✒️प्रसाद कुलकर्णी
दोन दिस आधीच गडावर परवाना काढून राह्यलैल्या हेरगडयांनी गडावरून पुन्हा शिळंची इशारत घातली.... थंडीचा कडाका चांगलाच वाढलावता..अन त्यात भर म्हणन सोसाट्याचा वारा बी स्टलावता...आमचं दोन हलकं गडी भंडारा लावून दोर घिऊन मावळतीकडचा कडा चढाई काराय लागलं....पोरं बघता बघता कड्याव पोचली... वरच्या
मावळ्यांनी टोकाव पोचल्याली पोरं उचलून घेतली.....वर गेल्याव टोकाला दगडगोटं लावलेल्या अजून धा-बारा रश्श्या
खाली आल्या .....
सुभेदारानं येका रश्शीत हात गुतावला समशेर कमरंला खोचून ... दातात बिचवा दाबून धरला आणि पैलवान गडी आक्षी वानरागत चढाई काराय लागला....म्या पन दोर धरला ...तलवार मागं लटकवुन ...चाकू दातात दाबला अन चढाय लागलो....गडी वर जात हुतं आणि अजून दोर टाकीत हुते..
म्या अर्ध्यापातूर आलो...दोर धरून हातूंब पार तटतटून गेलं.पाक छाती भरून आल्यागत झाल... थंडीचा कडाका घेऊन वारा लईच सोसाट्यानं सुटला हुता... त्यानं दोराला झोल बसाय लागलं....म्या तर या टोकाचा त्या टोका पातूर झुलत हतो...कधीमधी कपारीवर आपटत राहयलो....धा-बारा गडी हात सुटून खाली पडलं...पन कुनीह का चू क्येलं न्हाई...गडी निसटला की थोड्या वेळानं कायतर पडल्याचा बसका आवाज याचा बस्स.....!
वर गडावर उदेभान मुरली किल्लेदार होता...रजपूत आसला तरी औरंग्यानं बाटवला हुता....यो उदेभान गडी आडवा तिडवा अगदी हाबशावणी हातभार उंचच्या उंच होता..सिपाही गिरीत लै तरब्येज...
बाकी गडावर हाबशी अन यवनी शिबंदी हजार बाराशे हुती या हाबश्याची जमात लै इरसाल...ताकद रेड्याची पन खायाला कार अन धरणीला भार....उगा मोठमोठाल्या धौप तलवारी बाळगायची... पन कूट कलावंतीण दिसली की चटावलीच... वशाट खाऊन वरबाडून वर जीव जास्तुर दवादारू ढोसणे.. यांची डोस्की चालायचीच न्हाईत..चपळाई तर म्हाइतच न्हाय.....निव्वळ गुलाम....तशी पठाणाची जात लढाई कड़वी हती...इमानानं लढायची ...
हिकई तानाजी सुर्याजीच्या इशारतीची वाट बघित हुता....
गडावर कुठतर खुसफूस ह्याचं...आमी हाय तिथं गपगार पडून राह्यचो.....आस्ते आस्ते सव्वाशे फाकडे गड़ी
मावळतीचा कडा चढून कलावंतीनीच्या टोकाव काळवादून बसून राह्यलो.......
सूर्याजी त्याच्या गड्यांसकट कल्याण दरवाज्या जवळ मोर्चा धराय गेला हता पर कल्याण दरवाज्याव जरा जाग
हती.आधीच शेलारमामा दरवाज्याच्या आल्याड़ गाइयांसाकट मोर्चा धरून बसला हुता...म्हणून सूर्याजी गडी घीऊन पुन्हा कड़े खाली आला हुता... तशी इशारत झाली.....
आता तानाजीनं पाठीवरली ढाल काढली समशेर उभी धरून मळवटाव भंडारा भरला....आमी पटापट समशेरी आपल्या.. ढाली हाताव तोलून आमी पुढे सरकू लागलो...पाच पन्नास पावलाव झुंजार बुरुज हुता तितं हाबशी भालं धरून डुलकी काढीत होतं...
तिकई कोसभर उदेभानाचा वाडा हुता तिथं मशाली पेटलेल्या तिथं वाईच जाग हुती..आन दुसऱ्या टोकाला कल्याण दरवाज्याव पहान्याव चांगलीच जाग हूती...
गडाची हजार बाराशे शिबंदी गडाव ईस्कटून पांगली ती कुनाच्या ध्यानीमनी बी छापा पडल.... असं आलं नसल.....
आमी पंचवीस गडी सुभेदाराबर झुंजायकई सरकार...बाकी मावळंगडी मैलभर टप्प्यात ईसकाटून दडून राह्यली....
झुंजान्यावनं खाली गडावची शिबंदी कापत.... कल्याण दरवाजा खोलुन शेलारमामा आतघ्यायचा डाव हुता....ठरल्या परमानं सूर्याजी दरवाज्यात येनार नव्हता..त्यो मागून दोरावरूनच यायला लागला हुता...त्यो येस्तोवर आमच्याकड वक्त न्हवता...सकाळी फटफटायच्या आत गवताची जंजी जाळून राजगडाला इशारत द्याची हुती....
आमी गडी झुंजायव पोचलो आणि येकदम
"हारार महादेव" चा गलका उठला... त्या भयान शांततेत गलका कानठळ्या फोडीत राह्यला.....
झुंजाऱ्यावनं खडबडून जागं झाल्यालं...पाचपंचवीस हबशी धडपडतच आमच्याव चालून आलं....म्या जाग्याव पुंगुरमाळ घालीत तलवार भिंगवाय सूरवात केली येक आडदांड काळा हबशी डोक्याव दोन हातात खंडा घेऊन चालुन आला म्या सप्पय हून त्येच्या तडाख्यातून बाहेर पडलो अन तसाच माघारा झेप घिऊन गिरकीत त्याच्या गरदनीव समशेरीचा ठोक्या वार घातला ....झटक्यात मुंडकं उडाल्यालं धूड गुडघ्याव आदाळलं...म्या लोखंडी नाळ ठोकलेल्या पायतानानं त्येच्या छाताडाव सनसनीत लाथ घातली.... गर्दनितनं रक्ताच्या चिळकांड्या उडवीत बिन मुंडक्याचं धूड येका अंगाव कोसळलं....
तिकडं तान्या कदी ढालीवर तर कदी समशेरीव गरम झेलत...कापत पुढं ढांगा टाकीत हता.. आमी वानरांनी घटकंत पुरा बुरुज कापून काढला हुता ...तिकडं उदेभानाच्या वाड्याव गलका वाढला त्या बाजूनं गनिमामागून गनीम आमच्याव दिन दिन करत बरसाय लागला...जणू झुंजार बुरुज आमचं ठाणच झालं हुत.... खइड्या धोंड्यातनं... झुंजार बुरुजाकडं धावत सुटल्याला गनिम मधीच झुडपात दडून बसलेल्या आमच्या मावळ्यांकडून कापला जात हुता...आमी बी गनिमावर ढांगा टाकीत तुटून पडलो..
..आमचं पटाईत हाताव खोबळं लावलेल्या पानाचा रिंगणात गिरकी घेत, डाव टाकीत म्होरं काढणी खेळवीत हुतं..
त्यांच्या सळ्ळ सळ्ळ...भिंगरी वाणी फिरना-या पट्ट्यच्या तडाख्यात कुनी यायचा अन त्येजा फन्नाच उडायचा.....
आतापातूर ...बेसावाध गनीम सावध झाला खरा पन हातात हत्यार घीउन ...कुटं धावू... अन कुटं दडू...काय करू त्याला उमगत नव्हत..हातातल्या मशाली पन वाऱ्यानं टिकत न्हवते...निस्ता गोंधुळ आन किंचाळ्या उठत हत्य.. कल्याण दारवाज्यावरची शिबंदी आत धावून आली ....तान्या ह्याचीच वाट बघत हुता ...चार गड़ी घोंगडी पांघरून अंधारातनं दरवाज्याकड शेलारमामाला आत घ्यायला... दौडत गेली.. तान्या सपासप वार घालीत उदेभानाच्या वयाच्या हाताला ढांगा टाकीत दौडत हुता...म्या बी वाटंत यील त्याला गिरकीवर उडवीत, कापीत तान्या मागून धावत हुतो...वाड्याचं धारकरी कवाच इसकाटून गेले...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा