फॉलोअर

शनिवार, २१ डिसेंबर, २०१९

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔ अग्निदिव्य भाग - 10

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜

अग्निदिव्य

लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार

__📜🗡भाग - 1⃣0⃣📜🚩🗡___

_🚩📜🚩___

विजापूरच्या परकोटाबाहेर शहाच्या वतीने बहोललखानाने नेताजींचे स्वागत केले. नेताजींची व्यवस्था खास शामियान्यात केली गेली. जुम्म्याच्या खास दरबारात त्यांचा मोठा गौरव करण्यात आला. मानाची खिलत दिली गेली. पाचहजारी सरदारकी आणि जहागिरी बहाल करण्यात आली. मात्र जहागिरीचा परगणा जाहीर झाला नाही. तूर्तास खर्चासाठी रोख पन्नास हजार रुपये त्यांच्या पदरी घातले. पुढची व्यवस्था होईपर्यंत त्यांना रुस्तमेजमाची निसबत फर्मावण्यात आली.

मराठशाहीचे सरनोबत नेताजी पालकर आता शाही सही-शिक्क्यानिशी आदिलशाहीचे पाचहजारी मनसबदार झाले.

महाराज आईसाहेबांच्या महालात बसले होते. रामचंद्रपंत अमात्य, मोरोपंत पिंगळे, निराजी रावजी, दत्ताजीपंत, प्रतापराव गुजर, तानाजी मालुसरे, कोंडाजी फर्जंद, जेधे, शिळमकर, काटके वगैरे वेचक मंडळी समोर उपस्थित होती. खल चालला होता दिल्लीभेटीचा. नेताजींची उणीव प्रत्येकास खुपत होती पण विषयाला तोंड फोडण्याचा कोणाचा धीर होत नव्हता. अखेर आईसाहेबांनीच थेट विषय काढला.

शिवबा, नेताजी रुसून गेल्याचे कळले. त्यांची काय खबरबात? पन्हाळ्याचा पराभव त्यांनी जिव्हारी लावून घेतलेला दिसतो. रागाच्या भरात तुम्हीसुद्धा पार टोक गाठलेत. थेट त्यांची सरनोबतीच बरखास्त केलीत. अशाने मराठ्याचे मानी रक्त दुखावणारच.

मोका मिळताच रामचंद्रपंतांनीसुद्धा आईसाहेबांच्या सुरात सूर मिसळला–
आईसाहेबांचे बोलणे रास्त आहे. एकदम एवढी कठोर सजा देण्याचे महाराजांनी टाळले असते, तर एवढा तालेवार मोहरा दुखावला नसता. साऱ्या फौजेचा आपल्या सरनोबतावर भारी जीव. डोक्यात राख घालून ते असे अचानक निघून गेले; त्यामुळे फौजेत नाराजी आहे.
मोरोपंतांनी विषय पुढे सरकवला–


सरनोबती सांभाळण्यात प्रतापराव कोठेही उणे ठरणार नाहीत हे जरी खरे असले, तरी नेताजीरावांचे दुखावले जाऊन अज्ञातात निघून जाणे अस्वस्थता उत्पन्न करीत आहे. मौका साधून स्वत: महाराजांनीच फौजेची समजूत काढावी.


पंत, नेताजीकाका असे रुसून, न सांगतासवरता निघून गेले याचे आम्हास दु:ख कसे नसेल? स्वराज्याच्या सुरुवातीपासूनचे ते सोबती. आप्तसुद्धा आहेत ते आमचे. प्रश्न पन्हाळ्यावर माघार घ्यावी लागली याचा नाही. जय-पराजयास आम्ही महत्त्व देत नाही हे सारेच जाणतात. गनिमी काव्यात माघारीची शरम नसते. पण प्रश्न आहे एक हजार मावळ्यांच्या हकनाक झालेल्या कत्तलीचा. आम्हास रयत पोटच्या लेकरासारखी आणि प्रत्येक मावळा सख्ख्या भावासारखा. पन्हाळ्याचा किल्लेदार चलाख आहे, त्याला आगाऊ खबर मिळाली असेल, त्याने तो सावध राहिला असेल; पण जर नेताजीकाकांची कुमक वेळेवर पावती तर निदान निष्ठावान मावळ्यांचे जीव तरी वाचते. दौलत सध्या अडचणीत आहे. रजपुताने तहात आम्हास पुरते नागवले आहे. त्याच्या छावणीत आम्ही शरणागताचे अपमानास्पद जिणे जगत होतो आणि दिलेरखानाच्या भयाने आम्ही छावणी सोडून निघालो. ही बाब लपून राहिलेली नाही.

याउपर अधिकाऱ्यांच्या गफलतीमुळे आणि बेफिकिरीमुळे जर सैन्य मारले जाऊ लागले तर मावळ्यांचे धैर्य टिकून कसे राहावे? सरनोबतच जर बेफिकीर झाले आणि त्याकडे आमचा कानाडोळा झाला, तर लहान-मोठे अधिकारी आणि सर्वसामान्य शिलेदार यांजवर जरब कशी राहावी? सैनिकांकडून इमानाची अपेक्षा करीत असताना, त्यांच्या मनात धन्याविषयीचा विश्वास जागता ठेवणे हे धन्याचे प्रथम कर्तव्य ठरते. नेताजीकाकांची सरनोबती काढून घेण्याचा निर्णय आम्ही नाइलाजाने, पण पूर्ण विचार करूनच घेतला. काका स्वराज्याचे एकनिष्ठ पाईक. आम्हास वाटले, ते आम्हास समजून घेतील. त्यांच्यासाठी काही वेगळा मनसुबा आम्ही योजत होतो. कृष्णाजीपंत हणमंत्यांच्या सोबत मोठी जबाबदारी देऊन त्यांना कर्नाटकात पाठवण्याचा आमचा मानस होता. पण त्यांनी वेळ दिला नाही. धीर राखला नाही. एवढ्या तोलामोलाचा हा मोहरा कुठे भरकटला नाही म्हणजे मिळवली.


महाराज बोलत असतानाच हुजऱ्या आत आला.
म्हाराज, बहिर्जी नाईक तातडीची भेट मागतात. नाईक लई चिंतेत दिसाय लागलेत.
बहिर्जी? या वेळी? दे पाठवून.


मुजरा करून बहिर्जी मान खाली घालून उभा राहिला. शेल्याने कपाळीचा घाम वारंवार पुसत तो शब्दांची जुळवाजुळव करीत राहिला. प्रत्येकाची उत्सुक नजर आपल्यावर खिळलेली त्याला जाणवत होती पण शब्द ओठावर येत नव्हते. वाट बघून अखेर महाराजच बोलले–


नाईक, असे अचानक? तुम्ही विजापुरात असावयास हवे होते.
विजापुरास्नच येतोया म्हाराज. तीन दिस झाले घोड्याची मांड सोडलेली न्हाई. खबर अशी चक्रावनारी हाय की, कोना नजरबाजाकडून धाडनं रास्त वाटलं न्हाय. म्हनून मग सोता आलो.
आईसाहेबांचा जीव धास्तावला. त्या एकदम ताठ बसत्या झाल्या. पदराची अस्वस्थ चाळवाचाळव करीत काळजीच्या स्वरात त्या बोलल्या–


नमनाला घडाभर तेल जाळत जीव टांगणीला लावू नकोस. काय असेल ते पटकन सांगून टाक. धीर निघत नाही आताशा.
आईसाहेब, लई वंगाळ खबर हाये. नेताजी सरकार…
काय झालं नेताजीरावांना?
चार-पाच आवाज एकदम उमटले. एकटक नजरेने स्थिर पाहत महाराज बहिर्जीच्या काळजाचा ठाव घेत राहिले. जाजमावरची नजर न उचलता बहिर्जी बोलला–


नेताजी सरकार आदिलशहास मिळाले. अली आदिलशहा बाच्छावानं त्यानला पाच हजाराची सरदारी, मनसब आनि रुपये पन्नास हजार रोख बहाल क्येलं. खिलत, तेग आन् शिरपाव आनि घोडी अहेर करून नावाजनी क्येली. हाली सरकार रुस्तमेजमाच्या छावनीत हायेती.
सारे स्तब्ध झाले. नजरा पायतळी खिळल्या. चमकून आईसाहेब महाराजांकडे एकटक पाहत राहिल्या. महाराजांच्या मुखातून दीर्घ सुस्कारा उमटला. आईसाहेबांच्या नजरेला नजर देण्याचे टाळत ते गंभीर स्वरात उद्गारले–


जे अपेक्षिले तेच घडले. आम्हास नेताजीकाकांची चिंता वाटते. तुटलेला पतंग अस्मानात चढत नाही. वाऱ्याच्या झोताबरोबर काही क्षण वर चढल्यासारखा भासला तरी अखेरीस गोता खाऊन खालीच पडायचा. दुर्दैव! दुसरे काय!!


शिवबा, नेताजीस माघारी आणावयास हवे.
व्हय जी म्हाराज. खोपड्याची बात येगळी, नेताजीरावांची येगळी. असा चोखट असामी गमावनं सोराज्याच्या फायद्याचं न्हाई.


होय महाराज, प्रतापरावांचे बोलणे रास्त आहे. स्वराज्यातला प्रत्येक बारकावा नेताजीरावांस आपल्या खालोखाल ठावकी आहे. त्यांचे गनिमाच्या गोटात असणे मोठे नुकसानकारक ठरेल.


प्रतापराव, पंत, बरोबर आहे तुमचे; पण आईसाहेब, घाई करून चालणार नाही. तापला तवा भडकलेल्या चुलीवरून घाईने उतरविण्याचा खटाटोप केला तर बोटे भाजण्याचीच खात्री अधिक. बहिर्जी आमच्या महाली जाऊन आमची वाट पाहा. आम्ही आलोच. पंत, दिल्लीच्या मनसुब्यावर उदईक बोलू. तोवर या बातमीवर कोण काय प्रतिक्रिया देतो याची नीट माहिती काढा आणि उद्या सकाळी आम्हासमोर सादर करा. प्रतापराव, फौजेत दंगा किंवा फितवा होणार नाही याविषयी जातीने काळजी घ्या. मोरोपंत, प्रत्येक अधिकाऱ्यास आणि गडावर सख्त सूचना रवाना करा. म्हणावे, नेताजींचा बहाणा करून कोणी फिसाद उभा करू पाहील, तर मुलाहिजा राखला जाणार नाही. त्यांना पुढे करून गनीम गडावर चाल करू बघेल, तर कोणताही मुलाहिजा न बाळगता त्यांचेवर बेलाशक गोळा टाकावा. कोठे ढिलाई झाली आणि गनिमाने दावा साधला तर जबाबदार असणाऱ्याची गर्दन मारली जाईल. सीमेवरचे चौक्या पहारे आणि गड-कोटांवरचा बंदोबस्त कडक करा. ठिकठिकाणच्या नजरबाजांस सावधगिरीच्या सख्त सूचना रवाना करा. तानाजी तुम्ही, चिपळूण आणि संगमेश्वराच्या छावणीकडे आजच रवाना व्हा. कोठेही काही गडबड होता कामा नये. यावे. आईसाहेब, बहिर्जीशी बोलून आम्ही पुन्हा आपली गाठ घेतो.



महाराज महालात आले तेव्हा त्यांची वाट पाहत बहिर्जी दारातच उभा होता. महाराजांच्या मागोमाग तो आत गेला. महाराज लोडाला टेकून बसले. मुद्रा शांत, नजर स्थिर, भावरहित. जाजमावर नजर लावून बहिर्जी उभा.
पहाऱ्यावरच्या शिपायाला टप्प्याबाहेर उभे राहण्यास सांगा आणि कोणत्याही कारणाने आत न येण्याची सख्त ताकीद द्या. अडसर घालून कवाड लावून घ्या.


दाराला अडसर लावून बहिर्जी समोर उभा राहिला.
हं बोला नाईक. प्रत्येक गोष्ट तपशीलवार सांगा. कितीही क्षुल्लक वाटली तरी कोणतीही बाब टाळू नका, विसरू नका. तिखट-मीठ न लावता पण सविस्तर. ऐकण्यास कितीही कटू आणि त्रासदायक वाटले तरी जे जसे आहे ते तसे सांगा. ज्याने जे शब्द वापरले ते आणि तसेच आम्हापर्यंत पोहोचू देत. जे प्रत्यक्ष घडले आहे त्यापेक्षा विपरीत काय ऐकायला लागणार?


जवळपास दीड घटका बहिर्जी बोलत होता. मध्ये एकही प्रश्न न विचारता महाराज एकाग्रतेने ऐकत राहिले. मनातील भाव चर्येवर उमटू न देण्याची कोशिश करीत राहिले. बहिर्जीचे बोलणे संपले. महाराजांनी दीर्घ सुस्कारा सोडला. एवढा वेळ निश्चल बसून राहिलेल्या महाराजांनी आसन बदलले.
भेट झाली?


जी न्हाई म्हाराज. म्याच सामोरा ग्येलो न्हाई. कोणतंबी सोंग काढलं असतं तरी त्येंनी वळखलं असतं. म्हनून टाळलं. पण आडोशाला राहून हातभरावरून प्रत्यक्ष निरीखलं. दरबारातून परतत व्हते. पार हरवल्यासारखे दिसले. सरनोबतीचा डौल, तोरा, तडफ काईच शिल्लक राहिलं न्हाय.


ते तर व्हायचेच. सर्वांचा मनसुबा तर तुम्ही जातीनिशीच ऐकला. पण घाईगर्दीत इतक्यात काही करणे नाही. मात्र एक गोष्ट लगोलग करा, त्यांच्या भोवती सतत, अगदी अष्टौप्रहर आपली माणसे असू देत. त्यांना क्षणभरही दृष्टिआड होऊ देऊ नका. माणसांची निवड खुद्द तुम्हीच करा. माणसे हवी घारीच्या डोळ्यांची आणि पालीच्या कानांची. नेताजीकाकांची प्रत्येक कृती, प्रत्येक हालचाल, मुखातून निघालेला प्रत्येक शब्द मग कोणाशी संभाषण असो किंवा स्वत:शीच केलेली बडबड असो, सहेतुक उच्चारलेला असो वा सहज निर्हेतुक; आमच्यापर्यंत, थेट आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांना आपल्या माणसांची ओळख पटता कामा नये. मात्र आपली माणसे एकमेकांना, सकारण असो वा विनाकारण असो, रत्नागिरीच्या कलमी आंब्याचा उल्लेख करून आपापली ओळख देतील. दुसरे सर्वांत महत्त्वाचे, त्यांच्या जिवाला किंचितसाही अपाय होणार नाही याची डोळ्यांत तेल घालून काळजी घ्या. अगदी निकरावर येत नाही तोवर हस्तक्षेप करण्याची गरज नाही. तसे स्वसंरक्षण करण्यास ते समर्थ आहेत, पण अगदीच निरुपाय झाल्यास वा धोका वाटल्यास त्यांना खबर लागू न देता सरळ पळवून आणा. त्यांच्या सोबत गेलेली चार माणसेसुद्धा नजरेच्या टप्प्याआड होऊ देऊ नका.


अजून एक महत्त्वाचे, त्यांच्या माहितीचा कोणी एक नजरबाज त्यांना फितेल असे पाहा. त्याच्या मदतीने त्यांना त्यांच्या नजरबाजांची टोळी उभारून गनिमाच्या गोटात काम करू देत. त्यांना पोहोचत्या होणाऱ्या खबरा आपल्याकडे वळत्या होऊ देत. नीट ध्यानात आले? काही शंका वा स्पष्टीकरण हवे असल्यास विचारून घ्या.
क्रमश:

*____📜🚩📷Image result for नेताजी पालकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...