🏰 हिरकणी भाग ६ 🏰
येसाजी, एय येसाजी "
"कोण हाय? "
अरं दार उघडतुयस न्हवं...
आं..... नाईक तुम्ही आणि हिकडं? आत या बसा वाईच
" येसाजी आम्ही काय बसाय आलो न्हाय , तुला हाजीर करायला सांगितलंय पेशव्यांनी
" पेशव्यांनी? मला?
तुला आणि तुझ्या कारभारणीला म्होरं घालून आणायला सांगितलं हाय, आता चलतोस का बीगी बीगी "
मी आतून सगळं ऐकत होते. माझं धनी आत आले तेच पडलेल्या चेहऱ्याने . त्यांच्या बरोबर माझ्या मनात देखिल हजारो प्रश्नांचे काहूर उभे राहिले. जी गोष्ट घडेल म्हणून भितीने मन विचार करायचे टाळत होते ते अखेर समोर येऊन उभे राहिले होते.
मी कान्होबाला उचलून पाठिवर झोळीत बांधले. तोवर यांनी डोक्यावर फेटा बांधला आणि आम्ही नाईकांच्या पुढे पुढे चालू लागलो. वाटेने गावातील लोकांचे चेहरे काहीतरी बोलत आहेत आणि त्यातले काही लोक माझ्याकडे बोट करुन कुजबुजत आहेत हे मी डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहिले.
अर्धी चढण संपली असावी. पायाच्या ओल्या जखमेतून रक्त वहायला लागले म्हणुन मी थोडा वेळासाठी खाली बसले.
नाईक आणि त्यांचे शिपाई दुर आहेत हे पाहून मी हळूच यांच्याकडे पाहिले आणि
" धनी हि कशी येळ आली हो आपल्यावर " माझ्या स्वरात चिंता होती.
" हिरे , कळत नकळत तुझ्याकडून चुक घडली हे खरं होय आणि थोरलं धनी म्हणजे कायदाकानुन आणि शब्दांचे पक्के. आपल्याला सजा हुईल. पण आपल्या धन्यासाठी मन मोठं करुन सगळं सोसू. तु तिथं अज्याबात रडून गोंधळ घालायचा नाय म्हणजे काय "
" म्या शिक्षा भोगाया तयार हाय, पण आपल्या कान्होबाला माझ्या पासुन येगळा करू नये. तशी येळ पडलीच तर थोरल्या धन्यांच्या पायावर नाक रगडून माफी मागल म्या. मला काय शिक्षा करायची ती खुशाल करा, कुठल्या कोठडीत टाकायचे तिकडे टाका पण माझा कान्होबा माझ्या जवळ राहू द्या एवढं मागेन
" चल उठ, निघायला हवं, बाकी हिरे... आपण लहान माणसं, तसं बी तिथं आपल्याला इचारणारं कोण हाय ? आता बिरोबाच्या मनात असंल तसं हुईल
अत्यंत निराश मनाने आम्ही दोघं उठलो आणि गड चढायला पुन्हा सुरुवात केली. मागे नाईक अत्यंत बारक्या नजरेने आमच्यावर लक्ष ठेऊन होतेच.
तो प्रचंड मोठा दरवाजा ओलांडुन पुर्ण आयुष्यात मी पहिल्यांदा या राजदरबारात उभी होते. मीच काय माझे धनी देखिल इथे पहिल्यांदाच आले असावेत. अर्थात हे त्यांचा बावरलेला चेहराच सांगत होता.
आत मोठाच दिमाख होता. त्याचं वर्णन करायचे म्हटले तरी मला शब्द सुचणार नाहीत. ऐश्वर्य म्हणजे नेमकं काय असतं हे आमच्या सारख्या गरीबांना आयुष्यात पहिल्यांदाच पहायला मिळत होते. कारण आमचं जगणं पण कुडाच्या झोपडीत आणि मरणं पण कुडाच्या झोपडीत. मी हळू हळू सगळीकडे बघत होते.
सर्व दरबारी आपापल्या हुट्याप्रमाणे उभे किंवा बसलेले होते. माणसांची हि मोठी गर्दी तिथे होती. परंतु तेथील वातावरण मात्र अत्यंत आदबशीर आणि धीरगंभीर होते.
आणि त्या भारावलेल्या वातावरणाचा केंद्रबींदु असलेल्या सुवर्ण सिंहासनाकडे माझी नजर गेली... . हा माझा भास होता का ? नाही, नाही हा भास कसा असेल? मग मी पहात होते ते सत्य होते काय ? हो हिरकणी हे सत्य आहे.
"
मणामणांच्या सुवर्णाने आणि अत्यंत मौल्यवान रत्नांनी घडवलेल्या त्या सिंहासनावर ते" बसलेले होते. हो ..... तेच ! माझे, आमचे सर्वांचे धनी ! " छत्रपती शिवाजी महाराज
आपल्या गणांमध्ये बसलेला प्रत्यक्ष महादेव जणु.
स्वच्छ सुती अंगरखा. पायांत रत्नजड़ित चढाव. डोक्यावर मलमली जिरेटोप. त्या जिरेटोपावर उठुन दिसणारे पाचूंनी मढलेले पदक. गालांवर तोंडभरून शोभेलशी दाढी, आणि त्या रेखीव चेहर्याला शोभतील असे मान्यवर रूळणारे काळेभोर केस.
इतक्या लांबून देखिल वेध घेणारे पाणीदार डोळे आणि त्या विशाल भाळावर रेखाटलेला तो भगवा शिवगंध
हाच तो आमच्यासारख्या अनेक दिनदुबळ्यांचा, बायाबापड्यांची, अनाथांचा आधार असलेला आदिनाथ ......!
स्वतः अनेक संकटांचे हलाहल पचवून आमच्यासारख्या वंचिताना स्वातंत्र्य, न्याय, सुरक्षितता आणि आत्मसन्मान यांचे अमृत पाजणारा निलकंठेश्वर !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा