फॉलोअर

बुधवार, ५ एप्रिल, २०२३

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ५१

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव



भाग ५१
महाराष्ट्रात सातवाहनवंशाचा उदयकाळ ------------३
सातवाहन वंश :
पोस्तसांभार :: मिराशी, वा. वि.
वेदिश्रीनंतर अनेक राजांनी राज्य केले. त्यांची नावे व शासनाची वर्षे पुराणांत दिली आहेत पण ती सर्वस्वी विश्वसनीय नाहीत. या वंशातील आठवा राजा आपीलक याचे मात्र एक तांब्याचे नाणे छत्तीसगढमध्ये महानदीच्या काठी बालपूर येथे सापडले आहे. सतरावा राजा ⇨हाल हा गाथा सप्तशती नामक सुप्रसिद्घ प्राकृत भाषेतील सातशे गाथांच्या संग्रहाचा कर्ता म्हणून विख्यात आहे.
हाल राजानंतरच्या पाच राजांच्या कारकीर्दीविषयी पुराणांत किंवा इतरत्र काहीच माहिती मिळत नाही. या कालात कुशाण सम्राटांच्या भूमक आणि नहपान या क्षत्रपांनी (प्रांताधिपतींनी) गुजरात व महाराष्ट्र जिंकून तेथे आपला अंमल बसविला. नहपान व त्याचा जामात ऋषभदत्त यांचे शक संवत् ४१ ते ४६ पर्यंतचे लेख महाराष्ट्रात नासिक, कार्ले वगैरे ठिकाणी सापडले आहेत. त्यांवरून नहपानाचे साम्राज्य दक्षिणेत कृष्णा नदीपासून उत्तरेत अजमीरपर्यंत पसरले होते असे दिसते. प्रभदत्त वा उषवदात याने बौद्घ भिक्षूंकरिता नासिकजवळ लेणी कोरविली, त्यांच्या चरितार्थाकरिता ग्रामदाने दिली, तसेच धर्मशाळा, उद्याने, तलाव इ. लोकोपयोगी कृत्ये केली आणि सहस्र ब्राह्मणभोजने घालून ब्राह्मणांनाही विविध प्रकारची दाने दिली. विदर्भातही रुपिअम्मनामक महाक्षत्रपाचा अंमल होता, हे पौनी (भंडारा जिल्हा) येथे अलीकडे सापडलेल्या छायास्तंभावरून माहीत झाले आहे.
या काळात सातवाहन राजांची सत्ता प्रतिष्ठानजवळच्या प्रदेशात सीमित झाली असावी परंतु इ. स. दुसऱ्या शतकाच्या द्वितीय पादांत गौतमीपुत्र सातकर्णी (कार. इ. स. ६२–८६) या महाप्रतापी सातवाहन नृपतीने शकांचा उच्छेद करून दक्षिणेत विशाल साम्राज्य स्थापिले. त्याने प्रथम विदर्भ काबीज केला आणि नंतर पश्चिम महाराष्ट्रावर स्वारी केली. शकांवरील विजयानंतर लवकरच कोरविलेल्या लेखांत त्याने आपला उल्लेख ‘बेनाकटकस्वामी’ (वैनगंगा जिल्ह्याचा अधिपती) म्हणून केला आहे. त्याच्या राज्यांत ऋषीक (खानदेश), अश्मक (अहमदनगर आणि बीड), आकरावन्ती (पूर्व व पश्चिम माळवा), सुराष्ट्र आणि अपरांत (कोकण) हे देश अंतर्भूत होते, असा तत्कालीन लेखांत उल्लेख आहे. यांच्याही पलीकडे आंध्रादी प्रदेशांवर याचा अंमल होता, म्हणून कोरीव लेखांत त्याला ‘त्रिसमुद्राधिपती’ म्हटले आहे. त्याने निदान चोवीस वर्षे राज्य केले असे दिसते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...