संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव
नाणेघाट (Naneghat)---------------------१
पोस्तसांभार :: श्रीकांत गणवीर
महाराष्ट्रातील एक प्राचीन पुरातत्त्वीय अवशेषांचे स्थळ. ते पुणे व ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर जुन्नर तालुक्यात जुन्नरच्या वायव्येस सुमारे २८ किमी.वर वसलेले आहे. हा घाट सुमारे ५ किमी. लांब व ८६० मी. उंच आहे. प्राचीन काळी पश्चिम आशियातून येणारा व्यापारी माल मुंबईच्या उत्तरेस असलेल्या भडोच (भरुकच्छ), सोपारा (शूर्पारक), तसेच दक्षिणेकडील कल्याण व चेऊल (चौल) या बंदरांत येत असे. या बंदरांपैकी सोपारा येथे येणाऱ्या व्यापारी मालाची वाहतूक विशेषकरून नाणेघाट खिंडीमार्गे देशावर होत असे, तसेच यात्रेकरू देशावरून कोकणात ये-जा करीत असत. सोपारा व कल्याण येथून देशावर येण्यास नाणेघाट हा अगदी जवळचा मार्ग होता. नाणेघाटापासून पुढे हा मार्ग देशावर जुन्नर-नगर-नेवासा-पैठण असा जातो. त्यामुळे नाणेघाट कोकण व देश यांस जोडणारा दुवा आहे. घाटमाथ्यावर पठार असून तेथे एक भव्य कोरीव दगडी रांजण आहे. या रांजणात पूर्वी जकातीची रक्कम जमा केली जात असल्याची शक्यता वर्तविली जाते. नाणेघाटाचे भू-राजकीय स्थान आणि त्याचा शेजारील जुन्नर या प्राचीन स्थानाशी असलेला निकटचा संबंध बघता, प्राचीन काळातील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून जुन्नरचे अस्तित्व दिसून येते.
नाणेघाट
नाणेघाट येथे, खिंडमार्गात, मुख्य लेण्यात सातवाहन वंशातील राजांचे व त्यांच्या नातेवाइकांच्या भग्न झालेल्या प्रतिमांचे अवशेष असून त्या प्रतिमांच्या वरील बाजूंस त्यांची नावे कोरलेली आहेत. येथील सातवाहन राणी नागनिका हिने केलेल्या वैदिक यज्ञांचा व दानांचा प्रदीर्घ शिलालेख दोन भिंतींवर कोरला आहे. त्यातील बरीचशी अक्षरे नष्ट झाली असली, तरी त्यातील अवशिष्ट मजकुरावरून तत्कालीन सामाजिक, आर्थिक, धार्मिक व राजकीय परिस्थितीवर बराच प्रकाश पडतो. येथील मुख्य लेण्याच्या मंडपात दोन बाजूंस बाके कोरलेली असून मंडपाच्या डाव्या आणि उजव्या भिंतीवर शिलालेख कोरलेला आहे. मागील भिंतीत सातवाहन राजवंशातील सात व्यक्तींच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत त्या अशा : सिमुक सातवाहन, देवी नागनिका, श्रीसातकर्णी, कुमार भाय, महारठी त्रनकयिर, कुमार हकुश्री आणि कुमार सातवाहन. यांपैकी एका जोडपुतळ्याच्या वरच्या बाजूस देवी नागनिका आणि श्रीसातकर्णी असा लेख आहे. त्यावरून ती सातकर्णीची राणी असावी, तसेच महारठी त्रनकयिर हा नागनिकेचा पिता असावा, असे वा. वि. मिराशी म्हणतात. तर शेवटचे दोन अनुक्रमे कुमार हकुश्री आणि कुमार सातवाहन हे सातकर्णी व नागनिकाचे लहान पुत्र होते आणि हे लेणे सातवाहन राजवंशाचे प्रतिमागृह असावे, असे पुरातत्त्ववेत्त्यांचे मत आहे.
नाणेघाट येथील एक शिलालेख.
नाणेघाट लेण्यात कोरलेला नागनिकेचा वर उल्लेखिलेला शिलालेख ब्राह्मी लिपीत असून प्राकृत भाषेत आहे. शिलालेखाच्या अक्षरवटिकेवरून या शिलालेखाचा काळ योहान ब्यूलर, मिराशी यांसारख्या पुराभिलेखविद्यावंतांच्या मते साधारणतः इ.स.पू. दुसरे-पहिले शतक असावा. सध्या अस्तित्वात असलेला शिलालेख वीस ओळींचा असून डाव्या भिंतीवर शिलालेखाच्या दहा ओळी कोरल्या असून उर्वरित दहा ओळी उजव्या भिंतीवर कोरल्या आहेत. डब्ल्यू. एच. साईक्स याने ह्या शिलालेखाचा सर्वप्रथम उल्लेख १८३७ च्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकामध्ये केला. पुढे जेम्स प्रिन्सेप, रेव्हरंड जॉन स्टीव्हन्सन, भगवानलाल इंद्रजी, ब्यूलर, मिराशी, अजयमित्र शास्त्री, शोभना गोखले प्रभृतींनी या शिलालेखाचे वाचन करून अन्वयार्थ लावले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा