🏰🚩हिरकणी भाग २🚩🏰
आई झाल्यावर मी एका रात्रीत प्रौढ झाल्यासारखी वागत होते. आमच्या चंद्रमौळी संसाराला आपलाहि थोडा हातभार असावा असं मला वाटलं. आणि कान्होबा झाल्यावर तीन महिने घरात काढून गावातीलच तीन चार बायां बरोबर घरचं दुध विकण्यासाठी म्हणून गडावर येत होते.
गडाची वाट अत्यंत चढणीची व सरळ अंगावर येणारी. जसं जसं वर जाऊ तसं तसं वारा अगदी थैमान घातल्यासारखा वहात असे. पावसाळ्यात तर गडाची शिखरं
घालून पाहिल्यावर थेट ढगात बुडालेली दिसत. जणु कैलास पर्वत.....
हो माझ्यासाठी .... माझ्यासाठीच का आमच्या सगळ्यांसाठी तो कैलास पर्वत होता. त्या पर्वतावर कैलासा एवढ्याच मोठ्या मनाचा आमचा महादेवा सारखा राजा त्याच्या कार्तीक आणि गणपती सारख्या देखण्या असलेल्या दोन पुत्रांबरोबर वास करत होता. मी गडावर जेव्हा जेव्हा जायचे तेव्हा तेव्हा त्या मोठ्या राजवाड्याकडे तोंड करुन कुणी बघत नाही ना हे पाहून हळूच नमस्कार घालायचे. किती प्रचंड मोठा तो राजवाडा आणि काय त्याचे ते वैभव. मी ते सगळं बाहेरुनच बघितलं होतं म्हणा पण एक दिवस तरी मला त्या राजवाड्यात जाऊन तिथे निवास करणाऱ्या माझ्या बिरोबाचे डोळा भरून दर्शन घ्यायचे होते.
डोक्यावर दुधाची मडकी घेऊन लंगडत लंगडतच मी माझ्या सोबतीच्या बायांबरोबर गडाच्या दरवाजा पर्यंत पोहचले. गडावर आज बरीच लगबग दिसत होती. काही कार्यक्रम असेल म्हणून आज एवढी गर्दी असावी. हे दृष्य आम्हाला नवीन नव्हते.
रोजच्या येण्याजाण्यामुळे जवळपास सगळे शिपाई आम्हाला ओळखत होते. त्यातले काही जणतर आमच्याच वाडीतले होते. त्यातल्या बऱ्याच जणांना मी दादाच म्हणत असे.
पण त्या सगळ्यांचे प्रमुख नाईक बाबा म्हणजे एकदम वेगळे प्रकरण होते. आपण आणि आपले काम एवढाच त्यांचा खाक्या. डोळ्यात तेल घालुन एकूणएक व्यक्तीचा परवाना व वस्तू तपासल्याशिवाय ते काहीही आत बाहेर सोडत नसत. सगळ्या हालचालींवर त्यांची घारी सारखी नजर फिरत असे. आजही सगळ्यांचे परवाने व सामान तपासून शिपाई एकेकाला आत बाहेर सोडत होते. अखेर आमची पाळी आली म्हणून आम्ही पुढे झालो.
'कुणाची आणि कुठली म्हणायची गं तु ?" एक आवाज आला
मी आवाजाच्या दिशेने पाहिले. एक अनोळखी तरूण पोरगेला शिपाई अगदी बारीक नजर करून मलाच विचारत होता. मी इकडे तिकडे पाहिले तर नाईक बाबा कसल्यातरी लखोट्यांवर शिक्के मारण्यात व्यस्त होते.
" कोण मी...?" उन्हाने लालबुंद झालेल्या चेहऱ्यावर मी पदर ओढला.
" तु नाय तर कोण मी?" तो तरूण शिपाई तंबाखू मळता मळता आणखी बारीक नजर करुन म्हणाला
" मी... हिरा... इथलीच. खालच्या वाडीतली" मी उत्तरले
" ओ दादा, आम्ही सगळ्या रोज इथं धारा घालायला येतो. नाईकांना इचारा"
म्हातारी मध्ये पडली
" मध्ये बोलायचं काम न्हाय म्हातारे. माझं काम लय जोखमीचं. गडावर चुकून जरी एखादा हेर घुसला तर गर्दन जाईल ती माझी. एय हिरे तु जरा एका बाजूला ये. मला जरा तुझ्या सामानाची तपासणी करायची हाय" तो शिपाई करवादुन तडतडला.
मी डोळे त्याच्या नजरेत घालून वर बघितले आणि त्याच्या त्या एकटक बघणाऱ्या नजरेत क्षणार्धात मला पाप दिसले. बाईला या बाबतीत निसर्गाने विशेष इंद्रीयच दिलेले आहे. माझ्याशी सलगी करण्याच्या हेतूनेच तो मला एका बाजूला बोलवत होता ते न कळण्या इतकी मी खुळी नव्हते. मी जागेवरच स्तंभासारखी उभी राहिलेली पाहून तो शिपाई पुढे झाला आणि त्याने थेट माझा हात धरून एका बाजूला ओढले........
साट SSऽऽऽऽऽऽऽ5S त्या कोलाहलात विज कडकडावी तसा आसुडाचा आवाज घुमला. माझा हात धरणाऱ्या त्या शिपायाने वेदनेने एकच किंकाळी फोडली. साट साट असे आणखी चार पाच आवाज घुमले. तो तरूण शिपाई जमिनीवर आडवा पडून मारा पासुन वाचण्यासाठी अंग झाकून घेऊ लागला.
" अरे सुक्काळीच्या , आया बहिणींच्या पदराला हात घालायला हि आदिलशाही का मोगलशाही आहे व्हय रे ? फोद्रीच्या ....अरे रायगड आहे हा रायगड. राजांना यातलं काडी एवढं जरी कळलं ना तर तुझ्या बरोबर मला पण टकमक टोक बघायला लागंल. तु चार दिसातच शिपाईगीरीच्या धुंदीत माजलेल्या वळू सारखा करायला लागला व्हय रे... ( साटSSSऽ साट) रयतेच्या सुतळीच्या तोड्याला सुदीक हात लावायचा नाही असा आदेश आहे आपल्याला. थांब तुझा चौरंगा करतो ?" नाईक बाबा हातात आसुड घेउन एकदम पिसाळलेल्या वाघा प्रमाणे थैमान घालत होते. ते सगळं दृष्य बघून बाकीच्या शिपायांचे पण धाबे दणाणले असावेत. जो तो लगबगीने
"आपापले काम करू लागला.
शेवटी म्हातारी पुढं झाली आणि म्हणाली
" नाईक , जाऊ द्या.... पोरसवदा हाय. चुकला असेल पण त्याला एक डाव माफ करुन टाका. काय गं हिरे... बरोबर ना
व्हय नाईक बाबा.. माझ्या भावासारखाच हाय तो. एकडाव माफ करा त्याला..
हिथून पुढं आपण कुठं आणि कुणाच्या चाकरीत आहोत हे त्याच्या लक्षात आलं असंल. आता पुन्यांदा न्हाय चुकायचा तो" मी पटकन बोलुन गेले.
तो अत्यंत खजील झाला होता कारण आमच्या तोंडून त्याला माफीची अपेक्षा नसावी. त्याने सरळ माझे पाय धरले व चुकीच्या जाणीवेने ओक्साबोक्षी रडू लागला.
ते पाहून नाईक बाबांनी आपला आसुड आवरला. वातावरण निवळले..
आज मी दिंडी दरवाजातून आत शिरल्या शिरल्या पहिल्यांदाच सगळ्यांच्या देखत
"रयतेच्या सुतळीच्या तोड्याची देखिल काळजी वाहणाऱ्या" माझ्या शिव शंकराच्या महालाच्या दिशेने तोंड करून अगदी साष्टांग दंडवत घातला. माझ्या राजाचं भरभक्कम छत्र या भुमीवर आहे तोवर माझ्या सारख्या हजारो बाया बापड्यांना त्यांच्या अब्रुची चिंता करण्याचे किंचित देखिल कारण नव्हते.
क्रमशः
तुषार दामगुडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा