फॉलोअर

सोमवार, ५ जून, २०२३

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ८३

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव


भाग ८३
नाणेघाट (Naneghat)---------------------२
पोस्तसांभार :: श्रीकांत गणवीर
अंगियकुलवर्धन वंशातील त्रनकयिरनामक महारठीची कन्या नागनिका ही सातवाहन राजा पहिला सातकर्णी याची पत्नी आणि वेदिश्री राजाची व श्रीमान सती (शक्ती) याची माता होती. पतीच्या निधनानंतर नागनिकेने सातवाहन साम्राज्याची धुरा वाहिली. सम्राज्ञी नागनिकेला ज्या विशेषणांनी संबोधित केले आहे, त्यावरून राणी वैराग्यपूर्ण जीवन जगत होती, हे सिद्ध होते. या लेखाच्या प्रारंभी प्रजापती, धर्म, इंद्र, संकर्षण, वासुदेव, चंद्र, सूर्य, कुमार आणि चार दिक्पाल–यम, वरुण, कुबेर, इंद्र–यांना अभिवादन केले आहे. या शिलालेखात नागनिकेने सातकर्णी राजाबरोबर केलेल्या अनेक श्रौत यज्ञांचा –उदा., दोन अश्वमेध व एक राजसूय तसेच अग्न्याधेय, अनारंभणीय, गवामयन, भगलदशरात्र, आप्तोर्याम, अंगिरसामयन, गर्गत्रिरात्र, अंगिरसात्रिरात्र, शतात्रिरात्र इत्यादिकांचा– निर्देश आहे. या अनेक यज्ञांच्या उल्लेखावरून तत्कालीन धार्मिक स्थितीत यज्ञसंस्थेचे महत्त्व दिसून येते. या सर्व यज्ञांच्या नामनिर्देशाबरोबरच लेखात ब्राह्मणांना दिलेल्या हजारो गाई, हत्ती, घोडे, रथ, कार्षापण नाणी, सोन्या-चांदीचे अलंकार इत्यादिकांचे उल्लेख आहेत. त्यावरून तत्कालीन आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीवर प्रकाश पडतो. तसेच या शिलालेखात कार्षापण आणि प्रसर्पक या नाण्यांचा असलेला उल्लेख प्राचीन नाणकशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. याव्यतिरिक्त या शिलालेखात आकड्यांचा विपुल प्रमाणात केलेला उल्लेख बघता प्राचीन संख्याशास्त्राच्या प्रगत अवस्थेची कल्पना येते. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या जनतेला सातवाहन सम्राज्ञीने केलेल्या धार्मिक कार्याची व सातवाहनांच्या समृद्धीची ओळख व्हावी, असा हा शिलालेख कोरण्याचा उद्देश असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. प्राचीन ऐतिहासिक कालखंडात, या परिसरात मार्गानुक्रमण करणाऱ्या परकीय तसेच भारताच्या विविध प्रदेशांतील व्यापारी, सार्थवाह, यात्रेकरू या सर्वांवर सातवाहन राजवंशाची महानता ठसविण्यात या शिलालेखाने निश्चितच अनन्यसाधारण भूमिका बजावली.
नाणेघाटापासून सुमारे २८ किमी. अंतरावर असलेल्या जुन्नर या गावी प्रसिद्ध नाणकशास्त्रज्ञ पी. जे. चिन्मुळगुंद यांना इ. स. १९७६ मध्ये सातकर्णी आणि नागनिका यांचे चांदीचे संयुक्त नाणे एका शेतकऱ्याकडून मिळाले. त्यावर ब्राह्मी लिपीत नायनिका (नागनिका) व सिरी सातकनी (श्रीसातकर्णी) असा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे नाणेघाटापासून कोकणाकडे जाणाऱ्या मार्गावर, काही अंतरावर असलेल्या एका पाण्याच्या टाक्यावर असलेला सातवाहन राजा वासिष्ठिपुत्र स्कंद सातकर्णीचा शिलालेख भगवानलाल इंद्रजी यांनी प्रकाशित केला आहे. या दोन्ही बाबींचा उल्लेख नाणेघाटाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण आहे.
नाणेघाटातील राणी नागनिकेचा शिलालेख आणि सातवाहन राजवंशाचे प्रतिमागृह यांना प्राचीन इतिहासाचे एक विश्वसनीय साधन म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने नाणेघाटाला ‘राष्ट्रीय महत्त्वाचे स्थळ’ म्हणून घोषित केले आहे.
संदर्भ :
Shastri, Ajay Mitra, The Satavahanas and The Western Kshatrapas : A Historical Framework, Nagpur, 1998.
महाराष्ट्र राज्य गॅझिटिअर : इतिहास प्राचीन काळ , खंड १, मुंबई, २००३.
मिराशी, वा. वि. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख, मुंबई, १९७९.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...