#बाजींद
भाग क्र. २४ वा..!
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
दरम्यान मराठ्यांनी यशवंतमाचीच्या पूर्वेकडून हल्ला चढवत पूर्व वेस कब्जात घेतली.
मराठ्यांच्या त्या निकराचा लढ्यात अग्रभागी स्वत: वस्ताद काका नेतृत्व करत होते.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेवच्या घोषणांनी रायगडचे खोरे दुमदुमून गेले होते.
भगव्या जरी पटक्यांचे निशाण हिंदोळे घेत शिरक्यांच्या काळजात घुसत होते.
राजे येसजीरावांनी घोडदळाला आज्ञा केली व ते सुद्धा काळभैरवाच्या नावानं चांगभल आरोळी देत मराठ्यांच्या फौजेवर तुटून पडले.
तलवारीच्या खणखणाटाने यशवंतमाची हादरुन गेली होती.
कमजोर योद्धे गतप्राण होत होते, वीरांचे तांडव सुरु होते...!
इतक्यात मराठ्यांचा एक जंबियाचा गोळा फिरवणाऱ्या बहाद्दराने राजे येसजीरावांच्या रोखाने गोळा भिरकावला...!
सुदर्शन फिरावे तसा तो गोळा सुसाट वेगाने राजे येसजीरावांच्या छातीवर येऊन आदळला..!
घाव वर्मी बसल्याने, प्रचंड तडाख्याने राजे येसाजीराव घोड्यावरून खाली पडले..!
शिरक्याची फौज ते चित्र पाहून भयभीत झाली...!
घोडदळ मागे फिरू लागले.
हे पाहताच मराठ्यांच्या फौजेला अवसान शिरले... तुफान कत्तल करत ते पुढे सरकू लागले.
घोड्यावरून पडलेल्या येसजीरावांना काही अंगरक्षकांनी उचलून सावध केले.
ते शुद्धीवर आले, पण समोर शिरक्याची पीछेहाट पाहताच ते जखमी अवस्थेत पुन्हा घोड्यावर स्वार झाले.
पण, गोळ्याच्या प्रहाराने त्यांना शुद्ध टिकवणे कठीण होते...!
मराठ्यांनी जवळपास शिरक्यांच्या फौजेला कोंडीत आणले होते... आजवर अजिंक्य असलेली यशवंतमाची आज मराठे जिंकणार अशी लक्षणे दिसू लागली ..!
दूरवर यशवंतमाचीच्या राजे येसाजीरावांच्या वाड्यावरून "साऊ" हे सारे पाहत होती, इतक्यात वाड्याच्या मागे असलेल्या तालमीतून "काळ भैरवाच्या नावाने चांगभल" च्या आरोळ्या उठल्या... राजे येसाजीरावांच्या पदरी असलेले निष्ठावान शे दोनशे पैलवान युद्ध पोषाख घालून दौडत युद्धभूमीकडे धावत होते... त्यांचा म्होरक्या होता एक धिप्पाड पैलवान.... दुरुनच साऊने त्या म्होरक्याला ओळखले होते...!
"भीमा जाधव"
खंडेरायने यशवंतमाचीच्या यात्रेत चित करुन सपशेल पराभव केलेला राजे येसाजीरावांच्या खासगीतला मल्ल.
पराभवाचे उट्टे मातृभूमीचे रक्षण करुन काढण्याच्या मनसुब्याने त्वेषाने बाहेर पडला होता..!
ते शे दोनशे पैलवानांचे टोळके हातात तलवारी भाले घेऊन मराठ्यांच्या हल्ल्याचा प्रतिकार करावयास दौडू लागले...!
मजल दरमजल करत धुळीचे लोट उडवत त्या पैलवानांची पहिलीच टक्कर निकराची दिली.
पैलवानी घाव वाया जातच नव्हता.. ज्यावर पडेल त्याची खांडोळी होत होती.
एक एक पैलवान 10-10 धारकरी कापू लागला.
घोड्यासकट योध्याना उचलून आपटू लागले.
जणू रामायणात कुंभकर्णाने जसा संहार वानर सेनेचा मांडला होता, तसाच संहार त्या शिरक्यांच्या नेकजात पैलवानांनी मराठ्यांच्या सेनेविरुद्ध मांडला होता...!
आता थांबण्यात राम नव्हता... थांबलो तर जीव जाणार .. झाले... इशारतीची कर्णे वाजू लागली... विजयाची माळ गळ्यात पडता पडता भीमाने ती हिसका मारुन आपल्या हाती घेतली होती.
पुढे पळणाऱ्या फौजेची त्रेधातिरपीट बघत राजे शिर्के व पैलवानांची फौज उभी होती.... भीमाने डोक्याला चढवलेले शिरस्त्राण उतरवले... आणि राजे येसाजीरावांच्या समोर येऊन मुजरा केला...!
राजे निहायत खुश झाले... ते बोलले.... "भीमा... अरे तू आज धावून आला नसतास, तर शिरक्याची अब्रू, परंपरा सर्वकाही मोडीत निघाले असते.. संपले असते सारे..." असे म्हणत त्यांनी भीमाला मिठी मारली, पण छातीवरील आघाताने त्याच्या मिठीतच मूर्च्छित येऊन पडले.... सारे सैन्य राजे येसाजीना घेऊन वाड्याकडे जाऊ लागले....
एक योद्धा मात्र जाणीवपूर्वक मागे उभा होता... त्याचे बलदंड बाहू घामाने डबडबले होते.. हातातील नंगी समशेर रक्ताने निथळत होती.... त्या रक्ताकडे पाहत त्या वीरांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.... त्याने डोक्याला घातलेले शिरस्त्राण काढले व एकवार भरल्या नेत्रांनी त्या पळणाऱ्या सेनेला पाहू लागला.... आणि पुन्हा यशवंतमाचीकडे वळला...........
ओळखले....ओळखले.....
जंगलात उंच झाडावर हिरव्या पाल्याची झालर अडकवून हेरगिरी करणाऱ्या शिवछत्रपतीच्या निशाणबारदार हेजीबाने ओळखले... तो वीर कोण आहे ते.....
खंडेराय.....!
होय... खंडेराय सरदेसाई...!
ज्यांनी बहिर्जींच्या खांद्याला खांदा लावून अनेक युद्धात महाराजांना यश मिळवून दिले होते.... तो स्वराज्याचा गुप्तहेर... बहिर्जींचा उजवा हात... स्वराज्याशी फितूर झाला आहे... आपल्याच बांधवांची कत्तल उडवून तो अजूनही यशवंतमाचीत आहे...!
विजेच्या वेगाने ही खबर दस्तुरखुद्द बहिर्जी नाईकांच्या कानी पोचली ...!
कानात उकळते तेल ओतल्यासारखे झाले..!
डोळ्यात पश्चाताप उतरला होता...!
रायगड परिसरात एका गुप्त ठिकाणी हजारो मावळ्यांच्या पुढे बहिर्जी बसले होते आणि हेजीब खंडेरायाच्या कत्तलीचे वर्णन करत होता...!
समोर वस्ताद काका मान खाली घालून सर्व ऐकत होते...!
"वा काका... चांगले शिक्षण दिले तुम्ही तुमच्या पठ्ठयाला...!"
बहिर्जी नाईक ओरडले... सारी सेना भीतीने कापू लागली... बहिर्जींचा राग काय आहे सर्वाना ठाऊक होते...!
"आजवर शेकडो जीवघेण्या मोहिमा करुन मेलेली माझी नजर खंड्यासारख्या फितुराला कशी ओळखू शकली नाही, याचा मला पश्चात्ताप होतोय.... उद्याचा दिवस मावळायच्या आत स्वराज्याचा गद्दार आणि दिमाखाने महाराजांशी वैर करणारी यशवंतमाची जर स्वराज्यात आली नाही... तर तुमच्यापैकी एकाने सुद्धा मराठेशाहीचे नाव घेऊ नका..!
खंडूच्या जीवावर मोठ्या विश्वासाने माझी जीभ लवलवली होती, की यशवंतमाची एका महिन्यात स्वराज्यात येईल म्हणून... आज महिना होत आला, तर पदरात काय पडले ? अपयश ....? कत्तल....? गद्दारी...? मी जातीने उद्या माचीवर हल्ला चढवणार...."
इतक्यात समोर उभे असलेले वस्ताद काका धावत समोर आले.... त्यांनी बहिर्जींच्या पायाला मिठी मारली... ते बोलले... "नाईक... आम्ही जिवंत असताना तुम्ही मोहिमेवर जाणार..?
मराठेशाही शेण घालेल तोंडात... महाराज कधीही माफ करणार नाहीत...!
आजवरची माझी नोकरी रुजू धरावी आणि मला अखेरची संधी द्यावी...!
शिकस्त करुन माची स्वराज्यात घेऊन नाहीतर...हे तोंड परत कधीही तुम्हाला दाखवणार नाही नाईक....."
वस्ताद काकांच्या डोळ्यातील आग पाहून नाईकांना त्यांना उठवले...
ते बोलू लागले.... "काका माफ करा मला मी जहाल बोलतो. पण,आज मराठ्यांचा धाक अवघ्या पातशाहीला आहे, कारण महाराज दिलेला शब्द पाळतात. जर शब्द पाळू शकत नसेल, तर तो मराठा नव्हे....!
उद्या सायंकाळ पर्यंत वाट बघू.... नाहीतर... शिरक्याची शिबंदी पांगु अथवा न पांगु... आपल्या तलवारी यशवंतमाची वर वळल्या पाहिजेत.. ज्याचे नेतृत्व मी स्वता करणार....जय भवानी...!"
कराकरा पावले टाकत नाईक निघून गेले..!
इकडे यशवंतमाचीवर आनंदी आनंद होता...!
भीमा जाधव माचीचा खरा नायक ठरला होता...!
राजे येसजीरावांना शुद्ध आली होती, त्यांनी भीमाला बोलावून घेतले होते..!
सारा दरबार भीमावर कौतुकाचा वर्षाव करत होता.
राजे बोलले....."भीमा... आज तुझ्या पराक्रमामुळे यशवंतमाचीची अब्रू वाचली.
बोल.. डोंगराएवढे उपकार आहेत तुझे माझ्यावर.... काय देऊ तुला...?"
धीरगंभीर मात्र मुत्सद्दी मुद्रेत उभा असणारा भिमा शांत उभा होता.
राजे मोठ्या आवाजात गर्जले.. "आजपासून मी शिरक्यांच्या सेनेचे सेनापतीपद भीमाला बहाल करत आहे...!"
हे ऐकताच सारी यशवंतमाची भिमावर फुले टाकू लागली...
"बोल भीमा! अजून काय हवे तुला....?"
भीमा शांतपणे पुढे आला....
राजे येसजीरावांना मुजरा केला व बोलू लागला...."राजे जेव्हापासून तारुण्यात पदार्पण करुन प्रेम म्हणजे काय समजले आहे... माझ्या मनात, बुद्धीत, श्वासात एकच मुलगी आहे... सावीत्री.... राजे मला जर काही द्यायचेच असेल, तर साऊचा हात द्या... माझ्या प्रणापेक्षा जास्त मी तीला जपीन....."
हे ऐकताच वरच्या मजल्यावर स्रीयांच्यात उभी असलेल्या सावित्रीच्या हृदयाचे ठोके वाढले.... डोळ्यात आग उतरली... ती बेभान होऊन भिमाकडे पाहू लागली... व दुसऱ्या क्षणात निघून गेली.....
राजे येसजीरावांना भीमाला काय उत्तर द्यावे समजेना....!
"ते बोलले... भीमा.. मी स्वत: जातीने साऊ बरोबर चर्चा करुन उद्या तुला होकार-नकार सांगीन... तुझ्यासारख्या वीराच्या हाती माझी मुलगी देणे मी भाग्याचे समजतो...." असे म्हणताच सारा दरबार टाळ्या वाजवू लागला....जनतेचा कौल भीमाच्या बाजूने होता...!
दरबार बरखास्त झाला आणि भीमा तालमीत आला.... पाठमोऱ्या अवस्थेत उभा असणाऱ्या खंडेरायाला मिठी मारुन भीमा बोलू लागला.... "खंडोजी... आज केवळ तुमच्यामुळे या भीमाचे स्वप्न पूर्ण होत आहे. माझी गेलेली इज्जत तुम्हीच मला परत मिळवून दिली... कसे आभार मानू तुझे मला समजेना....!"
हे ऐकताच खंडोजीला युद्धाच्या वेळेचा प्रसंग समोर दिसू लागला...
वस्ताद काका घाईने निघून गेले आणि यशवंतमाचीची पूर्व वेस मराठ्यांनी जिंकली होती..!
मराठ्यांची शुरता फक्त खंडोजीलाच माहिती होती.... पण काही करुन ही गूढ वही सुरक्षित रहावी, म्हणून त्याने यशवंतमाची बाहेरच्या डोंगरातील गुप्त गुहेत ती लपवली आणि पुन्हा यशवंतमाचीत आला, तर राजे येसाजीराव जखमी असून यशवंतमाची हारण्यात जमा होती...!
खंडोजीने साऊला भेटायला थेट वाडा गाठला व वस्तुस्थिती सांगितली....
अश्रूंनी भरलेल्या नेत्रांनी साऊ बोलली.... "खंडोजीराव... मला माझे राज्य आणि वडिलांचा प्राण गमावून स्वतःचा संसार थाटायचा नाही...! एकतर मला तुमच्या तलवारीने मारुन टाका... नाहीतर माझ्या वडिलांचे प्राण वाचवा...." आणि हुंदका देत ती रडू लागली.... तो पोलादी पुरुष साऊच्या प्रेमाने विरघळला आणि तडक तालमीत आला व तालमीतल्या शे दोनशे पैलवानांना जागे केले व बोलू लागला.....
"अरे मर्दांनो... ज्याच्या जीवावर आजवर दूध तूप खाऊन पैलवान झालात, तो तुमचा धनी तिथे बेशुद्ध पडला आहे.... ज्या मातीत कुस्ती खेळाला ती माती धोक्यात आहे.... भीमासारखा भीमकाय मल्ल इथे असताना राजे येसाजीराव स्वता युद्ध खेळतात हे बरे नव्हे... चला उचला समशेर आणि गाजवा मर्दुमकीचे तडाखे.... जिंकलात तर नाव होईल हारलात तर अमर व्हाल.... भीमा तू स्वता नेतृत्व कर आमचे..."
असे म्हणत ते शे दोनशे पैलवान चवताळून मराठ्यांच्या फौजेवर तुटून पडले... स्वता खंडेराय पण होता त्यात... ज्याच्यासोबत तलवार चालवायला शिकला, तीच तलवार आपल्या बंधूंच्या पोटातून आरपार करताना त्याचे काळीज तुटत होते.. पण सवित्रीचा विरह मात्र यापेक्षा जीवघेणा होता, म्हणून तो अखे घोडे उचलून फेकू लागला होता......
भरल्या नेत्रांनी खंडेरायला सारे आठवत होते
••● क्रमश ●••
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
#लेखकपैगणेश_माणुगडे
#Mob_9850902575
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा