संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव
विदर्भ ( वऱ्हाड ) चा अतिप्राचीन इतिहास --------------------३
१८५७ च्या नानागर्दीत वर्हाड बहुतेक शांत होतें. स. १८५८ मध्यें तात्या टोपी सातपुडा पर्वतांत आला, व त्यानें दक्षिणेकडे उतरत जाऊन दख्खनमध्यें चळवळ करण्याचा प्रयत्न केला, परंतु वर्हाडमध्यें तो येऊन पोहोंचला नाहीं. जेव्हां इंग्रजांच्या ताब्यांत वर्हाड आलें तेव्हां शेतजमिनीची किंमत चढली. पुढें लगेच अमेरिकन यादवी (सिव्हिल वॉर) सुरु झाली व कापसाच्या पिकास विलक्षण उत्तेजन मिळालें. शेतकर्यांनीं धान्य न पेरतां सर्वत्र कापूसच पेरण्याचा सपाटा लावला. तो मुंबईस (व तेथून परदेशांत) रवाना होई. कापूस परदेशीं फार जाऊं लागल्यामुळें बराच रोख पैसा व सोनें मोबदला मिळत असे. मालाची किंमत एकदम वाढून मजुरी वाढली व लोक श्रीमंत झाले. याच वेळेस रेल्वे लाईनीचें काम सुरु झालें. लागवडीची जमीन शेंकडा ५० नें वाढली व १८६७ पासून जमीनवसुलाचें उत्पन्न शेंकडा ४२ नें वाढलें. लोकसंख्या शेंकडा ८ नें वाढली. स. १८६० नंतर पूर्वीप्रमाणें हैद्राबाद काँटिंजंट म्हणून वेगळें सैन्य संभाळणें खर्चाचें व निरुपयोगी ठरलें व वर्हाडची व्यवस्था वेगळाच एक प्रांत म्हणून ठेवणें फार खर्चाचें होऊं लागलें. म्हणून १९०२ मध्यें निजामाबरोबर पुन्हां तह करण्यांत आला. यांत निजामचा वर्हाडवरचा हक्क पुन्हां शाबीत झाला व त्यानें हिंदुस्थान सरकारला, दरसाल २५ लाख घेऊन वर्हाड कायमच्या वहिवाटीस दिला; यामुळें हिं. सरकारला या प्रांताची वाटेल तशी व्यवस्था करण्याचा अधिकार मिळाला. मात्र १८५३ च्या तहाप्रमाणें निजामचा मुलुख सुरक्षित ठेवण्याची अट राहिली. या तहान्वयें स. १९०३च्या मार्चमध्यें तैनाती फौज ही निराळें सैन्य गणलें न जाऊन हिंदी सैन्याचा एक भाग म्हणून समजण्यांत आली. व-हाड परत मिळण्याविषयीं सध्याच्या निजामानें बरीच खटपट केली पण त्याला यश आलें नाहीं. आज हा प्रांत मध्य प्रांताला जोडण्यांत आलेला असून मध्यप्रांताच्या गव्हर्नराच्या अधिकारांत हा प्रदेश आहे. तथापि कायदेशीर रीतीनें व-हाड अद्याप परकीय मुलुख म्हणूनच गणला जातो. व-हाडचें एकंदर उत्पन्न सुमारें दोन कोटी असून खर्च सव्वा कोटीचा आहे. वर्हाडच्या वसूलांतील शिलकीचा उपयोग मध्यप्रांताच्या खर्चाकडे होतो, त्यामुळें वर्हाडांत मुळींच सुधारणा होत नाहीं अशी वर्हाडी लोकांची ओरड होऊं लागल्यामुळें सध्यां वर्हाड मध्यप्रांत इलाख्याच्या खर्चाच्या रकमेंतील शें. ६२ मध्यप्रांताकरिंता व शें. ३८ वर्हाडाकरितां खर्च करावेत असें ठरलें आहे. (इं.गँ. काळे – वर्हाडचा इतिहास.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा