फॉलोअर

शनिवार, २५ एप्रिल, २०२०

⚔️🚩 सुभेदार ताण्या - भाग ४ 🚩⚔️


⚔️🚩 सुभेदार ताण्या - भाग ४ 🚩⚔️Tanaji Malusare : The conqueror of Sinhagad (the Lion's Fort ...

✒️प्रसाद कुलकर्णी

तान्या पडला....! सुभेदार पडला....!

माज्या पायाखालची भुईच सरकली... रात अजूनच काळी ठिकार वाटाय लागली.... अंगातलं वारंच गळपाटलं ....थंडीनं हाताला कापरं भरलं ... समशेर अजूनच जड झाल्यागत वाटाय लागली....

माजा जोडीदार गेला....

रायबाचा बाप गेला....

गइयांचा मुखत्यार गेला...

जिजामाय चा ताना पडला...

सर्जा शिवाचा जिवलग पडला....

सोराज्याचा सुभेदार पडला......

भोवतालचा गलका लैच वाढाय लागला....

आता पातूर मावळ्यांनी गडावरची निम्मी शिबंदी कापून काढली होती राहुल्या पळून गेलती.... न्हायतर लपून

बसली होती

सूर्याजी समद्याना सामोरं गेला... दात ओठ खाऊन खेकासला.....

पन झालं इपरितच .....सुभेदार पडला अन पटतच नव्हतं.. समदी कल्याण दरवाज्याकड ऊतारावनं धावाय लागली...तिकडं आदीच पळून गेलेला.. गनीम आता उलटून चालून आला ...मावळ परत मावाळतीच्या कड्याकडं चढावर धावाय लागली..... गलका उठला आमचं गडी सैरावैरा धावाय लागलं...सुभेदार पडला हये

"आरं मूडद्याहो तुमचा बाप तिकडे मरून पडला अन तुम्ही बुडाला पाय लावून पळता व्हय र..सुक्काळीच्यानो..म्या समदे दोर कापून टाकल्यात....आता लढा नायतर मर.

तवर तिकड शेलार मामानं समशेर घीउन उदेभानावर तडाखं द्यायला सुरुवात केलती....म्हाताऱ्याची उमेद बगून आमी पूना जोशानं गनीम फाडाय सुरवात केली...गनीम पुन्यांदा तोबा तोबा करीत दरवाज्याकडं धावाय लागला.....

शेलार मामानं दाब-दुब घेत उदेभानावर काढणी काढली उदेभानाच्या खांदयाव वरमी घाव बसला त्यो भेलकांडला तलवार गळून पडली.....रक्तानं न्हालेल्या उदेभान्याच्या डोळ्यात आता मौत दिसत हुती.....त्यो आता भयसाटून आरडाय लागला...... पडल्याली समशेर घीउन पळाय लागला...... मामानं सोता भवती गिरकी घेत घुंगुरमाळ घातली... घुंगुरमाळा समशेर डोक्यावनं सप्पय गोलात फिरली....डोळ्याचं पातं लवस्तवर ...चौकावर येका दोरीत घेतलेल्या काढणीला.उदेभानाचे कमरेत चिलखताखालून वरपर्यंत भोकसलेल्या समशेरीनं... थेट हुरद्याचाच ठाव घेतला ... उपसलेल्या समशेरीबरुबर रक्ताचं फव्वारं उडालं...

रक्ताच्या गुळण्या टाकत.उदेभान भुईवर उताणा पडला......म्हाताऱ्या शेलारमामानं उदेभानाच्या छातीव चढून त्येच्या नरडीचा घोट घेतला..उदेभानाचे नरडं फोडून.... रक्तानं भरल्यालं थोबाड घीउन.... मामा शड्डू ठोकीत आरोळ्या ठोकीत होता..आमी मावळ्यांनी हारार महादेव चा गलका उडवून दिला.....

उगवतीकई बारीक फटफटाय लागलं हुत...

मावळ्यांनी भरारा गंजीचा ढीग लावला अन पेटवून दिला.....राजगडाला इशारत झाली ...गड फत्ते झाल्याची....

पाच सहाशे गनीम कापून काढला ....उदेभानाच्या नरडीचा घोट घेतला....

आमची धा बारा पोरं चढाईला पडली....तर पाच पन्नास पोरं गनीमानं मारली...

अन आमचा शिवा सारखा हजारबाराशे मावळ्याचा मुखत्यार सुभेदार गारद झालता...

सुभेदाराला डोली करून राजगडाव न्हेला.... जिजामाय च्या डोळ्याला धार लागली......

सदरंतुन धावत आल्याला सर्जा शिवबा ....आमच्या खांद्याव डोली बगून गुडघ्यातनं वारं गेल्यागत भुईवरच

कोसळला....

डोली.. रक्तानं भरल्यालं, ..हात्बा तुटल्यालं.. त्याचं कलेवर बगून सर्जानं लेकरागत हंबरडा फोडला.....

सर्जाला धाय मोकलून...रडताना बघून,..आमा मावळ्यांनी..हर्दं फाटल्यावनी गलबलून आलं.....

सर्जानं गळ्यातली कवड्याची माळ तान्याला चढवली....लवून मुजरा घातला.....

अन जिजामायला म्हनला

"आऊ साहेब.गड आला पण....माझा सिंह गेला....माझा सिंह गेला..."

..समाप्त,

==========================================================================================

शब्दार्थ

१. कवळा: गनिमाला काखेत गतप्राण होईपर्यंत आवळून धरणे.

२. भालाईत: भाले चालवणारे.

३. ढालाईत: ढाल तलवार चालवणारे.

४. पटाईत: दांडपट्टा चालवणारे.

५. नाळ तलवारीवर कोरलेल्या वक्राकार रेषा..... या तलवार चालवणान्याच्या हातावर गनिमाचे रक्त येउन तलवार निसटू नये म्हणून केलेल्या विशिष्ठ रचना असतात

६. परज: तलवारीची मूठ

६. मुसकळ: तलवारीच्या मुठीवरचे आवरण.

७. गांज्या: तलवारीच्या मुठीपासून खाली असलेला वक्राकार भाग.

८. घण्टीतला: मर्जीतला.

९. आवताण: आमत्रण,

१० सर्जा राजा किंवा सिंह... राज्यभिषेकाच्या पूर्वी शिवाजीचा उल्लेख सर्जा असा आढळून येतो.

११. भोरप्याचा डोंगरः प्रतापगडाचा डोंगर.

१२. धोपः तलवारीचा एक प्रकार,

१३.इशारत: इशारा.

१४. मैंदाळ खूप.

१५. कालवादुन घेणे; अंधारात लपुन बसणे,

१६. शिबंदी: सैन्य.

१७. घुगुरमाळ युद्ध कलेतील एक डाव यात मावळा डोक्यावर समशेर अथवा दांडपट्टा स्वतःभोवती फिरवीत (घरंगळत) गनिमावर चालून जातो.

१८. दाब दुब: हे दोन डावांचे मिश्रण आहे दाब म्हणजे मावळा स्वतःच्या समोर वेगाने समशेर किंवा दांडपट्टा फुली म्हणजे इंग्रजीच्या "X" याआकारात फिरवतो...याने गनीमावर दाब देऊन त्याला मागे रेटण्यास मदत होते. दुब म्हणजे मावळा गिरकी घेत स्वतःच्या पाठीमागे वेगाने समशेर किंवा दांडपट्टा फुली म्हणजे इंग्रजीच्या

"X" याआकारात फिरवतो....याने गनिमाने पाठीवर हल्ला केल्यास संरक्षण मिळते.

१९. काढणी: दाब दुब घेतल्यावर मागे हटलेल्या गनिमावर गिरकी घेऊन केलेला प्राणघातक वार म्हणजे काढण..

काठणी चौकावर अथवा गोलावर घेतली जाते...

२०. चौक आणि गोल हे युदधकलेतील दोन वेगवेगळे प्रकार आहेत...आजही दांडपट्टा चौकावर म्हणजे चार कोपऱ्यावर चार काढण्या आणि गोलावर म्हणजे वर्तुळात अशा दोन प्रकारे खेळला जातो.

२१. बारामह तर्फ जावळीच्या खोन्यात असलेल्या तर्फे पैकी एक...याच ठिकाणी आदिलशाही फौजकडून लढताना लानाजीचे वडील काळोजी यांचा मृत्यू झाला. नंतर मामा शेलार यांनी तानाजी आणि सूर्याजी यांना त्यांच्या आईसह म्हणजे पार्वतीसह, साताऱ्यातील गडवली या त्यांच्या मूळ गावातून उमरठयाला नेले.

✒️प्रसाद बालकृष्ण कुलकर्णी

9850226990

⚔️🚩 सुभेदार ताण्या - भाग ३ 🚩⚔️


Who was Tanaji Malusare? - Quora
⚔️🚩 सुभेदार ताण्या - भाग ३ 🚩⚔️

✒️प्रसाद कुलकर्णी


तान्यानं दरवाज्याव लाथा घालाय सुरवात केली....तवर दिंडी दरवाज्यातून दोनपाच हबशी चालून आलं...आमी म्होरं जाऊन त्यास्नी अंगाव घेतलं....एका हाबश्यानं म्या घातलेला डोसक्यावचा वार चुकवून..माज्या पायात समशेर घातली म्या चुकवली पर पिंडरीला चाटून गेली.पायाच्या वाद्या तुटल्या...रक्ताची बारीक चिळकांडी उडाली ...म्या शिव्या दयेत त्याच्याव येका मागून येक समशेरीचं तडाखं देत सुटलो....हबशी पार गांगरून गेला..यम दिसल्यावानी हागाटून गेला.... त्याचं हत्यार उडून पडलं..... पुढचा ठोका घालणार तवा त्यानं तोबा तोबा करीत हात जोडलं....त्याला तसाच टाकून म्या तान्या मागून गेलेल्या बाकी हाबश्याव चालून गेलो ...

तव्हड्यात उदेभान शिवीगाळ करीत ढाल तलवार घीउन भाईर आला.....गडी अंगापिंडानं जबर हता..

ताना येवडा येळ ह्यालाच शोधीत होता.उदयभान मधी येणाऱ्या गड्यासनी हुसकावीत मैदानात आला....

तवर सूर्याजी त्याचं गडी घीउन वर आला हुता....अन तिकडं शेलारमामा... दरवाजा उघडून आत घेतला हुता....दोनी बाजूनं दोघांनी ताज्या दमानं पूना गरम कापाय सुरू केला.....

इकई तान्या उदेभानाला सामोरा झाला....

तान्या धीप्पाड उदेभानासमोर चणीला दोन बोटं कमीच हुता....उदेभान त्येच्याकडडं बघून गरजला ..

"कोन बे तू काफर चा बच्चा....

तुझ्या मौतीला आ गया क्या....कुणी धाडला तुला.....?

किसका शिलेदार तू.....?"

तान्यानं तलवार येका हातात तोलून धरली.....आन येका पायाव उडी घेत, डरकाळी फोडीत बोलला....

“शिलेदार.....?

म्या सुभेदार सर्जा शिवाजीचा....

तुझ्या मौतीला... मला सर्जानं धाडीला..."

तान्यानं डोळ्याचं पातं लवतं ना लवतं तवर वाघ्या उडी घालून उदेभानाच्या तलवारीच्या खांद्याव वार वाढला..उदयभान चप्पल...त्येनं झटक्यात मागं सरून ... शेवटच्या वक्ताला वार ढालीवर झेलला.....ढालीवर काइकन आवाज झाला.....तरी बी तान्यानं ढालीवर तलवार तशीच दाबून धरली.... तलवार निस्टांय च्या आदी

तान्यानं उदेभानाच्या पेकाटात लाथ घातली.....

उदेभान सटपटून बाजूला पडला ...कळवळून पुन्हा उठला...तान्या परत ढांग टाकून चालून गेला... आता उदेभान वार

घालायचा सोडून ढाल दाखवाय लागला....

हय पानी इपरित हाय..... हे त्याला उमगून चुकलं होतं..त्यानं हवत पुरुषभर उडी घेतली आन उदेभानाव समशेरीसकट इज पडावी असा कोसळला.....तान्याची तलवार उदेभानाच्या ढालीवर आदळून त्येच्या छाताडाव आली....उदेभानानं चिलखत घातल्यालं तान्याची समशेर खरखरत खाली आली....अंगात निव्वळ बाराबंदी घातलेला तान्या पिसाटून गेलता..... जरा वक्तानं उदेभानानं मोर्चा घेतला...त्यो पुरता भयसाटून गेलता.... जमल तसं वार

कराय लागला....

इकडं तान्या तांबारल्यालं डोळे वटारुन हल्ला चढवीत हता.. तान्यानं उदेभानाचा वार ढालीवर झेलला....तवा ढालीतून खन्नकन आवाज न्हाई आला उलट ढालीतून भिजलेल्या डफागत बदकन आवाज आला...मगा कड्यावरून चढाई करताना तान्याची ढाल कपारीत माइंदाळ घासली होती..

तान्याची ढाल तडाकली हुती.......उदेभानानं हे नेमकं हेरलं.....त्यो ढालीव वार करीतच सुटला...तान्यानं येक वार चुकावला अन लागलीच उदयभानचा पायाव समशेरीच्या मुठीचा तडाखा दिला....उदेभान उडून खाली पडला...परत तलवार गोल फिरवीत उठून मागं झाला ...त्यांन परत तान्याच्या ढालीवर रेटा देत वार घालाय सुरू केली.....अन येका वाराला.त्याची ढाल हातावच चिरफाळली तलवारीचा तिखटजाळ वार हाताव झाला....

तान्या जरा थबकला रक्तानं भरल्याला हात झटकला ....त्यानं मोर्चा घालीत उदेभानाला मागं रेटत न्हेला ....माग हटताना उदेभानाच्या काखंत तान्याच्या पायतानाला लावलेल्या पोलादीनालाची लाथ बसली..... उदेभान भेलकांडला..तान्या जरा बी येळ न दवडता डोक्याचं मुंडासं हाताव गुंडाळल...उदेभान चवताळून पुढे झाला .....तान्याच्या हाताव वार घालतच हुता..... तान्या वार झेलीत उदेभानाव चढाई करीत हुता....तान्यानं डोळा लवस्तवर काखंतुन तलवारीचा दाब दिऊन उदेभानाला मागं सारला....उदेभान घाव घालाय म्होरं होस्तवर तान्यानं गिरकी मारत पाठीवसमशेरीची फुली मारत दुब दिली...अन म्होरल्या गिरकीतच उदेभानाव काढणी काढली ...उदेभानाच्या ध्यानीमनी यायच्या आत तान्याचा घाव उदेभानाची गर्दन चाटून गेला....रक्त निगलं पन. घाव काय वर्मी न्हाय बसला...

.... उदेभानानं बी तान्याच्या हाताव येका मागून येक वार केलेले..दोगं बी रक्तानं न्हाल्यालं हत... हतं...पन मागं हटाय कोनी मागत नव्हतं..

अन इपरित घडलं उदेभानानं चवताळून तान्याच्या हाताव वर्मी घाव घातला....अन हात हवंत उडाला की रं.. तान्या कळवळला खरा....तिखटज्जाळ...कळ....फाटं फोडीत मस्तकापातूर गेली....

तान्या भानावर आला...त्यातून उदेभानाव त्यानं शेवटचा वार घातला उदेभानानं टाल घातली तरी गडी दोन पावलं उडून पडला...त्याला सावराय गडी धावले पन, त्येनं मागं वळून शिल्लक राह्यलेल्या समशेरीच्या हातानंच आमाला थांबावलं..उदेभान ह्याचीच वाट बघित हता...त्यानं पाठीमागून धाव घालून तान्याच्या खांद्यावनं तलवार भोकसली पार फासळ्या तोडीत छातीत घुसली.....

तान्याच्या घशात घरघर लागली.... डोळ्याच्या कड्यात पानी जमा झालं..खिनभर भवताली सफ्फेदि आल्यागत झालं. डोळ्यासमोर जिरंटोप घातल्याला सर्जा शिवबा दिसला ... देवीवानी जिजामाय दिसली....जावळीच्या बारामुर्ह तर्फेत गनिमानं छाताड फोडल्याला बा काळोजी दिसाला... डोक्यावन पदर घेतलेली पार्वतीमाय दिसली.... बाशिंग बांधल्याला हळदीतला रायबा दिसले..गडावलीतली देवी काळूमाय तरळून गेली ....समदं गरागरा फिराय लागलं....
अन कवातरी पगार झालं...



क्रमशः

⚔️🚩 सुभेदार ताण्या - भाग २ 🚩⚔️

⚔️🚩 सुभेदार ताण्या - भाग २ 🚩⚔️

✒️प्रसाद कुलकर्णी



दोन दिस आधीच गडावर परवाना काढून राह्यलैल्या हेरगडयांनी गडावरून पुन्हा शिळंची इशारत घातली.... थंडीचा कडाका चांगलाच वाढलावता..अन त्यात भर म्हणन सोसाट्याचा वारा बी स्टलावता...आमचं दोन हलकं गडी भंडारा लावून दोर घिऊन मावळतीकडचा कडा चढाई काराय लागलं....पोरं बघता बघता कड्याव पोचली... वरच्या

मावळ्यांनी टोकाव पोचल्याली पोरं उचलून घेतली.....वर गेल्याव टोकाला दगडगोटं लावलेल्या अजून धा-बारा रश्श्या

खाली आल्या .....

सुभेदारानं येका रश्शीत हात गुतावला समशेर कमरंला खोचून ... दातात बिचवा दाबून धरला आणि पैलवान गडी आक्षी वानरागत चढाई काराय लागला....म्या पन दोर धरला ...तलवार मागं लटकवुन ...चाकू दातात दाबला अन चढाय लागलो....गडी वर जात हुतं आणि अजून दोर टाकीत हुते..

म्या अर्ध्यापातूर आलो...दोर धरून हातूंब पार तटतटून गेलं.पाक छाती भरून आल्यागत झाल... थंडीचा कडाका घेऊन वारा लईच सोसाट्यानं सुटला हुता... त्यानं दोराला झोल बसाय लागलं....म्या तर या टोकाचा त्या टोका पातूर झुलत हतो...कधीमधी कपारीवर आपटत राहयलो....धा-बारा गडी हात सुटून खाली पडलं...पन कुनीह का चू क्येलं न्हाई...गडी निसटला की थोड्या वेळानं कायतर पडल्याचा बसका आवाज याचा बस्स.....!

वर गडावर उदेभान मुरली किल्लेदार होता...रजपूत आसला तरी औरंग्यानं बाटवला हुता....यो उदेभान गडी आडवा तिडवा अगदी हाबशावणी हातभार उंचच्या उंच होता..सिपाही गिरीत लै तरब्येज...

बाकी गडावर हाबशी अन यवनी शिबंदी हजार बाराशे हुती या हाबश्याची जमात लै इरसाल...ताकद रेड्याची पन खायाला कार अन धरणीला भार....उगा मोठमोठाल्या धौप तलवारी बाळगायची... पन कूट कलावंतीण दिसली की चटावलीच... वशाट खाऊन वरबाडून वर जीव जास्तुर दवादारू ढोसणे.. यांची डोस्की चालायचीच न्हाईत..चपळाई तर म्हाइतच न्हाय.....निव्वळ गुलाम....तशी पठाणाची जात लढाई कड़वी हती...इमानानं लढायची ...

हिकई तानाजी सुर्याजीच्या इशारतीची वाट बघित हुता....

गडावर कुठतर खुसफूस ह्याचं...आमी हाय तिथं गपगार पडून राह्यचो.....आस्ते आस्ते सव्वाशे फाकडे गड़ी

मावळतीचा कडा चढून कलावंतीनीच्या टोकाव काळवादून बसून राह्यलो.......

सूर्याजी त्याच्या गड्यांसकट कल्याण दरवाज्या जवळ मोर्चा धराय गेला हता पर कल्याण दरवाज्याव जरा जाग

हती.आधीच शेलारमामा दरवाज्याच्या आल्याड़ गाइयांसाकट मोर्चा धरून बसला हुता...म्हणून सूर्याजी गडी घीऊन पुन्हा कड़े खाली आला हुता... तशी इशारत झाली.....

आता तानाजीनं पाठीवरली ढाल काढली समशेर उभी धरून मळवटाव भंडारा भरला....आमी पटापट समशेरी आपल्या.. ढाली हाताव तोलून आमी पुढे सरकू लागलो...पाच पन्नास पावलाव झुंजार बुरुज हुता तितं हाबशी भालं धरून डुलकी काढीत होतं...

तिकई कोसभर उदेभानाचा वाडा हुता तिथं मशाली पेटलेल्या तिथं वाईच जाग हुती..आन दुसऱ्या टोकाला कल्याण दरवाज्याव पहान्याव चांगलीच जाग हूती...
गडाची हजार बाराशे शिबंदी गडाव ईस्कटून पांगली ती कुनाच्या ध्यानीमनी बी छापा पडल.... असं आलं नसल.....

आमी पंचवीस गडी सुभेदाराबर झुंजायकई सरकार...बाकी मावळंगडी मैलभर टप्प्यात ईसकाटून दडून राह्यली....

झुंजान्यावनं खाली गडावची शिबंदी कापत.... कल्याण दरवाजा खोलुन शेलारमामा आतघ्यायचा डाव हुता....ठरल्या परमानं सूर्याजी दरवाज्यात येनार नव्हता..त्यो मागून दोरावरूनच यायला लागला हुता...त्यो येस्तोवर आमच्याकड वक्त न्हवता...सकाळी फटफटायच्या आत गवताची जंजी जाळून राजगडाला इशारत द्याची हुती....

आमी गडी झुंजायव पोचलो आणि येकदम

"हारार महादेव" चा गलका उठला... त्या भयान शांततेत गलका कानठळ्या फोडीत राह्यला.....

झुंजाऱ्यावनं खडबडून जागं झाल्यालं...पाचपंचवीस हबशी धडपडतच आमच्याव चालून आलं....म्या जाग्याव पुंगुरमाळ घालीत तलवार भिंगवाय सूरवात केली येक आडदांड काळा हबशी डोक्याव दोन हातात खंडा घेऊन चालुन आला म्या सप्पय हून त्येच्या तडाख्यातून बाहेर पडलो अन तसाच माघारा झेप घिऊन गिरकीत त्याच्या गरदनीव समशेरीचा ठोक्या वार घातला ....झटक्यात मुंडकं उडाल्यालं धूड गुडघ्याव आदाळलं...म्या लोखंडी नाळ ठोकलेल्या पायतानानं त्येच्या छाताडाव सनसनीत लाथ घातली.... गर्दनितनं रक्ताच्या चिळकांड्या उडवीत बिन मुंडक्याचं धूड येका अंगाव कोसळलं....

तिकडं तान्या कदी ढालीवर तर कदी समशेरीव गरम झेलत...कापत पुढं ढांगा टाकीत हता.. आमी वानरांनी घटकंत पुरा बुरुज कापून काढला हुता ...तिकडं उदेभानाच्या वाड्याव गलका वाढला त्या बाजूनं गनिमामागून गनीम आमच्याव दिन दिन करत बरसाय लागला...जणू झुंजार बुरुज आमचं ठाणच झालं हुत.... खइड्या धोंड्यातनं... झुंजार बुरुजाकडं धावत सुटल्याला गनिम मधीच झुडपात दडून बसलेल्या आमच्या मावळ्यांकडून कापला जात हुता...आमी बी गनिमावर ढांगा टाकीत तुटून पडलो..

..आमचं पटाईत हाताव खोबळं लावलेल्या पानाचा रिंगणात गिरकी घेत, डाव टाकीत म्होरं काढणी खेळवीत हुतं..

त्यांच्या सळ्ळ सळ्ळ...भिंगरी वाणी फिरना-या पट्ट्यच्या तडाख्यात कुनी यायचा अन त्येजा फन्नाच उडायचा.....

आतापातूर ...बेसावाध गनीम सावध झाला खरा पन हातात हत्यार घीउन ...कुटं धावू... अन कुटं दडू...काय करू त्याला उमगत नव्हत..हातातल्या मशाली पन वाऱ्यानं टिकत न्हवते...निस्ता गोंधुळ आन किंचाळ्या उठत हत्य.. कल्याण दारवाज्यावरची शिबंदी आत धावून आली ....तान्या ह्याचीच वाट बघत हुता ...चार गड़ी घोंगडी पांघरून अंधारातनं दरवाज्याकड शेलारमामाला आत घ्यायला... दौडत गेली.. तान्या सपासप वार घालीत उदेभानाच्या वयाच्या हाताला ढांगा टाकीत दौडत हुता...म्या बी वाटंत यील त्याला गिरकीवर उडवीत, कापीत तान्या मागून धावत हुतो...वाड्याचं धारकरी कवाच इसकाटून गेले...

⚔️🚩 सुभेदार ताण्या - भाग १ 🚩⚔️


Narveer Tanhaji Malusare (नरवीर तानाजी मालुसरे ...⚔️🚩 सुभेदार ताण्या - भाग १ 🚩⚔️

✒️प्रसाद कुलकर्णी


किरेर काळ्या रातीचं.....आमी शेपाचशे फाकडं गडी गुंजवणीच्या ढवात उतरलो....डोळ्यात बोट घातल्यागत काळा कुट्ट अंधार होता..आधी गारठा हाई फोडीत होता त्यातनं पानी लईच गारदोन झाल्यालं... सुभेदार तान्या निधइया छाताडानं समयांच्या म्होरं हुता...किती बी आवाज न्हाई करायचा म्हनलं तरी बी पान्याचा आवाज हुतच हुता... आमी चार घोळक्यान पानी कपाय सुरवात केल्ती...आमच्या आदी सुर्याजीन त्येच्या गडयांना नदी पल्याड न्हेल हुतं... माज्या गळ्या पातूर पानी आल्याव म्या समशेर दातात धरली अन पान्याव आडवा हन पानी कापाय सुरवात केली...... इतक्यात पाज्यात येकच हैदोस उठला पाक समदं पानी ढवळून निघालं...

म्या काय ते उमगलो.. मघापासनं

पुरुषभर लांबीची मगर ...डुख धरुज पव्हत ती...

म्या येळ न दवडता शेजारचा गडी काखत घेतला ...अन पल्याड टाकला....तवड्यात जनावरान मला बगल देत ढुशी दिली ...जाइभरड खरखरीत जनावराचं धूड अंगाला घाशीत म्होरं गेलं.....अन काय कळायच्या आत.. पुढच्या गड्याव भला मोठा जबडा वासला... हातभर धारदार जर्द सुळ्याची पंगत अंधारात बी चमकून दिसली......खिनभर मी सोताला

सुधरलं अन दातातली समशेर काढून पान्यात उसळी मारून जनावरांच्या पाटानीत भोकसली... समशेर खडखडत पाठीत पुसलीपण... करून आलं. वयात समोरून तान्यानं जनावरांच्या नरियाला कवळा घातला...पान्यात जनावरांन सुटायची धडपड केली पन सुभेदारानं घातल्याला कवळा कोनाच्या बा ला सुटायचा न्हवता.....म्या मागनं तलवार सपासप लावली.. आसपासचं पानी अजूनच गडद झाल..हळूहळू जनावराची हालचाल थंडावली.. वार काय वर्मी बसला न्हाय....तरी जनावर काय हटाय मागना..... चवताळून अधीकच चाल

शेलारमामा आमच्या मागणी... दीडशे गडयांना घीवुन पल्याड पोचला हुता...घटका मरानं आमी नदी पल्याड आलो....पान्यातनं भाईर आल्याव थडी अजुनच झोबाय लागली....घटकाभर दम खाऊन आम्ही कोडान्याची वाट

धरली...

गोंधळ्याच्या वस्तीवर आधीच सोय झालती... आता पातूर समदं अंधारून आलं हुत.... वाईच उशिरच झालता....

नदीतीरावरनं गुंजवणीची झुडपं, दगड.तुडवीत आमी कोंडान्याच्या सोंडेवरनं निम्म्या डोंगरात गांदळ्याच्या वस्तीव पोचलो.. वस्तीव आदीच चार पाच मावळ्यानी भाकर तुकडा पोचवला हता..आमी ह्यानच दोन चार भाक-या कुस्कारील्या.

वर गडाव समदं गपगारच हतं..सर्याजीच्या मावळ्यांनी मावळतीला डोंगरकड़्याच्या कपारीत कालवाडून घेतलं हतं... आमी सोंडेच्या पल्याड घळीत शाकारून मोर्चा धरला.शेलारमामा अन तानाजी गोंधळ्याच्याम्होरक्यावर बातचीत करीत हुतं...

सुर्याजीनं शीळइशारा केला तसा आमी मावळ्यांनी बाराबंद्या आवाळल्या तुमानी खेचून गुड़ग्यापातूर चढविल्या.

वहाणा काय्यानं पिंडरीपातूर बांधून घेतला... ढाली पाटानीवर बाधुन घेतल्या..... मुंडास शेल्यान हनुवटीवर बांधून

टाकलं......

आमच्यात सव्वाशे गडी भालाईत तर पाच पन्नास पट्टाईत.. हतं.बाकी आमी समदी ढालाइत

-..सुभेदारान पाच पंचवीस पट्टेवाले आमच्यात घेतले हुते.बाकीचं पट्टवाल सूर्याजी बरुबर हु...अन शेलार मामाकई भाले-बरचे ढालाइतांची सरमिसळ झाल्याली....

म्या तलवार येक डाव परत दगडाव पाजकून घ्येतली.मागच्याच खंड़यानवमीचं नवीन हत्यार.... कर्नाटकी पोलाद... चार नाळीचं पान चांगलं चार बोट रुंदीला हतं...परजेला मुसकळ मजबूत हतं... गांज्या खाली इतभर अन टोकाला टप्पूर दोनी हातात धरावी आन गनीम आख्खा फाडून काढावा अशी दमदार समशेर अस्सल उमदं हत्यार हातात आल्यापासनं कवा छाप्यावं जातूय अन हत्याराची पारख करतुय अस झाल्त....

सुभेदारानं बी झटकज तलवार पाजळून घेतली.... तान्याची तलवार आमा समयापरास वजनानं धा शेर जास्तच ,লांबी रुंदीला बी ज्यादा हुती .... पन हत्यार लैच अव्वल हतं. हातात घाशीव ढाल अन नगी समशेर घेतलेला, भंडारा मळवट भरल्याला सुभेदार तान्या आक्षी जेजुरीच्या सोन्या खंडोबावानी दिसायाचा ....गडी अंगानं एकदम जबरदस्त.. कुस्त्या खेळून गब्बर झाला.. छाती फुगावल्याव बाराबंदी दिल्ली हुन वाद्या तुटायच्या ... दडाव हातुब पुरायचान्हाय..... अस्सल घोटीव खाद

.-पुरुषभर लांब ढांग टाकायचा

.

गेल्यालं..म्हनून तर गाडी सर्जा शिवाजीचा गोष्टीतला होता...

समोरच्याला भेदून पल्याइ जाणारी नज़र ..मिशाचे आंकड़े कानापूर

दोन दिसआदी आमी इडा सुपारी घीऊन राजगडाव गेलतो रायबाच्या, तान्याच्या पोराच्या लग्नाचं आवताण द्याला .. पंतानी आमाला सदरला बसवून घेतलं...पाढ-याधूत सुतात जिजामाय बसल्याली... हातात जपमाळ घेतलेली माय, आक्षी देविवाणी दिसत हुती... तान्यानं डोईवरलं मुंडासं काढलं अन जिजाबायच्या सुरकुतलेल्या पायाव माथं टेकलं.

सुभेदाराची आपुलकीनं चवकशी करून माय म्हनाली....

"ताना. शिवबाला सांगावा धाडायला सांगितलं होतं...

अरे कौढण्या सारख आपल मोठ ठाण आणि त्यावरल्या गनिमाला उशाशी का बाळगायच ... एव्हढा गनिम जवळ

असणं स्वराज्यालाघातकच..."

ताना काई बोलनार तवर..ललकारी झाली. सर्जा शिवाजी आस्ते कदम सदरला येताना दिसला......

डावच बघत हुतो...

अंगालगत रंगीत बाराबंदी... पायात तंग तुमान...कमरंला रंगीत शेला ... कानात टपुरं मोती... कोरल्याली दाढी जीवणीवर टोकदार झाल्याली.... गळ्यात कवड्याची दुहेरी माळ... मळवटावर दोन भुवायात भगवा उभा टिळा..नजर

आमी भुईवरनं धडपडत उठलो... लवून मुजरा घातला...मागल्या वक्ताला सर्जाला जावळीच्या छाप्यात बघितला हुता... भोरप्याच्या डोंगराव माडव घालून अफझुल्याचा कोथळा काढला हुता सर्जा बहाददरान.पुढ न थाबता अगाव चिलखत घालून दोनी हातात धोप घिऊन आमच्या बरुबर गनीम कापत हता. पन आज एवढ्या जवळनं पहिल्या

रामाच्या बाणावानी आरपार..एका दोरीत सरळ नाक...मिशाला आकर्ड काढल्याल...सासन काठीवानी शिडशिडीत मजबूत बांधा अन खांद्याला रुंद.... उंचीला सुभेदारापरास दोन बोटं ज्यादाच..

सर्जा आल्यासरशी सुभेदाराला गळामिठी घातली.आमचा उर भरून आला...सर्जाने एकवार आमच्यावर नजर टाकून सलगी दिली.... सर्जा आसनावर बसून सुभेदाराला बोलता झाला.....

"कोंढाणा घ्यायचा बस्स.....

पण आम्ही ही कामगिरी आम्ही दुसन्यास देतो....

.रायबाचं लगीन काढलंस ..

....या वक्ताला राहुदेत....एकदा का कोंढाणा आला.. की मग तुला उसंत नाही तुझ्यासाठी बक्कळ कामगिरी असेल...."

येवढा येळ सजाके एकटक बधित बसलेल्या तान्यानं आवंढा गिळला...जड आवाजात म्हनला

"आरं राजा मी माय भवानीचा पाईक हाय...

सोराज्याचा सुभेदार."

अस म्हनत तान्यानं सदरवचा भंडारा तळहाताव घेतला अन गरजला

"आता .... आदी लगीन कौंडान्याचं मग रायबाचं

आमी संमदयानी "हारार म्हादयेव' चा गलका केला....मागाहून तानाजीने दिलेली जय भवानीची हाळी आख्ख्या राजगडाव घुमून राह्यली..

दोनच दिसांनी आमी पन्नास गडी अन राजगडावचं शे पाचशे मावळ्याची शिबंदी धीऊन सुभेदार तानाजी, सूर्याजी

अन शेलारमामा गड उतरून गुंजवणीच्या पान्यात उतरलो.....

रातीच्या भयाण वार्यात अचानक टिटवी चित्कारल्यागत शीळ घालून गेली..... यो शेलार मामाकडून इशारती हता

...मैंदाळ शीळ फुकली मतदान..मामा त्याच्या गड्या संगत कल्याण दरवाज्यावर मोर्चा धरुन बसला..ही याची

इशारत दिली....

क्रमशः

"बाजींद" भाग १० वा

"बाजींद"
भाग १० वा

हातात पांढरे निशाण घेऊन एक हशम क्षणात झेपा टाकत निघून गेला.
हातात पांढरे निशाण पाहताच मावळ्यांच्या तुकडीचा बाणांचा वर्षाव कमी झाला..!
सूर्यराव च्या भोवती अंगरक्षकांचे कडे पडले.
बाजूच्या दाट झाडीतून निथळती तलवार घेतलेला,आश्वावर स्वार असलेला एक शिलेदार घोड्याचा लगाम खेचत खेचत सूर्यराव च्या पुढे आला..!
त्यांच्या मागे केस पांढरे झालेला वयोवृद्ध मावळाही घोड्यावर स्वार होऊन आला होता.
त्या वृद्ध माणसाची नजर काहीतरी शोधत होती,आणि त्याने एका व्यक्तीला हेरले आणि घोडे त्याच्या जवळ नेत बोलला....."खंडोजी.....बरा हायसं नव्ह "
मांडीवरची जखम धरत,वेदना सहन करत तो बोलला..."होय वस्ताद काका...! ठीक आहे मी "
असे बोलत त्याने एक कटाक्ष समोर अर्धमूर्च्छित असलेल्या सवित्रीकडे पहिले

मागे उभे असलेला स्वार एकदम पुढे आला आणी सूर्यराव ला बोलला.....!
"सूर्यराव तुम्हीच ना ?"

त्या स्वाराच्या आकस्मित बोलण्याने सूर्यराव आश्चर्य व्यक्त करत बोलला...."होय जी,मीच सूर्यराव "

पण,आम्ही महाराजांच्या कोणत्याच गुन्ह्यात नसताना आमच्या तुकडीवर महाराजांच्या जरीपटक्याच्या तुकडीचा न सांगता छापा का शिलेदार ?
महाराजांच्या कोणत्याही वाटेला आम्ही नसतो,तर आज कसे का ?

सूर्यराव बोलला...!

यावर तो स्वार उत्तरला...!

"सूर्यराव.... आपण ज्यावर शस्त्र रोखले होते,तो मराठेशाहीचा अधिकारी आहे,महाराजांच्या हेरखात्यातील एक प्रमुख हेर...बहिर्जींचा खास हेर...खंडोजी "

हे ऐकून सूर्यराव बाजूला उभा राहिला

त्या स्वाराच्या या बोलण्याने समोर अर्धमूर्च्छित असलेली सावित्री अवाक झाली,ज्या खंडेराय ला तलवार भाला चालवता येत नाही,जो केवळ नोकरीसाठी आमच्या वाड्यात आला,हे केवळ नाटक होते तर....तिला त्याच्या पराक्रमावर खुश व्हावे हे समजेना की त्याच्या खोटे बोलून वाड्यात येण्यावर राग व्यक्त करावा हे समजेना"

तो स्वार घोड्यावरून पायउतार झाला आणि समोर उभ्या खंडेराय उर्फ खंडोजी ला मुजरा करत बाजूला नेले आणि बोलू लागला..."

"नाईक.....हे काय करुन बसला आपण?
तुम्ही स्वराज्याच्या कामगिरीवर असलेले सैनिक आहात,असा जीव धोक्यात घालणे आपणास शोभत नाही....बहिर्जी नाईकांनी आपणास घेऊन येण्यास पाठवले आहे "

काय ?
मला घेऊन यायला मी कोणती चूक केली आहे ?

असे बोलताच तीन चार शिलेदारांनी खंडोजी च्या दंडाला धरले....

नाईक...आम्हाला माफ करा,आम्ही हुकमांचे गुलाम आहोत....!

खंडोजीने पुन्हा सवित्रीकडे पहिले....त्याच्या मनाची घालमेल सुरु झाली....एक कर्तव्यदक्ष सैनिक असून असा आततायीपना खरच त्याला शोभत नव्हता,पण सावित्रीला सूर्यराव च्या फौजेने पकडून नेले तेव्हापासून त्याचा मनावरचा ताबाच सुटला होता....!

खंडोजी ला पकडून ते शिलेदार नेऊ लागले इतक्यात बाजूच्या जंगलातून शिंगे-कर्णे गर्जू लागली.....हजारो हशमांच्या किंचाळण्याचा आवाज आणि घोड्यांच्या टापांचे आवाज घुमू लागले....."

कोणाचा हल्ला असेल हा ?
सूर्यराव,खंडोजी आणि वस्ताद काकासह तो स्वर विचारात पडला,पण सावित्रीने ओळखले......"

ही फौज राजे शिरक्याची नेकजात फौज..."

आपल्या एकुलत्या एक लेकीला चार दोनशे लोकांनी पळवून न्यावे,हे त्यांच्या मनाला अतिशय झोम्बले होते,त्यांच्या डोळ्यात केवळ आग होती,त्यांच्या हातातील तलवार आणि मनगटे केवळ शत्रूच्या रक्तासाठी आसुसली होती......

खंडोजीलाही समजले की नक्कीच राजे येसाजीची घाटमाथ्यावर टेहळणी ला गेलेली फौज सावित्री साठी येत आहे...त्याने पटकन त्या स्वराला ही गोष्ट सांगितली....माझं ऐका,ही शिरक्याची लेक सावित्री या सूर्यराव च्या पळवून आणली आहे.
आपण जर तिला परत शिरक्यांच्या हाती सुपूर्द केले तर शिरक्यांचा जास्तच विश्वास आपल्यावर बसेल..."

यावर तो स्वार उत्तरला...सूर्यराव व शिरक्यांच्या वादात पडणे हे आपले काम नव्हे...तुम्हाला बहिर्जी नाईकांच्या पुढे उभे करणे हे माझे काम आहे..."

त्या स्वरांच्या त्या बोलण्याने खंडोजी पुरता चवताळला,त्याने क्षणात आपल्या दंडाला हिसडा मारला आणि दंड धरुन नेणारे मावळे धरणीवर पडले,दुसऱ्याच क्षणी त्या स्वरांच्या कमरेला लावलेली तलवार उपसली आणि त्याच्याच नरड्यावर धरत तो बोलला......मला माझ्या हिशोबाने काम करु दे ....नाईकांना सांगा,काम जोवर होत नाही,खंडोजी परत येणार नाही..."

बाजूला उभे असलेल्या वस्ताद काकांनी पुढे येत खंडोजीला बोलले....खंडोजी,तुझे डोके आहे का ठिकाण्यावर ?
आपण कोणत्या कामगिरीवर आहोत,आणि तू करत काय आहेस...?

काका...माझ्यावर विश्वास ठेवा मी करतो ते ठीकच करतो..तुम्ही निघा इथून...शिरक्यांच्या पदरी कडवे धारकरी आहेत....निभाव लागणे कठीण आहे..."

इतक्यात शिरक्यांच्या पहिल्या तुकडीने हल्ला चढवला....सूर्यराव आणि मावळ्यांची तुकडी दुहेरी लढत सुरु झाली.
खंडोजी ने त्वरित त्या स्वराला बाजूला केले आणि प्रसंगावधान राखत तो सवित्रीजवळ आला,आणि तिच्या हाताला धरुन उठवू लागला,तितक्यात तिने तो हात झिडकरला आणि त्याच्यावर हाताने प्रहार करु लागताच त्याने तिचा हात पकडून मुरगळला आणि तिला उचलून पलीकडच्या जंगलातून निघून गेला....

शिरक्यांच्या कडव्या फौजेपुढे सूर्यराव आणि मावळे तोकडे पडू लागले....क्षणात त्यांनी काढता पाय घेत माघार घेतली आणि वाटा चोरवाटेने निघून गेले...."

इकडे खंडोजीने सावित्रीला उचलून जंगलातून बरेच बाहेर आणले होते...पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खाली नदीचे विशाल पात्र......खंडोजीने एकदा मागे पाहिले आणि ताडले की शिरक्याची फौज पाठलाग करत आहे....त्याने कशाचाही विचार न करता सवित्रिसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकून दिले...."

ही गूढ कथा ऐकता ऐकता सखाराम ला कधी झोप लागली त्यालाच समजले नाही, सकाळी कोमल सूर्यकिरणांनी त्याची झोप मोड केली....सखाराम सह त्याच्या साथीदारांना जाग आली आणि समोरच खंडोजी ते कधी उठतात याची वाट पाहत होता..."

खंडोजीला पाहताच त्यांची झोप उडाली...."

उठा...किती वेळ झाला वाट पाहतोय तुमची..."

खंडोजी बोलला...!

सखाराम ने आजूबाजूला पाहिले तर केवळ गर्द दाट झाडी......त्याच्या मनात प्रश्नाचा काहूर माजला..!

कुठे गेले ते महादेवाचे मन्दिर ?
कुठे गेली ती सुंदर सावित्री ?
कुठे गेला तो मेलेला वाघ ?
हा खंडोजी रात्रभर गायब होता,आता कुठून आला ?

त्यां चौघांच्या डोक्यात प्रश्नांनी थैमान घातले होते,खंडोजी मात्र धीरगंभीर मुद्रेने त्या चौघांकडे पाहत होता..!

•●क्रमश :●•

"बाजींद" भाग क्र.९

 "बाजींद"

भाग क्र.९

••••••••••••••••••••••••••

कोणीतरी पाठीमागून खंडेरायाच्या डोक्यात जोराचा दणका दिला अन खंडेराय शुद्ध हरपला....!
खंडेराय ला घेऊन सूर्यराव व त्याचे पथक दाट जंगळजाळीत घुसले.
जंगलाच्या मधोमध एका गुप्तठिकाणी सूर्यरावच्या फौजेचा अड्डा होता.
गंभीर मुद्रेच्या "सूर्यरावाच्या" चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
ज्या "पिराजी" शिरक्याने साऱ्या जाधववाडीच्या हातात हत्यारे घ्यायला भाग पाडले त्याची इज्जत,त्याची नात आता त्याच्या ताब्यात होती.
त्याच्या मनात कल्पनेचे खेळ सुरु होते.
एक हशम धावत आला आणि त्याने वर्दी दिली...,

सरदार,आपण माची लुटून येताना एका घोडेस्वाराने पाठलाग चालवला होता,त्याला जेरबंद केला आहे.

सूर्यराव उठला,बोलला..."कोण आहे तो ?"

शिरक्यांच्या वाड्यातील हशम किंवा त्याच्या कुटुंब कबिल्याचा अंगरक्षक असावा बहुतेक...त्याला आणा इथे "....त्याच्या आज्ञेने खंडेराय ला समोर आणले गेले...!

एव्हाना साऊ ला शुद्ध आली होती,पण तिचे हात पाय बांधल्याने ती हलू शकत नव्हती.
ती जोरजोरात किंचाळून त्या साऱ्यांना आव्हान देऊ लागली....."हिम्मत असेल तर एकदा माझे हात पाय खोला,ही शिरक्याची अवलाद काय आहे तुम्हाला दाखवते..."

तिच्या आकस्मित आव्हानाने सूर्यराव चे डोके भडकले....तो तडक सावित्री जवळ गेला आणि तिला जोरात थप्पड मारली,एक,दोन,तीन....त्याच्या प्रहाराने सावित्रीच्या तोंडातून रक्त येऊ लागले...."

"हरामखोर शिरक्याची अवलाद....तोंड बंद ठेव...तुझ्या साऱ्या घराण्यात गद्दारी,क्रूरता भरली आहे.
गरीब,भोळ्या जनतेला लुबाडून,त्यांची कत्तल करून सत्ता मिळवलेले तुझे बापजाडे काय लायकीचे आहेत आम्हाला माहित आहे..."

असे बोलत तो निघणार तितक्यात सावित्री ने बांधलेल्या हाताने सूर्यराव वर झडप घातली....आकस्मित हल्ल्याने सूर्यराव तोल जाऊन खाली पडला.....तितक्यात बाजूला उभे असलेल्या हशमानी सावित्रीला धरून बाजूला केले...."

आता मात्र सूर्यराव बेभान झाला...त्याने कमरेला असलेली तलवार म्यानातून उपसली आणि सावित्रीचे केस धरुन तिचे हात बांधलेला दोरखंड तलवारीने तोडला,पाय खोलले आणि पुन्हा एक जोरात थप्पड देऊन तीला ढकलून दिले....सावित्री तोल जाऊन पडली.....तडक सूर्यराव ने बाजूला उभे असणाऱ्या हशमाच्या हातातील तलवार हिसकून घेऊन सावित्रीच्या पुढ्यात टाकली.....आणि बोलू लागला....

चल,उचल ती समशेर आणि दाखव तुझ्या रक्ताची उसळी...मला ही पाहुदे, ज्या शिरक्यांनी निशस्त्र आजवर बाया बापड्यावर हत्यार उचलले,त्यांच्या घरातल्या स्त्रिया हत्यारे कशी चालवतात....उठ,आता बोलू नको,तुझी तलवार बोलू दे..."

सूर्यराव चे वाक्य पुरे होते न होते इतक्यात विजेच्या वेगाने सावित्रीने तलवार हातात घेऊन क्षणाचाही विलंब न करता सूर्यराववर हल्ला चढवला...!

तितक्याच चपळाईने सूर्यरावने बचावात्मक तलवारीचे हात सुरु केले....आणि मग त्यानेही आपला हात चालवायला सुरु केली...!

एव्हाना खंडेराव ला शुद्ध आली,आणि समोर सावित्री आणि सूर्यरावची लढाई तो पाहू लागला,त्याचे रक्त एक सळसळळे...पण त्याचे हात पाय बांधून ठेवल्याने तो सावित्रीची मदत करायला असमर्थ होता,पण प्रचंड ताकतीने त्याने हात सोडवायचा प्रयत्न सुरु केला पण दोर काही सुटत नव्हता...!

समोर मात्र तलवारी तलवारीवर आपटून खणखणाट वाढू लागला आणि सूर्यराव ला सवित्रीचा तलवार चालवायचा हातखण्डा मनोमन आवडला....तो पण कच्चा नव्हता...त्यानेही प्रचंड प्रतिहल्ला करत सावित्रीला हुलकावणी दिली...क्षणभर सावित्री फसली,ती संधी घेत सूर्यराव ने तलवारीच्या मुठीचा वर्मी घाव सावित्रीच्या तोंडावर मारला....तिच्या तोंडातून रक्त येऊ लागले...पण क्षणात सावरुन तिनेही प्रतिहल्ला केला आणि झुकत सूर्यराव च्या मांडीवर प्रहार केला...मांडीतून रक्त येऊ लागले...हे पाहताच बाजूचे पथक तलवार उपसून सवित्रीवर धावून आले...मात्र,सूर्यराव ने थांबायचा हातवारा केला.....आता मात्र सूर्यराव बेभान झाला...एक स्त्री म्हणून सावित्रीच्या तलवार हल्ल्याला त्याने नगण्य समजले होते,त्याचा तो भ्रमनिसरण झाला आणि आता मात्र त्याने प्रचंड वेगात तलवारीचे वलये,डाव-प्रतिडाव,हूल सुरु करत सावित्रीला बरेच मागे रेटले
...पण सावित्रीने सर्व हात धुडकावत लावले आणि प्रतिहल्ला सुरूच ठेवला....आणि एक क्षण..सूर्यराव ने हवेत झेप मारत गोल घिरकी घेत वार केला,ज्याने दुप्पट वेगाने हल्ला वाढला आणि तो वार सावित्रीच्या तलवारीवर लागला व तलवार हातातून खाली पडली...बस हाच क्षण सूर्यराव ने प्रचंड ताकतीने तलवार सावित्रीच्या दंडावर वर्मी मारली...रक्ताचे फवारे उडाले अन सावित्री किंचित मूर्च्छित होऊ लागली अन खाली पडली...."

बरेच वेळ प्रयत्न करून खंडेराय चे हात सुटले,त्वरित पाय सोडवून त्याने विजेच्या वेगाने सूर्यराव वर झेप घेतली....गरुड जसा सर्पावर झेप घेतो,त्यासारखीच व्याकुळता खंडेरायाच्या डोळ्यात होती.

सावित्री थोडी शुद्धीवर आली आणि समोर सुरू असलेला प्रकार पाहत तशीच पडून होती...अधीर वेदना तिला उठून देत नव्हत्या....!

खंडेराय च्या आकस्मित हल्ल्याने सूर्यराव तोल जाऊन खाली पडला,खंडेराय त्याच्या छातीवर बसून तोंडावर प्रहार मारु लागला,पण इतक्यात सावध झालेले सूर्यराव चे जवान खंडेराय वर तुटून पडले...त्याने सूर्यराव ला खंडेराय च्या तावडीतून सोडवले आणि ओढत बाजूला आणले...20-25 जणांनी करकचून धरलेल्या खंडेरायाने एकाच हिसड्यात सर्वाना भुईवर आदळले.... रागाने लालबुंद झालेला त्या वीराने समोर सावित्रीच्या हातून गळून पडलेली तलवार उचलली....क्षणभर डोळे मिटून तलवार कपाळाला लावली आणि तो समोरच्या 20-25 जणांच्या तुकडीवर तुटून पडला...!

प्रचंड रणकंदन सुरू झाले.खंडेराय च्या आडवे येणारा तुटून पडू लागला...कोणाचे हात तुटले तर कोणाचे पाय...कोणाची शिरे धडावेगळी होऊ लागली तर कोण उभा चीरु लागला...!!

काही दिवसापूर्वीच याच खंडेराय ला हातात तलवार धरायला येत नव्हती,अन आज हा इतक्या सफाईने तलवार चालवत आहे हे पाहून साऊ आश्चर्याने थक्क झाली,ती वेदना विसरून विचार करु लागली...हा खंडेराय नव्हे तर समशेरबहाद्दर वाटतो...!
ती उघड्या डोळ्यांनी खंडेराय चे शौर्य पाहू लागली...!

सैन्याची ही कापाकापी पाहून सूर्यराव लाव्हारसाप्रमाणे उसळून हाती तलवार घेऊन खंडेराय च्या आडवा आला.......आणि मग दोन महावादळे एकमेकांवर प्राणपणाने तुटून पडले...!

खंडेराय चा त्वेष,हल्ला जोमाने आडवत आडवत सूर्यराव तलवारीचे हात करु लागला....!

सूर्यराव ही कच्चा नव्हता....तोही चिवट धारकरी होता,त्यानेही प्रचंड प्रत्युत्तर दिले....ते दोन्ही वाघ रक्ताबंबाळ होऊन लढू लागले....!

अखेर खंडेराय चा आवेश पाहून सूर्यराव ने रणनीती बदलत....झुकते माप दिले अन तिथेच खंडेराय फसला....त्याचा तोल जाता क्षणीच सूर्यराव ने त्याच्या मांडीवर वर्मी घाव मारला....रक्ताचा कारंजा उसळला.....खंडेराय आलेली वेदना सहन करायला एकदम खाली बसला.....हे पाहताच सूर्यराव ने आपली समशेर खंडेराय च्या मानेवर ठेवली.....एक क्षण...त्याने प्रचंड ताकतीने तलवारीने खंडेरायाचे मुंडके तोडायला तलवार मागे नेली आणि ....सु सु सु करत एक बाण पलीकडच्या जंगलजाळीतुन सूर्यराव च्या खांद्याचा वेध घेत आला आणि समुद्रात उल्का पडावी तशी सूर्यराव च्या खांद्याचा वेध घेऊन सूर्यराव अक्षरश मागे उचलून पडला....!

दुसऱ्याच क्षणी त्या जंगलातून शेकडो बाण सूर्यराव च्या फौजेवर तुटून पडले अन फौज जखमी होऊ लागली......आणि जंगलाच्या पूर्वेकडून आरोळी घुमली..... हर हर हर महादेव......छत्रपती शिवाजी महाराज कि जय...."

भगव्या जरीपटक्यांचे निशान डोलवत शिवछत्रपतींच्या मावळ्यांची एक तुकडी हातात नंग्या तलवारी घेऊन सूर्यराव बेरड च्या फौजेवर तुटून पडली...."

सूर्यराव सावध झाला...खांद्याच्या घुसलेला बाण काढत बाजूच्या हशमाला बोलला..ही तर महाराजांची तुकडी आहे....पांढरे निशाण दाखवून थांबायला सांगा सर्वाना.....सूर्यराव मनात विचार करु लागला,आपण शिवाजी महाराजांच्या कोणत्याच गुन्ह्यात नसताना हा छापा कशासाठी असावा ?

••● क्रमश : ●

"बाजींद" भाग क्र.८

 "बाजींद"

भाग क्र.८
•••••••••••••••••••••••••••••

त्या दिवशी दिवसभर "साऊ"ला काही सुचत नव्हते,सतत सकाळचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर तरळत होता.

पण,राजे येसाजीरावांच्या एकुलत्या एक मुलीला असे विचार करणे शोभत नाही,म्हणून तिचे मन तिलाच समजावत होते.भावना आणि कर्तव्य यांचा मनात झालेला महापूर प्रथमच साऊ अनुभवत होती.

इकडे,खंडेराय आणि त्याचे वस्ताद काकासाहेब मोठ्या गूढ चर्चेत व्यस्त होते..!
ती चर्चा कोणती त्या दोघांनाच माहिती ..!

एव्हाना तालमीत चीटपाखरू नव्हते..शिर्क्यांची शिबंदी येसाजीरावंच्या आदेशाना त्यांच्यासोबत घाटमाथ्यावर टेहळणी ला गेली होती,जेमतेम शे दोनशे धारकरी वाडा राखत होते.
फौज टेहळणी करून यायला अजून बराच अवकाश होता.
शिर्क्यांचा आजवर कोणी पाडाव करू शकले नाहीत याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे नेकजात,इमानदार मराठ्यांची फौज,त्यात कुस्तीचा प्रचंड नाद असलेले राजे एक एक माणूस तोलून मापून दिमतीस घेत असत ..!
फंद फितुरीला स्थानच नव्हते.

पण,त्या दिवशी......!

शेजारच्या डोंगरातल्या दरोडेखोरांचा मोठा छापा यशवंतमाचीवर पडला...!
खंडेराय आणि वस्ताद चर्चेत व्यस्त होते तितक्यात गावात दंगा-गोंगाट ऐकू येऊ लागला.
दोघेही उठले...खुंटीला टांगलेली तलवार खंडेरायाने हातात घेतली आणि धावत तालमीतून बाहेर पळत सुटला...!

यशवंतमाची आणि पलीकडच्या डोंगरातील दाट जंगलातील "बेरड" यांची पिढ्यानपिढ्यांची दुष्मनी..!
अशी पिढी जात नव्हती कि एकमेकांचे मुडदे पडत नव्हते.मागच्या वेळेस तर याच बेरडानी शिर्क्यांचे सारे लग्नाचे वऱ्हाड कापून काढले होते.

त्याचे कारण असे,कि येसाजीराजांचे वडील आणि यशवंन्तमाची पलीकडच्या "मोऱ्यांची" हद्द एकमेकाला लागून होती.
जहागिरी,वाटणे यासाठी स्वकीयांच्यात होणार्या मारामाऱ्या कमी नव्हत्या,त्यात शिर्के –मोरे वैर महाभयानक.

आजवर ज्यांनी ज्यांनी मध्यस्ती केली त्यांचीही मुंडकी शाबूत राहिली नव्हती..!

मोऱ्यांचे पिढ्यानपिढ्यांचे कारभारी हे जाधववाडी चे "लखुजी बेरड"पाहत होते.

लखुजी बेरड मोठे बुद्धिमान आणि शूर.सारी जाधववाडी त्याना देव मानत होती,आणि लखुजी मोर्यांना देव मानत असे.
त्या दिवशी मैत्रीची खोटी आश्वासने देऊन येसाजीरावांचे वडील पिराजीराव शिर्के यांनी हद्दीसाठी मोर्यांशी दगा केला.घाटमाथ्यावरची सारी फौज कापून काढली...मात्र लखुजी बेरड आणि त्याची शे दोनशे चिवट धारकरी काही केल्या मागे हटेनात.

बरीच शिर्के मंडळी त्यांच्या हातून कत्तल होत आहे हे पाहून पिराजीरावांनी जाधववाडीवर छापा मारायला सांगून लखुजीच्या गावाची राख केली होती.....हे ऐकून लखुजीने तलवार टाकली आणि हताश होऊन कोसळला..हि संधी साधून पिराजीने त्याचे मुंडके कापले.......बस्स...तो दिवस मोरे-शिर्के वैर संपले आणि शिर्के-बेंरड वादाला तोंड फुटले...!

लखुजीच्या गावात ज्यांच्या ज्यांच्या स्त्रिया मृत्युमुखी पडल्या त्यांच्या त्यांच्या मुला-बाळांनी हातात तलवारी-कुर्हाडी घेऊन शिर्के घराणे संपवायचा विडा घेऊन गाव सोडले आणि जाधववाडी-यशवंतमाची दरम्यान च्या घनदाट जंगलात गुहेत राहून लुटालूट,जाळपोळ करून आयुष्य जगणे पसंद केले...!

त्यावेळी त्यांचा म्होरक्या होता लखुजीचा मुलगा रायराव.
रायरावाने अवघ्या २ ते ३ वर्षातच शिरक्यांच्या एका शुभ प्रसंगात चिवट बेरड फौजांनी पिराजीराव शिर्क्यांना ठार केले....आणि त्याचा बदला म्हणून काहीच दिवसात जंगलात छापा मारून रायरावाचे मुंडके शिर्क्यांनी तोडून आणले ...!

या अश्या कत्तलींचा लेखाजोखा पहिला तर साक्षात चित्रगुप्ताला शहारा येईल.....!

मुंडक्याला मुंडकी तोडली नाही तर ते शिर्के – बेरड वैरच नव्हे .....पण जेव्हापासून राजे येसाजीनी शिर्क्यांची गादी सांभाळली आहे त्यांनी बेरड आणि शिर्के यांच्या एकजूटीसाठी खूप प्रयत्न केले होते.
पण,दुहीचा शाप अजूनही संपला नव्हता......"रायराव" च्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याचा तरुण मुलगा "सूर्यराव"आता बेरडांचा म्होरक्या होता.

अतिशय शांत,शूर,मुत्सद्दी असलेला हा सूर्यराव जणू काही शपथ घेऊन होता कि शिर्के कुळ संपवले पाहिजे.

त्याने आजवर अनेक प्रयत्न केले पण ‘यशवंतमाची’ ला काही केल्या खिंडार पडत नव्हते.

राजे येसाजीनी माचीची सुरक्षा इतकी कडवी केली होती कि बेरडच काय कोणालाही अशक्य होते ते ...जर माची जिंकायचीच असा चंग बांधला कोणी तर मुंडक्यांची रास नक्कीच पडणार हे जगजाहीर होते,आणि एवढ्याश्या माचीसाठी एवढी मोठी किमत चुकवणे कोणाही मुत्सद्दी राजकर्त्याला परवडणारे नव्हते......!

पण,त्या दिवशी घात झाला होता.

राजे येसाजी सारीच फौज घाटमाथ्यावर घेऊन गेले ,अगदी थोडी फौज गावात होती ,आणि हीच खबर सूर्यराव बेरडच्या भयानक फौजेच्या कानी लागली आणि वाऱ्याच्या वेगाने ते यशवंतमाचीवर तुटून पडले.
गावातील सावकार,व्यापारी लोकांची घरे फुटू लागली.
खूप लुट जमा करून सूर्यराव बेरडाने लुट जंगलात धाडली आणि कडवे हशम बरोबर घेतले आणि त्याने त्याचा मोर्चा शिर्क्यांच्या वाड्यावर वळवला...!

डोळ्यात वडिलांच्या मृत्यूची आग घेऊन तो बेफाम घोड्यावर स्वार होऊन निघाला होता......!
खंडेराय हातात तलवार घेऊन बाहेर आला आणि त्याला जाणवले कि हातात पेटते पलिते घेऊन समोरून दौडत येणारी सारी फौज आता वाड्यावर कोसळणार...!

त्याने प्रसंगावधान राखले आणि वस्तदाना घेऊन सरळ वाडा गाठला..!

शिर्क्यांचा वाडा जणूकाही भुईकोट किल्लाच होता.
आत प्रवेश करून वाड्याचे मुख्य लाकडी द्वार बंद करायला सांगून वाड्यात मौजूद असणारी सारी फौज एकत्र केली...जेमतेम ३०/३५ लोक असतील ते ..!

प्रत्येकाला कामे वाटून देऊन वाड्याचे संरक्षण करायला सांगितले आणि तडक आपला मोर्चा वाड्यातील शिर्क्यांच्या कुटुंबाकडे वळवला.
घरातील आया-बाया आकस्मित हल्ल्याने हादरून गेल्या होत्या.
त्याना धीर देऊन तो निघणार इतक्यात शिर्क्यांची पत्नी रखमाईबाईसाहेब मोठ्या आवाजात रडत म्हणाली......थांबा...!

"माझी लेक हातात तलवार घेऊन मगाशीच चोरवाटेने बाहेर गेली आहे.काहीही करा पण माझ्या साऊला मागे आणा...बेरड –शिर्के वैर मला विचारा काय आहे ते .....एकवेळ आमच्या साऱ्यांचा जीव गेला तरी बेहत्तर पण माझ्या साऊ ला काही होता कामा नये तिने माझे काही न ऐकता १०० पैलवानांची फौज घेऊन वाड्याच्या चोरवाटेने बेरड फौजेवर चालून गेली आहे...."

हे ऐकून खंडेराय मात्र पुरता थक्क झाला......सकाळी दुध घेऊन आलेली नाजूक "सावित्री" हि शिर्क्यांची मुलगी होती तर ..!

आणि जीला नाजूक समजतोय ती रणांगण गाजवायला निघाली आहे ....!
तो खरोखर सावित्रीच्या या कामगिरीवर मनोमन खुश झाला ..!

‘’बाईसाहेब’.....राजांच्या फौजेला निरोप धडायला कोणाला तरी पाठवाल का ?

खंडेराय रखमाई बाईसाहेबाना बोलला....!

‘होय...निरोप घेऊन एक निशाणबारदार गेला आहे....फक्त काही तासात शिर्क्यांची फौज येईल...पण तोवर काही आक्रीत घडू नये ...तुम्ही जा...माझ्या साऊ ला तेवढे मागे आणा ....!

तुम्ही काळजी नका करू बाईसाहेब ....मी नक्की त्याना मागे आणतो...असे म्हणत खंडेरायाने तलवार पेलली आणि छलांग मारत तो वाड्याबाहेर दौडत गेला...!
एव्हाना माचीच्या पूर्वेकडून आर्त किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या होत्या...सावित्रीच्या नेतृत्वाखाली पैलवान फौजेने सुर्यरावाच्या फौजेवर हल्ला चढवला असावा बहुतेक.....!

सूर्याजीने पागेतील काळेभोर चांगले घोडे निवडून त्यावर मांड ठोकली..आणि वस्ताद काकाना बोलला.....काका ...प्रसंग बाका आहे,मला आई भवानी जसे सुचवते आहे तसे वागतो...ही खबर मात्र लौकर खेडेबारयाला पोहोच करा....!

मान हलवत काका बोलले...काळजी घे..आणि काका सुध्दा निघून गेले ...!

खंडेराय बेफान दौडत चालून गेला ...!

गावाच्या नदीपात्राजवळ सावित्री आणि पैलवानांच्या एकत्रित फौजेने सुर्यरावाच्या फौजेवर हल्ला चढवला...आकस्मित हल्ल्याने बेराडांची ती चिवट फौज मात्र पुरती हादरली...पण त्वरित सावरली...!

हल्ला कोणी आणि कोणाच्या नेतृत्वाखाली केला समजले....!
शिर्क्यांची लेक सावित्री.....!

सुर्यरावाने इशारा केला.....सावित्री जिवंत पकडा.

बस्स ..हजारांच्या फौजेपुढे सावित्रीचा तो हल्ला तोकडा पडला ,सावित्रीच्या घोड्याला दोर टाकून बांधून खाली पाडले..सावित्रीच्या डोक्यावर आघात झाला आणि ती बेशुद्ध झाली......!|
मासे पकडायची जाळी टाकून तिला कैद केले...!
आल्या पावली सुर्यरावने माघारी फिरायची आज्ञा केली....!

जे साधायला आलो होतो,त्यापेक्षा कितीतरी पट गवसले अशी भावना सुर्यरावच्या मनात थैमान घालू लागली...अवघ्या काही क्षणात यशवंतमाची ओसाड झाली.......सावित्रीला जिवंत कैद करून सूर्यराव जंगलात निघून गेला...!

काही क्षणात खंडोजी तिथे पोहचला.....पण वेळ निघून गेली होती.

आता ?
आता काय...विचार करून काय होणार नव्हते...त्याने लगाम खेचला आणि बेरडांच्या फौजेमागे त्यानेही पाठलाग सुरु करायचा ठरवत घोडे जंगलात घातले.

वार्यासारख्या वेगाने खंडेराय सुर्यरावाचा पाठलाग करू लागला.
अगदी काही अंतरावर सुर्यरावाची फौज आहे याची त्याला जाणीव झाली.
त्याने घोड्याचा वेग अजून वाढवला आणि मजल दरमजल करत एका भव्य पठारी प्रदेशात त्याचे घोडे आले आणि दुसऱ्याच क्षणांत घोड्याच्या खुरात आधीपासून पेरून ठेवलेली वाघर अडकली आणि घोडा कोसळला.....सूर्यरावांच्या फौजेला क्षणात समजले होते की कोणतरी पाठलाग करतोय..!

खंडेराया जमिनीवर पडणार इतक्यात त्याने स्वताला सांभाळत सावध पवित्रा घेतला आणि उठणार इतक्यात हजारो तलवारी त्याच्या नरड्यावर आल्या......पाच पंचविस धिप्पाड हशमानी खंडेरायाला जेरबंद केले....!

क्रमश:

"बाजींद" भाग क्र.७

~~~~~~~~


भाग क्र.७

•••••••••••••••••••••••••••••••
राजे येसजीरावांच्या मस्तकात फुटाणे उडत होते.
साऱ्या महाराष्ट्रातील मनसबदारांच्या पुढ्यात नाचक्की झाली होती.
काय कमी केलं होत "भीमा" च्या कुस्ती-मेहनत-खुराकात ?
रोज सकाळी पाच रात्री पाच शेर दूध.
दररोजचा 6-6 तास व्यायाम.
तगड्या मल्लांसोबत लढती.मालीश, मसाज करायला नोकर चाकर...मेहनत मोजून घ्यायला मुनीम.. सगळं राजेशाही असून शिळमकर देशमुखांच्या मल्लाला ऐकला नाही...!
डोकं भनभनत होत.
तेवढ्यात एका हुजऱ्यान वर्दी दिली..."राजे,ते मैदानातले पैलवान आणि वस्ताद आल्यात भेटाया"

राजे सावरुन बसले,भोवताली दिगग्ज सल्लागारांचे पथक दिमतीस होतेच....."बोलवा,त्यांना" राजांनी आदेश दिला....!

काही क्षण भूतकाळात विलीन झाले आणि चारचौकी शिर्के वाड्यातील सदरेत पैलवान खंडेराय आणि त्याचे वस्ताद आले...!

खंडेराय....अगदी वीस-पंचवीशीतला उमदा जवान गडी.ओठावर नुकतीच काळी रेघ दिसत होता.अंगापिंडाने धिप्पाड खण्डेराय पाहून कोणीही त्याच्या प्रेमात न पडावे तर नवल.
डोईला मराठेशाही पगडी,कमरेला तलवार असलेल्या खंडेराय व त्याच्या वस्तादांनी राजाना मुजरा केला.

उजवा हात वर करत राजांनी पण मुजरा स्वीकारला आणी बोलू लागले...."पैलवान,आम्ही तुमच्या कुस्ती वर निहायत खुश झालो आहोत,आमच्या भीमाला इतक्या सुंदर डावपेचात अडकवून चित करणारा पैलवान साधासुधा नाही हे आम्ही जाणतो,बोल काय बक्षीस देऊ तुला आम्ही "?

राजांचे स्तुतीपर ते शब्द ऐकून खंडेराय किंचित स्मित करत वस्तादांच्या हातात असलेले बक्षिसाने भरलेले पोते एका हातात धरून राजे येसजींच्या पुढ्यात ओतले...आणि बोलू लागला..."

"राज... मला द्यायचच असलं तर तुमच्या तालमीत आश्रय द्या,कुस्ती-मेहनत करुन गावोगावच्या यात्रा जत्रा मारुन वैतागलोय आमी, ही माज वस्ताद आणि म्या तुमच्या तालमीत राहिलो तर तुमचं लय नाव करुन दावीन..."

काय ?
राजे प्रश्नार्थक बोलून गेले ..!
अरे तुम्ही गुंजनमावळातील शिळमकर देशमुखांचे मल्ल,म्हणजे एकाअर्थी भोसल्यांच्याच हद्दीतले...!
भोसले-आदिलशाही दुष्मनी विकोपाला आली असताना तुला आम्ही आमच्या पदरी ठेवणे योग्य नाही...."

तेवढ्यात खंडेराय बोलला...."तस नव्ह राज...शिळमकर आणि आमचं संबंध जावळीच्या दंग्यावेळीच तुटलं,आणि शिळमकर तर चंद्रराव मोर्यांचा सख्खा भाचा हुता...त्यांना तर कुठं शिवाजीराजांच अभय हाय...?
हिकडं आड, तिकडं हिर नगासा करु... नायतर मग तुम्ही नाय म्हणला तर सरळ रायरी गाठून शिवाजीराजांची चाकरी पत्करायची का आमी ??

राजे,क्षणभर विचारात पडले.
खंडेराय चांगला पैलवान आहे यात शंकाच नाही,उद्या जर शस्त्रांचे चार हात शिकला तर चोखट धारकरी बनू शकेल,शिरक्याची दौलत सांभाळायला मजबूत मनगट मिळेल..."

"ठीक आहे खंडू....आम्ही ठेवू तुला आमच्या तालमीत...,असे म्हणत येसजीराजानी नोकराला हाक मारून,त्यांचे सामान उचलून वाड्याच्या मागे असलेल्या भव्य तालमीत ठेवायला लावले..!

ते म्हणाले...तुमची तात्पुरती सोय पुढे घोड्याच्या पागेभोवती असलेल्या घोडेवानाच्या खोलीत करु... चार दोन दिसानी तालमीत रहा..."
काही हवं नको याची सोय करुन राजे..वाड्याच्या आत निघून गेले...!

नोकरांनी खंडेराय व वस्तादांची साहित्याची पोती उचलून घोडेवानाच्या खोलीत ठेवली....!

"यशवंतमाची" च्या यात्रेत खुद्द येसाजीराजांच्या मल्लाला पराभूत केले ही बातमी वाऱ्यासारखी येसाजीराजांच्या अंतरमहालात गेली.
राजांना एकच मुलगी.
"सावीत्री"तिचे नाव.रुपाने अतिशय रूपवान.
गोरापान चेहरा,सतेज कांती,सरळ सळसळीत नाक..पांढरे शुभ्र मोत्यासारखे दात,सहीसही राजलक्ष्मी भासत असे...!
शिर्के घराण्याची "सावित्री"म्हणजे यशवन्तमाचीचे नाकच होते...लाडाने सर्व तिला "साऊ"म्हणत असे....खूप खूप लाडात वाढली होती ती..!
राजांना कधी आपल्याला मुलगा नाही याची उणीव तीने भासुन दिली नव्हती..!
नाजूक रुसव्या फुगव्यात कधी ती अडकलीच नव्हती.
भरधाव घोड्यावर मांड ठोकून वाऱ्याच्या वेगाने घोडा फेकत सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात स्वछंद भरारी मारणे,तलवार,भाला,गदा,धनुष्यबाण सर्वकाही लीलया चालवत असे...आणि एवढे असूनही शिरक्यांच्या वाड्यात नजरेने कधी जमीन सोडत नसे...!
जशी यशवन्तमाची साऊ जीव मानत असे किंबहुना त्यापेक्षाही जास्त यशवन्तमाचीची इज्जत साऊ ला प्रिय होती...!

आजचा घडलेला प्रकार तीला जिव्हारी लागला होता.
दस्तूरखुद्द शिरक्यांच्या गावात येऊन शिरक्यांच्या पैलवानाला आव्हान देऊन चितपट करणारा कोण हा ऎरा गैरा आहे त्याला चांगलाच धडा शिकवायची मनीषा साऊ च्या मनात आली होती...!

दिवस उगवला,सह्याद्रीच्या कडेकपारीत सहस्रोसूर्यनारायणाची सहस्रो किरणे आपल्या सुवर्ण किरणांनी दाही दिशा उजळून टाकू लागली...पण राजे शिरक्यांच्या वाड्यामागील तालमीत भल्या पहाटेच शड्डू घुमू लागले होते.
खंडोजीच्या जोराचा ठेका पाच हजाराच्या वर गेला होता...!
घामाने निथळत असलेले त्याचे शरीर एखाद्या चिरेबंद बुरुजाप्रमाणे भासत होते.

सकाळ होताच राजे स्वता तालमीत आले.
सर्व जवान धारकरी नुकताच कुस्तीचा सराव आटोपून आपापली हत्यारे परजत तालमीबाहेरच्या मैदानात तलवार-पट्टयांचा सराव करु लागली..."

"खडूं... उचल तो पट्टा ,अन घे पवित्रा...."
राजे खंडेराय ला बोलले.

त्यांच्या बोलण्याने खंडेराय बोलला...."नाय राजं... म्या पैलवान गडी...ही धारकऱ्याची कामं, मला नाय जमायचं.."

यावर हसून राजे बोलले..."अरे, माझ्या भीमाला चित केलंस त्यापेक्षा सोप्प काम आहे हे...चल उचल "

भीत भीत खंडेरायाने पट्ट्याच्या खोबणीत हात घातला..आणि एक एक हात करु लागला...सारे मल्ल त्यावर हसू लागले..."

खंडेराय ला काही केल्या पट्टा चालवता येईना,दमून त्याने त्याचा नाद सोडला व राजे येसजींची मालीश करतो म्हणाला...."

राजांचे सर्वांग तेलाने माखून खंडेराय आपल्या मजबूत हाताने मालीश करत होता,सारे मल्ल आसपास हत्यारांचा सराव करत होती....खंडेराय घामाने ड्बडबला होता अन तितक्यात तालमीच्या दरवाजावर थाप पडली..!

"बघ रे,कोण आहे ते....
खंडेराय उठला आणि घाम पुसत तालमीचा दरवाजा उघडला....सुर्याची किरणे एकदम तालमीच्या दरवाजातून आत प्रवेशली आणि त्याच्या आडवी उभी असणारी एक जातीवन्त देखणी स्त्री हातात दुधाचा तांब्या घेऊन उभी होती.....खंडेराय तीचे ते जातिवंत सौंदर्य पाहू लागला.....आणि ती ....ती सुद्धा त्याचे देखणेपण न्याहळत होती....,काही क्षण तसेच निघून गेले अन....राजे येसाजी गर्जले...कोण आहे रे ?

"आबा,दूध आणले आहे.....साऊ चा नाजूक आवाज आला,"

"खंडू...तांब्या घे तो"....राजे बोलले.

खंडेराय निशब्द होता,त्याच्या हृदयाची कंपने अतीतीव्र झाली होती...आणि साऊ...तिचीही अवस्था काहीशी तशीच होती...अजून काही क्षण भूतकाळात गेले आणि ते दोघेही नजरभेटीचे सुख अनुभवत तिष्ठत उभेच होते...."

"साऊ..........पाठीमागून कोणीतरी हाक मारली आणि दोघेही सावध झाले...सावित्री ने दुधाचा तांब्या खंडेराय च्या हातात देऊन धावत मागे गेली"

राजांच्या हाती तांब्या देऊन खंडेराय उभा होता...5 शेर दुधाचा पितळी तांब्या बघता बघता राजानी रिचवला...आणि अंघोळीला निघून गेले..."

खंडेराय मात्र त्या गूढ डोळ्यांची आठवण कितीतरी वेळ काढत तालमीत बसला होता...."

साऊ च्या मनाची घालमेल पण अशीच होती...कोण होता तो ?
याआधी कसा पाहिला नाही ...कित्येक प्रश्नांनी मनात काहूर माजले होते...."

अंघोळ पाणी आटोपून खंडेराय राजे येसजींच्या परवानगी ने गावात जाऊन येतो म्हणून निघाला......"

सकाळचा सूर्य माथ्यावर आला नी खंडेराय यशवन्तमाची पासून 5-6 कोसावर एका डोंगररांगेतल्या जंगलात गेला.
एक मेंढरांचा कळप चरणाऱ्या मेंढपाळाला पाहून त्याने हाक मारली.........."जय मल्हारी"
त्याची ती हाक ऐकून त्या मेंढपाळणे प्रतिउत्तर दाखल दुसरी हाक मारली........ "जय रोहिडेश्वर"

आणि दुसऱ्याच क्षणी दोघेही खदखदून हसू लागली...!

खंडेराय त्या मेंढपाळाला बोलला....खेडेबाऱ्याला निरोप द्या.....सांबाच्या पिंडीवर नाग पोहचता झालाय....लौकरच पंचमी खेळायला आवतण धाडतो......असे म्हणत पुनश्च एकदा...."जय मल्हारी...जय रोहिडेश्वर गजर झाला".....!

खंडेराय दुपारच्या प्रहरी पुन्हा यशवंतमाचीत राजे येसाजी शिर्के यांच्या तालमीत दाखल झाला...."

••●क्रमश●••
"बाजींद"

बाजींद" भाग क्र. ६

बाजींद"


भाग क्र. ६
•••••••••••••••••••••••••••••••
सर्व गोष्टीत संपन्न असणाऱ्या गावात आणि असे गाव संपन्न बनवण्यासाठी पडेल तडजोड करायला प्रसंगी प्राणाची बाजी लावायला तयार असणाऱ्या शिर्के घराण्यात माझा जन्म झाला.

वडील "राजे येसजीराव शिर्के" आदिलशाही साम्राज्याचे नेकजात,निष्ठावान मनसबदार.
आमचे सारे घराणे विजापूर च्या गादीची इमाने इतबारे सेवा कित्येक पिढ्या करत होती..!
पण,पुण्याचे शिवाजीराजे भोसले यांनी "हिंदवी स्वराज्याचा" डाव मांडला आणि केवळ आदिलशाही नव्हे तर हिंदुस्थानातील पाची पातशाह्या हादरुन गेल्या.
अफझलखानासारखा बलाढ्य सरदार फाडून जावळी पासून महाड पर्यंत असणारा जावळीच्या चंद्रराव मोर्यांचा प्रदेश एकहाती शिवाजी राजांनी जिंकला...केवळ आमची माची सोडून....!
वास्तविक आमच्याकडे लक्ष देण्याइतपत आमचे सैन्य जास्त नव्हते,पण आमचे वडील फार शूर,इमानी आणि एकनिष्ठ सेनानी म्हणून पंचक्रोशीत नाव होते,
दुसरी गोष्ट तळकोकणात सर्व हालचाली वर सहज लक्ष ठेवता येईल असे मोक्याचे ठिकाण म्हणजे "यशवंतमाची"...!
शिवाजी महाराजांच्या धाकाने आसपास ची कित्येक बलाढ्य घराणी शिवाजीराजांचा कौल घेऊन स्वराज्यात सामील झाली,फक्त आमचे घराणे सोडून....!
बस्स...हिच गोष्ट आमच्या घराण्याच्या नाशाला कारणीभूत ठरली...!
आमच्या वडिलांची फौज फार शूर व चिवट होती.
कुस्ती,तलवार,भाला, दांडपट्टा,घोडा या सर्वांचे प्रशिक्षण आमच्या वाड्यातच मिळत असे..!
आमच्या गावच्या "काळभैरव" यात्रेला कुस्तीचा फार मोठा आखाडा भरत असे.

त्यादिवशी पण गावाच्या यात्राचा फार मोठा आखाडा भरला होता ......

"राजे येसाजीराव शिर्के" यांनी अनेक मल्लांना आश्रय दिला होता.महाराष्ट्रातील एक एक तगडे मल्ल त्यांच्या तालमीत सराव करत होते.
बदाम,काजू,खारीक,सुके फळे यासह अनेक खुराकाचे पदार्थ दर महिन्याला बैलगाड्या भरून भरून तालमीत येत असे.
स्वता येसाजीराव कुस्ती मेहनत खूप करत असत.
पंचक्रोशीतील एखाद्या मैदानात चांगला लढवय्या मल्ल दिसला कि त्याच्या सार्या आयुष्याची जबाबदारी घेऊन त्याला सांभाळत असे.
असे आमचे शिर्के घराणे कुस्तीचे फार नादिष्ट्य..!
काळभैरवाच्या यात्रेत महाराष्ट्रातील अनेक मल्ल कुस्ती खेळायला येत असत.मोठमोठ्या बक्षिसांच्या रकमा,खुराकाचे साहित्य,तलवार,घोडा अशी बक्षिसे मिळवून परत जात असे.
पंचक्रोशीतील लाखो लोक त्या कुस्त्या पहायला बैलगाड्या जुंपून,घोड्यावरून,पालखीतून,पायी येत असत.
त्यांच्या जेवणा खाण्यापासून ते मुक्कामाची सोय सारे "राजे येसाजीराव शिर्के" करत असे.

शिवाजी महाराज आणि आदिलशाही चे राजकारण वेगळे आणि हा कुस्त्यांचा फड वेगळा असे समजून अनेक शिवशाहीचे सरदार सुध्दा या मैदानाला आवर्जून हजर असे.
त्या दिवशी सुध्दा असाच माणसांचा लोंढा यशवंतमाची ला पडला.
हशम हत्यारे पेलून येसाजीरावांच्या फौज्या चहू बाजूनी गस्त घालून संरक्षण करताच होत्या.
अनेक पैलवान हातात बर्चे भाले पेलून जंगलात तळ ठोकून येणाऱ्या पाहुण्यात कोणी शत्रू तर नाही याची दाखल घेत होते .....चिलट सुध्दा राजे येसाजीरावांच्या परवानगी शिवाय आत येणार नाही अशी संरक्षण व्यवस्था होती ,आणि जर आलेच तर त्याची खांडोळी करायचे आदेश होते.

दुपारी सूर्य मध्यावर आला आणि पश्चिमेकडे झुकू लागला आणि ‘काळभैरवाच्या नावान चांगभल’ च्या आरोळीने आसमंत दुमदुमून गेला.
लाखो लोकांनी यशवंतमाचीच्या काळभैरव डोंगराच्या खाली तयार केलेल्या कुस्ती मैदानाला कडे करायला सुरवात केली.
अनेक गावाचे,अनेक नावाचे ,अनेक पदांचे सरदार ते दंगल पहायला आले होते.अनेक वस्ताद- खलिफा आपापले पठ्ठे या मैदानात लढवायला घेऊन आले होते.
एव्हाना हलगी घुमक्याच्या ,शिंग तुताऱ्याच्या निनादात दांडपट्टा,लाठीकाठी चा खेळ मैदानात सुरु झाला.
अनेक वीर आपले कसब दाखवत होते ,आणि एखादा धारकरी आवडला कि उपस्थित प्रेक्षकातील एखादा "विजापुरी सरदार"त्याला मागेल तेव्हडे धन देऊन आपल्या पदरी येण्यासाठी व्यवहार करत असे..!
असे एक ना अनेक धारकरी आपल्या कर्तुत्वावर अनेक सरदार लोकांचे मांडलिक झाले ,अजूनही होत होते.
मर्दानी शस्त्रांचा खेळ संपून लहान मोठ्या कुस्त्याना प्रारंभ झाला ,महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेले अनेक मल्ल आपले कसब दाखवून उपस्थित धनाढ्य लोकांच्याकडून आणि खुद्द येसाजीरावांच्या खजिन्यातून रोख बक्षीस जिंकत होते ...!
सूर्य मावळतीला झुकणार इतक्यात राजे येसाजी शिर्के यांच्या खास तालमीत तयार केलेला "भीमा जाधव" हा लढवय्या मल्ल लांघ-लंगोट चढवून अंगाला तेल लावून मैदानात ‘’जय बजरंगाची’’ आरोळी ठोकून उतरला.त्याच्या शड्डूच्या घुणत्काराने सार्या मैदानाच्या कानठीळ्या बसल्या..!
सारेच त्याची शरीरयष्टी पाहून थक्क झाले.
शे-दीडशे किलोचा तो भीमा नावाप्रमाणे भीम भासत होता.कल्लेदार मिशा.काळाकिभिन्न दिसणारा भीमा हा पैलवान नव्हे तर प्रतिस्पर्ध्याचा यमदूत आहे असे वाटत होते.
अनेक ठेकेदार भीमावर रोख रकमा,सोने चांदी,तलवार ढाली,बैलजोड्या,घोडे,गदा.यासःह हिरे मोती सुध्दा बक्षीस लाऊ लागली,
बक्षिसांचा आकडा चांगलाच फुगला तरीपण उपस्थित वस्ताद,खलिफा खाली मान घालून उभे होते.
भीमाला जोड काही मिळेना.
कशी मिळणार जोड ?अहो त्या भिमाशी लढणे म्हणजे साक्षात मृत्यूशी लढणे होय.कधी काय मोडून टाकल नेम नाही....!
राजे येसाजी उठले आणि मोठ्या रवात बोलू लागले......!
माझ्या भिमाशी चार हात करायला महाराष्ट्रात कोणी नाही ?
वऱ्हाड,खानदेश,कृष्णाकाठ,देश,कोकण सारे इथे जमले आहेत.कोणाच्याही तालमीत नाही का एखादा सुरमा मल्ल ?
आणि नसेल त्याला जोड तर मानाने त्याला बक्षीस देऊन सर्वांनी मान्य करा कि राजे येसाजींच्या पदराचा मल्ल महाराष्ट्रात अजिंक्य आहे ...!
पूर्वेकडून हलगी,घुमके,शिंग तुताऱ्या कल्लोळ करू लागल्या...लाखांची गर्दी कुजबुजू लागली...!
सर्व बक्षीस एका हारकार्याने एका पोत्यात फिरून गोळा करून मैदानाच्या मधोमध आणले..स्वता राजे येसाजीनी ५ शेर वजनाचे सोन्याचे कडे भीमाला बक्षीस देऊ केले ...ते मनोमन खुश होते...!

भीमा बेजोड मल्ल म्हणून विजयी ठरणार होता.

पण...पण तितक्यात मैदानाच्या उजव्या अंगाकडून एका गंभीर आवाजाने मैदानात शांतता पसरली...!
‘थांबा.....’
माझा पठ्ठा लढेल भिमाशी तुमच्या....!

कोण ?..

एकाने विचारपूस करून ठावठीकाणा माहिती आणली...!

गुंजनमावळातील शिळमकर देशमुख सरदारांच्या पदरी असणारा एक लढवय्या मल्ल खंडेराव सरदेसाई आणि त्याचे वस्ताद काकासाहेब जेधे आले आहेत..!
दोन्ही वस्ताद पैलवानांचे गुळ पाणी देऊन स्वागत झाले आणि कपडे काढून राजे येसाजीना मुजरा करून तो मल्ल मैदानात आला....!

घोटीव,पिळदार शरीर...मजबूत मांड्या,बलाढ्य बाहू....ओठावर किंचित काळी रेघ आणि स्मितहास्य..गोरापान नितळ चेहरा,सरळ सळसळीत नाक ....आणि पायात काळा दोरा बांधलेला खंडेराय सहीसही साक्षात "मल्हारी मार्तंड" वाटत होता..!
त्याच्या देखणेपणा आणि शरीराचे कौतुक गर्दीत होऊ लागले...!

एक मुठी माती त्याने हातात घेऊन कपाळाला लावली....आणि राजे येसाजींच्या कडे पाहत प्रचंड शड्डू ठोकला...सारे मैदान हादरले......!
मान्यवरांच्या हस्ते हातसलामी झडली ...आणि काही क्षण भूतकाळात जमा झाले..!

भीमा आणि खंडेराय यांची कुस्ती म्हणजे जणू दोन वादळे एकमेकांशी भिडणार होती.
निकाल काय होईल याचा अंदाज बंधने मुश्कील होते..!
भीमा-आणि खंडेराय मनगटाला मनगटे भिडली...गर्दनखेच सुरु झाली..!

बघता बघता मैदानांत डावांची वलये सुरु झाली
भीमाने वर्षभर कसून तयारी केलेला एक एक डाव खंडेरायावर मारत होता,आणि त्याची सहजच उकल करत खंडेराय सुटत होता...दोन्ही मल्ल चिखलाने माखले..!

कुस्तीचे पारडे कधी भीमा तर कधी खंडेराय च्या बाजूला झुकत होते.

भीमा एखाद्या भरपावसात भिजत उभा असलेल्या बुरूजासारखा वाटत होता तर खंडेराय गोऱ्या रंगावर तांबड्या मातीच्या चिखलाने केशरी आंब्याप्रमाणे भासत होता ...!

आणि ,
आता मात्र खंडेरायाने आक्रमक पवित्रा घेतला आणि भीमा चा उजवा हात बगलेत दाबून "आतली टांग" डाव इतक्या जोरात मारला आणि अक्षरश सुदर्शन चक्र फिरावे तसे भीमा गर्दीशी फिरून मैदानावर आडवा झाला.....सपशेल चीतपट कुस्ती...!

सारे प्रेक्षक आनंदाने बेभान झाले ....खंडेरायाला डोक्यावर घेऊन सारे लोक आनंदाने नाचू लागले.
हे सर्व पाहत राजे येसाजी उठले....शेजारी उभे असलेल्या कारभार्याला बोलले...या पोराला आणि त्याच्या वस्तादाला घेऊन वाड्यावर या....असे म्हणत राजे निघून गेले....!
खंडेराय गळ्यात फुलांच्या माळा,गुलाल आणि रोख बक्षिसात न्हावून गेला ....!

सर्व जण बेभान आनंदात होते...पण खंडेरायाची गूढ नजर मात्र वेगळीच भाषा बोलत होती...चेहऱ्यावर एकप्रकारची गंभीर शांतता दिसत होती......!
सारे लोक आनंदात होते....फक्त राजे येसाजीराव मात्र मनस्वी दुखी.
आजवर त्यांच्या गावात येऊन खुद्द राजांच्या मल्लाच्या छातीवर बसून विजयी आरोळी ठोकणारा खंडेराय त्यांच्या नजरेसमोरून हटत नव्हता..........त्याना ओढ होती त्यांच्या भेटीची...आणि खंडेरायाला ओढ होती...’यशवंतमाचीची’...?
क्रमशः

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...