फॉलोअर

शनिवार, २५ एप्रिल, २०२०

⚔️🚩 सुभेदार ताण्या - भाग ३ 🚩⚔️


Who was Tanaji Malusare? - Quora
⚔️🚩 सुभेदार ताण्या - भाग ३ 🚩⚔️

✒️प्रसाद कुलकर्णी


तान्यानं दरवाज्याव लाथा घालाय सुरवात केली....तवर दिंडी दरवाज्यातून दोनपाच हबशी चालून आलं...आमी म्होरं जाऊन त्यास्नी अंगाव घेतलं....एका हाबश्यानं म्या घातलेला डोसक्यावचा वार चुकवून..माज्या पायात समशेर घातली म्या चुकवली पर पिंडरीला चाटून गेली.पायाच्या वाद्या तुटल्या...रक्ताची बारीक चिळकांडी उडाली ...म्या शिव्या दयेत त्याच्याव येका मागून येक समशेरीचं तडाखं देत सुटलो....हबशी पार गांगरून गेला..यम दिसल्यावानी हागाटून गेला.... त्याचं हत्यार उडून पडलं..... पुढचा ठोका घालणार तवा त्यानं तोबा तोबा करीत हात जोडलं....त्याला तसाच टाकून म्या तान्या मागून गेलेल्या बाकी हाबश्याव चालून गेलो ...

तव्हड्यात उदेभान शिवीगाळ करीत ढाल तलवार घीउन भाईर आला.....गडी अंगापिंडानं जबर हता..

ताना येवडा येळ ह्यालाच शोधीत होता.उदयभान मधी येणाऱ्या गड्यासनी हुसकावीत मैदानात आला....

तवर सूर्याजी त्याचं गडी घीउन वर आला हुता....अन तिकडं शेलारमामा... दरवाजा उघडून आत घेतला हुता....दोनी बाजूनं दोघांनी ताज्या दमानं पूना गरम कापाय सुरू केला.....

इकई तान्या उदेभानाला सामोरा झाला....

तान्या धीप्पाड उदेभानासमोर चणीला दोन बोटं कमीच हुता....उदेभान त्येच्याकडडं बघून गरजला ..

"कोन बे तू काफर चा बच्चा....

तुझ्या मौतीला आ गया क्या....कुणी धाडला तुला.....?

किसका शिलेदार तू.....?"

तान्यानं तलवार येका हातात तोलून धरली.....आन येका पायाव उडी घेत, डरकाळी फोडीत बोलला....

“शिलेदार.....?

म्या सुभेदार सर्जा शिवाजीचा....

तुझ्या मौतीला... मला सर्जानं धाडीला..."

तान्यानं डोळ्याचं पातं लवतं ना लवतं तवर वाघ्या उडी घालून उदेभानाच्या तलवारीच्या खांद्याव वार वाढला..उदयभान चप्पल...त्येनं झटक्यात मागं सरून ... शेवटच्या वक्ताला वार ढालीवर झेलला.....ढालीवर काइकन आवाज झाला.....तरी बी तान्यानं ढालीवर तलवार तशीच दाबून धरली.... तलवार निस्टांय च्या आदी

तान्यानं उदेभानाच्या पेकाटात लाथ घातली.....

उदेभान सटपटून बाजूला पडला ...कळवळून पुन्हा उठला...तान्या परत ढांग टाकून चालून गेला... आता उदेभान वार

घालायचा सोडून ढाल दाखवाय लागला....

हय पानी इपरित हाय..... हे त्याला उमगून चुकलं होतं..त्यानं हवत पुरुषभर उडी घेतली आन उदेभानाव समशेरीसकट इज पडावी असा कोसळला.....तान्याची तलवार उदेभानाच्या ढालीवर आदळून त्येच्या छाताडाव आली....उदेभानानं चिलखत घातल्यालं तान्याची समशेर खरखरत खाली आली....अंगात निव्वळ बाराबंदी घातलेला तान्या पिसाटून गेलता..... जरा वक्तानं उदेभानानं मोर्चा घेतला...त्यो पुरता भयसाटून गेलता.... जमल तसं वार

कराय लागला....

इकडं तान्या तांबारल्यालं डोळे वटारुन हल्ला चढवीत हता.. तान्यानं उदेभानाचा वार ढालीवर झेलला....तवा ढालीतून खन्नकन आवाज न्हाई आला उलट ढालीतून भिजलेल्या डफागत बदकन आवाज आला...मगा कड्यावरून चढाई करताना तान्याची ढाल कपारीत माइंदाळ घासली होती..

तान्याची ढाल तडाकली हुती.......उदेभानानं हे नेमकं हेरलं.....त्यो ढालीव वार करीतच सुटला...तान्यानं येक वार चुकावला अन लागलीच उदयभानचा पायाव समशेरीच्या मुठीचा तडाखा दिला....उदेभान उडून खाली पडला...परत तलवार गोल फिरवीत उठून मागं झाला ...त्यांन परत तान्याच्या ढालीवर रेटा देत वार घालाय सुरू केली.....अन येका वाराला.त्याची ढाल हातावच चिरफाळली तलवारीचा तिखटजाळ वार हाताव झाला....

तान्या जरा थबकला रक्तानं भरल्याला हात झटकला ....त्यानं मोर्चा घालीत उदेभानाला मागं रेटत न्हेला ....माग हटताना उदेभानाच्या काखंत तान्याच्या पायतानाला लावलेल्या पोलादीनालाची लाथ बसली..... उदेभान भेलकांडला..तान्या जरा बी येळ न दवडता डोक्याचं मुंडासं हाताव गुंडाळल...उदेभान चवताळून पुढे झाला .....तान्याच्या हाताव वार घालतच हुता..... तान्या वार झेलीत उदेभानाव चढाई करीत हुता....तान्यानं डोळा लवस्तवर काखंतुन तलवारीचा दाब दिऊन उदेभानाला मागं सारला....उदेभान घाव घालाय म्होरं होस्तवर तान्यानं गिरकी मारत पाठीवसमशेरीची फुली मारत दुब दिली...अन म्होरल्या गिरकीतच उदेभानाव काढणी काढली ...उदेभानाच्या ध्यानीमनी यायच्या आत तान्याचा घाव उदेभानाची गर्दन चाटून गेला....रक्त निगलं पन. घाव काय वर्मी न्हाय बसला...

.... उदेभानानं बी तान्याच्या हाताव येका मागून येक वार केलेले..दोगं बी रक्तानं न्हाल्यालं हत... हतं...पन मागं हटाय कोनी मागत नव्हतं..

अन इपरित घडलं उदेभानानं चवताळून तान्याच्या हाताव वर्मी घाव घातला....अन हात हवंत उडाला की रं.. तान्या कळवळला खरा....तिखटज्जाळ...कळ....फाटं फोडीत मस्तकापातूर गेली....

तान्या भानावर आला...त्यातून उदेभानाव त्यानं शेवटचा वार घातला उदेभानानं टाल घातली तरी गडी दोन पावलं उडून पडला...त्याला सावराय गडी धावले पन, त्येनं मागं वळून शिल्लक राह्यलेल्या समशेरीच्या हातानंच आमाला थांबावलं..उदेभान ह्याचीच वाट बघित हता...त्यानं पाठीमागून धाव घालून तान्याच्या खांद्यावनं तलवार भोकसली पार फासळ्या तोडीत छातीत घुसली.....

तान्याच्या घशात घरघर लागली.... डोळ्याच्या कड्यात पानी जमा झालं..खिनभर भवताली सफ्फेदि आल्यागत झालं. डोळ्यासमोर जिरंटोप घातल्याला सर्जा शिवबा दिसला ... देवीवानी जिजामाय दिसली....जावळीच्या बारामुर्ह तर्फेत गनिमानं छाताड फोडल्याला बा काळोजी दिसाला... डोक्यावन पदर घेतलेली पार्वतीमाय दिसली.... बाशिंग बांधल्याला हळदीतला रायबा दिसले..गडावलीतली देवी काळूमाय तरळून गेली ....समदं गरागरा फिराय लागलं....
अन कवातरी पगार झालं...



क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...