संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव
महाराष्ट्रात सातवाहनवंशाचा उदयकाळ ------------४
सातवाहन वंश :
गौतमीपुत्रानंतर त्याचा ज्येष्ठ पुत्र वासिष्ठीपुत्र पुळुमावी (कार. इ. स. १०६–१३०) हा गादीवर आला. याचेही राज्य बरेच विस्तृत होते पण शकक्षत्रप चेष्टनाने उत्तरेतील सुराष्ट्र आणि आकरावन्ती हे देश परत जिंकून घेतले होते. टॉलेमीने (इ. स. १४०) याचा ‘प्रतिष्ठानाधिपति’ म्हणून उल्लेख केला आहे. याने अठ्ठावीस वर्षे राज्य केले असे पुराणांत म्हटले आहे.
वासिष्ठीपुत्र पुळुमावीनंतर त्याचा भाऊ वासिष्ठपुत्र सातकर्णी (कार. इ. स. सु. १३०–१५९) हा गादीवर आला. त्याने माळवा-काठेवाड या देशांचा अधिपती प्रथम रुद्रदामन याच्या कन्येशी विवाह केला होता, असे कान्हेरी येथील लेण्यांतील लेखावरून समजते.
यानंतरचा बलाढ्य नृपती यज्ञश्री सातकर्णी हा होय.याचे कोरीव लेख व नाणी पश्चिमेत कोकणपासून पूर्वेस आंध्रापर्यंत सापडली आहेत. त्यांवरून त्याच्या विस्तृत साम्राज्याची कल्पना येते. याने क्षत्रपांकडून जिंकलेल्या प्रदेशाकरिता त्यांच्या नाण्यांसारखी चांदीची नाणी आणि पूर्वेच्या कोरोमंडल किनाऱ्यावरील प्रदेशाकरिता दोन शिडांचे जहाज असलेली शिशाची नाणी पाडली होती.
यज्ञश्री सातकर्णीनंतर विजय सातकर्णी, चंडश्री (चंद्रश्री) आणि पुळुमावी यांची नावे पुराणांत येतात. याशिवाय स्कंद सातकर्णी, कुम्भ सातकर्णी, शक सातकर्णी वगैरे काही राजांची पोटिन धातूची नाणी अकोला जिल्ह्यात तऱ्हाळा येथे काही वर्षांपूर्वी सापडली होती तथापि यज्ञश्रीनंतर सु. ५० वर्षांत (इ. स. २५० च्या सुमारास) सातवाहन घराण्यास उतरती कळा लागली. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात आभीरांचे व विदर्भात वाकाटकांचे राज्य आले. दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर-सातारा भागांत ‘कुर’ घराण्यातील सातवाहनांचे मांडलिक घराणे राज्य करीत होते, असे काही नाण्यांवरून ज्ञात झाले आहे.
सातवाहन राजांच्या कारकीर्दीत महाराष्ट्रात विविध क्षेत्रांत प्रगती झाली. सातवाहनांचा धर्म आणि वाङ्मय यांना उदार आश्रय होता. आरंभीच्या काही राजांनी श्रौत यज्ञ करून ब्राह्मणांवर विविध दानांचा वर्षाव केला होता. त्याचा उल्लेख नाणेघाटातील लेखात आहे. त्यांचा बौद्घ धर्मालाही आश्रय होता. कृष्ण, गौतमीपुत्र सातकर्णी, पुळुमावी आणि यज्ञश्री सातकर्णी यांनी बौद्घ भिक्षूंकरिता लेणी कोरवून ग्रामदाने दिल्याचे उल्लेख कोरीव लेखांत आले आहेत. अशी अनेक लेणी महाराष्ट्रात भाजे, कोंडाणे, कऱ्हाड, बेडसा, कार्ले, नासिक, जुन्नर, पितळखोरे, अजिंठा वगैरे ठिकाणी अद्यापि विद्यमान आहेत. त्यांतील लेखांवरून राजांपासून सामान्य ग्रामिकांपर्यंत विविध श्रेणींच्या आणि धंद्यांच्या लोकांनी दाने देऊन ती कोरविली आणि शिल्पे, चित्रे इत्यादींनी ती भूषविली होती असे दिसते. कार्ले-भाजे ही लेणी शिल्पशैलीच्या दृष्टीने लक्षणीय असून येथील बौद्घ शिल्पे तसेच स्त्रीपुरुष नर्तकांची दंपती व मिथुन शिल्पे लक्षणीय आहेत. ही लेणी बौद्घ धर्माच्या हीनयान पंथाची आहेत. त्यांतील काही ‘चैत्य’ व इतर काही ‘विहार’ प्रकारची आहेत. त्यांतील काही चित्रांत गौतम बुद्घांच्या चरित्रातील प्रसंग आणि इतर काहींत जातककथा दाखविल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा