फॉलोअर

मंगळवार, ४ एप्रिल, २०२३

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ३९

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव

भाग ३९
विदर्भ ( वऱ्हाड ) चा अतिप्राचीन इतिहास --------------------१
याच्या उत्तरेस गाविलगड व मेळघाट आणि दक्षिणेस बालाघाट (अंजठापर्वत) आहे. पूर्वेस वर्धा नदी व पश्र्चिमेस खानदेश जिल्हा आणि निजामाचें राज्य आहे. या मध्यप्रदेशाचें जुनें नांव पाइनघाट होतें; आणि मेळघाट, पाइनघाट, व बालघाट हीं तीन नांवें या प्रदेशाचे तीन स्वाभाविक भाग निर्दिष्ट करतात. वऱ्हाड या नांवाची व्युत्पत्ति निश्र्चित नाहीं. महाभारतांत विदर्भ शब्द देश व राज्यवाचक आला आहे. रूक्मिणी, शिशुपालाशीं लग्न लागण्यापूर्वी उमरावती येथील अंबा देवीच्या मंदिरांत दर्शन घेण्याकरितां गेली, तेव्हां रूक्मीराजाबरोबर पुष्कळ वऱ्हाड होतें, त्यावरून हें ‘वऱ्हाड’ नांव पडलें अशी एक दंतकथा आहे. अबुलफजल यानें हा शब्द वर्धा (नदीचें नांव) व तट म्हणजे तीर यापासून आला आहे असें म्हटलें आहे.
महाभारतांत रूक्मिणीच्या बापाचें व भावाचें विदर्भात राज्य होतें असें म्हटलें आहे. तसेंच विदर्भाचा उल्लेख नलदमयंती आख्यानांतहि आला आहे. विदर्भराजा भीम याची दमयंती ही कन्या होती. विदर्भ राज्याची राजधानी विदर्भ नांवाचें शहरच होंती. हें शहर हल्लीच्या निजामच्या मुलुखांतील ‘बेदर’ होय असें म्हणतात, व तें खरें असल्यास विदर्भ राज्य फार विस्तीर्ण होतें असें ठरतें. भागवतांत, बृहत्संहितेंत व नाशिकाच्या लेण्यांतील शिलालेखांत विदर्भ नांव येतें. वऱ्हाडचा खरा इतिहास आंध्र अथवा सातवाहन राजांच्या इतिहासाबरोबर सुरू होतो. त्यांच्या राज्यांमध्यें ह्याचा समावेश होत होता. ख्रि. पू. तिंसऱ्या शतकांत आंध्र लोकांनी गोदावरी व कृष्णा नदीच्या कांठचा प्रदेश व्यापिला होता. अशोकाच्या मुत्यूनंतर हे लोक जास्त प्रबल झाले व त्यांनी वऱ्हाडपर्येतचा प्रदेश हस्तगत केला. त्यानंतर हा प्रांत वाकाटक व आभीर उर्फ अहीर राजवंशाकडे होता. पुढें पुष्कळ कालपर्येत वऱ्हाडांतील महत्त्वाचे किल्ले अहीर (गवळी) राजांनीं ताब्यांत ठेविले; उदाहरणार्थ खानदेशांतील गवळीगड, मध्यप्रांतांतील अशीरगड व वऱ्हाडांतील गाविलगड. अहिरानंतर चालुक्य, नंतर राष्ट्रकूट, पुन्हां चालुक्य व देवगिरीकर यादव यांचा अंमल वऱ्हाडावर होता. पुढें अल्लाउद्दीन खिलजीनें १२९४ सालीं चंदेरी व एलिचपूरकडून दख्खनवर स्वारी केली.१३१६ सालीं देवगिरीच्या हरपाळदेवानें स्वतंत्रता धारण केली, म्हणून १३१७-१८ त मुबारकशहानें त्याला ठार मारलें व त्याचें राज्य खालसा केलें. अशा रीतीनें मुसुलमानांच्या ताब्यांत वऱ्हाड गेला. महंमद तुष्लकाच्या कारकीर्दीत वऱ्हाडास फार महत्त्व आलें होतें. १३४८ त बहामनी राज्य स्थापन झाल्यावर पुढें वऱ्हाड हा एक सुभा होता. त्यांत माहूर, रामगड व पाथरी यांचा समावेश होई. बहामनी राजांनी पुढें जीं युध्दें केलीं त्यांकरितां सैन्य वऱ्हाडांतून मिळत असे. १४७८ अथवा १४७९ सालीं वऱ्हाडचे राज्यकारभराकरितां दोन भाग झाले व ते आपल्या राजधानीच्या नांवानें प्रसिध्द आहेत: एक गाविल (उत्तारेकडील) व दुसरें माहूर (दक्षिणेकडील). याच वेळेस प्रांताच्या सुभेदाराचे अधिकार कमी होऊन सर्व महत्त्वाचे किल्ले किल्लेदारांच्या ताब्यांत आले. हे किल्लेदार खुद्द सुलतानच्या हाताखालचे असून त्यांचाच हुकूम पाळीत. पुढें गाविलगडाच्या सुभेदारानें १४९० सालीं स्वतंत्र होऊन आपल्या राज्यास माहूर जोडले; या सुभेदाराचें नांव इमादउल्मुल्क असून तो मूळचा कानडी हिंदु होता; त्याला वऱ्हाडच्या एका मुसुलमान सुभेदारानें विजयानगरच्या स्वारींत बाटविलें होतें. १५०४ त इमादउल्मुक वारल्यावर त्याचा मुलगा अल्लाउद्दीन गादीवर बसला; त्यानें गाविलगड राजधानी केली. १५२९ सालीं त्याच्यानंतर त्याचा मुलगा दर्याशहा त्याची कारकीर्द शांतपणें गेली. त्याचा मुलगा बुऱ्हाणशहा (१५६०-६१) याच्या वेळीं त्याचा प्रधान तुफालखाल यानें बंड करून त्यास नर्नाळा किल्ल्यांत कैदी केलें. १५७२ साली अहमदनगरच्या मुर्तुजा निजामशहानें बुऱ्हाणास सोडविण्याच्या मिषानें वऱ्हाडवर स्वारी केली व तुफालखान, त्याचा मुलगा आणि बुऱ्हाण यांनां पकडून ठार केलें. अशा रीतीनें वऱ्हांडातील इमामशाहीचा ८५ वर्षानंतर शेवट झाला. याप्रमाणें वऱ्हाड जरी निजामशाहीकडे गेलें तरी तिच्या आपसांतील भांडणामुळें १५९६ मध्यें सुलतान मुराद यानें वऱ्हाड जिंकून घेतलें. जरी वऱ्हाडांत वेगवेगळे राजे आले तरी त्यांनी पूर्वीची, परगण्यांतील व खेडयांतील वसून गोळा करणें ही व इतर हिंदूची राज्यव्यवस्थापध्दति कायम ठेविली; औरंगझेबानें मात्र पुष्कळ देशमुख, देशपांडयांनां वाटविलें. ते अध्याप गोमांस खात नाहींत व त्यांची नांवेंहि हिंदूसारखीं आहेत; मोंगलराज्यास वऱ्हाड जोडल्यानंतर मुरादानें बाळापुरापासून ६ मैलांवर शहापूर नांवाचें शहर वसविलें व तेथें आपला तळ दिला; व नवीन जिंकलेला प्रांत मोंगल सरदारांस वाटून दिला. १५९८ मध्यें मुरादच्या मृत्यूनंतर अकबरनें अहमदनगर जिंकल्यानंतर अहमदनगर, खानदेश, व वऱ्हाडची सुभेदारी दानियल यास दिली. त्याच्या मागें वऱ्हाड हें मलिक अंबरनें पुन्हां जिंकून निजामशाहींत दाखल केलें, पण शहाजहानच्या कारकीर्दीच्या पहिल्या वर्षी पुन्हां वऱ्हाड मोंगलांच्या ताब्यांत आलें. १६३६ मध्यें मोगलांच्या दख्खनच्या चार सुभ्यापैकीं वऱ्हाड एक होता तेव्हां त्याची राजधानी एलिचपूर व मुख्य किल्ला गाविलगड होता. या चार सुभ्यांचा सुभेदार औरंगझेब होता. तेव्हां मराठयांनीं वऱ्हाडवर बऱ्याच स्वाऱ्या केल्या व पुष्कळ खंडणी घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...