संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव
कलचुरी वंश--------------------------१
प्राचीन भारतातील एक प्रसिद्ध वंश. उत्तर किंवा दक्षिण भारतातील कोणत्या ना कोणत्या प्रदेशावर ५५० पासून १७४० पर्यंत, म्हणजे जवळजवळ बाराशे वर्षे हा वंश राज्य करीत होता. त्यांच्या कोरीव लेखांवरून ह्या वंशाची बरीच माहिती ज्ञात होते. त्यांत या वंशाचे नाव कटच्चुरी, कटचुरि, कलचुरी, कालच्चुरि, कलतुर्य, कळचुर्य इ. प्रकारांनी येते. नंतरच्या लेखांत हे राजे आपणास हैहय कार्तवीर्य सहस्रार्जुनाचे वंशज म्हणवू लागले. यांनी २४९-५० या वर्षात आरंभ होणार्या संवताचा सर्वत्र उपयोग केल्यामुळे या संवताला पुढे ‘कलचुरि-संवत’ किंवा (यांच्या प्रदेशावरून) ‘चेदि-संवत’ असे नाव पडले, पण तो संवत त्यांचा नसून मूळचा आभीरांचा होता. कारण कलचुरी तिसर्या शतकात उदयास आले नव्हते.
पूर्वकालीन कलचुरी ५५० च्या सुमारास वाकाटकांनंतर उदयास आले. त्यांचा मूळपुरुष कृष्णराज (सु. ५५०-५७५) याने माहिष्मती(मध्य भारतातील महेश्वर) येथे आपली राजधानी करून आपली सत्ता मध्य भारत, गुजरात, कोकण, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भ यांवर प्रस्थापित केली. त्याची चांदीची नाणी या सर्व प्रदेशांत सापडली आहेत.
कृष्णराजाचा पुत्र शंकरगण (सु. ५७५-६००) आणि नातू बुद्धराज (सु. ६००-६२०) यांचे लेख गुजरात महाराष्ट्र या प्रदेशांत सापडले आहेत. बादामीच्या मंगलेश या चालुक्य नृपतीने बुद्धराजाचा पराभव केला होता; पण त्याचे राज्य खालसा केले नव्हते. पुढे दुसर्या पुलकेशीने ६२० च्या सुमारास बुद्धराजाचा उच्छेद करून तो तीन महाराष्ट्रांचा स्वामी झाला. नंतर कलचुरींनी काही काळ चालुक्यांचे स्वामित्व स्वीकारून त्यांच्याशी शरीरसंबंधही केले. बादामीच्या दुसया विक्रमादित्याने दोन हैहय राजकन्यांशी विवाह केले होते. त्या कलचुरी वंशीय असाव्यात.
हे कलचुरी राजे शिवोपासक होते. त्यांचा पाशुपत आचार्यांना आश्रय होता. मुंबईजवळची घारापुरीची लेणी त्यांच्या आश्रयाखाली कोरली गेली, असा एक तर्क आहे.
सातव्या शतकापासून बादामीचे चालुक्य महाराष्ट्र-विदर्भ, गुजरात या प्रदेशांत प्रबळ झाल्यामुळे कलचुरींना उत्तर भारताकडे आपली दृष्टी वळविणे भाग पडले. त्यांनी कालंजरचा किल्ला काबीज करून त्रिपुरी (जबलपुरचे तेवर) येथे आपली राजधानी केली. उत्तर भारतातील कलचुरी सत्तेचा संस्थापक वामदेवराज (सु. ६७५-७००) हा होता. म्हणून त्रिपुरीचे त्याचे सर्व वंशज आपल्या लेखांत स्वतःचा ‘वामदेवपादानुध्यात’ (वामदेवाच्या चरणांचे चिंतन करणारे) असा निर्देश करतात. वामदेवाने शरयूपार प्रदेश जिंकून तेथे आपल्या लक्षणराज नामक लहान भावाची नेमणूक केली होती. त्याच्या शाखेला शरयूपारचे कलचुरी असे नाव आहे. ही शाखा त्या प्रदेशावर पंधरा पिढ्या राज्य करीत होती. तिचा शेवटचा राजा सोढदेव (सु. १०५५-१०८०) याचा उच्छेद करून कनौजच्या गाहडवालांनी तो प्रदेश खालसा केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा