महाराष्ट्र देशा

पोस्तसांभार ::

9224223189
जेव्हा जेव्हा दक्षिण भारत व उत्तर भारत यांबद्दल बोललं जातं तेव्हा तेव्हा न जाणो का, या दोन्ही संस्कृती कशा वेगळ्या आहेत आणि कशा वेगळ्याच पद्धधतीने विकसित होत गेल्या हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. पण जर सखोल विचार केला तर सांस्कृतिकदृष्ट्या या दोन्ही सारख्याच आहेत असे दिसेल. किंवा त्या दोन्ही वेगळ्या नाहीतच हे अभ्यासाअंती समजेल. हो, त्यांच्या भौगोलिक विविधतेमुळे त्यांच्यात फरक असू शकतो पण संस्कृती मात्र बऱ्यापैकी सारखी व इतर सर्व संस्कृतींप्रमाणे समावेशक आहे. जशा एकाच झाडाला अनेक फांद्या असतात, कुणा एका फांदीवर फळ असते, कुणावर नसते .पण म्हणून या फांद्या पूर्ण वेगळ्या आहेत असे म्हणणे योग्य नाही. तसेच आहे हे. हे इतकं समजावून सांगण्याचं कारण की दक्षिण भारतातून उत्तरेकडे (महाराष्ट्राकडे) सरकत आलेली एक संस्कृती. *महापाषाणीय संस्कृती*(इ.स.पू. 900 ते 300) .
ताम्रपाषाणयुग संपता संपता महाराष्ट्राच्या पूर्वेकडे भटकंती करत आलेल्या काही लोकांनी दक्षिणेकडून आलेल्या संस्कृतीतील लोकांना आपल्यात सामावून घ्यायला सुरुवात केली. मागच्या लेखात मी या लोकांबद्दल सांगताना त्यांनी महाराष्ट्रात आणलेल्या तीन गोष्टींचा उल्लेख केला होता. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा आवडता प्राणी- *घोडा* . घोडा हा या महापाषाणयुगीन संस्कृतीचा आवडता प्राणी . सांगून खरं वाटणार नाही पण काही ठिकाणी या प्राण्याला माणसाप्रमाणे दफन करण्यात आलेले दिसते. दफन करताना त्यावर अलंकार ही घातले जात. भारतात घोडा हा तसा वादग्रस्त विषय आहे. घोडा मूळचा भारतीय नाही असे अनेकांचे म्हणणे आहे. कारण सिंधू संस्कृतीमधील उत्खननात घोड्याचे अवशेष मिळाले नाहीत. मात्र महापाषाणयुगाशी संबंधित बऱ्याच उत्खननात मानवी अस्थींशेजारी घोड्याची हाडे ही सापडतात. यावरून मालकाबरोबर घोड्यालाही पुरण्यात आले असावे असा अंदाज निघतो. बहुतेक ठिकाणी घोड्यांच्या फक्त डोक्याची हाडे सापडतात. यावरून त्याचा बळी देऊन मग विधीवत त्याला मालकाशेजारी पुरण्यात आले असावे असे समजते (वैदिक संस्कृतीमधेही अश्वमेध यज्ञानंतर घोड्याचा बळी देऊनच यज्ञ समाप्ती होत असे). घोड्याला समाजामध्ये मान होता, काही ठिकाणी घोड्यांची दफनेही आढळतात, दफन करताना त्यावर अलंकार घालीत, हे सर्व जरी खरे असले तरी घोड्याची पैदास फार मोठ्याप्रमाणावर होत नसल्यामुळे फक्त काही संपन्न लोकांनाच तो घोडा बाळगणे परवडत असावे, म्हणून घोड्याच्या अस्थी सर्रास आढळत नाहीत. प्रत्येक दफन भूमीत दोन चारच्या संख्येने आपणास घोड्याची दफने दिसून येतात. यावरून समाजामध्ये संपन्न गट व सामान्य गट अशी विभागणी असावी असे दिसते.
घोड्याच्या पाठीवर सामान लादून दूर दूरची अंतरे कापता येऊ लागली, त्यामुळे घोड्याने त्यांच्या जीवनालाच गती दिली. या गतीमुळेच त्यांना हव्या असणाऱ्या धातूच्या शोधात त्यांना भटकता यायचं. पण या भटकंतीमुळेच त्यांना एकाच ठिकाणी वस्ती करून राहणं काही जमलं नाही. कदाचित म्हणूनच त्यांच्या वस्त्यांचे अवशेष फारसे मिळत नाहीत. स्थिर/कायमच्या वसाहतींऐवजी (permanent settlement) त्यांच्या वसाहती या हंगामी वसाहती (seasonal settlements) होत्या. म्हणूनच असेल कदाचित त्यांची दफन पद्धती वेगळीच होती. तीच आज त्यांची एक मुख्य ओळख आहे. आणि त्या मुळेच या संस्कृतीला आपले नाव मिळाले .... पाषाणयुगाशी तसा काही संबंध नसलेली ही महापाषाणीय संस्कृती (Megalithic Culture).

9224223189
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा