फॉलोअर

रविवार, १० मे, २०२०

🏰 हिरकणी भाग ३ 🏰

🏰 हिरकणी भाग ३ 🏰

दरवाजा उघडणार न्हाय म्हणजे काय

अहो पर मला घरला जायलाच हवं

" म्या त्यात काय बी करू शकत न्हाय "

मी

" अहो दादा.. घरला माझं तान्हं बाळ हाय... ते अजून अंगावर पितंय... त्यासाठी मला घरला जायलाच हवं..." मी आणखी आळवणी केली

अगं हिरे हिथं आत्ता माझी सख्खी भन येऊन म्हटली तरी मला गडाचे दरवाजे उघडता येणार न्हाई"

" अहो दादा एक डाव चुक पदरात घ्या .... गडावर येळ कसा गेला ते आज काय लक्षात आलं न्हाई आणि सोबतीच्या बायांची चुकामुक झाली म्हणून त्यांना शोधत बसले व इथवर येईपर्यंत सुर्य कधी मावळतीला गेला ते देखिल कळलं न्हाई. चुक माझीच हाय पण एक डाव माफ करा...

" हिरे नसता हट्ट धरू नकोस...दरवाजे उघडणार न्हाय म्हणजे न्हाय "

" अहो माझा कान्होबा माझ्या शिवाय कसा राहिल? त्याला भुक लागल्यावर कुणाकडे जाईल ... मी तुमच्या पाया पडते... भिक मागते ... मला घरी जाऊ द्या .... दरवाजा उघडा" मी त्याच्या पायावर लोळण घेतली

" पाय सोड.. काय करतीयासा... नाईकांना महाराजांचीच आज्ञा हाय कि सुर्य मावळतीला गेल्यावर गडाचे दरवाजे बंद म्हणजे बंद. नाईकांना कळलं मी दरवाजा उघडला तर माझी गर्दन धडावर राहिल काय ? हे बघ तु काय काळजी करू नको .

मी माझ्या बायलीला सांगावा धाडतो.. तु आज गडावर तुझ्या या भावाकडंच

रहा....

" पहाटं उगवतीलाच तु आपल्या घरला खुशाल निघून जा कशी ... मी काय म्हणतोय . लक्ष कुठाय तुझं ... हिरे"

अं. हो हो " मी काहीच न सुचून काहितरी बोलुन गेले. महाराजांची आज्ञा असताना गडाचे दरवाजे आत्ता उघडणं शक्यच नव्हतं. ते नाईकांच्या अखत्यारीत नव्हतं. आणि मी खुद्द महाराजांकडे माझी कर्मकहाणी घेऊन जावं हे देखिल अशक्य होतं. मी तिथेच काहिवेळ मटकन बसून राहिले. पहारेकरी देखिल त्यांचे दैनंदिन कामकाज उरकु लागले.

मी तिथून निघाले. सगळे लोक आपापल्या कामात व्यस्त झाले होते. माझ्या सारख्या दिडदमडीच्या गवळणीकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ होता. दिवसभर काम करुन कधी एकदा आराम करतो असं सगळ्यांना झाले असावे.

माझं मन मात्र अगदी सैरभैर झालं होतं. समोर सतत कान्होबाचा चेहरा थैमान घालत होता. आणि का घालणार नाही. केवढूसा होता तो. आईच्या छातीला लागून चुटूचुटू दुध पिणारा आणि रात्री अंधारात घट्ट बिलगुन आश्वस्त झोप घेणारा तो कोवळा जीव आज काय करेल? त्याला भुक लागल्यावर कोणाकडे जाईल?

त्याला भिती वाटल्यावर कोणाला कवटाळेल ? जेव्हा त्याला जाणीव होईल कि आपली आई आपल्याजवळ नाही तेव्हा त्याला शांत कोण करेल?

नाही .... नाही.... नाही ! मला इथुन जायला हवं. काहीही करुन घरी पोहचायला हवं. घरी जाऊन कान्होबाला जवळ घेतल्याशिवाय मला चैन पडणार नव्हता. आज एकतर मी घरी जाईन किंवा तो प्रयत्न करता करता माझा जीव देईल पण मी इथे थांबणार नाही......... बस्स ठरलं म्हणजे ठरलं !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...