संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव
कलचुरी वंश--------------------------२
वामदेवाच्या वंशजांनी त्रिपुरी येथे दीर्घकाल राज्य केले. त्यांना डाहल किंवा चेदी देशाचे कलचुरी म्हणतात. नवव्या शतकाच्या उत्तरार्धात या वंशात पहिला कोकल्लदेव (सु. ८५०-८९०) हा बलाढ्य राजा होऊन गेला. त्याने कनौजचा प्रतिहार भोज, शरयूपारचा शंकरगण, चित्रकूटाचा गुहिल हर्ष, मान्यखेटचा राष्ट्रकूट द्वितीय कृष्ण यांना अभय दिल्याचे वर्णन आहे. याचा पुत्र शंकरगण (सु. ८९०-९१०) हा राष्ट्रकूटांच्या बाजूने वेंगीच्या पूर्व चालुक्यांशी लढत होता.
कोकल्लाने आपली कन्या राष्ट्रकूट दुसरा कृष्ण याला दिली होती. त्यानंतर अनेक पिढ्यांत मान्यखेटचे राष्ट्रकूट आणि त्रिपुरीचे कलचुरी यांमध्ये असेच शरीरसंबंध झाले आणि कलचुरींनी राष्ट्रकूटांना त्यांच्या स्वायांत मदत केली. ९१५ मध्ये राष्ट्रकूट तिसरा इंद्र याने कनौजवर स्वारी करून ते नगर उद्ध्वस्त केले, तेव्हा त्रिपुरीचा पहिला युवराजदेव (सु. ९१५-९४५) त्याच्याबरोबर होता. या विजयानंतर कनौज येथे प्रतिहारांच्या आश्रयास असलेला संस्कृत कवी राजशेखर त्रिपुरीस आला. तेथे त्याने विद्धशालमंजिका,काव्यमीमांसा आणि हरविलास हे ग्रंथ लिहिले.
युवराजदेवाने आपला जामात राष्ट्रकूट बद्दिग उर्फ तिसरा अमोघवर्ष याचा पक्ष घेऊन मान्यखेटवर चाल केली. वाटेत अचलपूरजवळ पयोष्णी (पूर्णा) नदीच्या काठी घनघोर युद्ध होऊन त्याला जय मिळाला. त्या विजयोत्सवाच्या प्रसंगी राजशेखराचे विद्धशालमंजिका नाटक त्रिपुरी येथे प्रथम रंगभूमीवर आले.
अकराव्या शतकात या वंशात गांगेयदेव (सु. १०२५-१०४१) नामक महाप्रतापी राजा झाला. त्याचा उल्लेख अल्-बीरूनीने केला आहे.त्याने आपली सत्ता प्रयाग व वाराणसीपर्यंत पसरवून या तीर्थक्षेत्रांचे मुसलमानांपासून रक्षण केले. याची उत्तरकालीन चालुक्यजयसिंह, धारचा परमार भोज, दक्षिण कोसलचा (छत्तीसगढ-संबळपूर) महाशिवगुप्त ययाती इत्यादिकांशी युद्धे झाली होती. त्याने‘विक्रमादित्य’ ही पदवी धारण केली होती. हा प्रयाग येथे अक्षय्यवटानजीक मृत्यू पावला, तेव्हा त्याच्या शंभर राण्या सती गेल्या; असेकोरीव लेखात वर्णन आहे, पण ते अतिशयोक्तिपूर्ण वाटते.
गांगेयदेवाचा पुत्र कर्ण (सु. १०४१-१०७३) हा पित्यापेक्षा बलाढ्य आणि महत्त्वाकांक्षी निघाला. त्याने भोजाच्या मृत्यूनंतर माळवाजिंकला. चंदेल्ल राजा देववर्मा याला ठार मारून त्याचे राज्यही जिंकले. बंगालच्या तृतीय विग्रहपालाचा पराभव केला आणि याविजयांचा द्योतक असा १०५२ मध्ये आपणास दुसरा राज्याभिषेक करवून घेतला. त्याला इतिहासकारांनी ‘भारतीय नेपोलियन’ अशीपदवी दिली आहे. नेपोलियनप्रमाणे यालाही आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस विजयश्री चंचल असल्याचा प्रत्यय आला आणि चंदेल्लराजांनी आपली राज्ये जिंकून परत घेतली. शेवटी त्याच्या शत्रूंनी त्याला इतके नामोहरम केले की, त्याला आपला पुत्र यशःकर्ण यालाराज्याभिषेक करावा लागला.
कर्णानंतर त्रिपुरीच्या कलचुरींचा र्हास होत गेला आणि १२१० च्या सुमारास चंदेल्ल राजा त्रैलोक्यवर्मा याने त्रिपुरी काबीज करूनत्यांचे राज्य खालसा केले.
त्रिपुरीचे कलचुरी शिवोपासक होते. त्यांनी मत्तमयूर नामक शैव पंथाच्या आचार्यांना आदराने आपल्या राज्यात बोलावूनत्यांच्याकरिता शिवालये व मठ बांधले व त्यांच्या योगक्षेमाकरिता अनेक गावे दान केली. कर्णाने वाराणसी येथे ‘मेरु’ पद्धतीचे बाराकिंवा सोळा मजल्यांचे शिवालय बांधले. त्याच्या आश्रयास विद्यापती, गंगाधर, बिल्हण, वल्लण, नाचिराज वगैरे अनेक संस्कृत कवीहोते. गांगेयदेवाने आपल्या नावे विशिष्ट प्रकारची सोन्याची नाणी पाडली. त्याचे अनुकरण अनेक उत्तर भारतीय राजांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा