फॉलोअर

शनिवार, २८ मार्च, २०२०

*नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔* *अग्निदिव्य* अंतिम भाग - 38⃣

*नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜*
*अग्निदिव्य*
*_______📜🗡अंतिम भाग - 3⃣8⃣🚩🗡________*

*लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार*

*___🚩📜🚩_______*
*बादशहाच्या खास खासगी महालात मोजके दरबारी मनसबदार खाली माना घालून उभे होते.* *महालाच्या फरशीवर दक्षिणेतून नुकतेच आलेले टपाल अस्ताव्यस्त विखरून पडले होते. वजीर* *जाफरखानालासुद्धा ते उचलून घेण्याची हिंमत होत नव्हती. वातावरणात मोठा तणाव भरून राहिला होता. खोजे आणि खिदमतगारांना महालातून काढून लावले गेले होते. मुद्दाम बहिरे करवले गेलेले हशम दारावर पहाऱ्याला उभे होते. पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघाप्रमाणे बादशहा येरझारा घालीत होता. त्याच्या हिरव्या डोळ्यांतून जणू आगीच्या ठिणग्या बरसत होत्या. मागे बांधलेल्या हातांमधल्या जपमाळेचे मणी झरझर सरकत होते. ज्वालामुखीचा एक उद्रेक होऊन गेला होता; पुढचा कोणत्याही क्षणी होणार होता. त्याची आग आपल्यावर कोसळू नये म्हणून प्रत्येकजण अल्लाला विनवीत होता. महालात भरून राहिलेल्या सन्नाट्यामध्ये मध्येच तडतडणाऱ्या चिरागदानातील वातीचा आवाजसुद्धा फार मोठा वाटत होता. येरझारा थांबवून बादशहा मसनदीवर बसला. साऱ्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. काही वेळ त्याने छतावर नजर लावली आणि ती हिरवी नजर थेट जाफरखानावर उतरली. हिंस्र श्वापदाच्या गुरगुरण्यासारखा आवाज उमटला–*
जाफरखान… हुकूम आलमपन्हा. उचल, उचल ते टपाल आणि या नामुरादांना वाचून दाखव नमकहराम मरगट्ट्यांनी काढलेले मुघलिया सलतनतीच्या अब्रूचे धिंडवडे. तू मोठी खात्री देत होतास त्या हरामखोर कुलीखानाच्या इमानपरस्तीची, गोडवे गात होतास त्याच्या प्रामाणिकपणाचे आणि कर्तबगारीचे. वाचून दाखव त्याचे पराक्रम, कसे त्याने माबदौलतांना हातोहात फसवले. कसे आपल्या साहेबी इमानाला काळे फासले. लटपटत्या हातांनी जाफरखान कागद गोळा करू लागला. एक-दोन मनसबदारांनी पुढे होऊन कागद उचलण्यास मदत केली. मात्र जाफरखानाची टपाल वाचण्याची हिंमत होत नव्हती. कागद नीट लावण्याचा बहाणा करीत तो वेळ काढत राहिला. पुन्हा गुरगुरल्यासारखा आवाज उमटला–
माबदौलतांना पहिल्या दिवसापासूनच शक होता, हा हरामखोर कुठली उपरती झाली म्हणून शाही खिदमतीत दाखल झाला नाही तर ती त्या दगाबाज कोहस्तानी चूह्याची बेइमानी चाल होती. तो काफिर बुढ्ढा मिर्झाराजा त्याला सामील होता. आता शक यकीनमध्ये कायम झाला आहे. मात्र तो कोणता मकसद घेऊन आला होता, काही अंदाज लागत नाही. त्याने शाही दौलत वाळवीसारखी पोखरून काढली की काय? किंवा काफिर राजपुतांना त्याने शाही तख्ताच्या खिलाफ बगावत करण्यास फितवून ठेवले आहे का? या अल्ला, विचार करून करून डोके फुटायची वेळ आली आहे. तुम्ही सगळे अय्याशी करण्यात मग्न, मूठभर मियाँची हातभर दाढी अशा वायफळ गोष्टींपलीकडे तुमच्याकडून काय अपेक्षा करणार? एक-दोन नाही पुरती दहा वर्षे हा नामुराद सुअर आपला नापाक इरादा मनात घेऊन माबदौलतांना फसवीत राहिला. अल्लाची खैर तो अफगाणिस्तानात अडकला होता, जिथे दख्खनचा वारासुद्धा लागणे शक्य नव्हते. जर तो दिल्लीत असता तर…? मौका सापडताच हरामखोर आपल्या कमअस्सल आकाकडे पळून गेला. सुअर अशी नौटंकी करीत राहिला की माबदौलतांच्या आँखोंनी पण धोका खाल्ला.
पुन्हा शांतता पसरली. हिरवी नजर हातातल्या तसबीहवर स्थिर झाली. मणी थांबले. थोड्या वेळाने एक दीर्घ सुस्कारा सुटला, त्या श्वासात मिसळूनच शब्द उमटले– लाहौलवलाकूवत. त्या हरामखोर काफिराने फक्त दौलतीशी किंवा माबदौलतांशी बेइमानी केली असे नाही, त्याने प्रत्यक्ष इस्लामची नाफर्मानी करून सर्वशक्तिमान अल्लाचा दगा करण्याची गुस्ताख कोशिश केली आहे. हा गुन्हा माफ करण्याचा हक प्रत्यक्ष पैगंबर सलल्लाह वसल्लम हजरतांनासुद्धा नाही. अशा पाप्यांना कुराणेपाक एकच सजा फरमावतो, तो जिथे आणि जसा सापडेल तिथे, लगेचच त्याला ठार करून, त्याची रूह त्याच्या जिस्मपासून वेगळी करून सैतानाच्या हवाली करायची आणि त्याला दोजखच्या आगीत रवाना करायचे. जाफरखान… हुकूम… उद्याच्या उद्या शाही फर्मानासोबत असे फतवे दख्खनमध्ये रवाना झाले पाहिजेत. जो हुकूम जिल्हेसुभानी. ऐलान कर, प्रत्येक नेक मोमिनचे फर्ज आहे, इस्लामची नाफर्मानी आणि अल्लातालाशी दगा करणाऱ्या पाप्याला कुराणेपाकने सांगितलेली सजा दिली पाहिजे. नापाक, बेइमान, इमानफरामोश काफिर कुलीखानाला शोधून काढा. सापडताक्षणी ठार मारा. त्यासाठी वाट्टेल ती किंमत द्यावी लागली तरी बेहत्तर. या नेक कामासाठी जे प्राण गमावतील ते शहीद म्हणून अल्लाच्या दरबारात बसतील. जन्नत उपभोगतील. जो त्या नापाक काफिराचे मुंडके माबदौलतांसमोर पेश करील त्याची सरफरोशी शाही दरबारातून तर केली जाईलच पण त्याशिवाय माबदौलतांच्या खासगीतून एक लाख अश्रफी माबदौलत स्वत:च्या मुबारक हातांनी देऊन नवाजतील. उद्याच्या उद्या हुकमाची तामील होईल.
काही वेळ पुन्हा शांततेत गेला. मनसबदार चोरट्या नजरेने एकमेकांकडे पाहत होते. मात्र तोंडातून ब्र काढण्याची कोणाची छाती होत नव्हती. दानिशमंदखानाने काहीतरी बोलून बादशहाचा गुस्सा ठंडा करावा म्हणून जाफरखान त्याला खुणावत होता. वजिराला डावलणे त्याला शक्य नसले तरी धगधगत्या हुडव्यात हात घालण्याची त्याची शामत नव्हती. त्याने नजरेनेच असहायता व्यक्त करीत हाताने वजिराला थोडा धीर धरण्याची खूण केली. तेवढी चोरटी हालचालसुद्धा हिरव्या नजरेतून सुटली नाही.
दानिशमंद, ज्या क्षणी शिवाने त्या नमकहरामाला पनाह दिली त्या क्षणी माबदौलतांचा शक मजबूत झाला. मोठमोठ्या पंडितांसमोर जेव्हा त्याने जिरह केली आणि हिंदू धर्मात तशी पद्धत नसताना त्याला परत हिंदू करून घेतले, तेव्हा आता तर कोणताही शक शुबाह शिल्लकच राहत नाही. यकीनन त्या कोहस्तानी चूह्याने माबदौलत ज्याला मुघलिया तख्ताचा सर्वांत इमानी आणि वफादार शेर समजत होते त्या काफिर बुढ्ढ्या जयसिंहाला लाच देऊन फितूर केले आणि शाही छावणीत हरामखोर कुलीखानाची शिरकत करून घेतली. अफसोस! अफसोस!! या अल्ला, केवढे हे गलिच्छ राजकारण? त्या बुढ्ढ्याला नादान शिवासाठी दख्खन सुभेदारी मिळविता आली नाही म्हणून त्याने हा असा तिढा टाकावा? अफसोस! माबदौलतांची अक्कल काम करेनाशी झाली आहे. तो नामुराद कोहस्तानी चूहा इस्लामचा कट्टर दुश्मन आहे आणि तो अजून काय काय गुल खिलवणार आहे ते या अल्ला फक्त तू एकटाच जाणतोस. या सरजमीन-ए-हिंदला दार-उल-इस्लाममध्ये तबदील करण्यासाठी माबदौलत हर मुमकीन कोशिश जी जानसे करीत आहेत आणि हे परवरदिगार-ए-आलम या लाचार नाचीज बंद्याला तू अजून अजमावीत आहेस! सांग, दानिशमंद तू अल्लाचा प्यारा बंदा आहेस, या नाचीज बंद्याची अजून कोणती इम्तहान बाकी आहे सांग.
दानिशमंद काही बोलला नाही. आपल्या बोलण्यातून बादशहाचे समाधान होण्यापेक्षा गैरसमज होण्याचीच शक्यता अधिक हे मोगल रियासतीत हयात घालविलेल्या विद्वानाला बरोबर समजत होते. अशा प्रसंगी अक्कल पाजळून मुक्ताफळे उधळण्याचा नतीजा इतर मुत्सद्दी चांगलेच जाणून असल्याने ते तोंड उघडणे शक्यच नव्हते. महालात पुन्हा शांतता पसरली. हिरवी नजर प्रत्येकावरून फिरत होती. ज्याच्यावर ती काही काळ स्थिरावे त्याला नजर वर न उचलताच त्या नजरेची धग जाणवे आणि तळहात-पाय पार घामेजून जात. रादअंदाज खान… जी आलमपन्हा. त्या नामुराद कुलीखानाचा जनाना इथेच शिकारपूरच्या त्याच्या हवेलीत शाही बंदोबस्तात माबदौलतांनी ठेवून घेतला आहे. ही हजरत आलमपन्हांची मोठीच दूरअंदेशी झाली. बिनकामाच्या मखलाशी करण्याची गरज नाही. शराबच्या नशेत तवायफांच्या गराड्यात पडून राहण्यापेक्षा याच्या निम्मी अकलमंदी जरी तुझ्यासारख्या शाही खिदमतगारांनी दाखवली तरी रुमशानपासून रामेश्वरपर्यंत मुघलिया सलतनतीच्या सरहद्दी पोहोचतील. इन्शाल्लाह. चापलूसी करून गुमराह करण्याची गुस्ताखी पुन्हा करशील तर खबरदार. हुजुरे आला गुलाम गुस्ताखीची माफी चाहतो. कुलीखानाच्या कबिल्यात आणि जनानखान्यात जेवढ्या जवान आणि काबील पोरी असतील त्या बाजारत वीक. आलेला पैसा माबदौलतांच्या नावाने फकीर, अपाहिज आणि जरूरतमंदांना खैरात म्हणून वाटून टाक. जो हुकूम…
बाकी बायकांना जहर पाजून ठार कर. फातिहा किंवा कोणताही दुवा न पढता, त्या मुसलमान म्हणवत असल्या तरी, काफिर समजून एकाच खड्ड्यात त्यांना सुपुर्दे खाक करून टाक. जी जिल्हेसुभानी. तगड्या जवान पोरांना गुलाम म्हणून अरबस्तानात रवाना कर. त्यातून आलेला पैसा माबदौलतांच्या नावाने यतीमखान्यात देऊन टाक. कम उम्रचे जे लौंडे असतील त्यांना सरळ खोजे बनव आणि शाही जनानखान्यात दाखल करून घे.
हुकूम आलमपन्हा. आणि त्या हरामखोर काफिराचा तितकाच हरामी काका. त्याला आग्र्याच्या भरचौकात हत्तीच्या पायी दे. बाकी पुरुषांना सरसहा कत्ल कर. नीट ध्यानात ठेव, त्याच्या वंशातला जनानखान्यातला किंवा परिवारातला एक जरी कोणी उरल्याचे पुढे कधी आढळले, तर तुझे डोके शिल्लक राहणार नाही आणि तुझ्या जनानखान्याचे हेच हाल होतील हे पक्के ध्यानात ठेव. उद्या फजरच्या नमाजानंतर तू रवाना झाल्याची खबर जाफरखानाकडून माबदौलतांना मिळाली पाहिजे. यासाठी तुला कोणताही लेखी हुकूम मिळणार नाही आणि तू पोहोचण्याआधी बातमी फुटली तर तुझी खैर नाही.
जी हुजुरेआला. आलमपन्हांच्या हुकमाची हरफ दर हरफ तामील होईल. इन्शाल्लाह. हुकूम ऐकून त्या निर्ढावलेल्या मुघलांचीसुद्धा छाती दडपली. शब्दाशब्दांतून उमटणारी जरब ऐकून ते अधिकच धास्तावून गेले. ही वीज आपल्यावर न पडो अशी प्रत्येकजण अल्लाची करुणा भाकू लागला. या तणावपूर्ण शांततेत काही वेळ गेला आणि पुन्हा तोच जरबेचा कठोर स्वर त्यांच्या कानात शिरला– माबदौलतांनी दख्खन सुभ्याला फर्मान पाठवले होते की, एकसुद्धा किला फते झाला नाही तरी बेहत्तर पण त्या नापाक सुअर कुलीखानाला शोधून काढून ठार करा. तर शाही पैशांवर गुलछर्रे उडवणाऱ्या अतिशहाण्या शाही अंमलदारांनी फर्मानातून सोईस्कर अर्थ काढला. आजपर्यंत एकही मोहीम त्यांनी कारगर तर केली नाहीच, पण त्या नमकहरामांनी बदजात कुलीखानाला पकडण्यासाठी काय केले? इकडची काडी तिकडे नाही. काय तर म्हणे शाही हुकूम हातात येण्याआधीच तो सुअर काफुर-अल् हुकूम किले रायगडसारख्या मेहफूज ठाण्यात पोहोचला. इतकेच नाही तर शिवाने कशी जिरह करून पंडितांना परास्त केले. कुलीखानाला पुन्हा हिंदू करून घेण्यासाठी कसा मोठा जलसा केला, दावत दिल्या, कशी खैरात वाटली, हे ते नादान मोठ्या कौतुकाने लिहितात. लानत है त्यांच्या इमानावर आणि इमानदारीवर. असे नापाक बेइमान अल्फाज यांच्या कलमेतून लिहिलेच कसे जातात? अफसोस! सख्त अफसोस!! या अल्ला, या तुझ्या गरीब असहाय एकट्या पडलेल्या बंद्यावर दया कर. तू सोपवलेले काम पूर्ण करण्यासाठी शक्ती दे. अरे परवरदिगार त्या कुलीखानासारखे माणिक तू का हिरावून घेतलेस? तो एकटा जरी सोबत असता आणि हे शाही दौलतीवर चरणारे सर्व अय्याश पलक झपकते गैबमध्ये गेले असते तरी तुझ्या या कमजोर बंद्याने तुझा संदेश हिंदोस्तांच्या हरएक कोन्यात नेण्याची हर मुमकिन कोशिश केली असती. या अल्ला मदद! या मौला मदद!
बोलता बोलता बादशहाच्या डोळ्यांत चक्क पाणी आले. प्रत्यक्ष वडील जन्नतनशीन झाल्याची खबर ऐकून अथवा ग्वाल्हेरच्या किल्ल्यात सर्वांत थोरल्या शहजाद्याचा इंतकाल झाल्याचे ऐकून जो पाषाणपुरुष पाझरला नाही त्याच्या डोळ्यांत अश्रू दाटले. गळा भरून आला. पण सांत्वनासाठी तोंड उघडून अंगाराने भरलेला पिटारा स्वत:वर ओढून घेण्याची कोणाची तयारी नव्हती. चार-दोन क्षणांतच बादशहा सावरला. पुन्हा भानावर आला. इतिकदखान… हुकूम मेरे आका.
माबदौलतांसाठी तू स्वत: दख्खनमध्ये जा. सोबत मोठा सरंजाम घेण्यात वेळ वाया दवडू नकोस. उशिरात उशीर पीरपर्यंत तू रवाना हो. सोबत बहादूरखान आणि दिलेरखानासाठी गुप्त फर्मान घेऊन जा, मीर अल्तमशला ताबडतोब जेरबंद करण्याचा दिलेरखानाला तोंडी हुकूम कळव. मीर अल्तमशला साखळदंडाने बांधून, खोगीर नसलेल्या उंटावर उलटे बसवून टाकोटाक रवाना कर. त्याच्या बंदोबस्तासाठी लागणारा खर्च त्याचाच सरंजाम विकून उभा कर. दिलेरखानाच्या निसबतीचे पाचशे पठाण सोबत घे आणि त्याला आग्र्याला घेऊन ये. जो हुकूम मेरे आका. कैद्याला हुजूर दाखल केल्याशिवाय गुलाम तलवार म्यान करणार नाही. अल्ला कसम.
बहोत खूब घरच्याच खुराड्यातले कोंबडे पकडून आणण्यासाठी केवढी ही बहादुरी जाफरखान… हुकूम जिल्हेसुभानी. तो बेइमान आग्र्यात दाखल होताच तू स्वत: जातीनिशी जाऊन त्याला सिद्दी फुलादखानाच्या हवाली कर. त्याला हुकूम दे की, त्याने जो सलूक कमीना कुलीखान त्याच्या आदबखान्यात असताना त्याच्यासोबत केला तोच सलूक मीर अल्तमशखानासोबत कर. जर तीन महिन्यांनंतर तो हरामखोर जिंदा राहिलाच तर त्याला साखळदंडांनी बांधून दरबारात पेश कर. हजरते आला हुकूम की तामील होगी.
गलथान बेइमान मीर अल्तमशखानाने, ज्या कुलीखानाला तब्बल दहा वर्षे माबदौलतांनी टाचेखाली दाबून कह्यात ठेवले होते, त्याला याने गाफील राहून फरारी व्हायला मदत केली. यापुढे जो कोणी गाफील राहील आणि शाही मकसद चूर करील तो हाच नतीजा पावेल.
रात्री बऱ्याच उशिरापर्यंत बादशहा आग पाखडीत राहिला. दरबारी खालमानेने ऐकत राहिले. मगरीने माणिक गिळले होते. आता ते तरी बिचारे काय करणार होते? मगरीच्या दाढांमध्ये हात घालण्याची हिंमत एकाही शाही सिपाहसालारमध्ये नव्हती, हे पुरते जाणून असलेला बादशहा चरफडण्याशिवाय काहीच करू शकत नव्हता. तो स्वत: राजधानी सोडून जाण्यास घाबरत होता. एकापाठोपाठ एक मंदिरे आणि पवित्र धर्मस्थळे उद्ध्वस्त केल्याने राजपूत दुखावले होते आणि नुकताच बैराग्यांनी दिल्लीला शह देऊन मोठा उधम केला होता.
शुद्धीकरणाच्या पंगती उठल्या आणि लगेचच गड रिकामा होण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी एकही हुद्देदार पाहुणा गडावर मुक्कामाला राहिला नव्हता. एवढेच नव्हे तर गडावर रेंगाळणारी रयतसुद्धा सूर्याजीच्या शिपायांनी काढून लावली. बिनकामाचा एकही माणूस गडावर उरला नाही. स्वराज्यातला प्रत्येक अधिकारी लगेचच आपापल्या जबाबदाऱ्यांवर रुजू झाला.
झाल्या प्रकाराने डिवचला गेलेला बादशहा कोणतेही घातक पाऊल उचलण्याची शक्यता होती. इतकेच नव्हे तर बहादूरखान आणि दिलेरखानासारखे कर्तबगार मोगल अधिकारी शाही हुकमाची वाट पाहत स्वस्थ बसून राहणे शक्य नव्हते. ते तातडीने कधीही जोरदार आक्रमक मोहिमा उघडणे शक्य होते. आदिलशाहीसुद्धा स्वराज्याच्या विरुद्ध हालचाल करणार असल्याची चिन्हे होती. शिवाय तशा मुस्तकीम खबरी सदरेवर दाखल होतच होत्या. सर्वांत धोकादायक शक्यता म्हणजे ‘इस्लाम खतरे में’ असल्याची आवई उठवत या दोन्ही सत्ता आपले ‘अहि-नकुल’ सख्य विसरून, हातमिळवणी करून एकत्र मोहीम सुरू करणे संभवत होते. आदिलशाहीत सध्या उत्तरी आणि त्यातही पठाणांचा दबदबा वाढला होता. अब्दुल करीम बहलोलखानासारख्या पठाणाने आपले मोठे वर्चस्व निर्माण केले होते. दिलेरखानासारखा मुत्सद्दी ही संधी सोडण्याची शक्यता फारच धूसर होती. त्याशिवाय त्याची आजवरची कर्तबगारी पाहता तो दिल्लीवरून हुकूम येण्याची वाट न पाहता हाच बागुलबुवा पुढे करून भागानगरच्या कुतुबशाहीलासुद्धा स्वराज्याविरुद्ध उभे करू शकत होता. दुर्दैवाने असे काही घडलेच तर आजवरचा इतिहास पाहता, या आयत्या चालून आलेल्या संधीचा गोवेकर आणि मुंबईकर या गोऱ्या सत्ता लाभ उठविण्यात मागे राहणार नव्हत्या. ते आणि जंजिऱ्याचा सिद्दी स्वराज्याच्या शत्रूंशी हातमिळवणी करणारच नाही असे सुतराम म्हणता येत नव्हते.
महाराजांसारख्या अष्टावधानी द्रष्ट्याच्या नजरेतून या सगळ्या शक्यता सुटणे शक्यच नव्हते; त्यामुळे त्यांनी प्रत्येक ठाणेदार, किल्लेदार, सरदारास सावधगिरीची सख्त सूचना रवाना केली होती. जागोजागीच्या सैन्य तुकड्यांना सज्जतेचे कडक हुकूम सुटले होते. पावसाळ्यासाठी घरी परतणाऱ्या शिलेदार-बारगिरांच्या रजा रद्द करून त्यांना छावणीतच ठेवून घेण्यात आले होते. खबरे आणि नजरबाजांवर विशेष कामगिरी सोपविली गेली होती.
शुद्धीकरणाचे क्रांतिकारी पाऊल उचलत असतानाच महाराजांची दृष्टी त्याचे परिणाम आणि प्रतिक्रियांचा वेध घेत होती. त्या अनुषंगाने निरनिराळ्या मोहिमांची आखणी होत होती. जेवणावळीच्या पंगती उठत असतानाच गडागडांवर तोफा, बंदुका ठासून जय्यत तयार होत होत्या. सैन्य तुकड्यांची हालचाल सुरू झाली होती. उत्सव समारंभाच्या धामधुमीतदेखील संरक्षणाच्या बंदोबस्तात अणुमात्र शिथिलता येऊ दिली गेली नव्हती.
चार दिवसांनंतर भरलेल्या दरबारात सर्व शास्त्रीमंडळींची यथास्थित संभावना केली गेली. सुपे भरभरून होन त्यांच्या पदरात घातले गेले. त्यांच्या विद्यार्थ्यांना यथायोग्य मानपान देऊन संतुष्ट करण्यात आले. याआधी इतर ब्राह्मणांना देकार आणि गोरगरिबांना दाने वाटली गेली होती. दरबारात नेताजींचा मोठा सन्मान करण्यात आला. गनिमाच्या छावणीत आणि नंतरसुद्धा त्यांनी जे हाल आणि कष्ट सहन केले, त्याला तोंड देत अचल धैर्य राखले, प्रदीर्घ काळ शारीरिक-मानसिक यमयातनांचा सामना करीत राहून आपल्या ध्येयावर अढळ दृष्टी ठेवली याची महाराजांनी विशेष नावाजणी केली. मानाची वस्त्रे देऊन कंबरेला रत्नजडित मुठीची तलवार बांधली. पगडीत शिरपेच खोवला. चिपळूणच्या छावणीची देखरेख सोपविली; परंतु महाराजांनी त्यांना कोणतेही पद वा पदवी बहाल केली नाही.
दुसऱ्या दिवशी प्रात:काळी शास्त्रीमंडळी गडउतार झाली. टोळशास्त्रींनी आपले दोन विद्यार्थी नेताजींकडून कृच्छ आणि चांद्रायणे करवून घेण्यासाठी गडावर मागे ठेवले. आता त्यांच्याच देखरेखीखाली नेताजींचा खाना शिजणार होता.
नेताजींचा राबता खुला झाला. मात्र मोरोपंत आणि महाराज गडावर नसल्यास किल्लेदार सूर्याजी पिसाळ यांच्या परवानगीशिवाय त्यांना कोणी भेटण्याची इजाजत नव्हती. महाराजांनी अनेक सरदार आणि मुत्सद्द्यांना दिवसातून किमान एकदा तरी त्यांची भेट घ्यावी असे सांगून ठेवले होते. त्याच दिवशी दुपारच्या भोजनानंतर महाराज गड उतरले आणि पावसाळ्याच्या पूर्वी करायच्या छावण्यांच्या आणि गडकोटांच्या पाहणीसाठी ते निघून गेले.
महाराज परतले ते पाठीवर पाऊस घेऊनच. नेताजींची उरलेली प्रायश्चित्ते पूर्ण होत आल्याने टोळशास्त्रींच्या विद्यार्थ्यांनी महाराजांचा निरोप घेण्याची इच्छा प्रदर्शित केली. पण कोसळत्या पावसात घाट ओलांडून भरलेल्या नद्या-नाले पार करीत पैठणपर्यंत प्रवास करणे धोक्याचे असल्याने महाराजांनी चातुर्मास संपेपर्यंत त्यांना गडावर राहण्याची आज्ञा केली. त्याशिवाय त्यांनी निराजीरावजींना त्यांच्यायोग्य कामे जोडून देण्यास सांगून ठेवले.
एका संध्याकाळी नित्याप्रमाणे सदर बसली. सदरेवर मोजकीच मंडळी हजर होती. बाहेर आषाढ पूर्ण भराने कोसळत होता. पावसाळ्यानंतर गनीम काय करतो याची वाट पाहत न बसता नेहमीच्या रिवाजास अनुसरून काढायच्या नव्या मोहिमांची ढोबळ आखणी सुरू होती. अनेक वर्षांनंतर हा अनुभव पुन्हा घेणारे नेताजी चांगलेच उत्साहात होते. चर्चा जरा थट्टामस्करीच्या अंगानेच सुरू होती. मध्ये संधी मिळताच नेताजी म्हणाले–
महाराज आता हे बसून खाणे बस्स झाले. बसल्या जागी बुडाला मुळ्या फुटण्याची पाळी आलीय. बुद्धीला गंज आणि हातापायांवर शेवाळ धरायला लागलंय. काहीतरी कामगिरी सांगा. नेताजीकाका कामगिऱ्या तर ढीगभर पडल्या आहेत. पण आता पाऊसकाळ उणावेपर्यंत तरी काही करणे शक्य नाही. त्याशिवाय आलमगिराची माणसे जंगली कुत्र्यांसारखी तुमचा माग काढीत आहेत. त्यांना अंगावर घेण्याची ही वेळ नव्हे. तेव्हा पूर्वी ठरल्याप्रमाणे तुम्हाला चिपळूणच्या छावणीची नेमणूक दिलेली आहेच तर तुम्ही सध्या काही दिवस चिपळुणास फौजेत मिसळून राहा. मग कामगिरी आहे आणि आपणही आहोतच.
पण गडावर अडकून राहून कसे निभावेल? काही चलनवलन हे हवेच. छे! छे!! असे कसे? चला बरे झाले अनायासे विषय निघाला. आज आम्ही हुकूम काढणारच होतो, या संबंधाने. परवाची एकादशी झाली की, तुम्हाला चिपळूणच्या छावणीकडे निघायचे आहे. तोपर्यंत पाऊससुद्धा उसंत घेईल. हंबीरराव नेताजीकाकांना चिपळूण छावणीत सोडण्यासाठी तुम्ही जातीनिशी जावे. फौजेवर तुमचा वचक आहेच. शिवाय तुम्ही अनेक वर्षे त्या छावणीत होतात; त्यामुळे नव्या परिस्थितीत नेताजीकाकांचे छावणीत बस्तान बसवून देणे तुम्हास सोईस्कर होईल, पौर्णिमेपर्यंत छावणीत पोहोचा. वद्य प्रतिपदेला बाजीप्रभू देशपांडे यांचे पुण्यस्मरण आहे तो मोका साधून नेताजीकाकांच्या अग्निदिव्याचे महत्त्व सर्वांवर ठसविणे तुम्हास सहज शक्य होईल.
*जशी आज्ञा.* *काही किरकोळ कामे उरकून महाराज सदरेवरून उठून गेले.*
महाराजांच्या अटकळीप्रमाणे खरोखरच एकादशीला दुपारनंतर पावसाने उघडीप दिली. द्वादशीला सकाळी गडाचे दरवाजे उघडताच हंबीररावांनी नेताजींना सोबत घेऊन गड सोडला. सोबत मोजकी शिबंदी होती. पाऊस थांबला असल्याने हवा सुंदर होती. खेडपर्यंतचा प्रवास अगदी झपाट्याने झाला. मात्र घाट चढून ते परशुरामाच्या जवळपास पोहोचले आणि पावसाने गाठले. पावसाचा जोर इतका भयंकर होता की, जणू आभाळच फाटले. भोवताली इतके दाट धुके पसरले की, तीन-चार हातांवरचे दिसणेही अशक्य झाले. भणाणता तुफानी वारा सुरू असूनसुद्धा धुके हटेना. कोंदटलेपणामुळे माणसांनाच नव्हे तर जनावरांनासुद्धा श्वास घेणे जड होऊ लागले. त्याउपर डोळे दिपविणारा विजांचा लखलखाट आणि कानाशी तोफ उडावी तसा ढगांचा गडगडाट. बिचकलेली घोडी पुढे सरेनात. जागच्या जागी खूर आपटीत शेपट्या फिस्कारीत उभी राहिली. त्यांना थोडे चुचकारून, थोपटून चालती केली आणि कसेबसे परशुरामाचे मंदिर गाठले. सोबतच्या मावळ्यांनी धावपळ करून मंदिराच्या ओवऱ्यांमध्ये कोरडी जागा पाहून खाशांच्या पथाऱ्या पसरल्या. देवळाच्या कारभाऱ्याने मंडळींसाठी गरमगरम तांदळाच्या भाकरी आणि फणसाच्या आठळ्या घालून केलेली कुळथाची उसळ पाठविली. चार घास खाऊन जरा मंडळी स्थिरावली. गप्पांच्या ओघात नेताजी म्हणाले–
हंबीरराव, आज कित्येक वर्षांनंतर हा आपल्या देशीचा पाऊस पाहण्याचे भाग्य लाभले. पावसाचा हा जोर, ही रौद्रता अफगाणिस्तानच्या पहाडी मुलखातसुद्धा अनुभवायला मिळत नाही. तिथे कहर घनदाट धुके आणि बर्फवृष्टीचा. आज या पावसाचा हा धडाका पाहून सिद्दी जौहरच्या वेढ्याच्या वेळेच्या पावसाची याद आली. अशाच भणाणत्या वाऱ्या-पावसात, घनघोर अंधारात महाराजांना पालखीत बसवून बाजी विशाळगडाकडे निघाले. खरोखरीच धन्य त्यांची.
जी सरकार, घाटात असताना माझ्या डोक्यातसुद्धा हाच विचार चालू होता. दिवसाउजेडी जनावरांच्या पाठींवर स्वार असताना आपण अगदी जेरीस येऊन ठेपलो. त्यांनी तो प्रवास कसा केला असेल, त्यांचे तेच जाणोत. सोबत खुद्द महाराज. त्यांच्या नखालासुद्धा धक्का लागू न देता त्यांना गनिमांच्या तावडीतून सोडवायचे याचा जीवघेणा ताण. त्याउपर गनिमांशी प्रहर अन् प्रहर दिलेली कडवी झुंज. आपल्या एका मावळ्याविरुद्ध गनिमाचे शंभर शिपाई. यांची दमछाक झालेली, ते ताज्या दमाचे. बाजींच्या आणि गुंजण मावळातल्या त्यांच्या सोबत्यांच्या क्षमतेची कल्पना करणे केवळ अशक्य. मनुष्यास आपली शक्ती, चिकाटी, श्रद्धा आणि समर्पणाच्या जोरावर काय करता येऊ शकते याचा घालून दिलेला वस्तुपाठच हा. महाराजांची प्रेरणा कोणाकोणाकडून काय काय दिव्य करवून घेईल सांगता येत नाही.
नेताजींनी चमकून हंबीररावांकडे पाहिले. ते निर्विकार भावाने पावसाच्या धारा निरखीत होते. त्यांना काही माहीत असावे असे त्यांच्या चर्येवरून तरी जाणवत नव्हते. नाहीतरी कोणता मराठा मनातले भाव चेहऱ्यावर दाखवितो म्हणा! माणसाची तोंडे पाहून आडाखे बांधणे मराठ्यांच्या बाबतीत तरी शक्य नाही, याचा आपल्याला विसर पडला की काय, अशी शंका त्यांच्या मनाला चाटून गेली. दुसऱ्या दिवशीसुद्धा पाऊस बेफाम कोसळत राहिला; त्यामुळे मुक्काम हलविणे शक्य झाले नाही. पण महाराजांच्या आज्ञेप्रमाणे वद्य प्रतिपदेचा योग गाठणे आवश्यक होते; त्यामुळे तिसऱ्या दिवशी पहाटे पावसाची तमा न बाळगता त्यांनी चिपळूणकडे प्रस्थान ठेवले. घाट उतरला की, चिपळूण हाकेच्या अंतरावर. दुपारपर्यंत छावणी गाठावी असा त्यांचा बेत होता. वसिष्ठी दुथडी भरून वाहत होती. पाण्याची ओढ नजर ठरू देत नव्हती. मात्र तशा पुरात बेधडक घोडी घालून सांजावण्याच्या सुमारास त्यांनी छावणी गाठली.
आठवडाभर छावणीत राहून आणि नेताजींची नीट व्यवस्था लावून, पाऊस उघडलेला पाहून हंबीरराव परत निघाले. परतताना मात्र ते पन्हाळ्याला जाऊन तिथून कऱ्हे पठार, सासवड, पुणे, जुन्नर अशा निरनिराळ्या छावण्यांची पाहणी करीत रायगडी पोहोचणार होते. महाराजांची आज्ञाच मुळी तशी होती. कोसळत्या पावसात कोणी पाहणीसाठी येणार नाही असे समजून जर छावणी सुस्त किंवा गाफील असेल तर तीस वचक बसणे जरुरीचे होते. त्याशिवाय अशा वेळी माणसांच्या आणि जनावरांच्या दाणागोट्याची सोय कशी आहे हे पण नजरेखालून घालता येते.
हंबीरराव गडावर पोहोचले तो राखी पौर्णिमेचा दिवस होता. त्यांनी टाकोटाक महाराजांकडे भेटीची इजाजत पेश केली. महाराजांनी उलट सांगावा धाडला– आपल्या ताईसाहेबांकडे राखी बांधण्यास याल तेव्हा भोजनोत्तर आमच्या खासगीच्या दिवाणखान्यात रुजू व्हावे. तेव्हा मोरोपंत, अनाजी, त्र्यंबक सोनदेव, प्रल्हादपंत, मानाजी काकडे, येसाजी शिळमकर, हिरोजी आदी मंडळींस हजर राखणे. बाळाजी आवजीस कलमदान ठेवून सिद्ध असो द्या. सर्वांच्या साक्षीनेच आम्ही सारा करीना ऐकू.
दुपारच्या भोजनानंतर महाराजांच्या खासगी दिवाणखान्याच्या महालात बैठक बसली. बोला हंबीरराव, एका एका ठाण्याचा आणि आमच्या पन्हाळ्याचा हालहवाल बैजावार तपशिलाने सांगा. हंबीररावांनी प्रत्येक ठाण्याचा इत्थंभूत झाडा दिला. महाराजांनी प्रत्येक बारीकसारीक गोष्टीचीसुद्धा तपशीलवार चर्चा केली. ज्या बाबींवर तातडीने हुकूम जारी करायचे होते त्यांचे तर्जुमे त्यांनी तिथल्या तिथे बाळाजींना सांगितले. हंबीरराव आणि इतर प्रधानांना योग्य त्या सूचना दिल्या. सरतेशेवटी त्यांनी विचारले–
सरनोबत, नेताजीकाकांची काय खबर? छावणीत हशमांचे आणि अंमलदारांचे बर्ताव कसे होते? महाराज, आडमुठ्या ब्राह्मणांना दिलेल्या शिक्षेसह शुद्धीकरणाची अवघी खबर छावणीत आधीच पोहोचली होती. ज्याला दस्तूरखुद्द आपण कौल दिला, प्रसंगी कठोरपण पदरी घेऊन शुद्ध करून घेतले, त्यांच्याबद्दल कोण शक शुबा धरणार? त्यांचे फारच आदराने स्वागत झाले. त्यांना पाहून जुन्या मंडळींचे ऊर भरून आलेले जाणवत होते. त्या मंडळींनी त्यांच्या पायांवर घालून घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. आपली छावणी, आपली फौज, आपले मावळे सारे आपले पाहून नेताजी सरकार फारच उल्लसित झाले. त्यांनी अगत्याने छावणीची पाहणी केली. त्यांच्या स्मरणशक्तीला दाद दिली पाहिजे. मला महाराज आपलीच आठवण आली. कित्येकांना त्यांनी नावानिशी ओळख दिली. घरची चौकशी केली, तसेच शिपायांत मिसळणे, तशीच सलगी देणे थेट आपल्यासारखेच. सारे त्यांना योग्य त्या मानाने आणि मोठ्या जिव्हाळ्याने वागवीत आहेत. आठ दिवसांतच नेताजी सरकार छावणीत चांगलेच सरमिसळून गेले आहेत. फक्त त्यांना मोगली फौजेत जडलेल्या काही सवयी मोडायला थोडा वेळ लागेल एवढेच… काही सवयी म्हणजे? काही गैर वा अवाजवी…?
छे! छे!! महाराज, तसे काही नाही. नेताजी सरकार एवढ्या साऱ्या दिव्यांतून जाऊन, एवढा ताण, कष्ट, हाल सोसूनसुद्धा कुठल्याही व्यसनाला बळी पडलेले नाहीत वा अय्याशीला चटावलेले नाहीत; ही शंभू महादेवाची कृपाच म्हणायची. पण छावणीतील रीतीरिवाजांच्या आपल्या वहिवाटी वेगळ्या, मोगली निराळ्या आणि महाराज इतक्या वर्षांच्या मानसिक ताणांच्या खुणा जाणवतात. स्वभाव थोडा चिडखोर अन् लहरी झाला आहे. भोगलेल्या कष्टांचा आणि हाल-अपेष्टांचा शरीरावर परिणाम झाला आहे. पूर्वीची तडफ, उमेद आणि काटकपणा आता राहिलेला नाही, हे प्रकर्षाने जाणवते. परशुरामापासून छावणीचे अंतर ते किती? पण पावसाच्या माऱ्यात अंतर काटताना त्यांची पुरती दमछाक झाली. मांडीखाली जनावर सांभाळण्याचे कसब पूर्वीचे राहिले नाही असे जाणवण्यास जागा आहे. नेहमी जुन्या जुन्या आठवणी काढून बोलत राहतात. मग अशा वेळी समोर कोण आहे याचेसुद्धा भान सुटते. न जाणो कधी पूर्वीची कुठली एखादी गुप्त मसलत त्यांच्या तोंडून बाहेर पडेल की काय याची धास्ती वाटू लागली आहे.
हे सारे असेच असेल आणि होईल याचा अंदेशा आम्हास आगाऊच आला होता. म्हणून इतके दिवस त्यांना आम्ही एकांतात ठेवून निरखीत होतो. जवळपास दहा वर्षे ते आलमगिराच्या छायेत वावरत आहेत, त्याला त्यांनी फार जवळून निरखले आहे. अनुभवले आहे, चांगलेच जाणले-जोखले आहे. काही कपट-कारस्थान करून दग्याने तो आपला जीव घेईल या भीतीने त्यांचे मन व्यापले असणे शक्य आहे. प्रत्यक्ष त्याच्या गोटात असताना, आदबखान्यातील छळाचा सामना करताना, त्याच्या पाताळयंत्री संशयाचा मुकाबला करताना ते मोठ्या दिलेरीने अन् बेदरकारपणे मृत्यूला आपल्या जुतीच्या ठोकरीवर वागवीत होते. पण आपल्या घरात, आपल्या माणसांत सुरक्षित वावरताना मात्र त्यांचे मन भयकंपित झाले आहे. हे असेच होत असते. या अनाठायी पण जीवघेण्या भीतीचा अनुभव आमच्यासुद्धा काळजाला स्पर्शून गेला आहे. आग्र्यावरून परतल्यावर आम्ही आजारी असताना, या भावनेशी आम्हीसुद्धा मोठी कडवी झुंज दिली आहे. त्या वख्ती आईसाहेब होत्या, त्यांनी, तुमच्या ताईसाहेबांनी आणि आमच्या अन्य महालांनी, तुम्हासारख्या सवंगड्यांनी आणि मनी कायम धगधगत असलेल्या ध्येयनिष्ठेने आम्हास फार लवकर सावरले. आम्ही आलमगिराच्या शिकंजात तसे फारच थोडा काळ होतो. त्याने आमची कोंडी केली. मनस्ताप दिला. मरणाचे भय शिरावर अष्टौप्रहर टांगत ठेवले. पण नेताजीकाकांनी प्रदीर्घ काळ त्याच्या दाढेखाली काढला. अकल्पनीय मानसिक आणि शारीरिक छळाचा मुकाबला केला आहे. एकाकीपणे आधाराशिवाय केवळ अनिश्चिततेचीच त्यांच्यासमोर निश्चिती होती, सतत अकरा वर्षे. आम्हास मिर्झाराजांसारख्या मातब्बर राजपुताच्या वचनाचा काडीइतका का होईना आधार होता. रामसिंहाचा आसरा होता. प्रेमाची, विश्वासाची आपली माणसे भोवती वावरत होती. करुणा भाकण्यास दैवते होती. त्यांच्या बाबतीत साराच उन्हाळा. ते सलामत परत आले. पण त्यांचा कबिला? त्याचा घोर त्यांच्या जिवाला आहेच. आलमगीर त्यांचा काय नतीजा करणार हे ते पुरते उमगून असणारच. कितीही दडवावे म्हटले तरी त्या भयानक खबरा लपून राहणे अशक्य. या कारणेच आम्ही त्यांस शिरपेच दिला, पण शिक्का कट्यार सोपवली नाही. स्वराज्याच्या ऐन गाभ्यात फौजेच्या गराड्यात ठेवले आहे. थोड्याच दिवसांत कदाचित ते मोठे आजारपणसुद्धा काढतील. त्याचीसुद्धा पुरती तजवीज राखा. त्यांना फार फार जपावे लागेल. त्यांचे मन सांभाळावे लागेल. उभारी वाटेल असे सतत त्यांच्याभोवती काहीना काही राखावे लागेल. विषण्ण शांतता पसरली, कोणालाच काही बोलणे सुचेना. शांततेचा भंग केला त्र्यंबक सोनदेवांनी. महाराज…
महाराजांची शून्यात गेलेली नजर त्यांच्यावर स्थिरावली. महाराज, एखादी बरीशी मुलगी पाहून त्यांचे लग्न लावून द्यावे असे वाटते. पंत, मसलत तर बरोबर आहे, पण ती दहा-अकरा वर्षांची पोर त्यांना काय सावरणार? उलटे तीच बिचारी घाबरून जायची आणि एक वेगळाच अनर्थ उभा ठाकायचा. पंत तुम्ही, अनाजी तुम्ही, मोरोपंत आणि प्रल्हाद निराजी तुम्ही, जातीनिशी लक्ष ठेवून त्यांची खबर घेत असणे. हंबीरराव, येसाजी, सर्जेराव अन् सूर्याजी तुम्ही सारे जमेल तसे त्यांना भेटत राहणे. त्यांचे मन मोकळे होईल हे पाहणे. मनाचा निचरा करण्यास चांगला खांदा मिळाला तर गोष्टी बऱ्याच सोप्या होतात. मिरजेहून व्यंकटेश भट वैद्यांना त्यांच्या दिमतीस रवाना करणे.
महाराज, नेताजीरावांची जुनी विश्वासू चाकरमंडळी आणि पूर्वीची तैनातीतली माणसे सोबत कोणी भरवशाचा मोहरा देऊन त्यांच्यासोबत ठेवली तर त्यांना सावरण्यास बळ येईल. आत्ता स्वामींनी जे सविस्तर विशद केले त्याची त्यांस पुरती जाण देऊन ठेवल्यास मंडळी साक्षेपाने राहतील. महाराज, अण्णाजी पंतांच्या म्हणण्यात तथ्य आहे. माझेही मत त्यांच्यासारखेच आहे. जणू माझेच विचार त्यांच्या मुखातून बाहेर पडले.
व्वा मोरोपंत! आत्ता बोलताना आमच्या मनातसुद्धा हेच नेमके घुमत होते. बघा कशी आपली मने तादात्म्य पावली आहेत. म्हणूनच तर केवळ भुवईच्या संकेतावर अवघडातले अवघड मनसुबे चुटकीसरशी पार पडतात. हंबीरराव, नेताजीकाकांची जुनी माणसे, सुभानराव, गोदाजी आणि खाशाबा असतील तेथून शोधून काढा. त्याचप्रमाणे मोगली छावणीतून त्यांच्या सोबतीने परत आलेले सिद्दी आफताब आणि नर्दुल्लाखान पठाण ही मंडळी त्यांच्या दिमतीला रवाना करा. त्या दोघांनासुद्धा दगा होण्याचा अंदेशा आहे. त्यायोगे त्यांचीपण चांगली हिफाजत होईल. जबाबदार असामी म्हणून हिरोजी फर्जंदास त्यांच्या निसबतीत जोडा. त्यास आमच्याकडे धाडून द्या म्हणजे त्यास करीनेवार समजवता येईल. जी महाराज.
दर आठ-दहा दिवसांनी आम्हास त्यांचे वर्तमान मिळत राहील याची मोरोपंत तुम्ही जातीने काळजी घ्या. जी. आज्ञा. इतका वेळ ही चर्चा मुकाट बसून ऐकणारा फिरंगोजी नरसाळा आपल्या पांढऱ्याधोप गालमिश्या पालथ्या मुठीने सावरीत म्हणाला– म्हाराज, अबय आसंल तर योक शंका इचारावी म्हन्तो. आता इतकी तालेवार हायती. उडत्या डोक्याची बामणं हायती पर आलं टकुऱ्यात, ते इचारू का? बोला बोला. बेशक विचारा. तुमच्या शंका मोठ्या नमुनेदार असतात. कधी कधी अवघड बाबी सहजी करून टाकतात. विचारा. न्हाई म्हन्जी आता ज्ये काय बोलनं जालं आज जे काय तुमी बोललासा, त्ये म्हन्जे नेताजी सरकार काय आता पुन्यांदा सरनोबत हुयाचे न्हाई किंवा ग्येलाबाजार तसलं काय थोरलं बांक्या जिम्मेदारीचा हुद्दा सांबाळन्याजोगं ऱ्हायले न्हाईत. म्हन्जे चार-दोन वरसं तरी काय तशी उमेद ऱ्हायली न्हाई. मंग म्हाराज, त्यांना परत आनन्याचा आन् सुद्द करून घेन्याचा येवडा जंगी खटाटोप क्येला तो समदा पान्यातच ग्येला म्हनायचा.
आम्ही म्हणालो ना, फिरंगोजीच्या शंका म्हणजे नमुनेदार असणार म्हणून. आता असे बघा फिरंगोजी, नेताजीकाकांना परत आणले म्हणजे आपण आपले हरवलेले माणूस परत मिळवले नाही का? अहो, गोठ्यातली एक कालवड वेळेवर परत आली नाही तरी जीव खालवरी होतो आपला. मग एवढा मोठा तालेवार तलवारीचा रुस्तम मोहरा काय वाऱ्यावर सोडून द्यायचा? दुसरे म्हणजे त्यांच्या निमित्ताने आम्ही हा खटाटोप केला तो गनिमाच्या डोळ्यांत अंजन घालण्यासाठी. काय. बरोबर की नाही?
जी अक्षी बरुबर हाय म्हाराज. तिच्या मायला तिच्या, आमचं टकुरं कायम फकस्त हानामारीचाच इचार करतंया. असलं नाजूक इचार आन गुंतावळ्याची हलक्या हाताची सोडवनुक कंदी ध्यानास येतच न्हाई. ह्ये समदी मंडळी हायती म्हनून ठीक हाय. न्हायतर आमचं काय खरं नव्हतं बगा म्हाराज. हसण्याचा एकच खकाणा उडाला आणि मंडळींच्या मनावर आलेली विषादाची, उदासीची मरगळ आपसूकच दूर झाली.
नेताजी चिपळूणच्या छावणीत स्थिरावले. रुळले. महाराजांच्या हुकमाप्रमाणे विशाळगडापासून ते थेट फोंड्यापर्यंत गडकोटांना भेटी देऊन तिथल्या शिबंदीची, बंदोबस्ताची पाहणी करू लागले. निमित्तानिमित्ताने मानकरी त्यांना भेटून जात. कधी हास्यविनोद होई, तर कधी जुन्या आठवणी उजळल्या जात. कधी महाराजांच्या वतीने कोणी मुत्सद्दी येऊन कोणा समस्येवर त्यांचा मनसुबा घेऊन जाई. असे वाटू लागले की, आता लवकरच नेताजी मूळ पदावर येणार. एक दिवस भल्या सकाळी आन्हिके आटोपून नेताजी छावणीतल्या शिवमंदिरात देवदर्शनास निघाले. तेवढ्यात प्रतापगडावरून रातोरात निघालेला हरकारा चौखूर घाड दाडवात सामारा आला. झप घत पायउतार हात त्यान कसाबसा मजरा घातला. फुलल्या श्वासातच त्याने निरोप सांगितला– सरकार, घात जाला.
नेताजी चमकले. मंदिराकडे न जाता तसेच माघारी फिरून छावणीच्या सदरेवर पोहोचले. चालतानाच भराभरा हुकूम देऊन त्यांनी महत्त्वाच्या मोहऱ्यांना सदरेवर बोलावले. रामप्रहरीच सदर बसली. सदरेबाहेर मावळ्यांची मोठी गर्दी जमली. हरकाऱ्याचा श्वास अजून निवत नव्हता. भरल्या श्वासातच त्याने सांगावा तोंडी सांगितला.
सरकार, रायगडास्न पंतपरधान मोरोपंत सरकारांची तातडीची थैली हाय. सरकार, घात जाला. कंदी व्हनार न्हाय त्ये जालं. परत्यक्ष युवराज संबाजीराज माहुलीच्या घाटावरून निसटलं आन गनिमाला, मोगली दख्खन सालार पटान दिलेरखानाला जाऊन मिळालं. संगत त्येंचा धाकला म्हाल दुर्गाबाई रानीसरकार हायती. म्हाराजांच्या हुकमापरमानं मोरोपंत सरकारांनी दर एक ठाना-गडकोट आन छावनीस अशीच थैली धाडलिया. सांच्याला गडावर थैली पावली आन किल्लेदारानं रातोरात थैली छावणीत दौडवली तो आत्ता पावता जालो. ह्ये थैली सोता नेताजी सरकारांच्या हाती द्येयाचा हुकूम हाय. अरे माझ्या कर्मा, हे काय करून बसले बाळराजे?
असे बोलत नेताजी ताडकन उभे राहिले. हरकाऱ्याने हाती दिलेली थैली त्यांना उघडवेना इतके त्यांचे हात थराथरा कापू लागले. अखेर त्यांनी थैली चिटणिसाहाती सोपविली. थरथरत्या हाताने त्याने हुकमाचा कागद बाहेर काढला आणि कापऱ्या आवाजात वाचायला सुरुवात केली. हरकाऱ्याने तोंडी सांगितलेले वर्तमान खलित्यात होते. शिवाय सावधगिरी ठेवण्याचे, युवराजांचे नाव घेऊन कोणी फंद माजविण्याची कोशिश करताना सापडल्यास त्याला थेट कडेलोट वा तोफेच्या तोंडी देऊन ठार करण्याचा हुकूम अतिशय कडक शब्दांत कळविण्यात आला होता. उभ्या उभ्या खलिता ऐकणारे नेताजी धाडकन खाली कोसळले. त्यांना उचलून मसनदीवरच आडवे झोपविले. मोठ्या प्रयत्नांनी ते शुद्धीवर आले. काही वेळ तसेच सुन्न बसून राहिल्यावर ते पुरते भानावर आले. भराभरा हुकूम सोडून छावणीचे पहारे चौक्या गस्त कडक करविली. पुढच्या हुकमापर्यंत कोणालाही छावणीबाहेर पडण्याची मनाई करण्यात आली. दोन मावळ्यांच्या खांद्यांवर हात ठेवून नेताजी कसेबसे कमऱ्यात पोहोचले.
तासा-दोन तासांत नेताजी सावरले. त्यांनी चिटणिसाला बोलावून घेतले. चिटणीस तातडीने महाराजांसाठी खलिता लिहा आणि घटकाभरात आमच्या दस्तुरीसाठी पेश करा. खलिता टाकोटाक रवाना झाला पाहिजे. त्यात आमची विनंती लिहा की, युवराज शेवटी आपलेच लेकरू. काय कारणे दुखावले आणि भलते करून बसले. सर्वेश्वर जाणे. सर्व अपराध पोटात घाला आणि हर प्रयत्न करून होईल त्या तातडीने लेकरास परत आणवा. आम्ही गनिमाहाती काय नतीजा पावलो ते युवराजांस तपशिले सांगावा. बादशहा मोठा दगाबाज, काफिरास दिलेले वचन मोडणे पाप नाही असे मानणारा. दिलेर त्याचाच खादिम. आपल्यावरील आणि आमच्यावरील राग लेकरावर काढल्याशिवाय राहायचा नाही. लेकरू हकनाक हातचे जायचे.
तिसऱ्या प्रहरी त्यांनी छावणीची सदर भरविली. मंडळी, नेमके काय घडले अन् युवराज हे करून बसले कोणालाच काही माहीत नाही. पण त्यांचे नाव घेऊन कोणी फितवा करू पाहील तर मुलाहिजा ठेवला जाणार नाही. प्रसंग पडलाच तर सरळ मुंडके मारले जाईल. आपली निष्ठा स्वराज्याशी, सांब सदाशिवाच्या आणि आई भवानीच्या पायांशी. आजपासून दस्तावेजाबिगर कोणी छावणी सोडून बाहेर जाणार नाही की कोणास आत घेतले जाणार नाही. येणारा प्रत्येक हरकारा, कागदाचा प्रत्येक चिटोरा प्रथम आमच्याकडेच आला पाहिजे. चिटणीस प्रत्येक गडावर कागद पाठवून खबरदारीचे आमच्या तर्फेचे हुकूम जारी करा. किल्लेदारांस सांगावा धाडा, आम्ही कुठल्याही क्षणी गडावर येऊन ठेपू. ढिलाईचा नतीजा बरा होणार नाही. दिवेलागणीला हिरोजी मुजऱ्यासाठी आला. नेताजींनी त्यास थांबवून घेतले. थोडे इकडचे तिकडचे किरकोळ बोलणे झाल्यानंतर अस्वस्थ हिरोजीने स्वत:च विषय काढला. हिरोजी मोठ्या तळमळीत बोलला–
सरकार, लई वंगाळ जालं बगा. परतेक्ष ल्येक बापाच्या, स्वराज्याच्या, धरमाच्या दुश्मनाकडं जावा. काय गुदरली आसंल म्हाराजांच्या काळजावं, ह्ये उद्याचं म्हाराज छत्रपती व्हायाचं; त्येंना काय अवदसा आटवली. कुनी हरामजाद्यानं फितवलं आसंल बाळराजास्नी काय उमगंना. हाती गावला तर आईची आन; पयलं मुंडकं तोडीन मंग नाव पुसीन.
हिरोजीचा शोक-संताप उरात मावत नव्हता. त्याला जशी महाराजांची चिंता वाटत होती तशीच युवराजांची पण वाटत होती. मध्येच त्यांचा संताप येत होता तर मध्येच कीव, कणव येऊन डोळे भरून येत होते. स्वत:चे मन आवरून नेताजींनाच त्यास सावरावे लागले. मग थोड्या वेळाने स्वत:शी बोलावे तसे ते बोलू लागले.
आम्हाला आठवतात बाळराजे, ते जन्मले तेव्हाचे; आम्हीच होतो किल्लेदार पुरंदराचे. आम्हीच दिला हुकूम तोफांना बत्ती देण्याचा. मिर्झाराजांच्या छावणीत ओलीस म्हणून राहिले तेव्हा फक्त नऊ वर्षांचेच होते. त्यांच्या हिफाजतीचा जिम्मा महाराजांनी आमच्यावर टाकला होता. रात्री जागवल्या त्यांच्या उशाशी हत्यार तयार ठेवून बसून राहण्यात! सुरुवातीस थोडे घाबरले होते. पण मग त्यांनी मराठी बाणेदारपणाने मिर्झाराजांस जिंकून घेतले. याच दिलेरचे गर्विष्ठ तोंड त्यांनी बंद केले होते. राजे तीन वेळा बादशहाच्या हातावर तुरी देऊन सुटले. आग्र्यातून, मग मथुरेतून आणि शेवटी औरंगाबादेतून. आता तो काही बाळराजांना गमावणार नाही. महाराजांनी तातडी करून त्यांना परत आणलेच पाहिजे.
काही महिने उलटले आणि थैलीस्वार दौडत आला. ‘युवराज परत आले’ असे ओरडतच तो छावणीत दाखल झाला. नेताजींना वर्दी पोहोचली तेव्हा ते खासगी कमऱ्यात पोशाख करीत होते. त्यांनी हरकाऱ्यास थेट तेथेच बोलावून घेतले. त्याने सुपुर्द केलेली थैली त्यांनी मोठ्या अधीरतेने उघडली पण त्यांना वाचणे सुधरेना. अखेर त्यांनी चिटणिसांकडूनच वाचून घेतली. एकीकडे त्यांना हसू येत होते, तर एकीकडे त्यांचे अंग हुंदक्यांनी गदगदत होते. छावणीत भांडी वाजविण्याचा आणि साखर वाटण्याचा हुकूम झाला. ढोल-ताशे, तर्फे-हलगी, शिंगे-तुताऱ्यांनी छावणी दणाणून गेली. मध्येच ठासणींचे बार फुटत होते. पालथ्या मुठीने डोळे कोरडे करीत, भरल्या आवाजात ते हिरोजीला म्हणाले–
हिरोजी, बाबा देव पावला. लेकरू घरी सुखरूप परत आले. बादशहाने जे आमचे हाल केले तेच त्यांचे केले असते यात काही शक नाही. कोवळे पोर नाही टिकते त्याच्यासमोर. देवा खंडेराया, माझी उमर लागू दे रे देवा युवराजांना. बराच वेळ मग ते आपण फुलादखानाच्या आदबखान्यात काढलेल्या दिवसांच्या आठवणी सांगत राहिले. - युवराज परत आले. पन्हाळ्यावर महाराज त्यांना भेटले. त्यांना कौल देऊन कोल्हापूर आणि कोकणचा सुभा त्यांच्यावर सोपवून महाराज रायगडी गेले पण त्यांनी युवराजांस रायगडी सोबत नेले नाही. येसूबाईंना माहेरी शृंगारपुरी राहण्याचाच हुकूम झाला. अशा बातम्या छावणीत येत होत्या. पण त्या बातम्यांचा धड अर्थ नेताजींना लागत नव्हता.
थोड्या दिवसांनी महाराज रायगडावर आजारी झाल्याची बातमी छावणीत पोहोचली. मागोमाग छावणीच्या खबरगिरांकडून खबरा आल्या की, रायगडाचा राबता बंद झाला आहे. महाराणी सोयराबाईंनी अनाजी दत्तोंना हाताशी धरून गडात चौक्या पहारे बसविले. मोरोपंत पेशवे आणि सरनोबत हंबीरराव मोहित्यांना सोयराबाईंनी मोहिमांच्या निमित्ताने दूर ठेवले होते. संभाजीराजांस पन्हाळा सोडण्यास मनाई झाली होती. छावणीवर विषादाची गडद छाया पसरली.
नेताजींनी महाराजांच्या दर्शनाची परवानगी घेण्यासाठी माणूस पाठविला पण त्याला पाचाडातूनच परतावे लागले. घडणाऱ्या घटनांचा नेताजींना अर्थच लागेना. गेल्या कित्येक महिन्यांत छावणीतील शिपाई बदलले गेले नव्हते कारण मोहिमा थंडावल्या होत्या. कोणा जबाबदाराची गाठभेट घडली नव्हती. हुकूम नसल्याने त्यांना पन्हाळ्यास जाऊन युवराजांची भेट घेणे शक्य होईना.
आणि एक दिवस विजेच्या लोळाप्रमाणे बातमी कोसळली, छत्रपती महाराजांना देवाज्ञा झाल्याची! आश्चर्य म्हणजे युवराज पोहोचण्याची वाट न बघता त्यांना भडाग्नी देऊन अग्निदाह उरकला गेला. प्रधानमंडळांच्या घरांवर चौक्या पहारे बसले. छावणीत सोयराबाईंच्या माहेरची म्हणून त्यांच्या विश्वासाची जी मंडळी होती त्यांना नेताजींवर नजर ठेवण्याची कामगिरी आली. रामराजांचे मंचकारोहण करवून रायगडावरून फौजा युवराजांना जेरबंद करण्यासाठी पन्हाळ्याच्या दिशेने निघाल्या पण सरनोबत हंबीररावांनी हालचाली करून सोयराबाईंच्या कारस्थानांना पायबंद घातला. युवराज रायगडी आले. महाराजांच्या निर्वाणानंतर नेताजींना काही न सांगतासवरता अचानक पन्हाळ्यास निघून गेलेला हिरोजी युवराजांच्या हाती जेर झाल्याची बातमी आली. नेताजी फारच कष्टी झाले. हिरोजीच्या गैरहजेरीत आता माल्होजी घोरपड्यांचा मुलगा संताजी नेताजींची मोठ्या आस्थेने देखभाल करीत होता. - महाराजांचा काळ झाला आणि नेताजींनी पुन्हा कधी उभारी धरलीच नाही. दिवस-दिवस विमनस्कपणे शून्यात बघत बसून राहत, तर कधीकधी रात्री-अपरात्री दचकून जागे होत आणि बायका-पोरांची नावे घेऊन हाका मारीत. दिसायला दणकट असले तरी घोड्यावरची मांड आणि हत्याराची पकड ढिली झाली होती. महाराज असताना चिपळूणच्या छावणीतूनच त्यांनी चार-दोन बारीकसारीक मोहिमा केल्या होत्या, पण ना त्यात पूर्वीची धडाडी होती ना पूर्वीचा जोश. छावणीतील सारे त्यांना खूप जपत, सांभाळत; पण त्यांच्या पश्चात हळहळत. हळूहळू नेताजींचा एकलकोंडेपणा वाढत गेला. आता त्यांनी आफताबखानाशिवाय आपले सगळे हुजरे आणि सेवक दूर सारले. आफताबखान सावलीसारखा अष्टौप्रहर त्यांच्या सोबत असे. कधी लहर लागली तर संताजीला समोर बसवून जुन्या आठवणी काढत, घटकान् घटका बोलत बसत. आदबखान्यातील, अफगाणिस्तानातील किंवा बादशहाच्या लहरी धर्मांधतेचे किस्से सांगत बसत. आपण आतून खचत चालल्याचे आणि आपली ताकद घटत चालल्याचे त्यांना जाणवू लागले होते. ती खंत ते संताजीकडे आणि आफताबकडे बोलून दाखवीत.
एक दिवस दुपारच्या थाळ्यानंतर आचवत असताना त्यांच्या हातातून लोटा निसटला. त्यांना आपला उजवा हातच हलविता येईना. हाती तोंडपुसणी घेऊन जवळच उभ्या असलेल्या आफताबखानाच्या ध्यानी येण्यापूर्वीच ते धाडकन खाली कोसळले. बघताबघता त्यांचे उजवे अंग लुळे पडले. रायगडावर संभाजीराजांकडे तातडीने खबर रवाना झाली. त्यांनी आपला स्वत:चा वैद्य त्यांच्या उपचारास धाडला. कबुतराच्या रक्ताने, सांड्याच्या तेलाने, घोरपडीच्या तेलाने, वाघाच्या चरबीने, कशाकशाने त्यांना मालीश केले याची गणती नाही. पण त्यांना उतार पडेना. एके काळी ज्याच्या नुसत्या नावाने गनिमांना थरकाप सुटे असा दिलेर मोहरा लोळागोळा होऊन खाटेवर पडलेला बघवेनासा झाला. असेच जवळपास चार महिने लोटले. आता ताप भरू लागला. तापाच्या ग्लानीत त्यांना भ्रम होऊ लागला. अशा अवस्थेत असताना ते महाराजांना भेटायला नेण्याचा हट्ट धरू लागले. समोर दिसेल त्यांच्याकडे त्यांचा एकच धोशा असे–
मला महाराजांकडे जायचे आहे. बहिर्जीला बोलवा. तो मला महाराजांच्या पायाशी घेऊन जाईल. तुम्ही सारे कुचकामी आहात. मला महाराजांपासून दूर ठेवता. कसेही करा, मला महाराजांना भेटवा. मला त्यांची माफी मागायची आहे. त्यांनी सोपविलेली कामगिरी मी त्यांच्या मनाजोगती करू शकलो नाही. उलट त्यांना अतोनात त्रासच दिला. माझ्यासारख्या करंट्यासाठी स्वराज्याच्या सेवेतील नामांकित माणसे नाहक खर्ची पडली पण हाती काही लागले नाही. मी पापी आहे. त्यांची बायका-पोरे माझ्यामुळे उघडी पडली. मी त्यांचा, महाराजांचा, स्वराज्याचा अपराधी आहे. मला त्यांची क्षमा मागू द्या. असेच दोन महिने उलटले. हळूहळू त्यांची वाचा क्षीण झाली. नजर हरवली. अगदी तोंडाशी कान नेला तर जाणवे, त्यांचे ओठ महाराजांच्या नावाचा जप करीत आहेत. एके दिवशी रात्री तब्येत फारच बिघडली. श्वास धड चालेना. मध्येच आचके येत. घशातून विचित्र आवाज निघत. संताजीने माणूस पाठवून राजवैद्यांना बोलावून घेतले. वैद्यबुवांची चर्या गंभीर झाली. पंत, कशी हाय सरकारांची प्रकृती?
कठीण आहे. आजची रात्र निभावली तरी पुरे. अरे द्येवा, आता म्या युवराजास्नी काय तोंड दावू? त्यांनी नेताजी सरकारांना माज्यावर सोपवला, पर म्या त्यास्नी न्हाय राकू शकलो. कुटं फेडू ह्ये पाप? संताजी, सबूर. तू तुझे कर्तव्य चोख पार पाडलेस. दैवगतीसमोर कोणाचा काय इलाज चालणार? प्रत्येकाची वेळ ठरलेली असते. प्रत्यक्ष ब्रह्मदेवसुद्धा त्यात ढवळाढवळ करू शकत नाही. शोक आवर. पंत, जायाचं तर हर येकाला हाये. पर नेताजी सरकारांसारका तिखट हत्याराचा आन अफाट अकलेचा रणनवरा ह्यो असा खाटेवर पडून झिजतझिजत जावा यापरीस दुसरे वंगाळ काय न्हाई. येकाद्या निकराच्या झुंजात परतापरावांवानी पडते तर डोळ्यांतल्या पान्यानं शेले जरूर भिजते. पर मोटा अभिमान वाटता. संताजी, हेच प्राक्तन. यालाच विद्वान दैवगती म्हणतात. अस्तु. मी हेमगर्भाची मात्रा चाटवली आहे. कितपत काम करेल हरी जाणे. पण सावध असा. कदाचित शुद्धीवर यायचे. काही महत्त्वाचे सांगायचे. जी. पंत, मी हतंच बसलेला हाय. संगतीला ह्यो आफताबखान बी हायेच की. आमी पुरते सावध ऱ्हाऊ. ठीक आहे. आता येतो आम्ही. काही विपरीत जाणवले तर पुन्हा बोलावण्यास अनमान करू नका, मग रात्र कितीही चढलेली असो.
वैद्यबुवांच्या मते धीर देऊन पण प्रत्यक्षात घोर लावून वैद्यबुवा निघून गेले. पायथ्याशी बसून आफताबखान काशाच्या वाटीने तळव्यांना तूप घासत राहिला. संताजी उशाशी बसून नेताजींचा क्षीण, म्लान चेहरा एकटक निरखीत राहिला. दोघे एकमेकांशी शब्द बोलत नव्हते. आफताबखानाच्या मनात अनेक आठवणी कल्लोळत होत्या. त्याच्या डोळ्यांसमोर त्याने पाहिलेली अनेक रूपे उमटत होती. अधूनमधून अंगच्या बाहीने तो पाझरणारे डोळे पुसत होता. कोणासाठी न थांबणारा काळ सुसाट धावत होता; मात्र दोघांना तो मुंगीच्या पावलांनी चालल्यासारखा भासत होता. मध्यरात्र उलटली. पहाटेचा गार वारा सुटला. अचानक नेताजींनी डोळे उघडले. त्यासरशी बेसावध संताजी एकदम दचकला. नजर अगदी स्वच्छ होती. त्यांनी स्वच्छ पण धिम्या आवाजात हाक मारली– आफताब… जी सरकार. पाणी… जी सरकार. तिवईवरील गडव्यातील पाणी आफताबने त्यांच्या मुखात सोडले. दोन-तीन शिंपले भरून पाणी पाजले. थोडे ओठाबाहेर सांडले ते पंचाने टिपून घेतले. संताजीने त्यांच्या कपाळाला हात लावला. हलक्या आवाजात पुसले– कसं काय वाटतंया सरकार? काय वेळ झालीय आफताब? जी. पहाट होत्येय सरकार. नुकतीच पहिल्या कोंबड्यानं बांग दिली. सरकार उगा जास्त बोलू नगासा. शीन हुईल. निवांत झोपा. आय भवानी समदं गोमटं करील. तुम्हास काय पायजे का सरकार?
आफताब, देव्हाऱ्यात आईच्या पूजेचे तीर्थ असेल तेवढे माझ्या मुखी घाल. झटकन उठून संताजीने देवासमोरच्या पंचपात्रातले तीर्थ आणून पळीने त्यांच्या ओठाशी नेले. आफताब… संताजीने आफताबकडे पाहिले आणि मुकाटपणे पळी-पंचपात्र आफताबच्या हाती सोपविले. त्याने पळीने थेंब थेंब तीर्थ नेताजींच्या मुखात सोडले. पंचपात्र तिथेच उशाशी तिवईवर ठेवले. हलक्या आवाजात बोलला–
सरकार, आराम करा. जास्त बोलू नका. बोलू दे, बोलू दे. पुन्हा वेळ मिळणार नाही. बोलू दे. पापी औरंग्याने माझ्या अवघ्या कुटुंबाची धूळधाण केली. माझ्या बायका, माझी पोरे ठार केली. माझ्या एका चुकीची सजा बिचाऱ्यांनी प्राणाचे मोल देऊन भोगली. आज माझी घटका भरली. माझ्या शेजारी ना माझी कोणी बायको आहे ना एकदेखील मुलगा. कुणी सगासोयरासुद्धा नाही.
सरकार, बोलू नगासा तरास व्हईल. निवांत व्हा. आफताब, मी महाराजांच्या कामात कुचराई केली. त्याच पापाचे हे फळ आहे. पोटच्या पोराची मांडी माझ्या नशिबी नाही. त्याच्या हातून मुखी पाणी घेण्याचे नशिबी नाही. आफताब, लेकरा तू मुखी पाणी घातलेस आता तूच माझा लेक. माझे डोके मांडीवर घे. तूच आता माझे सर्वस्व. तूच मला डाग दे. हुंदका रोखण्यासाठी आफताबने खांद्यावरच्या गमछाचा बोळा तोंडात कोंबला. मोठ्या प्रयासाने संताजीने आपला कंठ रोखला. मात्र त्याचा स्वर भरलेलाच होता. असं बोलू नगासा सरकार. आई भवानी समदं गोमटं करील. पंतांनी दवा बदलून दिलिया. मनलं, लई गुनकारी हाय. पंधरा-ईस दिसांत चांगलं हिंडाया लागाल.
आफताब, बोलू दे. महाराजांशी भेट झाली नाही. त्यांना माझा सांगावा सांग. माझा सांगावा त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. नाहीतर ओठातला घास ताटात टाकून ते धावत भेटीस येते. आफताब, आता दम धरवत नाही. मीच करंटा. महाराजांच्या एका शब्दावर भल्याभल्यांनी प्राण उधळले. असुदाच्या धारा वाहिल्या. देहाची कुरवंडी केली. पण मी चांडाळ निपजलो. महाराजांची इच्छा पूर्ण नाही करू शकलो. मात्र माझ्यामुळेच त्यांना यातना झाल्या. मनस्ताप सहन करावा लागला. मी करंट्याने त्यांचे सारे मनसुबे नासवून टाकले. त्यांच्या विश्वासाला, प्रेमाला मी पात्र ठरलो नाही. आफताब माझ्यासाठी तू महाराजांची माफी माग. महाराजांना सांग, पुढच्या जन्मी तरी त्यांच्या मनास येईल अशी सेवा हातून घडावी हे मागणे देवाकडे मागतच हा अभागी नेताजी गेला.
*नका नका सरकार, असं वेडंवाकडं काही बोलू नका. व्हाल तुम्ही बरे…* *असे म्हणत त्याने नेताजींच्या कपाळावर हात ठेवला. त्याने चटकन हात मागे घेतला. अंग थंडगार पडले होते. डोळे थिजून पार गारगोट्या होऊन गेले होते. छातीचा भाता थांबला होता. कपाळावरचा हात दूर होताच मान एका बाजूला कलंडली.*
*पुरंदराच्या बालेकिल्ल्यासारखा अभेद्य, सह्याद्रीच्या बुलंद कड्यासारखा बेलाग, हुताशनीच्या होमासारखा धगधगता, हनुमंतासारखा निष्ठावान इमानी मोहरा काळाच्या प्रवाहात मातीच्या ढेकळासारखा विरघळून गेला. कीर्तीचा मृद्गंध काही काळ दरवळला आणि वातावरणात विरून गेला. मागे उरला गैरसमजुतीचा, अपकीर्तीचा चिखल. धन्याच्या एका शब्दाखातर पतिव्रता सतीसारखे अग्निदिव्य हसत झेलत राहिला, मागे उरली केवळ राख; कोणी तिला भस्म-विभूती म्हणून मस्तकी धरले नाही. सर्वव्यापी बलवान काळाने ती बारावाटा वाऱ्यावर उधळून दिली. एक अग्निदिव्य संपले.* *--------------------------------------________________*
*जे सदस्य वाचन करत असतील त्यांनी अभिप्राय अवश्य देने🙏🏻*

*नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔* *अग्निदिव्य* भाग - 37⃣

*नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜*
*अग्निदिव्य*
*_______📜🗡भाग - 3⃣7⃣🚩🗡________*

*लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार*

*___🚩📜🚩_______*
*गुरुवारी पहाट ताऱ्याचे चांदणे रायगडावर उतरले आणि नगारखान्यात रुद्रगंभीर नौबत दुमदुमू लागली. त्या मागोमाग जगदीश्वराच्या देवळात आणि होळीच्या माळावर उभारलेल्या मंडपात चौघडा सुरू झाला. सनईचे मंगल सूर वातावरण उल्लसित करू लागले. तोरणा-राजगडाच्या दिशेने आकाश लाल-शेंदरी होऊ लागण्यापूर्वीच टोळशास्त्री आणि ढेरेशास्त्रींचे विद्यार्थी मांडवात पोहोचले. त्यांनी लगेचच धार्मिक विधींची तयारी, चौरंग व देवतायनांची मांडामांड वगैरे कामे सुरू केली. त्यांच्या काही सहकाऱ्यांनी रात्रभर जागून शिंपण, लिंपण, सारवण, रांगोळी रेखन, तसेच लतापल्लव, तोरणे, ध्वजारोपण इत्यादी यथास्थानी करवून घेतले होते. मंडपात ही कामे सुरू असतानाच प्रेक्षक रयतेने अन् निमंत्रित मानकऱ्यांनी मंडपात जागा धरायला सुरुवात झाली. त्यांच्यात उत्साह तर एवढा होता की, जसजसे हुजरे पोस, चादरी, लोड-गिर्द्यांची मांडामांड करू लागले तसतसे त्यावर मानकरी जागा धरू लागले. कित्येकजण तर आपला मरातब बाजूला ठेवून त्यांना त्या कामी मदतसुद्धा करू लागले.*
इकडे नेताजींना भल्या पहाटेसच उठवून त्यांचे पुन्हा एकदा विधिवत क्षौर करविण्यात आले. टोळशास्त्रींच्या विद्यार्थ्यांच्या देखरेखीखाली त्यांची गोमूत्र, गोमय, गोधुली, क्षेत्रमृत्तिका व शुद्धोदक स्नाने झाली. एक कोरा पंचा कंबरेस आणि एक दोन्ही खांद्यांवर पांघरून त्यांना अनवाणी मंडपात नेण्यात आले. गोमयाने सारवून धर्मविधीसाठी तयार करण्यात आलेल्या चौकाच्या बाहेरच्या अंगाला एका तृणासनावर त्यांना बसविण्यात आले. तोपर्यंत शास्त्रीमंडळी मंडपात उपस्थित झाली. गणेशशास्त्री जांभेकर, सोबत अन्य काही विद्वान द्विजवरांना घेऊन, महाराजांच्या आज्ञेप्रमाणे शुद्धीकरण प्रयोगात अत्यंत आस्थेने सामील झालेले दिसत होते. ब्रह्मवृंद त्यांना आदराने व सन्मानाने वागविताना दिसत होता.
मंडपपूजन, अष्ट दिग्पाल स्थापना, नवग्रह स्थापना, मातृका स्थापना, देवायतन व देवक स्थापना वगैरे प्राथमिकता पूर्ण होण्यापूर्वीच महाराजांना वर्दी गेली. अर्ध्या घटकेत महाराजांची पालखी देवक स्थानापर्यंत आली. त्यांच्या पाठोपाठच महाराणी सोयराबाई साहेबांचा मेणा दाखल झाला. अन्य राण्यांचे मेणे पोहोचले. रामराजांच्या बोटाला धरून शंभूराजेसुद्धा दाखल झाले. हाती नारळ देऊन टोळशास्त्रींनी महाराज व राणीसाहेबांचे स्वागत केले. उभयतांनी सर्व ज्येष्ठ ब्राह्मणांस चरणस्पर्श करून नमस्कार केला आणि पुण्याहवाचनासाठी आसनस्थ झाले. महाराज, दो नेत्रांस उदकस्पर्श करावा. हरि: ॐ।। केशवाय नम:।। ॐ नारायणाय नम:।। ॐ माधवाय नम:।। ॐ गोविंदाय नम:… ब्राह्मण खणखणीत वाणीने मंत्रोच्चार करू लागले. आचमन, प्राणायाम करून पुण्याहवाचनास सुरुवात झाली.
हरि: ॐ।। श्रीमन्महागणाधिपतये नम:।। इष्ट देवताभ्यो नम:।। कुलदेवताभ्यो नम:।। ग्रामदेवताभ्यो नम:।। दुर्ग देवताभ्यो नम:।। स्थानदेवताभ्यो नम:।। शचिपुरंदराभ्याम् नम:।।… विनायकं गुरुं भानु ब्रह्माविष्णू महेश्वरान् । सरस्वती प्रणम्यादौ सर्व कार्यार्थ सिद्धये।।… श्रीमद्भगवतो महापुरुषस्य, विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य, अस्य ब्रह्मणे द्वितिये परार्धे… भरतवर्षे भरतखण्डे जंबुद्वीपे दंडकारण्यांतर्गत अपरान्ह देशे, सह्यगिरी पर्वतशिखरे सिंधूसागराया: पूर्वेतीरे, गोदावर्या: दक्षिणेतीरे शालिवान शके… तथाच शिवराज्याभिषेक शके… देशकालाचा यथोचित विधिवत उच्चार करून, बाह्मणांनी शुद्धीकरण प्रयोगाचा संकल्प सांगितला. …मम सेनाध्यक्ष: पालकर कुलोत्पन्न: नेताजीवर्मनस्य प्रायश्चित्तोपरी वैदिकधर्मे पुनरागमनार्थे शुद्धीकरण कार्यांतर्गत यथाशास्त्रेण पुण्याहवाचम् अहम् करिष्ये । तथाच… त्यानंतर तदंगभूत देवतापूजन, हवनादींचा यथास्थित संकल्प सांगितला गेला. संकल्पोत्तर श्रीगणेशाची आद्यपूजा झाली. ॐ गणानां । त्वाम् गणपतिं हव:महे । कविं कविनामुपश्रवस्तंम् । ज्येष्ठराजं ब्रह्मणा ब्रह्मणस्पत आ न श्रुण्वन्नुतीभि: सीद सादनम् ।। यानंतर भूमिपूजन, आसनशुद्धी, दिग्बंधन, न्यासादी पूर्वकर्मे करून चौरंगावर कलश स्थापना केली गेली. ॐ आषधयै: संवदन्ते सोमेनसहराज्ञा । यस्मै कृणोति ब्रह्मणस्तु राजन्पारयसि ।। कलशस्य मुखे विष्णू कण्ठे रुद्र… कलशपूजन झाले. त्यावर पूर्णपात्र स्थापिले– ॐ पूर्णं दर्वी परातवसपूर्णा पुनरावत: ।… कलशावर स्थापित पूर्णपात्रामध्ये गणेश, वरुण, शचिसह इंद्र आदी देवतांची स्थापना व पूजन झाले. त्यानंतर महाराजांकडून नांदीश्राद्ध करविण्यात आले. सत्यवसु संज्ञका विश्वेदेवा नांदीमुख: भूर्भुव: स्व:… नांदीश्राद्ध होत असताना मंडपात मंगलवाद्यांचा, शंख, घंटांचा ध्वनी निनादत होता. मंडपाबाहेर शिंगे, तुताऱ्या गर्जून उठल्या. यानंतर प्रत्यक्ष पुण्याहवाचनास सुरुवात झाली. यजमान म्हणून ब्राह्मणांनी महाराजांस म्हणण्यास सांगितले– यं कृत्वा सर्ववेद करण कर्मारंभा: शुभा: शोभता: प्रवर्तत तमहमोंकारमादिम् कृत्वा ऋग्यजु: समाशीर्वचनम् बृहवृमिमंत भगविद्भिरनुज्ञात: पुण्यं पुण्यामहं वाचयिष्ये । मग पुरोहित म्हणाले– ॐ द्रविणोदाद्रविणसस्तुरस्य द्रविणोदा… महाराजांना पुन्हा म्हणण्यास सांगितले गेले– मह्यम् सहकुटुंबिने सहपरिवारे महाजनान्नमस्कुर्वाणाय आशीर्वचनम् अपेक्षमाणायाद्य करिष्यमाणा शुद्धीकरण कर्मण: पुण्याहम् भवन्तो ब्रुवन्तु ।। पुरोहित म्हणाले– ॐ पुण्याहमिति… पुण्याहवाचन सुरू असतानाच श्री शंभूमहादेवास आणि श्री देवीस अभिषेक सुरू झाला. ॐ नमस्ते रुद्र मन्यव उतो त इषवे नम: । नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्याम् उत ते नम: ।।… गौरी पद्मा शचिर्मेधा सावित्री विजया जया । देवसेना स्वधास्वाहा मातरो लोक मातर: ।।… पुण्याहवाचन आणि देवतांचा अभिषेक यथासांग पार पडला. महाराजांच्या उजव्या हातास बसलेल्या सोयराबाईंना आता महाराजांच्या डाव्या हातास बसण्याची ब्राह्मणांनी सूचना केली. अभिषेके पत्नी वामत: टोळशास्त्रींनी सर्व कलशांमधील पाणी एका सुवर्ण ताम्हनात व अभिषेकाचे तीर्थ दुसऱ्या सुवर्ण ताम्हनात काढून चित्रावशास्त्री आणि गणेशशास्त्रींच्या हवाली केले. तसेच दर्भाचा एकेक अभिमंत्रित कुर्चा आणि आंबा, जांभूळ, वड, पिंपळ व औदुंबर अशा पाच महावृक्षांच्या दोषरहित पानांची एकेक जुडी त्यांच्या हवाली केली. मागोमाग गोमूत्रासह पंचगव्याने भरलेले तांब्याचे छोटे घंगाळ, दर्भ कुर्चा व महावृक्षांच्या पानांची जुडी घेऊन विनायक भट आणि तीर्थोदकाने भरलेले चांदीचे छोटे घंगाळ घेऊन ढेरेशास्त्री नेताजींच्या संमुख उभे झाले. ॐ समुद्र ज्येष्ठां सलिलस्य मध्यंतुनानाय… उच्चरवात होणाऱ्या मंत्रघोषात महाराजांस सपत्नीक अभिषेक होऊ लागला. नेताजीरावांस सिंचन होऊ लागले. काही ब्राह्मण तीर्थोदकाचे सिंचन महावृक्षपर्णाने उपस्थित जनसमुदायावर करू लागले. सारे श्रद्धायुक्त अंत:करणाने लीन होऊन पवित्र जलाचे तुषार अंगावर घेत राहिले. अभिषेक विधी पूर्ण झाल्यानंतर पुरोहितांनी महाराजांस सपत्नीक पाचारण केले व त्या उभयतांच्या हस्ते नेताजींवर पुनश्च संमंत्रक सिंचन करविले. नेताजींस गोमूत्र व पंचगव्याचे तीर्थ प्राशनास दिले गेले.
महाराज व सोयराबाई यज्ञवेदीजवळ आले. टोळशास्त्रींच्या सूचनांप्रमाणे ते यज्ञकुंडासंमुख पूर्वाभिमुख बसले. त्यानंतर नेताजी मंडपाशेजारीच उभारलेल्या आडोशात जाऊन स्नान करून ओलेत्याने पूजेच्या चौकाजवळ आले. चौकाबाहेर उभे करून त्यांना पुनश्च संमंत्रक पंचगव्य प्राशनास दिले गेले. चौकाच्या आतल्या बाजूस मात्र अगदी कडेला बसवून त्यांना विधिवत प्रायश्चित्त दिले गेले. प्रायश्चित्तोपरी त्यांनी पुन्हा स्नान केले आणि ते सोवळे नेसून, सोवळ्यातील उपरणे दोन्ही खांद्यांवर पांघरून महाराजांच्या शेजारी यज्ञकुंडासंमुख बसले. ढेरेशास्त्रींनी महाराजांकडून ब्राह्मणद्वारे होम करविण्याचा संकल्प करून घेतला. ब्रह्मा, होता, कर्ता व उद्गाता यांच्या वर्णी लावून घेतल्या. ब्राह्मणांनी अरणीमध्ये मंथा घुसळून संमंत्रक अग्नी सिद्ध केला. होमकुंडात विधिवत यज्ञीय अग्नीची प्रतिष्ठापना झाली. समिधा आणि तुपाच्या आहुत्यांनी यज्ञकुंड पूर्णार्थाने प्रज्वलित झाले. चौकाशेजारी जेथून सर्व विधी व्यवस्थित दिसतील अशा रीतीने मांडलेल्या आसनावर महाराज जाऊन बसले. राणीवशात मांडलेल्या सोवळ्यातील स्वतंत्र आसनावर सोयराबाई सुखावल्या. देवतांची पूजा व अभिषेक करण्यासाठी नेताजी देवायतनासमोर जाऊन बसले.
धूप आणि अगरबत्त्यांच्या सुगंधावर मात करून होमाच्या सुगंधाने अन् धुराने सारा मंडप कोंदून गेला. उच्चरवात होणाऱ्या ब्राह्मणांच्या मंत्रघोषाने दुमदुमून गेला. वातावरणात एक अद्भुत भारलेपण भरून राहिले होते. याच स्थानी काल काही कांड घडून गेले याची पुसटशी खूणसुद्धा आता मागे उरली नव्हती. होम धूमाने उरलीसुरली जळमटे जळून गेली. साऱ्या शंका-कुशंका आपोआपच भस्मसात झाल्या. सर्वत्र एक धीरगंभीर, पवित्र मांगल्य भरून राहिले होते. बघता बघता पूर्णाहुतीची वेळ आली.
नव्या कोऱ्या निर्दोष बांबूंच्या तिकाटण्यांवर केळीच्या सोपटांची पन्हळ उभारली गेली. पन्हळीचे बाहेरचे टोक यजमानास सुरक्षित अंतरावर पण यज्ञकुंडासमीप उभे राहता येईल असे, तर दुसरे टोक नेमके यज्ञकुंडाच्या केंद्रस्थानी येईल अशी मांडणी केली होती. पूर्णाहुतीच्या तुपाच्या संततधारेने उफाळणाऱ्या ज्वालांचा उपद्रव तर होऊ नये आणि तुपाची अखंड धार नेमकी अग्नीमध्ये पडावी हा त्यामागचा साधा सरळ उद्देश होता. टोळशास्त्रींनी पन्हळीच्या एका बाजूस महाराजांना सपत्नीक उभे केले आणि महाराजांच्या हाती तुपाने भरलेली सुवर्णझारी दिली. चांदीची झारी देऊन नेताजींस दुसऱ्या बाजूस महाराजांसंमुख उभे करण्यात आले! दोघांच्या मधोमध एक ब्राह्मण तुपाने भरलेले मोठे पातेले घेऊन उभा झाला. पन्हळीमधून महाराजांनी व नेताजींनी तुपाची धार सोडण्यास सुरुवात केली आणि उच्चरवात पूर्णाहुतीचे मंत्र म्हटले जाऊ लागले. प्रज्वलित यज्ञकुंड धडाडून उठले. असे वाटले, ज्वाला छतास स्पर्श करतील. पूर्णाहुती पूर्ण झाली. घृतधारा थांबल्या. उफाळत्या ज्वाला कमी झाल्या. फुलमाळा आणि जरीच्या कलाबतूने मढविलेले श्रीफळ महाराजांनी यज्ञकुंडास अर्पण केले. नंतर यज्ञपुरुषास अहेर म्हणून एक वस्त्रयुग्म, सुवर्णतंतूंचे यज्ञोपवित आणि अभिमंत्रित अक्षतांची आहुती यज्ञकुंडात देण्यात आली. होमकुंडात ओदनचरुचा, तर मंडपाबाहेर काटेकोहळ्याचा बळी देण्यात आला. महाराजांना सवाष्णींनी अवभृत स्नान घातले, तर नेताजींना शागिर्दांनी मांगलिक स्नान घातले. पूर्ण पोशाखात क्षात्रवेषात मंडळी चौकात परतली. महाराजांनी नेताजींना रीतीप्रमाणे अहेर केला. यज्ञनारायण व देवतांस नेताजींकरवी महानैवेद्य दाखविण्यात आला. वाद्यांच्या दणदणाटात महाआरती झाली. चढ्या आवाजात देव्यांसह मंत्रपुष्प झाले. त्यासरशी मंडपाबाहेर बंदुकांचे बार उडाले. बुरुजांवरून तोफांचे आवाज दऱ्याखोऱ्यांमध्ये दुमदुमले. नेताजी पालकरांचा शुद्धीकरण प्रयोग पूर्ण झाला. महम्मद कुलीखान पुनश्च नेताजीराव पालकर म्हणून स्वगृही परतला. मात्र जे गमावले होते ते पुन्हा भरून येणार नव्हते. जखमा बुजल्या तरी व्रण कायम राहणार होते. सर्व धर्मविधी यथासांग पार पडले. टोळशास्त्रींनी सारे शास्त्रोक्त पद्धतीने करवून घेतले. ब्राह्मण साक्षेपाने सांगत होते, महाराज श्रद्धायुक्त अंत:करणाने तसे करीत होते. नेताजींचे डोळे वारंवार भरून येत होते. कधी महाराजांवरील श्रद्धेने, कृतज्ञतेने, तर कधी औरंगजेबाच्या राक्षसी पंजात अडकून पडलेल्या बायका-पोरांच्या आठवणीने. मनातले कढ उरातच जिरवीत, पालथ्या हातांनी डोळे पुसत ते सारे विधी मुकाट करत होते. पूजा करण्यास देवायतनासमोर बसताना तर त्यांना घेरीच आली. महत्प्रयासाने त्यांनी स्वत:स सावरले. सजदा देताना ज्या शंभू महादेवास आणि आदिशक्ती भवानीस ते आठवत होते ती त्यांची प्राणांहून प्रिय दैवते अकरा वर्षांनंतर त्यांच्यासमोर समूर्त दिसत होती. ते स्वत: स्वहस्ते त्यांची विधिवत पूजा करीत होते. देवतांवर अभिषेकाच्या धारा सुरू होत्या, तर नेताजींच्या डोळ्यांतून अश्रुधारा. अभिषेक सांगणाऱ्या चित्रावशास्त्रींनी एकवार महाराजांकडे सहेतुक पाहिलेसुद्धा, मात्र महाराजांनी खुणेनेच नेताजींची तंद्री भंग न करण्यास सुचविले.
सुप्रतिष्ठित देवतांची उत्तर पूजा व देवकोत्थापन सुरू झाले. हरि: ॐ उत्तिष्ठ ब्रह्मणस्वते देव्यंतस्त्वेमहे उपप्रयन्तु मरुत्त: सुदानेव इंद्र: प्राशुर्भवा सचा… ॐ अभ्यारम् मिददयोनिर्षिक्त पुष्करे मधु:।। अवस्तरय विसर्जने ।। यांतुदेवगणा सर्वे… कित्येक शतकांनंतर महाराजांनी ही क्रांती घडवून आणली होती. तोफांचे आवाज जगाला आणि विशेषत: जुलमी परधर्मी सत्ताधाऱ्यांना गर्जून हेच सांगत होते कारणपरत्वे वा जुलमाने परधर्मात गेलेल्यांचा स्वधर्मात परत येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सावधान!! नेताजींना यज्ञवेदीसमोर बसवून जोशीशास्त्रींनी गोदान, सुवर्णदान, अन्नदानादी विविध दानांचे संकल्प करवून घेतले. नेताजींनी महाराजांच्या पायांवर लोटांगण घातले. दोन्ही खांद्यांना धरून महाराजांनी त्यांना वर उठविले आणि आपल्या हृदयाशी घट्ट कवटाळले. दोघांच्या डोळ्यांतून अविरत अश्रुधारा सुरू झाल्या. नेताजींच्या जुन्या सहकाऱ्यांची, दुय्यमांची छाती भरून आली. सर्व उपस्थितांचे डोळे पाणावले, कंठ अवरुद्ध झाले. मंत्रघोषात त्यांच्यावर मंत्राक्षता उधळण्यासाठी सारा ब्रह्मवृंद हाती अक्षता घेऊन आणि बाकी उपस्थित फुले घेऊन सिद्ध होते पण भरल्या गळ्यातून स्वर उमटणे शक्यच नव्हते. सारे भारल्यागत स्तब्ध होते. सर्वप्रथम गणेशशास्त्रींनी भावनांवर ताबा मिळविला. मुठीतील अक्षता एकमेकांच्या मिठीत उभ्या असलेल्या दोघा अभिन्न हृदयी महावीरांवर हलके हलके उधळीत त्यांनी उच्चरवात आशीर्वाद देण्यास सुरुवात केली.
…बहु देहंचास्तु । दीर्घमायु: । श्रेय: शांति: । पुष्टिस्तुष्टिश्चास्तु । श्रेर्यशो विद्यायविनयावित्तं बहुपुत्रंचायुष्यचास्तु ।। त्यांच्यापाठोपाठ समस्त ब्रह्मवृंदाने आणि प्रेक्षकांत उपस्थित असणाऱ्या ब्राह्मणांनी त्यांच्या सुराला साथ देत टिपेचा स्वर लावला. शांतिरस्तु । पुष्टिरस्तु । तुष्टिरस्तु । बुद्धि रस्तु । अविघ्नमस्तु । आयुष्यमस्तु । आरोग्यमस्तु । शिवंकर्मास्तु । कर्मसमृद्धिरस्तु । धर्मसमृद्धिरस्तु । वेदसमृद्धिरस्तु । शास्त्र समृद्धिरस्तु । शस्त्रसमृद्धिरस्तु । पुत्रसमृद्धिरस्तु । धनधान्यसमृद्धिरस्तु । कोषसमृद्धिरस्तु । इष्टसंपदस्तु । बहिर्देशेसर्वारिष्ट निरसनमस्तु । यत्पापं तत्पतिहतमस्तु । यच्छ्यस्तदस्तु । उत्तरेकर्मण्य अविघ्नमस्तु । उत्तरोत्तरं हरहराभिवृद्धिरस्तु । काले वर्षन्तु पर्जन्य: पृथ्वि: सस्यशालिनी… ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: । आशीर्वचन आणि शांतिपाठ पूर्ण झाला. संपूर्ण मांडवात नीरव शांतता पसरली. महाराजांनी नेताजींना विलग केले आणि त्यांच्या भरल्या डोळ्यांत खोलवर नजर दिली. ती आश्वासक नजर कल्प कल्प सांगून गेली. हीच ती स्नेहाळ नजर जिच्या एका इशाऱ्यासरशी हजारोंनी प्राणांची कुरवंडी दिली. हीच ती करारी नजर जिचा एक क्षेप गनिमांच्या उरात धडकी भरवितो. हीच ती नजर जिच्या एका कटाक्षाने गनिमांच्या टापांखाली तुडविलेली रयत अमृतसिंचन झाल्याप्रमाणे कंबरा कसून पुन्हा उभी राहते. हीच ती नजर जिच्या इशाऱ्यासरशी नेताजींनी या अग्निदिव्यात उडी घेतली आणि हीच ती द्रष्टी नजर जिने नव्हत्याचे होते करून दाखविले. सर्रसर्रर्रर्र आवाजाने शांततेला किंचित तडा गेला. हिरोजी फर्जंदाने आपली तलवार उंच उभारून धरली आणि कंठाची घाटी फुलवत घनघोर गर्जना केली– हर हर हर हर महादेऽऽऽऽव… सरसरून समशेरी म्यानाबाहेर आल्या. उंच उभारल्या गेल्या आणि क्षणही न दवडता प्रतिसाद उमटला–
हर हर महादेऽऽऽव. आई भवानीचा उदेऽ उदेऽ खंडोबाच्या नावानं चांऽऽगभलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असोऽऽऽ महाराजांच्या जयघोषाने अस्मान दुमदुमले. नेताजींच्या खांद्यावर हात ठेवून महाराज मंडपाबाहेर निघाले.
उत्तम प्रकारे सजविलेल्या मांडवात ब्राह्मणांच्या सोवळ्यातील पंगती बसल्या होत्या. पळसाच्या हिरव्याकंच ताज्या पत्रावळींसमोर पांढरीशुभ्र रांगोळी उठून दिसत होती. सर्व शास्त्रीमंडळींच्या पानासमोर समया उजळल्या होत्या. सोंगटीमध्ये चंदनी उदबत्त्या खोचल्या होत्या. त्या चंदनी सुगंधात सुग्रास अन्नाचा आणि पक्वान्नांचा सुवास मिसळून एक वेगळाच सुगंध मांडवात भरून राहिला होता. सोवळेकऱ्यांनी डावे-उजवे वाढप पूर्ण करून महाराजांच्या आदेशासाठी अन्नशुद्धी तेवढी खोळंबून ठेवली होती. महाराज सोयराबाईंसह भोजनमंडपात प्रवेशले. गणेशशास्त्रींनी त्यांच्या हातून ब्राह्मणभोजनासह अन्नदानाचा संकल्प सोडला. उत्साहाने भारलेल्या ब्राह्मणांनी उच्चस्वरात भोजनमंत्र म्हणण्यास सुरुवात केली. ॐ यन्तु नदयो वर्षन्तु पर्जन्य: सुपिप्पला ओषधयो भवन्तु… ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु… ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ।। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल । सीताकान्तस्मरण जयजय राम । पार्वतीपते हर हर महादेवऽऽऽ । जागेवर उभे राहूनच महाराजांनी ब्राह्मणांचा आणि शास्त्रीगणांचा समाचार घेतला. भूदेव, स्वस्थ होऊ द्या. उशीर झाला असेल तर क्षमा करा. अन्नब्रह्माचा मनसोक्त आस्वाद घ्या. यद् यद् रोजते सग्राह्मम् । यद् यद् न रोचते स त्याज्यं ।। जे जे रुचेल, भावेल ते मनसोक्त मागून घ्या. संकोच, अनमान न करता मागून घ्या. मोरोपंत, सर्व ब्राह्मणांस यथायोग्य भोजन दक्षिणा मिळाली ना? निळो सोनदेव आणि अनाजीच्या साहाय्याने काय हवे नको यावर लक्ष ठेवा. येतो आम्ही.
मोठ्या आनंदात ब्राह्मण भोजन सुरू झाले. मोरोपंतांवर तेथील जोखीम सोपवून महाराज सरदार-मानकरी आणि खाशांच्या पंगती असलेल्या मांडवाकडे निघाले. या मांडवाची सजावट जरा अधिकच डौलदार होती. काही खाशांसाठी गिर्द्यांची बैठक आणि त्यावर चौरंग, चांदीच्या थाळ्या असा थाट होता. मानकऱ्यांना कोणाला काशाच्या, तर कोणाला झिलई दिलेल्या पितळी थाळ्या होत्या. मंडळी खास दरबारी पूर्ण पोशाखात पानावर बसली होती. वाढप पूर्ण करून महाराजांसाठीच पंगत खोळंबली होती. ब्राह्मणांच्या पंगतीतून सोयराबाई वाड्यावरच्या भोजनाची तयारी बघायला राजवाड्यात निघून गेल्या. महाराज भोजनमंडपात आल्यावर मंडळींनी उठून ताजीम दिली. हाताची इशारत करून महाराजांनी माणसांना बसते केले. ब्राह्मणांनी भोजन मंत्र म्हटले. हरिनामाचा गजर करून मानकऱ्यांनी भोजनास सुरुवात केली. पंगतीमध्ये हिंडून महाराजांनी सर्वांचा यथास्थित समाचार घेतला. पंगतीची पुढची जबाबदारी हंबीररावांवर सोपवून महाराज येर रयतेच्या पंगतींमध्ये समाचार घेण्यास निघाले.
आपल्या समाचारासाठी महाराज जातीनिशी आलेले पाहून रयतेला मोठा आनंद झाला. इतका की, आपण उष्ट्या हाताने मुजरा रुजू करतो आहोत याचेसुद्धा त्यांना भान राहिले नव्हते. महाराजांच्या जयजयकाराने आणि आई भवानीच्या उदेकाराने वातावरण नुसते दणाणून गेले. दोन्ही हात उभारून महाराजांनी त्यांना शांत केले. पंगतीच्या सर्व रांगांमधून महाराजांनी फेरफटका मारला. कित्येकांची नावानिशी वास्तपुस्त केली. आग्रह करून वाढायला लावले. तोपर्यंत वाड्यावरून पंगतीची वर्दी आली. तेथील व्यवस्था पाहणाऱ्या येसाजींना हवे-नको विचारून आणि आवश्यक त्या सूचना देऊन महाराज तडक वाड्याकडे चालू लागले. - राजवाड्याच्या मुख्य भोजनमहालात कित्येक दिवसांनंतर आज खाशांच्या पंगती बसल्या होत्या. भरदुपारची वेळ असूनसुद्धा महालातील एकूणएक चिरागदाने, हंड्या, झुंबरे लखलखत होती. एकही कोपरा-कोनाडा अंधारात राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती. भिंतींचे सारवण ओले असतानाच महालात धूपाचा धूर पसरल्याने भिंतींनासुद्धा धूपाचा मंद सुगंध येत होता. लग्नकार्यात विहिणीच्या पंगतीचा जो थाटमाट असतो तशा राजस थाटात पंगत सजली होती. प्रत्येक ताटाखाली शिसवी चौरंग, बसायला चांदीच्या फुल्या मारलेले शिसवी पाट, तसाच पाट टेकायला, पानांभोवती नाजूक वेलबुट्टीच्या सुंदर रांगोळ्या. प्रत्येक पानासमोर इतमामाप्रमाणे सोन्याच्या वा चांदीच्या मोठमोठ्या समया, मध्यभागी कनोजी उदबत्त्यांचे घमघमते झाड, महाराज व दोन्ही युवराजांसाठी सोन्याच्या, तर बाकी मानकऱ्यांना चांदीच्या भल्या मोठ्या थाळ्या असा सारा थाट होता. पानांमध्ये पंचपक्वान्ने वाढून तयार होती. पंगतीला फक्त जवळची आप्त मंडळी आणि मोजकेच मानकरी होते. महाराजांच्या उजव्या हातास दोन्ही युवराजांची पाने होती. डाव्या हातास त्या दिवसाची उत्सवमूर्ती नेताजी पालकरांचे पान मांडले होते. पंगतीतील सर्व खासे पूर्ण दरबारी पोशाखात पानांवर बसून महाराजांची वाट पाहत होते.
दोन्ही युवराजांसोबत महाराज भोजनमहालात प्रवेशले. त्याबरोबर दाराशी बसलेल्या वाजंत्र्यांनी सनई-चौघडा सुरू केला. सर्वांनी तडफेने उठून मुजरे घातले. सस्मित मुद्रेने अदब मुजरे स्वीकारीत, सर्वांवरून नजर फिरवीत महाराज पानावर बसले. इशारत होताच पंगत बसली. महाराजांचे कुलोपाध्याय पुढे झाले. त्यांनी संमंत्रक भोजन संकल्प सोडला. सोयराबाईंनी सोन्याच्या झारीतून जातीनिशी अन्नशुद्धी केली. मंडळींनी मोठ्या स्वरात हरिनामाचा गजर केला.
चला मंडळी, स्वस्थ होऊ द्या. आज जवळपास अकरा वर्षांनंतर आमच्यासाठी सणाचा दिवस उजाडला आहे. आज खऱ्या अर्थाने आणि पूर्णांशाने आमचे नेताजीकाका घरी परतले आहेत. आजचा दिवस आम्हासाठी नुसताच अत्यानंदाचा नव्हे तर बालपणापासून थोरले महाराजसाहेब आणि आईसाहेबांसोबत जे स्वप्न पाहिले होते, रोहिडेश्वरी ज्याचा संकल्प केला होता त्याच्या पूर्ततेच्या शुभारंभाचा आहे. करा सुरुवात नेताजीकाका. आज पहिला घास घेण्याचा मान तुमचा. आता असे पानावर बसून डोळे गाळायचे नाहीत. सारी दु:स्वप्ने संपली आहेत. पुढे आपल्यासाठी मोठमोठे मनसुबे योजून ठेवले आहेत. आता समोर वाढलेले पूर्णब्रह्म स्वस्थपणे संपवा. गहिवरलेल्या नेताजींच्या पाठीवर त्यांनी हलकेच थोपटले आणि त्यांना घास घेण्यास सांगितले. त्यानंतर महाराजांनी घास घेताच पुंडलीक वरदेऽऽऽचा गजर झाला आणि भोजन सुरू झाले. सोयराबाई इतर राण्यांच्या मदतीने वाढपावर जातीनिशी लक्ष ठेवून होत्या. महाराज स्वत: आग्रह करकरून वाढायला लावत होते. थट्टामस्करी आणि हास्यविनोदात बराच वेळ पंगत रंगून गेली. खूप वर्षांनंतर महाराज मनापासून जेवल्याचे साऱ्या राणीवशास जाणवले. *पंगत उठली आणि उरलेल्या गप्पा पूर्ण करण्यासाठी मंडळी महाराजांच्या खाशा दिवाणखान्यात पुन्हा एकत्र जमली. दिवेलागणीपर्यंत गप्पा रंगल्या.* *_क्रमश:_*
*________📜🚩

*नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔**अग्निदिव्य* भाग - 36⃣

*नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜*
*अग्निदिव्य*
*_______📜🗡
भाग - 3⃣6⃣🚩🗡________*

*लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार*

*___🚩📜🚩_______*
*शुद्धीकरणाचा तिथी निश्चय झाला आणि महाराजांची सारी यंत्रणा झडझडून कामाला लागली. गडागडांवर आणि ठाण्यांवर आवतणे पाठवायची होती. विद्वान ब्राह्मणांनाच नव्हे तर रयतेलासुद्धा आमंत्रणे धाडायची होती. निमंत्रणपत्रांचे आणि फर्मानांचे तर्जुमे महाराजांनी स्वत: बाळाजी आवजींना सांगून मनाजोगते लिहवून घेतले. निमंत्रितांच्या याद्या त्यांनी जातीनिशी तपासल्या. जणू पोटच्या पोरीचे लगीन निघावे असा महाराजांचा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाच्या बारीकसारीक तपशिलाच्या सूचना ते जातीनिशी देत होते. कार्यक्रमाची भव्य आखणी अन् महाराजांचा ओसंडणारा उत्साह पाहून बाळाजी आवजींना राहावले नाही. तिसरे प्रहरी सदर बसली असताना अखेर त्यांनी विचारलेच–*
महाराज, नेताजीरावांच्या शुद्धीकरणाचा एवढा बडेजाव? एवढा महोत्सव? पूर्वी बजाजी नाईकांचे शुद्धीकरण झाले तेव्हा काही इतका बडेजाव केल्याचे ऐकिवात नाही. मग या खेपेस एवढा उत्सव तो का? मोरोपंतांनी पण विषय निघाल्याबरोबर संधी साधून घेतली–
एवढ्या मोठ्या समारंभास खर्चसुद्धा मोठाच येणार. माझा अंदाज तर सांगतो की, राजघराण्यात आजवर झालेल्या कोणत्याही लग्नसमारंभाच्या कित्येक पटींनी खर्च होईल. किंबहुना राज्याभिषेकासाठी केलेल्या खर्चाच्या खालोखाल या कार्यक्रमाच्या खर्चाचा आकडा जाईल. अनाजी दत्तो हळूच पुटपुटले. असं म्हंता? अबब! अवं येवड्या पैक्यात तर अवघा योक किला नव्यानं बांदुन हुईल. काय? येसाजी कंक आश्चर्य व्यक्त करीत म्हणाले–
बडेजाव जरा अधिकच होतोय एवढे बरीक खरे. मोगलांची नवी स्वारी समोर दिसत असताना वास्तविक अशा खर्चांना आळा हवा. महाराज मंद हसले. त्यात थोडी गमतीची, काहीशी थट्टेची छटा होती. तशीच किंचित विषादाचीही किनार होती. मोरोपंत, अनाजी, आमचा कट्टा शत्रू आलमगीर बादशहा आम्हास जेवढा ओळखून आहे, तेवढे आमच्याच तालमीत तयार झालेले आमचे मुत्सद्दी कारभारी व रणधुरंधर ओळखीत नाहीत हे स्वराज्याचे दुर्दैव आणि आमच्या काळजीचे मोठे कारण आहे. मंडळी, नेताजीकाकांचे आम्ही असेच काही करू, सर्व परंपरा मोडून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेऊ हा संशय मनी धरूनच त्याने इतकी वर्षे त्यांना दख्खनचा सोडाच, पण हिंदू माणसाचा, संस्कृतीचा वारासुद्धा लागू दिला नव्हता. एवढा मोठा काळ लोटल्यावर नेताजीकाका इस्लाममध्ये पूर्ण मुरले असावेत, मोगली ऐशआरामाला चटावले असावेत आणि आम्हीसुद्धा त्यांचा नाद सोडून देऊन त्यांना विसरलो असू असे त्याला खात्रीलायकपणे वाटले तेव्हाच अगदी निरुपाय झाला म्हणूनच त्याने नेताजीकाकांना दख्खनमध्ये सोडले. असे असताना आमच्या कृतीचे वर्म आणि मर्म आम्हाला आमच्याच माणसांना उलगडून सांगावे लागते.
आता आमचे मेहुणे, बजाजी नाईकांचे शुद्धीकरण करून घेतले तेव्हा आमची ताकद तोकडी होती. परकीय सत्ताधाऱ्यांनाच काय पण आमच्या स्वजनांना आणि रयतेलासुद्धा आमची पुरेशी ओळख नव्हती; त्यामुळे त्या शुद्धीकरणाची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही, जनमनावर त्याचा परिणाम झाला नाही; त्याचे पुन्हा कोठे अनुकरण झाले नाही. आता आम्ही मस्तकी छत्र धरिले आहे. हिंदूंचे स्वतंत्र आणि सार्वभौम सिंहासन निर्माण केले आहे. दक्षिण दिग्विजय केला आहे. गनिमांच्याच काय स्वकीय विरोधकांच्या मनी धाक उत्पन्न केला आहे. प्रत्येक हिंदुमात्र फक्त लुटण्यासाठी, लुबाडण्यासाठी, बाटवण्यासाठीच उत्पन्न झाला आहे, अशी धारणा घेऊन बसलेल्या परकीय सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यांत आम्हाला झणझणीत अंजन घालायचे आहे. एकदा हिंदू बाटवला की, संपले, त्याला परधर्मात राखण्याचे काम हिंदूच नेटाने करतात ही समजूत आम्हाला निपटून काढायची आहे. हिंदू पुन्हा स्वधर्मात येऊ शकतो, आला पाहिजे हे आलम दुनियेला पटवून देणे आम्हाला गरजेचे वाटते. गावोगावी, क्षेत्रांच्या ठिकाणी शुद्धीकरणांचे अनुकरण झाले पाहिजे. घडवून आणले पाहिजे. असे घडले तरच अत्याचारी बाटवाबाटवीस खीळ बसेल. सर्रास परधर्मात जाणारे लोंढे आम्हास थोपवता येतील. स्वधर्मात परतणाऱ्यांचे लोंढे वाढू लागले तर ही परकी कीड या पुण्यभूमीमधून उखडून दूर फेकण्यास विलंब लागणार नाही. आमच्या माता-पितरांनी आणि आम्ही पाहिलेल्या स्वराज्याचे स्वप्न ते हेच आहे. हीच वैदिक हिंदू धर्माची पुनर्स्थापना आहे.
मंडळी, व्यक्तिगत स्तोम वाढवण्यासाठी, स्वत:चे मोठेपण मिरवण्यासाठी किंवा आमच्या वा आईसाहेबांच्या हौसेखातर काही आम्ही राज्याभिषेकाचा एवढा घाट घातला नव्हता हे तर तुम्ही जाणताच. त्या उत्सवाला जो संदर्भ, तोच किंबहुना त्यापेक्षा कांकणभर वरचढ संदर्भ या शुद्धीकरणाच्या सोहळ्याला आहे. नेताजीकाकांचे निमित्त एवढेच. बाळाजी आवजी, या शुद्धीकरणाचे सविस्तर वर्णन करणारी वार्तापत्रे खुद्द आलमगिरापर्यंत जातील याची नीट तजवीज करा. आदिलशहा आणि कुतुबशहांच्या हाती ती जाऊ देत. गनिमांच्या प्रत्येक सुभेदारास, ठाणेदारास ती मिळू देत. जंजिऱ्याचा सिद्दी, मुंबईचे टोपीकर, वसई आणि गोव्याचे फिरंगी, इतकेच नव्हे तर प्रत्येक काझी, पाद्री, परधर्माचा प्रचार-प्रसार करणाऱ्यापर्यंत पोहोचू देत. म्हणजे मग ते बाटवाबाटवी करताना यापुढे दहादा विचार करतील. भारावून गेलेले बाळाजी हळूच म्हणाले–
महाराजांच्या प्रत्येक कृतीमागे केवढा मोठा अर्थ भरलेला असतो! तिला केवढा व्यापक संदर्भ असतो! केवढी ही व्यापक दूरदृष्टी! केवढी अलौकिक प्रज्ञा! म्हणूनच मग रयत त्यांना अवतारी पुरुष समजते. पुरे, पुरे. ही काही आमचे कौतुक करून घेण्याची घडी नव्हे. हजार कामे पडली आहेत. निष्कारण गप्पाटप्पा आता पुरेत.
मंगळवार उजाडला. सकाळी गडाचे दरवाजे उघडल्यापासूनच गडावर माणसांची रीघ लागली. सरदार-दरकदार, मुत्सद्दी, गडकरी, याशिवाय मोठ्या प्रमाणावर रयतसुद्धा हा सोहळा पाहण्यास लोटली होती. गावोगावचे व क्षेत्रोक्षेत्रीचे ब्राह्मणसुद्धा मोठ्या प्रमाणावर गोळा झाले होते. काही उत्सुकतेपोटी, केवळ काय-कसे घडते ते पाहण्यास. काही महाराजांवरील प्रगाढ श्रद्धेपोटी, काही दक्षिणेच्या अभिलाषेने, तर कित्येकजण हा ‘भ्रष्टाकारी पाखंड’ रोखण्यासाठी मुद्दाम गडावर आले होते.
तंबू, डेरे, राहुट्या, शामियाने, मंडप वगैरे उभारून सर्व अभ्यागतांची सोय केली होती. मोठमोठ्या पाकशाळांमधून भोजनाची सोय होती. ब्राह्मणांसाठी सोवळ्याची स्वतंत्र व्यवस्था होती. गडावर एवढी गर्दी झाली असली तरी कोठेही भोंगळपणाला थारा नव्हता. चौकी पहाऱ्यात ढिलाई नव्हती. रयतेला मुक्तद्वार असले, तरी टवाळांना बरोबर चाप लावला जात होता. महाद्वारावरच्या हवालदाराला पाणी पिण्याससुद्धा उसंत नव्हती. येणाऱ्या गर्दीत कोणी परका नजरबाज घुसू नये म्हणून डोळ्यांत तेल घालून लक्ष पुरविले जात होते. किल्लेदार सूर्याजी पिसाळ भल्या पहाटे घोड्यावर स्वार झाले होते; ते थेट सांजवेपावेतो पायउतार झाले नाहीत. या एवढ्या काळापुरती सकाळ-दुपार-सायंकाळ मुजऱ्याच्या रिवाजातून त्यांना महाराजांनी सूट दिली होती. रिवाजापेक्षा अभ्यागतांची सोय आणि गडाची सुरक्षा यांना महाराजांच्या लेखी जास्त महत्त्व होते.
होळीच्या माळावर हिरव्या पोरक्याचा भला मोठा मांडव घालण्यात आला होता. मांडवाच्या मध्यभागी धार्मिक विधींसाठी बरीच मोठी जागा गोमयाने सारवून सिद्ध करण्यात आली होती. त्या जागेच्या बरोबर मधोमध सुशोभित यज्ञकुंड तयार केले गेले होते. पताका, तोरणे, गुढ्या आणि ध्वज लावून मंडप उत्तम रीतीने सजविला होता. यज्ञवेदीच्या पूर्वेकडील अंगास ब्रह्मवृंदाच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पश्चिमेच्या अंगास मानकरी व राणीवशातील स्त्रियांची सोय होती. अन्य दोन्ही बाजू रयतेसाठी खुल्या होत्या. इकडे कार्यक्रमाच्या व्यवस्थांची धामधूम उडाली असतानाच ‘पाखंड’ मोडून काढण्यासाठी आलेल्या मंडळींच्या कारवाया गडावर पाय ठेवल्या क्षणापासून पूर्ण ताकदीनिशी सुरू झाल्या होत्या. किल्लेदाराच्या तुकडीचे त्यांच्यावर पूर्ण लक्ष होते; परंतु जोपर्यंत त्यांच्याकडून कोणताही उपसर्ग होत नाही तोपर्यंत त्यांना अटकाव न करण्याच्या किल्लेदाराच्या सैनिकांना सूचना होत्या. मध्यान्हीच्या सुमारास ब्राह्मणांचा एक मोठा जमाव तावातावाने शास्त्रीमंडळाच्या मुक्कामी पोहोचला. मंडळी भोजनासाठी निघाली होती. ते निवासाच्या पायऱ्या उतरत असतानाच जमाव त्यांची वाट अडवून उभा ठाकला. हडकुळ्या शरीरयष्टीचा एक वयोवृद्ध ब्राह्मण जमावाचे नेतृत्व करीत होता. संतापाने तांबडेलाल झालेले डोळे गरगरा फिरवीत ते वृद्ध शास्त्रीमंडळास उद्देशून म्हणाले–
काय हो, आपणापैकी टोळशास्त्री ते कोण? अहो, गडावर हा जो काही अनाचार चालला आहे त्यास आपण पैठणच्या धर्मसभेचे प्रतिनिधी म्हणून मान्यता दिली आहे, हे सत्य आहे काय? अन् अशा प्रकारचा परस्परव्यवहार करण्याचा तुम्हास अधिकार तो काय? का पैठणच्या धर्मपीठाने आपणास खास परवानापत्र देऊन या अव्यापारेषु व्यापारात सहभागी होण्यास धाडले आहे? त्या ब्राह्मणाचे अत्यंत उद्धट आणि मनामध्ये क्षोभ उत्पन्न करणारे भाषण ऐकूनसुद्धा मनाचा तोल यत्किंचितही ढळू न देता अत्यंत शांतपणे टोळशास्त्री म्हणाले–
मला तरी गडावर कोणत्याही प्रकारचा अनाचार चालू असल्याचे दिसत नाही आहे. कोणत्याही अनाचारास मी व्यक्तिश:सुद्धा कधी संमती देणार नाही; तर मग धर्मसभेचा प्रतिनिधी म्हणून मान्यता देण्याचा प्रश्नच नाही. आपण नेमके कशासंबंधाने बोलत आहात ते स्पष्ट केल्यास बरे होईल. वेड पांघरून संभाविताचा आव आणण्याचे ढोंग पुरे झाले. हेच ते, एका यवनास म्हणे हिंदू धर्मात परत घेण्याचा अनैतिक खटाटोप सुरू आहे आणि त्यासाठी हे एवढे अवडंबर माजविले गेले आहे. रयतेच्या घामाचा राजकोषात जमा झालेला पैसा त्यासाठी उधळला जात आहे.
सनातन वैदिक धर्माचा हा असा अपमान आम्ही कदापि खपवून घेणार नाही. या भ्रष्टाकारास आम्ही प्राणपणाने विरोध करू. जर कोणी हा अनाचार असाच चालू ठेवण्याचा हट्ट धरणार असेल तर त्या भ्रष्टाकारासाठी उभारलेल्या मांडवातच आम्ही आमचा कपाळमोक्ष करून घेऊन, जीव देऊ आणि या ब्रह्महत्येचे पातक स्वत:स ब्राह्मण प्रतिपालक म्हणवून मिरविणाऱ्या तुमच्या राजाच्या माथी बसेल, याची याद राखून ठेवा.
जमावामधील एकेक ब्राह्मण मारे शिरा ताणताणून, आवाज टिपेला नेऊन ओरडत होता. शास्त्रीमंडळी शांतपणे त्यांचा क्रोध पाहत होती. समोरून कोणतेच प्रत्युत्तर येत नाही किंवा साधी प्रतिक्रियासुद्धा प्रकट होत नाही हे पाहून काही वेळाने गदारोळ शांत झाला. पण संतापाने फणफणलेला तो घोळका त्यांची वाट अडवून तसाच उभा होता. मग टोळशास्त्री एक पाऊल पुढे होऊन हात जोडून ब्राह्मणांना सामोरे जात म्हणाले–
भूदेव, आपण समाजपुरुषाचे उत्तमांग, मस्तक. आपल्यासारिख्या सुज्ञांनी असा आततायीपणा करणे शोभनीय नाही. क्रुद्ध जनांचा जमाव जमा करून घेऊन असा वितंडवाद करण्याचा ग्राम्यपणा आपणासारख्यांस शोभत नाही. मध्यान्ह झाली आहे. ब्राह्मण भोजनाच्या पंगती वाढून तयार आहेत. अन्नब्रह्माचा अपमान होऊ देऊ नका. शांत व्हा. प्रथम जठराग्नीस आहुती देऊन त्याससुद्धा शांत करा. या विषयावर आपण सुयोग्य प्रकारे सभा घेऊन, यथास्थित चर्चा करू. तुम्हा सर्वांचे ऐकून घेतले जाईल, मात्र शिष्टाचारास अनुसरून बोलले जाणार असेल तरच; तर्काला धरून व्यक्त होणाऱ्या प्रत्येक शंकेचे निरसन केले जाईल. असे या कार्याचा अध्वर्यू म्हणून मी आपणास वचन देत आहे. सभेचे स्थळ, काळादी तपशील आपणास विदित होतील. निश्चिंत राहावे. प्रथम भोजन करून घ्यावे.
ब्राह्मणांचा तो घोळका अखेर परत फिरला. महाराज दरबारातून परत येताच टोळशास्त्र्यांनी ढेरेशास्त्री व चित्रावशास्त्र्यांना सोबत घेऊन महाराजांची भेट घेतली आणि घडलेला प्रकार त्यांच्या कानी घातला. ब्राह्मणांची ही टोकाची धारणा पाहून महाराज उदास झाले. चर्चेअंती त्यांनी निर्णय घेतला की, बुधवारी, म्हणजे लगेच दुसऱ्याच दिवशी आणि शुद्धीच्या आदल्या दिवशी समारंभासाठी उभारण्यात आलेल्या मांडवातच धर्मसभा भरवायची. महाराजांनी आग्रह धरला की, या सभेत नेहमीच्या प्रथेप्रमाणे केवळ ब्राह्मणच नव्हे तर सर्व जातींच्या मंडळीस सहभागी करून घ्यावे. शुद्धीकरणाचे महत्त्व सर्वसामान्यांच्या मनात बिंबविणे अगत्याचे असल्याने शास्त्रीमंडळाने कोणतीही खळखळ न करता महाराजांच्या योजनेस पुष्टी दिली. त्याच बैठकीत किल्लेदार सूर्याजी पिसाळास बोलावून बुधवारी प्रात:काळी भरणाऱ्या विशेष धर्मसभेची दवंडी देण्याची आज्ञा दिली.
शुद्धीकरणास विरोध करणारी ब्राह्मण मंडळी मुकाट्याने परत फिरली खरी, परंतु ती शांत बसली नाहीत. गडावर आलेल्या अठरापगड लोकांच्या गर्दीत त्यांनी या विषयाची राळ उडविण्यास सुरुवात केली. त्यांचा आक्रमक पवित्रा आणि भडक कोटिक्रम, तसेच तथाकथित धर्मरक्षणासाठी प्राणार्पण करण्याच्या फुशारक्यांनी येर रयत भेदरून गेली. या विरोधकांनी धर्माचा ऱ्हास, भ्रष्टाचार, कलियुगाचा अंत, प्रलय, सर्वनाश वगैरेंचा असा काही बागुलबुवा उभा केला की, सांगता सोय नाही. पुराणातील आणि स्मृतींमधील संदर्भहीन उतारेच्या उतारे उद्धृत करून चालविलेली तर्कटे ऐकून मुळातच द्विधा मन:स्थितीत असणाऱ्या ब्राह्मणांची आणि मराठ्यांची मते विरोधी पक्षीयांकडे झुकू लागली. रात्री उशिरापर्यंत त्यांनी फार मोठा समुदाय आपल्या पक्षाकडे वळवून घेण्यात यश मिळविले.
विरोधकांचा हा धडाका पाहून शास्त्रीमंडळीसुद्धा अस्वस्थ झाली. महाराजांचे ऐकून आपण धर्मसभेचा म्हणून जो निर्णय घेतला, तो योग्य की अयोग्य या संबंधाने ते दोलायमान झाले. जनक्षोभास तोंड देणे काही सोपे नसते. त्यांच्यात अस्वस्थ कुजबुज सुरू झाली. टोळशास्त्र्यांना या अस्वस्थतेची जाणीव झाल्याशिवाय राहिली नाही. या विषयात ते प्रत्यक्ष गागाभट्टांचेच शिष्य असल्याने त्यांची मते अत्यंत परिपक्व आणि ठाम होती. रोज रात्री भोजनोत्तर होणाऱ्या बैठकीत या प्रश्नाचा समाचार घेण्याचे त्यांनी ठरविले होतेच. अपेक्षेप्रमाणे त्या रात्रीच्या बैठकीत काहींनी हा मुद्दा उपस्थित केलाच. यत्किंचितही विचलित न होता टोळशास्त्र्यांनी चर्चेचे स्वागत केले. अत्यंत ठाम आणि आत्मविश्वासपूर्ण रीतीने त्यांनी शास्त्रशुद्ध तर्क, तसेच ब्राह्मणे, उपनिषदे, त्याचप्रमाणे निरनिराळ्या स्मृती व प्रायश्चित्त ग्रंथांमधील उताऱ्यांचे संदर्भासहित दाखले देत, तसेच पूर्वी महाराजांनी विशद केलेला कोटिक्रम इत्यादीचे अतिविस्तृत निरूपण केले. शंकांचे यथोचित निरसन केले. विरोधकांनी चालविलेल्या तर्कटांचा आणि त्यामुळे उभ्या झालेल्या बागुलबुवाचा त्यांनी खरपूस समाचार घेतला; त्यामुळे समस्त शास्त्रीमंडळ पुनश्च पूर्ण आश्वस्त झाले. आपण अंगीकारलेले हे ऐतिहासिक धर्मकृत्य वरकरणी जरी जनसामान्यांच्या प्रचलित विचारांच्या विरोधात वाटत असले तरी तेच अंतिमत: सुयोग्य व हितकर असल्याची त्यांची पूर्ण खात्री पटली. कोणा माथेफिरू दांडगटाकडून कोणास काही उपसर्ग होऊ नये किंवा निवासस्थानावर कोणता अतिप्रसंग होऊ नये याची यथायोग्य काळजी घेण्याची सूचना टोळशास्त्र्यांनी पहाऱ्यावरील शिलेदारांना न विसरता दिली.
होळीच्या माळावर उभारलेला विस्तीर्ण मंडप पहाटेपासूनच खचाखच गर्दीने भरून गेला. लोक मोठ्या आवाजात तावातावाने आपसांत चर्चा करीत असल्याने मांडवात एकच कोलाहल भरून राहिला होता. त्यातच कोणी एखादा अधिक-उणा शब्द काढलाच तर गरम डोक्याची मंडळी हमरीतुमरीवर येत होती. क्वचित कुठे एक-दोन ठिकाणी धक्काबुक्कीचा प्रसंगसुद्धा आला. लोकांना आवरता आवरता मावळ्यांच्या अगदी नाकीनऊ आले. जसजशी सभेची वेळ जवळ येऊ लागली तसतशी अस्वस्थता वाढू लागली. गलका वाढत गेला. ब्राह्मणांचा एक गट तर अगदी हातघाईवरच आला. अखेर हंबीरराव जातीनिशी मंडपात हजर झाले आणि कधी सूचना, तर कधी दरडावणी करू लागले तेव्हा कुठे जमाव आटोक्यात आला. मात्र प्रक्षुब्ध झालेला तो ब्राह्मणांचा गट कोणालाच जुमानेनासा झाला, तेव्हा मोरोपंत पेशवे आणि त्र्यंबक सोनदेवांना हस्तक्षेप करून त्यांना समज देणे भाग पडले. तर फारच चवताळलेल्या एक-दोघांना चौदावे रत्न दाखवून ताळ्यावर आणावे लागले.
घटका भरली आणि मांडवाबाहेर नौबत दुमदुमली. तुताऱ्या निनादल्या. महाराजांच्या आगमनाच्या ललकाऱ्या उठल्या. निरव शांतता पसरली. दमदार पावले टाकत महाराजांनी मांडवात प्रवेश केला. सस्मित चर्येवर धीरगंभीर अन् पूर्ण आत्मविश्वासाचे भाव होते. त्यांच्या मागोमाग शास्त्रीमंडळी प्रवेशली. त्यांच्या गंभीर चेहऱ्यांवर काळजी स्पष्ट दिसत होती. महाराजांच्या साध्याशाच मसनदीशेजारी शास्त्रीमंडळासाठी एका तक्तपोसावर उच्चासनाची सोय केली होती. साऱ्या सभेने महाराजांना उत्थापन दिले. महाराज आणि शास्त्रीमंडळ आपापल्या स्थानी बसल्यानंतरच सभा बसली. महाराजांची करारी नजर चौफेर फिरली आणि अद्याप चुळबुळ करणाऱ्या ब्राह्मणांच्या घोळक्यावर स्थिर झाली. त्या नजरेतील धाक त्यांना जाणवल्याशिवाय राहिला नाही. त्यांची चुळबुळ स्तब्ध झाली. महाराजांनी निराजीरावजींना नजरेनेच इशारा केला. मुजरा घालीत ते सामोरे आले. महाराजांना संमुख होऊन बोलू लागले–
महाराज, मनामध्ये काही हेतू धरून नेताजीराव पालकर गनिमाकडे गेले. परंतु दगा करून, आपण आग्र्याहून प्रयाण करताच आलमगिराने त्यांस अटक केली. दिल्लीत नेऊन आदबखान्यात डांबले. इतकेच नव्हे तर अतोनात छळ मांडला. छळ करून बादशहा आपल्याला जीवे मारल्याशिवाय राहणार नाही व त्यामुळे मनातील हेतू साध्य होणार नाही असे जाणून, कार्यपूर्तीसाठी जीव जगवणे अगत्याचे म्हणून, गनिमी काव्याचा भाग असे म्हणून त्यांनी म्लेंच्छ धर्म स्वीकारला. तरी त्यांच्या मनी स्वधर्म व स्वराज्य यांच्याप्रति निष्ठा आणि श्रद्धा कायम धगधगत राहिली. संधी मिळताच बादशहाच्या कचाट्यातून त्यांनी सुटका करून घेतली आणि ते स्वराज्यात स्वामींच्या पायांशी पावते झाले. स्वधर्म आणि स्वराज्याची सेवा करण्याची त्यांची ऊर्मी प्रखर तेजाने जिवंत आहे असे जाणून स्वामींनी त्यांना अनुकूल कौल दिला आणि धर्मसभेकडून त्यांना शुद्ध करून घेऊन, स्वधर्मात परत आणण्यास मान्यता मिळवली. त्या धर्मसभेच्या निर्णयाप्रमाणे उदईक याच स्थळी नेताजीरावांच्या प्रायश्चित्तपूर्वक शुद्धीकरणाचा विधी होणार आहे. त्यासाठी मुद्दाम आमंत्रणे देऊन रायगडी जनलोक व खाशे मंडळींस पाचारिले आहे. आमंत्रित ब्रह्मवृंदांपैकी काहींना धर्मसभेचा हा निर्णय मान्य नाही. या शुद्धीकरणास त्यांचा सख्त विरोध आहे. हे शुद्धीकरण शास्त्रास असंमत, परिणामी पाखंड माजवणारे असून, ते तत्काळ रद्द करावे अशी त्यांची मागणी आहे. सनातन वैदिक धर्माच्या पावित्र्य रक्षणासाठी त्यांची ही भूमिका असल्याचा दावा ते करीत आहेत. विरोधी मत धारण करणाऱ्यांचे आक्षेप ऐकून घेऊन त्यांस आपली भूमिका विशद करून सांगणे आणि त्यांच्या मागणीचा सांगोपांग विचार होऊन योग्य निर्णय व्हावा या कारणे स्वामींनी प्रस्तुत विशाल धर्मसभेचे आयोजन केले आहे. तरी विरोधी मत धारण करणाऱ्या ब्रह्मवृंदास पूर्वपक्ष करण्यास स्वामींची अनुमती असावी.
नेताजीरावांच्या प्रायश्चित्तपूर्वक शुद्धीकरणाचा निर्णय हा वैदिक संस्कृती, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माच्या अभिवृद्धी आणि संरक्षणासाठीच घेतला गेला आहे. तरीसुद्धा केवळ अज्ञानामुळे ज्यांचा या कृतीस आक्षेप आहे किंवा पोकळ आणि मिथ्या धर्माभिमानाचा आश्रय करून जे प्रत्यक्ष धर्महिताच्याच कृतीस विरोध करीत आहेत किंवा विरोधकांना साहाय्यभूत होणारी भूमिका घेत आहेत त्या समाजाचे अध्वर्यू म्हणवणाऱ्या विद्वान ब्रह्मवृंदास त्यांचा पक्ष मांडण्यास पूर्ण अनुमती आहे. रयतेच्या आणि धर्माच्या हिताचा असला, तरी केवळ दंडशक्तीच्या जोरावर आम्हास रयतेवर कोणताही निर्णय लादावयाचा नाही. मात्र मांडण्यात येणारा तर्क धर्मग्रंथ आणि शास्त्रांच्या आधारेच असावा. पोकळ परंपरा वा रूढींचे अवडंबर माजवणारा नसावा, हे प्रत्येक उपस्थिताने नीट ध्यानी घ्यावे. सभेच्या शिष्टाचारांचा भंग वा बेअदबीचा मुलाहिजा राखला जाणार नाही याचीसुद्धा प्रत्येकाने जाणीव ठेवावी.
महाराजांचे बोलणे संपले आणि त्यासरशी अनेक ब्राह्मण एकदम उठून बोलू लागले. त्या बोलण्याने एकच मोठा कोलाहल उडाला. एकाचेही बोलणे धड ऐकू येईना. मुत्सद्दी, मंत्रिमंडळ आणि शास्त्रीमंडळ महाराजांकडे टकामका पाहू लागले. महाराजांनी तो गोंगाट काही वेळ तसाच चालू दिला. मग मात्र त्यांनी आपला हात उंच उभारून शांत राहण्याची इशारत केली. हळूहळू गलबला शांत झाला. सभामंडपाच्या ज्या भागात कोलाहल करणाऱ्या त्या ब्राह्मणांचा गट बसला होता, तेथे आपली करडी नजर रोखून महाराज बोलू लागले–
ब्राह्मणहो, आपले म्हणणे ऐकून घेण्यासाठी, आमची भूमिका समजावून सांगण्यासाठी, चर्चा करण्यासाठी ही सभा भरवण्यात आली आहे. गोंगाट आणि गलबला म्हणजे आपले म्हणणे मांडणे नव्हे किंवा चर्चा करणे नव्हे. आपणात जे प्रमुख असतील, शास्त्रवेत्ते वा वैदिक विद्वान असतील त्यांनी सर्वांच्या वतीने थोडक्यात शास्त्राधारे जे म्हणणे असेल ते मांडावे. ऐसा गलबला ही धर्मसभेची रीत नव्हे. हे ऐसेच चालणार असेल तर आपणाकडे पूर्वपक्ष नाही असे जाहीर करून सभा बरखास्त करण्यात येईल.
काही वेळ आपसांत कुजबुज झाली. नेत्रपल्लवींचे इशारे झाले. खाणाखुणा झाल्या. मग काही मंडळी एका वृद्ध द्विजवराकडे उठून जाऊन त्यांना काही विनवणी करती झाली. त्यांनी मानेनेच होकार दिला. कपाळी शिवगंध, अंगी भस्माचे पट्टे, गळ्यात, मनगटावर, दंडात रुद्राक्ष माळा, शास्त्री असल्याची खूण प्रकट करणारी मस्तकी शालजोडी गुंडाळलेली, पावित्र्याचे आणि विद्वत्तेचे तेज मुखावर झळकत असलेले, शांत-धीरगंभीर मुद्रेचे ते वयोवृद्ध ब्राह्मण उठून उभे राहिले. शास्त्रीमंडळींस आणि महाराजांस त्यांनी विनम्रपणे नमस्कार केला. मधाने भरलेल्या कास्यपात्राप्रमाणे त्यांचा आवाज अत्यंत शुद्ध आणि कणीदार, श्रवणीय होता, शुद्ध काशाच्या घंटेप्रमाणे नादमय होता.
भो राजन, अइ विद्वांस: श्रेष्ठा: धर्म सागर पारावार परिणा: सकळ भूमण्डळ मण्डणी कृता: वैतण्डिक गण्डस्थळ खण्डनैकहरया: श्रूयताम् तावत्… महाराजांच्या मागे अदबीने उभे असलेले कवींद्र परमानंद हळूच त्यांच्या कानी पुटपुटले– महाराज, गणेशशास्त्री जांभेकर-कुळकर्णी, वेदान्त वागिश, वय्याकरणी, अद्वैत वेदान्ताचे गाढे अधिकारी, काशी क्षेत्री अध्ययन करून शास्त्रीपद प्राप्त केले. खान्देशातून आलेत. हल्ली मुक्काम श्रीक्षेत्र कोल्हापूर…
महाराज हलकेच उद्गारले– अरे वा! एवढे गाढे विद्वान आणि त्यांचा समाचार अद्याप आमचेकडून घेतला गेला नाही? पंत तुम्ही स्वत: ध्यानी ठेवा आणि आम्हाकडून त्यांचा परामर्श घेतला गेल्याशिवाय ते गड उतरणार नाहीत इकडे लक्ष द्या. जी. आज्ञा.
शुद्ध, सुंदर, ओघवत्या संस्कृतात गणेशशास्त्र्यांनी पूर्वपक्ष मांडला. महाराजांनी सहेतुक टोळशास्त्र्यांकडे नजर टाकली. मान लववून शास्त्रीबुवांनी प्रतिसाद दिला आणि उपरणे झटकत उत्तर देण्यासाठी ते उभे राहिले. ते काही बोलण्यास सुरुवात करणार एवढ्यात डोक्याला भले मोठे मुंडासे बांधलेला, मोठमोठ्या गालमिश्या राखलेला प्रौढ वयाचा एक दणकट गडी कंबरेची भली मोठी तलवार सावरीत उभा राहिला. जागेवरूनच महाराजांना मुजरा घालून आपल्या ढाल्या आवाजात तो म्हणाला– मुजरा मायबाप, आमी पवन मावळातल्या बहिरोबाच्या वाडीचं पाटील हावो जी. म्हाराज, ह्ये बामन देव जे काय बोलले त्ये कानास्नी लय ग्वाड वाटलं ह्ये खरं, पर इमानानं सांगावं तर तेतला योक सबुद बी आमा अडान्यांच्या टकुऱ्यात न्हाई शिरला. आमचं राजं गोबामन परतिपालक हाईती आनि जवा त्ये देवा-धरमासाटी कायबाय गोमटं करू म्हन्तात त ही बामनच त्येंना इरोद कराया हुबी ठाकत्यात. आता आमच्या राजाला त्येंचा इरोद कशापाई हाय, त्येंचं म्हननं तरी काय हाय, त्ये जरा आमालाबी समजू द्यात की. का फकस्त आपली बामनंच येक त्येंना की दुसरी द्येवाला उमगनाऱ्या भासत कायबाय बोलनार आन आमी रयत त्येंना नंदीबैलावानी मुंडासं हालवीत ऐकनार. आता ही काय धरम सबा की काय म्हन्तासा तीत आमालाबी आवतन देऊन बोलिवलासा त मग कोनाचं काय म्हननं हाय त्ये जरा आमालाबी उमगू देवा की. मंग आमाला पटलं त व्हय आन नाय पटलं त नाय म्हन्ता येईल. काय मंडळी, म्या म्हन्तो ते बरुबर हाय का न्हाई?
‘खरं हाय, बरुबर हाय, आमालाबी समजलं पायजेल.’ अशा अर्थाचे आवाज रयतेतून मोठ्या प्रमाणावर उमटू लागले. मानकऱ्यांनी पण पाटीलबुवांना पाठिंबा दर्शविणाऱ्या खाणाखुणा केल्या. गोंधळून गेलेल्या टोळशास्त्र्यांनी महाराजांकडे पाहिले. मंद हसून महाराजांनी त्यांना खाली बसण्याचा संकेत दिला आणि हात उंचावत गलका रोखला. सारे शांत झाल्यावर महाराज म्हणाले–
भूदेव, एका अतिमहत्त्वाच्या आणि नजीकच्या ज्ञात भूतकाळात न झालेल्या अशा एका महत्त्वाच्या धर्मनिर्णयावर चर्चा करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने येरांच्या मनात उभ्या राहणाऱ्या शंका निवारण्यासाठी ही धर्मसभा भरवली गेली आहे. एरवी धर्मसभेत विद्वज्जन देव वाणीत पूर्वपक्ष - उत्तरपक्ष करितात, परंतु भूदेव, आजच्या या धर्मसभेत देववाणी न जाणणाऱ्या रयतेचा मोठ्या संख्येने सहभाग आहे. अत्यंत महत्त्वाच्या आणि नाजूक प्रश्नावर काय चर्चा होते आणि कशा प्रकारे काय निर्णय होतो ये विषयी विद्वानांइतुके, आम्हाइतुके येरांससुद्धा स्वारस्य आहे. तेव्हा आपण आत्ता आपले म्हणणे जे देववाणीत मांडलेत तेच सर्वांस समजेल अशा प्रकारे प्राकृतात अर्थात मऱ्हाठीमध्ये मांडावे आणि त्यास शास्त्रीबोवा आपण उत्तरसुद्धा प्राकृतातच द्यावे, अशी आमची सूचना आहे. सूचना यासाठी की, धर्मसभेत धर्माज्ञा दिल्या जाव्यात, राजाज्ञा देण्याचा प्रसंग कोणी येऊ देवो नये. कोणी काही प्रतिक्रिया देण्यापूर्वीच एक प्रौढ ब्राह्मण ताडकन उठून उभा राहिला. घाईघाईत कसाबसा नमस्कार करून उतावीळपणे म्हणाला–
धर्मचर्चेतील शूद्रांस काय समजत्ये? शास्त्रे कशाशी खातात हे तरी त्यांस ठावकी आहे काय? धर्मचर्चेत शूद्रांचा सहभाग म्हणजे तर भ्रष्टाकाराचा कळसच झाला म्हणायचे. ते काही नाही, धर्मसभा म्हटल्यावर धर्मसभा; तिच्या रीतीनेच चालली पाहिजे. वाटल्यास धर्मसभेचे निर्णय शूद्रांस प्राकृतात सांगावेत…
महाराजांची अत्यंत जळजळीत दृष्टी त्याच्यावर स्थिर झाली, त्याबरोबर त्याचे पुढचे शब्द घशातच अडकले. आसपास बसलेल्या लोकांनी हात ओढून त्याला बसते केले. रयतेमधूनसुद्धा काही दांडगे उठून हातवारे करीत तावातावाने काहीबाही बोलू लागले. मावळ्यांनी त्यांना आवरले. थोड्या वेळाने सारे स्थिरस्थावर झाले. मात्र इथे-तिथे थोडी कुणकुण, थोडी कुजबुज होत राहिली. गणेशशास्त्री पुन्हा उठून उभे राहिले. त्यांनी कुजबुज करणाऱ्यांना हाताने थोपवून शांत केले. महाराजांना उद्देशून अत्यंत सौम्य स्वरात ते म्हणाले–
राजन, अशा नाजूक अन् संवेदनशील समस्येचा विचार करीत असता समाजाच्या सर्व स्तरांचा त्यात सहभाग असावा या दृष्टीने आपली सूचना अगदी रास्त आहे. हे जरी खरे असले तरी शास्त्राधारित तत्त्वचर्चेमध्ये काही तांत्रिक आणि पारिभाषिक शब्दांचा वापर अनिवार्य असतो. तद्वतच आपल्या मुद्द्याच्या पुष्ट्यर्थ द्यावी लागणारी उद्धृते आणि उद्धरणे संस्कृतातच द्यावी लागतात; त्यामुळेच हे राजन, धर्मचर्चेत संस्कृत भाषेचा वापर श्रेयस्कर असतो. तद्वतच अन्य प्रांतांच्या, प्रदेशांच्या प्राकृत बोली भिन्न असतात. तेव्हा आसेतू हिमाचल सर्व ब्रह्मवृंदांस व तत्त्ववेत्त्यांस आकलन होणारी संस्कृत हीच ज्ञानभाषा आणि संपर्कभाषा म्हणून अनादी काळापासून मान्यता पावली आहे. म्हणून मग धर्मचर्चा स्वाभाविकच संस्कृतातून केली जाते. दुसरे असे की, सर्वसामान्य रयतेचा सहभाग असणारी धर्मसभा आजवर माझ्या तरी पाहण्यात नाही. या कारणे मी स्वाभाविक आणि प्रचलित सभारीतीस अनुसरून पूर्वपक्ष संस्कृतात मांडला आहे.
गणेशशास्त्री, आपले म्हणणे रास्त असले, तरी सांप्रतची धर्मसभा मराठीतच चालावी असा आमचा आग्रह आहे. पारिभाषिक शब्द व उद्धृते तर संस्कृतात येणारच, त्यास उपाय नाही. कारण सारी शास्त्रे, सारे ज्ञान संस्कृतातच आहे. हजारो वर्षांपासून चालत आलेला तो अखंड प्रवाह आहे. तरी आमचा आग्रह आहे की, जसे जमेल तसे त्यांचासुद्धा मराठीत अनुवाद करून निरूपण व्हावे, ज्यायोगे संस्कृत न जाणणाऱ्यास काही थोडे पदरी पडेल.
हे राजन, प्रवचन वा कीर्तन केल्याप्रमाणे अगदीच प्राथमिक पातळीवर जाऊन धर्मचर्चा करणे तर शक्य नाही. तरीसुद्धा हे प्रजाहितदक्ष राजयोग्या, मी मजकडून होता होईतो सहज ग्राह्य होईल असे प्रतिपादन करण्याचा प्रयत्न करितो मात्र येरांनीसुद्धा मला समजून घेण्याचा प्रयत्न करावा. कधी कोणता मुद्दा फारच क्लिष्ट वाटल्यास, कोणा अधिकाऱ्याने शंका जरूर उपस्थित करावी, मी अधिक सोपे करून सांगण्याचा यत्न करीन; परंतु हे राजन, त्यास मर्यादा असतील तद्वतच या प्रक्रियेस वेळ अधिक लागेल.
‘व्हय. व्हय. चालंल. चालंल. अवं अगदीच काय न्हाय तर अर्धेतर टकुऱ्यात ऱ्हाईल. चालंल ते समद्यास्नी.’ गर्दीतून अशा प्रकारचे आवाज उमटले. मंद हसत महाराजांनीसुद्धा हात उंचावून सहमती दर्शविली. शास्त्रीमंडळींनीसुद्धा मोकळेपणी हसत माना डोलावून त्यास अनुमती दिली. त्यानंतर गणेशशास्त्र्यांनी पुन्हा आपले म्हणणे शक्य तेवढे सोपे करीत रसाळ मराठीत मांडले. त्यांची भाषा प्रासादिक, आर्जवी आणि शैली ओघवती असल्यामुळे तसेच प्रतिपाद्य विषयाचे विवेचन प्रचलित समाजभावना आणि रीतीस अनुसरून असल्याने सर्वसामान्यांस सहजपणे पटणारी होती; त्यामुळे रयतेतूनसुद्धा फार मोठा जनसमुदाय त्यांच्या बोलण्यास कधी माना डोलावून, तर कधी संमतीदर्शक उद्गार काढून पाठिंबा व्यक्त करू लागला.
जांभेकरशास्त्र्यांचा पांडित्यपूर्ण आणि प्रभावी पूर्वपक्ष आणि त्यास असलेला रयतेचा पाठिंबा पाहून शास्त्रीमंडळ अस्वस्थ झाल्याशिवाय राहिले नाही. टोळशास्त्री उत्तरपक्ष करण्यास उभे राहिले. महाराजांनी त्यांच्याकडे पाहून आश्वासक स्मित केले आणि मान डोलावून धीर दिला. शास्त्रीबुवांनी आदल्या रात्री शास्त्रीमंडळींसमोर जे विवेचन केले होते तेच पुन्हा एकदा अधिक विस्तारपूर्वक आणि त्यात अनेक उदाहरणांची व दृष्टान्तांची भर घालून साध्या सोप्या सरळ भाषेत सभेपुढे मांडले. संस्कृतातील उद्धरणांचा केवळ अर्थच नव्हे तर त्यांचा ग्रंथातील नेमका संदर्भ, त्यांची पार्श्वभूमी व त्यांचा समकालीन संदर्भ सोप्या शब्दांत रसाळपणे सांगितला. त्याच्याच जोडीला यापूर्वी महाराजांनी जगदीश्वराच्या मंदिरातील ब्रह्मसभेसमोर जो कोटिक्रम आणि तर्क मांडला होता, तोसुद्धा दैनंदिन जीवनात भोवताली घडणाऱ्या घटनांच्या उदाहरणांची आणि दृष्टान्तांची जोड देत विस्तारपूर्वक मांडला. शुद्धीकरणाची आवश्यकता आणि निकड त्यांनी अगदी तळमळीने मांडली. त्यांच्या वक्तव्यात केवळ पांडित्य नव्हते तर आर्जवी आग्रह होता. केवळ शास्त्रीय तर्क नव्हता तर समाजपुरुषाच्या उन्नतीची, उत्थानाची तळमळ पदोपदी जाणवत होती. विचार अगदी स्पष्ट होते. त्यांचे प्रतिपादन थेट श्रोत्यांच्या काळजाचाच ठाव घेत होते. धर्मांतराच्या संकटाची त्यांनी केलेली विदारक मीमांसा अत्यंत प्रत्ययकारी होती. कारण सभेतील बहुतेक प्रत्येकाच्या कुटुंबास कधीना कधी त्याचा फटका बसला होता. कोणी ना कोणी सगा, सोयरा, स्नेही, परिचित असाच हिरावून घेतला गेला होता; त्यामुळे तर त्यांच्या निवेदनाचा श्रोत्यांवर चांगलाच खोलवर परिणाम झाला. महाराजांच्या मुद्रेवरील संतोष लपून राहू शकत नव्हता. संपूर्ण शांततेने सभा त्यांचे निरूपण ऐकून घेत होती. सुरुवातीस विरोधाचे, असहमतीचे आणि निषेधाचे शेरे उठत होते पण पुढेपुढे संपूर्ण शांततेत, त्यांचे म्हणणे ऐकले जाऊ लागले. बहुसंख्य सर्वसामान्यांस तर त्यांचे म्हणणे पूर्णत: पटले. इतकेच नव्हे तर समंजस प्रज्ञावंतांचा मोठा वर्ग त्यांनी आपल्या वाक्चातुर्याने आपल्या पक्षाकडे वळवून घेतला.
असे असले तरी तथाकथित धर्मनिष्ठ कर्मठ ब्राह्मणांचा एक गट मात्र नर्मदा पाषाणवत आपल्याच भूमिकेस चिकटून होता. टोळशास्त्र्यांचे वक्तव्य संपताच त्या गटातील अनेक व्यक्ती उठून शिरा ताणून, तावातावाने बोलत आपला विरोध व्यक्त करीतच राहिल्या. त्यांच्या बोलण्यात शास्त्रोक्त तर्कापेक्षा तर्कटे आणि आग्रहापेक्षा हटवादच ठासून भरला होता. बहुतेक सारे मुद्दा सोडून भरकटत होते, तर काही भडक भाषा वापरून भावना भडकावण्याचा प्रयत्न करीत होते; धर्मभावनेला आवाहन करण्याच्या नावाखाली धमक्या देत होते. गणेशशास्त्र्यांसारख्या विद्वान मंडळींनी सामंजस्याच्या चार गोष्टी सांगण्याचा व त्यांना आवरण्याचा प्रयत्न करून पाहिला आणि अखेर ते असहाय मुद्रेने त्यांचा तमाशा पाहत गप्प बसून राहिले. शास्त्रीमंडळातून कोणीही एका शब्दाने त्यांना उत्तर देण्याचा, प्रतिवाद करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. ही असली तर्कटे चालू असताना महाराजांनी टोळशास्त्र्यांसह काहींना तसेच निराजीपंत, मोरोपंत, अनाजी दत्तो अशा निवडक मुत्सद्दी मंडळींना समीप बोलावून हलक्या स्वरात काही क्षण चर्चा केली आणि सभेस संबोधित करण्याचा निर्णय घेतला. मंडळी आपापल्या स्थानी परतली व मोरोपंतांनी हस्तक्षेप करून चर्चा थोपविली.
जनहो, वास्तविक श्रीमान टोळशास्त्र्यांनी सर्व शास्त्राधार देऊन यथास्थितपणे शुद्धीकरणाचे समर्थन केले आहे. तरी काही मंडळींचे समाधान झालेले दिसत नाही. हा प्रश्न एवढा अगत्याचा आहे की, महाराजांस त्यास असलेला विरोध पूर्णत: दूर व्हावा असे वाटते. या कारणे महाराज स्वत: या विषयाच्या समर्थनार्थ बोलू इच्छितात. राज्याचे पंतप्रधान या नात्याने आम्ही सर्व उपस्थितांस ताकीद देतो की, महाराजांचा अधिक्षेप करण्याचा, दरबारी रिवाज सोडून बेअदबी करण्याचा प्रयत्न झाल्यास नतीजा बरा होणार नाही.
त्यानंतर महाराजांनी बोलण्यास सुरुवात केली. जगदीश्वराच्या मंदिरात ब्रह्मसभेसमोर त्यांनी जे सांगितले होते आणि टोळशास्त्र्यांनी आपल्या निवेदनात जे मांडले होते तेच त्यांनी पुन्हा एकदा विस्तारपूर्वक व अधिक सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. त्यांच्या मधुर आग्रही बोलण्याची जादू भल्याभल्यांना गुंग करीत असे. तर आधीच भारलेल्या सभेस त्यांनी मंत्रमुग्ध केले नसते तरच नवल! रयतेसोबतच ब्रह्मवृंदांमधून अनुमतीसूचक उद्गार उमटू लागले. महाराजांचे बोलणे संपल्यानंतर कोणी प्रतिवाद करण्यास पुढे येत नसल्याचे पाहून निर्णय देण्यासाठी उभे राहण्याची टोळशास्त्र्यांनी नजरेनेच अनुमती घेतली. एवढ्यात एक दणकट गडी झटक्याने उभा राहिला. जागेवरूनच त्याने मुजरा घातला. आपल्या गडगडाटी आवाजात आणि रांगड्या शैलीत त्याने बोलण्यास सुरुवात केली–
म्हाराज, आमी गुंजन मावळातल्या हुबेवाडीचं पाटील. म्हाराजांनी हाळी द्यावी आन आपुन झोकून द्येयाचं हा आमचा शिरस्ता. आता यो शासतरी द्येव म्हनंल, म्हाराज सोता म्हनंल त्यापरमानं बाटून दूर ग्येलेल्या आपल्या मानसास्नी परत गोत गंगेत आनलं पायजे ह्ये तर अक्षी बावनकशी खरं हाय, पर आमाला थोडकं येगळं म्हनायचं हाय. आमचं म्हननं असं हाय की, सोराज्याशी गद्दारी करनाऱ्याचा गडाच्या टकमक टोकावरून हरहमेश कडेलोट होतुया. अशांना कंदी तोपच्या तोंडी, तर कवा कवा हत्तीच्या पायदळी द्येतात. ग्येलाबाजार बेन हातपाय तरी गमावतोच. पर, म्हाराज चूक आसंल तर पोटी घेवा. ल्हान तोंडी मोटा घास घेतो म्हना, खोटं बोलत आसंन त चाबकानं हाना, पर आमच्यासारक्या इमानदार पाइकांना हितं कायतरी विपरीत हुतंय असं दिसतंया. सोराज्याशी, सोता म्हाराजांशी इतकंच नव्हं तर धरमाशी गद्दारी करनाऱ्यासाटी हा येवडा मोटा बारदाना हुबा क्येला जातुया. काय समजंना झालंया. ‘व्हय, व्हय. बरुबर हाय’ अशा अर्थाचे उद्गार उमटले. महाराजांनी सहेतुक हंबीररावांकडे पाहिले. हंबीरराव पुढे सरसावत म्हणाले–
पाटील, महाराजांच्या न्यायाबद्दल तुम्हाला शंका आहे का? न्हाय जी सरकार, तसं न्हाई. त्ये पाप पदरात घिवून म्या काय नरकाचं धनी व्हवू की काय? पर जिकडंतिकडं कोनी कोनी काय बाय बोलतात. न्हाय न्हाय तो शक शुबा करत्यात. त म्हनलं आपुन थ्येट म्हाराजास्नीच पुसावं. चूक आसंल तर मापी करा मायबाप.
हंबीररावांनी महाराजांकडे पाहिले. महाराजांच्या नजरेची इशारत झाल्यावर ते पुन्हा म्हणाले– ठीक, ठीक. चूक नाही बरेच झाले. निदान रयतेची या संबंधातली धारणा तरी उघड झाली. नेताजीरावांचे गनिमाच्या गोटात जाणे ही गद्दारी नव्हती या विषयी महाराजांनी जातीनिशी खातरजमा करून घेतली आहे. जर नेताजीराव गद्दार असते तर आलमगिराने त्यांस जेरबंद करून दिल्लीत नेले नसते. आदबखान्यात कोंडून त्यांचा जीवघेणा छळ केला नसता. कसेही करावे पण कैदेतून मोकळे व्हावे, म्हणजे मग महाराजांच्या पायाशी स्वराज्यात परतता येईल, स्वराज्याची पुनरपि सेवा करता येईल, ऐसे योजूनच ते मुसलमान झाले. ते गद्दार नव्हते म्हणूनच. तरीसुद्धा बादशहाला त्यांचा विश्वास वाटला नाही. त्यांना दूर अफगाणिस्तानात ठेवले. नाइलाज झाला तेव्हाच दख्खनमध्ये धाडले. एवढा काळ लोटला तरी नेताजीरावांच्या निष्ठा तशाच जिवंत धगधगत्या होत्या. मोगली ढिलाईचा फायदा उठवत संधी मिळताच ते स्वराज्यात परतून महाराजांच्या चरणी रुजू झाले. त्यांच्या इमानाची आणि सचोटीची खातरजमा करून घेतली तेव्हाच महाराजांनी कौल दिला.
हंबीररावांच्या बोलण्याने समाधानाची लहर एका बाजूने उठत असतानाच कृश शरीराचा एक वयोवृद्ध ब्राह्मण ताडकन उठून उभा राहिला. अभिवादनाचे सारे संकेत धुडकावून लावत, तांबडेलाल डोळे गरगरा फिरवीत त्याने तावातावाने बोलण्यास सुरुवात केली.
हे असले शब्दांचे गारुड उभारून तुम्हास या अडाणी शूद्रांना भुलविता येईल कदाचित, परंतु आमच्यासारखे धर्मरक्षक या असल्या भाकड कथांना फसून तुम्हास काय वाट्टेल ते करू देतील असे वाटते की काय? तुम्हास धर्म म्हणजे काय पोरखेळ वाटतो? कोणीही उठावे, काहीही करावे. अरे, ज्ञानेश्वराचे उदाहरण कसले देता, तो प्रत्यक्ष नारायणाचा अवतार होता. तुम्ही काय त्याची बरोबरी करणार? अरे, चार थेंबुटे अंगावर उडवून जर राजा होता आले असते तर नदीत धुतला जाणारा प्रत्येक बैल आणि हेला चक्रवर्ती सम्राट म्हणवता…
तो ब्राह्मण असे बरेच काही बडबडत राहिला. गणेशशास्त्र्यांनी अन् चार सुज्ञांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न करून पाहिला; परंतु परिणाम उलटाच झाला. पाच-सहा ब्राह्मण उठून त्या संतापी ब्राह्मणास साथ देऊ लागले. शांत करू पाहणाऱ्यांनाच अपमानित करू लागले. मंडपातील सारे वातावरण त्यांनी दूषित करून सोडले. लोक अस्वस्थ झाले. ब्राह्मणांचा तो आरडाओरडा, शिवीगाळ ऐकत महाराज बराच काळ स्वस्थ बसून राहिले. जणू राजसूय यज्ञात शिशुपालाचे अपराध मोजणारा योगेश्वरच. मात्र महाराजांचा हा शांतपणा म्हणजे जणू आपला विजयच आहे, असे वाटून ब्राह्मणांचा तो तमाशा जसजसा उग्र होत गेला तसतशी महाराजांची नजर आणि चर्या कठोर होऊ लागली. सोबत मिळाल्याने चेव येऊन अधिकच फणफणणारा तो ब्राह्मण निर्वाणीचे बोलल्याप्रमाणे बोलून गेला– हा म्हणे राजा, म्हणे गोब्राह्मण प्रतिपालक. स्वत:स धर्मरक्षक म्हणवितो, धर्मसंस्थापक म्हणून मिरवितो, ही सभा भरवून त्याने आपण मोठा न्यायी आणि धर्मरक्षक असल्याचा मारे आव आणला आहे. पण जोवरी आमच्या जिवात जीव आहे, तोवरी आम्ही हा भ्रष्टाकार खपवून घेणार नाही. जर कोणाला आपली मनमानी करायचीच असेल, तर त्याच्या मनगटातल्या बळापेक्षा ब्रह्मतेजाचे बळ मोठे आहे हे परत एकदा सिद्ध करून दाखवू. आम्ही धर्मरक्षक ब्राह्मण आत्ता या क्षणी याच स्थानी आपली जीभ हासडून वा कपाळमोक्ष करून प्राणार्पण करू. या ब्रह्महत्येचे पातक राजा म्हणविणाऱ्या या अधम्र्याच्या माथी लागेल हे ब्रह्मवाक्य. खामोश… महाराजांचा संयम संपला. वीज कडाडावी वा आसूड कडकावा तसा त्यांचा आवाज साऱ्या मंडपात घुमला. त्या स्वरातील चीड आणि संतापामुळे मांडवातील खांबन् खांब थरथरला. कनाती शहारल्या. त्या आवाजाने तो अद्वातद्वा बोलणारा ब्राह्मण इतका दचकला की, मटकन खालीच बसला. खामोशऽऽऽ यापुढे एक शब्द जरी उच्चारला तरी कोणताही मुलाहिजा न राखता जिभा कापल्या जातील. आम्ही ब्राह्मणांच्या प्रतिपालनाची प्रतिज्ञा घेतली आहे म्हणूनच इतका उशीर तुमच्या ब्राह्मण्याचा मुलाहिजा बाळगला आणि तुमची बकवास सहन केली. आमची सहनशीलता म्हणजे आमची दुर्बलता, हतबलता समजता की काय? स्वत:ला धर्माचे रक्षणकर्ते म्हणवणारे तुम्ही आज ब्राह्मण म्हणून येथे तोंड चालवीत आहात ते केवळ परमेश्वर कृपेने तुम्हावरी यवनांचा घाला आला नाही म्हणूनच. येथे तुमचा सन्मान होतो म्हणून ही मुजोरी दाखविता? अन्यथा गनिमाकडचा एक मुसलमान शिपाई जरी सामोरी आला तरी श्वानागत दो पायी शेपूट घालून बारावाटा धावता.
स्वराज्य संस्थापना आणि स्वधर्माच्या अभिवृद्धीसाठी आम्ही केवळ तोंडाने वल्गना करीत नाही तर त्यासाठी हाती शस्त्र धरिले आहे. त्याचा धाक आज त्रिखंडी दुमदुमतो आहे. काय युक्त आणि काय अयुक्त हे तुम्हासारख्या पोटार्थींकडून शिकण्याची आम्हास गरज नाही. पाप-पुण्याचा धाक कोणास घालिता? अफजलखान मारिला, त्याचा वकील जातीने ब्राह्मण, पण म्लेंच्छांचे मीठ खाऊन म्लेंच्छांपेक्षा म्लेंच्छ झालेला. त्याने आम्हावरी शस्त्र धरिले. त्याचे तलवारीचे घाव झेलीत आम्ही त्यास विनवीत होतो, आम्हास ब्राह्मणावर शस्त्र चालविणे नाही; परंतु म्लेंच्छ वृत्ती कणाकणांत बाणवून स्वत:च्याच धर्माच्या मुळावर उठलेल्यास त्याचा पाड लागेना. असल्या अधर्म्यांचे ब्राह्मण्य ते कोठले? त्यांच्या ब्राह्मण्यापेक्षा आम्हास स्वराज्याचे रक्षण सहस्रपट अगत्याचे. तेव्हा शस्त्राघाते आम्ही स्वहस्ते ब्राह्मण कापून काढिला. रणांगणी लढताना आमचेच स्वकीय आम्हावरी शस्त्रे उगारून येतात तेव्हा आम्ही काय त्यांस जात-गोत पुसतो की काय? योगेश्वराच्या उपदेशे पार्थाने ब्राह्मण असलेल्या प्रत्यक्ष आपल्या गुरुवरी शस्त्र धरिले. प्राणांहुनी प्रिय आजाचा वध केला. तो काय अधर्म? नव्हे सत्य धर्माच्या रक्षणास्तव ते तर त्यांचे परमकर्तव्य.
अपसमजूत दूर व्हावी, प्रबोधन व्हावे, सामोपचाराने समजवावे म्हणून आम्ही या सभेचा प्रपंच मांडिला. येर रयतेस धर्म कळावा म्हणून धर्मचर्चा मराठीत करविली. या उपरीसुद्धा समजूत पटत नसेल आणि फुकाची आढ्यता संपत नसेल तर समजणाऱ्या भाषेत समजावणी करण्याचाच धर्ममार्ग आम्हापुढे शिल्लक उरतो. तुमच्या आततायी, हटवादी, ब्राह्मण्याच्या रक्षणापरिता स्वधर्माची अभिवृद्धी आम्हास अधिक अगत्याची. मिथ्या धर्मरक्षणाचा तुमचा हट्ट आम्हीच स्वहस्ते पुरवितो. पवित्र धार्मिक विधींसाठी येथे यज्ञवेदी उभारली आहे. त्या कारणे येथे कोणाचे दूषित रक्त सांडणे युक्त नव्हे. त्या कारणे मोक्षप्राप्तीची तुमची इच्छा आम्ही तुम्हास टकमकावरून लोटून देऊन पुरी करवितो. येसाजी कंक, ढालाईत बोलवा आणि या पाचही ब्राह्मणांच्या मुसक्या आवळा. महाराजांचा सात्त्विक संताप पाहून भल्याभल्यांना घाम फुटला. त्यांनी पाच ब्राह्मणांना जेरबंद करून, त्यांचा कडेलोट करण्याची दिलेली आज्ञा ऐकून तर सारी सभा चित्रासारखी तटस्थ झाली. ब्राह्मणांची उर्मट वटवट बंद झाली तरी त्यांच्या मुखावरील मगरुरी कायम होती. मात्र जेव्हा ढालाईतांनी खरोखरच त्यांच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांना मांडवाबाहेर चालविले, तेव्हा मात्र त्यांचे अवसान गळाले. मग मात्र त्यांनी नुसता आकांत मांडला–
महाराज, दया करा. क्षमा करा. आमची चूक झाली. पदरात घ्या. आमचा जीव वाचवा शास्त्रीमहाराज. या गरीब ब्राह्मणांचा जीव वाचवा. दया करा महाराज, दया करा… झाल्या प्रकाराने अस्वस्थ झालेले गणेशशास्त्री ब्राह्मणांची रदबदली करण्याच्या इराद्याने उभे राहिले असता महाराजांनी हाताच्या इशाऱ्याने त्यांना थोपविले आणि कडक शब्दांत हुकूम सोडला– येसाजी, याच क्षणी यांना नेसत्या वस्त्रानिशी गडाखाली न्या. हातीपायी साखळदंड जखडून यांना तातडीने स्वत:च्या गावी रवाना करा. यांच्याच गावातून यांची गाढवावरून धिंड काढा. चावडीसमोर गाव गोळा करून यांनी केलेल्या तमाशाचा झाडा घ्या. आम्ही गोब्राह्मण प्रतिपालक असलो, तरी धर्मरक्षणाच्या आड येणारी अडाणी आणि हटवादी ब्राह्मणांची खोटी पत्रास या राज्यात राखली जात नाही. राखली जाणार नाही हे जगाला नीट समजू देत. शास्त्रीबुवा उद्याचे विधी ठरल्या मुहूर्तावर, ठरल्या रीतीनेच होतील. आसनावरून ताडकन उठून ताडताड पावले टाकीत महाराज मंडपाबाहेर पडले. सात्त्विक संतापाने त्यांच्या अंगाला थरकाप सुटला होता. हुजऱ्याने पुढे केलेले चढाव पायी चढविण्याचेसुद्धा त्यांना भान राहिले नाही. मोतद्दाराने पुढे आणलेल्या घोडीवर झेप टाकून त्यांनी टाच दिली आणि घोडी चौखूर उधळीत ते महालाकडे निघून गेले.
महाराज दुपारच्या भोजनास निघणार एवढ्यात निराजीपंत आणि कवींद्र परमानंद भेटीला आल्याची वर्दी आली. महाराजांची अनुमती मिळताच दोघे मुजरा करीत महालात प्रवेशले. या पंत. तातडीने असे?
आपल्या आज्ञेप्रमाणे गणेशशास्त्री जांभेकर भेटीसाठी दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत अन्य बारा-पंधरा विद्वानसुद्धा महाराजांच्या दर्शनाच्या इच्छेने आले आहेत. त्यांस सदरेवर थांबवले आहे. आज्ञा झाल्यास भेटीस दाखल होतील. पण हुजऱ्या सांगत होता, स्वामी भोजनास निघत आहेत. तरी भोजनोत्तर भेट घेता येईल. मंडळी सदरेवर थांबतील. नाही. नको. भोजनासारख्या क्षुल्लक सबबीखातर विद्वज्जनांचा खोळंबो नको. त्यांची भोजनेसुद्धा व्हायची असतील. मंडळीस आमच्या खासगी दिवाणखान्यात घेऊन या. आम्ही पोहोचतोच काही पळांत. महाराज दिवाणखान्यात प्रवेशताच उपस्थित ब्राह्मणांनी उत्थापन देत रीतसर नमस्कार केला. महाराजांनी सर्वांचा परिचय करून घेतला. वास्तपुस्त केली. सरतेशेवटी गणेशशास्त्र्यांकडे वळून ते म्हणाले–
गणेशशास्त्री जांभेकर, कुलकर्णी आपण म्हणे मूळ खान्देशीचे, पण सध्या कोल्हापुरी वास्तव्य करून आहात. काय कारणे मूळ वतन सोडून ये देशी येणे झाले? महाराज, आमचे गाव गोधुली, पांझरा नदीचे तीरावर. गाव तसे गावंढेच पण उत्तरेतून येणाऱ्या फौजा तापीपार झाल्या की, आमचे गाव ओलांडूनच दक्षिणेत उतरतात. एकदा फौज आली की, टोळधाडीप्रमाणे सारा विध्वंस होतो. दाणा-वैरण, धान्यधुन्य, गुरेढोरे, तरणे-ताठे पुरुष-स्त्रिया काय काय लुटले जाईल काही सांगता येत नाही. वारंवार येणाऱ्या या विपदेस कंटाळून अखेर करवीर क्षेत्री श्री जगदंबेच्या चरणी आश्रय घेतला.
आपणासारखे व्युत्पन्नच जर निराश होत्साते असा ग्रामत्याग करू लागले तर येरांनी कोणाचा भरवसा धरावा? त्यातून आपण कुलकर्णी म्हणजे सरकारी अधिकारी. आपल्या पश्चात गावचे कुळकर्ण कोणी सांभाळावे? त्याने सरकारी उत्पन्नाची तर हेळसांड होतेच पण गावात जबाबदार अधिकारी नसल्याने गावगुंडांचे फावते. रयत अधिकच त्रस्त होते. असे न होऊ देणे. खान्देशीचा मोठा प्रदेश आता स्वराज्यात आला आहे. श्री कृपेकरून यापुढे असा उपद्रव होणार नाही. मऱ्हाठी फौजांच्या धाकाने उत्तरेतून येणारी दले मार्ग बदलून जातील. आपण स्वग्रामी परतावे. जी. आज्ञा. नव्हे, नव्हे; ही आज्ञा नाही. आमची अशी विनंती आहे. सिंहासनाधीश्वर राजाची इच्छासुद्धा प्रजेने आज्ञा म्हणून उरीशिरी धरिली तरच स्वराज्य सुराज्य होते. वाहव्वा! वाहव्वा!! त्यानंतर महाराजांनी गणेशशास्त्र्यांसह सर्व ब्राह्मणांची यथोचित संभावना केली. त्यांस निरोप देताना महाराज म्हणाले– गणेशशास्त्री, सकाळी सभेत अतिप्रसंग झाला खरा. पण काय करणार? नाइलाज होता. काडीने औषध लावून व्रण बरा करिता येत नाही. त्रास देणारी गळवे कापूनच काढावी लागतात. स्वामींची कृती प्रसंगानुरूपच होती. स्वामींनी दिलगीर होऊ नये. आम्हासोबत आलेली ही मंडळी वस्तुत: त्या प्रकाराबद्दल क्षमा मागण्यासाठीच आली आहेत; परंतु या अशा प्रसन्न वातावरणात अप्रिय विषय कसा काढावा हे न उमगल्याने उगी राहिली. त्या अतिरेकी ग्राम्य प्रकाराबद्दल स्वामींनी विरोधी मत व्यक्त करणाऱ्यांवर नाराज होऊन काही कठोर कारवाई करू नये, अशी प्रार्थना आहे. जवळपास आम्हा साऱ्यांचेच आता मतपरिवर्तन झाले आहे. आजवर आम्ही आम्हास जे शिकविले गेले तेच घोटत गेलो. शास्त्रवचनांचा अर्थ समजला पण त्यांचा असा समाजोन्मुख आशय कधी ध्यानी आलाच नाही. आम्ही आपले ‘धर्मो रक्षति’ याकडेच ध्यान दिले, ‘रक्षित:’ नुसते घोकले पण त्याचा अन्वय आणि आशय ध्यानी घेतला नाही. धर्मरक्षण करितो हे तर त्रिकालबाधित सत्य आहे, पण कोणाचे? तर जो धर्माचे रक्षण करितो त्याचे. हा अन्वय आज ध्यानी आला. तरी अज्ञानमूलक अपराधाला स्वामींनी क्षमा करावी. छे! छे!! अहो क्रोध कसला धरायचा, गैर वागणाऱ्यास शासन झाले. विषय संपला. हे सर्वत्रांस जाणवून देण्यासाठी म्हणून तर आपणास मुद्दाम पाचारिले. आता आमुच्या दोन विनंत्या विद्वज्जनांनी मान्य कराव्यात.
आम्ही राजाज्ञा म्हणूनच त्यांचा आदर करू. पहिली गोष्ट, आपण या सर्व मंडळींसह उद्या होणाऱ्या धर्मकार्यात सक्रिय सहभागी असावे. हा तर आम्ही आमचा बहुमान समजतो. उत्तम! आम्ही टोळशास्त्र्यांकडे तसा सांगावा धाडतो. आपण लगेचच त्यांची गाठ घ्यावी म्हणजे त्यांची अडचण होणार नाही. तद्वतच आपलासुद्धा मरातब राखणे त्यांस सुलभ होईल. अस्तु. दुसरे असे की, यापुढे हा विषय आपणासारख्यांनी जनलोकांत न्यावा. येरांच्या गैरसमजुती दूर कराव्यात. परधर्मात गेलेल्यांस पुनरपि स्वधर्मात आणावे. अवश्य राजन, यापुढे हा विषय आमचे जीवनव्रत होऊन राहील. त्यासंबंधी लोक-जागरण करण्यास आम्ही सर्वशक्तिनिशी कटिबद्ध असू. मात्र… मात्र लोकांस स्वधर्मात आणण्याचा विषय जरा अवघड आहे. तो काय म्हणून? तृषार्ताने कूपाशी जावे. कूपास तर तृषित शोधत हिंडणे शक्य नाही. वास्तव. परंतु व्युत्पन्नांनी कूप वृत्तीने राहू नये. निर्झर होऊन राहावे अशीच आमची प्रार्थना आहे. तथास्तु. *त्यानंतर महाराजांनी ब्रह्मवृंदास अत्यंत सन्मानपूर्वक निरोप दिला.* *_क्रमश:_*
*________📜🚩

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...