फॉलोअर

बुधवार, ५ एप्रिल, २०२३

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ५३

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव




भाग ५३
महाराष्ट्रात सातवाहनवंशाचा उदयकाळ ------------५
सातवाहन वंश :
पोस्तसांभार :: मिराशी, वा. वि.
सातवाहनांचा प्राकृत वाङ्‌मयालाही उदार आश्रय होता. एका सातवाहन राजाने आपल्या अंतःपुरात प्राकृत भाषेचाच उपयोग केला पाहिजे, अशी आज्ञा काढली होती असे राजशेखर सांगतो. या कालातील हाल नृपतीने कोट्यवधी गाथांतून सातशे गाथा निवडून त्यांचा संग्रह गाहा सत्तसई (गाथा सप्तशती ) नावाने प्रसिद्घ केला होता. त्यांतील गाथा विविध दर्जाच्या कवींनी रचल्या होत्या. त्यांत कवींप्रमाणे काही कवयित्रीही होत्या. या कालातील दुसरा सुप्रसिद्घ प्राकृत ग्रंथ बृहत्कथा हा होय. हा आता उपलब्ध नाही पण त्याची इ. स. अकराव्या शतकात सोमदेव आणि क्षेमेंद्र यांनी अनुक्रमे केलेली कथासरित्सागर आणि बृहत्कथामंजरी ही संस्कृत रूपांतरे प्रसिद्घ आहेत. त्यांतील कथेवरून गुणाढ्य हा विदर्भातील सुप्रतिष्ठ नगराचा रहिवासी असून राजाश्रयार्थ सातवाहनांच्या प्रतिष्ठान नगरीस गेला होता असे समजते.
सातवाहन काळात दीर्घकाळ शांतता आणि समृद्घी नांदली. सातवाहन राजांनी यज्ञयागांप्रमाणेच लोककल्याणार्थ पूर्तकर्मे (वापी, कूप, तडाग इ.) केली. नासिकच्या देवी लेण्यातील लेखात ऋषभदत्त म्हणतो की, भरुकच्छ (भडोच), दशपूर (मंदसोर), गोवर्धन आणि शुर्पारक (सोपारा) येथे प्रवाशांकरिता धर्मशाळा बांधल्या. तसेच बगीचे, तलाव, पाणवठे निर्माण केले होते इबा, पारदा, दमण, तापी, करबेणा आणि दाहनुका या नद्या पार करण्याकरिता धर्मार्थ तरींची सोय केली होती. शिवाय या नद्यांच्या दोन्ही तीरांवर विश्रांतिगृहे उभारली होती आणि पाणपोया घातल्या होत्या. तत्कालीन आपस्तंब धर्मसूत्रावरून असे दिसते की, त्या काळच्या न्यायदानात पुरुषवध, चौर्य, भूमीचा अपहार या गुन्ह्यांबद्दल कठोर शिक्षा होत्या. अपराध्याची मालमत्ता जप्त करून त्याला देहान्ताची सजा दिली जाई. याशिवाय या आपस्तंब धर्मसूत्रात परिश्रमाचे मूल्यवर्णन केले असून परिश्रम न केल्यामुळे जमिनीतून उत्पन्न कमी आल्यास नुकसानभरपाई वसूल करावी, तसेच शेतावरील कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्यास त्यांना दंडताडन करावे असेही सांगितले आहे.
या काळात व्यापार भरभराटीत असल्याचे दाखले मिळतात. तत्कालीन राजधानी प्रतिष्ठान हे व्यापारी मार्गांचे मुख्य केंद्र झाले होते. कल्याण, चौल, सोपारा इ. महत्त्वाची बंदरे सागरी व्यापार हाताळीत होती. याउलट जुन्नर, नासिक, पैठण, तेर (तगर), भोकरदन आणि कोल्हापूर (ब्रह्मपुरी) ही महत्त्वाची व्यापारी व राजकीय केंद्रे होती. उत्तरेतील उज्जयिनी आणि पश्चिमेतील नासिक, कल्याण, शूर्पारक, भरुकच्छ इ. नगरे व बंदरे व्यापारी मार्गांनी जोडली होती. प्रतिष्ठान व तेर येथून विविध प्रकारचे मणी, मलमलीसारखे तलम कापड आणि विविध प्रकारचा माल गाड्यांतून पश्चिमेकडील बंदरांना पोहोचविला जात असे, असे पेरिप्लस ऑफ द एरिथ्रिअन सी या ग्रंथावरून समजते. सातवाहनांच्या राज्यात तीस तटबंदीयुक्त नगरे होती, असे उल्लेख परदेशी प्रवाशांनी नोंदविले आहेत. व्यापाराबरोबरच सातवाहन साम्राज्यात कलाकेंद्रेही उदयास आली. या ठिकाणी झालेल्या उत्खननांत काही हस्तीदंती मूर्ती, रोमन मद्यकुंभ (ॲम्फोरा) व इतर अनेक वस्तू मिळाल्या. भोकरदन व तेर येथील उत्खननांत काही हस्तिदंती स्त्रीमूर्ती मिळाल्या असून त्या इटलीतील पाँपेई येथील स्त्रीमूर्तींशी साधर्म्य दर्शवितात. यांशिवाय काही रोमन नाणी आणि देवतांचे ब्राँझ पुतळे मिळाले. त्यांवरून सातवाहन साम्राज्याचा रोमन साम्राज्याशी व्यापारी संबंध होता, हे स्पष्ट होते. (चित्रपत्र).
पहा : कार्ले गौतमीपुत्र सातकर्णि तेर नागनिका पुळुमावि (यि) पैठण ब्रह्मपुरी (कोल्हापूर) भोकरदन.
संदर्भ : 1. Majumdar, R. C. Pusalker, A. D. Eds. The History and Culture of the Indian People, The Age of Imperial Unity, Vol. II, Bombay, 1998.
2. Sastri, Nilakanta K. A. Ed. A Comprehensive History of India, Vol. 2, Bombay, 1957.
3. Yazdani, Gulam, Ed. Early History of the Deccan, Vol. I and II, London, 1960.
४. मिराशी, वा. वि. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख, मुंबई, १९७९.
मिराशी, वा. वि.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...