्तु राजन्पारयसि ।। कलशस्य मुखे विष्णू कण्ठे रुद्र… कलशपूजन झाले. त्यावर पूर्णपात्र स्थापिले– ॐ पूर्णं दर्वी परातवसपूर्णा पुनरावत: ।… कलशावर स्थापित पूर्णपात्रामध्ये गणेश, वरुण, शचिसह इंद्र आदी देवतांची स्थापना व पूजन झाले. त्यानंतर महाराजांकडून नांदीश्राद्ध करविण्यात आले. सत्यवसु संज्ञका विश्वेदेवा नांदीमुख: भूर्भुव: स्व:… नांदीश्राद्ध होत असताना मंडपात मंगलवाद्यांचा, शंख, घंटांचा ध्वनी निनादत होता. मंडपाबाहेर शिंगे, तुताऱ्या गर्जून उठल्या. यानंतर प्रत्यक्ष पुण्याहवाचनास सुरुवात झाली. यजमान म्हणून ब्राह्मणांनी महाराजांस म्हणण्यास सांगितले– यं कृत्वा सर्ववेद करण कर्मारंभा: शुभा: शोभता: प्रवर्तत तमहमोंकारमादिम् कृत्वा ऋग्यजु: समाशीर्वचनम् बृहवृमिमंत भगविद्भिरनुज्ञात: पुण्यं पुण्यामहं वाचयिष्ये । मग पुरोहित म्हणाले– ॐ द्रविणोदाद्रविणसस्तुरस्य द्रविणोदा… महाराजांना पुन्हा म्हणण्यास सांगितले गेले– मह्यम् सहकुटुंबिने सहपरिवारे महाजनान्नमस्कुर्वाणाय आशीर्वचनम् अपेक्षमाणायाद्य करिष्यमाणा शुद्धीकरण कर्मण: पुण्याहम् भवन्तो ब्रुवन्तु ।। पुरोहित म्हणाले– ॐ पुण्याहमिति… पुण्याहवाचन सुरू असतानाच श्री शंभूमहादेवास आणि श्री देवीस अभिषेक सुरू झाला. ॐ नमस्ते रुद्र मन्यव उतो त इषवे नम: । नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्याम् उत ते नम: ।।… गौरी पद्मा शचिर्मेधा सावित्री विजया जया । देवसेना स्वधास्वाहा मातरो लोक मातर: ।।… पुण्याहवाचन आणि देवतांचा अभिषेक यथासांग पार पडला. महाराजांच्या उजव्या हातास बसलेल्या सोयराबाईंना आता महाराजांच्या डाव्या हातास बसण्याची ब्राह्मणांनी सूचना केली. अभिषेके पत्नी वामत: टोळशास्त्रींनी सर्व कलशांमधील पाणी एका सुवर्ण ताम्हनात व अभिषेकाचे तीर्थ दुसऱ्या सुवर्ण ताम्हनात काढून चित्रावशास्त्री आणि गणेशशास्त्रींच्या हवाली केले. तसेच दर्भाचा एकेक अभिमंत्रित कुर्चा आणि आंबा, जांभूळ, वड, पिंपळ व औदुंबर अशा पाच महावृक्षांच्या दोषरहित पानांची एकेक जुडी त्यांच्या हवाली केली. मागोमाग गोमूत्रासह पंचगव्याने भरलेले तांब्याचे छोटे घंगाळ, दर्भ कुर्चा व महावृक्षांच्या पानांची जुडी घेऊन विनायक भट आणि तीर्थोदकाने भरलेले चांदीचे छोटे घंगाळ घेऊन ढेरेशास्त्री नेताजींच्या संमुख उभे झाले. ॐ समुद्र ज्येष्ठां सलिलस्य मध्यंतुनानाय… उच्चरवात होणाऱ्या मंत्रघोषात महाराजांस सपत्नीक अभिषेक होऊ लागला. नेताजीरावांस सिंचन होऊ लागले. काही ब्राह्मण तीर्थोदकाचे सिंचन महावृक्षपर्णाने उपस्थित जनसमुदायावर करू लागले. सारे श्रद्धायुक्त अंत:करणाने लीन होऊन पवित्र जलाचे तुषार अंगावर घेत राहिले. अभिषेक विधी पूर्ण झाल्यानंतर पुरोहितांनी महाराजांस सपत्नीक पाचारण केले व त्या उभयतांच्या हस्ते नेताजींवर पुनश्च संमंत्रक सिंचन करविले. नेताजींस गोमूत्र व पंचगव्याचे तीर्थ प्राशनास दिले गेले.
महाराज व सोयराबाई यज्ञवेदीजवळ आले. टोळशास्त्रींच्या सूचनांप्रमाणे ते यज्ञकुंडासंमुख पूर्वाभिमुख बसले. त्यानंतर नेताजी मंडपाशेजारीच उभारलेल्या आडोशात जाऊन स्नान करून ओलेत्याने पूजेच्या चौकाजवळ आले. चौकाबाहेर उभे करून त्यांना पुनश्च संमंत्रक पंचगव्य प्राशनास दिले गेले. चौकाच्या आतल्या बाजूस मात्र अगदी कडेला बसवून त्यांना विधिवत प्रायश्चित्त दिले गेले. प्रायश्चित्तोपरी त्यांनी पुन्हा स्नान केले आणि ते सोवळे नेसून, सोवळ्यातील उपरणे दोन्ही खांद्यांवर पांघरून महाराजांच्या शेजारी यज्ञकुंडासंमुख बसले. ढेरेशास्त्रींनी महाराजांकडून ब्राह्मणद्वारे होम करविण्याचा संकल्प करून घेतला. ब्रह्मा, होता, कर्ता व उद्गाता यांच्या वर्णी लावून घेतल्या. ब्राह्मणांनी अरणीमध्ये मंथा घुसळून संमंत्रक अग्नी सिद्ध केला. होमकुंडात विधिवत यज्ञीय अग्नीची प्रतिष्ठापना झाली. समिधा आणि तुपाच्या आहुत्यांनी यज्ञकुंड पूर्णार्थाने प्रज्वलित झाले. चौकाशेजारी जेथून सर्व विधी व्यवस्थित दिसतील अशा रीतीने मांडलेल्या आसनावर महाराज जाऊन बसले. राणीवशात मांडलेल्या सोवळ्यातील स्वतंत्र आसनावर सोयराबाई सुखावल्या. देवतांची पूजा व अभिषेक करण्यासाठी नेताजी देवायतनासमोर जाऊन बसले.
धूप आणि अगरबत्त्यांच्या सुगंधावर मात करून होमाच्या सुगंधाने अन् धुराने सारा मंडप कोंदून गेला. उच्चरवात होणाऱ्या ब्राह्मणांच्या मंत्रघोषाने दुमदुमून गेला. वातावरणात एक अद्भुत भारलेपण भरून राहिले होते. याच स्थानी काल काही कांड घडून गेले याची पुसटशी खूणसुद्धा आता मागे उरली नव्हती. होम धूमाने उरलीसुरली जळमटे जळून गेली. साऱ्या शंका-कुशंका आपोआपच भस्मसात झाल्या. सर्वत्र एक धीरगंभीर, पवित्र मांगल्य भरून राहिले होते. बघता बघता पूर्णाहुतीची वेळ आली.
नव्या कोऱ्या निर्दोष बांबूंच्या तिकाटण्यांवर केळीच्या सोपटांची पन्हळ उभारली गेली. पन्हळीचे बाहेरचे टोक यजमानास सुरक्षित अंतरावर पण यज्ञकुंडासमीप उभे राहता येईल असे, तर दुसरे टोक नेमके यज्ञकुंडाच्या केंद्रस्थानी येईल अशी मांडणी केली होती. पूर्णाहुतीच्या तुपाच्या संततधारेने उफाळणाऱ्या ज्वालांचा उपद्रव तर होऊ नये आणि तुपाची अखंड धार नेमकी अग्नीमध्ये पडावी हा त्यामागचा साधा सरळ उद्देश होता. टोळशास्त्रींनी पन्हळीच्या एका बाजूस महाराजांना सपत्नीक उभे केले आणि महाराजांच्या हाती तुपाने भरलेली सुवर्णझारी दिली. चांदीची झारी देऊन नेताजींस दुसऱ्या बाजूस महाराजांसंमुख उभे करण्यात आले! दोघांच्या मधोमध एक ब्राह्मण तुपाने भरलेले मोठे पातेले घेऊन उभा झाला. पन्हळीमधून महाराजांनी व नेताजींनी तुपाची धार सोडण्यास सुरुवात केली आणि उच्चरवात पूर्णाहुतीचे मंत्र म्हटले जाऊ लागले. प्रज्वलित यज्ञकुंड धडाडून उठले. असे वाटले, ज्वाला छतास स्पर्श करतील. पूर्णाहुती पूर्ण झाली. घृतधारा थांबल्या. उफाळत्या ज्वाला कमी झाल्या. फुलमाळा आणि जरीच्या कलाबतूने मढविलेले श्रीफळ महाराजांनी यज्ञकुंडास अर्पण केले. नंतर यज्ञपुरुषास अहेर म्हणून एक वस्त्रयुग्म, सुवर्णतंतूंचे यज्ञोपवित आणि अभिमंत्रित अक्षतांची आहुती यज्ञकुंडात देण्यात आली. होमकुंडात ओदनचरुचा, तर मंडपाबाहेर काटेकोहळ्याचा बळी देण्यात आला. महाराजांना सवाष्णींनी अवभृत स्नान घातले, तर नेताजींना शागिर्दांनी मांगलिक स्नान घातले. पूर्ण पोशाखात क्षात्रवेषात मंडळी चौकात परतली. महाराजांनी नेताजींना रीतीप्रमाणे अहेर केला. यज्ञनारायण व देवतांस नेताजींकरवी महानैवेद्य दाखविण्यात आला. वाद्यांच्या दणदणाटात महाआरती झाली. चढ्या आवाजात देव्यांसह मंत्रपुष्प झाले. त्यासरशी मंडपाबाहेर बंदुकांचे बार उडाले. बुरुजांवरून तोफांचे आवाज दऱ्याखोऱ्यांमध्ये दुमदुमले. नेताजी पालकरांचा शुद्धीकरण प्रयोग पूर्ण झाला. महम्मद कुलीखान पुनश्च नेताजीराव पालकर म्हणून स्वगृही परतला. मात्र जे गमावले होते ते पुन्हा भरून येणार नव्हते. जखमा बुजल्या तरी व्रण कायम राहणार होते. सर्व धर्मविधी यथासांग पार पडले. टोळशास्त्रींनी सारे शास्त्रोक्त पद्धतीने करवून घेतले. ब्राह्मण साक्षेपाने सांगत होते, महाराज श्रद्धायुक्त अंत:करणाने तसे करीत होते. नेताजींचे डोळे वारंवार भरून येत होते. कधी महाराजांवरील श्रद्धेने, कृतज्ञतेने, तर कधी औरंगजेबाच्या राक्षसी पंजात अडकून पडलेल्या बायका-पोरांच्या आठवणीने. मनातले कढ उरातच जिरवीत, पालथ्या हातांनी डोळे पुसत ते सारे विधी मुकाट करत होते. पूजा करण्यास देवायतनासमोर बसताना तर त्यांना घेरीच आली. महत्प्रयासाने त्यांनी स्वत:स सावरले. सजदा देताना ज्या शंभू महादेवास आणि आदिशक्ती भवानीस ते आठवत होते ती त्यांची प्राणांहून प्रिय दैवते अकरा वर्षांनंतर त्यांच्यासमोर समूर्त दिसत होती. ते स्वत: स्वहस्ते त्यांची विधिवत पूजा करीत होते. देवतांवर अभिषेकाच्या धारा सुरू होत्या, तर नेताजींच्या डोळ्यांतून अश्रुधारा. अभिषेक सांगणाऱ्या चित्रावशास्त्रींनी एकवार महाराजांकडे सहेतुक पाहिलेसुद्धा, मात्र महाराजांनी खुणेनेच नेताजींची तंद्री भंग न करण्यास सुचविले.
सुप्रतिष्ठित देवतांची उत्तर पूजा व देवकोत्थापन सुरू झाले. हरि: ॐ उत्तिष्ठ ब्रह्मणस्वते देव्यंतस्त्वेमहे उपप्रयन्तु मरुत्त: सुदानेव इंद्र: प्राशुर्भवा सचा… ॐ अभ्यारम् मिददयोनिर्षिक्त पुष्करे मधु:।। अवस्तरय विसर्जने ।। यांतुदेवगणा सर्वे… कित्येक शतकांनंतर महाराजांनी ही क्रांती घडवून आणली होती. तोफांचे आवाज जगाला आणि विशेषत: जुलमी परधर्मी सत्ताधाऱ्यांना गर्जून हेच सांगत होते कारणपरत्वे वा जुलमाने परधर्मात गेलेल्यांचा स्वधर्मात परत येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सावधान!! नेताजींना यज्ञवेदीसमोर बसवून जोशीशास्त्रींनी गोदान, सुवर्णदान, अन्नदानादी विविध दानांचे संकल्प करवून घेतले. नेताजींनी महाराजांच्या पायांवर लोटांगण घातले. दोन्ही खांद्यांना धरून महाराजांनी त्यांना वर उठविले आणि आपल्या हृदयाशी घट्ट कवटाळले. दोघांच्या डोळ्यांतून अविरत अश्रुधारा सुरू झाल्या. नेताजींच्या जुन्या सहकाऱ्यांची, दुय्यमांची छाती भरून आली. सर्व उपस्थितांचे डोळे पाणावले, कंठ अवरुद्ध झाले. मंत्रघोषात त्यांच्यावर मंत्राक्षता उधळण्यासाठी सारा ब्रह्मवृंद हाती अक्षता घेऊन आणि बाकी उपस्थित फुले घेऊन सिद्ध होते पण भरल्या गळ्यातून स्वर उमटणे शक्यच नव्हते. सारे भारल्यागत स्तब्ध होते. सर्वप्रथम गणेशशास्त्रींनी भावनांवर ताबा मिळविला. मुठीतील अक्षता एकमेकांच्या मिठीत उभ्या असलेल्या दोघा अभिन्न हृदयी महावीरांवर हलके हलके उधळीत त्यांनी उच्चरवात आशीर्वाद देण्यास सुरुवात केली.
…बहु देहंचास्तु । दीर्घमायु: । श्रेय: शांति: । पुष्टिस्तुष्टिश्चास्तु । श्रेर्यशो विद्यायविनयावित्तं बहुपुत्रंचायुष्यचास्तु ।। त्यांच्यापाठोपाठ समस्त ब्रह्मवृंदाने आणि प्रेक्षकांत उपस्थित असणाऱ्या ब्राह्मणांनी त्यांच्या सुराला साथ देत टिपेचा स्वर लावला. शांतिरस्तु । पुष्टिरस्तु । तुष्टिरस्तु । बुद्धि रस्तु । अविघ्नमस्तु । आयुष्यमस्तु । आरोग्यमस्तु । शिवंकर्मास्तु । कर्मसमृद्धिरस्तु । धर्मसमृद्धिरस्तु । वेदसमृद्धिरस्तु । शास्त्र समृद्धिरस्तु । शस्त्रसमृद्धिरस्तु । पुत्रसमृद्धिरस्तु । धनधान्यसमृद्धिरस्तु । कोषसमृद्धिरस्तु । इष्टसंपदस्तु । बहिर्देशेसर्वारिष्ट निरसनमस्तु । यत्पापं तत्पतिहतमस्तु । यच्छ्यस्तदस्तु । उत्तरेकर्मण्य अविघ्नमस्तु । उत्तरोत्तरं हरहराभिवृद्धिरस्तु । काले वर्षन्तु पर्जन्य: पृथ्वि: सस्यशालिनी… ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: । आशीर्वचन आणि शांतिपाठ पूर्ण झाला. संपूर्ण मांडवात नीरव शांतता पसरली. महाराजांनी नेताजींना विलग केले आणि त्यांच्या भरल्या डोळ्यांत खोलवर नजर दिली. ती आश्वासक नजर कल्प कल्प सांगून गेली. हीच ती स्नेहाळ नजर जिच्या एका इशाऱ्यासरशी हजारोंनी प्राणांची कुरवंडी दिली. हीच ती करारी नजर जिचा एक क्षेप गनिमांच्या उरात धडकी भरवितो. हीच ती नजर जिच्या एका कटाक्षाने गनिमांच्या टापांखाली तुडविलेली रयत अमृतसिंचन झाल्याप्रमाणे कंबरा कसून पुन्हा उभी राहते. हीच ती नजर जिच्या इशाऱ्यासरशी नेताजींनी या अग्निदिव्यात उडी घेतली आणि हीच ती द्रष्टी नजर जिने नव्हत्याचे होते करून दाखविले. सर्रसर्रर्रर्र आवाजाने शांततेला किंचित तडा गेला. हिरोजी फर्जंदाने आपली तलवार उंच उभारून धरली आणि कंठाची घाटी फुलवत घनघोर गर्जना केली– हर हर हर हर महादेऽऽऽऽव… सरसरून समशेरी म्यानाबाहेर आल्या. उंच उभारल्या गेल्या आणि क्षणही न दवडता प्रतिसाद उमटला–
हर हर महादेऽऽऽव. आई भवानीचा उदेऽ उदेऽ खंडोबाच्या नावानं चांऽऽगभलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असोऽऽऽ महाराजांच्या जयघोषाने अस्मान दुमदुमले. नेताजींच्या खांद्यावर हात ठेवून महाराज मंडपाबाहेर निघाले.
उत्तम प्रकारे सजविलेल्या मांडवात ब्राह्मणांच्या सोवळ्यातील पंगती बसल्या होत्या. पळसाच्या हिरव्याकंच ताज्या पत्रावळींसमोर पांढरीशुभ्र रांगोळी उठून दिसत होती. सर्व शास्त्रीमंडळींच्या पानासमोर समया उजळल्या होत्या. सोंगटीमध्ये चंदनी उदबत्त्या खोचल्या होत्या. त्या चंदनी सुगंधात सुग्रास अन्नाचा आणि पक्वान्नांचा सुवास मिसळून एक वेगळाच सुगंध मांडवात भरून राहिला होता. सोवळेकऱ्यांनी डावे-उजवे वाढप पूर्ण करून महाराजांच्या आदेशासाठी अन्नशुद्धी तेवढी खोळंबून ठेवली होती. महाराज सोयराबाईंसह भोजनमंडपात प्रवेशले. गणेशशास्त्रींनी त्यांच्या हातून ब्राह्मणभोजनासह अन्नदानाचा संकल्प सोडला. उत्साहाने भारलेल्या ब्राह्मणांनी उच्चस्वरात भोजनमंत्र म्हणण्यास सुरुवात केली. ॐ यन्तु नदयो वर्षन्तु पर्जन्य: सुपिप्पला ओषधयो भवन्तु… ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु… ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ।। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल । सीताकान्तस्मरण जयजय राम । पार्वतीपते हर हर महादेवऽऽऽ । जागेवर उभे राहूनच महाराजांनी ब्राह्मणांचा आणि शास्त्रीगणांचा समाचार घेतला. भूदेव, स्वस्थ होऊ द्या. उशीर झाला असेल तर क्षमा करा. अन्नब्रह्माचा मनसोक्त आस्वाद घ्या. यद् यद् रोजते सग्राह्मम् । यद् यद् न रोचते स त्याज्यं ।। जे जे रुचेल, भावेल ते मनसोक्त मागून घ्या. संकोच, अनमान न करता मागून घ्या. मोरोपंत, सर्व ब्राह्मणांस यथायोग्य भोजन दक्षिणा मिळाली ना? निळो सोनदेव आणि अनाजीच्या साहाय्याने काय हवे नको यावर लक्ष ठेवा. येतो आम्ही.
मोठ्या आनंदात ब्राह्मण भोजन सुरू झाले. मोरोपंतांवर तेथील जोखीम सोपवून महाराज सरदार-मानकरी आणि खाशांच्या पंगती असलेल्या मांडवाकडे निघाले. या मांडवाची सजावट जरा अधिकच डौलदार होती. काही खाशांसाठी गिर्द्यांची बैठक आणि त्यावर चौरंग, चांदीच्या थाळ्या असा थाट होता. मानकऱ्यांना कोणाला काशाच्या, तर कोणाला झिलई दिलेल्या पितळी थाळ्या होत्या. मंडळी खास दरबारी पूर्ण पोशाखात पानावर बसली होती. वाढप पूर्ण करून महाराजांसाठीच पंगत खोळंबली होती. ब्राह्मणांच्या पंगतीतून सोयराबाई वाड्यावरच्या भोजनाची तयारी बघायला राजवाड्यात निघून गेल्या. महाराज भोजनमंडपात आल्यावर मंडळींनी उठून ताजीम दिली. हाताची इशारत करून महाराजांनी माणसांना बसते केले. ब्राह्मणांनी भोजन मंत्र म्हटले. हरिनामाचा गजर करून मानकऱ्यांनी भोजनास सुरुवात केली. पंगतीमध्ये हिंडून महाराजांनी सर्वांचा यथास्थित समाचार घेतला. पंगतीची पुढची जबाबदारी हंबीररावांवर सोपवून महाराज येर रयतेच्या पंगतींमध्ये समाचार घेण्यास निघाले.
आपल्या समाचारासाठी महाराज जातीनिशी आलेले पाहून रयतेला मोठा आनंद झाला. इतका की, आपण उष्ट्या हाताने मुजरा रुजू करतो आहोत याचेसुद्धा त्यांना भान राहिले नव्हते. महाराजांच्या जयजयकाराने आणि आई भवानीच्या उदेकाराने वातावरण नुसते दणाणून गेले. दोन्ही हात उभारून महाराजांनी त्यांना शांत केले. पंगतीच्या सर्व रांगांमधून महाराजांनी फेरफटका मारला. कित्येकांची नावानिशी वास्तपुस्त केली. आग्रह करून वाढायला लावले. तोपर्यंत वाड्यावरून पंगतीची वर्दी आली. तेथील व्यवस्था पाहणाऱ्या येसाजींना हवे-नको विचारून आणि आवश्यक त्या सूचना देऊन महाराज तडक वाड्याकडे चालू लागले. - राजवाड्याच्या मुख्य भोजनमहालात कित्येक दिवसांनंतर आज खाशांच्या पंगती बसल्या होत्या. भरदुपारची वेळ असूनसुद्धा महालातील एकूणएक चिरागदाने, हंड्या, झुंबरे लखलखत होती. एकही कोपरा-कोनाडा अंधारात राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती. भिंतींचे सारवण ओले असतानाच महालात धूपाचा धूर पसरल्याने भिंतींनासुद्धा धूपाचा मंद सुगंध येत होता. लग्नकार्यात विहिणीच्या पंगतीचा जो थाटमाट असतो तशा राजस थाटात पंगत सजली होती. प्रत्येक ताटाखाली शिसवी चौरंग, बसायला चांदीच्या फुल्या मारलेले शिसवी पाट, तसाच पाट टेकायला, पानांभोवती नाजूक वेलबुट्टीच्या सुंदर रांगोळ्या. प्रत्येक पानासमोर इतमामाप्रमाणे सोन्याच्या वा चांदीच्या मोठमोठ्या समया, मध्यभागी कनोजी उदबत्त्यांचे घमघमते झाड, महाराज व दोन्ही युवराजांसाठी सोन्याच्या, तर बाकी मानकऱ्यांना चांदीच्या भल्या मोठ्या थाळ्या असा सारा थाट होता. पानांमध्ये पंचपक्वान्ने वाढून तयार होती. पंगतीला फक्त जवळची आप्त मंडळी आणि मोजकेच मानकरी होते. महाराजांच्या उजव्या हातास दोन्ही युवराजांची पाने होती. डाव्या हातास त्या दिवसाची उत्सवमूर्ती नेताजी पालकरांचे पान मांडले होते. पंगतीतील सर्व खासे पूर्ण दरबारी पोशाखात पानांवर बसून महाराजांची वाट पाहत होते.
दोन्ही युवराजांसोबत महाराज भोजनमहालात प्रवेशले. त्याबरोबर दाराशी बसलेल्या वाजंत्र्यांनी सनई-चौघडा सुरू केला. सर्वांनी तडफेने उठून मुजरे घातले. सस्मित मुद्रेने अदब मुजरे स्वीकारीत, सर्वांवरून नजर फिरवीत महाराज पानावर बसले. इशारत होताच पंगत बसली. महाराजांचे कुलोपाध्याय पुढे झाले. त्यांनी संमंत्रक भोजन संकल्प सोडला. सोयराबाईंनी सोन्याच्या झारीतून जातीनिशी अन्नशुद्धी केली. मंडळींनी मोठ्या स्वरात हरिनामाचा गजर केला.
चला मंडळी, स्वस्थ होऊ द्या. आज जवळपास अकरा वर्षांनंतर आमच्यासाठी सणाचा दिवस उजाडला आहे. आज खऱ्या अर्थाने आणि पूर्णांशाने आमचे नेताजीकाका घरी परतले आहेत. आजचा दिवस आम्हासाठी नुसताच अत्यानंदाचा नव्हे तर बालपणापासून थोरले महाराजसाहेब आणि आईसाहेबांसोबत जे स्वप्न पाहिले होते, रोहिडेश्वरी ज्याचा संकल्प केला होता त्याच्या पूर्ततेच्या शुभारंभाचा आहे. करा सुरुवात नेताजीकाका. आज पहिला घास घेण्याचा मान तुमचा. आता असे पानावर बसून डोळे गाळायचे नाहीत. सारी दु:स्वप्ने संपली आहेत. पुढे आपल्यासाठी मोठमोठे मनसुबे योजून ठेवले आहेत. आता समोर वाढलेले पूर्णब्रह्म स्वस्थपणे संपवा. गहिवरलेल्या नेताजींच्या पाठीवर त्यांनी हलकेच थोपटले आणि त्यांना घास घेण्यास सांगितले. त्यानंतर महाराजांनी घास घेताच पुंडलीक वरदेऽऽऽचा गजर झाला आणि भोजन सुरू झाले. सोयराबाई इतर राण्यांच्या मदतीने वाढपावर जातीनिशी लक्ष ठेवून होत्या. महाराज स्वत: आग्रह करकरून वाढायला लावत होते. थट्टामस्करी आणि हास्यविनोदात बराच वेळ पंगत रंगून गेली. खूप वर्षांनंतर महाराज मनापासून जेवल्याचे साऱ्या राणीवशास जाणवले. *पंगत उठली आणि उरलेल्या गप्पा पूर्ण करण्यासाठी मंडळी महाराजांच्या खाशा दिवाणखान्यात पुन्हा एकत्र जमली. दिवेलागणीपर्यंत गप्पा रंगल्या.* *_क्रमश:_*
*________📜🚩

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...