फॉलोअर

शनिवार, ७ मार्च, २०२०

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔ अग्निदिव्य भाग - 27⃣


नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜

अग्निदिव्य

__📜🗡
भाग - 2⃣7⃣🚩🗡___

🚩📜🚩___

महालाच्या खिडकीत उभे राहून महाराज कोणाची तरी वाट पाहत होते. महालात एकच समई तेवत होती. तिच्या अपुऱ्या प्रकाशातील हलत्या सावल्यांमुळे अंधार अधिकच दाटल्यासारखा वाटत होता. भिंतीतला चोरदरवाजा करकरला. महाराजांनी दिंडी उघडून बहिर्जीला आत घेतले. मुजरा घालून तो आसनासमोर उभा राहिला. पलंगावर टेकत महाराजांनी अधीरतेने पुसले-

नर्दुल्लाची काय खबर बहिर्जी?

म्हाराज, नर्दुल्लाखानानं नबाब अस्मत अलीच्या फौजंत लई हिकमतीनं रिघाव मिळवला, आन थेट काबूलला पोहोचला. कुंवर छत्रसालजींची शिफारस व्हतीच. मंग म्हाबतखानाकडं शिरकाव अवघड ग्येला न्हाई. पठ्ठ्यानं काय जादू क्येली न कळे पर लगेचच त्येचा इस्वास बी कमावला. म्हाबतखान दिल्लीत परत आला तवा येताना त्येनं आपल्या खास इस्वासाचा मानूस म्हनून त्येला सरनोबतांवर नदर ठेवन्यासाटी मागं ठेवलाया. अक्षी त्येंचा खास आंगरक्षक म्हनून. तवा आपल्याला साधायचं व्हतं त्ये अनायसचं साधलं.

आई भवानीची कृपा. आता पुढे? त्याच्याशी संपर्क ठेवण्यासाठी माणसे धाडलीत का? नेताजीकाकांनी परत येण्याची कोशिश केली तर त्यांना विश्वासाचे वाटाडे, खात्रीचे मुक्काम अशी सगळी सोय पुरवावी लागेल. त्याच्या तजविजीचे काय योजलेत?

म्हाराज, पल्ला लई मोटा. अवघा मुलुक गनिमाचा. पंजाबी सुब्यात तर गुलामी पार रक्तात भिनलिया, इथवर की त्ये लोक द्येवाला बी अरबितल्यावानी रब्ब म्हनत्याती. त्येंच्यात हल्ली कोनी येक गोविंदसिंह नावानं गुरू पैदा झालाया. त्येनं गुरू नानकांच्या शिकवनुकीतून खालसा पंथ तयार क्येलाया. यवनांशी लई कडवी झुंजतात त्येची मानसं. त्येंची थोडीफार मदत व्हते. पर तेवडीच. ती बी अटकेपोतुरच सीमित हाय. अटक वलांडून जायास कोनी धजावत न्हाई. तरी चार-सहा फकिरांची आपली योक टोळी पेशावरपोतुर पोहोचलिया. पर अजून त्येंना खैबर वलांडता आलेली न्हाई. मोगली ठाणेदार लष्करी परवाना असल्याबिगर कोनाला बी खैबरच्या आसपास फिरकू द्येत न्हाईत. शेवटची खबर आली तवा आपली मानसं घाटातल्या आडवाटा शोधन्याची कोशिश करीत व्हती. सरनोबत निसटले, तरी त्येंना खैबर पार करून, अटक वलांडून पंजाबी सुब्यात उतरेपोतुर आपल्यास्नी काय बी करनं दुरापास्तच हाय.

मग काय दैवावर हवाला ठेवून, हातावर हात धरून बसून राहायचे की काय?

तसं कसं म्हाराज. कोशिश तर जारी हायच. पान्यागत पैका खर्च व्हतुया. आतावरी शे-दीडशे मानसं खर्ची पडलियात. पैक्याची काय बी चिंता न्हाई. तिथल्याच अंमलदारास्नी लुटून आमी पैका उभा करितो. पर लाख लाख मोलाचा योक योक मानूस जवा खर्ची पडतो त्ये लुकसान भरून निगत न्हाई तेवडीच काळजी.

पन्हाळ्यावर एका मुठीने हजार माणूस गमावला. पुरंदरावर, घोडखिंडीत, किती माणसे? झुंजात किती माणसे गेली याचा हिशेब मांडायचे म्हटले तर स्वराज्याचा हा खटाटोप गुंडाळून ठेवून काशीस जाऊन राहणेच बरे.

मापी असावी मायबाप. पर लडाई वायली. ही झुंज वायली. म्हाराजांनी असा त्रागा करून घिऊ नये. आपन साहेबकामी खर्ची पडलो हेचा परतेक जानाऱ्याला मोटा अबिमानच असतोया. सवाल येतो, त्येच्या जागी त्याच तोलामोलाचा आन इस्वासाचा असामी नेमताना.

महाराजांनी एक दीर्घ नि:श्वास सोडला. थोडा वेळ तसेच स्तब्ध बसून राहिले.

मग? आता पुढे?

योक मसलत हाय डोक्यात. दोन-अडीच हजार कोसांचा मोगली मुलुक तुडवत येन्यापरीस काही येगळी वाट सोधली तर कसं?

वेगळी वाट? ती कुठली? हनुमंतासारखे त्यांनी आकाशातून उडत यावे की काय? का तुम्हीच कोणा बिभीषणाकडून पुष्पक विमान मिळवण्याचा घाट घालता आहात?

काय च्येष्टा करता म्हाराज गुलामाची. हवेतून न्हाय पर पान्यातून येयाची वाट काडता ईल की.

मतलब?

आपलं सोराज्याचं आरमार हायच. त्याउपर राजापूर आनि सुरतेच्या व्यापाऱ्यांचा आपला लई चांगला संबंध जुळलाया. त्येंचा इरान-अरबस्तानाशी वेपार चालतुया. त्येंच्या मदतीनं आपुन आपली गलबत इरानच्या मकरान बंदरापोतुर किंवा सिंधमधी कराचीपोतुर न्हेऊ शकतो. मकरान तर अफगाणिस्तानच्या सरहद्दीला खेटूनच हाय. काय तरी हिकमत करून सरनोबतांनी मकरान गाठावं. तितं आपल्या गलबतावर चढून थ्येट सोराज्यात! न्हाई चौक्या, न्हाई ठानी, न्हाय पाटलागाचं भेव की फितुराहातून धरला जान्याचा घोर. येकदा सिंध वलांडला, द्वारका येरावळ जवळ आलं की गलबतांवर बेलाशक भगवी निशानं फडकवायची. कुनाची माय व्यालिया, भर दर्यात मराठी आरमाराला धका लावायची?

बहिर्जी बोलायचा थांबला. महाराज काही न बोलता समईच्या ज्योतीकडे एकटक पाहत राहिले. जणू त्यांचे ध्यान लागले. बऱ्याच उशिराने बहिर्जी किंचित खाकरला.

व्वा! नाईक, बनाव तर मोठा नामी आखलात. आमच्या डोळ्यांसमोर हे सारे कसे काय घडेल याचाच दृश्यपट उमटत होता. व्वा! तुमच्यासारखी एकापेक्षा एक हिकमती माणसे आमच्यासोबत आहेत म्हणून तर आम्ही प्रत्येक संकटावर मात करून पुन्हा उभे राहतो. नाईक, केवळ या कल्पनेसाठी तुमच्या हाती शेरभर सोन्याचा तोडा चढवावा. तेवढे मोल आहेच या हिकमतीचे.

सेवकावर धन्याची मेरनजर कायम असतिया; म्हनून तर सेवकांना हुरूप येतो. पर म्हाराज ह्यो बनाव माजा न्हाई. आपन सिद्दी हिलालच्या निसबतीचा जो शिपाई नजरबाज म्हनून, सरनोबत आदबखान्यात असताना त्येंच्याकडं संदेश देऊन धाडला व्हता, त्योच आता त्येंचा खिदमतगार शागिर्द बनून छावणीत ऱ्हायलाय. सरनोबतांचा खास शागिर्द झालाया. पठ्ठ्यानं परिस्थितीचा आन परिसराचा दांडगा अब्यास केलाया. ह्यो बनाव त्याच्याच डोक्याची करामत. म्हाबतखानाच्या फौजेसोबत परतलेल्या येका वेपाऱ्याच्या हातून त्येनं दिल्लीतल्या आपल्या शेट झमटमल मारवाड्याकडं कागुद धाडला. त्येच्यात समदा बनाव इगतवारीनं लिवला हाय. द्येवाची कृपा, मधी कागद धरला ग्येला न्हाय.

अरे व्वा! हे तर खूपच छान. आता प्रत्येक शिपाई प्यादासुद्धा स्वराज्याच्या हिताच्या योजना आखू लागला आहे. परिस्थिती जेवढी प्रतिकूल तेवढी यांची डोकी उत्तम विचार करतात. आमच्या पश्चात स्वराज्याचे काय होईल याची आता चिंता राहिली नाही. खुद्द आलमगीर जरी दख्खनेत उतरला तरी आमचे हे पेटून उठलेले सर्वसामान्य शिपाई प्यादे त्याला गाडून टाकल्याशिवाय राहणार नाहीत. मग आम्ही असलो काय किंवा नसलो काय, काही फरक पडणार नाही. काय नाव काय त्या बहाद्दराचे?

सिद्दी आफताबखान. मूळ सिद्दी हिलालच्या निसबतीचा. अत्यंत भरवसेमंद नजरबाज हाय. सोपवलेली कामगिरी संपली तरी आपली अक्कल वापरून सरनोबतांच्या खिदमतीत थ्येट काबूलपोतुर पोहोचलाया.

योजना पार पडेल न पडेल. होईल ते ईश्वराधीन पण स्वतंत्र बुद्धीने असा विचार करणाऱ्या माणसांना प्रोत्साहन देऊन त्यांची कदर ही झालीच पाहिजे. तो जेव्हा केव्हा परत येईल तेव्हा आम्हाला या प्रसंगाची याद द्या. तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे आम्ही शेरभर सोन्याचा तोडा त्याच्या हाती चढवू. ही योजना आम्हाला मंजूर असल्याचा कौल त्याला कळवा. यावर अंमल कसा करता येईल या दृष्टीने कामाला लागा.

जी म्हाराज.

बरे. नेताजीकाका अफगाण मोहिमेचे सरसेनापती झाले हे तुम्ही आम्हाला कळवले नाही.

मापी म्हाराज; पर येवडी जगजाहीर गोस्ट काय आपल्यापासून लपून ऱ्हानार न्हाय म्हनून येगळी खबर धाडली न्हाई.

एकच खबर दहादा ऐकली म्हणून काही अजीर्ण होत नाही. खबर बाहेरून समजणे आणि तुमच्याकडून येणे यातला फरक आम्ही तुम्हाला वेगळा सांगण्याची गरज असू नये.

अशी गफलत पुन्यांदा घडायची न्हाई म्हाराज.

ठीक आहे. सरखेल, मायनाक भंडारी आणि इब्राहिम खान यांच्याशी मसलत करा. आपली गलबते इतका दूरचा पल्ला गाठून सुखरूप माघारी परतू शकतील का? याचा अदमास घ्या आणि आम्हास कळवा. नसल्यास तशी गलबते बांधून घ्यावी लागतील. पण त्यात वेळ जाईल. निकड पडल्यास टोपीवाल्यांकडून हस्तगत करावी लागतील. त्याची बित्तंबातमीसुद्धा तयार ठेवा. पुरता अदमास आला की सरखेलांना आमच्या भेटीस धाडा. या मसलतीत कोण व्यापारी काय मदतीस येतील नीट जोखून घ्या. उद्या प्रधान मंडळासोबत खलबतखान्यात पेश व्हा. आमच्या हुकमाशिवाय गड सोडू नका. या आता. गड सोडण्यापूर्वी नेताजीकाकांकडे संदेश कसा धाडावा याचे हुकूम घेऊन जा.

मुजरा करून बहिर्जी आल्यावाटेने अदृश्य झाला. महाराजांनी पलंगावर अंग टाकले तेव्हा पहिल्या कोंबड्याने बांग दिली. आणि डोळे मिटताक्षणी महाराजांना गाढ झोप लागली.

-

कासवाच्या चालीने दिवस सरकत होते. काहीच घडत नव्हते. पुरेशी कुमक आणि खजिना हाताशी नसल्याने मोहीम नावालाच राहिली होती. काही घडत नव्हते तरी नर्दुल्लाखानाची डाक नियमित जात होती. त्यात अनेक तथाकथित चुगल्या-चहाड्या असत. त्याचप्रमाणे कुलीखानाच्या धर्मनिष्ठेचे, न्यायीपणाचे, शौर्याचे वर्णन करणाऱ्या खऱ्याखोट्या किश्शांचे भले मोठे चऱ्हाट असे. नुसतेच एरंडाचे गुऱ्हाळ. ना रस; ना चोथा!

वर्ष उलटले. नवी कुमक आणि खजिना न आल्याने कुलीखानाच्या आशा पालवल्या. त्याने मोहीम गुंडाळून परत फिरण्याची परवानगी मागणारा अर्ज दरबारास पाठविला. सहा महिने उलटून गेले तरी बादशहाने त्याला उत्तर धाडले नाही. बादशहाच्या मनाचा थांग लागत नव्हता.

याच दरम्यान आपल्या पन्नास-साठ चेल्यांना घेऊन खुश्कीच्या मार्गाने हज पढण्यासाठी निघालेला एक अवलिया काबूलमध्ये येऊन थडकला. त्याचा थाटमाट आणि मिजास एखाद्या जहागीरदारापेक्षासुद्धा वरचढ होती. चेल्याचपाट्यांसोबत त्याचा शागिर्दपेशा आणि उंट-घोड्यांचा पागा भला जंगी होता. एवढा मोठा अवलिया हजच्या वाटेवर अनायासे आपल्या जवळपास आला आहे, तर त्याचा योग्य सन्मान करावा असा सोबतच्या सरदारांचा आग्रह पडला. कंटाळवाण्या आळसावलेल्या दिनक्रमात तेवढाच विरंगुळा! सरलष्कराच्या दरबारात अवलियाला मोठ्या सन्मानाने पाचारण केले गेले. रोख रक्कम, पोशाख, घोडा वगैरे देऊन त्याचा यथोचित सत्कार झाला. गडी अगदी खूश होऊन गेला. पेशावर सोडल्यापासून बिचाऱ्याची कोणी दखल घेतली नव्हती. त्याने कुलीखानाला तोंडभरून आशीर्वाद दिले. दुवा देत तो म्हणाला–

बेटा, तुझा सारा इतिहास मला स्पष्ट दिसतो आहे. हमखास नरकात जाणारा गलत रस्ता तू सोडलास आणि तुला अल्लाच्या नेक रस्त्यावर येण्याची बुद्धी झाली. याचाच अर्थ, त्या परवरदिगारे आलम अल्लातालाची तुझ्यावर मोठी कृपा झाली आहे. त्या रहिमाने रहीमच्या प्रेरणेने आलाहजरत बादशहा तुझ्यावर खूश आहेत. तू आपले इमान राखून त्यांच्यासाठी अल्लाचे पाक साम्राज्य वाढव, तुला कशाचीच कमतरता पडणार नाही. अल्लावर, आपल्या सत्कर्मावर आणि बादशहावर निष्ठा ठेव, तुला तुझे ईप्सित मिळाल्याशिवाय राहणार नाही. हजच्या काळात रसुलेपाक सलल्लाह वसल्लमच्या मजारेपाकवर दुवा मागताना आणि काबाशरीफची तवाक करताना मी तुझ्यासाठी, तुझ्या कामयाबीसाठी खास प्रार्थना करीन. बेटा, सरकारी खजिन्यातून तू मला माझ्या पवित्र प्रवासासाठी भरभक्कम मदत दिली आहेसच पण मला तुझ्या स्वत:कडूनसुद्धा काही हवे आहे. परवा रात्री मी तुझ्या दौलतखान्यावर जेवणासाठी येईन म्हणतो. त्या वेळी मी माझी इच्छा जाहीर करीन.

खुशामदीन. आपल्यासारखा हजच्या पवित्र राहवर निघालेला राहगीर माझ्यासारख्या दीनाचा हम नेवाला झाला, आपल्यासारख्या अल्लाच्या नेक बंद्याची पायधूळ माझ्या गरीबखान्याला लागली हे माझे परमभाग्य. आपण जरूर यावे. आपली इच्छा पूर्ण करण्यात मला मोठा आनंद वाटेल. इतकेच नव्हे तर माझ्या फौजेतील प्रत्येक मानकरी आणि अगदी शिपाईसुद्धा तुमच्या ईश्वरी कार्यासाठी यथाशक्ति दान देतील.

हरतऱ्हेचे चविष्ट पदार्थ आणि मेवे-मिठाया खायला घालून कुलीखानाने मौलाना घियासुद्दीनला पुरते तृप्त करून सोडले. त्याचे चेलेचपाटे शेजारच्या दालनात मेजवानीवर आडवा हात मारण्यात मश्गूल होते. जेवण झाले. दोघे मसनदीवर गप्पा मारीत बसले. आफताबखान काही किरकोळ कामे काढीत तेथेच रेंगाळत राहिला. गप्पांच्या ओघात कुलीखानाने सहजच विचारले–

मौलाना, सामान्यपणे हिंदोस्तानातून हज पढण्यासाठी जाणारे हाजी सुरतेतून गलबताने जातात. आपण एवढा लांबचा वळसा घेऊन खुश्कीने कसे काय निघालात?

बेटा, दर्यातून गेलो तर जौळाचा-तुफानाचा धोका होऊ शकतो.

खुश्कीच्या रस्त्यावर धोके काय कमी असतात? चोर, दरोडेखोर, भामटे, लुटारू, जंगली जनावरे, अडचणीच्या वाटा-घाटवाटा, नद्या-नाले, त्याशिवाय परवाने, दस्तावेजांची झंझट, चौकश्या, तपास, तो प्रवाससुद्धा काही फारसा सुखाचा म्हणता येणार नाही. धोक्यापासून मुक्त म्हणवणार नाही.

मौलाना घियासुद्दीन बराच वेळ कुलीखानाच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत राहिला. मग काही वेळ तो तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत डोळे मिटून बसला.

काय झाले मौलाना? मी काही चुकीचे किंवा तुमच्या मनाला दु:ख होईल असे काही बोललो का?

नहीं बेटा नहीं, ऐसी कोई बात नहीं. तू कधीच चुकीचे बोलत नाहीस. चुकीचे वागत नाहीस. तुझा सवाल रास्त आहे. खुश्कीच्या रस्त्यावर अनेक धोके आहेत. त्या रस्त्यावर भेटतात ती गिधाडांपेक्षा, जंगली जनावरांपेक्षाही वाईट माणसे! जिवावर उठलेली. केवळ त्यांचा थोडासा स्वार्थ साधण्यासाठी सहज जीव घेणारी. चौक्या, पहारे, ठाणी आणि तिथली हपापलेली, लाच खायला चटावलेली माणसे, दस्तावेजांची बेमुरव्वत तपासणी आणि चौकश्या, तफतीश करतात. हे खरोखर भयाण आणि भयंकर आहे. बेटा, तुझ्या हजची वाट मात्र खुश्कीची नव्हे तर दर्यातून जाते. इथून नीघ. मुलूख जिंकत, विजय मिळवत इराणच्या सरहद्दीवर पोहोच. गलबत तुझी वाट पाहत असेल. अल्ला तुझ्या पाठीशी आहे. कामयाबी तेरी कदम चूमेगी. अल्लाच्या भेटीची तुला मनातून प्रामाणिक ओढ असेल तर मकरानात तुला हजला नेणारे गलबत अल्ला देईल. तुझी हज कबूल झाल्याशिवाय राहणार नाही. माझी दुवा तुझ्यासोबत आहे.

असे काहीतरी असंबद्ध बोलून मौलाना बोलायचा थांबला. मात्र त्याचे बोलणे ऐकून आफताबखान सजग झाला. थोडा जवळ सरकून कान टवकारून तो पुढे काय बोलतो ते ऐकण्याचा प्रयत्न करू लागला. मौलानाच्या असंबद्ध बोलण्याचा कुलीखानाला काही अर्थबोध होईना. तो नुसताच त्याच्या तोंडाकडे पाहत राहिला. काही क्षणांनी मौलानाने डोळे उघडले आणि त्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली-

खैर छोड दो बेटा. खुश्कीने जाण्याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे वाटेने जाता जाता अनायासे हातून तबलीग घडते. तुझ्यासारखे अल्लाचे नेक बंदे भेटतात. त्यांना दीन-दुनियेच्या चार गोष्टी सांगता येतात. मुलूख पाहता येतो. अल्लाने निर्माण केलेली ही अजब दुनिया डोळे भरून निरखता येते. जिंदा पीर आलमगीर साहेबांचे दीदार झाले. तुर्कस्तानात खलिफा आहेत. अल्लाची मर्जी असेल तर त्यांची भेट होईल. वाटेत करबलाला थांबता येईल. तिथे चाळीस दिवस राहून नमाज अदा करीन. शहिदांसाठी फातेहा पढीन. मग पवित्र अरब भूमी पाहत पाहत मक्का शरीफला पोहोचेन…

आफताबखानाने मध्ये तोंड घातले– आपला डावा अंगठा त्याच्या सहज नजरेत येईल अशा प्रकारे पिकदाणी मौलानांच्या समोर धरीत तो म्हणाला-

गुस्ताखी माफ मौलाना, आपण शिया आहात का?

बेवकूफ, गुस्ताख. हजरत अली आम्हाला तितकेच प्यारे आहेत जितके हजरत अबू बकर आणि हजरत उस्मान हसन आणि हुसेन स्वत:च्या स्वार्थासाठी नव्हे, इस्लामसाठी शहीद झाले. पण मी हे तुला का सांगतो आहे? गुस्ताख गुलाम, तुला एवढी अक्कल नाही की दोन मोठी माणसे बोलत असताना हलक्यांनी मध्ये तोंड घालू नये. बेमुरव्वत, तुला काही विचारायचे असेल तर उद्या मला पडावावर भेट. आत्ता मी तुझ्यासारख्या गुलामाशी नव्हे तुझ्या आकाशी बोलायला आलो आहे. तोंड काळे कर इथून.

आफताबखानाला मिळायचा तो इशारा मिळाला. दोन्ही हातांनी गालावर मारून घेत, वारंवार माफी मागत तो दालनातून निघून गेला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत मौलाना पुन्हा बोलायला लागला. बराच वेळ तो अघळपघळ बोलत राहिला. प्रवासातले अनुभव सांगत राहिला. अखेर रात्री उशिरा बराच मोठा ऐवज गाठीशी बांधून मौलाना घियासुद्दीन परत जाण्यास निघाला. त्याला सोबत करण्यासाठी नुर्दल्लाखान त्याच्या पडावावर जाऊन आला.

भल्या सकाळपासून आफताबखान गायब होता. दुपारी तो परतला तेव्हा जेवणाची वेळ झाली होती. तो आला तोच मोठ्या खुशीत. त्याची आणि मौलाना घियासुद्दीनची भेट बराच वेळ चालली. कुलीखान जेवायला बसला तेव्हा काही ना काही निमित्त काढून बाकी खिदमतगारांना त्याने बाहेर पिटाळले. जेवण वाढायला तो स्वत: बसला. वाढता वाढता अगदी हलक्या आवाजात त्याने घियासुद्दीनचा विषय काढला. कपाळाला आठ्या घालीत कुलीखान त्याला म्हणाला–

काल तो मला काहीतरी सुचवण्याचा प्रयत्न करीत होता. काय ते मात्र अजून ध्यानात येत नाही. माझी हज इराणमार्गे आहे असे तो म्हणाला. माझा काही मक्केला जायचा विचार नाही. आलाहजरत मला तशी परवानगी देणेसुद्धा शक्य नाही. मग तो असे का म्हणाला?

सरकार, मला एक सांगा, तुमची काशी, मथुरा, मक्का, मदिना सारी तीर्थे कुठे आहेत? महाराज आणि आईसाहेबांच्या पायाशीच नाही का? तुमची हज तीच नव्हे का?

कुलीखान चमकून आफताबखानाच्या तोंडाकडे पाहत राहिला. हातातला घास हातात आणि तोंडातला तोंडातच राहिला. मग लांब सुस्कारा सोडून तो हलकेच म्हणाला–

अच्छा! म्हणून तो खुश्कीच्या मार्गातले धोके इतक्या विस्ताराने सांगत होता तर. समजा, आपण मकरानला गेलो तरी स्वराज्यात जायला तिथे कुठून गलबत मिळणार?

सरकार, पैसा फेकला तर जगात काय मिळत नाही? म्हणूनच मी सुचवत असतो हिरे आणि माणकांमध्ये रोकड साठवून ठेवा, कुठल्याही क्षणी वापरता येईल अशी. जर शक्य झाले, आपण योग्य योजना आखू शकलो आणि योग्य वेळात ती महाराजांपर्यंत पोहोचवू शकलो तर आपली आरमारी गलबतेसुद्धा आणवता येतील.

कुलीखानाच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. एका सामान्य शिपायाची– हुजऱ्या खिदमतगाराची योजकता आणि बुद्धीची झेप पाहून तो स्तंभित झाला. तस्तात हात धुऊन तो पलंगावर बसला तेव्हा विडा घेऊन आफताबखान जवळ आला. पंख्याने वारा घालीत तो पुन्हा हलकेच म्हणाला-

सरनोबत, तुम्ही मौलाना घियासुद्दीनला ओळखलेले दिसत नाही. मला त्याला पाहताक्षणीच संशय आला होता पण तो हजच्या पोशाखात आणि नबाबी थाटामाटात असल्याने खात्री वाटेना. पण जेव्हा त्याने गलबताचा प्रवास आणि मकरानाचा उल्लेख केला, तेव्हा मात्र माझी खात्री पटली.

कशी काय?

सरकार ही योजना माझ्याच डोक्यात आली होती. नर्दुल्लाखान येऊन मिळाल्यानंतर त्याचा सल्ला घेऊन पक्की केली. जनाब महाबतखान सरकारांच्या सोबत परत गेलेल्या एका व्यापाऱ्याच्या हस्ते बायकोसाठी म्हणून खत दिले. त्यामधून योजना नेमकी महाराजांपर्यंत पोहोचली. घियासुद्दीन महाराजांचा कौल घेऊनच आला आहे. तो कोण आहे हे आतातरी ध्यानात आले का सरकार?

नाही बाबा. काही आठवत नाही.

अजी सरकार नाही आठवत? अहो, पुण्याच्या शेख सल्ला दर्ग्याचा मुजावर, मौलाना घियासुद्दीन तो हाच.

काय? काय सांगतोस काय? अरे बाप रे! महाराज… महाराज कोणाकोणाला धरून कसकशा प्रकारे स्वराज्याच्या कामाला लावतील, एक ते स्वत: आणि दुसरा देवच जाणे.

कमरबंदातून एक पुडके काढून आफताबखानाने समोरच्या तिवईवर ठेवले. लाल आलवणातले ते गाठोडे कुलीखानाने हलक्या हाताने उघडले. गाठोड्यात वीतभराचे एक धनुष्य, त्यास साजेसा एक बाण, दोन घुंगरू, शमीच्या पानाची एक डहाळी, पाच बेलाची दले आणि एका कुपीत लाल पिंजर अशा वस्तू होत्या. एकेक वस्तू कपाळाला लावून त्याने पलंगावर समोर मांडून ठेवल्या आणि त्यांच्याकडे एकटक पाहत राहिला. हळूहळू डोळे भरून आले. दूरवरून आल्यासारखे शब्द कानी आले तेव्हा तो भानावर आला. आफताबखान सांगत होता–

मौलाना सांगत होता, या गाठोड्यात महाराजांनी कौल पाठवला आहे. सरकार, मला तर याचा काहीच अर्थ लागत नाही.

कसा लागणार? तू कधी महाभारत वाचलेस? हे धनुष्य आणि बाण अर्जुनाचे प्रतीक आहे. हे घुंगरू पाहिलेस? हे घुंगरू नाचणारणीच्या पायातील चाळातले घुंगरू आहेत. संकटकाळ आला तेव्हा अर्जुनाला स्त्रीवेष घेऊन बृहन्नडा नावाने विराटाच्या घरी नर्तिका बनून राहावे लागले होते. त्या काळात त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर टांगून ठेवली होती. म्हणून ही शमीची डहाळी. महाराज धीर देत आहेत. सांगताहेत की, जेथे अर्जुनासारखा परमवीर वेळ आली तेव्हा कापुरुष होऊन दुसऱ्याच्या दारी राहिला, तर मी काही काळ धर्म सोडून राहावे लागत आहे याची खंत करू नये. संधी येताच शमीवरून शस्त्रे काढून शत्रूचा संहार करण्याची क्षमता कायम ठेव. ही बेलाची पाने जशी पांडवांचे प्रतीक आहे तशीच शंभू महादेवाचा प्रसाद आहेत; आणि हा कुंकवाचा करंडा भवानी आईचा प्रसाद आहे. महाराज सांगताहेत, ही दोन्ही दैवते माझ्या पाठीशी आहेत. आफताब हा कौल मिळाला. आता मला हजार हत्तींचे बळ आले आहे. मी एकटा, एकाकी नाही. महाराजांची शक्ती, भक्ती आणि पुण्याई माझ्या मस्तकी छत्र धरून आहे. चला, आता नव्या जोमाने कामाला लागले पाहिजे.

हे ऐकून आफताबखानाचा चेहरासुद्धा आनंदाने फुलून आला. त्याला नवे स्फुरण चढले. मोठ्या उत्साहाने तो म्हणाला-

जी सरकार, महाराजांचा कौल मिळाला आता काय कमी आहे.

कुलीखानाने साऱ्या वस्तू काळजीपूर्वक गाठोड्यात नीट बांधल्या आणि ते गाठोडे संदुकीत जपून ठेवण्यासाठी आफताबखानाच्या हाती सोपविले.

-

खूप दिवसांनंतर कुलीखान स्वस्थ झोपला. सकाळी त्याला जाग आली तीच मोठा उत्साह आणि उमेद सोबत घेऊन. त्याने फौजेचा मुख्य मुन्शी गुलशन नक्वी आणि त्याच्या निसबतीचे दोन नायब सरदार शेख अरमान आणि उस्मान अली यांना एकांतात बोलावून घेतले. त्या तिघांना त्याने फौजेतील सरदारापासून सामान्य शिपायापर्यंत प्रत्येकाची नावनिशीवार यादी तयार करून आठ दिवसांच्या आत पेश करण्याचा हुकूम दिला. यादीत नुसती नावेच नव्हे तर कोण कोणाच्या निसबतीत, कुठल्या आघाडीवर, ठाण्यावर, चौकीवर किती दिवसांपासून तैनात आहे, अफगाणिस्तानात कधी रुजू झाला, मूळचा कोठला हा सर्व तपशील भरण्याची ताकीद दिली. त्याशिवाय फौजेतल्या प्रत्येकाच्या खिदमतीत असलेला हुजऱ्या, शागिर्द, खोजा, बांदी, बटकी, नाटकशाळा यांच्या याद्या तयार करण्यास फरमावले. फौजेसोबत ठिकठिकाणी विखुरलेले बाजारबुणगे आणि व्यापारी यांचा तपशील तयार करण्याचासुद्धा हुकूम त्याने जारी केला. मुन्शी गुलशन नक्वी वयोवृद्ध आणि अनुभवी होता. महाबतखानाचा खास विश्वासाचा माणूस म्हणून त्याला मुद्दाम मागे ठेवले होते. सर्व हुकूम त्याने काही न बोलता शांतपणे ऐकून घेतले. सरतेशेवटी त्या हुकमांना आपल्या लेखी काहीच महत्त्व नाही अशा थाटात तो म्हणाला–

जनाबे आली, अशा प्रकारची गणती ठेवण्याची आपल्या फौजेत पद्धत नाही. प्रत्येक सरदार आपापल्या फौजेचा ताळेबंद ठेवतो. त्यांचा दाणागोटा, चारा-पाणी, रोजमुरा वगैरे खर्च ते परस्पर भागवतात. त्यासाठी सरदारांना महिना दरमहिना शाही खजिन्यातून गला आणि तनख्वाह मिळतो. त्यामधून त्यांनी ही झंझटे सांभाळायची असतात. कमी-जास्त खर्च, जिम्मा त्यांचा. गुस्ताखी माफ हुजूर, पण हे सरदर्द आपण आपल्या मागे लावून घेण्याची गरज नाही. हुजूर, जनाबे आली महाबतखान हुजुरांच्या काळातसुद्धा हाच शिरस्ता होता.

मुन्शीला दुजोरा देत शेख अरमान म्हणाला-

हुजुरे आला मुन्शीजी बिलकुल दुरुस्त फरमावत आहेत. आपण शिपाई प्याद्यांची गणती केली तर सरदार आणि मानकरी नाराज होतील. कदाचित लष्करी कामाचा भाग म्हणून आपण तशी गणती केली, तरी नोकर-चाकर, खिदमतगार वगैरेंची गणती करण्याची आवश्यकता त्यांना पटवून देता येणार नाही. त्या गणतीची काही आवश्यकता आहे असे मला वाटत नाही.

कुलीखानाच्या डोळ्यांत अंगार फुलला. शेख अरमानकडे तुच्छतेचा कटाक्ष टाकीत जळजळीत शब्दांत त्याने मुन्शीला सवाल केला–

फौजेचा सरलष्कर कोण?

कुलीखानाचा रुद्रावतार पाहून मुन्शी गुलशन लटपटला.

आप, जनाबे आली.

फौजेत हुकूम कोणाचा चालतो?

सरलष्करांचा जनाबे आली.

आलमपन्हांना जवाब कोणाला द्यावा लागतो?

आपल्याला जनाबे आली.

किती वर्षांपासून फौजेत मुन्शी आहेस?

वीस वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाली जनाबे आली.

तर मग मला सांग, फौजेतील एका सामान्य मुलाजिमाने जर सरलष्करालाच थेट उलट सवाल केला किंवा न मागता मशवरा दिला किंवा हुकमाची तामील करण्यास टाळाटाळ केली किंवा नाफर्मानी केली तर त्याला सजा फरमावण्याचा अधिकार कुणाचा?

आपला जनाबे आली.

अशा गुन्हेगारांना फौज मोहीमनशीन असताना काय सजा देण्याचा रिवाज मुघलिया फौजेत आहे?

हुजूर, गुन्ह्याच्या स्वरूपावर आणि गुन्ह्याचा फौजेच्या सुरक्षेवर होणारा परिणाम ध्यानात घेऊन फटक्यांपासून मौतपर्यंत कुठलीही सजा फरमावण्याचा अधिकार सरलष्कर हुजुरांना आहे.

तुला काय सजा द्यावी?

मुन्शीने स्वत:ला जमिनीवर लोटून दिले. दोन्ही गालफडांत मारून घेत रडत-भेकत तो विनवण्या करू लागला–

रहम, सरकार रहम करा बुढ्या गरिबावर. गुलामाची इतक्या वर्षांची इमानदारी ध्यानात घ्या. हुजूर, म्हाताऱ्याला माफी करा; सरकार मायबाप माफी करा.

करड्या आवाजात कुलीखानाने फरमावले–

ऊठ. उभा राहा. नौटंकी करण्याची गरज नाही. या खेपी माफ केले आहे. पण आयंदा कधी अशी गुस्ताखी करण्याची हरकत केली तर मुलाहिजा राखला जाणार नाही. शेख अरमान, तुझी फौज किती?

दोन हजार सरकार.

दिल्ली सोडली तेव्हा किती होती?

दोन हजार हुजूर.

किती वर्षे आमच्या हाताखाली आघाडी लढवीत आहेस?

तीन वर्षे झाली हुजूर.

तीन वर्षांत इतकी जंगे झाली, असंख्य चकमकी झाल्या. तुझा एकही शिपाई कामी आला नाही? एकही जायबंदी झाला नाही?

अनेक झाले हुजूर.

मग तरी दोन हजार बरकरार कसे? जायबंदी आणि मेलेल्या शिपायांची सरकारात नोंद केलीस? त्यांना वाजवी मुआवजा मिळवून दिलास? कोणी दगा केला, कुचराई केली तर त्याला सजा देण्याची कधी शिफारस केलीस? कोणी खास कर्तब दाखवले, विशेष शौर्य गाजवले तर त्यांची हौसला अफजाही करण्यासाठी, इनाम देण्यासाठी शिफारस दाखल केलीस?

नाही जनाबे आली. मेलेल्या शिपायांच्या जागी स्थानिक लोकांमधून भरती करीत राहिलो.

क्रमश:

___🌱🌳🍂🍁___

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...