संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव
सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप - राजकीय संघर्ष
पोस्तसांभार :: मिसळपाव
पुळुवामीनंतर गौतमीपुत्र श्रीयज्ञसातकर्णी हा गादीवर आला. हा सुद्धा स्वतःच्या नावापुढे गौतमीपुत्र असे बिरुद लावत असे. हा शेवटचा महाप्रतापी सातवाहन सम्राट. याने अपरान्ताचा गमावलेला प्रदेश पुन्हा एकदा रूद्रदामनाच्या वंशजांकडून जिंकून घेतला व सातवाहन राज्ये पुन्हा एकदा कळसास पोचवले. ह्याने सत्तावीस वर्षे राज्य केले व आपली सत्ता पश्चिमसमुद्रापासून पूर्वसागरापासून प्रस्थापित केली. विदिशा व काठेवाडापर्यंतही त्याचा अंमल असावा असे काही तेथे सापडलेल्या यज्ञ सातकर्णीच्या नाण्यांवरून दिसते. पुळुवामी आणि यज्ञसातकर्णीने शिडाच्या जहाजांची मुद्रा असलेली नाणी पाडली होती यावरून त्यांचे समुद्रावरचे प्रभुत्त्व सिद्ध होते.
वासिष्ठिपुत्र सातकर्णीचे शिडाच्या जहाजाची मुद्रा असलेले नाणे
श्री यज्ञ सातकर्णीनंतर मात्र सातवाहनांच्या साम्राज्याच्या र्हासाला प्रारंभ झाला. सातवाहनांची सामंत घराणी प्रबळ होत जाऊन त्यांनी पैठणची सातवाहनांची केंद्रिय सत्ता झुगारून दिली. व्यापारही बंद पडू लागल्याने सातवाहन साम्राज्य कमजोर होत गेले. उत्तरेत इशवदात (ईश्वरदत्त) महाक्षत्रपाने शके १५१ (सन. २२९) मध्ये पश्चिम महाराष्ट्रात सातवाहनांचा पाडाव करून सत्ता बळकावली. ह्या ईश्वरदत्ताने सुमारे २० वर्षे राज्य केले असावे. इस. २५० मध्ये पुन्हा एकदा राज्यक्रांती होऊन आभीरवंशीय ईश्वरसेनाने क्षत्रपांचा पराजय करून उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात आपले राज्य स्थापन केले. याच्या आधीच इस. २३० मध्ये विदर्भातही सातवाहनांची सत्ता संपुष्टात येऊन मुंडवशीयांनी आपले राज्य स्थापन केले व सातवाहन पूर्णतः दक्षिणेत (आंध्रात) ढकलेले गेले व दक्षिणेतही थोडक्याच कालावधीत त्यांचा इक्ष्वाकूवंशी शतमूलाने पाडाव केला व सातवाहन सत्ता पूर्णपणे लयास गेली.
गुजरात, काठेवाड, माळवा ह्या पश्चिमेकडच्या प्रदेशात मात्र पश्चिमी क्षत्रपांचा अंमल गुप्तांच्या राजवटीपर्यंत चालू राहिला. समुद्रगुप्ताने विदिशेपर्यंत गुप्त साम्राज्य स्थापन केले व त्याच्या पुढे चंद्रगुप्ताने वाकाटक नृपतीची मदत घेऊन तृतीय रूद्रसिंह क्षत्रप याचे राज्य अनुमाने सन ३९५ मध्ये संपूर्णतः खालसा केले व क्षत्रपांच्या भरुकच्छ (भडोच) या राजधानीवर कब्जा केला व अशा तर्हेने जवळजवळ संपूर्ण उत्तर भारत आपल्या साम्राज्यात आणला व तत्पुर्वी खाली दक्षिणेत सातवाहनांची राजवट संपूर्ण नष्ट होऊन लहान लहान प्रांतिक राज्ये निर्माण होऊन दक्षिण भारताचा चेहरामोहरा बदलला.
अशा तर्हेने एक वैभवशाली राज्य समाप्त झाले. सातवाहनांनी विस्तृत प्रदेशात केवळ दिर्घकाळ राज्य केले इतकेच नव्हे तर स्थापत्य, कला, साहित्य, संस्कृती, शिल्प, चित्रकला यातही संस्मरणीय अशी प्रगती केली. व्यापारास उत्तेजन देऊन जनतेस सुखी, समृद्ध केले आणि परकियांशी प्राणपणाने लढून आपले गमावलेले राज्य परत मिळविले व मातृभूमीस स्वतंत्र केले. याकाळात सातवाहनांची सतत क्षत्रपांबरोबर लहानमोठी युद्धे होत राहिली. प्रदेश मिळवावे लागले, गमवावे लागले. इ.स.पू. २३० ते इ.स. २३० ह्या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी महाराष्ट्र देशी तसेच आंध्रातही सत्ता टिकवून धरली व महाराष्ट्राचे पहिले स्वतंत्र ज्ञात राज्यकर्ते झाले. ह्या सातवाहनांनीच सह्याद्रीत बांधलेल्या बहुतांश किल्ल्यांचा वापर गुप्तांनी,चालुक्यांनी, राष्ट्रकूटांनी, शिलाहारांनी व नंतर यादवांनी केला तसेच अधिक किल्ले बनवून भरही घातली. यादवसत्तेच्या पाडावानंतर इस्लामी राज्यकर्त्यांनी मात्र हे किल्ले, येथील प्रदेश आपल्या साम्राज्यात आणिला पण पुढे ह्याच सह्याद्रीच्या एका सातवाहननिर्मीत शिवनेरी नामक दुर्गावर छ्त्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला व पुढे ह्याच किल्ल्यांच्या सहाय्याने तसेच नवे किल्ले उभारून महाराष्ट्राला पुन्हा स्वराज्याचे दिवस दाखवले. असे सातवाहनांचे मोठे ऋण इये देशी आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा