फॉलोअर

बुधवार, ५ एप्रिल, २०२३

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ४३

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव

भाग ४३
खानदेशचा प्राचीन इतिहास
दख्खनच्या पठाराचा खानदेश हा अगदीं उत्तरेकडील भाग होय. खानदेशांतील मुख्य नदी तापी ही होय. ती सातपुडा पर्वतांत बैतुलाजवळ उगम पावून, पूर्वखानदेश व पश्चिम खानदेश या जिल्ह्यांतून वहात जाऊन सुरतेजवळ खंबायतच्या आखातास मिळाली आहे. या शिवाय गिर्ना, बोरी, पांजरा या लहान लहान नद्या खानदेशांत आहेत. निमारपासून नंदुरबारपर्यंतचा १५० मैलांचा टापू सपाट मैदान असून त्यांतील जमीन उत्तम मळीची आहे. या टापूंत पुष्कळ संपन्न शहरें व खेडीं आहेत.
खानदेशाच्या प्राचीन इतिहासाला ख्रि. पू. १५० या वर्षांपासून सुरवात होते. याच्यापूर्वीं एके ठिकाणीं खानदेशांतील तोरणमाल व अशरिगड यांचा उल्लेख आलेला आहे. तोरणमाल व अशरिगड येथें अश्वत्थाम्याचें स्थान आहे. ख्रिस्ती शतकापूर्वीं औंधच्या राजघराण्याचे वंशज खानदेशवर राज्य करीत होते ही गोष्ट निःसंशय आहे. ख्रि. पू. १५० सालच्या एका शिलालेखावरून वरील विधानाला ऐतिहासिक पुराव्याची जोड मिळाली आहे. आंध्रांनीं खानदेश जिंकून घेऊन तो आपल्या ताब्यांत आणला. नंतर कांहीं काळांनीं पश्चिमेकडील क्षत्रपांनीं आंध्र राजाला येथून हुसकावून लावलें. पांचव्या शतकांमध्यें चालुक्यवंशीय राजांचा खानदेशवर अंमल बसला. अल्लाउद्दीन खिलजीनें १२९५ सालीं खानदेशवर स्वारी केली. त्यावेळीं खानदेश हा चव्हाणवंशीय राजाच्या ताब्यांत होता.
अल्लाउद्दीन खिलजीनें खानदेशवर स्वारी केल्यापासून तो १७६० मध्यें अशीरगडचा किल्ला मराठयांनी जिंकीपावेतों, खानदेश हा मुसुलमानी वर्चस्वाखालीं होता. दिल्ली येथें जें मुसुलमानी घराणें राज्य करीत असे त्या घराण्यांतील राजे खानदेशवर आपला सुभेदार नेमीत असत. महंमद तघलकाच्या कारकीर्दीत, खानदेशाची व्यवस्था एलिचपूर येथें असणा-या सुभेदाराकडून पाहिली जात असे. इ. स. १३७०-१६०० यांच्या दरम्यान खानदेश हा फरुकी घराण्यांतील राजांच्या ताब्यांत होता. हा फरुकी राजे जरी आपल्याला गुजराथच्या सुलतनाचे मांडलीक म्हणवीत तरी ते जवळ जवळ स्वतंत्रच असत. इ. स. १५९९ सालीं अकबरानें जातीनें खानदेशवर स्वारी केली व अशीरगड जिंकून घेऊन तेथील शहा बहादूरखान यास कैद करून किल्ल्यांत पाठविलें. खानदेश हा या वेळेपासून अकबराच्या राज्यांत मोडूं लागला. अकबरानें या प्रदेशाचा कारभार पाहण्याकरितां आपला मुलगा दानियाल यास सुभेदार नेमलें. याच्या नावांवरून कांही काळपर्यंत खानदेशला दानदेश हें नांव पडलें. १७ व्या शतकाच्या मध्यकालांत खानदेशची भरभराट झाली होती. दख्तनमधून वर हिंदुस्थानांत जाण्याचा व्यापारी मार्ग खानदेशमधून जात असल्यानें खानदेश सधन बनला होता.
१६७० मध्यें शिवाजीमहाराजांनीं आपला अधिकारी खानदेश येथें पाठवून चौथाई वसूल केली. पुढें त्यांनीं साल्हेरचा किल्ला जिंकला. शिवाजी राजे , संभाजी राजे व औरंगझेब या तिघांनींहि आपल्या अमदानींत खानदेशवर स्वारी केली. इ. स. १७२० मध्यें निझामउल्मुल्क यानें खानदेश आपल्या राज्याला जोडला. १७६० मध्यें निजामाला मराठयांनीं हांकलून लावलें व पेशव्यांनीं खानदेश आपल्या ताब्यांत घेऊन त्या मुलुखापैकीं काहीं भाग शिंदे व होळकर यांनां जहागीर दिला. इ. स. १८०२ मध्यें होळकरांच्या सैन्यानें खानदेश लुटण्यास आरंभ केला. रावबाजी यांच्या बेबंद कारभारामुळें खानदेशांत जिकडे तिकडे अव्यवस्थेचें साम्राज्य माजलें होतें. पुढे १८१८ मध्यें खानदेश हा ब्रिटिशांच्या ताब्यांत आला. पुढें कांही वर्षांनीं भिल्ल लोकांनीं बंडाचे निशाण उभारलें पण अलपिष्टन साहेबानें तें मोडून टाकलें. औटराम यानें भिल्लांनां पोलीसखात्यांत नौक-या देऊन त्यांचीं पथकें बनविलीं. १८५२ व १८५७ मध्यें पुन्हां भिल्लांनीं बंडें केलीं पण ती ताबडतोब मोडण्यांत आलीं.
खानदेशमध्यें, 'हेमाडपंती' पद्धतीचीं दगडीं देवालयें, तळीं, विहिरी जिकडे तिकडे दृष्टीस पडतात. 'हेमाडपंत' याला खानदेशमध्यें गवळीराजा असें म्हणतात. अशा हेमाडपंती इमारती खानदेशमध्यें ३९ असून त्यांपैकी ३१ देवळें, ६ पायर्यांच्या विहिरी व २ तळीं आहेत. या इमारती १३ व्या शतकांतल्या किंबहुना कांही त्याच्या पूर्वींच्याहि आहेत असें वाटतें. या हेमाडपंती इमारती मोठमोठया दगडांच्या असून हे दगड चुना न लावतां जोडण्यांत आलेले असतात. कांही कांहीं इमारतींचे दगड तर फारच मोठे असतात. या हेमाडपंती इमारतींशिवाय खानदेशमध्यें कांही मुसुलमानांच्या वेळच्या इमारतीहि आहेत. त्यामध्यें सर्वांत प्रसिद्ध म्हणजे फरकांडे येथील हलते मनोरे होत. चाळिसगांव तालुक्यांतील पितळखो-यामध्यें बौद्धकालीन एक चैत्य व कांहीं विहार आढळतात. पण ते हल्लीं जीर्णावस्थेंत आहेत. हा चैत्य व हे विहार ख्रि. पू. २ शतकांमधील असावे असें दिसतें. खो-याच्या पायथ्याशीं पाटण नांवाचें एक ओसाड खेंडे आहे. या खेडयांत कांहीं देवालयें व शिलालेख आहेत. प्रसिद्ध भास्कराचार्य ज्योतिषाचा नातू येथें रहात असे. त्याचें ज्योतिषविषयक विद्यापीठ येथें होतें. वाघळी येथें दहाव्या शतकांतील एक महादेवाचें मंदिर असून त्या मंदिराच्या भिंतीवर तीन शिलालेख आढळतात.
खानदेशाला कन्ह (कृष्ण) देश असेंहि प्राचीन नांव आहे. अश्मक म्हणून जो प्रांत महाभारतांत येतो तोच खानदेश असें कांहीचें म्हणणें आहे. खानदेशांत ख्रिस्ताच्या पहिल्या शतकांत अहीर नांवाचे राजे होते. यांनांच हल्लीं तिकडे गवळी राजे म्हणतात. प्रख्यांत अजिंठयाचीं लेणीं खानदेशांत खानदेशवर्हाडच्या सरहद्दीवर आहेत.
खानदेशांतील मुख्य जाती म्हणजे कुणबी, भिल्ल महार, मराठा, माळी, कोळी, ब्राह्मण, वाणी, तेली, सोनार, रजपूत, धनगर, वंजारी, न्हावी, चांभार, सुतार, शिंपी व मांग या होत. ब्राह्मणांच्या १३ पोटजाती आहेत. त्यांतील १० जाती मराठी भाषा बोलतात. बाकीच्या तीन जातींनां मराठी कळतें पण ते ती बोलत नाहींत. या पोटजातींत बेटीव्यवहार होत नाहीं.
खानदेशाच्या पश्चिम व दक्षिण भागांत मराठी भाषा प्रचारांत आहे. कचेर्यांतून व शाळांतून मराठी भाषा प्रचारांत आहे. खानदेशांतील लोकांची घरगुती भाषा खानदेशी असून ती मराठी, गुजराथी, नेमाडी, हिंदुस्थानी इत्यादिकांचें मिश्रण आहे. खानदेशी भाषेला अहिराणी असेंहि नांव आहे.
खानदेख हा १९०६ पूर्वीं एकच जिल्हा होता पण १९०६ सालापासून खानदेशचे पूर्व व पश्चिम असे दोन जिल्हे करण्यांत आले आहेत.
पूर्वखानदेशमध्यें अमळनेर, भुसावळ चाळिसगांव, चोपडा, एरंडोल, जळगांव, जामनेर, पाचोरा रावेर व यावल असे १० तालुके व पारोल, एदलाबाद व भडगांव हे तीन पेटे आहेत. पश्चिमखानदेशांत धुळें, नंदुरबार, पिंपळनेर, शाहाडा, शिरपूर, सिंदखेड व तलोदे असे ७ तालुके व नवापूर पेटा आहे. पूर्वखानदेशचें जळगांव व पश्चिम खानदेशचे धुळें हें मुख्य ठिकाण आहे. पूर्व खानदेशांत अमळनेर, भुसावळ, चाळीसगांव, चोपडा, धरणगांव, एरंडोल, जळगाव, पारोल, नसिराबद रावेर इत्यादि प्रमुख शहरें व पश्चिम खानदेशांत धुळें, नंदुरबार, तलोदें, शाहाडा इत्यादि शहरें आहेत.
Amit Khairnar
खरी माहिती अशी आहे
१.गुजरातचा डांग जिला हा सुध्दा खान्देशचा भाग होता.
२.खान्देशचे प्राचीन नाव अहिरवाडा असे होते.
३.खान्देशचे पहिले मराठा सुभेदार मल्हारराव होलकर होते.
४.अहिल्याबाई होलकरांनी बांधलेल्या विहिरी येथे आजही पाहयला मिळतात.
५.खान्देशची मुख्य भाषा अहिराणी आहे जी गुजराती मराठी हिंदी मिश्रित आहे अहिराणी भाषेत मराठी शब्द जास्त आहेत आणि अहिराणी भाषेतील शब्दात ग्रामीन शहरी भाग आणि जाती यानुसार बदल होतात.
६.महाभारतातील वीर एकलव्य हा खान्देशचा होता खान्देश मध्ये भील जातीचे लोकं खुप आहेत.
७.छत्रपती शिवाजी महाराज सुरत मोहिमेवर जातांना खान्देश मार्गे गेले होते.
८.पेशवा बाजीराव मल्हारराव होलकर हे मालवा मोहिमेवर असतांना काही दिवस थाळनेरच्या किल्ल्यामध्ये मुक्कामी होते मग पुढे सेंधवा गेले.
९.खान्देशची प्राचीन राजधानी असिरगड होती.
१०. ब्रिटीश काळात धुळे प्रमुख ठिकाण बनले.
११. १९९८ मध्ये धुळ्यामधून नंदुरबार जिल्हा वेगळा झाला या भागाला अदिवासी भाग म्हटले जाते.
१२. येथे प्राचीन काळात राजपूतांचे राज्य नव्हते अदिवासी,अहिर,कुणबी आणि यादवांचे राज्य होते.
१३.असिरगड हा अहिर राजांनी बांधला होता.
१४.खान्देशची स्थापना कोणी केली हे माहित नाही पण धुळे प्रांतात छोटे छोटे प्रांत होते काटवान,बागलान,माळमाता आणि इथे लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी नेमला त्यास मामलेदार म्हणत यांच्यात सटाण्याचे देवमामलेदार हे प्रसिध्द झाले.
१५.मुस्लिम सरदाराने अहिरवाडा चे नाव बदलून खानदेश केले होते.हा मुस्लिम सरदार तुगलकी असावा.जेव्हा मुहम्मद तुगलक ने राजधानी दिल्ली हून देवगीरी येते हलवण्यात आली होती तो काळ असावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...