फॉलोअर

रविवार, १० मे, २०२०

🏰 हिरकणी भाग ८ 🏰

🏰 हिरकणी भाग ८ 🏰

त्यानंतर कितीतरी वेळ मी बोलत होते. त्या दिवशी गडावर आले त्या क्षणांपासून , गडाचे बंद झालेले दरवाजे , घरी एकटा असलेला माझा कान्होबा , गडावरून खाली उतरण्याचे वेडे साहस, ते साहस करताना मला खुणावणारा कान्होबा , गड उतरून घरी घेतलेली धाव, रडता रडता माझ्या छातीला लुचून दुध पिता पिता झोपून गेलेला माझा बाळ, आणि त्यानंतर शांत क्लांत अवस्थेत झोप लागून गेलेली मी, आणि अपराधाचं ओझं बाळगत आज या दरबारात असहाय अवस्थेत उभी असलेली मी सगळे सगळे मी मला जमेल तसं आणि सांगता येईल तसं सांगून खालमानेने उभी राहिले .... शांतपणे .... माझ्या नियतीचा फैसला ऐकण्यासाठी ...!

दरबारात टाचणी पडली तरी आवाज होईल अशी शांतता पसरली होती. सर्वांचे कान आता पुढे काय होणार या उत्सुकतेने दाटले असावेत. जो तो पुढे येण्यासाठी एकमेकांना रेटू लागला. महाराज आता काय करणार? आम्हाला काय शिक्षा सुनावणार ? प्रश्न .... प्रश्न ...... प्रश्न.

आणि काही क्षण गेल्यावर तो आवाज पुन्हा त्या दरबारात घुमु लागला.

" आम्ही ... राजे शहाजी व जीजाऊ मांसाहेब यांचे पुत्र व भोसले कुलोत्पन्न अभिषिक्त सम्राट " छत्रपती शिवाजी " ! आमचे आजपर्यंतचे जीवन म्हणजे अगदी दंतकथा वाटाव्यात अशा घटनांच्या मालिकांनी अगदी शिगोशीग भरलेले आहे . आणि त्या सर्व प्रसंगांमध्ये अगदी मुकुटमणी शोभावा असा विचित्र तिढा आज आमच्यासमोर उभा आहे.

काल बहिर्जीनी जेव्हा घडलेल्या या संपूर्ण प्रसंगाची इत्यंभूत बातमी आम्हाला दिली तेव्हापासून आमचे मन एका विचित्र कात्रीत सापडले आहे. एकीकडे आमची कर्तव्यं आणि आम्हीच बनवलेले व स्वतः देखिल कधीही न मोडलेले कायदे आम्हाला साद घालत आहेत तर दुसरीकडे या हिरकणीच्या रूपातील एक आई आमच्यासमोर न्यायाच्या प्रतिक्षेत उभी आहे. पण या दोघांना आम्ही या राजदरबारात उपस्थित केले आहे ते वेगळ्याच कारणाने ..

आम्हाला आजही तो दिवस आठवतो. आमचे वय कदाचीत पंधरा सोळा असेल.

रायरेश्वराच्या पावन मंदिरात आमच्या सारख्या छोट्या मुला वर विश्वास ठेऊन आमचे एक स्वप्न पुर्ण करण्यासाठी स्वतःचे जीवन देखिल अर्पण करण्याची शपथ घेणारे आमचे सहकारी आजही आम्हाला लख्ख आठवतात. आमचा जीवा, शिवा, येसाजी, तानाजी, दिपाजी, कुडतोजी , बाजी.. सगळे सगळे आठवतात. प्रत्येक क्षणी आठवतात. आम्हाला फक्त आठवत नाहीत तर ...... आठवण देखिल करुन देतात !

कशासाठी घातला आहे आम्ही हा सगळा घाट, कशासाठी लावली आहे वेळोवेळी प्राणांची बाजी, कशासाठी दिली आहे आप्तस्वकीय आणि मित्रांच्या प्राणांची आहुती, कशासाठी त्या औरंग्याशी मांडला आहे आजन्म उभा दावा या सगळ्याची आठवण करुन देतात.

आमचे वडील म्हणजे राजे , उभ्या महाराष्ट्रातील एक वजनदार व नामांकित असामी.

जन्मतःच आम्हाला मिळालेली जहागीरी आणि यावर कंठू शकणारे एक सुखासीन आयुष्य. एक मोह पाडणारं आयुष्य ..... पण ....... पण एकीकडे माझेच रक्ताचे बांधव दुःखाच्या अग्नीत होरपळत असताना डोळेझाक करुन हा शिवाजी. तुमचा शिवाजी मिष्ठान्नाचे घास आपल्या घशाखाली कसे ढकलू शकला असता ? आमच्या मातोश्रींनी स्वाभिमान आणि न्यायाचे धडे आम्हाला जन्मापासुन दिले होते ते यासाठी ? नाही , नाही , त्रिवार नाही!

काय होतं ते आमचे स्वप्न ........ एकीकडे आदिलशहा, निजामशहा, औरंगजेब आमच्या इष्ट देवतांची करत असलेली मानखंडना , आयाबहिणींची लुटत असलेली अब्रु , रक्ताचं पाणी करुन वाढवलेल्या पिकांची होणारी उभी लुट, सावकारांना देखिल लज्जा वाटावी अशा पद्धतीने केली जाणारी वसुली, घरादारांवर फिरवले जाणारे नांगर हे सगळं रोखायचे असेल तर उभं करावे लागणार होते एक स्वतंत्र राज्य .... " स्वराज्य "

या राज्यात राहणाऱ्या दिनदुबळ्यांपासून प्रत्येक बाईबापडीला आपले वाटेल असे स्वराज्य !

आणि ते स्वप्नातलं स्वराज्य उभं करण्यासाठी कशाकशाची आहुती आपल्या सगळ्यांना द्यावी लागली आहे याची देखिल कल्पना तुम्हा सर्वांना आहे. ( हे बोलताना राजांचा कंठ अगदी दाटून आला असावा ) आज हि हिरकणी आणि हा येसाजी माझ्या समोर अपराधी म्हणून उभा असताना तो आमचा तानाजी, आमचा दिपाजी, आमचा शिवा, आमचा बाजी आणि ...... आणि आमच्या मांसाहेब आमच्याकडे मोठ्या आशेने पहात आहेत. त्यांचा हा शिवाजी , शिवबा काय फैसला देणार याकडे मोठ्या आशेने डोळे लावून बसलेले मला दिसत आहेत.

मगाशी आमच्या शंभू राजांना या हिरकणी कडे पाहिल्यावर त्यांच्या मातोश्रींची आठवण झाली , आणि आश्चर्य म्हणजे या हिरकणी कडे पाहताना आम्हाला देखिल आमच्या मांसाहेबांची आठवण झाली.

आई " ..काय जादु आहे या दोन शब्दांत ! स्वर्गाचं राज्य देखील ज्या पायांवर ओवाळून टाकावे असे शब्द, असे नाते म्हणजे " आई"

आपल्या लेकरावर कठीण प्रसंग आला आहे हे लक्षात आल्यावर क्षणाचाहि विलंब न करता प्राण ओवाळून टाकणारी व्यक्ती म्हणजे आई. आज हि हिरकणी दरबारात उपस्थित झाली आणि आम्ही औरंगजेबाच्या कैदेत अडकून पडल्याचे समजल्यावर कमरेला तलवार लावून तडक निघू पाहणाऱ्या आमच्या मांसाहेब दरबारात पुन्हा अवतीर्ण झाल्या आहेत असा भास आम्हाला झाला. आमच्या मांसाहेबांच्या डोळ्यात आमच्या विषयी दाटून येणाऱ्या प्रेमात आणि या छोट्या बाळासाठी हिरकणीच्या डोळ्यांत दाटून येणाऱ्या प्रेमात फरक करणे या तुमच्या शिवाजीला शक्य नाही........

आज या दरबारात आमच्या मांसाहेब हजर नाहीत परंतु त्या हजर असत्या तर जे घडले असते तेच आम्ही करणार आहोत. त्यांना मनोमन साक्षी ठेऊन वागणार आहोत.

राणीसाहेब तुमच्या स्वहस्ते हिरकणीचा साडीचोळी आणि मानमरातब देऊन सत्कार करा. पत..... तुम्ही आमच्या खाजगीतून येसाजी आणि कान्होबा साठी सोन्याच्या तोड्यांची व्यवस्था करा. पेशवे .... तुम्ही हिरकणीला पाच गावे इनाम आणि त्यांच्या राहत्या गावाला " हिरकणी वाडी" हे नाव दिल्याचे आज्ञापत्र टाकोटाक जारी करा.

हे श्रींचे राज्य आहे. इथले कायदे आणि व्यवस्था लोकांच्या सेवेसाठी, हितासाठीच बनवले जातील आणि त्यांच्या हितासाठीच मोडले आणि रूजु देखिल केले जातील.

या शिवाजीच्या अंतिम श्वासापर्यंत तो यासाठी लढत राहिल. आणि मीच न्हवे तर आमचे शंभुराजे आणि या भुमीत जन्म घेणारा प्रत्येक व्यक्ती यासाठीच त्याच्या अंतिम श्वासापर्यंत लढत राहिल याची आम्हाला खात्री आहे. जगदंब ...... जगदंब ! " कित्येक वेळानंतर तो कैलासपती बोलण्याचा थांबला.

मी स्वप्नात आहे कि सत्यात हे मला देखिल उमगेना. ऐकणारे कित्येक लोक आपल्या डोळ्यांच्या कडा पुसत असताना मला दिसल्या. आणि तेच का तर माझ्याही डोळ्यांतून अणूंच्या धारा वाहू लागल्यामुळे समोरील दृष्य धुसर झाले.

माझ्या कानावर फक्त " छत्रपती शिवाजी महाराजांचा...... विजय असो " अशा घोषणा पडू लागल्या. मीही माझ्या नकळत अगदी अंतकरणापासुन जयघोष सुरू केला

छत्रपती शिवाजी महाराजांचा

.........विजय असो "

तुषार दामगुडे

( तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा )

1 टिप्पणी:

Sunil म्हणाले...

फारच सुरेख लेखन. हिरकणी ला तूम्ही तूम्ही मूर्तीमंत सजीव केलाय. असच लिखाण सुरू ठेवा ही नम्र विनंती

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...