⚔️🚩 सुभेदार ताण्या - भाग ४ 🚩⚔️

✒️प्रसाद कुलकर्णी
तान्या पडला....! सुभेदार पडला....!
माज्या पायाखालची भुईच सरकली... रात अजूनच काळी ठिकार वाटाय लागली.... अंगातलं वारंच गळपाटलं ....थंडीनं हाताला कापरं भरलं ... समशेर अजूनच जड झाल्यागत वाटाय लागली....
माजा जोडीदार गेला....
रायबाचा बाप गेला....
गइयांचा मुखत्यार गेला...
जिजामाय चा ताना पडला...
सर्जा शिवाचा जिवलग पडला....
सोराज्याचा सुभेदार पडला......
भोवतालचा गलका लैच वाढाय लागला....
आता पातूर मावळ्यांनी गडावरची निम्मी शिबंदी कापून काढली होती राहुल्या पळून गेलती.... न्हायतर लपून
बसली होती
सूर्याजी समद्याना सामोरं गेला... दात ओठ खाऊन खेकासला.....
पन झालं इपरितच .....सुभेदार पडला अन पटतच नव्हतं.. समदी कल्याण दरवाज्याकड ऊतारावनं धावाय लागली...तिकडं आदीच पळून गेलेला.. गनीम आता उलटून चालून आला ...मावळ परत मावाळतीच्या कड्याकडं चढावर धावाय लागली..... गलका उठला आमचं गडी सैरावैरा धावाय लागलं...सुभेदार पडला हये
"आरं मूडद्याहो तुमचा बाप तिकडे मरून पडला अन तुम्ही बुडाला पाय लावून पळता व्हय र..सुक्काळीच्यानो..म्या समदे दोर कापून टाकल्यात....आता लढा नायतर मर.
तवर तिकड शेलार मामानं समशेर घीउन उदेभानावर तडाखं द्यायला सुरुवात केलती....म्हाताऱ्याची उमेद बगून आमी पूना जोशानं गनीम फाडाय सुरवात केली...गनीम पुन्यांदा तोबा तोबा करीत दरवाज्याकडं धावाय लागला.....
शेलार मामानं दाब-दुब घेत उदेभानावर काढणी काढली उदेभानाच्या खांदयाव वरमी घाव बसला त्यो भेलकांडला तलवार गळून पडली.....रक्तानं न्हालेल्या उदेभान्याच्या डोळ्यात आता मौत दिसत हुती.....त्यो आता भयसाटून आरडाय लागला...... पडल्याली समशेर घीउन पळाय लागला...... मामानं सोता भवती गिरकी घेत घुंगुरमाळ घातली... घुंगुरमाळा समशेर डोक्यावनं सप्पय गोलात फिरली....डोळ्याचं पातं लवस्तवर ...चौकावर येका दोरीत घेतलेल्या काढणीला.उदेभानाचे कमरेत चिलखताखालून वरपर्यंत भोकसलेल्या समशेरीनं... थेट हुरद्याचाच ठाव घेतला ... उपसलेल्या समशेरीबरुबर रक्ताचं फव्वारं उडालं...
रक्ताच्या गुळण्या टाकत.उदेभान भुईवर उताणा पडला......म्हाताऱ्या शेलारमामानं उदेभानाच्या छातीव चढून त्येच्या नरडीचा घोट घेतला..उदेभानाचे नरडं फोडून.... रक्तानं भरल्यालं थोबाड घीउन.... मामा शड्डू ठोकीत आरोळ्या ठोकीत होता..आमी मावळ्यांनी हारार महादेव चा गलका उडवून दिला.....
उगवतीकई बारीक फटफटाय लागलं हुत...
मावळ्यांनी भरारा गंजीचा ढीग लावला अन पेटवून दिला.....राजगडाला इशारत झाली ...गड फत्ते झाल्याची....
पाच सहाशे गनीम कापून काढला ....उदेभानाच्या नरडीचा घोट घेतला....
आमची धा बारा पोरं चढाईला पडली....तर पाच पन्नास पोरं गनीमानं मारली...
अन आमचा शिवा सारखा हजारबाराशे मावळ्याचा मुखत्यार सुभेदार गारद झालता...
सुभेदाराला डोली करून राजगडाव न्हेला.... जिजामाय च्या डोळ्याला धार लागली......
सदरंतुन धावत आल्याला सर्जा शिवबा ....आमच्या खांद्याव डोली बगून गुडघ्यातनं वारं गेल्यागत भुईवरच
कोसळला....
डोली.. रक्तानं भरल्यालं, ..हात्बा तुटल्यालं.. त्याचं कलेवर बगून सर्जानं लेकरागत हंबरडा फोडला.....
सर्जाला धाय मोकलून...रडताना बघून,..आमा मावळ्यांनी..हर्दं फाटल्यावनी गलबलून आलं.....
सर्जानं गळ्यातली कवड्याची माळ तान्याला चढवली....लवून मुजरा घातला.....
अन जिजामायला म्हनला
"आऊ साहेब.गड आला पण....माझा सिंह गेला....माझा सिंह गेला..."
..समाप्त,
==========================================================================================
शब्दार्थ
१. कवळा: गनिमाला काखेत गतप्राण होईपर्यंत आवळून धरणे.
२. भालाईत: भाले चालवणारे.
३. ढालाईत: ढाल तलवार चालवणारे.
४. पटाईत: दांडपट्टा चालवणारे.
५. नाळ तलवारीवर कोरलेल्या वक्राकार रेषा..... या तलवार चालवणान्याच्या हातावर गनिमाचे रक्त येउन तलवार निसटू नये म्हणून केलेल्या विशिष्ठ रचना असतात
६. परज: तलवारीची मूठ
६. मुसकळ: तलवारीच्या मुठीवरचे आवरण.
७. गांज्या: तलवारीच्या मुठीपासून खाली असलेला वक्राकार भाग.
८. घण्टीतला: मर्जीतला.
९. आवताण: आमत्रण,
१० सर्जा राजा किंवा सिंह... राज्यभिषेकाच्या पूर्वी शिवाजीचा उल्लेख सर्जा असा आढळून येतो.
११. भोरप्याचा डोंगरः प्रतापगडाचा डोंगर.
१२. धोपः तलवारीचा एक प्रकार,
१३.इशारत: इशारा.
१४. मैंदाळ खूप.
१५. कालवादुन घेणे; अंधारात लपुन बसणे,
१६. शिबंदी: सैन्य.
१७. घुगुरमाळ युद्ध कलेतील एक डाव यात मावळा डोक्यावर समशेर अथवा दांडपट्टा स्वतःभोवती फिरवीत (घरंगळत) गनिमावर चालून जातो.
१८. दाब दुब: हे दोन डावांचे मिश्रण आहे दाब म्हणजे मावळा स्वतःच्या समोर वेगाने समशेर किंवा दांडपट्टा फुली म्हणजे इंग्रजीच्या "X" याआकारात फिरवतो...याने गनीमावर दाब देऊन त्याला मागे रेटण्यास मदत होते. दुब म्हणजे मावळा गिरकी घेत स्वतःच्या पाठीमागे वेगाने समशेर किंवा दांडपट्टा फुली म्हणजे इंग्रजीच्या
"X" याआकारात फिरवतो....याने गनिमाने पाठीवर हल्ला केल्यास संरक्षण मिळते.
१९. काढणी: दाब दुब घेतल्यावर मागे हटलेल्या गनिमावर गिरकी घेऊन केलेला प्राणघातक वार म्हणजे काढण..
काठणी चौकावर अथवा गोलावर घेतली जाते...
२०. चौक आणि गोल हे युदधकलेतील दोन वेगवेगळे प्रकार आहेत...आजही दांडपट्टा चौकावर म्हणजे चार कोपऱ्यावर चार काढण्या आणि गोलावर म्हणजे वर्तुळात अशा दोन प्रकारे खेळला जातो.
२१. बारामह तर्फ जावळीच्या खोन्यात असलेल्या तर्फे पैकी एक...याच ठिकाणी आदिलशाही फौजकडून लढताना लानाजीचे वडील काळोजी यांचा मृत्यू झाला. नंतर मामा शेलार यांनी तानाजी आणि सूर्याजी यांना त्यांच्या आईसह म्हणजे पार्वतीसह, साताऱ्यातील गडवली या त्यांच्या मूळ गावातून उमरठयाला नेले.
✒️प्रसाद बालकृष्ण कुलकर्णी
9850226990
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा