फॉलोअर

सोमवार, ३० डिसेंबर, २०१९

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔ अग्निदिव्य भाग - 11

 नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔
 अग्निदिव्य

लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार

📜⚔🗡भाग - 1⃣1⃣📜⚔🚩🗡___

_⚔🚩⚔📜🚩___


जी म्हाराज, समदं नीट ध्यानात आलं. आपुन सांगाल तसंच व्हुईल. चिंता नगं.

उत्तम! या विषयीची खबर घेऊन येणारा नजरबाज थेट आमच्यापर्यंत पोहोचू देत. आम्ही कितीही कामात वा व्यग्र असलो तरी. आम्हाशिवाय एक शब्दसुद्धा इतरांच्या कानी पोहोचता उपयोगाचा नाही. अगदी पंतप्रधान वा सरनोबतांच्यासुद्धा नाही. आम्ही कोठेही असलो तरी सासवडचे अंजीर घेऊन येणाऱ्या खबऱ्यासाठी आमचे दरवाजे अष्टौप्रहर उघडे आहेत. आमची निद्रा भंग करावी लागली तरी फिकीर करू नये.

जी म्हाराज, तसंच व्हुईल.
आता कोणाचीही भेट न घेता थेट विजापूर गाठा. अगदी आईसाहेबांचेसुद्धा दर्शन घेण्यास आम्ही मना केले आहे असे समजा. खर्चाची चिंता नको. विजापुरात लिंगण्णा सावकाराच्या पेढीवरून आणि कोल्हापुरात तुकाशेट गंगणेच्या पेढीवरून लागेल तशी उचल करा. कशी ते सांगणे नकोच.
जी म्हाराज, असाच टाकोटाक गड सोडतो.
हो, बरे आठवले, थांबा. मागे आम्ही उत्तरेतील कामगिरी सोपवली होती. त्याचे काय?

म्हाराज, कर्माजीला त्याच कामगिरीवर सोडलंया. दिवसा-दोन दिवसांत तो आपली गाठ घेईल. समदं अगदी बैजवार जमून आलंया. म्या त्येला सांगावा धाडतो.
मिर्झाराजे दिल्लीला जाण्यासाठी फारच नेट लावून आहेत. टाळणे अशक्य दिसते. फार वेळ गमावूनसुद्धा चालणार नाही.

इचार करन्यास हरकत न्हाई म्हाराज. परत्येक ठिकानचा कौल उजवाच हाय. हुकूम व्हायची खोटी, कर्माजी समदं बैजवार जुळवून आनील. आता रजा घिऊ का म्हाराज? आत्ता निघालो तर भाकरी खान्यास पेठेत पोहोचीन.
होय निघा, थेट विजापूर. कोणाचीही भेट न घेता. कोणी हटकले, विचारले वा बोलावले तर बिनदिक्कत आमचे नाव सांगा.
जी म्हाराज.

मुजरा करून बहिर्जी निघून गेला. काही वेळ महाराज स्वस्थ बसून राहिले. मग त्यांनी आईसाहेबांच्या
 महालात वर्दी पाठविली.
-
मिर्झाराजांच्या दिवाणखान्याच्या शामियान्यात वेचक मोगल सरदारांची मसलत भरली होती. दिलेरखान पठाण खालमानेने चडफडत उभा होता. वातावरण अस्वस्थ होते. मिर्झाराजे चिडलेले दिसत होते.

दिलेरखान, आज नेताजीसारखा रुस्तमेजंग आदिलशाहीला जाऊन मिळाला, यास अप्रत्यक्षपणे तुम्हीच जिम्मेदार आहात. शिवाजी आणि नेताजी यांना आपल्या छावणीत एवढ्यासाठी ठेवून घेतले होते की, ही अत्यंत शूर आणि महत्त्वाकांक्षी माणसे सदैव आपल्या नजरेसमोर असावीत. आणि मुघल सलतनत वाढवण्यासाठी त्यांचा उपयोग करून घेता यावा. पण केवळ द्वेष, द्वेष आणि द्वेष यापलीकडे तुम्हा लोकांना काही सुचत नाही. शिवाजीच्या हत्येच्या गोष्टी जर तुम्ही केल्या नसत्या तर शिवाजीला छावणी सोडून जाण्याचे निमित्त मिळाले नसते. पन्हाळ्याच्या किल्लेदाराला हल्ल्याची खबर कळवून त्याच्याकडून शिवाजीचा काटा परस्पर काढण्याची बेहुदा हरकत जर तुम्ही केली नसतीत तर शिवाजी अपयशी होणे शक्य नव्हते आणि आज जी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे ती झाली नसती. कारस्थान करण्याची इतकी हौस होती तर मग नेताजीला आपल्याकडे वळवून घेण्याची खटपट करायची होती. आता झाले ते होऊन गेले. त्याची चर्चा व्यर्थ आहे. आता शिवाजीपासून वेगळ्या झालेल्या नेताजीला, दुसऱ्या शिवाजीला; हर प्रयत्न करून मुघल छावणीत ओढून आणले पाहिजे.

राजासाहब, आप जो ठीक समझे कीजिये. मी साधा रांगडा शिपाई गडी. जिल्हेसुभानी हजरत बादशहा सलामतांच्या विरुद्ध उठणारा प्रत्येक हात कलम करायचा. उठणारा प्रत्येक डोळा फोडायचा. बोलणारी प्रत्येक जबान छाटायची आणि जिवाची बाजी लावून शाही तख्ताची इमानाने सेवा करायची एवढेच मला समजते. आपली सियासत आपण खुल्या दिलाने करावी. त्यात माझी दखलअंदाजी नसेल. आपल्या हर हुकमाची तामील होईल. यह हमारा वादा रहा.

त्याच दिवशी मिर्झाराजांनी दिल्लीला तातडीचे टपाल रवाना केले आणि नेताजीसंबंधीचा सारा तपशील बादशहाला कळविला. आदिलशाहीस नेताजीच्या रूपाने कसे बळ मिळाले आहे आणि त्यावर प्रतिडाव म्हणून नेताजीला मोगली गोटात खेचून घेणे कसे लाभदायक ठरणारे आहे याचा त्यांनी तपशीलवार ऊहापोह केला. त्यासाठी त्याला जी आश्वासने द्यावी लागणार होती त्याचा सारा तपशील यथास्थित कळविला. त्यास बादशहाची मंजुरी मागितली. तसेच बादशहाच्या वतीने त्यास जहागिरी देण्याचा अधिकारसुद्धा मागून घेतला.
-

औरंगजेबाने आग्र्याच्या किल्ल्यात कैद करून ठेवलेला त्याचा बाप शहाजहान बादशहा मरण पावला. औरंगजेबाचा मार्ग आता पूर्णत: निष्कंटक झाला. तो दिल्लीवरून आग्र्यास आला. आग्रा पुन्हा दार-उल-सलतनत म्हणजे राजधानी म्हणून घोषित झाले. मोठा दरबार भरवून पुन्हा एकदा शहनशाह-ए-हिंदोस्ताँ, बादशहा अशी सर्वांची मान्यता वदवून घ्यावी, त्यांच्याकडून निष्ठेची शपथ घेववावी आणि आपल्या दबदब्याचा खुंटा हलवून बळकट करून घ्यावा, असा त्याने घाट घातला होता.
या दरबारासाठी सर्व दरबारी, मनसबदार, जहागीरदार, मानकरी एवढेच नव्हे तर इराण, तुर्कस्तानपासून परदेशी पाहुण्यांना निमंत्रणे गेली. या भपकेबाज दरबारातच शिवाजीला बोलावून मोगली वैभवाच्या प्रदर्शनाने त्याला पार दीपवून टाकावे. त्याच्या मनात मोगली सत्ता आणि सामर्थ्याचा धाक निर्माण करावा. त्याला जरबेत घ्यावे असा बेत बादशहाने मुक्रर केला.
बेत ठरताच बादशहाने मिर्झाराजांचे सर्व अर्ज मंजूर केल्याची फर्माने दख्खनेत रवाना झाली. वाटखर्चासाठी शिवाजीला दख्खन खजिन्यातून रुपये एक लाख मंजूर झाले. त्याला शहजाद्याच्या इतमामात आग्र्यास आणण्याचा हुकूम दिला गेला. आयुष्यातले सर्वांत मोठे राजकारण सफल होण्याची आशा मिर्झाराजांच्या दिलात जागी झाली, मात्र मिर्झाराजांची मोहीम सुरूच राहिली. याबरोबरच नेताजीसंबंधीचेसुद्धा सर्व अर्ज बादशहाने मंजूर करून टाकले. नेताजीला मोगली पक्षात वळवून घेण्यासाठी सर्व अधिकार आता मिर्झाराजांच्या मुठीत आले. त्यांची पावले त्या दिशेने पडू लागली.
-

राजगडावर महाराजांची खास सदर बसली होती. खुद्द आईसाहेब जातीनिशी सदरेवर उपस्थित होत्या. वयोमानानुसार आजकाल त्यांचे सदरेवर येणे बरेच कमी झाले होते. त्यांचा बहुतेक वेळ आईवेगळ्या शंभूराजांच्या देखभालीतच जाई. पण आजची बाब विशेष होती. खास महाराजांच्या नावे बादशहाचे भेटीच्या मंजुरीचे फर्मान आले होते; ते स्वीकारण्यास मिर्झाराजांच्या छावणीत जायचे होते. बादशहा त्याच्या वाढदिवसाला आग्र्यात मोठा दरबार भरविणार होता. त्या दरबारात हजर राहण्याचे महाराजांना विशेष कृपेचे निमंत्रण आले होते. महाराजांचे आग्र्यास जाणे अजून मुत्सद्द्यांच्या मनात येत नव्हते. त्र्यंबक सोनदेव म्हणाले–

महाराज, औरंगजेब म्हणजे शहाजहान नव्हे हे ध्यानी घ्यावे. मोगल सारेच धर्मांध. पण याबाबतीत आलमगिराचा हात धरणारा कुणी नाही. इस्लामपुढे त्याला दुसरे राजकारण समजत नाही. निजामशाहीच्या निमित्ताने थोरल्या महाराजांनी मोगल आणि आदिल अशा दोन्ही शाह्यांशी टक्कर घेतली. निजाम मुर्तुजाला वाचवण्यासाठी आपल्या पायाने चालत जाऊन ते दोन्ही बादशहांचे बंदी झाले. ते वख्ती प्राणांशीच गाठ होती. पण शहाजहान बादशहा धोरणी; थोरल्या महाराजांचे शौर्य, बुद्धी, तडफ आणि थोरवीची त्यास जाण होती. एवढा तालेवार मोहरा हकनाक मारून वाया घालवण्यापरीस त्याने मुसलमानी शाही वाढवण्यासाठी त्यांचा उपयोग करून घ्यायचे ठरवले, म्हणूनच हद्दपारी देऊन त्यांना दूर कर्नाटकात पाठवले तरी जीव वाचवला. हाती अधिकार कायम ठेवले. आलमगिरास ही दूरदृष्टी नाही. म्हणून त्याचा भरवसा धरता येत नाही.

प्रतापरावांनी पंतांना दुजोरा देत म्हटले–
पंताचं बोलनं अक्षी चोख बरुबर हाये. तुळतुळीत हजामत केलेल्या आलमगिराच्या डोक्यात राजकारणापेक्षा दगाबाजीचे आनि कपट कारस्थानाचे कारखाने चालू ऱ्हातात.

शिवबा, मिर्झाराजांना तुम्ही थोरल्या महाराजसाहेबांच्या स्थानी मानता. तेसुद्धा तुमचेवर पुत्रवत प्रेम करतात. त्यांना म्हणावे, आपण वडीलकीच्या नात्याने बोटास धरून बादशहासमोर रुजू करावे. त्यांना डावलून काही करणे अथवा त्यांच्यादेखता दगा करणे आलमगिरास झेपणारे नाही. मग तुमच्या सलामतीची आणि सुखरूप परत येण्याची चिंता जशी मिटेल तसेच पत्रोपत्री चालणारे राजकारण थेट समोरासमोर प्रत्यक्ष बोलून तडीस नेता येईल.

आपला मुद्दा आणि उपाय अगदी बिनतोड आहे, आईसाहेब. सुरुवातीपासूनच आम्ही राजासाहेबांना तसा आग्रह करीत आलो आहोत. पण मोहीम टाकून दरबारात येण्यास त्यांस इजाजत नाही. कावेरीपावेतो मोगली निशाण नेण्याचा बादशाही हुक्म आहे. तशी राजदूताची आणसुद्धा आहे. या राजकारणाइतकीच किंबहुना त्यापरीस कांकणभर अधिकच ही मोहीम त्यांना मोलाची वाटते. त्यांच्या या काजात आम्ही शरीक झाल्यास ते अधिक सुकर होईल, अधिक वेगाने साध्य होईल या आणि केवळ याच एकमेव अटकळीने त्यांनी हे राजकारण चालवले आहे. आपणास मदत करणे वा हिंदवी स्वराज्यास साहाय्य करणे हे त्यांच्यासाठी दुय्यम ठरते.

ऐसे घृतकुल्या मधुकुल्याचे राजकारण असेल तर बादशहासमोर एवढ्या दूर जाणे टाळावे हेच श्रेयस्कर असे आमचे स्वच्छ मत आहे.

शहाजीराजांच्या राणीसाहेब जिजाऊ भोसले हे बोलत नाहीत, तर वृद्धत्वाकडे झुकलेली आणि कर्त्यासवरत्या एकुलत्या एक लेकराच्या काळजीने ग्रस्त झालेली एक वत्सल माता हे बोलत आहे. आईसाहेब, दोन तपे रक्ताचे पाणी करावे, पाण्यासारखे सवंगड्यांचे रक्त सांडावे, काल्यात लाह्या उधळाव्यात तसे मावळ्यांनी आपले प्राण उधळून राज्य उभे करावे, गोरगरीब, भोळ्याभाबड्या रयतेने, आया-बहिणींनी हर जुलमास तोंड देत, प्रसंगी रानावनात परागंदा होऊन, अनेक दिव्यांत आम्हास मुखातून ब्र न काढता साथ देऊन ते तगविण्याचा निकराचा यत्न करावा आणि एखाद्या शाहिस्ताखानाने अथवा मिर्झाराजाने सारे सारे लुटून, ओरबाडून न्यावे. आम्ही नव्या उमेदीने ‘पुनश्च हरि ओम’ म्हणून नेटाने कार्य सुरू करावे. हे असे किती काळ चालवावे.

महाराजांनी धीराने घ्यावे. भावनेत वाहत जाऊन घायकुतीने कुठलाही निर्णय घेणे रास्त नाही. अशा प्रसंगी थोरल्या महाराजसाहेबांना अनुसरावे.
त्र्यंबकपंत, आपल्या तीर्थरूपांच्या सोबतीने आबासाहेब स्वराज्याचा खेळ खेळले. अवघी उमेद या काजातच वेचली. अखेर हाती काय आले? एका तहाच्या फलस्वरूप त्यांना महाराष्ट्रापासून, सह्याद्रीपासून दूर कर्नाटकात हद्दपारी पत्करावी लागली. त्यांचे स्वराज्याचे स्वप्न सावरीच्या कापसासारखे दाही दिशांना उडून गेले. कारण त्या वख्ती आबासाहेब अगतिक होते. दोन-दोन बलाढ्य शहांचे बंदिवान होते. युद्धात परास्त झालेले जीत होते. निरुपाय होऊन त्यांना तह स्वीकारावाच लागला. याउलट आज आपण मोगलांपुढे शरणागती स्वीकारली असली, तरी संपूर्ण परास्त झालेलो नाही. बरेच काही गमावले असले, तरी आपले स्वतंत्र अस्तित्व आपण राखून आहोत. मोहीम कितीही मोठी आणि महत्त्वाकांक्षी असली, सेनापती कितीही थोर आणि कुशल असला, तरी ती कायम चालू ठेवणे बादशहाला शक्य नसते. सैन्य फार काळ घरापासून दूर राहू शकत नाही; त्यामुळे मिर्झाराजांची पाठ फिरताच आम्ही पुन्हा उचल खाणार आणि येरागबाळ्या सरदारांना न जुमानता गमावलेली दौलत सव्याज परत मिळवणार हे आपली फौज आणि रयत जाणते, तसेच आलमगीरसुद्धा हे पक्के ओळखून आहे. आता होणारी बोलणी जीत आणि जेता यांच्यामधील वाटाघाटी नसून दोन राज्यकर्त्यांमध्ये बरोबरीच्या नात्याने चालणारे राजकारण आहे. या संधीचा आपण फायदा उठवला नाही तर नियती आपल्याला क्षमा करणार नाही. बादशाही खजिना आणि फौजा अन् आपली युक्ती, बुद्धी वापरून जर कुतुबशाही आणि आदिलशाही बडवून तो मुलूख आपल्या कब्जाखाली आणता आला तर वावगे ते काय? जगदंब कृपेने जर हे राजकारण साधले, आणि बादशाही सही-शिक्क्यानिशी आमच्या हाती अधिकार आले तर गुलामी आणि लाचारीची सवय झालेल्या आणि सत्ताधाऱ्यांचे लांगूलचालन करण्यात धन्यता मानणाऱ्या मराठी सरदार, वतनदार आणि जहागीरदारांना आपले स्वामित्व मान्य करण्यावाचून गत्यंतरच राहणार नाही. एकदा ते जवळ आले की, प्रेमात घेता येईल. आणि प्रेमात आले की, स्वराज्यात आणणे कठीण जाणार नाही. संधी येताच मोगली जोखड झुगारून दिल्लीला मोर्चे लावणे स्वप्न राहणार नाही.

महाराजांचा तर्क आणि राजकारण अगदी रास्त अन् बिनतोड आहे. पण धर्मांध, पाताळयंत्री, कावेबाज, दगलखोर आलमगीर हाच मोठा काळजीचा विषय आहे. इच्छेप्रमाणे राजकारण झाले तर भवानीच पावली. पण महाराज, फासे उलटे पडले आणि प्रसंग प्राणावर बेतला तर? याच चिंतेने जीव घाबरतो.

पंत, प्राणांची क्षिती कधीपासून वाटू लागली? फत्तेखान चालून आला, तेव्हा काय होते आपल्याकडे? आश्रयासाठी गडसुद्धा नव्हता धड. पण तेव्हा निभावून नेलेच ना आपण? फौजेसह अफजलखान बुडवला, सिद्दी जौहरचा वेढा तोडून निसटलो आणि राहत्या महालात घुसून शाहिस्तेखानास शास्त केली. हे सारे साधले ते जिवाची जोखीम घेतली म्हणूनच ना? त्या निकरामुळेच आई भवानीने यश दिले; मग आताच कच काय म्हणून?
आता तर बोलनंच खुंटलं म्हनायचं. पर म्हाराज, त्या वक्ताला आपन आपल्या मुलखात, आपल्या मानसात व्हतो. आता आग्र्याला जायाचं म्हन्जी थेट वागाच्या जबड्यातच की. निसटू म्हनलं तरी अंतर शेकडो कोस आनि समदा मुलूख गनिमाचा. कसं निसटावं मानसानं सलामतीनं?

एवढी एकच बाब आहे जी काळजी उत्पन्न करते. पण आबासाहेबांची शिकवण सर्वज्ञात आहेच, ‘काळजी घ्या. काळजी करू नका.’ मिर्झाराजांनी स्वत: बेल-भंडारा उचलून सलामतीची आणि रक्षणाची आण घेतली आहे. आग्रा मुक्कामी आम्ही त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव महाराज कुंवर यांच्या निगराणीत असू. हे सारे बादशाही मंजुरीनेच ना? आलमगीर कितीही पाताळयंत्री आणि कुटिल असला, तरी मिर्झाराजांसारख्या मातब्बर रजपुतास दुखावून रजपुतांना बिथरवणे या घडीला तरी त्यास परवडणारे नाही हे तो पक्के जाणून आहे; त्यामुळे राजकारण साधो न साधो, सुखरूप परतण्यात काही बाधा येईल असे वाटत नाही. पण, जगदंब न करो, आपले दुर्दैव उभे ठाकलेच आणि असा काही धोका निर्माण झाला तर त्याचीसुद्धा तजवीज झाली आहे. संपूर्ण उत्तरेत आपल्या नजरबाजांनी जी संपर्काची वीण निर्माण केली आहे तिचा उपयोग करून सुखरूप परत येणे शक्य होईल. साहसे श्री प्रतिवसति। काल कर्माजी हीच खबर घेऊन आला होता. आग्र्याच्या वाटेवरच कोणत्या स्थानी कोणास भेटावे आणि यासंबंधीचा तपशील पक्का करावा याची समूचित योजना त्याने तयार केली आहे. उत्तरेत बैरागी सहसा घोड्यावर हिंडतात; त्यामुळे बैरागी वेषात घोड्यावरून प्रवास सहज शक्य होणारा आहे. बैरागी गोसाव्यांची भाषा जाणणारी मंडळी आपल्यासोबत असणार आहेतच.
म्हणजे सारे पूर्वीच ठरलेले आहे तर. आमच्यासमोर फक्त उपचार पूर्ण करणे सुरू आहे म्हणायचे. शिवबा, वय वाढले, पण तोरण्याच्या वखती होता तो हूडपणा लवमात्र कमी झालेला नाही.

हास्याच्या लकेरीत सदरेवरचा ताण विरून गेला. बादशहाच्या भेटीस आग्र्याला जाण्याच्या बेतावर शिक्कामोर्तब झाले. हुताशनी पौर्णिमेचा मुहूर्त मुक्रर झाला.
-

मिर्झाराजांना आलेल्या फर्मानात बादशहाने पडेल ती किंमत देऊन नेताजीस मोगली गोटात वळवून घेण्याचे आदेश दिले होते. फर्मान जसे बादशहाच्या संशयी स्वभावाचे द्योतक होते तसेच त्यातून त्याची दूरदृष्टी आणि अखंड सावधानता स्पष्ट होत होती. त्यात मिर्झाराजांना जाणीव करून दिली होती की, नेताजी हा प्रतिशिवाजी असल्याने त्याचे बाबतीत अजिबात गाफील राहू नये. तो मोगली गोटात दाखल झाल्यावर त्याला दिलेरखानाची निसबत सोपविण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले होते. याचे कारण उघडच होते की, दोन प्रबळ हिंदू, त्यातील एक बंडखोर वृत्तीचा, जर एकत्र आले तर तख्ताला आणि इस्लामला धोका निर्माण होऊ शकतो.
एक स्वतंत्र गुप्त खलिता खास दिलेरसाठी होता. त्यात नेताजीवर कशा प्रकारे नजर ठेवावी आणि मिर्झाराजांच्या संपर्कापासून त्याला दूर राखण्यासाठी कोणत्या मोहिमा सोपवाव्यात याचे बारीकसारीक तपशिलानिशी स्पष्ट दिग्दर्शन होते.
फर्माने येताच मिर्झाराजांनी हालचालींना सुरुवात केली. त्यांची विश्वासू माणसे निरनिराळ्या वेषांनी आणि मिषांनी नेताजींभोवती घिरट्या घालू लागली. घटना महाराजांच्या अंदाजाप्रमाणेच वळण घेत होत्या. नेताजी महाराजांकडून संकेत मिळण्याची वाट पाहत मिर्झाराजांना झुलवू लागले. अधिकारपदे आणि जहागिरी मिळण्याच्या अटी घालू लागले.

मोगली हालचाली आदिलशाही मुत्सद्द्यांपासून लपून राहणे शक्य नव्हते; त्यामुळे आदिलशाही गोटात अस्वस्थ चुळबुळ सुरू झाली. नेताजींवर नजरा रोखल्या गेल्या.


आईसाहेबांच्या महालात महाराज प्रवेशले तेव्हा आईसाहेबांची नित्याची पूजा आटोपली होती आणि त्या जप करीत होत्या. शेजारी बसलेल्या शंभूराजांचे दूध पिणे सुरू होते. महाराजांनी आईसाहेबांचे पाय शिवले.
औक्षवंत व्हा. यशवंत व्हा. कीर्तिवंत व्हा. बैस शिवबा. भल्या पहाटे नजरबाज येऊन गेल्याचे कळले. काही विशेष?

अरे वा! दारुणी महालाचे हेर खाते जबरदस्तच आहे म्हणायचे. याचा बंदोबस्त तर करावाच लागणार. बातम्या आपल्या महाली येताहेत तोवर चिंता नाही, पण बातमीला पाय फुटून ती चारीवाटा जायला वेळ लागायचा नाही.

मंचावर बसता बसता महाराज बोलले. शंभूराजांनी लगेच पाय शिवले. महाराजांनी त्यांना हाताला धरून शेजारी बसवून घेतले.

तसे काही नाही रे बाबा. काल रात्री मोरोपंत आला होता. म्हणाला, ‘शंभूबाळास आग्र्यास सोबत न्यायचे आहे.’ जीव राहवेना म्हणून म्हटले तुम्हास पुसून खात्री करून घ्यावी. त्यासाठी सकाळीच यायचे होते तर बटकी सांगत आली की, महत्त्वाच्या नजरबाजाशी बोलणे सुरू आहे आणि मुलाखतीस बंदी केली आहे. तू म्हणतोस तेसुद्धा खरेच आहे म्हणा. काळजी ही घ्यायलाच लागणार. त्यात दिवस हे असे. खरेच का शंभूबाळास सोबत न्यायचे आहे?

होय आईसाहेब. शंभूराजे आता मोठे झाले आहेत. स्वाऱ्या, शिकारी, राजकारणाची त्यांना सवय झाली पाहिजे. त्यात आमचे हे असे कायम तळहाती जीव घेऊन हिंडणे. न जाणो कोणत्या वखती त्यांच्यावर जबाबदारी येऊन पडेल.

उगीच सकाळच्या प्रहरी भरल्या घरात गृहस्थाने असे काही अभद्र बोलू नये.
अभद्र नव्हे आईसाहेब, ही तर रोकडी वस्तुस्थिती. जसे तुम्ही आम्हास लहानपणापासूनच तयार करण्यास सुरुवात केली होती तसे शंभूराजांना पण घडवायला नको का? शंभूराजे आता मोगलांचे पाचहजारी मनसबदार, जहागीरदार. त्यांचे नावेसुद्धा शाही फर्मान आलेले आहे. त्यांना दरबारात पेश करावे लागणारच. काय राजे, येणार ना आम्हासोबत आग्र्याला बादशहासमोर?
होय तर. आबासाहेब सोबत असताना आम्हास वाघाचीदेखील भीती वाटायची नाही. मग बादशहा तो काय?

क्रमश:

*____⚔📜🚩Image result for नेताजी पालकर

शनिवार, २१ डिसेंबर, २०१९

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔ अग्निदिव्य भाग - 10

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜

अग्निदिव्य

लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार

__📜🗡भाग - 1⃣0⃣📜🚩🗡___

_🚩📜🚩___

विजापूरच्या परकोटाबाहेर शहाच्या वतीने बहोललखानाने नेताजींचे स्वागत केले. नेताजींची व्यवस्था खास शामियान्यात केली गेली. जुम्म्याच्या खास दरबारात त्यांचा मोठा गौरव करण्यात आला. मानाची खिलत दिली गेली. पाचहजारी सरदारकी आणि जहागिरी बहाल करण्यात आली. मात्र जहागिरीचा परगणा जाहीर झाला नाही. तूर्तास खर्चासाठी रोख पन्नास हजार रुपये त्यांच्या पदरी घातले. पुढची व्यवस्था होईपर्यंत त्यांना रुस्तमेजमाची निसबत फर्मावण्यात आली.

मराठशाहीचे सरनोबत नेताजी पालकर आता शाही सही-शिक्क्यानिशी आदिलशाहीचे पाचहजारी मनसबदार झाले.

महाराज आईसाहेबांच्या महालात बसले होते. रामचंद्रपंत अमात्य, मोरोपंत पिंगळे, निराजी रावजी, दत्ताजीपंत, प्रतापराव गुजर, तानाजी मालुसरे, कोंडाजी फर्जंद, जेधे, शिळमकर, काटके वगैरे वेचक मंडळी समोर उपस्थित होती. खल चालला होता दिल्लीभेटीचा. नेताजींची उणीव प्रत्येकास खुपत होती पण विषयाला तोंड फोडण्याचा कोणाचा धीर होत नव्हता. अखेर आईसाहेबांनीच थेट विषय काढला.

शिवबा, नेताजी रुसून गेल्याचे कळले. त्यांची काय खबरबात? पन्हाळ्याचा पराभव त्यांनी जिव्हारी लावून घेतलेला दिसतो. रागाच्या भरात तुम्हीसुद्धा पार टोक गाठलेत. थेट त्यांची सरनोबतीच बरखास्त केलीत. अशाने मराठ्याचे मानी रक्त दुखावणारच.

मोका मिळताच रामचंद्रपंतांनीसुद्धा आईसाहेबांच्या सुरात सूर मिसळला–
आईसाहेबांचे बोलणे रास्त आहे. एकदम एवढी कठोर सजा देण्याचे महाराजांनी टाळले असते, तर एवढा तालेवार मोहरा दुखावला नसता. साऱ्या फौजेचा आपल्या सरनोबतावर भारी जीव. डोक्यात राख घालून ते असे अचानक निघून गेले; त्यामुळे फौजेत नाराजी आहे.
मोरोपंतांनी विषय पुढे सरकवला–


सरनोबती सांभाळण्यात प्रतापराव कोठेही उणे ठरणार नाहीत हे जरी खरे असले, तरी नेताजीरावांचे दुखावले जाऊन अज्ञातात निघून जाणे अस्वस्थता उत्पन्न करीत आहे. मौका साधून स्वत: महाराजांनीच फौजेची समजूत काढावी.


पंत, नेताजीकाका असे रुसून, न सांगतासवरता निघून गेले याचे आम्हास दु:ख कसे नसेल? स्वराज्याच्या सुरुवातीपासूनचे ते सोबती. आप्तसुद्धा आहेत ते आमचे. प्रश्न पन्हाळ्यावर माघार घ्यावी लागली याचा नाही. जय-पराजयास आम्ही महत्त्व देत नाही हे सारेच जाणतात. गनिमी काव्यात माघारीची शरम नसते. पण प्रश्न आहे एक हजार मावळ्यांच्या हकनाक झालेल्या कत्तलीचा. आम्हास रयत पोटच्या लेकरासारखी आणि प्रत्येक मावळा सख्ख्या भावासारखा. पन्हाळ्याचा किल्लेदार चलाख आहे, त्याला आगाऊ खबर मिळाली असेल, त्याने तो सावध राहिला असेल; पण जर नेताजीकाकांची कुमक वेळेवर पावती तर निदान निष्ठावान मावळ्यांचे जीव तरी वाचते. दौलत सध्या अडचणीत आहे. रजपुताने तहात आम्हास पुरते नागवले आहे. त्याच्या छावणीत आम्ही शरणागताचे अपमानास्पद जिणे जगत होतो आणि दिलेरखानाच्या भयाने आम्ही छावणी सोडून निघालो. ही बाब लपून राहिलेली नाही.

याउपर अधिकाऱ्यांच्या गफलतीमुळे आणि बेफिकिरीमुळे जर सैन्य मारले जाऊ लागले तर मावळ्यांचे धैर्य टिकून कसे राहावे? सरनोबतच जर बेफिकीर झाले आणि त्याकडे आमचा कानाडोळा झाला, तर लहान-मोठे अधिकारी आणि सर्वसामान्य शिलेदार यांजवर जरब कशी राहावी? सैनिकांकडून इमानाची अपेक्षा करीत असताना, त्यांच्या मनात धन्याविषयीचा विश्वास जागता ठेवणे हे धन्याचे प्रथम कर्तव्य ठरते. नेताजीकाकांची सरनोबती काढून घेण्याचा निर्णय आम्ही नाइलाजाने, पण पूर्ण विचार करूनच घेतला. काका स्वराज्याचे एकनिष्ठ पाईक. आम्हास वाटले, ते आम्हास समजून घेतील. त्यांच्यासाठी काही वेगळा मनसुबा आम्ही योजत होतो. कृष्णाजीपंत हणमंत्यांच्या सोबत मोठी जबाबदारी देऊन त्यांना कर्नाटकात पाठवण्याचा आमचा मानस होता. पण त्यांनी वेळ दिला नाही. धीर राखला नाही. एवढ्या तोलामोलाचा हा मोहरा कुठे भरकटला नाही म्हणजे मिळवली.


महाराज बोलत असतानाच हुजऱ्या आत आला.
म्हाराज, बहिर्जी नाईक तातडीची भेट मागतात. नाईक लई चिंतेत दिसाय लागलेत.
बहिर्जी? या वेळी? दे पाठवून.


मुजरा करून बहिर्जी मान खाली घालून उभा राहिला. शेल्याने कपाळीचा घाम वारंवार पुसत तो शब्दांची जुळवाजुळव करीत राहिला. प्रत्येकाची उत्सुक नजर आपल्यावर खिळलेली त्याला जाणवत होती पण शब्द ओठावर येत नव्हते. वाट बघून अखेर महाराजच बोलले–


नाईक, असे अचानक? तुम्ही विजापुरात असावयास हवे होते.
विजापुरास्नच येतोया म्हाराज. तीन दिस झाले घोड्याची मांड सोडलेली न्हाई. खबर अशी चक्रावनारी हाय की, कोना नजरबाजाकडून धाडनं रास्त वाटलं न्हाय. म्हनून मग सोता आलो.
आईसाहेबांचा जीव धास्तावला. त्या एकदम ताठ बसत्या झाल्या. पदराची अस्वस्थ चाळवाचाळव करीत काळजीच्या स्वरात त्या बोलल्या–


नमनाला घडाभर तेल जाळत जीव टांगणीला लावू नकोस. काय असेल ते पटकन सांगून टाक. धीर निघत नाही आताशा.
आईसाहेब, लई वंगाळ खबर हाये. नेताजी सरकार…
काय झालं नेताजीरावांना?
चार-पाच आवाज एकदम उमटले. एकटक नजरेने स्थिर पाहत महाराज बहिर्जीच्या काळजाचा ठाव घेत राहिले. जाजमावरची नजर न उचलता बहिर्जी बोलला–


नेताजी सरकार आदिलशहास मिळाले. अली आदिलशहा बाच्छावानं त्यानला पाच हजाराची सरदारी, मनसब आनि रुपये पन्नास हजार रोख बहाल क्येलं. खिलत, तेग आन् शिरपाव आनि घोडी अहेर करून नावाजनी क्येली. हाली सरकार रुस्तमेजमाच्या छावनीत हायेती.
सारे स्तब्ध झाले. नजरा पायतळी खिळल्या. चमकून आईसाहेब महाराजांकडे एकटक पाहत राहिल्या. महाराजांच्या मुखातून दीर्घ सुस्कारा उमटला. आईसाहेबांच्या नजरेला नजर देण्याचे टाळत ते गंभीर स्वरात उद्गारले–


जे अपेक्षिले तेच घडले. आम्हास नेताजीकाकांची चिंता वाटते. तुटलेला पतंग अस्मानात चढत नाही. वाऱ्याच्या झोताबरोबर काही क्षण वर चढल्यासारखा भासला तरी अखेरीस गोता खाऊन खालीच पडायचा. दुर्दैव! दुसरे काय!!


शिवबा, नेताजीस माघारी आणावयास हवे.
व्हय जी म्हाराज. खोपड्याची बात येगळी, नेताजीरावांची येगळी. असा चोखट असामी गमावनं सोराज्याच्या फायद्याचं न्हाई.


होय महाराज, प्रतापरावांचे बोलणे रास्त आहे. स्वराज्यातला प्रत्येक बारकावा नेताजीरावांस आपल्या खालोखाल ठावकी आहे. त्यांचे गनिमाच्या गोटात असणे मोठे नुकसानकारक ठरेल.


प्रतापराव, पंत, बरोबर आहे तुमचे; पण आईसाहेब, घाई करून चालणार नाही. तापला तवा भडकलेल्या चुलीवरून घाईने उतरविण्याचा खटाटोप केला तर बोटे भाजण्याचीच खात्री अधिक. बहिर्जी आमच्या महाली जाऊन आमची वाट पाहा. आम्ही आलोच. पंत, दिल्लीच्या मनसुब्यावर उदईक बोलू. तोवर या बातमीवर कोण काय प्रतिक्रिया देतो याची नीट माहिती काढा आणि उद्या सकाळी आम्हासमोर सादर करा. प्रतापराव, फौजेत दंगा किंवा फितवा होणार नाही याविषयी जातीने काळजी घ्या. मोरोपंत, प्रत्येक अधिकाऱ्यास आणि गडावर सख्त सूचना रवाना करा. म्हणावे, नेताजींचा बहाणा करून कोणी फिसाद उभा करू पाहील, तर मुलाहिजा राखला जाणार नाही. त्यांना पुढे करून गनीम गडावर चाल करू बघेल, तर कोणताही मुलाहिजा न बाळगता त्यांचेवर बेलाशक गोळा टाकावा. कोठे ढिलाई झाली आणि गनिमाने दावा साधला तर जबाबदार असणाऱ्याची गर्दन मारली जाईल. सीमेवरचे चौक्या पहारे आणि गड-कोटांवरचा बंदोबस्त कडक करा. ठिकठिकाणच्या नजरबाजांस सावधगिरीच्या सख्त सूचना रवाना करा. तानाजी तुम्ही, चिपळूण आणि संगमेश्वराच्या छावणीकडे आजच रवाना व्हा. कोठेही काही गडबड होता कामा नये. यावे. आईसाहेब, बहिर्जीशी बोलून आम्ही पुन्हा आपली गाठ घेतो.



महाराज महालात आले तेव्हा त्यांची वाट पाहत बहिर्जी दारातच उभा होता. महाराजांच्या मागोमाग तो आत गेला. महाराज लोडाला टेकून बसले. मुद्रा शांत, नजर स्थिर, भावरहित. जाजमावर नजर लावून बहिर्जी उभा.
पहाऱ्यावरच्या शिपायाला टप्प्याबाहेर उभे राहण्यास सांगा आणि कोणत्याही कारणाने आत न येण्याची सख्त ताकीद द्या. अडसर घालून कवाड लावून घ्या.


दाराला अडसर लावून बहिर्जी समोर उभा राहिला.
हं बोला नाईक. प्रत्येक गोष्ट तपशीलवार सांगा. कितीही क्षुल्लक वाटली तरी कोणतीही बाब टाळू नका, विसरू नका. तिखट-मीठ न लावता पण सविस्तर. ऐकण्यास कितीही कटू आणि त्रासदायक वाटले तरी जे जसे आहे ते तसे सांगा. ज्याने जे शब्द वापरले ते आणि तसेच आम्हापर्यंत पोहोचू देत. जे प्रत्यक्ष घडले आहे त्यापेक्षा विपरीत काय ऐकायला लागणार?


जवळपास दीड घटका बहिर्जी बोलत होता. मध्ये एकही प्रश्न न विचारता महाराज एकाग्रतेने ऐकत राहिले. मनातील भाव चर्येवर उमटू न देण्याची कोशिश करीत राहिले. बहिर्जीचे बोलणे संपले. महाराजांनी दीर्घ सुस्कारा सोडला. एवढा वेळ निश्चल बसून राहिलेल्या महाराजांनी आसन बदलले.
भेट झाली?


जी न्हाई म्हाराज. म्याच सामोरा ग्येलो न्हाई. कोणतंबी सोंग काढलं असतं तरी त्येंनी वळखलं असतं. म्हनून टाळलं. पण आडोशाला राहून हातभरावरून प्रत्यक्ष निरीखलं. दरबारातून परतत व्हते. पार हरवल्यासारखे दिसले. सरनोबतीचा डौल, तोरा, तडफ काईच शिल्लक राहिलं न्हाय.


ते तर व्हायचेच. सर्वांचा मनसुबा तर तुम्ही जातीनिशीच ऐकला. पण घाईगर्दीत इतक्यात काही करणे नाही. मात्र एक गोष्ट लगोलग करा, त्यांच्या भोवती सतत, अगदी अष्टौप्रहर आपली माणसे असू देत. त्यांना क्षणभरही दृष्टिआड होऊ देऊ नका. माणसांची निवड खुद्द तुम्हीच करा. माणसे हवी घारीच्या डोळ्यांची आणि पालीच्या कानांची. नेताजीकाकांची प्रत्येक कृती, प्रत्येक हालचाल, मुखातून निघालेला प्रत्येक शब्द मग कोणाशी संभाषण असो किंवा स्वत:शीच केलेली बडबड असो, सहेतुक उच्चारलेला असो वा सहज निर्हेतुक; आमच्यापर्यंत, थेट आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांना आपल्या माणसांची ओळख पटता कामा नये. मात्र आपली माणसे एकमेकांना, सकारण असो वा विनाकारण असो, रत्नागिरीच्या कलमी आंब्याचा उल्लेख करून आपापली ओळख देतील. दुसरे सर्वांत महत्त्वाचे, त्यांच्या जिवाला किंचितसाही अपाय होणार नाही याची डोळ्यांत तेल घालून काळजी घ्या. अगदी निकरावर येत नाही तोवर हस्तक्षेप करण्याची गरज नाही. तसे स्वसंरक्षण करण्यास ते समर्थ आहेत, पण अगदीच निरुपाय झाल्यास वा धोका वाटल्यास त्यांना खबर लागू न देता सरळ पळवून आणा. त्यांच्या सोबत गेलेली चार माणसेसुद्धा नजरेच्या टप्प्याआड होऊ देऊ नका.


अजून एक महत्त्वाचे, त्यांच्या माहितीचा कोणी एक नजरबाज त्यांना फितेल असे पाहा. त्याच्या मदतीने त्यांना त्यांच्या नजरबाजांची टोळी उभारून गनिमाच्या गोटात काम करू देत. त्यांना पोहोचत्या होणाऱ्या खबरा आपल्याकडे वळत्या होऊ देत. नीट ध्यानात आले? काही शंका वा स्पष्टीकरण हवे असल्यास विचारून घ्या.
क्रमश:

*____📜🚩📷Image result for नेताजी पालकर

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔ अग्निदिव्य ⚔🗡भाग - 9

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜

अग्निदिव्य

लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार

_📜🗡भाग - 9⃣📜🚩🗡___

_🚩📜🚩___

खाली मान घालून नेताजी मुक्कामाकडे निघून गेले. त्यांच्या चर्येकडे बघवत नव्हते. त्यांनी स्वत:ला खोलीत कोंडून घेतले. त्यांच्याकडून कुचराई झाली होती. त्याचे मोल पराभवात आणि मावळ्यांच्या प्राणात चुकते झाले होते. आदिलशाहीकडून पहिला पराभव. अत्यंत लाजिरवाणा, दारुण पराभव आणि तोसुद्धा दस्तूरखुद्द महाराज झुंजत असताना. नेताजी आपली फौज घेऊन कोकणातून पन्हाळ्याकडे येत होते. किल्लेदाराने किल्ल्याच्या परिसरात ठेवलेली फिरती गस्त चुकविण्याच्या नादात जरा लांबचा फेरा घ्यावा लागला होता. त्यातून वाघदरीतून सरदरवाजाच्या दिशेने येताना अंधारात दिशाभूल झालेली. पण या सबबी सरनोबतास समर्थनीय नव्हेत. कारण योजना आखताना या बाबींचा विचार करूनच काळ-काम-वेगाचे गणित मांडायचे असते आणि दुर्दैव म्हणजे नेमके याच प्रसंगी ते चुकले. नेताजींचे मन आतल्याआत आक्रंदत होते–


काय करू? नेमकी कुठे गफलत झाली तेच समजत नाही. महाराजांना तोंड कसे दाखवू? त्यांची समजूत कशी पटवू? सारे सरदार, पंतमंडळ, फौज प्यादे सारी मंडळी मावळ्यांच्या हत्येस मलाच जबाबदार धरणार. कोणत्या प्रकारे त्यांची समजूत काढू? देवा शंभू महादेवा, खंडेराया हा कलंक कसा धुऊन काढू? आई जगदंबे, लेकराला यातून तूच सोडीव.


दोन संपूर्ण दिवस आणि तीन रात्री नेताजी खोलीतून बाहेर आले नाहीत. अन्न नाही, पाणी नाही. फक्त खंत, खंत आणि खंत. सोबत्यांनी हाका मारल्या, सेवकांनी नाकदुऱ्या काढल्या; पण त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. अधूनमधून येणारे वस्तूंच्या फेकाफेकीचे आवाज आणि मधूनच भिंतीवर बुक्क्या मारल्याचा वा डोके आपटल्याचा आवाज हीच तेवढी जाग बाहेरच्यांना जाणवत राहिली.


हळूहळू महाराजांचा राग शांत झाला. नेताजीकाकांसारखा जबाबदार असामी अशी हलगर्जी करणे शक्य नाही याची त्यांना जाणीव झाली. महाराज आपल्या सवंगड्यांशी एवढे तादात्म्य झाले होते की, नेताजींचे आक्रंदन त्यांच्या मनास स्पर्शू लागले. पण आता काय करावे? घडणारे घडून गेले होते. नुकसान होऊन चुकले होते. आता पर्याय एकच. नेताजींबरोबर योजलेले राजकारण पुढे चालविणे. महाराजांनी बहिर्जीला एकांतात बोलावून घेतले. महाराजांच्या महालातून बहिर्जी निघाला तेव्हा रात्रीचा दुसरा प्रहर टळत होता. निजानीज होऊन गेली होती. बहिर्जी थेट नेताजींच्या मुक्कामावर पोहोचले. शिपाई-प्यादे, सेवक सर्वांना त्यांनी दूर उभे केले. दाराशी येऊन त्यांनी कानोसा घेतला. नेताजींच्या येरझारांचा पदरव स्पष्ट जाणवत होता. त्यांनी हलकेच थाप मारली आणि कवाडाशी तोंड नेऊन हलक्या पण स्पष्ट स्वरात त्यांनी साद दिली–


सरनोबत, सरकार, दार उघडा. मी बहिर्जी. म्हाराजांचा सांगावा घेऊन आलोया. सरकार, दार उघडा.
काही क्षण गेले. हलकेच दार किलकिले झाले. भकास मुद्रेचे आणि तारवटल्या डोळ्यांचे सरनोबतांचे ते रूप पाहून बहिर्जीचे काळीज चरकले. झटकन खोलीत शिरून त्याने कवाड लावून घेतले. हाताला धरून नेताजींना विस्कटलेल्या पलंगावर बसविले. खोली पार अस्ताव्यस्त झाली होती. स्वत:वरचा संताप नेताजींनी खोलीतील वस्तूंवर काढल्याचे स्पष्ट दिसत होते. तिवईवरच्या फुलपात्रापासून पलंगावरच्या गादीपर्यंत एकही वस्तू जागेवर नव्हती. भिंतीशी उडून पडलेली ठाणवई उचलून बहिर्जीने जागेवर ठेवली. हातातला दिवा ठाणवईवर ठेवून तो नेताजींकडे वळला. ते जमिनीवर नजर खिळवून निश्चल बसून होते. आश्चर्याने स्तंभित झालेला बहिर्जी त्यांना आपादमस्तक न्याहाळीत राहिला. रणमर्द सिंहाचे हे विकल रूप त्याने कधी कल्पिलेसुद्धा नव्हते. अखेर बहिर्जीनेच शांततेची तार तोडली.


सरकार, म्या लईच लहान मानूस. काय अन् कसं झालं इचारपूस करन्याचा चाकराला अधिकार न्हाई. सोपवलेलं काम चोख बजावायचं त्येवढंच चाकराला ठावं. म्हाराजांचा सांगावा हाये, घडलं ते घडून ग्येलं, आता त्येला उपाय न्हाय. तव्हा त्येचा इचार करणं सोडून द्या. आम्हास भेटन्याची गरज नाही. जे जसं ठरलं ते तसंच पुढं चालवणं. जगदंबा कृपेनं यशाचे धनी व्हाल तव्हा पुन्हा भेट व्हईलच.


विजेचा धक्का बसावा तसे त्यांनी बहिर्जीकडे पाहिले. झटकन उठून भिंतीचा आधार घेत त्यांनी पाठ फिरविली. भले थोरले वडाचे झाड चक्रीवादळात घुसळून निघावे तसे गदगदणारे सरनोबत बहिर्जी विस्मयाने पाहत राहिला. पाठीवरून फिरविण्यासाठी त्याचा हात क्षणभर वर उचलला गेला, पण मर्यादेचे भान येऊन आपसूकच खाली आला. नेताजींना तसेच सोडून पाय न वाजविता तो खोलीबाहेर आला. कवाड तसेच अर्धवट उघडे ठेवून तो झपाट्याने निघून गेला.


बहिर्जीची वाट पाहत महाराज जागेच होते.
बोला नाईक! काय झालं?
म्हाराज, नेताजी सरकारांनी मनाला लईच लावून घेतलंया. पार कोलमडून ग्येल्याती. बघवत न्हाई. येवडा डोंगरासारखा, वाघाच्या काळजाचा गडी, पर बाईमानसावानी रडला वो. व्हटातून शबुद फुटंना त्येंच्या.


ते ठीक आहे. मेलेल्या मावळ्यांचे प्राण असे डोळ्यांतून पाणी काढल्याने परत येणार नाहीत. सांगावा सांगितला? जवाब काय?
जी. जसाच्या तसा सांगावा सांगितला पर नेताजी सरकार जवाब देन्याच्या परिस्थितीत नव्हतं. भिंतीला डोकं टेकून नुसतं हुंदकत ऱ्हायलं. वाढूळ वाट पायली आनि परत फिरलो. म्हाराज…
बहिर्जी घुटमळला. महाराजांची डावी भुवई वर चढली.
म्हाराज, म्या लई छोटा मानूस. आपल्याला काय सांगायचा मला अधिकार न्हाय. तेवडी माजी लायकी बी न्हाय, पर म्हाराज सरनोबतांची हालत पायली, काळजाचं पार पानी झालं. त्येंची भूल पदरात घ्या. त्येंना कौल द्या.


महाराजांची भेदक नजर बहिर्जीच्या नजरेला भिडली. अगदी क्षणभरच. जणू काळीज आणि मस्तक भेदून आरपार गेली. थंडगार घामाची धार मणक्यांतून कंबरेवर उतरली. जीभ पार टाळ्याला चिकटली.
माफी मायबाप, माफी. गलती झाली.
खालमानेने मुजरा करीत पाठ न वळविता बहिर्जी झटक्याने महालाबाहेर निघून गेला.

बहिर्जी गेल्यावर बऱ्याच वेळाने नेताजी भानावर आले. पण सुन्नपणे तसेच पलंगावर बसून राहिले. उघडे कवाड पाहून दबकत दबकत हुजऱ्या खोलीत आला. त्याच्या चाहुलीने नेताजींनी मान वर केली. कसेबसे तोंडातून शब्द आले–
पाणी…


उलट्या पावली हुजऱ्या बाहेर गेला आणि पाण्याचे तांब्या-भांडे घेऊन धावतच परत आला. एका घोटातच तांब्या रिकामा झाला. गार पाणी पोटामध्ये गेल्यावर काही क्षण नेताजी डोळे मिटून स्वस्थ बसून राहिले. त्यांच्या मुखातून निघालेला अस्पष्टसा शब्दसुद्धा ध्यानातून निसटू नये म्हणून कंबरेत झुकून हुजऱ्या तिष्ठत राहिला.



हजामाला बोलाव. स्नानाची व्यवस्था कर.
धनी, येवढ्या राती?
चौकश्या नकोत. थाळ्यांची व्यवस्था करायला सांग आणि महिपत, खाशाब्या, सुभान्या अन् गोदाजीला सांगावा धाड. म्हणावे, असाल तसे दाखल व्हा. आत्ता या क्षणी.
जी धनी.


पुऱ्या तीन दिवसांनंतर धनी स्वत:हून जेवायला मागतात, माणसांना बोलावतात, याच आनंदात तो बिचारा चाकर लगेच कामाला लागला. हजामत आणि स्नान आटोपून नेताजी थाळ्यावर बसत असतानाच बोलावलेली माणसे समोर हजर झाली. पहाऱ्यावरील शिपायाला, कोणालाही आत न सोडण्याची सख्त ताकीद देऊन त्यांनी कवाड लावून घेण्यास सांगितले.
जेवणे झाली?
जी धनी.


मी जर माझ्या सोबत चला म्हणून सांगितले, तर चलणार?
असं का इचारता धनी? तुमचा शबुद वलांडला तर प्राण कुडीत ऱ्हायाचे न्हाईत.
त्याची खात्री आहे म्हणूनच बोलावून घेतले. पण आताचा मामला नाजूक आहे. नेहमीच्या शिरस्त्यातला नाही. कदाचित मनाला न मानवेल. स्वराज्य सोडून महाराजांपासून दूर, मी जिथे जाईन तिथे, जेव्हा जाईन तेव्हा येणार? जिथे राहीन तिथे, जसा राहीन तसे, राहणार? एकही प्रश्न न विचारता साथ देण्याचे, इमान न सोडण्याचे वचन देणार? कदाचित पुन्हा बायका-पोरांत परत येता येईल न येईल; मान्य कराल? द्या वचन.


आमचं इमान कवाचंच आपल्या पायी हाय धनी. पन आज असं पुन्यांदा इचारतायसा म्हन्जी बाब लई गंभीर असनार. आनि सोराज्यापासून, म्हाराजांपासून दूर जायाचं? काय उमगना झालंय बगा.
आजवर स्वराज्याविरुद्ध महाराजांच्या शब्दाबाहेर या हातांनी काही घडलेले नाही, स्वप्नांतसुद्धा कधी घडणार नाही या गोष्टीची तुम्हा सर्वांना खात्री आहे ना?
जी सरकार.


मग प्रश्न नकोत. आपण जे करायला निघालो आहोत ते वरकरणी विरोधी दिसत असले, तरी… तरी ते स्वराज्यासाठी आणि महाराजांच्या हितासाठीच असेल याची पक्की खूणगाठ मनात असू द्या. इतके दिवस स्वराज्याचे बिनीचे शिलेदार आणि सरनोबतांची खास माणसे म्हणून मिरवलात, कौतुक करवून घेतलेत, मानमरातब झेललेत; आता निंदानालस्ती झेलण्यास सज्ज व्हा. आज स्वराज्य आणि महाराज तुमच्या प्राणांची आहुती मागत नाही, तर अब्रू, इभ्रत आणि सन्मानाची किंमत मागत आहेत, असे समजा. ही जणू आपली सर्वांचीच सत्त्वपरीक्षा आहे. मान्य असेल तर या भाकरीची शपथ घ्या. नसेल तर विसरून जा. मात्र एक गोष्ट नीट ध्यानात घ्या, आत्ता या क्षणी परत फिरण्याची मुभा असली, तरी नंतर परतीचा मार्ग नाही. या खोलीतून यातला एक शब्द जरी बाहेर फुटला, तरी स्वराज्याशी गद्दारी केल्याचे पाप माथी घेऊन कडेलोटाला सामोरे जावे लागेल. अर्ध्यातून साथ सोडून परतलात तरी भविष्य तेच. पूर्ण विचार करा आणि निर्णय घ्या.


नेताजींचे बोलणे संपताक्षणी चौघांनी झटकन पुढे होऊन समोरच्या तसराळ्यातील भाकर उचलून हाती घेतली. एकमुखाने चौघे बोलले–


धनी, भाकरीची आण घेतो. तुमा विषी न कधी सोंशय व्हता, न कधी मनात किंतू येईल. जे कराल ते अंती गोमटंच असनार. येक डाव सावली साथ सोडंल, पर आमची साथ सुटनार न्हाई. का? कशापाई? असा सवाल जबानीवरच काय पन मनात बी उमटनार न्हाई. जे कराल ते कितीही इपरीत दिसत असलं तरी अंती सोराज्याच्या नि म्हाराजांच्या काजाचंच आसंल या श्रद्धेनं जिवात जीव हाय तवर साथ करू. यात कुचराई व्हनार न्हाई. मान-पान, इभ्रतीचा इचार करनार न्हाई, घर-संसाराची परवा करनार न्हाई. भाकरीची, जिवाची, इमानाची आन.


शाबास रे माझ्या वाघांनो! माझा विश्वास सार्थ ठरला. लगोलग घोडी तयार करा. लांब मजलीच्या पडशा बांधा. मात्र बोभाटा नको. येरवाळी गडाचे दरवाजे उघडताच आपण गडातून बाहेर पडणार आहोत. गोदाजी, हडपा उघड. माझा कसा रुपयांनी भरून दे. तुमच्या प्रत्येकाच्या कंबरेला मोठी रक्कम ठेवा. माझ्या पडशीत दरबारी कापडाचा एक जोड असू देत. या आता.



पूर्व क्षितिजावर सूर्याची पहिली किरणे उमटताच बुरुजावरून तोफ उडाली आणि विशाळगडाचा कोकण दरवाजा सताड उघडला. त्याच क्षणी पाच स्वार भरवेगात गडाबाहेर पडले. हवालदाराने अन् मावळ्यांनी सरनोबतांना ओळखून मुजरे घातले पण माना वर होईतो घोडी पार नजरेआड झाली होती. नेताजी पालकर चार स्वार सांगाती घेऊन कोकण दरवाजाने गडाबाहेर पडल्याची खबर लगोलग महाराजांना पावती झाली. सदरेवर येताच, हीच खबर प्रतापरावांनी सर्वांसमोर सादर केली. महाराज काही बोलले नाहीत. काही वेळ फक्त डोळे मिटून स्वस्थ राहिले. त्यांच्या चर्येवर क्षणभर विषादाची आणि खिन्नतेची छटा उमटून गेल्याचे जाणकारांना जाणवले.



विशाळगडावरून नेताजी सुटले ते थेट नेसरीची खिंड ओलांडून रुस्तमेजमाच्या छावणीत दाखल झाले. शिवाजीने मोगली आश्रयाने आदिलशाहीविरुद्ध स्वतंत्र मोहिमा उघडल्याने त्याचा प्रतिकार करण्यासाठी रुस्तमेजमा छावणी ठोकून सज्ज होता. नेताजी पालकर येतोय अशी खबर येताच भराभरा हुकूम सोडून रुस्तमेजमाने फौज हत्यारबंद करवली. पण मग मागाहून खबर आली की, फक्त चार स्वार सांगाती घेऊन नेताजी सडा येतोय. पन्हाळ्यावर झालेल्या पराभवाचा ठपका ठेवून शिवाजीने नेताजीला सरनोबतीतून बरखास्त केल्याच्या खबरा मोगल व आदिलशाही दरबार अन् छावणीत उतरल्या होत्या पण इतक्या तडकाफडकी नेताजी बाजू बदलेल अशी अटकळ कोणाला आली नव्हती; त्यामुळे रुस्तमेजमाने जरा बिचकतच नेताजींची भेट घेतली. वर्षे लोटली तरी अफजलवधाचा धसका सर्वांच्या मनात कायम होता.
नेताजींनी, महाराजांना सोडून आल्याचे सांगताच रुस्तमेजमाच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही.
खानसाहेब, राजे स्वराज्य स्थापण्यास निघाले म्हणून शिर तळहाती घेऊन त्यांची साथ केली. ते स्वप्न आता वाऱ्यावर विरले. राजेच मोगलांच्या चाकरीत धन्यता मानू लागले. आम्हास अपमानित केले. या मनगटात स्वतंत्र दौलत उभारण्याची रग आणि ताकद रतीभरसुद्धा कमी नाही. चाकराचे पडचाकर होऊन राहण्यापेक्षा आपणसुद्धा शाही खिदमत करून दौलत कमवावी अशी मनशा बाळगण्यात गैर ते काय? आम्ही आदिलशाहीत मनसबदार होऊ इच्छितो. आमच्यासाठी आपण शहाकडे रदबदली करावी.


रुस्तमेजमा खुळचट दरबारी नव्हता. त्याने फारच सावध प्रतिक्रिया दिली. कोणतेही स्पष्ट वचन न देता त्याने नेताजींना छावणीत ठेवून घेतले आणि आदिलशहास सविस्तर खलिता पाठविला मात्र त्यात स्वत:ची शिफारस किंवा मत न नोंदविण्याचा सावध पवित्रा त्याने कायम ठेवला.


शिवाजीवर चिडलेला प्रतिशिवाजी चाकरीत येतो म्हटल्यावर अली आदिलशहा आणि बड्या बेगमेस मोठा आनंद झाला. अली आदिलशहाने दस्तूरखुद्द दस्तखतीचे पत्र, पोशाख, कट्यार, तलवार, शिरोपाव नेताजींसाठी रवाना केले आणि त्यांना विजापूर दरबारात सन्मानाने पाचारण केले. रुस्तमेजमाने सिद्दी सरवरच्या हाताखाली एक हजार स्वार आणि पाचशे पायदळ नामजद करून नेताजीस विजापुराकडे रवाना केले.
क्रमश:

*____📜🚩Image result for नेताजी पालकर

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔ अग्निदिव्य ⚔🗡भाग - 8

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜
अग्निदिव्य

लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार

_📜🗡भाग - 8⃣📜🚩🗡___

_🚩📜🚩___

एकदा उद्दिष्ट निश्चित झाल्यावर योजना ठरण्यास वेळ लागला नाही. नेहमीच्या पद्धतीने आणि उत्साहाने भराभरा तपशील ठरत गेला. जबाबदाऱ्या वाटल्या गेल्या. मात्र नेताजींनी अवाक्षरसुद्धा उच्चारले नाही. अपमान त्यांच्या जिव्हारी लागला होता. संतापाने मस्तक भणाणून गेले; अर्थात भरमसलतीत महाराजांवर राग व्यक्त करणे शक्यच नव्हते. मात्र त्यांची नाराजी आणि संताप मुद्रेवर स्पष्ट दिसत राहिला. संतापाने सोडलेले सुस्कारे ऐकू येत राहिले. पण महाराजांनी त्याची दखल घेतली नाही. इतरांनीसुद्धा तिकडे दुर्लक्ष केले.


नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे कामकरी, कातकरी, हेटकरी, वंजारी आदींच्या वेषात गडावर माणसे पेरावी. त्यांनी मोक्याच्या जागा हेरून ठेवाव्यात. त्या जागांच्या आसपास संशय येणार नाही अशा पद्धतीने रात्रीचा मुक्काम करावा. मध्यरात्रीच्या दरम्यान सरदरवाजावर महाराजांनी एल्गार करावा; त्यामुळे उडालेल्या धांदलीचा फायदा घेत गडात घुसून राहिलेल्या शिबंदीने एकदम उठाव करून हेरलेल्या जागांचा ताबा घ्यावा. एका टोळीने ऐन सरदरवाजावर गोंधळ उडवून देऊन दरवाजा उघडावा आणि महाराजांच्या सैन्याला आत घ्यावे. याच सुमारास नेताजींनी अचानक येऊन आपल्या तुकडीनिशी महाराजांची कुमक करावी आणि गड फत्ते करावा असा बेत मुक्रर झाला.


गडाचा आदिलशाही किल्लेदार अतिशय शूर, सावध आणि इमानदार म्हणून ख्यात होता. म्हणून मुख्य हल्ला महाराजांनी स्वत: करण्यास सर्वांनी विरोध केला. नेताजींनी पहिला हल्ला करून किल्लेदाराचा ताज्या दमाचा जोर अंगावर घ्यावा आणि निकराच्या समयी महाराजांनी कुमक करून कर्त करावी, असे सर्वांचे म्हणणे पडले. महाराजांनी त्या बेतास साफ नकार तर दिलाच पण नेताजींनी सुचविलेल्या मोहिमेच्या अनुषंगाने चार तिखट बोलसुद्धा सुनावले.



सारा तपशील निश्चित करून मसलत संपली. काही मंडळींना तातडीने छावणी सोडून पुढे जाण्याचे आदेश महाराजांनी दिले.


मसलत बरखास्त झाली. मुजरे घालून एकेक जण निघून गेला. सरतेशेवटी नेताजी जड अंत:करणाने उठले. खालमानेनेच त्यांनी मुजरा केला. नजर किंचित उचलली. महाराजांच्या नजरेत नजर मिसळली. ये मनीची खूण त्या मनी पटली. दोघांच्या मुद्रेवर स्मित उमटले. पण फक्त अर्धा क्षणच. पायात मणामणाच्या बेड्या असल्यागत चालत नेताजी बाहेर पडले.


समोर भेटेल त्या शिपाई-प्याद्यापासून सरदार-मुत्सद्द्यापर्यंत ज्याला त्याला नेताजी आपल्या अपमानाची बोच उघडपणे बोलून दाखवीत राहिले. आपला उद्वेग आणि संताप लपविण्याचा ते किंचितही प्रयत्न करीत नसत. या साऱ्या गोष्टी महाराजांच्या कानी गेल्याशिवाय राहणे शक्यच नव्हते. नेताजी वठवीत असलेली बतावणी पाहून महाराज संतुष्ट झाले. त्यांनी दुर्लक्ष करण्याची बतावणी सुरू ठेवली. रिवाज वगळता दोघांचे भेटणे-बोलणे बंदच झाले. परिणामी, इतर मुत्सद्दी आणि अधिकारी नेताजींना टाळू लागले.


महाराजांची योजना मंजूर झाली. मंजूर झालेला खजिना, गला आणि दारूगोळा मोरोपंतांनी त्याच दिवशी ताब्यात घेऊन पन्हाळ्याच्या वाटेने पुढे रवाना केला. अन्य छावण्यांमधून शिबंदी गोळा करण्यासाठी नेताजींनी छावणी सोडली. रातोरात मसलत बसून हल्ल्यासाठी शिवरात्रीचा मुहूर्त पक्का झाला. मिर्झाराजांचा निरोप घेऊन महाराजांनी दुसऱ्याच दिवशी छावणी सोडली. बरोबर पाचव्या दिवशी महाराज पन्हाळ्याच्या परिसरात पोहोचले. ठरलेल्या बेताप्रमाणे कातकरी वगैरेंच्या वेषातल्या मावळ्यांच्या तुकड्या गडावर रवाना झाल्या.



महाराजांची ही पन्हाळा मोहीम सपशेल फसली. किल्लेदार अतिशय सावध तर होताच, पण त्याला कशी कोण जाणे हल्ल्याची खबर मिळाली होती. महाराजांनी गडात घुसविलेली मंडळी एकजात पकडली गेली. मात्र या गोष्टीचा सुगावा त्याने महाराजांना शेवटपर्यंत लागू दिला नाही. महाराजांचा एल्गार होताच त्याने सरदरवाजाच्या आतल्या बाजूस गोंधळ उडाल्याचे नाटक करून स्वत:च दरवाजा उघडला. महाराजांची फौज गडात आतपर्यंत घुसू दिली.


या हल्ल्याला गडकऱ्यांनी नुसते चोख प्रत्युत्तर दिले असे नाही तर हल्ला साफ मोडून काढला. गडकऱ्यांचा आवेग एवढा जबरदस्त होता की, एक हजार मावळा कामी आला. नेताजी वेळेपर्यंत पोहोचले नाहीत. त्यांची वाट पाहत झुंजत राहणे शक्यच नव्हते. मोठ्या शिकस्तीने विशाळगडाकडील दिंडी उघडण्यात मावळ्यांना यश आले. सपाटून मार खाऊन महाराजांना विशाळगडाकडे पळून जावे लागले. आदिलशाहीविरुद्ध मराठ्यांचा हा पहिलाच पराभव. त्याउपर एक हजार मावळ्यांनी हकनाक जीव गमावले. ही गोष्ट महाराजांच्या जिव्हारी लागली. नेताजी समयास पावते तर कदाचित पारडे फिरू शकले असते.


कामात कुठेतरी कुचराई करण्याची मसलत जरी महाराजांची होती, तरी मोहिमेत कुचराई कधीच अपेक्षित नव्हती. आणि त्या कुचराईचे मोल हजार मावळ्यांच्या प्राणाने चुकवावे हे तर कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय ठरणारे नव्हते. अशी गफलत नेताजी जाणूनबुजून करणे कधीच शक्य नव्हते. नक्की काहीतरी घोटाळा झाला होता. काही असो, नेताजी वेळेवर पोहोचले नाहीत ही वस्तुस्थिती कायम राहते. नुकसान झाले होते. मोहिमेत दारुण पराभव पदरी आला होता. महाराज खरोखर संतापले होते.
विशाळगडावर नेताजी महाराजांसमोर पावते झाले. महाराजांच्या दिलात संताप आणि नजरेत अंगार होता. त्या नजरेला नजर देण्याची हिंमत नेताजींमध्ये उरली नव्हती. संतापाने थरथरणाऱ्या ओठांमधून तीक्ष्ण आवाजात वीज कोसळल्यासारखा एकच प्रश्न बाहेर उमटला–
समयास का पावते झाला नाहीत?


नेताजींकडे उत्तर नव्हते. पायतळी नजर गुंतवून ते गप्पच राहिले. महाराजांनी नेताजींना सरनोबतपदावरून तडकाफडकी बरखास्त केले. कुडतोजी गुजरांच्या पगडीवर सरनोबतीचा चांदवा चढला. त्यांना नवा किताब मिळाला. ‘प्रतापराव’. सरनोबत प्रतापराव गुजर.
क्रमश:

*____📜🚩Related image

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...