फॉलोअर

सोमवार, ४ मे, २०२०

🏰 हिरकणी भाग १ 🏰🚩

🏰 हिरकणी भाग १ 🏰🚩 " आई गं 'वेदना क्षणात तळव्यातुन मस्तकापर्यंत जाऊन भिडली आणि तोंडातून आपोआप शब्द बाहेर पडले.
मी मटकन पायवाटे वरच खाली बसले. डोक्यावरील मडकं हळूच बाजूला ठेवले नाहीतर त्यातले दुध सांडले असते. पायाचा तळवा वर करुन बघितला .... रक्ताचा टपोरा थेंब जमा झाला होता.
काय झालं गं हिरे ?" म्हातारी मागं वळून बघत म्हणाली
काय न्हाय , काटा मोडला ..." मी उत्तर दिले.
डोक्यावरील मडक्यांची उतरंड सांभाळत म्हातारी माझ्या जवळ आली. माझ्या पायातील वेदनांमुळे डोळ्यात टचकन पाणी आले होते. म्हातारीने डोक्यावरची मडकी खाली उतरवली व माझा पाय हातात घेतला.
" डोळं फुटलं जणू तुझं , वाटं बरचं काटं कुटं दिसंना व्हय तुला ... उलुशी शांत बस जरा आता आणि बघू पाय न्याहार इकडं... म्होरा बशीवला याचा , पार आत पत्तुर गेलाय" म्हातारी माझा पाय निरखत म्हणाली
आत्त्याबाय लय दुखतंय बरं का, तुम्ही काय बी अघोरी उपाय करू नका बरं सांगूनशान ठेवते " मी पटपट बोलायला लागले कारण म्हातारी त्या काट्या बरोबर उलझपड करायला लागली होती. खरंतर रक्त बघूनच मला भोवळ यायला सुरुवात झाली होती.
" आत्ता गं बया, इंद्राची राणीच जणु, हिरे आपल्याला एवढं नाजूक साजुक राहून चालणार हाय का पोरी,
" अगं आई गं " म्हातारीने मला बोलण्यात गुंतवून खसकन काटा ओढून काढल्यामुळे वेदनेचा आगडोंब शरीरात उसळला. रक्ताची धार पायातुन लागली.
माझे डोळे अधूंनी वाहू लागले. मी पदर तोंडात खुपसला आणि हमसुन हमसुन रडायला लागले...
अगं माझी पोर ती... वाईच कळ काढ रडू नगं " असं म्हणत आत्याबाईने टरटर पदर फाडला आणि इकडे तिकडे शोधक नजर टाकली. त्यांना हवं ते दिसल्यावर पटकन धाव घेत त्यांनी त्या झाडाची चार पाच पानं ओरबाडून कुस्करली आणि तो ओलेता पाला हातात घेऊन माझ्या जखमेवर लावला व वरुन त्या चींधीची पट्टी बांधून टाकली.
थोडा वेळ तिथंच बसून म्हातारीने मला धीर दिला. उन्हं वर यायला लागली होती.
मडकी डोक्यावर घेऊन आम्ही दोघींनी गड पुन्हा चढायला सुरुवात केली. तरी माझा पाय वेदनेमुळे थोडा लंगडतच होता.
मी हिरा..... हिरकणी ! माझ्या आई वडीलांना एकुलती एक. पाठीवर ना भाऊ ना बहीण. माझी आई..... आई ! एकुलती एक असल्यामुळे आईने तळहातावरच्या फोडाप्रमाणे मला जपली होती.
कधी शेरडांमागे लावणे नाही कि कधी घरकामाला हात लावु देणे नाही.... आम्ही आर्थिक श्रीमंत नसलो तरी जमेल त्या परीने आईने माझे सगळे हट्ट अगदी लाडाने पुरवले होते. पण एवढ्या लाडामुळे मीही कधी वावदूक वागले नव्हते. अगदी न्हातीधुती झाले तरी आईचा पदर सोडुन कुठे गेली नदत.
पण आमच्या ह्यांनी मला जत्रेत पाहिले काय, मला लग्नासाठी मागणी घातली काय आणि आईने अगदी खोदुन खोदुन नवऱ्या मुलाची सगळी चौकशी करुन लग्नाला परवानगी दिली काय ........ माझी पाठवणी करताना एखादी गाय वासराला चाटून हंबरते तसा आईने काळजीपोटी फोडलेला टाहो माझ्या कानात आजही घुमतो.
बघता बघता लग्नाला दोन वर्षे झाली. माझे धनी म्हणजे तारांगणात चंद्र शोभावा तशा रूबाबदार व्यक्तीमत्वाचे. मराठमोळं सौंदर्य जणु. लग्न झाले तेव्हा आम्ही दोघंही तसे पोरसवदाच होतो. धन्याचे माझ्यावर आणि माझे त्यांच्या वर खूप प्रेम होते...... आमच्या आत्याबाई माझ्या सारख्या अल्लड व अज्ञानी मुलीला कसं सांभाळून घेतात ते मला आश्चर्यच वाटायचं. कारण तेल मीठ किती टाकायचं इथपासून माझ्या स्वयंपाकाची सुरुवात होती. पण एकमेकांना अगदी प्रेमाने सांभाळत आमचा संसार अगदी टुकीने चालला होता.
सहाच महिन्यापुर्वी आमच्या संसाराच्या वेलीवर " कान्होबा" च्या रूपाने एक गोंडस फुल उमलले होते. प्रसुतीच्या त्या जीवघेण्या कळा सोसल्यावर जेव्हा मला शुध्द आली आणि मी पहिल्यांदा कान्होबाला माझ्या ओंजळीत घेतले तेव्हा अतीव वात्सल्याने मला केव्हा पान्हा फुटला ते हि कळले नाही. कान्होबा जेव्हा आपल्या नाजुकश्या लालसर ओठांनी मला लुचू लागला तेव्हा ती अनुभूती शब्दांत वर्णन करुन सांगणे अशक्यप्राय आहे. माझे आईवडील , धनी, आत्याबाई यांच्या वर माझे प्रेम होते , अगदी निरतीशय प्रेम होते. परंतु माझ्याच शरीरात वाढलेला, माझ्या काळजाच्या स्पंदनांवर जगलेला, माझ्या हाडा मांसा पासुन बनलेला कान्होबा माझ्यासाठी काही क्षणांत या सगळ्यापेक्षा अधिक जवळचा व सर्वाधिक प्रिय झालेला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...