फॉलोअर

बुधवार, ५ एप्रिल, २०२३

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ४२

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव

भाग ४२
आभीरांचें आगमन
आभीरांच्या वंशजांस सध्यां अहीर म्हणतात, व सध्यां ते सोनार, सुतार, गुराखी, उपाध्याय वगैरे धंदेवाले बनले आहेत. महाराष्ट्राच्या उत्तर भागांत एके काळीं त्यांचें राज्य होतें. आभीर शिवदणत्ताचा मुलगा ईश्वरसेना याच्या कारकीर्दीच्या ९ व्या वर्षाचा एक शिलालेख नाशिक येथें सांपडला आहे. हा शिलालेख इसवी सनाच्या तिस-या शतकाच्या समाप्तीच्या काळांतील असावा असें दिसतें. आभीर नांवाचा एक राजवंश असून त्यांत दहा राजे होऊन गेले असा पुराणांत उल्लेख आहे (वायुपुराण, खण्ड २ रें अ. ३७). याच्या पूर्वींच्या काळचा एक शिलालेख काठेवाडांत गुंडा येथें सांपडला आहे. त्यांत रुद्रमूर्ति नांवाच्या एका आभीर सेनापतीच्या दानधर्माचा उल्लेख आहे. शके १०२ म्ह. इ. स. १८० च्या सुमारास रुद्रसिंह नांवाचा क्षत्रप राजा राज्य करीत होता त्याच्या वेळचा सदर शिलालेख आहे. दुस-या शतकाच्या शेवटीं शेवटीं व तिस-या शतकात आभीर लोकांच्या हातांत बरीच राजकीय सत्ता होती, यावरून ते पहिल्या शतकांत या देशांत आले असावेत;
ख्रिस्ती शतकाच्या सुमारास मध्य आशियांतून आलेल्या लोकांपैकीं आभीर व हे एक असावेत. महाभारत आणि पुराणें यांतून यांचा उल्लेख दस्यु असा आढळतो. कधीं कधीं त्यांस म्लेछ असेंहि म्हटलेलें आहे. भगवान श्रीकृष्ण निजधामास गेल्यावर द्वारकेहून कृष्णाच्या स्त्रियांस अर्जुन हस्तिनापुरास नेत असतां वाटेंत आभीरांनीं त्या हिरावून नेल्या. शके १०२ म्हणजे ख्रिस्ताब्द १८० च्या सुमारास सांपडलेल्या एका शिलालेखावरून गुजराथेंतील सुंड संस्थानाच्या सेनापतीचा उल्लेख आभीर म्हणून केला आहे.
नाशिक लेण्यांतील शिलालेखांत एका आभीर राजाचें वर्णन आहे. ('आभीर पहा') एंथेविन यानें त्याचा काल ख्रिस्ती चवथे शतक असा ठरविला आहे. आंध्रमृत्यांनंतर दक्षिण (प्रांत) आभीरांच्या ताब्यांत होती असें पुराणांत सांगितलें असून तापीपासून देवगडापर्यंत असणार्या भागास आभीर ही संज्ञा होती. समुद्रगुप्ताच्या वेळीं अभीरांनीं पूर्व राजपुतान्यांत आणि माळव्यांत वस्ती केली. काठी लोक गुजराथेंत आठव्या शतकांत आले तेव्हां बराच भाग अहीरलोकांच्या ताब्यांत असलेला त्यांस आढळला. मिर्झापूर जिल्ह्यांतील एका भागास अहरौरा असें नांव आहे आणि झांशीजवळ असलेल्या एका भागास अहीरवाड असें म्हणतात. ख्रिस्ती शतकारंभाच्या सुमारास अहीर नेपाळचे राजे होते, असें इलियट म्हणतो. खानदेशांतहि अहीरांच्या वसाहती महत्त्वाच्या होत्या. अशीरगड किल्ला पंधराव्या शतकांत आसा अहीराने बांधला असें म्हणतात. त्याच्या पूर्वजांची वस्ती तेथें ७०० वर्षांपासून होती आणि त्याच्या जवळ खुद्द १०००० गुरें, २०००० मेंढया, १००० घोड्या व २००० सैन्य असूनहि आसा या साध्या नांवानेंच तो लोकांत ओळखला जाई. त्याच्या उदारपणामुळें तो फार लोकप्रिय झाला होता. अशीरगडविषयींच्या दंतकथांत अतिशयोक्ति असण्याचाहि संभव आहे. ११ व्या (ख्रिस्ती) शतकांत टाक आणि चव्हाण रजपुतांच्या ताब्यांत हा कित्ता अशीर किंवा अहीर या नांवानेंच होता. फिरस्ता यानेंहि अशीरगड हा अहीरानें बांधलेला आहे अशी माहिती आपल्या पुस्तकांत दिली आहे. तापीनदीच्या खोर्यांत असलेल्या एखाद्या अहीर संस्थानिकाच्या नांवावरून या किल्ल्याच्या नांवाचा त्याच्या लोकांशीं सबंध जुळवून देणेंहि संभवनीय आहे.
मध्य प्रांतांत गौळी राजांच्या वैभवाच्या दंतकथा बर्याच चालत आल्या आहेत. छिंदवाड्यांतील देवगड किल्ला हा एका दंतकथेच्या आधारें पाहातां सोळाव्या शतकांपर्यंत गवळी राजांच्या ताब्यांत होता व त्यापासून नंतर तो गोंडांनीं घेतला. देवगड गोंड जातीचा मूळ पुरुष जातवा यानें मनसुर आणि गणसुर या गवळी राजांची नौकरी धरली आणि देवीच्या प्रसादानें त्यांचा वध करून स्वत: त्यांच्या जागीं राजा झाला. त्यानंतर कांहीं वर्षें गवळ्यांच्या ताब्यांत नरनाळा किल्ला होता आणि पुढें तो मुसुलमानांनीं घेतला. सातपुड्याच्या दक्षिणेकडील एका शिखरावर गाविलगड नांवाचा किल्ला आहे, सागर जिल्ह्यांत प्रचलित असलेल्या दंतकथांवरून इटावा आणि खुरई येथें ख्रिस्ती शकाच्या सतराव्या शतकाच्या अखेरपर्यंत गवळी राजे होते.
चवथ्या शतकांत अहीर लोकांचें राज्य खानदेश, नाशिक, काठेवाड पालनपूर व कच्छ या प्रांतांत होतें, याबद्दल बळकट पुरावा आहे. काठी लोक गुजराथेंत ८व्या शतकांत गेले. तेव्हां बहुतेक मुलुख अहीर लोकांच्या ताब्यांत होता. त्याचप्रमाणें खानदेशांत अहीर लोकांचें बरेंच वर्चस्व असावें कारण असि(शि) रगड नांवाचा किल्ला ''असा अहीर'' यानें बांधला व त्यानें आपलें नांव त्या किल्ल्यास दिलें असें फेरिस्त्याचें मत आहे ही गोष्ट वर सांगितलीच आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...