संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव
महाराष्ट्रात सातवाहनवंशाचा उदयकाळ ------------२
सातवाहन वंश :
सिमुकाने २३ वर्षे राज्य केले असे पुराणे सांगतात. त्याच्या राज्यात पुणे, नासिक, अहमदनगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांचा अंतर्भाव होता. त्याची राजधानी प्रतिष्ठान (औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण) येथे होती असे दिसते.
सिमुकाच्या निधनाच्या वेळी त्याचा पुत्र प्रथम सातकर्णी (कार. इ. स. पू. २००–१७७ ) हा अल्पवयस्क असल्यामुळे सिमुकाचा भाऊ कृष्ण हा गादीवर आला. त्याच्या अमात्याने नासिकजवळच्या ‘पांडवलेण्यां’तील एक लेणे कोरवून ते बौद्घ भिक्षूंना अर्पण केले, असे तेथील कोरीव लेखावरून कळते. या लेखात कृष्णाचा निर्देश ‘सातवाहन कुलातील कृष्ण राजा राज्य करीत असता’ असा केला असल्याने तो सातवाहन राजाचा पुत्र नसून बहुधा तिसऱ्या पिढीतील त्यांचा वंशज असावा.
कृष्णानंतर प्रथम सातकर्णी गादीवर आला. पुराणांत याला कृष्णाचा पुत्र म्हटले आहे तथापि नाणेघाटात सिमुक, सातकर्णी, त्याची राणी नागनिका, तिचे पुत्र वगैरेंचे पुतळे कोरले होते पण त्यांमध्ये कृष्णाचा पुतळा नव्हता. त्यावरून सातकर्णी हा सिमुकाचा पुत्र असावा.
सातकर्णीने नर्मदा नदीच्या उत्तरेस आपल्या राज्याचा विस्तार केला. सांचीच्या तोरणावर त्याचा नामनिर्देश आहे. तत्कालीन कलिंगनृपती खारवेल याने त्याच्या राज्यावर स्वारी करण्याकरिता चतुरंग सेना पाठविली होती पण ती नागपूरजवळच्या कन्हान (कृष्णवेणा) नदीजवळ आल्यावर बहुधा सातकर्णीच्या सेनेच्या आगमनाची वार्ता मिळाल्यावर तिला परत फिरावे लागले.
सातकर्णीने नागाधिपती महारठी कळलाय याची कन्या नागनिका हिच्याशी विवाह केला होता. त्याने दोनदा अश्वमेध करून दक्षिणेतील आपले सार्वभौमत्व प्रस्थापित केले. याशिवाय त्याने राजसूय, अग्न्याधेय, आप्तोर्याम, दशरात्र, त्रयोदशरात्र, अंगिरसत्रिरात्र, गवामयन इ. अनेक श्रौत याग करून बाह्मणांना हजारो गाई, हत्ती, घोडे, कार्षापणनामक तत्कालीन नाणी दान दिली. त्यांचा तपशील नागनिकेच्या नाणेघाटातील लेखांत दिला आहे. सातकर्णीच्या नाण्यांच्या प्राप्तिस्थानावरून त्याचे राज्य मध्य महाराष्ट्र, पश्चिम आंध्र व माळवा अशा विस्तृत प्रदेशांवर होते. तसेच नाणेघाट लेखाच्या आरंभी इंद्र, धर्म, संकर्षण, वासुदेव व चार लोकपालांचा उल्लेख आला आहे. त्यावरून सातकर्णी भागवत संप्रदायाचा अनुयायी असावा, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.
सातकर्णीला वेदिश्री आणि शक्तिश्री असे दोन पुत्र होते. पुराणांत यांच्या ऐवजी पूर्णोत्संग आणि स्कंदस्तंभी अशी नावे आढळतात. अनेक विद्वानांनी वेदिश्री हा अल्पवयस्क असल्यामुळे नागनिका काही काळ राज्यकारभार पाहात होती असे म्हटले आहे पण ते बरोबर दिसत नाही. नाणेघाटातील लेखात तिचे वर्णन ‘महिना-महिना उपोषण करणारी, गृहतापसी, ब्रह्मचर्यव्रताचे पालन करणारी, दीक्षा, व्रत आणि यज्ञ यांच्या अनुष्ठानांत निपुण’ असे केले आहे. त्यावरून ती त्या काळी आपले जीवन धार्मिक वृत्तीने घालवीत होती, यात संशय नाही. त्या काळी तिचा ज्येष्ठ पुत्र वेदिश्री हा राज्य करीत होता. त्याचे वर्णन नाणेघाटातील लेखात ‘दक्षिणापथपति’ असे केले आहे. [⟶ नागनिका].
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा