फॉलोअर

शनिवार, ७ मार्च, २०२०

*नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔* अग्निदिव्य भाग - 24⃣





*नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜*
 *अग्निदिव्य*

_______📜🗡भाग - 2⃣4⃣🚩🗡________*
*___🚩📜🚩_______*

*जिल्हेज महिन्याच्या चौदाव्या चंद्राला म्हणजे पौर्णिमेला अफगाण मोहिमेसाठी सरलष्कर आणि इतर सेनानी छावणीत मोहीमनशीन झाले. बादशहाच्या हुकमाप्रमाणे कुलीखानाचा मुक्कामाचा शामियाना सरलष्कर महाबतखानाच्या शेजारीच होता. पंचवीस-पन्नास मोजके अंगरक्षक वगळता त्याच्या बाकी फौजेचा पडाव बराच दूर होता. संपूर्ण फौजेच्या संरक्षणाची जबाबदारी असल्याने, छावणीभोवती फिरती गस्त घालण्याचे काम त्याच्या फौजेकडे असल्याने त्याच्या तुकड्या संपूर्ण छावणीभोवती विखुरलेल्या होत्या. त्याच्या फौजेच्या हालचाली आणि पडावाच्या संबंधाने बारीकसारीक सूचना दिल्या गेल्या होत्या. त्याशिवाय काही गुप्त सूचना आणि सल्ले होतेच. त्या सूचना कशा आणि कितपत पाळल्या जातात याची निगराणी करणारी यंत्रणा बादशहाने त्याच्याच नाकाखाली पेरली असणार याची महाबतखानाला खात्री होती; त्यामुळे त्याच्याकडून हयगय होणे शक्यच नव्हते.*

उत्तरेत जसा हिवाळा कडक तसाच उन्हाळासुद्धा भयंकर पण उन्हाच्या कडाक्याला न जुमानता मोगली रिवाजाला अनुसरून संथ गतीने फौज हलत होती. लढाऊ फौजेसोबतच सर्व सरदार आणि मानकऱ्यांचे जनानखाने, बटकी-बांद्या, खोजे, शागिर्दपेशा, हुजरे व इतर बाजारबुणगे असा मोठा पसारा ‘सब दिन चले ढाई कोस’ या खाक्याने हलत होता. छावणी म्हणजे जणू हलते शहरच होते. दीड-पावणेदोन लाखांची लढाऊ फौज आणि बाकीचा लबादा. त्यात काय नव्हते? दरकदार मानकऱ्यांच्या ऐश्वर्यसंपन्न शामियान्यापासून ते चाकर शागिर्दांच्या पालापर्यंत विविध प्रकारचे तंबू, राहुट्या होत्या. अंबरखाने होते, शस्त्रागारे होती, बाजार होते, नायकिणींचे, गवया बजवय्यांचे फड होते. एक ना अनेक. कधी कधी फौजा पुढे सरकत. दोन-चार मजला पुढे जात, पण येर गोतावळा एखाद्या ठिकाणी काही कारणाने मागे रेंगाळत असे. चार-आठ दिवसांचा मुक्काम पडे. अशा वेळी छावणीत मोठा बाजार भरे. त्या बाजारात दाणागोटा, जनावरांचा चारा-खुराक, इथपासून ते कापडचोपड ते पार जडजवाहिरापर्यंत सर्व गोष्टींचा भरणा असे. कधी कधी तर गुलाम आणि बटकीसुद्धा विकण्यासाठी आणली जात. हा सारा प्रकार कुलीखानासाठी नवा होता. आजवरची सवय अशी की, मोहीम मुक्रर झाली आणि खोगिराला पडशी बांधली की स्वारीसाठी मावळा तयार. ताड ताड घोडी उडवत एक-दोन चुटपुटते पडाव केले न केले की जाऊन गनिमावर कोसळायचे; त्यामुळे त्याला ती लष्करी मोहीम न वाटता एखाद्या सहलीला निघाल्यासारखे वाटत होते.

मैलोन्मैल सपाट मुलूख. वाटेत लागणारी सारीच जमीन उपजाऊ. अति सुपीक. जणू बर्फीच अंथरलेली. सुपारी फोडू म्हणावे तर धोंडा धुंडाळण्यात घटका दवडावी लागे. तर मग डोंगर-दऱ्या, राने, वने, अरण्ये? नाव नको. नद्यांची पात्रे भली रुंद, तशीच खोल; पण कोसच्या कोस उताराचा ठाव लागत नसे. त्यातून वाचला तरी नदी ओलांडणे अशक्यच. हत्ती, घोडे, तोफा इत्यादी अवजड सामान, ओझ्याची वाहने, जनावरे आणि अन्य अवजड सामान नदीमधून पल्याड नेणे शक्यच नसे. मग एखादी मोठी नदी आडवी आली तर मोठा मुक्काम पडे. आजूबाजूच्या नावाड्यांवर गाज कोसळे. वेठबिगारासारखे त्यांना धरून बांधून हुजूर दाखल केले जाई. त्यांच्या नावा जप्त होत. मग नदीच्या या थडीपासून त्या थडीपर्यंत एकमेकांस खेटून, पक्क्या बांधून नावा उभ्या केल्या जात; त्यावर फळ्या आणि माती टाकून एक तात्पुरता तरता पूल तयार केला जाई. त्यावरून सारा लवाजमा पार होई. अशा प्रसंगी कुलीखानाची काही पथके प्रथम पुढे सरकत आणि पैलतीरावर संरक्षणाची फळी धरत. मग तोफा, दारूगोळा, दाणागोटा, चारा इत्यादी अवजड सामान आणि त्याबरोबरचे मनुष्यबळ सर्वप्रथम नदीपार होत असे. कितीही काळजी घेतली तरी अपघात घडेच. कधी मोलाचे सामान नदीत वाहून जाई, तर कधी जनावरे. माणसे वाहून जाणे-त्यातही शारीरिक कष्टाची कामे करणारे कामगार-ही तर आम बात. पण त्याची काळजी करीत बसणे मोगली शिरस्त्यात बसत नसे. अगदी शेवटी जनानखाने आणि त्यांच्या मागे बाजारबुणगे नदीपार होत. पैलतीरावर सर्वांची गणती होई. हिशेब दिले-घेतले जात. मग काफिला पुढे रवाना होई. हे सव्यापसव्य पूर्ण होण्यास कधी आठ दिवस लागत. नदी अधिक आगळी, मोठी असेल तर मग पंधरा दिवससुद्धा मोडत. या काळात छावणी बरीच अस्ताव्यस्त असे. आरडाओरडा, गडबड-गोंधळ यांचा एकच खकाणा रात्रंदिवस उसळत असे. कुलीखान सारे निरखीत होता, मनात नोंदवून ठेवीत होता.

दिवस सरत होते. फौज सरकत होती. कुलीखानाच्या डोक्यात अष्टौप्रहर सतत एकच चिंतन, महाराजांकडे स्वराज्यात परत जायचे. या लाखभर फौजेच्या गराड्यातून कसेही करून निसटायचे आणि स्वराज्याची राजगडाची वाट धरावी. पण हे साधावे कसे? कोणाची मदत घ्यावी? कोणता मार्ग धरावा? भोवताली अवघे सारे गनीमच. कोणास आपला म्हणावा अशा माणसाचा वारादेखील नाही. मग साधावे कसे? काहीतरी हिकमत करून या गर्दाव्यातून एकवेळ निसटता येईल पण शेकडो कोसांचा गनिमाचा मुलूख तुडवत, चौक्या-नाकी चुकवत, पाठलाग टाळत, राजगडावर पोहोचावे कसे? कधी कधी मनात विचार येई, फार विचार करू नये. प्रथम छावणीतून बाहेर पडून दूर जावे. मग काहीतरी मार्ग निघेलच. परमेश्वर बुद्धी देईल. साह्यकारी उभे राहतील. काहीतरी घडेलच. एकटे तर एकटे सही. हिम्मते मर्दा मदते खुदा.

लाहोर शहराबाहेर छावणी पडली. पाणवठा दूषित होऊ नये म्हणून प्रत्यक्ष छावणी नदीकाठापासून कोसभर दूर होती. हिमालयातून येणाऱ्या नद्यांना उन्हाळ्यात पूर येतात. रावी फुसांडत दुथडी वाहत होती. नावांचा पूल बांधून पैलथडी जाण्याचा खटाटोप सुरू झाला. पंजाबी सुभ्यात शिखांनी उपद्रव सुरू केल्यामुळे सजग सावधानता बाळगणे आवश्यक झाले होते. दोन भल्या अवजड तोफा एकामागे एक नदीपार होत होत्या. सायंकाळ होत आली होती. अंधारून येण्याच्या आत तोफा पार होणे गरजेचे होते. एरवी या अवजड तोफा हत्तीकडून ओढल्या जात. पण नावांच्या हलत्या पुलावरून नेताना त्यांना हत्ती जुंपणे शक्य नव्हते. साखळदंड लावून माणसे जीव खाऊन तोफा ओढत होती. त्यांचे मुकादम शिव्या घालत त्यांच्यावर ओरडून घाई करत होते. प्रसंगी कोणाच्या पाठीवर आसूड उठत होते. पूल कराकरा वाजत होता. वेडावाकडा डचमळत होता. तसू तसू तोफा पुढे सरकत होत्या. संपूर्ण पूल दृष्टिपथात येईल अशी थोडी उंचवट्याची जागा पाहून ऐल तीरावरून कुलीखान त्यावर देखरेख करीत होता. बादशहाने नुकताच बक्षीस दिलेला उमदा घोडा त्याच्या मांडीखाली होता. भोवताली पन्नास-साठ ‘अंगरक्षकां’चा गराडा होता. वास्तविक शिखांच्या हल्ल्याचा अंदेशा असल्याने ‘अंगरक्षक’ सजग असायला हवे होते पण सारेच तोफांमध्ये लक्ष गुंतवून होते. आणि… आलाच… आलाच शिखांचा छापा.

वाहे गुरुजी दा खालसा! वाहे गुरुजी दी फतह! सत् श्री अकाल!
बुलंद नारे लावत शे-शंभर शिखांचा एक जथा कुलीखानाच्या तुकडीवर कोसळला. त्यांनी पहिल्या जोशात पाच-सात मुंडकी सपासप उडविली. पण मोगल लगेच सावरले. सरसरत तलवारी म्यानाबाहेर आल्या. खणाखणी सुरू झाली. असा प्रकार कधीही उद्भवू शकतो याचा अंदाज असल्याने अगदीच निकड पडल्याशिवाय पुलावरच्या शिपायांनी हातचे काम सोडून धावायचे नाही अशा सख्त सूचना खुद्द कुलीखानानेच देऊन ठेवल्या होत्या; त्यामुळे पुलावर चालू असलेले काम विनाव्यत्यय तसेच सुरू राहिले.
धुमश्चक्री सुरू होताच कुलीखानाच्या मस्तकातसुद्धा खणाखणी सुरू झाली. हीच ती वेळ! हीच संधी! हाच तो क्षण! एकमेव! प्रथम छावणीपासून दूर पळ. पुढचे पुढे पाहता येईल. पळ. पळ… अति विचार म्हणजेसुद्धा अविचारच. अशी संधी पुन्हा मिळेल न मिळेल. पळ… हर हर महादेव…

दोन-तीन शिखांना अंगावर घेत त्याने घोडा हळूहळू गर्दीतून बाहेर काढला. ऐन झटापटीपासून पंधरा-वीस कदम बाजूस सरला. चवताळून अंगाशी झोंबी करू पाहणाऱ्या एका शिखावर सफाईदार जनेव्याचा वार काढून त्याचा फाळका उडविला आणि त्याने घोड्याला टाच दिली. छावणीच्या विरुद्ध दिशेने घोडे बेफाम दौडू लागले. क्षणागणिक छावणी दूर दूर होत होती. दौडता दौडता त्याने विचार पक्का केला, जास्तीतजास्त वेगाने जितके दूर जाता येईल तेवढे दूर जायचे. सोबत रोख पैका नाही पण अंगावर चार-दोन डाग आहेतच. एखाद्या खेड्यात फुंकून टाकायचे. अनायासे इस्लामचे पुरते ज्ञान झालेच आहे. भणंग फकिराचा वेष घ्यायचा. या राज्यात त्यांच्याइतकी सुरक्षा आणि सवलत कोणालाच नाही. भीक मागत जमेल तसा झपाट्याने प्रवास करत दख्खन गाठायची. कोणी फार चौकशी केलीच तर सांगावे खुल्दाबादला जात आहे. तेथे आलमगिराच्या गुरूचा दर्गा असल्याने रोखण्याची हिंमत कोण करणार? ठरले तर मग. पण पहिले लक्ष्य छावणीपासून दूर; जास्तीतजास्त दूर आणि लवकरात लवकर…

धावत्या घोड्यावरून त्याने नजर मागे टाकली. चार स्वार त्याच्या पाठलागावर दौडत होते. त्याने विचार केला आपल्याला मुलूख अपरिचित, तर पाठलाग करणाऱ्यांसाठी दारचे अंगण. अनोळखी मुलखात त्यांना पाठीवर घेऊन फार लांब जाणे धोक्याचे. शिवाय एकास चार म्हणजे काही फारसे कठीण प्रकरण नाही. अचानक त्याने घोडा फिरविला आणि तो स्वत:च पाठलाग करणाऱ्यांवर चालून गेला. त्यांना ती चाल अनपेक्षित होती. ते गांगरले. काही समजण्यापूर्वीच एकाचे मुंडके धडावेगळे झाले होते. जागच्या जागी घोडा फिरवून त्याने दुसऱ्याच्या पाठीत खुपसलेली तलवार काळीज घेऊनच बाहेर आली. उरलेले दोघे तोवर सावरले. त्यांनी प्रतिहल्ला चढविला. त्यांच्यातील त्वेष आणि जोश वाखाणण्यासारखा होता. ताकद आणि रग जबरदस्त होती. मात्र त्यांना हत्यारांची फारशी माहिती असल्याचे दिसत नव्हते. हत्यारे हाताळण्यातला त्यांचा नवखेपणा जाणवण्याजोगा होता.

तिसऱ्याने आपले घोडे त्याला समोरासमोर भिडविले आणि त्याच्या मस्तकावर पुऱ्या ताकदीनिशी वार केला. वार धारेच्या बाजूने न उतरता मुठीच्या अगदी जवळून उतरला, जेथे तलवारीस धार नसते. घावातली ताकद आणि जोश एवढा जबरदस्त होता की, घाव योग्य प्रकारे उतरता तर क्षणात डोक्याची दोन शकले उडती. त्याचा घाव खाली येत असतानाच कुलीखानाने अशा प्रकारे तलवार उलटी वर चालविली की, वारकऱ्याच्या वेगाचा आणि ताकदीचा फायदा मिळावा. झटक्यासरशी हात तुटून खाली आला. त्याच झपाट्यात तलवार त्याच्या छातीतून आरपार झाली. मात्र डोक्याला मोठी जखम झाली होती. किमांश उडून दूर पडला होता. एवढ्यात त्याला डोळ्याच्या कोपऱ्यातून चौथ्याचा घाव उतरत असलेला दिसला. त्याने चपळाईने घोडा फिरविला तरी कुशीत जखम झालीच. घोड्याच्या पुठ्ठ्याला मोठी जखम झाली. तीन-चार घाव डावातच चौथासुद्धा कामी आला. क्षण न दवडता त्याने घोड्याला टाच दिली. या झटापटीत आपली दिशा चुकलेली नसू दे अशी तो परमेश्वराची मनोमन प्रार्थना करीत राहिला.

उसंत न घेता सारी रात्र तो दौडत राहिला. जखमी असून ते उमदे जनावर धन्याला पाठीवर घेऊन जीव तोडून दौडत राहिले. सूर्य हातभर वरती आला तरी कुलीखान दौडत होता. डोक्यात एकच जुनून थैमान घालीत होता, छावणीपासून दूर, जास्तीतजास्त दूर, पुढचे पुढे पाहता येईल. तेरा-चौदा तास न थांबता दौडत राहणाऱ्या त्या जनावराचा दम संपल्याचे त्याच्या अनुभवी मनाला जाणवले. चपळाईने झेप घेत त्याने वरची झाडाची फांदी पकडली. मांडीखालून मोकळा झालेला घोडा जेमतेम चार-सहा कदम पुढे गेला आणि धरणीवर कोसळला. त्याच क्षणी त्याच्या तोंडातून रक्ताचा लोट बाहेर फुटला. घोड्याचे ऊर फुटले होते. तशाही अवस्थेत कुलीखानाने धावण्याचा प्रयत्न केला पण दुसऱ्याच पावलाला तो खाली कोसळला. कसाबसा खुरडत जाऊन तो झाडाला टेकून बसला आणि त्याची शुद्ध हरपली.
त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला दिसले की, चार-सहा भाले त्याच्या छातीला टेकलेले आहेत. क्षण-दोन क्षणांतच त्याला काळवेळाचे भान आले. आपण पुन्हा धरले गेल्याचे त्याच्या लक्षात आले. एकेकाळचा स्वराज्याचा सरनोबत तो, पुढच्याच क्षणी त्याला वास्तवाचे भान आले. मेंदू तल्लखपणे कार्यरत झाला. त्याच्यासोबत पुलावर देखरेख करत असलेला महाबतखानाचा अत्यंत विश्वासू दफेदार जलालुद्दीनचा चेहरा त्याने चटकन ओळखला. उत्स्फूर्तपणे निघावे तसे त्याच्या मुखातून शब्द आले–
अलहमदुलइलल्लाह. अल्लाची कृपा तू मला वाचवलेस. अन्यथा या परमुलखात माझे काय झाले असते? अल्लाहु आला.

हाताने छातीवर रोखलेले भाले दूर सारत तो कसाबसा उभा राहिला. खास मोगली ढंगात तो शिपायांवर खेकसला–
हरामजादो, तुमची लायकी आहे माझी अशी मजाक उडविण्याची? आधी पाणी द्या. घशात जणू वाळवंट उतरून आले आहे.
शेजारच्या शिपायाच्या कंबरेला लटकलेली छाजल हिसकावून त्याने तोंडाला लावली. कुत्सित हसत जलालुद्दीन म्हणाला–
अफसोस. सख्त अफसोस. कुलीखान पळून जाण्याची तुझी कोशिश नाकामयाब झाली. तू आता माझ्या गिरफ्तमध्ये आहेस.
खामोश! लाहौलवलाकूव्वत! बदतमीज शिपाई! थोरामोठ्यांशी कसे बोलावे याची अक्कल तुला नव्याने शिकवावी लागेल असे दिसते. तुझ्यासारख्या खालच्या दर्जाच्या शिपायाला सफाई द्यायला मी बांधलेला नाही. तुला माहीत असलेच पाहिजे की, माझ्यावर फक्त सरलष्कर म्हणून महाबतखान जनाबे आली, वजीरेआझम आणि खुद्द आलाहजरत यांचीच हुकूमत चालते. तुझी ही बदतमीज हरकत दिल्लीत समजली तर तुझा काय हशर होईल हे समजून अस. आता आपले नापाक थोबाड बंद कर आणि मला छावणीत घेऊन चलण्याची व्यवस्था कर. हकिमाला बोलावून माझ्या मलमपट्टीची तजवीज कर. माझे सवारीचे घोडे मरून पडले आहे.

बोलता बोलता त्याने पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला पण तो खाली कोसळला. त्याच क्षणी पुन्हा त्याची शुद्ध हरपली. शेजारी उभ्या असलेल्या शिपायाने त्याला लगेच सावरले. अशा विकल अवस्थेतसुद्धा कुलीखानाचे तेवर आणि जरबेचा स्वर पाहून जलालुद्दीन हादरला. बादशहा कुलीखानावर किती मेहेरबान आहे हे त्याला पुरते ठाऊक होते. त्याने सुज्ञपणे ठरविले की, डोक्यावर फारशी जबाबदारी न घेता कुलीखानाला लवकरात लवकर महाबतखानासमोर हजर करावे. मग त्याचे काय करायचे ते महाबतखान पाहून घेईल. आता या क्षणी त्याच्या जखमा बांधल्या पाहिजेत आणि त्याला शुद्धीवर आणले पाहिजे.
बेशुद्ध कुलीखानाला एका घोड्याच्या पाठीवर घालून तो दीड कोसावर असलेल्या खेड्यातील एका मशिदीत घेऊन गेला. त्यापूर्वी तातडीने दोन स्वार छावणीत महाबतखानाकडे रवाना करून कुमक मागविण्यास तो विसरला नाही. गावातून एक वैद्य आणि एक न्हावी धरून आणवला. स्वत:च्या आणि हल्लेखोरांच्या रक्ताने कुलीखानाचे सर्वांग माखून निघाले होते. रक्त साकळल्याने कपडे अंगाला घट्ट चिकटले होते; त्यामुळे कपडे फाडून काढावे लागले. डोक्यावर होती तशीच मोठी जखम उजव्या कुशीत होती. बरेच रक्त गेले होते. तेरा-चौदा तास अथक घोडदौड केल्यामुळे दोन्ही पाय मांड्यांपासून भोपळ्यासारखे सुजले होते. शिरा तटतटून आल्या होत्या. वैद्याने भरपूर कडुनिंब टाकून उकळलेल्या पाण्याने त्याचे सर्वांग आणि जखमा नीट पुसून काढल्या. न्हाव्याकडून जखमा नीट शिवून घेतल्या. दगडी, निर्गुडी, करंज असा बराच पाला-टाला वाटून जखमांवर त्याचा नीट लेप दिला आणि त्या काळजीपूर्वक बांधून टाकल्या. राईच्या तेलाने न्हाव्याने दोन्ही पायांना मालीश करण्यास सुरुवात केली. दीड-दोन घटका सतत मालीश केल्यानंतर कुठे पाय थोडे सैल झाले. एवढे सारे सोपस्कार सुरू होते. पण कुलीखानाला त्याची जाणीवच नव्हती. तो पूर्ण बेशुद्ध होता.

तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी छावणीतून शंभर स्वारांचे पथक घेऊन फत्तेखान आला. त्याने आपल्यासोबत कुलीखानाचे कपडेलत्ते वगैरे तसेच त्याचे दोन खिदमतगार आणले होते. जलालुद्दीनने कुलीखानाची शारीरिक स्थिती तपशीलवार कळविली होती. महाबतखानाने त्याच्यावर उपचार करण्यासाठी आपला खास हकीम पाठविला होता. कुलीखानाला आणण्यासाठी पालखीची व्यवस्था करण्यात आली होती. आल्यासरशी हकीमसाहेबाने कुलीखानाचा ताबा घेतला. तीन-चार दिवस सतत मालीश झाल्याने पायावरची सूज बरीच उतरली होती. स्नायू आणि शिरा बऱ्यापैकी मोकळ्या झाल्या होत्या. मात्र अजून शुद्ध आली नव्हती.

हकीमसाहेबाने सर्वांग तपासले. नाडी पाहिली. तपासणी पूर्ण करून हकीमसाहेब म्हणाले–
रक्त बरेच वाहून गेले आहे. एवढ्या कमी वेळात एवढ्या दूर अंतराची दौड कशी मारली अल्ला जाने! मात्र त्यामुळे अवघे शरीर खिळखिळे झाले आहे. नुकतेच त्यांनी मोठे आजारपण काढले आहे; त्यामुळे एवढा ताण आणि दगदग त्यांना सहन होऊ शकली नाही. मी त्यांना आता दवाई दिली आहे. इन्शाल्ला, ते लवकरच शुद्धीवर येतील. यांना खायला-प्यायला काय दिले आहे?
गावचा वैद्य चाचरत बोलला–
हुजूर बेहोशीच्या आलममध्ये काही खाऊ घालणे तर शक्य नव्हते. दिवसातून दोन-तीन कटोरे दूध चिंधीने पिळून देत आहोत. सोबत दिवसाला तीन-चार तोळे मध चाटवत आहोत.

बहोत अच्छे! आता मी आहे, घाबरू नका. शक्य झाले तर संत्र्याचा रस पाजू या.
संध्याकाळी कुलीखान शुद्धीवर आला. अंगात उठून बसण्याचेसुद्धा त्राण नव्हते. फत्तेखानाला सांगून हकिमाने त्याला त्याच खेड्यात ठेवून घेतले आणि व्यवस्थित उपचार सुरू केले. दोन दिवसांत तो उठून बसला. पाचव्या दिवशी हलके हलके पावले टाकू लागला. सहाव्या दिवशी पालखीत बसवून त्याला छावणीकडे चालविले. हकिमाच्या देखरेखीखाली सावकाश प्रवास करीत तीन दिवसांनी ते छावणीत पावते झाले. सततचे मालीश आणि हकिमाच्या उपचारामुळे आता सावकाश पावले टाकीत चालणे शक्य झाले होते. जनानखान्यासह सारी छावणी रावीपार झाली होती. पुढे रवाना होण्याची सारी तयारी पूर्ण झाली होती. फक्त कुलीखान येण्याची वाट पाहणे सुरू होते. वर्दी पुढे पोहोचल्यामुळे महाबतखान सदर भरवून आपल्या शामियान्यात त्याची वाट पाहत होता. फत्तेखानाने पूर्ण बंदोबस्तात त्याला सरलष्करासमोर हजर केले.

अकस्मात काहीही घडू शकते. अचानक कधी दैव अनुकूल दान समोर फेकू शकते. अचानक संधी उपलब्ध होऊ शकते, असा आपण कधी विचारच केला नाही. अशा अकस्मात चालून आलेल्या संधीचा लाभ उठविण्यासाठी कधी तयारच राहिलो नाही; त्यामुळे कोणतीही योजना न आखता आपण पळून जाण्याचे वेडे साहस केले. अविचाराने आपली स्वत:ची, जनावराच्या जिवाची पर्वा न करता बेफाम दौडत राहिलो; त्यामुळे आपले साहस फसले. सोबत ना रोख पैसा होता ना अंगावर किमती दागिने. गनिमाच्या, अनोळखी मुलखातून कोणाच्या मदतीशिवाय एकट्याने पैशांशिवाय शेकडो कोसांचा प्रवास आपण कसा करणार होतो? अशा विचारांनी कुलीखान मनातून खचला होता. मात्र अष्टौप्रहर सजग राहण्याची सवय असलेले त्याचे सावध मन त्याला बजावून सांगत होते, रतीभर संशय आला तरी थेट प्राणांशी गाठ आहे. पर्वा प्राणांची नाही पण मग कामगिरीचे काय? आपल्या इभ्रतीचे काय? असे बेमौत मेलो तर सारेच मुसळ केरात. आई भवानी, शक्ती दे! शक्ती दे! युक्ती दे! बुद्धी दे! यश दे! शिपायांच्या गराड्यात चालता चालता कुलीखानाने स्वत:च्या मनाला सावरले. महाबतखानास सामोरा जाण्यास तो मनोमन सिद्ध झाला. आपला मूर्खपणा हाच आता आपला बचाव. आक्रमक बचाव हीच योजना, प्रत्येक घटनेचा तर्कशुद्ध युक्तिवाद हेच शस्त्र असा त्याने मनोमन निर्धार केला. हा मनोनिग्रह होताच त्याचा आत्मविश्वास पूर्ण जागृत झाला. देहबोलीवर त्याचा इष्ट परिणाम झाला. दृढ पावले टाकीत अत्यंत थंड डोक्याने आणि शांत मनाने त्याने महाबतखानाच्या डेऱ्यात प्रवेश केला.
सदर पूर्ण भरली होती. हरएक लहान-मोठा सरदार आवर्जून हजर होता. महाबतखान नजरेने त्याचा ठाव घेण्याचा प्रयत्न करीत होता. असले छप्पन्न महाबतखान मराठे उगाळून प्यायले होते. त्यांच्या सरनोबतांचा काय त्याला ठाव लागणार.

आओ कुलीखान. अफसोस. पळून जाण्याची तुझी कोशिश पूर्णपणे नाकामयाब झाली. ताजूब है, इतक्या दिवसांत तुला मुघलिया ताकदीचा अंदाज येऊ शकला नाही. लक्षात ठेव, मुघल फौजेच्या शिकंजातून निसटणे थट्टा नाही. महाबतखान म्हणजे फुलादखान नव्हे हे तू विसरलास. आता अल्लाच तुझे रक्षण करो. तुझ्या जागी दुसरा कुणी असता, तर या इथेच त्याचे थडगे बांधून मी पुढे कूच केले असते. पण तुझ्यासाठी मला आलाहजरतांकडून हुकूम मागवावा लागणार आहे. तुला काही सफाई द्यायची असेल तर तुला इजाजत दिली जात आहे.

नामंजूर. जनाबे आली, तुम्ही केलेला हा पळपुटेपणाचा आरोप मला साफ नामंजूर आहे. जलालुद्दीनसारख्या हलक्या दर्जाच्या माणसाने जसे बोलावे त्याच भाषेत अवघ्या मुघलिया सलतनतीत ज्याच्या शौर्याचा, बुद्धिमत्तेचा आणि शहाणपणाचा डंका वाजतो आहे अशा शाही सिपाहसालारने बोलावे हे जसे माझे दुर्भाग्य आहे तसेच फौजेचे आणि आलम सलतनतीचे दुर्दैव आहे. जनाबे आलींनी मला सफाई विचारली त्याबद्दल शुक्रिया. मात्र मला सर्वप्रथम हे स्पष्ट केले पाहिजे सफाई गुनाहगार देतो. मी गुनाहगार नाही. मी फक्त आणि फक्त हकिकत बयान करणार आहे आणि विनंती करतो की, मी बयान केलेला हरएक लफ्ज हरएक अल्फाज, हरएक हरफ नुक्ता दर नुक्ता आलाहजरतांना कळवावा किंवा मला कळवू देण्याची मुभा असावी.

ठीक है. कहो.
सबसे अव्वल बात, मी जेव्हा जलालुद्दीनला आढळलो तेव्हा एकटा, एकाकी, जख्मी बेहोश अवस्थेत सापडलो. माझ्यासोबत कोणी संगी-साथी नव्हता. मी इसकदर जख्मी आणि बेहाल होतो की, इतक्या दिवसांनंतर आज जेमतेम फक्त उभा राहू शकतो आहे. तेसुद्धा आपण आपल्या खास हकीम साहेबांद्वारा केलेल्या मेहेरबानीमुळेच.
जख्मी झालास म्हणून तर तू आमच्या गिरफ्तमध्ये आलास, नाहीतर खुदा ना खास्ता तू पळून जाण्यात कामयाब झाला असतास.
मला झालेल्या जखमा मला शोधून काढणाऱ्यांकडून त्यांच्याशी झुंजताना झालेल्या नव्हत्या तर ज्यांनी माझ्या दस्त्यावर हमला चढवला होता आणि ज्यांनी माझा पाठलाग चालवला होता त्या गनिमांकडून झालेल्या होत्या. आता कोणी अकलमंद बंदा असे तारे तोडण्यास कमी करणार नाही की, गनिमाने हल्ला चढवला तो मला पळून जाता यावे म्हणूनच. माझा पाठलाग करणाऱ्या चार स्वारांची प्रेते जलालुद्दीनला सापडली आहेत. आपल्याला मदत करणाऱ्यास कोणी इतक्या बेरहमीने कत्ल करतो काय? मला मदत करणारेच मला प्राणांतिक जख्मी करतील का? असा जर कोणी विचार करीत असेल तर त्याची कीव करावी तितकी थोडी.

ठीक है. पुढे?
मी सापडलो तेव्हा माझ्यासोबत सवारीचे जनावर नव्हते. मी बेहोश पडलो होतो त्याच्यापासून जवळच माझे घोडे मरून पडले होते. अल्लाची मोठी मेहेरबानी की, त्याने जलालुद्दीनला लवकर पाठवले अन्यथा घारी-गिधाडांनी घोड्याबरोबर मलासुद्धा फाडून खाल्ले असते. असो. हजारो कोसांचा प्रवास मी काय सवारीशिवाय करणार होतो? माझी उभी हयात घुडसवारी करण्यात गेली आहे. पल्ला दूरचा असताना जनावर कसे आणि किती दौडवायचे हे मला कोणी शिकवण्याची गरज नाही. घोडे छाती फुटून मेले. कोणी शहाणा घुडसवार जनावर इतक्या बेरहमीने दौडवणे शक्य आहे का?
ठीक है. पुढे?
मी बेशुद्ध असतानाच माझी झडती झाली. माझ्याजवळ ना काही रोख रक्कम सापडली ना जडजवाहीर. हजारो कोसांची ही सफर मी काय सोबत्याशिवाय, सवारीच्या जनावराशिवाय, कंबरेला फक्त एक तलवार घेऊन निष्कांचन, भणंग भिकाऱ्यासारखा करणार होतो? माझ्याजवळ पडशी सापडली नाही, अंथरूण-पांघरूण इतकेच काय मला परत आणताना नेसूचे कपडे छावणीतून पाठवावे लागले. मी काय नंगा फकीर बनून जाणार होतो? जलालुद्दीनसमक्षच मी डोळे उघडले तेव्हा सर्वप्रथम मला वाचवल्याबद्दल मी अल्लाचे आणि जलालुद्दीनचे आभार मानले. कोणीही गुनाहगार आपल्याला शोधून काढणाऱ्याचे आभार मानणार नाही. तो पकडला गेल्याबद्दल शोक करील. प्रतिकार करण्याचा प्रयत्न करील. दयेची भीक मागेल किंवा बहाणे सांगेल.

बात में दम है। पुढे?
माझी बायका-पोरे या इथे तुमच्या ताब्यात छावणीत सोडून एकटा एकाकी जखमी, बेहाल, नि:शस्त्र, निष्कांचन असा मी चौक्या, पहारे, ठाणी टाळत, मागे शाही फौजेचा पाठलाग सुरू असताना हजारो कोसांच्या मुघल सलतनतीचा प्रदेश पायी तुडवत कोठे जाणार होतो? शिवाजीराजाच्या दौलतीत? त्याच दौलतीत जिथे गद्दारांचा कडेलोट करण्यासाठी दर दुसऱ्या-चौथ्या कोसावर उत्तुंग कडे आणि पाताळात घुसणाऱ्या दऱ्या मौजूद आहेत? जिथे गद्दाराच्या चिंध्या उडवण्यासाठी प्रत्येक गड-किल्ल्यावर पेटते पलिते घेऊन तोफा सज्ज आहेत. तिथे? एके काळी त्याच दौलतीचा मी सरनोबत होतो. अनेक गद्दारांना मी स्वत: या अशा सजा दिल्या आहेत. जगजाहीर आहे की, शिवाजीराजाने मला गद्दार करार केले आहे. त्यांनी माझा नाश करण्यासाठी धाडलेले मारेकरी रहमदिल आलाहजरतांनी नष्ट केले. माझ्यावर कृपा केली. माझा जीव वाचवला. मग असे असताना हा एवढा मानमरातब, ही सत्ता, हे वैभव, हे सुख, ही चैन, ही शाही कृपा आणि माझे कुटुंब सोडून, हालअपेष्टा काढत, आपल्या पायांनी चालत, स्वत:ची बरबादी करून घेण्यासाठी, बेमौत मरण्यासाठी आलाहजरतांचे पाय सोडून पळून जाणार होतो? एवढा मी मूर्ख बेवकूफ दिसतो?

वाह! बहोत खूब. तुमची दलील बेमिसाल आहे. काबिले गौर आहे. तुम्हाला अजून काही सांगायचे आहे?
शुक्रिया जनाबे आली. आपल्यासारख्या सलतनतीच्या थोर आणि ज्येष्ठ निजामाने असा बेबुनियाद शक घ्यावा या गोष्टीचा सख्त अफसोस वाटतो. मी आपल्याला सत्य तेच सांगतो आहे आणि ते सत्य जे आपल्या विश्वासू माणसांनी आपल्याला आधीच बयान केले आहे. फरक फक्त नजरिया कसा असावा याचाच आहे. आलाहजरत म्हणतात तेच सत्य आहे हे मला पुरते पटले आहे. माझ्या हातून इस्लामची फार मोठी सेवा घडायची आहे. म्हणूनच मला अल्लाच्या कृपेने जलालुद्दीनने वाचवले आणि हकीमसाहेबांनी खडखडीत बरे केले. खरोखरच आलाहजरत आलमगीर जिंदा पीर आहेत. भविष्यात घडणाऱ्या गोष्टी त्यांच्या नजरेला साफ दिसतात. म्हणून त्यांनी माझ्यासारख्या एकेकाळच्या बगावतखोरावर दयेचा आणि कृपेचा वर्षाव केला आहे. बस्स! मला एवढेच सांगायचे आहे. तुम्हापैकी कोणीही माझ्या केसालासुद्धा धक्का लावू शकत नाही, कारण मला वाचवण्यासाठी स्वर्गात परवरदिगारे आलम अल्ला आणि पृथ्वीवर जिल्हेसुभानी आलाहजरत मौजूद आहेत याची मला पूर्ण खात्री आहे.

सुभानअल्ला! सुभानअल्ला! बहोत खूब जनाब महम्मद कुलीखान आपने बहोत वजा फरमाया. शुक्रिया! न जाणे कोणत्या गफलतीमुळे पण मी सैतानाच्या बहकाव्यात आलो. अल्लाच्या नेक बंद्याबाबत माझ्या दिलात शक पैदा केला गेला. आपण माझी नजर साफ केलीत. माझ्या दिलात निर्माण झालेला मैल साफ केलात. मला आलाहजरत आणि अल्लाचा गुनाहगार होण्यापासून वाचवलेत. मात्र यापुढे काळजी घ्या. स्वत:ला असे वेड्या साहसात झोकून देऊ नका. आपल्या शिरावर अवघ्या शाही फौजेच्या रक्षणाची जिम्मेदारी आहे. अल्लाच्या फजलोकरमसे तुम्ही मरणाच्या दारातून परत आलात. आता आपण पेशावरला पोहोचेपर्यंत सारा प्रवास तुम्ही माझ्या खास हत्तीवरून कराल. नाही म्हणू नका.

महाबतखान जागेवरून उठला. त्याने कुलीखानाला घट्ट आलिंगन दिले. सदरेत मुबारकबादचे नारे घुमले. कुलीखानाने सुटकेचा नि:श्वास सोडला. आई भवानी आणि खंडेरायाचे मनोमन आभार मानले आणि महाराजांची क्षमा मागितली. असे अंगलट येणारे वेडे साहस पुन्हा करायचे नाही, अशी त्याने मनाशी पक्की खूणगाठ बांधली.
एक वादळ शमले. दुसऱ्याच दिवशी रावीतीरावरून छावणी पुढे रवाना झाली. सुदैवाने मध्ये कुठला प्रसंग उभा राहिला नाही. मजल दरमजल करीत फौजा अडीच महिन्यांनंतर पेशावरला पोहोचल्या. लाहोर प्रकरणातून कुलीखान सुखरूप सुटला असला, तरी त्याच्यावरील नजर अंमळ अधिक कडक झाली. अगदी जाणवावी इतपत. पण त्याच्या सुरक्षेचा आणि नाजूक प्रकृतीचा बहाणा पुढे केला गेला. महाबतखानाने सारा वृत्तान्त दिल्लीला बादशहाकडे पाठविला. होय, आता बादशहा दिल्लीला परत आला होता. आपल्या अखबारीसोबत त्याने कुलीखानाची दलील शब्दश: पाठविली. शिवाय त्यावर त्याची अनुकूल टिप्पणीसुद्धा जोडली. बादशहाकडून कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. याचा अर्थ बादशहाने ते प्रकरण बंद केले असाच घेतला गेला.

पावसाळा तोंडावर आलेला असल्याने पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष मोहीम सुरू करावी. तोपर्यंत फौज महम्मद कुलीखानाची मेहमान म्हणून त्याच्या जहागिरीतच राहावी असा महाबतखानाचा निर्णय झाला. अर्थात एवढी मोठी फौज रिकामी बसवून ठेवणे तर शक्य नव्हते. आसपासच्या प्रदेशात उद्भवलेली बारीकसारीक बंडे मोडून काढण्याचा मोठाच उद्योग होता. अनेक वर्षांत कोणी सक्षम जहागीरदार नसल्याने साऱ्या जहागिरीत अनागोंदी माजली होती. बंडखोर निर्माण झाले होते; त्यामुळे जागोजागी मोठ्या तुकड्या पाठवून बंडांचा बीमोड सुरू झाला. त्याशिवाय दाणागोटा, वैरण-चारा इत्यादीची बेगमी करून ठेवून मोहिमेच्या काळात फौजेला त्याचा नियमित पुरवठा होत राहील अशी तजवीज करणे, तोफा-बंदुका, दारूगोळा इत्यादींचा साठा करणे, ओझ्याच्या तसेच लढाऊ जनावरांची खरेदी, भोवतालच्या मांडलिकांकडून आणि लहान-मोठ्या वतनदारांकडून वसूल गोळा करून खजिन्याची भर करणे, स्थानिक जवानांची फौजेत भरती करून घेणे, पठाणांच्या प्रदेशात नजरबाजांच्या तुकड्या पाठवून परिस्थितीचा अंदाज घेणे, अफगाणिस्तानात असलेल्या शाही अंमलदारांशी संपर्क निर्माण करणे, त्यांची हौसला अफजाही करणे अशी कामे सुरूच होती. महाबतखान कुलीखानाला प्रत्येक बाबीत विश्वासाने सामील करून घेत होता. त्याच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवीत होता. कुलीखानासाठी हा सारा प्रकार अगदीच नवीन होता. त्याच्या आजवरच्या मोहिमा म्हणजे टाक झडप की कर गडप अशा झटपट स्वरूपाच्या होत्या.

सरलष्कर महाबतखानाच्या मदतीने त्याने जहागिरीचा ताबा घेतला. वसूल आणि खर्चाचा ताळेबंद तपासून पाहिला. काही नव्या नेमणुका केल्या. काही उद्दाम कारभाऱ्यांना आणि मुलाजिमांना घरी बसविले. काहींवर छोट्या-मोठ्या कारवाया केल्या. त्यात मुफ्ती नसरुद्दीनवर काही ओरखडे उठणे साहजिक होते. एकूण कारभाराची रीतसर घडी बसविली. हा अनुभव पण तसा नवाच. आजवर लूट किंवा वसूल आणला, महाराजांच्या पायी वा मुजुमदाराच्या हाती सोपविला की हात झटकून पुढच्या मोहिमेला मोकळा. फौजेचा रसद-दाणागोटा आणि रोजमुरा या वेगळी मुजुमदारी वा फडणिशी करण्याचा कधी प्रसंगच आला नव्हता. मोगलाईत जहागीरदार हा तेवढ्या प्रदेशाचा सर्वसत्ताधीशच असतो. अगदी न्यायदानापासून प्रत्येक बाब त्याच्या अखत्यारीत; धार्मिक बाबींचा जिम्मासुद्धा त्याचाच. कुलीखानाला वाटले, ‘चला, यानिमित्ताने नवा अनुभव पदरी पडला. उद्या स्वराज्य विस्तारले की हे सारे करणे आलेच. त्या वेळी वेगळी डोकेफोड नको.’

बलुचिस्तानचा मुलूख पहाडी. हिंदुकुश पर्वताच्या उत्तुंग रांगांनी वेढलेला. पाऊस भरपूर, पण त्याला कोकणातल्या वा घाटमाथ्यावरच्या पावसाची सर नव्हती. पाऊस पडल्यानंतर भयंकर थंडी सुरू झाली. अगदी कल्पना करता येणार नाही इतकी. दिल्ली-आग्रा त्या मानाने उबदारच म्हणायचे. फौज डेरे-राहुट्यांतून राहत असली तरी जहागीरदार महम्मद कुलीखान आपल्या बायका-पोरांसह स्वत:च्या आलिशान हवेलीत आरामात राहत होता. तशीच एक आलिशान हवेली सरलष्कर महाबतखानाच्या जनानखान्यासाठी मुक्रर केली गेली होती. सगळा ऐशआराम सुरू होता. सारी सुखे हात जोडून समोर उभी होती. आजवर एवढी सत्ता कधी उपभोगायला मिळाली नव्हती. फक्त एकच त्रास होता; आठवणींचा. जुन्या आठवणी. स्वराज्याच्या, महाराजांच्या, आईसाहेबांच्या, जुन्या सोबत्या-सवंगड्यांच्या, तुळजापूर, पंढरपूर, जेजुरीच्या. त्या आठवणी मात्र चैन पडू देत नसत.

पावसाळा संपत आल्याच्या खुणा दिसू लागल्या. फौजा अफगाणिस्तानात सरकण्याच्या हालचाली सुरू झाल्या. डोंगरी वाटा निर्धोक करण्यासाठी आघाडीच्या तुकड्या खैबरखिंडीकडे रवाना झाल्या. उद्या-परवाकडे खाशा स्वाऱ्या डेरेदाखल व्हायच्या होत्या. आदल्याच दिवशी बादशहाने दिल्लीवरून पाठविलेला दारूगोळा आणि कुमकेच्या तुकड्या छावणीत दाखल झाल्या होत्या. रोज सायंकाळी भरणारी सरलष्कराची सदर आटोपून कुलीखान आपल्या दालनात आला तेव्हा दिवेलागण होत होती. एक हब्शी खिदमतगार चिराग रोशन करीत होता. कुलीखानाची चाहूल लागताच तो ताठ झाला. मग लवून कुर्निसात करून शांत उभा राहिला. चिरागदानाचा प्रकाश त्याच्या काळ्याशार हब्शी चेहऱ्यावर चमकत होता. त्याच्या चेहऱ्याकडे नजर जाताच कुलीखान दचकला. त्याच्या तोंडून सहजोद्गार बाहेर आले–

तू? तू इथे?
खिदमतगाराने तोंडावर बोट ठेवून त्याला शांत राहण्याची खूण केली. हाताने मसनदीकडे इशारा केला. कुलीखान सावकाश बैठकीवर बसला. त्याच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य लपून राहू शकत नव्हते. तो काही बोलणार तोच खिदमतगाराने त्याला पुन्हा गप्प राहण्याची खूण केली. तो दाराजवळ गेला. दोन्ही बाजूंना नीट न्याहाळून पाहून तो परत बैठकीजवळ आला. अगदी हलक्या आवाजात तो बोलला–

जी हुजूर. तुमच्या खिदमतीत मी पुन्हा दाखल झालो आहे. माझे नाव आहे सिद्दी आफताबखान. आलमपन्हांचा खास माणूस म्हणून तुमच्यावर नजर ठेवण्याची खास कामगिरी मला दिली गेली आहे. आम्ही पाच असामी आहोत. आपली पूर्वी गाठभेट झाली असल्याने मी तुमच्यासमोर उघड झालो आहे. बाकी चौघे इतक्यात समोर येणार नाहीत. प्रसंग येईल तसतसा मी स्वत: एकेकाला तुमच्यासमोर उघड करीनच. प्रत्येकजण शंभर टक्के खात्रीचा आहे. त्याची काळजी नको. दिल्ली सोडताना आम्ही आठ होतो. माझे चार सोबती आपल्याच दस्त्यातले आहेत. त्यांना मीच निवडले आहे. बाकी तिघे परके, सिद्दी फुलादखानाच्या खास विश्वासातले होते; त्यामुळे जरा काळजी वाटत होती. वाटेने येताना पंजाबी सुभ्यात शिखांबरोबर मोठी चकमक उडाली. तेव्हा त्यातले दोघे माझ्या शेजारीच लढत होते. मोका साधून मी एकाच्या पाठीत तलवार खुपसली. ती थेट काळजात पोहोचली. तेवढ्या धामधुमीतसुद्धा त्याच्या सोबत्याच्या ध्यानात हा प्रकार आला. त्याने जोरात ओरडून माझ्यावर घाव घातला. सुदैवाने मी तो तलवारीवरच झेलला. मात्र मला आयती संधी मिळाली होती. त्याला दुसऱ्यांदा तलवार पेलण्याची संधी न देता त्याचा फाळका उडवला. हा प्रकार अगदी उघडपणे झाला कारण त्याच्या आरोळीने इतरांचे लक्ष वेधले गेले होते. मग काय करणार, तो शिखांना फितूर झाला होता; त्याच्या इशाऱ्यावरच त्यांनी छापा मारला होता. पहिल्याचा खून त्यानेच केला वगैरे सांगून मोकळा झालो. तिसरा काही लढाऊ नव्हता. हजाम होता. प्रवासात त्याला आग्रह करकरून इतके उलटसुलट खायला घातले की, बिचारा भलताच आजारी झाला आहे. त्याची देखभाल मीच करतो आहे. दवाई म्हणून त्याला सोनामुखीचा काढा देतो, दिवसातून एकदा. चार-पाच दिवसांत बिचारा सोबत्यांच्या भेटीला रवाना होईल. त्याची चिंतासुद्धा मिटल्यातच जमा आहे.

उत्तम! पण तू इथे कसा येऊ शकलास? काय हिकमत लढवलीस? सांग तरी.
मोठी लंबी दास्तान आहे सरकार. मोठ्या शिकस्तीने सिद्दी फुलादखानाच्या डोक्यात एक गोष्ट भिनवली ती म्हणजे आपला ज्यावर विश्वास बसू शकेल असा आलमपन्हांचा खास माणूस तुमच्या आसपास राहून तुमची खबरबात थेट आलमपन्हांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. एकदा फुलादखानाला हे पटल्यावर त्याने ते वजीर जाफरखानाच्या गळी उतरवले. मग आलमपन्हांना पटवणे फारसे अवघड नव्हते. या मसलतीसाठी फुलादखानाचे कौतुक झाल्याने माझा पण भाव वधारला. ऐन त्रासात मी तुम्हाला पाणी पाजले, त्यासाठी फटके खाल्ले. तसेच इस्लाम कबूल करण्याचे सर्वप्रथम तुम्ही मलाच सांगितलेत. मग या कामगिरीसाठी माझ्यापेक्षा कोण लायक असणार? मात्र काही झाले तरी तो बेटा आलमगिराचाच माणूस. तसाच संशयी. म्हणून त्याने त्याची स्वत:ची माणसे सोबत जोडली. पण मघाशी सांगितले त्याप्रमाणे आता त्यांचा प्रश्न मिटला आहे. बरे. सरकार इतक्या लांबवरून महाराजांकडे वार्ता पोहोचवणे अवघड आहे. तरी काहीतरी तोड निघेलच. नियमित नाही तरी अधूनमधून काही व्यवस्था होईलच. मात्र आपल्या जिवाला काही धोका होणार नाही याची सतत काळजी घेण्याचा हुकूम आहे. त्याची चोख तामील होईल. खात्री बाळगा. सरकार, आपल्या भोवतालचा प्रत्येक प्यादा, शिपाई, खोजा, खिदमतगार, बांदी - लौंडी आलमगिराचा हेर आहे असे मनात धरूनच वागा आणि व्यवहार करा. अल्ला तुमची मनशा लवकरात लवकर पूर्ण करील. मात्र लाहोरला जे घडले तसे पुन्हा घडू देऊ नका. आता आम्ही आहोत. फार वेळ रेंगाळणे धोकादायक आहे. आता रोजच संगत आहे. पुन्हा बोलू.

कुर्निसात करून सिद्दी आफताबखान कमऱ्यातून निघून गेला. कुलीखानाच्या मनात महाराजांच्या आठवणींचा नवा उमाळा उसळला.

यथावकाश खैबरखिंड ओलांडून शाही फौजा अफगाण प्रदेशात शिरल्या. स्वराज्यापासून हजारो कोस दूर, हिंदुस्थानच्या सीमांच्या पार पलीकडे, संपूर्ण अनोळखी असलेल्या अफगाणिस्तानच्या दुर्गम, डोंगराळ आणि रखरखीत प्रदेशात पठाणांच्या विरुद्ध जोरदार मोहीम सुरू झाली. महम्मद कुलीखान जीव तोडून झुंजत होता. स्वत:च्या अक्कलहुशारीने अनेक मोहिमा आखत होता. चमकदार विजय मिळवीत होता. भरमसाट लूट गोळा करीत होता. आपले कर्तृत्व, इमान सिद्ध करण्यासाठी धडपडत होता. आपले शौर्य, निष्ठा, तळमळ महाबतखान आणि अन्य जुन्या मानकऱ्यांच्या मनात भरावी, त्यांनी त्यांच्या टपालात बादशहाकडे कौतुक करावे, बादशहानेसुद्धा आता तो पुरता ‘मोगल’ झाला याची खात्री पटून माघारी बोलवावे, जुना अनुभव लक्षात घेऊन दख्खनच्या मोहिमेवर नेमणूक करावी अशी आस त्याला लागून राहिली होती. शिवाजीला नामोहरम करून दख्खन जिंकण्यासाठी, त्या इलाख्यात बाटवाबाटवी करण्यासाठी म्हणून तर नेताजीला बादशहाने जिवंत ठेवून त्याचा कुलीखान केला होता. खुद्द बादशहाने भरदरबारात तसे बोलून दाखविले नव्हते का?

पठाणांची जमात मोठी विक्षिप्त. त्यांची निष्ठा फक्त त्यांच्या टोळीशी आणि इमान टोळीप्रमुखाशी. त्यापलीकडे ते कोणालाच जुमानायला तयार नसतात. हाडवैर म्हणजे काय ते पठाणांकडून शिकावे. स्वभाव अत्यंत मानी. मानापमानाच्या संवेदना प्रमाणाबाहेर तीव्र. डोके कायम भडकलेले. वृत्ती स्वतंत्र. कोणाचीही ताबेदारी त्यांना अमान्य. टोळीप्रमुखाशी टोळीतला प्रत्येक पठाण एकनिष्ठ असला, तरी मनमानी करून टोळीवर आपले निर्णय लादण्याची त्याची प्रज्ञा नसे. टोळीअंतर्गत त्यांची शेकडो वर्षांची परंपरा असलेली लोकशाही असे. प्रत्येक महत्त्वाचा निर्णय सर्वानुमते वा बहुमतानेच होत असे. पठाण कडवे धर्मनिष्ठ. कडवे लढवय्ये. विपरीत निसर्गाशी सतत झुंजत राहिल्याने शरीरप्रकृती अत्यंत दणकट आणि काटक. झुंजीत पराभव झाला तरी जेत्याचे वर्चस्व मान्य न करणारे. जेत्याची पाठ वळताच ते पुन्हा आपले स्वतंत्र ते स्वतंत्रच. या त्यांच्या वैशिष्ट्यामुळे कोणा परक्याने पठाणांवर राज्य करण्याची आकांक्षा बाळगणे म्हणजे पारा मुठीत धरण्याची इच्छा करण्यासारखे होते.

पठाणांच्या स्वभाववैशिष्ट्यांबद्दल मोगली फौजेत ख्वाजा मोइउद्दीन चिस्तीचा एक किस्सा वारंवार सांगितला जात असे. ख्वाजा अरबस्तानातून हिंदुस्थानात येत होता. खैबरखिंड ओलांडून त्याने सरहिंदमध्ये प्रवेश केला. त्या वेळी त्याची एका हिंदू साधूशी गाठ पडली. तो साधू एका झाडाखाली त्याच्या जवळचे हरणाचे कातडे अंथरून आसन तयार करण्याच्या खटपटीत होता. ते कातडे एका बाजूने सरळ केले की दुसऱ्या बाजूने गुंडाळले जाई. दुसऱ्या बाजूने सरळ केले की पहिली बाजू पुन्हा होती तशी गुंडाळली जाई. साधूची पार दमछाक झाली. ख्वाजा त्याची गंमत पाहत खूप वेळ उभा होता. शेवटी न राहवून त्याने साधूला विचारले–

अरे बाबा, हे असले विचित्र कातडे तुला कोठे मिळाले?
कैकेय देशातल्या (अफगाणिस्तान) माझ्या एका भक्ताने मोठ्या प्रेमाने आणि श्रद्धेने हे मला भेट दिले आहे. माझ्यासाठी त्याने स्वत: त्याची शिकार केली होती.
मग बरोबर आहे. जशी त्या देशाची माती आणि आबोहवा तसेच तिथल्या माणसांचे आणि अर्थातच जनावरांचेसुद्धा स्वभाव. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असे म्हणतात. पण मला तर साफ दिसते आहे की, मेल्यानंतरसुद्धा त्या हरणाची खोड गेलेली नाही. बाबा रे, सोड त्या कातड्याचा नाद आणि माझ्या या घोंगडीवर बैस.

पठाणांचे अक्षरश: तसेच सुरू होते. उत्तरेकडून त्यांना जिंकत, चेपत पार अगदी इराणच्या सरहद्दीपर्यंत पोहोचावे तर बंदोबस्तासाठी मागे ठेवलेली फौज कापून काढून पिछाडीला पठाणांनी स्वत:ला पुन्हा स्वतंत्र करून घेतलेले असे. पुन्हा त्यांच्याबरोबर नव्याने झुंज! इकडे त्यांना पुन्हा जिंकून घेतले न घेतले तोच दक्षिणेच्या पठाणांनी पुन्हा बंड पुकारल्याच्या खबरा येऊन थडकत. धावा पुन्हा त्या आघाडीवर! त्यामुळे दिवसांमागून दिवस लोटले, महिने सरले, वर्षे उलटली तरी कुलीखान पठाणांशी झुंजतच होता.
हा प्रकार आणि हा अनुभव शाही फौजांना नवा नव्हता. अगदी हुमायुनच्या काळापासून ही कसरत वर्षानुवर्षे चालूच होती. मात्र त्यावेळच्या आणि यावेळच्या मोहिमेत एक मोठा फरक होता. ज्या राजपुतावर बादशहा खफा होई, त्याला अफगाणिस्तानात पाठविले जाई. मग बादशहाची मर्जी संपादन करण्यासाठी राजपूत झुंजत. मरत. बादशहासाठी रक्त सांडत. मात्र या मोहिमेत एकजात सारे मुसलमान. सेनापतीपासून भिस्त्यापर्यंत आणि हुजऱ्यापासून बाजारबुणग्यापर्यंत. अशा काबाडकष्टांची अय्याशीला चटावलेल्या मोगल मनसबदार दरबाऱ्यांनाच नव्हे तर शिपायांनासुद्धा सवय राहिलेली नव्हती; त्यामुळे ते थकून, कंटाळून टेकीला आले. माघारी जाण्यासाठी बादशहाकडे अर्ज-विनंत्यांचा सपाटा लावू लागले.

मोहिमेतील सरदार बदलत गेले. जुन्या तुकड्या जात, नव्या दमाच्या नव्या तुकड्या येत. मात्र या मोहिमेत सुरुवातीपासून ठरविलेल्या धोरणात किंचितही फरक पडला नव्हता. फक्त मुसलमान, त्यातही खानदानी मुसलमानच अफगाणिस्तानात नामजद होत. फक्त कुलीखान आणि सरलष्कर महाबतखान हे मात्र सुरुवातीपासून अद्याप कायम होते. महाबतखानसुद्धा केवळ कुलीखानामुळेच अडकून पडला होता. वर्षानुवर्षे तो घरापासून, वतनापासून, शाही दरबारापासून, बादशाही कृपेपासून दूरच झाला होता. त्याच्या जहागिरीत अनागोंदी माजल्याच्या खबरा त्याला मिळत होत्या. शाही दरबारातील त्याचे प्रतिस्पर्धी, उघड आणि प्रच्छन्न दुश्मन, त्याच्याविरुद्ध बादशहाचे कान फुंकण्याच्या खटपटीत असल्याचे त्याच्या कानी येत होते. वजीर जाफरखान त्याचा जवळचा रिश्तेदार असल्याने तो काहीसा निश्चिंत असला तरी ती मोगलाई होती. मोगलाईत कधी कोणाचे काय होईल याचा अंदाज प्रत्यक्ष अल्लाला लागणेसुद्धा दुरापास्त, हे तो पिढ्यान् ढ्यांच्या अनुभवाने चांगले जाणून होता; त्यामुळे तोसुद्धा आता पार वैतागून गेला होता. हळूहळू मोहिमेचा सारा भार कुलीखानावर सोपवून तो पिछाडीला काबूलमध्येच राहू लागला. मात्र या खटाटोपातून कुलीखानाची सुटका नव्हती. तो बिचारा वाऱ्यामागे धावणाऱ्या पिसाटासारखा पठाणांच्या मागे धावतच होता. झुंजतच होता. रानोमाळ भटकत होता.

कंटाळून गेलेला महाबतखान रोजच्या रोज बादशहाकडे अर्ज धाडून राजधानीत माघारी बोलावण्याची विनंती करीत होता. बादशहा त्याला एकच उत्तर धाडीत होता–
कुलीखानावर नजरकैद जारी आहे. तो इतका चलाख आहे की, त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी कोणा ऐऱ्यागैऱ्यावर विसंबणे शक्य नाही; त्यामुळे जोपर्यंत त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी तुझ्या तोडीचा दुसरा काबील दरबारी नजरेत येत नाही, तोपर्यंत तुला माघारी बोलावणे शक्य नाही.
या साऱ्याचा परिणाम असा झाला होता की, अफगाण मोहीम तर सुरू होती, पण तिच्यातील पहिला जोश आणि उत्साह ओसरला होता. एकटा कुलीखानच जीव तोडून काही करू पाहत होता. बादशहाच्या नजरेत भरून माघारी बोलावले जाण्याच्या वेड्या आशेपायी! बादशहाने पण ही मोहीम केवळ कुलीखानाला दख्खनपासून दूर गुंतवून ठेवण्यासाठीच काढली होती. त्याचा उत्साहसुद्धा आता उणावला होता; त्यामुळे कुमकेचा ओघ रोडावला, खजिन्याचा पुरवठा आटला होता. प्रसंगी दारूगोळ्यावाचून तोफा आऽऽ वासून पडलेल्या राहत, तर कधी चून चाऱ्यावाचून जनावरांची उपासमार होई.

बहिर्जी येऊन छत्रसाल बुंदेल्याची खबर देऊन गेला त्याला वर्षे उलटली. महाराज त्या तेजस्वी तरुणाची आतुरतेने वाट पाहत होते. परंतु महाराज आणि छत्रसाल भेटीचा योग येत नव्हता. महाराजांची छावणी पुणे प्रांतात भीमेच्या काठावर पडली होती. भीमेच्या पल्याड मोगलाई प्रदेश सुरू होई. दोन-तीन दिवसांत छावणी हलण्याच्या बेतात असताना खबर आली– कुंवर छत्रसाल मोगली छावणीतून पसार झाले आणि भेटीस येण्यासाठी स्वराज्याच्या दिशेने दौडताहेत. महाराजांनी छावणीचा मुक्काम वाढविण्याचे हुकूम दिले. यथावकाश कुंवर छत्रसाल छावणीत दाखल झाले. महाराजांनी मोठ्या अगत्याने त्यांची भेट घेतली. त्या तरण्याबांड तेजस्वी तरुण बुंदेल्याने महाराजांच्या मनात लगेचच स्थान मिळविले. महाराजांनी मोठ्या आग्रहाने त्यांना छावणीत ठेवून घेतले.

कुंवर छत्रसाल महाराजांची कर्तबगारी आणि पराक्रम ऐकून होते. मागे अनेक वर्षांपूर्वी त्यांनी मिर्झाराजांच्या छावणीत महाराजांची भेट घेतली होती. परंतु ती भेट अगदीच चुटपुटती आणि औपचारिक होती. मात्र तेवढ्या भेटीनेच छत्रसाल दिपून गेले होते. त्या वेळी उत्पन्न झालेली ठिणगी या भेटीतील महाराजांची सलगी, आत्मीयता आणि कौतुकाचे खतपाणी मिळाल्याने चांगलीच रसरसली होती. महाराजांपासून प्रेरणा घेऊन छत्रसाल अंतर्बाह्य पेटून उठले होते. मनात महाराजांची सेवा करावी, स्वधर्म आणि स्वराष्ट्रासाठी जिवाची कुरवंडी करावी अशी ऊर्मी जागी झाली; परंतु महाराजांनी त्यांना आपल्या पदरी नोकरीवर ठेवून घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्या उलट त्यांना बुंदेलखंडात स्वत:चे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली. एका तेजस्वी ज्योतीने दुसरी ज्योत प्रज्वलित झाली होती. महाराज रोज त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करीत होते. अखेर छत्रसालांचा परतण्याचा दिवस जवळ आला. उद्या ते मायभूमीकडे प्रयाण करणार होते. दोन प्रहरी ते महाराजांचा निरोप घेण्यासाठी त्यांच्या डेऱ्यात गेले. मोठ्या प्रेमाने महाराजांनी त्यांना शेजारी बसवून घेतले. अनेक बोलणी झाली. निरोप घेता घेता कुंवरजी म्हणाले–

महाराजसाहेब, आपल्या आज्ञेप्रमाणे मी माझ्या मातृभूमीत स्वराज्य आणि स्वधर्माची स्थापना करीनच. तरी आपण काही कामगिरी आमच्यावर सोपवावी. ती यशस्वी केल्याचे समाधान आम्हास मिळावे अशी मनोकामना आहे.
प्रसन्न हसून महाराज म्हणाले–
आज हवा अशी सुंदर पडली आहे की दूरवर रपेट मारून यावे असे वाटते. तूर्तास तीच कामगिरी समजावी.

राजा बोले, दळ हाले. ताबडतोब घोडी आणवली गेली. महाराजांच्या डाव्या हाताला दुडक्या चालीने छत्रसाल घोडा पळवीत होते. पन्नास-साठ स्वारांची तुकडी अंतर राखून मागे दौडत होती. नदीतीरावर एका रमणीय आमराईत महाराजांनी घोडी थांबवली. स्वारांना तिथेच उभे राहण्याची इशारत करून दूर उभे ठेवले. महाराजांनी आपले घोडे पात्राच्या अगदी निकट नेले. छत्रसाल शेजारी होतेच.
महाराजसाहेबांना शायद काही खास फरमावयाचे आहे असे वाटते.

होय कुंवरजी. तुम्ही तुमची इच्छा व्यक्त केली आणि आमच्या मनावरचे ओझे उतरवलेत. आपण भेटीस येण्याचे कळले त्या दिवसापासून हे काम आम्ही मनाशी योजून ठेवले होते. प्रश्न होता ते आपणास कसे सांगावे हा. आपण आमची अडचण दूर केलीत.
महाराजसाहेबांनी इतका संकोच धरू नये. आपला नि:श्वाससुद्धा आम्हासाठी आज्ञा आहे. जिवाची बाजी लावू पण कामगिरी पूर्ण करू.

उत्तम! कुंवरजी आपण जाणता, आमचे जुने सरनोबत नेताजी पालकर आम्हावर रुसून मोगलांस जाऊन मिळाले. आजघडीला त्यांनी यावनी धर्म स्वीकारून महम्मद कुलीखान या नव्या नावाने आलमगीर बादशहाची चाकरी पत्करली आहे. काबूल-कंदाहारच्या पठाणी मुलखात ते मोहीम गाजवीत आहेत.
होय महाराज, त्यांचे धरणे झाले तेव्हा आम्ही दिलेरखानाच्या छावणीतच होतो. एवढ्या थोर सेनानीचे हे दुर्दैवी अध:पतन पाहून मन खिन्न होते. आपला इतक्या वर्षांचा सहवास लाभूनसुद्धा त्यांनी असे करावे, मोठेच आश्चर्य आहे.
महाराजांच्या चर्येवर वेदनेची एक सूक्ष्म कळ उमटून गेली. डावा हात हवेत उडवून त्यांनी यावर अधिक चर्चा टाळली.

ते असो. आता ती बाब महत्त्वाची नाही. समस्या अशी आहे की, त्यांना स्वराज्याची अनेक गुपिते ज्ञात आहेत; त्यामुळे त्यांना आहेत तशा अवस्थेतच साधेल तसे परत आणायचे आहे. पण आलमगीर खानदानी मुसलमानांशिवाय कोणासही त्यांच्या आसपास फिरकू देत नाही. इतक्या दूरवर परक्या मुलखात आम्हाला आमचे जाळे उभारणे शक्य होत नाही. अशाही अवस्थेत आम्ही आमची पाच विश्वासू माणसे त्यांच्या खिदमतगारीत घुसवली आहेत. परंतु त्या बिचाऱ्यांचेसुद्धा पुढे काय झाले गेल्या कित्येक वर्षांत समजले नाही.
आपण आज्ञा करा. आम्ही स्वत: जाऊन त्यांची खबर खैरियत घेऊन येतो.
महाराज मंद हसले.
इतक्या क्षुल्लक कामासाठी आपल्यासारखा मोहरा इरेला घालण्याची गरज नाही. आमचे नजरबाज त्या कामगिरीवर आहेतच. आपल्यासाठी विशेष कामगिरी आहे.
सांगावी महाराज.
आम्ही चाळीस-पन्नास निवडक स्वारांचा एक दस्ता उभा केला आहे. त्यात काही पठाण, काही थोडे अरब आणि बरेचसे आपल्या रोहिल खंडातील रोहिले आहेत. माणसे पारखून-जोखून घेतलेली पूर्ण विश्वासाची आहेत. त्यांचा नायक आहे नर्दुल्लाखान पठाण.
माफी असावी महाराज, पण या दस्त्यातील सारीच माणसे यवन. त्यांचा भरवसा कितपत धरता येईल? त्यांचे इमान शेवटी त्यांच्या धर्माकडेच झुकायचे.

कुंवरजी, हीच तर गोम आहे हिंदवी स्वराज्याची. आम्ही यवन-परकीय मुसलमानांच्या उरावर ही हिंदुपतपातशाही उभी केली आहे. असे असले तरी आमच्या रयतेत मुसलमान सुखाने नांदत आहेत. स्वराज्यासाठी झुंजत आहेत. रक्त सांडत आहेत. आमचा आरमारी सुभा तर इब्राहिमखान सांभाळत आहेत. त्यांना जाण आहे आम्ही धर्मांध नाही. हिंदूंच्या अंगभूत सहिष्णुतेवर आणि धर्मबुद्धीवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. त्याशिवाय या कामगिरीसाठी त्यांनी पवित्र कुराणाची आणि रोटीची शपथ घेतली आहे. त्याचा विश्वास धरण्यास हरकत नाही. पण त्यांची कामगिरीसुद्धा मर्यादित आहे. नेताजींवर फक्त अष्टौप्रहर नजर ठेवणे, त्यांच्या जिवास अपाय होऊ न देणे आणि जर ते स्वराज्याला घातक अशी काही हालचाल करतील किंवा तसे काही विपरीत करण्याच्या विचारात असतील तर, हर प्रयत्न करून त्याची खबर आम्हास देणे. पुढची कारवाई त्यानंतर ठरेल. बस्स इतकेच.

मग या साऱ्यात आमच्याकडून नेमके काय अपेक्षित आहे?
हा दस्ता काबूलमध्ये पोहोचवून त्याचा नेताजींच्या अंगरक्षक दलात शिरकाव करवून द्यायचा. मध्यंतरी शहजादा मुअज्जममार्फत खटपट करून पाहिली होती. पण त्याचे आमच्याशी असलेले गोडीचे संबंध पाहून बादशहा शंकित झाला. सध्या आलमगिराची त्याच्यावर इतराजी झाली आहे.
मग जे शहजाद्याला जमले नाही ते आम्हाला नवख्याला जमेल असा आपला विश्वास आहे?
अशक्य वाटणारे शक्य करून दाखवणे यालाच स्वराज्यात कामगिरी म्हणतात. बाकी उरते ती शिपाईगिरी आणि मजुरी. काबूल-कंदाहारच्या मोहिमेचा सरलष्कर महाबतखान आणि आपले पूज्य तीर्थरूप चंपतराय यांचा जुना घरोबा. आपल्या पिताजींच्या मृत्यूनंतर त्याने आपणास बरीच मदत केलेली आहे. या जुन्या घरोब्याचा फायदा घेऊन आपण हे काम करावे अशी आमची इच्छा आहे. विचार करून ठरवा. शक्य वाटले तरच हो म्हणा. आमच्या भिडेखातर, दडपणाखाली हो म्हणाल आणि चाळीस-पन्नास निरपराध जीव निष्कारणी खस्त व्हायचे. असे करू नका.

आपण निश्चिंत असावे महाराजसाहेब. आपण दिशा दाखवलीत. पुढचा जिम्मा आमचा. मोगलाई म्हणजे भ्रष्टाचाराची बजबजपुरी. पुरेसा पैसा खर्च केला तर बादशहाच्या पंजासारखा पंजा उमटवलेले फर्मानसुद्धा जिथे काढून मिळते तिथे काही परवाने मिळवणे कितीसे अवघड. वेगवेगळ्या मोहिमांवर तुकड्यांची अदलाबदल सतत सुरू असते. अशाच एखाद्या तुकडीत घुसवून आपला हा दस्ता काबूलमध्ये महाबतखानापर्यंत पोहोचवणे फारसे अवघड नाही. आम्ही स्वत:चे पत्र देऊन पाठवले तर महाबतखानाच्या फौजेत शिरकाव अशक्य नाही. मात्र नेताजींच्या अंगरक्षक दलात शिरकाव कसा करायचा हे मात्र नर्दुल्लाखानाच्या कौशल्यावर विसंबून असेल.

आपल्याकडून आमची एवढीच अपेक्षा आहे. उद्या आपण दुपारच्या भोजनानंतर परत निघणार; तेव्हा आपली पुन्हा भेट नाही. नर्दुल्लाखानाचा दस्ता आपल्यासोबतच कूच करून निघेल. दुसरे अत्यंत महत्त्वाचे. ही मसलत आपण आणि नर्दुल्लाखान याशिवाय तिसऱ्यास कळता कामा नये याची दक्षता घ्या. चला, परतू या.
आज्ञा महाराज. आपण निर्घोर असावे.
रपेट संपवून डेऱ्यात परतल्याबरोबर महाराजांनी रामाजी पांगाऱ्यांना बोलावून घेऊन आज्ञा केली–
नाईक, नर्दुल्लाखानाच्या हाताखाली आपण एक खास दस्ता तयार केला आहे. सध्या तो आपल्या निसबतीत आहे. आम्ही आता तो कुंवर छत्रसालांच्या मदतीसाठी मुक्रर केला आहे. उद्या ते छावणी सोडणार आहेत. आपला दस्ता त्यांच्या सोबतच रवाना होईल. यात हयगय नको. त्यांचा विनाकारण खोळंबा होता कामा नये.
क्षमा महाराज, पण पुराच्या पुरा दस्ता यावनी. कुंवरजी तरुण. त्यांना अनुभव नाही. काम नवे. मुलूख नवा. काही गडबड झाली तर?

*हंऽऽ! रामाजी काका, आमच्यावर विश्वास ठेवा. आज्ञा दिली तिची तामील करा. मनात किंतू ठेवून कोणते काम करू नये. तो दस्ता त्यांच्या सुपुर्द करण्यामागे आमचा खास मकसद आहे. असे करा, रात्रौ भोजनोत्तर नर्दुल्लाखानास आम्हाकडे लावून द्या. आम्ही जातीनिशी त्यांना सारे समजावून सांगू.*
*आज्ञा…*
*दुसऱ्या दिवशी दुपारी छत्रसाल आपल्या देशी परत गेले. त्यांच्या सोबत, त्यांच्याच तुकडीत सरमिसळून नर्दुल्लाखानाचा दस्ता बुंदेलखंडाकडे रवाना झाला.*
*_क्रमश:_*

*________📜🚩

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...