फॉलोअर

सोमवार, ५ जून, २०२३

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ९१

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव


भाग ९१
सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप - राजकीय संघर्ष
पोस्तसांभार :: मिसळपाव
भाग
शक क्षत्रपांच्या सततच्या हल्ल्यांनी जेरीस आल्यामुळे सातवाहनांची राज्यव्यवस्था खिळखिळी होऊन गेली. सह्याद्रीतील घाटमार्ग क्षत्रपांच्या ताब्यात गेल्यामुळे सातवाहनांकडे येणार्या संपत्तीचा ओघ खुंटला गेला. तत्कालिन सातवाहन नृपती शिवस्वातीच्या काळात सातवाहन राज्य गलितगात्र होऊन गेले. त्याच्या अमलाखाली फक्त दक्षिण महाराष्ट्राचा भूभाग राहिला होता असे दिसते. अशातच शिवस्वाती सातकर्णी याची पत्नी गौतमी बलश्री हिच्या पोटी एका पराक्रमी पुत्राचा जन्म झाला तोच गौतमीपुत्र सातकर्णी.
गौतमीपुत्र सातकर्णी अतिशय कुशल, धोरणी आणि महाप्रतापी होता. त्याने आपल्या कारकिर्दीच्या पंधरा सोळा वर्षात हळूहळू आपले सामर्थ्य वाढवत नेऊन परकी आक्रमकांच्या दास्यातून आपले साम्राज्य मुक्त करण्याचा निश्चय केला. सर्वप्रथम त्याने विदर्भावर स्वारी करून वेण्णा(वैनगंगा) नदीच्या काठावर असलेल्या पौनी (कुशावती) ह्या नगरीच्या क्षत्रपांचा उच्छेद केला व स्वतःला 'बेणाकटकस्वामी' म्हणून घोषित केले. नंतर त्याने पश्चिमेकडच्या प्रदेशात चाल करून नहपानाने बळकावलेल्या प्रदेशावर आक्रमण केले. त्याची आणि नहपानाची घनघोर लढाई नाशिकजवळच्या गोवर्धन पर्वताजवळ झाली. हा गोवर्धन पर्वत नेमका कुठला ते आता समजत नाही पण हा बहुधा त्र्यंबकेश्वरनजीकचा डोंगरी प्रदेश असावा. तीत नहपानाचा संपूर्ण पराभव होऊन तो सह्याद्रीच्या पर्वतरांगामधे आश्रयार्थ पळून गेला. या विजयानंतर गौतमीपुत्राने लागलीच नाशिकच्या लेण्यांस भेट देऊन तेथील बौद्ध भिक्षुसंघास 'अजकालकीय' नावाचे शेत निर्वाहासाठी दान केले व तसा उल्लेख तेथील शिलालेखामध्ये केला. याच लेखात गौतमीपुत्र स्वत:ला बेणाकटकस्वामी म्हणवतो. नाशिकचे युद्ध गौतमीपुत्राच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी झाले होते. गौतमीपुत्राच्या राज्यारंभाचे वर्ष निश्चितपणे माहीत नाही पण नहपानाच्या कारकिर्दीचे शेवटचे वर्ष शके ४६ आहे. त्यानुसार इस. १२५ मध्ये ही घटना घडली असावी.
नाशिक येथील विजयानंतर गौतमीपुत्राने सह्याद्रीमध्ये नहपानाचा पाठलाग करून त्याचा समूळ वंशविच्छेद केला व लागलीच कार्ले येथील लेणीला भेट देऊन तिथल्या बौद्ध संघाला निर्वाहासाठी करजक नावाचे गाव दान देऊन तसा शिलालेख तिथल्या भिंतीवर कोरविला. दोन्ही शिलालेखांतील वर्णनानुसार ह्या दोन युद्धात सुमारे पंधरा दिवसांचे अंतर होते असे दिसते. गौतमीपुत्राच्या कार्ले शिलालेखावरून नहपानाचा विच्छेद मावळप्रांती झाला असावा असे मानण्यास पुरेसा वाव आहे. या युद्धात फार मोठी कत्तल झाली. गौतमीपुत्राने नहपानाची सर्व नाणी जप्त करून त्यावर पुन्हा आपली मुद्रा उमटवून ती नाणी परत वापरात आणली. अशी जवळजवळ तेरा हजार नाणी सापडली आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...