🏰 हिरकणी भाग ४ 🏰
जागा
गडावर दुध घालताना कुठे पहारेकरी कमी व निवांत असतात त्या जागा मी आठवू लागले. नाही नाही ती नाही..... तिथे जरा जास्तच नजर असते .... मग ती नाही.. ते देखील नाही ...... त्या ठिकाणावर लांबून देखील नजर .. ठेवता येते म्हणून पहारेकरी कमी असतात. मी भरभर सगळे मनातल्या मनात
आठवू लागले.
आणि मला आठवली. एक जागा मला हवी तशी होती. तिथे पहारेकरी कमी असत. आणि जे असत ते देखिल थोडे निवांतच असत. कारण कारण तेथन काही दगा होईल हे कठीण होतं. कठीण कसलं अशक्यच होतं. पण मला शक्य अशक्यच्या त्रांगड्यात अडकुन पडायचे नव्हते. मला कान्होबा कडे जायचे होते एवढेच आता लक्षात होते. बस्स!
मी अगदी तिथलीच रहिवासी असावी अशा पद्धतीने चालत चालत मला हव्या त्या ठिकाणी पोहचले. कुणी बघत नाही हे पाहून पटकन कमरेला पदर खोचून हळूच त्या घळईत शिरले. व पटपट पाऊले टाकत एका आडोशाच्या मागे श्वास घेण्यासाठी उभी राहिले. जोरात चालल्यामुळे माझा श्वास फुलून आला होता. काही क्षण थांबल्यावर मी खाली पाहिले
मी मनाचा निश्चय करुन थोडी पुढे झाले व खाली पाहिले आणि..
बापरे
पटकन मागे सरून मी पुन्हा मागच्या दगडाचा घट्ट आधार घेऊन उभी राहिले. त्या धुसर अंधारात देखिल काळजाचा थरकाप उडवणारी एक खोल खोल दरी माझ्या डोळ्यांसमोर माझा घास घेण्यासाठी " आ" वासुन उभी होती. इथे पहारेकरी कमी का असतात त्याचे कारण माझ्यासमोर उभे होते. मला ये ये म्हणून खुणावत होते.
हिरे अगं हा काय वेडेपणा करते आहेस तु. चल मागे हो , पुन्हा वर जा, आजची रात्र गडावर घालव आणि सकाळी उगवतीलाच खुशाल आपल्या घरी जा. माझे एक मन माझ्याशी बोलु लागले.
पण माझा कान्हा ?
अगं वेडे , समोर हि खोल दरी बघते आहेस ना ? माणसाला देखिल कस्पटासारखं उडवून लावण्या वाऱ्याचा आवाज तुला ऐकू येतोय ना ? इथल्या खोबणी खोबणीत तुला डसण्यासाठी दबा धरून बसलेल्या जनावरांची सळसळ ऐकू येतेय ना?
हो .... पण माझा कान्हा ?
अगं आज वाचलीस तर तुझा कान्हा आहेच पण तुच नसलीस तर....
नाही .. नाही .... गप्प बस. तुझं मला काहीही ऐकायचे नाहीये. आज मी माझ्या बाळाकडे जाईल नाहीतर इथेच माझा जीव देईल पण आता माघार नाही. आई जगदंबे या तुझ्या लेकीचं तुच आता रक्षण कर. मी सगळे विचार थांबवून पुन्हा एकदा पदर खोचला. आणि पुढे होत त्या बेलाग कड्याला उतरायला प्रारंभ केला.
मी खाली बघायचं शक्य तेवढे टाळू लागले कारण उंचावरून खाली पाहताना मला चक्कर येत असे. थोडा जरी झोक गेला तरी एक अत्यंत वेदनामय मृत्यु माझ्या नशीबात निश्चित होता. तोंडाने देवीचं नाव घेत घेत व त्या अंधारात हाता पायानेच चापसत चापसत मी खाली उतरू लागले. हि एक अत्यंत उभी व सरळसोट दगडांची भिंतच होती जणू. मी पुर्ण नेटाने जोर लावून एकेक सांदीकोपरा पकडून पायाला
आधार मिळताच हातातला आधार सोडत होते.
आई गं.. आई .. मी वेदनेने ओरडले.
किती वेळ गेला कुणास ठाऊक त्या कड्यावर सतत पाऊस पडुन पडुन एखाद्या तलवारीला यावी तशी धार आलेली होती आणि मी आधारासाठी त्यावर पाय देताच भाजी चिरावी तसा माझ्या पायाच तळवा चीरला गेला होता. रक्ताची एक धार काटा लागून आधीच जखमी झालेल्या त्या पायातुन वाहू लागली. तो दगड त्या रक्ताने न्हाऊन निघू लागला.
मी वेदनेने कळवळून तिथेच ओक्साबोक्षी रडू लागले. मी काय करून बसले होते.
आई...... आई...... तुझ्या हिरकणीला कुशीत घे. तीला घट्ट कुशीत घे. तुझ्या उबदार मिठीत घे. बघ तुझ्या हिरकणीचं काळीज भितीने कसं उडतंय , तीचे पाय कसे लटलट कापत आहेत ..... ती फार मोठ्या संकटात आहे गं !
आणि कान्हा ? हिरे ..... तुझ्या कान्हाला कुशीत कोण घेणार ? भितीने टाहो फोडणाऱ्या कान्हाला उबदार मिठीत कोण घेणार हिरे ? तुझ्याशिवाय त्याला तरी कोण आहे हिरे ? तु इथेच गर्भगळीत झालीस तर त्याच्यावर मायेची पाखर कोण करणार हिरे ? विचार नुसते विचार.... डोके फुटून जायची पाळी आली होती.
वेदनेचा पहिला भर ओसरल्यावर मी कसलाही विचार न करता धडूत्याचा एक कोपरा टर्रकन फाडून काढला. त्या चींधीनेच वाहणारं रक्त पुसून काढलं आणि तोंड घट्ट आवळून तळव्याला करकचून पट्टी बांधली. रक्त वाहायचं थोडं थांबल परंतु वेदना मात्र तशीच ठसठसत होती. आता त्या वेदनेचा विचार मागे पडला आणि माझ्या बाळाचा चेहरा पुन्हा डोळ्यांसमोर रूंजी घालू लागला. मी तिथेच दगडाला धरुन थोडावेळ आराम केला.
आणि पुन्हा उतरायला सुरुवात केली. आता मी जास्त विचार करायचा नाही या निश्चयानेच उतरू लागले. याला एक प्रकारचे झपाटलेपण म्हणता येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा