संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव
महाराष्ट्रात सातवाहनवंशाचा उदयकाळ ------------१
सातवाहन वंश :
प्राचीन भारतातील एक बलाढ्य सुप्रसिद्घ राजवंश. या वंशातील राजांनी इ. स. पू. सु. दुसऱ्या शतकापासून इ. स. तिसऱ्या शतकादरम्यान मुख्यत्वे महाराष्ट्रात अधिसत्ता गाजविली. या वंशाविषयीची माहिती मुख्यत्वे त्यांची नाणी, शिलालेख, रुद्रदामनचा जुनागढ येथील प्रस्तरलेख, आपस्तंब धर्मसूत्र, वायु, विष्णु, मत्स्य आदी पुराणे जैन ग्रंथ वगैरेंतून मिळते. या वंशाच्या मूलस्थानाबद्दल आणि नावाबद्दलही विद्वानांत मतभेद आहेत. तसेच या राजवंशाच्या कालखंडाबद्दल आणि राजांच्या एकूण संख्येबद्दल विद्वानांत एकमत नाही. पुराणांतील राजांची काही नावे तत्कालीन कोरीव लेखांतल्या पुराव्याशी जुळत नाहीत तथापि सामान्यतः या वंशातील तीस राजांनी सु. ४५० वर्षे राज्य केले असे मानण्यास हरकत नाही. पुराणांत या राजांना आंध्र किंवा आंध्रभृत्य म्हटले आहे परंतु त्यांचे आरंभीचे लेख व नाणी महाराष्ट्रात उपलब्ध झाली, त्यांवरून त्याचा उदय महाराष्ट्रात झाला असावा. पुराणांतील वंशावळी लिहिल्या गेल्या त्यावेळी त्यांची सत्ता आंध्र प्रदेशावर पसरली होती म्हणून त्यांना पुराणांत आंध्र वा आंध्रभृत्य अशी नावे मिळाली असावीत.
सम्राट अशोकाच्या निधनानंतर (इ. स. पू. २३२) हा वंश उदयाला आला असावा. या वंशाला कोरीव लेखात ‘सातवाहन कुल’ असे म्हटले आहे, त्यावरून त्याचा संस्थापक कोणी सातवाहन राजा असावा. या सातवाहन राजाची प्रारंभीची नाणी मराठवाड्यात व विदर्भात सापडली आहेत. नेवासे येथील उत्खननांतही ती सापडली आहेत. या पुराव्यांवरून त्यांची सत्ता इ. स. पू. तिसऱ्या-दुसऱ्या शतकांत होती असे दिसते.
सातवाहन हा या वंशाचा उत्पादक असला, तरी त्याचा नामनिर्देश पुराणांत आढळत नाही कारण आरंभी त्याचे राज्य बरेच मर्यादित असावे तथापि त्याने महाराष्ट्रातील महारठी व महाभोजी अधिपतींशी सख्य आणि वैवाहिक संबंध जोडून ते लवकरच वाढविले असावेत. त्याच्यानंतर बहुधा तिसऱ्या पिढीतील सिमुक (श्रीमुख) याचे नाव या वंशाचा उत्पादक म्हणून पुराणांत येते. तो इ. स. पू. २०० च्या सुमारास राज्य करू लागला असावा. जुन्नरजवळ नाणेघाटातील लेण्यात त्याचा पुतळा कोरून त्याखाली त्याचे नाव ‘सिमुक सातवाहन’ असे कोरले होते. तसेच त्याचा पुत्र सातकर्णी, सून नागनिका व काही राजपुत्र यांचेही पुतळे तेथेच कोरून त्यांच्या पीठांवर त्यांची नावे कोरली होती. सर्व पुतळे आता नष्ट झाले आहेत पण त्यांची नावे अवशिष्ट आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा