फॉलोअर

शनिवार, ७ मार्च, २०२०

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔ अग्निदिव्य भाग - 26⃣


नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜

अग्निदिव्य

__📜🗡भाग - 2⃣6⃣🚩🗡___

🚩📜🚩___

नर्दुल्लाखान महाबतखानाच्या निसबतीत दाखल झाला. त्याला एक हप्ता होऊन गेला. राजधानीत परत जाण्याचे फर्मान छावणीत दाखल होऊनसुद्धा आता तीन हप्ते उलटून गेले होते. आघाडीवरून कुलीखान काबूलमध्ये दाखल झाला होता पण महाबतखानास परत निघण्यास अवसर मिळत नव्हता. कारण शाही फर्मान सशर्त होते. कुलीखानावर नजर ठेवून राहू शकेल असा विश्वासाचा माणूस अजून त्याला गवसला नव्हता. त्याच्या फौजेतला प्रत्येक माणूस घरी परत जाण्यासाठी त्याच्यापेक्षा दसपट बेताब होता. मागे राहण्याची एकाचीही तयारी नव्हती. कितीही आमिषे दाखविली तरी कोणी बधत नव्हता. कोणावर जबरदस्ती करण्यात अर्थ नव्हता. कारण तो कुलीखानाला सामील व्हायचा आणि त्यांनी मिळून काही कारस्थान शिजविले तर बादशहा गर्दन उडवायचा. पक्वान्नाचे ताट वाढून समोर मांडलेले, पण हात-तोंड बांधलेले असा प्रकार.

विचार पिंजून काढता काढता त्याच्या डोक्यात आले, नर्दुल्लाखानाला विश्वासात घेऊन त्याच्यावर ही जोखीम सोपविली तर? तो नव्याने दाखल झालेला, पूर्वजांची भूमी पाहण्याच्या ओढीने आलेला, ताज्या दमाचा गडी. काही वेडेवाकडे घडले तर सारी बिलामत कुंवर छत्रसालावर उलटविता येणे सहज शक्य होणार होते. फक्त त्याने लिहिलेले पत्र तेवढे नीट बंदोबस्तात जपून ठेवले पाहिजे. बराच उलटसुलट विचार करून त्याने नर्दुल्लाखानाचे नाव आपल्या मनाशी निश्चित केले. या मसलतीत कोणा तिसऱ्याचा सल्ला घेण्यात त्याला जसा कमीपणा वाटत होता तसाच कोणी निष्कारण बभ्रा करण्याचा धोका जाणवत होता.

एकदा मनाशी निर्णय पक्का झाल्यानंतर मात्र त्याने वेळ दवडला नाही. ईशाच्या नमाजानंतर एका गुप्त कामगिरीसाठी भेटीस येण्याचा निरोप त्याने आपला अत्यंत विश्वासू माणूस जलालुद्दीन याच्या हस्ते नर्दुल्लाखानास धाडला. तोसुद्धा त्याप्रमाणे दाखल झाला.

ये नर्दुल्लाखान पठाण. तू एवढ्या लांब आपल्या पूर्वजांचे वतन पाहण्यासाठी, त्या भूमीत काही पराक्रम गाजवावा या ईर्षेपोटी आलास. विश्वासाने आमच्या पदरी राहिलास. पण अफसोस, आम्हाला दार-उल्-सलतनतला वापस बोलावणारे फर्मान छावणीत दाखल झाले आहे; त्यामुळे लवकरच दिल्लीकडे कूच करावे लागणार आहे.

जी जनाबे आली. फौजेत तसा बोलवा आहे. पुरखों का वतन देखनेकी तमन्ना अब कैद हो गयी. आम्हाला मोठी मायूसी आली आहे. हेच जर नशिबी होते तर इतक्या दूर येण्याचा आटापिटा का करायला लावला म्हणून माझे साथी माझ्यावर खफा आहेत. अल्लाची मर्जी.

तुला मायूस होण्याचे कारण नाही. तुझे साथीदारसुद्धा खूश होतील. आम्ही वापस जाताना आमच्या वतीने तुला मागे ठेवून तुझ्यावर खास गुप्त कामगिरी सोपवावी असे आम्हास वाटते. तू तयार आहेस का?

चाणाक्ष नर्दुल्लाखानाच्या आशा पालवल्या. क्षणही वाया न दवडता तो एकदम म्हणाला–

जान हाजिर आहे सरकार.

तू कुंवर छत्रसालचा खास विश्वासाचा माणूस. त्यांचे वालिद आमचे जिगरजान दोस्त; त्यामुळे तुझ्यावर विश्वास ठेवला तर दगा होणार नाही असे माझे मन मला सांगते आहे; त्यामुळे तुझ्यावर नाजूक आणि अवघड कामगिरी सोपवली तर आम्हाला निश्चिंत मनाने घरी परत जाता येईल ऐसी उम्मीद है।

कामगिरी कितीही अवघड असू दे, हुजुरांनी बेशक या गुलामावर सोपवून बेखौफ वापस जावे. खुदा गवाह आहे. पठाणाची जबान कधी खोटी ठरत नाही. आपल्या माघारी आपली संपत्ती सांभाळायची आहे की आपली कोणी हसीन मेहबूबा कोठून सोडवून आणायची आहे?

छे! छे!! यातले काहीच नव्हे. असली नादानी आम्ही कधी करत नाही. तू जनाब महम्मद कुलीखान साहेबांस ओळखतोस?

जी हुजूर, नाव ऐकले आहे. पण प्रत्यक्ष दीदार झाले नाही. पूर्वी मी दख्खनमध्ये असताना चार-दोन वेळा त्यांच्या मराठी फौजेशी बखेडा केला आहे. बडी तेजतर्रार शेरदिल असामी. पण आता जिल्हेसुभानी आलाहजरतांच्या मेहेरबानीने साहेबी इमान पत्करून मुघलिया तख्ताची अत्यंत इमानदारीने सेवा करीत आहेत. आपले नायब म्हणून सध्या आघाडी सांभाळतात. आपल्या माघारी मोहिमेचे सरलष्कर तेच होणार असल्याचे लोक बोलतात. त्यांचे काय?

ते मरगट्टा असताना किती जालिम होते याची तुला पुरती कल्पना आहे?

नर्दुल्लाखानाच्या आशा हातपाय पसरू लागल्या, पण बहिर्जीच्या या बेरकी चेल्याने आपली उत्सुकता जाणवणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेत जवाब दिला.

जी जनाबे आली. शिवाजीराजांचा ते दाहिना हाथ होते. राजांच्या खालोखाल त्यांचा दबदबा आणि रुतबा होता. एवढा खास माणूस दुसऱ्या पक्षाला सामील झाला याचे सर्वांनाच आश्चर्य वाटते.

ते ठीक आहे. आपल्या जिल्हेसुभानी आलाहजरतांनासुद्धा काही थोडा शक आहे याबाबतीत; त्यामुळे त्यांनी त्यांना मान-मरातब, ओहदा, संपत्ती सगळे दिले असले, तरी त्यांच्यावर आलाहजरतांची कडी नजर आहे. माझ्या पश्चात ती तशीच बरकरार ठेवण्याचा हुक्म आम्हाला देण्यात आला आहे. आम्ही तर आता परत जाणार; मघाशी सांगितल्याप्रमाणे तुझ्यावर विसंबून. ही जोखीम तुझ्यावर आम्ही सोपवू शकतो का?

बेलाशक. जान हाजिर है हुजूर. सांगाल तर रोटीची कसम खातो किंवा कुराणे पाकवर हात ठेवतो. ही पठाणाची जुबान आहे हुजूर.

महाबतखानाचे वाक्य पूर्ण होताच नर्दुल्लाखान बोलला. आपले ईप्सित अगदी सहजासहजी साध्य होत असल्याची त्याला खात्री पटली. मात्र त्या बेरकी मराठ्याच्या चेहऱ्यावर त्याचा मागमूस नव्हता. महाबतखानाने दरवाजावरच्या पहारेकऱ्याला बोलावून दूर उभे राहण्यास आणि कोणासही आत न सोडण्यास फरमावले. मग खूण करून नर्दुल्लाखानास जवळ बोलावले. हलक्या आवाजात तो सांगू लागला–

उद्या मी दरबार भरवून जनाब कुलीखान साहेबांना सरलष्करीचे फर्मान आणि खिलत सुपुर्द करणार आहे. त्याच वेळी त्यांचा खास अंगरक्षक म्हणून तुझी तुझ्या दस्त्यासकट नेमणूक जाहीर करीन. दरबारात मी जाहीर करीन की, खुद्द आलाहजरतांनी तुला खास नेमणूक करून पाठवले आहे; त्यामुळे त्या जालिम कुलीखानावर तुझा वचक राहील. तू त्याच्यावर बारीक नजर ठेवून राहा. क्षणभरही दृष्टिआड होऊ देऊ नकोस. त्याला कोण भेटते, तो कोणाशी जरूरतपेक्षा जास्त दोस्ती ठेवतो, सगळे आम्हाला समजले पाहिजे. फौजेतून दररोज डाक दिल्लीला जाते. हप्ता दर हप्ता तुझी डाक त्यात सामील झाली पाहिजे. याबाबत योग्य सूचना आणि हुकूम डाक पाठवणाऱ्या मुन्शीला दिले जातील. या जादा कामाचा तुला योग्य मोबदला आणि इनामसुद्धा मिळेल.

अलीजा उदार आहेत. ते इमानदारीची कदर जाणतात. गुलामाने त्याची फिकीर करण्याची गरज नसते.

मांडीशी ठेवलेली एक जडशी थैली महाबतखानाने समोर फेकली. नर्दुल्लाखानाने ती अचूक झेलली. त्यानेच कुंवर छत्रसालाकडून आणलेली थैली त्याने ओळखली.

ही पेशगी. काम मात्र चोख झाले पाहिजे. तुझी डाक थेट माझ्या नावे आली पाहिजे, सरकारी दफ्तरखान्यात नव्हे. मी कूच केल्या दिवसापासून प्रत्येक घटना डाकेत लिहिली पाहिजे. कुणी साधू, फकीर, बैरागी, मुसाफिर त्याला भेटू पाहील तर त्याची पूर्ण छानबीन झाली पाहिजे. कळवली गेली पाहिजे. मगर याद रहे, या गोष्टीची भनक कोणाला लागता कामा नये. गफलत झाली तर मुलाहिजा राखला जाणार नाही. दगा झाला तर गर्दन जागेवर राहणार नाही. इतकेच नव्हे तर रडण्यासाठी मागे ना रंडकी राहील ना यतीम. समजले?

हुजूर, आपण बेखौफ, बेफिक्र होऊन वतनास जावे. गुलामाकडून कुचराई होणार नाही. खातरजमा ठेवावी. खुदा कसम.

तखलिया।

शब्ब खैर। हुजूर अल्ला हाफिज।

दुसरा दिवस जुम्मा होता. जुम्म्याच्या नमाजानंतर लगेचच महाबतखानाने मोहिमेवर असणाऱ्या हाताखालच्या सरदार आणि मानकऱ्यांचा दरबार भरविला. महम्मद कुलीखानाची सर्फराजी करणारे बादशहाचे पत्र दरबारात जाहीरपणे वाचून दाखविण्यात आले. त्यानंतर त्याला पत्रासोबत आलेला अस्सल अरबी नस्लचा घोडा, पोशाख, रोख रक्कम, सरोपा आणि समशेर बहाल करण्यात आली. मुबारकबादच्या घोषणांनी दरबार दुमदुमला.

त्यानंतर महाबतखानाच्या जागी कुलीखानाची सरलष्कर म्हणून नेमणूक करणारे फर्मान स्वत: महाबतखानाने दरबारास वाचून दाखविले. कुलीखानाने पूर्ण दरबारी इतमामात फर्मानाचा स्वीकार केला. सरलष्करीचे खास मानाचे धनुष्यबाण, शिरपेच आणि शिक्का कट्यार महाबतखानाने नव्या सरलष्कराकडे सुपुर्द केली. त्याला खास शाही खिलत पांघरली गेली. बादशहाने नव्या सरलष्करासाठी पाठविलेल्या रोख एक लाख अश्रफी आणि चांदीच्या अंबारीसह चांदीचा साज चढविलेला हत्ती त्याच्या सुपुर्द करण्यात आला. पुन्हा एकदा मुबारकबादींनी दरबार दुमदुमला.

त्यानंतर नर्दुल्लाखानाच्या नावाचा पुकारा झाला. रुमालाने हात बांधून तो दरबारात पेश झाला. त्याला पाच हजार रुपये रोख, कट्यार आणि पोशाख देण्यात आला. दरबारास समजेना हा नर्दुल्लाखान कोण? त्याचा एवढा मरातब कशासाठी? दरबारात शांतता पसरली. अस्मत अली तर आश्चर्याने वेडाच झाला. महाबतखानाने दरबारास फार काळ अंधारात ठेवले नाही.

सगळ्यांना आश्चर्य वाटलेले पाहून मला आश्चर्य वाटत नाही. कोण हा नर्दुल्लाखान? काय याचे कर्तब? ईमानवालो, तुमचे नवे सरलष्कर जनाबे आली खान-ए-खानान हजरत महम्मद कुलीखान यांचा खास अंगरक्षक म्हणून या नर्दुल्लाखानाची त्याच्या पन्नास स्वारांच्या रिसाल्यासह खुद्द जिल्हेसुभानी आलमपन्हांनी नेमणूक करून पाठवले आहे. आजपासून सरलष्करांच्या जानोमालची जोखीम नर्दुल्लाखान पठाण याच्या खांद्यावर राहील.

महाबतखानाची घोषणा ऐकून अस्मत अली उडालाच. त्याने अल्लाचे मनोमन आभार मानले. नर्दुल्लाखानास परस्पर हाकलून न देता सोबत आणल्याबद्दल त्याने समाधानाचा सुस्कारा सोडला. त्याला हाकलून देता तर बादशहा काय करता कुणास ठाऊक? बादशहा कोणाला कोणत्या रूपात पाठवेल केवळ अतर्क्य!

महाबतखान आता परत जाणार. सारी सूत्रे आणि अधिकार हातात येणार. स्वातंत्र्य मिळणार; त्यामुळे आता सिद्दी आफताबखानाच्या मदतीने स्वराज्यात बहिर्जीशी आणि मग महाराजांशी संपर्क करता येईल. निसटून जाण्याची काही योजना तयार करता येईल या खुशीत असलेल्या कुलीखानाच्या मनोराज्याचे इमले वाळूत बांधलेल्या किल्ल्यासारखे ढासळले. त्याने महत्प्रयासाने आपले दु:ख दाबून चेहऱ्यावर उसन्या आनंदाचे भाव कायम ठेवले आणि पुढच्या कारवाईवर लक्ष केंद्रित केले.

महाबतखानासोबत राजधानीत परत जाणाऱ्या सरदारांची यादी वाचून दाखविली जात होती. त्यानंतर कुलीखानाच्या तैनातीत मागे राहणाऱ्या सरदारांची यादी वाचून दाखविली गेली. कोण जाणार आणि कोण मागे राहणार, छावणीतल्या पार सामान्य खोजालासुद्धा माहीत झाले होते. आता त्याची रीतसर घोषणा झाल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले एवढेच. महाबतखानासोबत दोनतृतीयांशापेक्षा जास्त फौज परत जात होती; त्यामुळे आता मोहीम कशी चालणार हा एक प्रश्नच होता.

महाबतखानाने प्रयाणाचा मुहूर्त जाहीर केला. परतणाऱ्या फौजेतल्या जबाबदाऱ्यांचे वाटप केले. त्यानंतर तो सरलष्कराच्या मसनदीवरून पायउतार झाला. बंदुकींच्या फैरींच्या कडकडाटात आणि नौबतींच्या दणदणाटात नवा सरलष्कर, खान-ए-खानान, शेर-ए-दख्खन, अजीज-ए-शहेनशहा महम्मद कुलीखान मोठ्या मरातबात त्या मसनदीवर बसला. सर्वप्रथम महाबतखानाने त्याला मुजरा करून नजर नजराणे पेश केले. मागोमाग इतर मानकऱ्यांचे मुजरे झडले. नजर नजराणे पेश झाले. नव्या सरलष्कराने परतणाऱ्या फौजेच्या कूच करण्याच्या मुहूर्तास मान्यता जाहीर केली. पहिल्या पडावाचे ठिकाण मुक्रर केले. परत जाणाऱ्या मानकऱ्यांना निरोपाची वस्त्रे आणि विडे दिले गेले. मागे राहणाऱ्या सरदारांच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या. वस्त्रे-शस्त्रे देऊन त्यांचा इस्तकबाल करण्यात आला. अत्तर-गुलाब झाल्यानंतर दरबार बरखास्त झाला.

दरबार आटोपल्यानंतर कुलीखान महाबतखानास आग्रह करून आपल्या मुक्कामावर घेऊन गेला. त्याला निरोपाची मेजवानी होती. सर्व सोपस्कार यथास्थित पार पडले. कुलीखानावर नजर ठेवण्याची चोख व्यवस्था झाली. आता घरी परत जाण्याच्या कल्पनेने महाबतखान मोठा खुशीत होता. दिलखुलासपणे अघळपघळ गप्पा करीत होता. ओघाओघाने कुलीखानाने त्याच्याकडून बरीच माहिती काढून घेतली. अनेक गुप्त मसलती जाणून घेतल्या. आघाडीपासून ते राजधानीपर्यंतच्या संपर्काच्या जाळ्याची माहिती करून घेतली. तो आता सरलष्कर झाला असल्याने ही सारी गुपिते त्याच्यासमोर उघडी करण्यात महाबतखानास काही वावगे वाटत नव्हते. तर त्या दोघांच्या खिदमतीत असलेला आफताबखान सर्व बारकाव्यांची मनात नोंद करून घेत होता.

कुलीखानाने महाबतखानास मोठा अहेर केला. तृप्त मनाने आणि तृप्त पोटाने महाबतखान परत गेला तेव्हा दिवेलागण होण्याच्या बेतात होती. मगरीबची बांग होत होती.

दरबारानंतर नर्दुल्लाखान कुलीखानाची भेट घेण्यास त्याच्या खासगीच्या डेऱ्यात पोहोचला तेव्हा सरलष्कर हजरतांची स्वारी मगरीबचा नमाज पढून यायची होती. एक खिदमतगार चिरागदाने रोशन करीत होता. दुसरा धूपदानमध्ये धूप पाजळत होता. अचानक सिद्दी आफताबखानाची आणि त्याची नजरानजर झाली. आश्चर्यचकित होऊन त्याच्या तोंडातून काही उद्गार बाहेर पडणार तोच आफताबखानाने नजरेनेच त्याला गप्प करीत ‘नंतर भेट’ अशी सूचक नेत्रपल्लवी केली. तेवढ्यात हुजऱ्याने सरलष्कर येत असल्याची ताजीम दिली.

सलाम - दुवा आणि औपचारिक बोलणी आटोपून नर्दुल्लाखानाने इजाजत मागितली. कुलीखानाचे वागणे-बोलणे अत्यंत रूक्ष, तुटक आणि जेवढ्यास तेवढेच होते. ‘बादशहाने खास पाठविलेला माणूस’ म्हणून वास्तविक त्याच्या मनात तिटकाराच उत्पन्न झाला होता. त्याने लगेचच त्याला निरोप दिला आणि सदरेवर हजर होण्याचा हुकूम दिला.

कुलीखानाच्या डेऱ्यात सिद्दी आफताबखानास पाहून नर्दुल्लाखानाच्या आश्चर्यास पारावार राहिला नव्हता. ज्या पद्धतीने त्याने त्याला बोलू न देता गप्प केले, खुणा करून नंतर भेटण्याचा संकेत केला, त्यावरून त्याने तो फितूर नसावा असा तर्क केला. मात्र खात्री पटवून घेतल्याशिवाय त्याच्या मनाला स्वस्थता लाभणार नव्हती. आफताबखानास तो बहिर्जीचा खास नजरबाज म्हणून ओळखत होता. अनेक वर्षांपूर्वी त्याला उत्तरेत मोठ्या जोखमीच्या कामगिरीवर धाडले होते हेसुद्धा तो जाणत होता. मात्र त्याची त्यानंतर कित्येक वर्षांत काहीच खबरबात नसल्याने त्याच्या विश्वासार्हतेबद्दल तो साशंक होता. तो जर फुटला असेल तर सारेच मुसळ केरात जायचे आणि आपण अन् आपले पन्नास साथीदार काही करण्याआधीच गारद व्हायचो; त्यामुळे खात्री पटवून घेणे, तेसुद्धा वेळ न दवडता, निकडीचे होते. काही संशयास्पद वाटलेच तर आफताबखानाला सरळ गारद करून धोका दूर करणे अगत्याचे होते. उलटसुलट विचारांचा कल्लोळ त्याच्या डोक्यात थैमान घालीत होता.

विचाराच्या तंद्रीतच तो कुलीखानाच्या छावणीतून बाहेर पडला. सोबत्यांशी चकार शब्द न बोलता चालत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर दिसणारी व्यग्रता पाहून सोबत्यांनीसुद्धा गप्प राहणेच पसंत केले. छावणीबाहेर थोड्या दूर अंतरावर एका भल्या थोरल्या बदामाच्या झाडाच्या सावलीत उभा राहून पुढे काय असा तो विचार करीत असतानाच सोबतच्या शिपायाने थोड्या दूर अंतरावर तशाच झाडाच्या सावलीकडे त्याचे लक्ष वेधले. अंधारात ठरावीक पद्धतीने चिलमीचा जाळ कमी-जास्त होताना दिसत होता. काही क्षणांत तो अस्फुट उजेड दिसेनासा झाला. भर अंधारात एकमेकांना खुणा करण्याची ही मराठ्यांची खास रीत होती. दुरून कोणाला वाटावे काजवा चमकून गेला. उजेडाच्या दिशेने पुढे जावे किंवा न जावे विचार करीत असतानाच पुन्हा काजवा चमकला.

भाई पेशखान, मघा हुजुरांच्या डेऱ्यात मला सिद्दी आफताबखान दिसला. त्याने नजरेने गप्प करून नंतर भेटण्याची इशारत केली होती. म्हणजे त्याने मला ओळखले आहे. कदाचित आपले कामसुद्धा त्याने जाणले असावे. बहुधा तोच खुणावत आहे. काय करावे? जावे काय? की काही दगाफटका आहे? काही समजेनासे झाले आहे.

सरदार, आफताबखान माझ्या चांगल्याच परिचयाचा आहे. तो पण कामगिरीवरच असावा. येथे रिघाव मिळवण्यात तो कामयाब झाला असावा. नाईकांशी जर त्याचा संपर्क असेल तर आपले काम आसान होईल. त्याने ओळख टाळली नाही. उलट सावध करून नंतर भेटण्याची इशारत दिली. त्यावरून मला तरी दगा जाणवत नाही. एकदा जाऊन बघावेच. त्याने दगा करण्याचा प्रयत्न केल्याचे जाणवले तर… आपण आपल्या कंबरेला तलवारी काय नुसत्या शोभेसाठी वागवतो आहोत?

बिल्कुल दुरुस्त. त्याला पाहिल्यापासून कसे गाठता येईल याचाच मी विचार करीत होतो. त्या विचारातच मी इथे अंधारात उभा आहे. चला भेटूच. काय तो सोक्षमोक्ष तर लागेल. दग्याचा संशय जरी आला तरी साफ कापून काढायचा. दयामाया नाही. थोडी जरी गफलत झाली तरी सगळी मसलतच पाण्यात जायची.

दोघांचे बोलणे सुरू असताना पुन्हा चिलीम चमकली. पेशखानाने घाईघाईने चिलीम शिलगावून प्रतिसाद दिला. पलीकडून ‘तेथेच थांबा, मी आलो’ अशा अर्थाची खूण झाली. अंगाभोवती काळ्या घोंगड्या लपेटलेल्या दोन सावल्या जवळ आल्या. अंधारातून शब्द आले-

सलाम अलेकुम नर्दुल्लाखान. चलो, पीछे पीछे हो लो.

सावल्या चालू लागल्या. तलवारीच्या मुठीवर हात ठेवून नर्दुल्लाखान आणि त्याचे तीन साथीदार एक शब्दही न बोलता सावल्यांच्या मागे चालत निघाले. सावल्या निर्भीडपणे दमदार पावले टाकत जात होत्या. मागून चालणारे मात्र चारी बाजूस नजर फिरवीत अंधारात काही दिसते का याचा अंदाज घेत, कुठल्याही क्षणी तलवारी उपसण्याच्या तयारीत, थोडे दबकतच चालत होते. छावणीपासून दीड कोस चालून गेल्यावर छावणीचा पाणवठा आला. एक मोकळीशी जागा बघून सावल्या थांबल्या. सावल्यांच्या मागे चालणारे पण सावधपणे थांबले. रात्र फार झाली नसली तरी गारठा चांगलाच जाणवत होता. पाणवठ्यावर चिटपाखरू नव्हते. पहाटेपर्यंत कोणी येण्याची शक्यता नव्हती. दीड-दोन फर्लांग दूर तळ्याच्या काठाशी पाणवठा राखणाऱ्या शिपायांच्या चौकीसमोर पेटविलेल्या शेकोटीच्या हलत्या उजेडात होती तेवढीच जाग, बाकी घनदाट अंधार, गारठा आणि सन्नाटा.

आफताबखानाने अंगाभोवती गुंडाळलेले कांबळे दूर केले. कंबरेची चामडी छाजल काढून स्वत: चार घोट पाणी पिऊन त्याने छाजल नर्दुल्लाखानाच्या हातात दिली. पायपीट आणि ताण यामुळे घशाला कोरड पडलीच होती. एकामागे एक सारेच चार-चार घोट पाणी प्यायले. आफताबखानाने एका पसरट खडकावर घोंगडे अंथरले. त्याच्या साथीदाराने त्याचे अनुकरण केले. सहाही असामी घोंगडीवर बसल्या. नर्दुल्लाखान आणि त्याच्या साथीदारांनी सहज काढल्यासारख्या कंबरेच्या तलवारी काढून मांडीवर आडव्या ठेवल्या. तेवढ्या अंधारातसुद्धा नर्दुल्लाखानास आफताबखानाच्या चेहऱ्यावर उमटलेले स्मित दिसले. आफताबखानानेच बोलायला सुरुवात केली.

बसून बोललो तर हालचाल आपसूकच कमी होते. चौकीवरच्या शिपायांना कोणी भालू वगैरे बसलेत असेच वाटेल. आवाज मात्र ताब्यात असू देत. या वातावरणात खूप दूरवरचे स्पष्ट ऐकू येते.

आफताबखान ज्या सहजतेने वावरत होता, अंधारातसुद्धा नेमक्या जागी पोहोचला होता, त्यावरून तो परिसर त्याच्या पायाखालचा असावा अन् त्या ठिकाणी तो वारंवार येत असावा असे नर्दुल्लाखानास जाणवले. तो उघडपणे दबक्या आवाजात एवढेच म्हणाला-

दुरुस्त है। सर्वांनीच हे ध्यानात ठेवा.

नर्दुल्लाखान! तुला प्रत्यक्ष पाहिले, माझ्या जिवात जीव आला. मी दिल्ली सोडली तेव्हा मला सांगण्यात आले होते की, अंगरक्षकांची एक तुकडी पाठवली जाणार आहे. मी वाटच पाहत होतो. तू येथवर सुखरूप येऊन पोहोचलास त्याबद्दल मला अल्लाचे आभार मानू देत, कारण ते किती अवघड आहे हे माझ्याइतके दुसरे कोणीच जाणू शकणार नाही.

कशावरून मी महाराजांच्या कामगिरीवर आलो आहे? कशावरून मी दरबारात जाहीर झाले त्याप्रमाणे बादशहाच्या कामगिरीवर नाही? तू आता तुझे खरे स्वरूप माझ्यासमोर बेधडक उघड केलेस. कशावरून मी तुझी चुगली महाबतखानाकडे करणार नाही?

आफताबखान हसला. नर्दुल्लाखानाच्या मांडीवर हलकेच थाप मारून म्हणाला–

खरा मराठा हेर शोभलास. भाईजान, पैशाच्या मोहाने कोणी महाराजांना सोडून मोगलांनाच मिळाला तर तो स्वत:हून एवढ्या दूर अशा विराण मुलखात कामगिरीवर येणार नाही. तर जिथे खाण्यापिण्याची चंगळ असेल, भरपूर लुटालूट करता येईल अशा मुलखातल्या मोहिमेत शरीक होईल. अशा अवघड ठिकाणी येण्यासाठी कोणी शिफारसपत्र घेऊन येत नाही, तर नशिबाला दोष देत येतो. मीसुद्धा बहिर्जी नाईकांच्या तालमीत काही वर्षे काढली आहेत. सहजासहजी फितूर होऊ शकणाऱ्यांची त्यांच्या निसबतीत भरती होत नसते, याची मला पूर्ण खात्री आहे.

अरे! जिथे खुद्द सरनोबत गनिमाला सामील होतो, तिथे सामान्य नजरबाजाची काय कथा?

अशा वेळी सर्वप्रथम तो डाव्या अंगठ्यातील अंगठी काढून फेकून देईल.

मोठ्याने हसण्यासाठी नर्दुल्लाखानाने तोंड उघडले, पण आफताबखानाने झटक्यासरशी त्याचे तोंड दाबले. बसल्या बसल्याच दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले. मग तिथपर्यंत पोहोचण्याच्या चित्तरकथांची देवाणघेवाण झाली. बराच वेळ बोलणे झाले. अखेर आफताबखान म्हणाला–

आता जनाब महाबतखान परत जाणार. आता यापुढे थोडा मोकळा श्वास घेता येईल. तूसुद्धा सोबतीला आलास, काही करता येईल का बघायचे.

वेडे साहस करायचे नाही अशी स्वत: महाराजांची सख्त ताकीद आहे. थोडा अधिक-उणा काळवेळ लागला तरी हरकत नाही. पण सरनोबतांच्या जिवाला अपाय होता कामा नये. ते छावणीतून नाहीसे झाल्याचे उघड होईल त्या वेळी मोठा गहजब उडेल. महाराज आग्र्यातून निसटले त्यावेळचा प्रवास त्या मानाने सोपा झाला. कारण नाईकांनी तसा चोख बंदोबस्त वाटभर ठेवला होता. या खेपेस पल्ला जास्त दूरचा आणि अवघड आहे. दिल्लीत पोहोचेपर्यंत बाहेरून कुठलीच मदत मिळण्याची आशा नाही. त्याउपर खुद्द दिल्लीत वा दिल्लीच्या गिर्दपेशात पोहोचणे म्हणजे धोकाच पत्करणे. दिल्ली टाळायची तर रस्ता राजपुताना आणि कच्छच्या वाळवंटामधून जातो. ते वाळवंट पार करून जाणे गंमत नाही. योग्य आणि विश्वासू वाटाड्या मिळाल्याशिवाय वाळवंटात पाऊल घालणे म्हणजे स्वत:ला घारी-गिधाडांच्या स्वाधीन करून घेणे ठरेल. शिवाय मागचा अनुभव गाठीस असल्याने बादशहा चौक्या जास्त सावध ठेवील. मी येताना जे पाहत आलो आणि ऐकत आलो त्यावरून असे दिसते की, स्वराज्याच्या सीमांवरील प्रत्येक चौकी आणि ठाणे या क्षणीसुद्धा सावध आहे. कडक तपासणी आणि चौकशीतून फकीर-बैरागीसुद्धा सुटत नाहीत. जे करायचे ते नीट ठरवून, पूर्ण विचार करून, योजना आखून आणि स्वराज्याशी संधान साधूनच करायचे, अशी निघण्यापूर्वी मला महाराजांनी जातीनिशी आज्ञा केली आहे. आपल्याकडे मोजकाच पैका आहे. सरनोबतांना सांगून मोगली खजिन्यातूनच तजवीज करावी लागेल.

मी एक विचार केला आहे. आपली गलबते जर मकरान किंवा कराचीच्या किनाऱ्यावर आणवता आली तर त्यात बसून स्वराज्यात जाणे खुश्कीच्या मार्गापेक्षा सोपे असेल. पण इतक्या दूर महाराजांशी संधान साधून गलबते आणवावी कशी, हाच मोठा प्रश्न आहे.

असू दे. आजच्या आज ते ठरवण्याची घाई नाही. दिल्लीत आणि आग्र्यात आपले सावकार संधान बांधून आहेत. बऱ्याच वर्षांत तुझ्या बायकोला तुझी खबर खैरियत नाही. कोणाच्या तरी हातून तिला पत्र पाठवून दे. आपले सावकार जरूर तिला पत्र पोहोचवण्याची व्यवस्था करतील. असो. आपल्याला उघडपणे फार जास्त संबंध ठेवणे सध्या तरी कठीण आहे. जरी आपण दोघे बादशहासाठी हेरगिरी करीत असलो तरी याचे भान बाळगावेच लागेल.

होय. हे तर खरेच. बायकोला पत्र पाठवायचे माझ्या डोक्यात आलेच नाही. बरे झाले तू आठवण करून दिलीस. चला, निघू या. सरनोबतांची रात्रीच्या जेवणाची वेळ होत आली आहे.

प्रथम नर्दुल्लाखान आणि त्याचे साथीदार उठून गेले. मध्ये काही वेळ गेल्यानंतर आफताबखान आणि त्याचा सोबती उठले. जरा लांबचा वळसा घालून ते पाणवठ्यावर पोहोचले. सोबत असलेल्या घागरी ताज्या पाण्याने भरून घेतल्या. परतीच्या वाटेवर दरोग्याने हटकले-

क्यों? इतक्या रात्री पाणी भरायला? वेडबीड लागलंय की काय? अरे! थोड्या वेळापूर्वीच त्या बाजूला एक अस्वलांचा झुंड बसला होता. नशीब, ते इकडे वळले नाहीत. जरा सांभाळून परत जा.

काय करणार दरोगासाब, नेमकी हुजुरांच्या पिण्याच्या पाण्यात छिपकली पडली. सारे पाणी फेकून द्यावे लागले. दुपारी दावत झाली; त्यामुळे तेवढेच पाणी होते. आता हुजुरांची दस्तरखानची वेळ होत आली; त्यामुळे अशा थंडीत अवेळी पाण्यावर यावे लागले. जवळपास अस्वले आहेत असे म्हणता, मग जरा दोन शिपायांना सोबतीला द्या ना. डोक्यावर हंडे घेऊन तलवारी चालवणे मुश्कील आहे.

दोन शिपायांची सोबत घेऊन आफताबखान राजरोसपणे छावणीत परत आला.

-

महाबतखानाची फौज काबूल सोडून रवाना झाली. निरोप देण्यासाठी कुलीखान दोन मजलांपर्यंत गेला होता. परत आल्यावर तीन-चार दिवसांतच त्याने आपला मुक्काम छावणीतून महाबतखान राहत होता त्या हवेलीत हलविला. आता त्याला आघाडीवर धावपळ करण्याची गरज उरली नव्हती. तोसुद्धा काबूलमध्ये राहूनच सैन्याच्या हालचाली करवून घेणार होता. बहुतेक फौज परत गेल्याने मोहीम थंडावल्यातच जमा होती. जेवढे हाती आले होते तेवढे राखून ठेवणे इतकेच त्या तुटपुंज्या फौजेकडून शक्य होणार होते. नवी ताज्या दमाची कुमक आल्याशिवाय पुढचे आक्रमण हाती घेणे शक्य नव्हते.

महाबतखान परत गेला त्याला दोन आठवडे उलटले. कुलीखान आज सरलष्कर म्हणून पहिल्यांदाच दरबार भरविणार होता. आपल्या महालात, दरबारात जाण्यासाठी पोशाख करीत होता. आफताबखान कमरबंद आवळण्यास मदत करीत होता. गिरकी घेत तो कुलीखानाजवळ पोहोचला. आणि कमरबंदाचा शेव खोचता खोचता हळूच पुटपुटला-

सरकार, नर्दुल्लाखान घरचा माणूस आहे.

चमकून कुलीखानाने त्याच्या तोंडाकडे पाहिले.

कशावरून?

कंबरेला कट्यार खोचत, तलवार बांधत तो पुन्हा फुसफुसला-

मी त्याला ओळखतो. आम्ही काही कामगिऱ्या एकत्र केल्यात. तो पहिल्यांदा आपल्याला भेटून गेल्यानंतर लगेचच मी त्याची गाठ घेतली. बोलणे झाले. त्याला बादशहाने नव्हे, तर महाराजांनी धाडलंय. कुणी छत्रसाल म्हणून बुंदेला राजकुमार आहे, त्याचे शिफारसपत्र घेऊन आला आणि जनाब महाबतखान हुजुरांकडे रुजू झाला. मोठ्या हिकमतीने त्यांचा विश्वास मिळवला आणि आपल्या सेवेत दाखल झाला. बादशहाचा खास माणूस हा त्यांनीच उभा केलेला देखावा आहे. निव्वळ नाटक. त्यांना त्यांच्या माघारी आपल्यावर नजर ठेवण्यासाठी माणूस गवसत नव्हता. हा पठ्ठ्या आपल्या पायांनी चालत नेमका त्यांच्याकडे पोहोचला. हुजुरांनी गोड बोलून त्याला बरोबर ‘आपल्या जाळ्यात’ ओढला. अनायासे आपले काम झाले. अल्लाची मोठी मेहेरबानीच झाली. खात्री पटवून घ्यायची असेल तर सरकार, त्याच्या डाव्या हातातली अंगठी बघा.

कुलीखान दिवाणावर बसला. त्याने क्षणभरासाठी डोळे मिटून घेतले. मग हलकेच पुटपुटला-

काय सांगतोस? खरंच? महाराज, महाराज, धन्य आहे तुमची. एका क्षुद्र सेवकासाठी केवढी ही यातायात. सगळा ताप, त्रास, मनस्ताप, क्लेश, कष्ट, दु:ख भरून पावलो. महाराज, कातड्याचे जोडे करून आपल्या पायी घातले तरी हे ऋण फिटायचे नाही.

सरकार, डोळे पुसा. कोणाला संशय यायचा. पण सरकार, तुम्ही स्वत: त्याच्याशी काही बोलू नका. त्याची ओळख पटली हे त्याला इतक्यात तरी जाणवू देऊ नका. काही लागले सवरले, तर मीच बोलेन त्याच्याशी.

दोन-तीन आठवडे उलटले. एक दिवस दिवेलागणीच्या सुमारास कुलीखान त्याला पुन्हा म्हणाला-

आफताब, आता काहीतरी हालचाल केली पाहिजे. इथून परत जाण्याची काहीतरी तजवीज करण्याच्या मागे लागा. आता मैदान साफ आहे.

माफी सरकार, पण जल्दबाजी नको. महाराजांची पण तशीच ताकीद आहे. नजरकैद उठली, ‘नजर ठेवणारा’ आपलाच माणूस हे जरी खरे असले तरी भोवतालची फौज गनिमाचीच आहे. त्यातल्या कुणाला काय गुप्त हुकूम आहे, कळायला मार्ग नाही. साधा संशय आला तरी जेरबंद करतील. कदाचित ठारसुद्धा मारतील. पल्ला फारच लांबचा. सारा मुलूख गनिमाचा. ठायी ठायी चौक्या, नाकी, ठाणी. किती चुकविणार? वाटेत काही मुक्काम तरी खात्रीचे आणि सुरक्षित पाहिजेत. त्यासाठी संपर्काची साखळी आणि तजविजीची व्यवस्था सुरू आहे. नर्दुल्लाखान येऊन पोहोचला याचा अर्थ महाराज त्याच प्रयत्नात असणार. मुस्तकीम व्यवस्था झाली की, महाराज संदेश पाठवतील. तोपर्यंत कळ काढली पाहिजे. सरकार मी तर जवळपास कफल्लकच आहे. नर्दुल्लाखानाकडे पण तुटपुंजाच पैका आहे. एवढ्या मोठ्या प्रवासात पैका पाण्यासारखा खर्च व्हायचा. आपण पैका उभा करण्याच्या तजविजीला लागा. जमा होणारा ऐवज हिरे, मोती, रत्ने, सोने असा कोणत्याही क्षणी उचलता येईल अशा पद्धतीने तयार ठेवा. सध्या आपण तेवढेच करू शकतो.

दीर्घ उसासा टाकीत कुलीखानाने खांदे उडविले आणि तो दरबारात जाण्यासाठी महालातून बाहेर पडला.

क्रमश:

*____📜🚩

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...