फॉलोअर

सोमवार, ५ जून, २०२३

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ९०

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव



भाग ९०
सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप - राजकीय संघर्ष
पोस्तसांभार :: मिसळपाव
भाग
नाणेघाटाबरोबरच इतरही अनेक घाटवाटा व त्यांचे संरक्षक दुर्ग मुख्य सह्यधार व त्यांच्या उपत्यकेत निर्माण केले गेले. बौद्ध धर्माला उदार राजाश्रय दिला गेला. ग्रीक, रोमन लोकांबरोबर व्यापाराला सुरुवात झाली. रोम, इस्तंबूल, अलेक्झांड्रिया आदी शहरांमधून येणार्या मणी, सोने, चांदी, रत्ने, प्रवाळ, नक्षीदार भांडी, उंची मद्यपेये इ. वस्तू समुद्रमार्गे चेऊल (चौल), कलियान (कल्याण), श्रीस्थानक (ठाणे), शूर्पारक (नालासोपारा) इ. बंदरात येऊन पडू लागल्या. सार्थवाह बैलांच्या तांड्यावर त्या वस्तू लादून खोदीव घाटमार्ग पार करू लागले व पैठण, तेर, नाशिक, ब्रह्मपुरी आदी शहरांत येऊ लागले व तिथे त्या वस्तू देऊन तलम रेशमी वस्त्रे, मसाल्याचे पदार्थ, कापूस, हस्तीदंती वस्तू, लोणी, तूप, मध, चंदन आदी माल परत समुद्रापार नेऊ लागले. हळूहळू व्यापाराची भरभराट होऊन सातवाहन साम्राज्य समृद्ध होत गेले. राज्य विस्तार पावू लागले. पैठण ही सातवाहनांची राजधानी. तिची किर्ती दूर दूर पसरू लागली व याच व्यापारावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी सातवाहनांच्या समृद्ध राज्यात क्षत्रपांचा प्रवेश झाला.
क्षत्रप म्हणजे प्रांताधिपती. क्षत्रप मूळचा संस्कृत शब्द नाही तो पर्शियन भाषेतील शब्द क्षत्रपन यांपासून बनलेला आहे. क्षत्र म्हणजे राष्ट्र. राष्ट्राचा कारभार पाहणारे ते क्षत्रपन. मध्यपूर्वेतून शकांच्या रानटी टोळ्यांची वरचेवर आक्रमणे होऊ लागली. शक मूळात वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये विभागलेले असल्याने शकांना स्वतंत्र असे नेतृत्व नव्हते. प्रत्येक टोळीचा एक प्रमुख असे.
सन ७८ मध्ये कुशाणवंशीय कनिष्काची राजवट सुरु झाली. त्याने लवकरच बहुतेक उत्तर भारत आक्रमून दक्षिणेकडे आपला मोर्चा वळवला. संस्कृतीविहीन, धर्मविहीन, रानटी अशा ह्या शकांना कुशाणवंशीयांनी आपलेसे केले. प्रथम कनिष्काने कच्छ जिंकून तेथे त्याने कार्दमक वंशीय 'चष्टन' याची आपला क्षत्रप म्हणून नेमणूक केली. पुढे कनिष्काने महाराष्ट्राच्या उत्तर भागात 'भूमक' हा क्षहरात वंशी दुसरा क्षत्रप नेमला. क्षहरात हा सुद्धा पर्शियन शब्द असून क्षहर म्हणजे नगर व राद् म्हणजे अधिपती. अर्थात नगराधिपती. भूमकाने गुजरात, काठेवाडाचा काही भाग, माळवा या प्रांतांवर आक्रमण करून त्यांचा ताबा मिळवला. त्याने महाराष्ट्राचा किती प्रदेश जिंकला होता याचे उल्लेख मात्र सापडत नाही. कनिष्काच्या मृत्युनंतर कुशाण राजवट कमजोर होऊन शकांनी स्वतंत्र राज्ये स्थापन केली व ते स्वतःस स्वामी, राजा, महाक्षत्रप अशा विशेषणांनी गौरवू लागले. क्षत्रपांची अनेक घराणी भारताच्या निरनिराळ्या प्रांतात लहान लहान राज्ये चालवू लागली. मथुरा, पंजाब, तक्षशीला यांवर अंमल करणार्या क्षत्रपांस 'उत्तरी क्षत्रप' तर माळवा, गुजरात, उज्जैन, उत्तर महाराष्ट्र यांवर अंमल करणार्यांस पश्चिमी क्षत्रप म्हणत असत. भूमकाच्या नंतरच्या पिढीतील नहपान क्षत्रपाने सातवाहनांची बरीचशी राज्यलक्ष्मी हरण करून जुन्नर, नाशिक, कोकण, विदर्भ आदी विस्तृत प्रदेश बळकावत सातवाहनांना पार प्रतिष्ठान (पैठण) पर्यंत ढकलले. स्वतः नहपानाने जुन्नर ही राजधानी केली असावी असे काही पुरातत्वीय पुराव्यांनुसार मानले जाते. नहपानाचा जावई उषवदात (ऋषभदत्त) याने आपल्या अनेक धर्मकृत्यांचा व दानांचा उल्लेख नाशिकच्या शिलालेखाद्वारे करून ठेवला आहे. यावरून त्याच्या आणि त्याचा सासरा नहपान यांच्या राज्यविस्ताराची, त्यांच्या साधनसंपत्तीची पुरेशी कल्पना येते. हे शक मूळचे रानटी जरी असले तरी इथली संस्कृती त्यांनी आपलीशी केली होती. बौद्धांना उदार राजाश्रय देऊन ब्राह्मणांनाही विपुल दानधर्म केला होता. नाशिकच्या शिलालेखात नहपानाचा उल्लेख 'क्षत्रप' असा आलेला असून कारकिर्दीचे वर्ष शके ४४ आहे तर जुन्नरजवळच्या मानमोडी लेणीतील शिलालेखात नहपानाचा अमात्य आयम नहपानाचा उल्लेख 'महाक्षत्रप' असा करतो व त्यात शके ४६ असा कालउल्लेख आहे. म्हणजेच केवळ दोनच वर्षात नहपान क्षत्रप पदावरून महाक्षत्रपपदाला पोहोचला पण दुर्दैवाने हेच त्याच्या कारकिर्दीचे आणि वंशाचेही शेवटचेच वर्ष ठरले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...